त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले
एलीया खऱ्या देवाला उंचावतो
इस्राएलमध्ये त्याचा कसून तपास चालला होता. तो राजाच्या हाती लागला असता तर राजा त्याला नक्कीच ठार मारणार होता. हा कोण होता ज्याच्या मागावर सर्व होते? यहोवाचा संदेष्टा एलीया.
राजा अहाब आणि त्याची मूर्तीपूजक पत्नी ईजबेलीने इस्राएलमध्ये बआल उपासना पसरवली होती. यामुळे, यहोवाने त्या देशावर दुष्काळ आणला आणि दुष्काळाचे हे चौथे वर्ष चालू होते. तीळपापड झालेल्या ईजबेलीने यहोवाच्या संदेष्ट्यांना मारण्याचा बेत केला, पण अहाबाला खासकरून एलीया हवा होता. तीनपेक्षा अधिक वर्षांपूर्वी एलीयानेच अहाबाला म्हटले होते की: “जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पर्जन्य पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.” (१ राजे १७:१) यामुळे आलेला दुष्काळ अजूनही होता.
अशा भयानक परिस्थितीत, एलीयाला यहोवाने म्हटले: “जा, अहाबाच्या दृष्टीस पड; मी पृथ्वीवर पर्जन्यवृष्टि करणार आहे.” स्वतःचा जीव धोक्यात घालून एलीयाने यहोवाच्या आज्ञेचे पालन केले.—१ राजे १८:१, २.
दोन विरोधकांची भेट
एलीयाला पाहताक्षणी अहाबाने विचारले, “इस्राएलास छळणारा तो तूच ना?” एलीयाने निर्भीडपणे उत्तर दिले: “मी इस्राएलास छळिले नाही; तर तू व तुझ्या वडिलांच्या घराण्याने परमेश्वराच्या आज्ञा मानावयाचे सोडून बआलमूर्तीच्या नादी लागून इस्राएलास छळिले आहे.” मग एलीयाने सूचना दिली, की ‘बआलमूर्तीचे साडेचारशे संदेष्टे आणि अशेरा मूर्तीचे चारशे संदेष्टे’ यांच्या समवेत सर्व इस्राएली लोकांनी कर्मेल डोंगरावर एकत्र जमावे. मग एलीया जमलेल्या समूहाला म्हणाला: “तुम्ही दोहो मतांमध्ये कोठवर लटपटाल [“लंगडाल,” NW]?a परमेश्वर [“यहोवा,” NW] हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.”—१ राजे १८:१७-२१.
लोक निःशब्द झाले. आपण यहोवाला अनन्य भक्ती देत नाही हे त्यांच्या कदाचित लक्षात आले असावे. (उत्पत्ति २०:४, ५) किंवा कदाचित त्यांचा विवेक इतका निगरगट्ट झाला असावा, की यहोवा आणि बआल यांच्यात आपली निष्ठा विभागण्यात त्यांना काही गैर वाटत नव्हते. काहीही असो, एलीयाने लोकांना एक बआल संदेष्ट्यांसाठी आणि एक स्वतःसाठी असे दोन जवान गोऱ्हे आणण्यास सांगितले. दोन्ही गोऱ्हे अर्पणासाठी तयार करण्यात येणार होते, पण त्यांना आग लावावयाची नव्हती. एलीया म्हणाला: “तुम्ही आपल्या देवाचे नाम घ्या आणि मी परमेश्वराचे [यहोवाचे] नाम घेतो; जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच [खरा] देव ठरावा.”—१ राजे १८:२३, २४.
यहोवाला उंचावले जाते
बआल संदेष्टे “जी वेदी त्यांनी केली होती तिच्याभोवती ते नाचूबागडू लागले.” सकाळपासून ते ओरडत राहिले: “हे बआला, आमचे ऐक!” पण बआलाने काही तोंड उघडले नाही. (१ राजे १८:२६) मग एलीयाने त्यांची थट्टा करीत म्हटले: “मोठ्याने पुकारा, देवच तो!” (१ राजे १८:२७) बआल संदेष्टे सुऱ्यांनी व भाल्यांनी स्वतःस घाव करून घेऊ लागले—त्यांच्या दैवतांना दया यावी म्हणून मूर्तीपूजक सहसा ही प्रथा आचरीत असत.b—१ राजे १८:२८.
आतापर्यंत दुपार टळून गेली होती आणि बआलाचे उपासक अजूनही “स्वतःला संदेष्टे समजत होते” [NW]—हा वाक्यप्रचार या संदर्भात, निरर्थक बडबड करीत राहणे व स्वतःवरचा ताबा सुटल्याप्रमाणे बडबडत राहण्याचा अर्थ देतो. संध्याकाळी एलीया शेवटी लोकांना म्हणाला: “माझ्याजवळ या.” एलीयाने यहोवाची वेदी दुरुस्त केली, तिच्याभोवती खळगा खणला, जवान गोऱ्ह्याचे लहान लहान तुकडे कापून वेदीवरील इंधनावर त्यांना रचून ठेवले; हे सर्व काही लोक लक्ष देऊन पाहत होते. नंतर, गोऱ्हा, वेदी आणि इंधन यांना चिंब भिजवण्यात आले. (निःसंशये, भूमध्य समुद्राच्या पाण्याने) वेदीभोवती खणलेले खळगे भरण्यात आले. मग, एलीयाने यहोवाला प्रार्थना केली: “इस्राएलांमध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांस विदित कर. हे परमेश्वरा, [यहोवा] ऐक, माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदये पराङ्मुख केली आहेस, याची या लोकांस जाणीव होऊ दे.”—१ राजे १८:२९-३७.
अचानक स्वर्गातून अग्नी उतरला आणि “त्याने होमबलि, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकिली आणि त्या खळगीतले पाणी चाटिले.” हे पाहणारे सर्व लोक पटापट पालथे पडून म्हणाले: “परमेश्वर [यहोवा] हाच देव! परमेश्वर हाच देव!” एलीयाच्या आज्ञेवरून बआलाच्या संदेष्ट्यांना पकडून किशोन ओहळानजीक आणून त्यांचा वध करण्यात आला.—१ राजे १८:३८-४०.
आपल्याकरता धडा
एलीयाने जणू काय ईश्वरी धैर्य दाखवले होते. पण, बायबल लेखक याकोब आपल्याला आश्वासन देतो, की “एलीया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता.” (याकूब ५:१७) त्याच्याही मनात भीती होती चिंता होती. जसे की, बआल संदेष्ट्यांना गमावल्याचा सूड घेण्याची ईजबेलीने शपथ घेतली तेव्हा एलीया आपला जीव मुठीत धरून तेथून पळून गेला आणि यहोवाला त्याने विनंती केली: “हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर.”—१ राजे १९:४.
यहोवाने काही एलीयाचा अंत केला नाही. उलट, त्याला प्रेमळपणे साहाय्य केले. (१ राजे १९:५-८) आज यहोवाचे सेवक देखील, कदाचित विरोधामुळे होणाऱ्या तीव्र अस्वस्थतेच्या काळात ही खातरी बाळगू शकतात, की यहोवा त्यांनाही असेच साहाय्य करील. त्यांनी जर यहोवाकडे साहाय्य मागितले तर तो त्यांना “सामर्थ्याची पराकोटी” देऊ शकतो जेणेकरून त्यांच्यावर “चोहोकडून संकटे आली तरी” त्यांचा “कोंडमारा” होणार नाही. अशाप्रकारे, एलीयाप्रमाणेच त्यांनाही सहन करण्यास मदत केली जाईल.—२ करिंथकर ४:७, ८.
[तळटीपा]
a काही विद्वानांच्या मते, एलीया बआल उपासकांचा धार्मिक नाच सूचित करीत असावा. “लंगडाल” हाच शब्द १ राजे १८:२६ [NW] मध्ये बआल उपासकांच्या नाचाचे वर्णन करण्याकरता उपयोगात आणला आहे.
b आत्म-घावाचा संबंध मनुष्यबळी देण्याच्या प्रथेशी होता असे काहींचे म्हणणे आहे. दोन्ही कार्ये सुचवतात, की शारीरिक पीडा दिल्याने किंवा रक्त वाहू दिल्याने एखाद्या दैवताची कृपा मिळवता येते.