वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ९/१५ पृ. १०-१५
  • तुम्ही एलीयाप्रमाणे विश्‍वासू राहाल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही एलीयाप्रमाणे विश्‍वासू राहाल का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवत्वाची विलक्षण परीक्षा
  • ‘एलीया संदेष्टा’ अद्यापही यायचा आहे?
  • त्यांच्याकडे एलीयाचा आत्मा आहे
  • परीक्षेत विश्‍वासू
  • एलीप्रमाणे विश्‍वासू असा
  • त्याने देवाकडून सांत्वन मिळवले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • त्यानं देवाकडून मिळणारं सांत्वन अनुभवलं
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तुला कधी एकटं-एकटं किंवा भीती वाटली आहे का?
    आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • त्यानं शुद्ध उपासनेसाठी ठाम भूमिका घेतली
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ९/१५ पृ. १०-१५

तुम्ही एलीयाप्रमाणे विश्‍वासू राहाल का?

“परमेश्‍वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्यास तुम्हाकडे पाठवीन.”—मलाखी ४:५.

१. वाग्दत्त देशात सुमारे ५०० वर्षे राहिल्यानंतर इस्राएल लोकांवर कोणते संकट कोसळते?

‘दुधामधाच्या प्रवाहांचा देश.’ (निर्गम ३:७, ८) सा. यु. पू. १६ व्या शतकात इस्राएल लोकांची इजिप्शियन बंधनातून सुटका झाल्यानंतर यहोवा देवाने त्यांना दुधामधाच्या प्रवाहांचाच एक देश दिला होता. पण! आता पाच शतके उलटून गेली आहेत आणि इस्राएलच्या दहा वंशांचे राज्य कडक दुष्काळाला तोंड देत आहे. हिरवे गवत शोधूनही सापडत नाहीए. जनावरे चाऱ्‍यावाचून मरत आहेत आणि तब्बल साडेतीन वर्षे होऊन गेली तरी पावसाचा काही पत्ता नाहीए. (१ राजे १८:५; लूक ४:२५) हे संकट का ओढवले आहे?

२. इस्राएलच्या राष्ट्रीय संकटास कोण कारणीभूत आहे?

२ या संकटास धर्मत्याग कारणीभूत आहे. देवाच्या नियमशास्त्राला धाब्यावर बसवून, अहाब राजाने कनानी राजकन्या ईजबेल हिच्याशी विवाह केला आहे आणि इस्राएलमध्ये बआल उपासना आणण्यासाठी त्याने तिला राजरोसपणे संमती दिली आहे. याहून अधिक वाईट गोष्ट म्हणजे, या खोट्या दैवतासाठी त्याने शोमरोन नामक राजधानीच्या शहरात मंदिर बांधले आहे. बआल उपासनेमुळे आपल्याला भरघोस पीक मिळेल, असे वाटल्याने इस्राएल लोकांची फसवणूक झाली आहे! तथापि, ‘या चांगल्या देशातून त्यांचा नायनाट होण्याचा’ त्यांना आता धोका असल्याचा इशारा यहोवाने दिला आहे.—अनुवाद ७:३, ४; ११:१६, १७; १ राजे १६:३०-३३.

देवत्वाची विलक्षण परीक्षा

३. एलीया संदेष्टा इस्राएलच्या खऱ्‍या समस्येकडे कसे लक्ष आकर्षित करतो?

३ दुष्काळ सुरू होतो तेव्हा देवाचा विश्‍वासू सेवक एलीया अहाब राजाला असे म्हणतो: “इस्राएलाचा देव परमेश्‍वर ज्याच्या हुजूरास मी असतो त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पर्जन्य पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल!” (१ राजे १७:१) या भाकिताच्या भयंकर सत्याचा अनुभव घेतल्यानंतर इस्राएलाचा छळ केल्याचा दोष राजा एलीयावर लावतो. परंतु, अहाब आणि त्याच्या घराण्याने बआलचे उपासक होऊन धर्मत्याग केल्यामुळे ते आरोपास खरे पात्र आहेत, असे प्रत्युत्तर एलीया देतो. हा वादविवाद मिटवण्यासाठी यहोवाचा संदेष्टा अहाब राजाला आर्जवतो, की सर्व इस्राएल लोकांना कर्मेल डोंगरावर एकत्र करण्यात यावे ज्यांच्यासोबत बआलचे ४५० संदेष्टे आणि अशेरा मूर्तीचे ४०० संदेष्टे आहेत. अहाब आणि त्याचे प्रजाजन तेथे एकत्र होतात, या घटनेमुळे तरी हा अनावृष्टीचा काळ संपेल, असे त्यांना वाटते. परंतु येथे एलीया त्याहीपेक्षा अधिक गंभीर विषयाकडे लक्ष केंद्रित करतो. तो विचारतो, “तुम्ही दोहो मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्‍वर [“यहोवा,” NW] हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” त्यावर इस्राएल लोकांनी चकार शब्द काढला नाही.—१ राजे १८:१८-२१.

४. देवत्वाचा वाद मिटवण्याकरता एलीया कोणता प्रस्ताव मांडतो?

४ कित्येक वर्षे इस्राएल लोकांनी यहोवाच्या उपासनेशी बआलवादाची सरमिसळ करण्याचा प्रयत्न केला आहे. देवत्वाचा वाद मिटवण्यासाठी एलीया आता एका आमनासामन्याचे आयोजन करण्याचे सूचवतो. अर्पणासाठी तो एक गोऱ्‍हा तयार करणार आहे आणि बआलचे संदेष्टेही अर्पणासाठी दुसरा गोऱ्‍हा तयार करणार आहेत. त्यानंतर एलीया म्हणतो: “तुम्ही आपल्या देवाचे नाम घ्या आणि मी परमेश्‍वराचे [यहोवाचे] नाम घेतो; जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा.” (१ राजे १८:२३, २४) प्रार्थनेच्या उत्तरादाखल आकाशातून येणाऱ्‍या आगीची कल्पना करा!

५. बआल उपासनेचा निरुपयोगीपणा कशा प्रकारे प्रकट होतो?

५ एलीया, बआलच्या संदेष्ट्यांना पहिल्यांदा सुरवात करण्याचे पाचारण करतो. ते अर्पणासाठी गोऱ्‍हा तयार करतात आणि त्याला वेदीवर ठेवतात. त्यानंतर ते वेदीभोवती नाचत प्रार्थना करतात: “हे बआला, आमचे ऐक!” हा त्यांचा जप “सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत” चालतो. “मोठ्याने पुकारा,” एलीया टोमणा मारतो. बआलला काही तातडीचं काम निघालं असेल किंवा “कदाचित तो निजला असेल, त्याला जागे केले पाहिजे!” त्यामुळे ते अधिकच उन्मत्त होतात. आणि पाहा! आता तर ते स्वतःवर सुऱ्‍यांनी वार करत आहेत आणि स्वतःस रक्‍तबंबाळ करून घेत आहेत. आणि ते सर्व ४५० जन बेंबीच्या देठापासून ओरडतात तेव्हा आसमंत निनादून निघतो! परंतु त्यांना कोणतेही उत्तर मिळत नाही.—१ राजे १८:२६-२९.

६. देवत्वाची परीक्षा घेण्यासाठी एलीया कोणती तयारी करतो?

६ आता एलीया सामोरा येतो. तो वेदी तयार करून तिच्याभोवती मोठी खळगी खणतो आणि अर्पण तयार करतो. मग तो होमबलीवर आणि इंधनावर पाणी ओतण्यास सांगतो. जोपर्यंत खळगी पूर्ण भरत नाही तोपर्यंत मोठ्या आकाराच्या बारा घागरी वेदीवर ओतण्यात येतात. एलीया प्रार्थना करतो तेव्हा सर्वांची उत्कंठा किती शिगेला पोहंचली असेल याची कल्पना करा: “हे परमेश्‍वरा, अब्राहाम, इसहाक व इस्राएल यांच्या देवा, इस्राएलांमध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्‍या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांस विदित कर. हे परमेश्‍वरा, ऐक, माझी विनंती ऐक; हे परमेश्‍वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदये पराङ्‌मुख केली आहेस, याची या लोकांस जाणीव होऊ दे.”—१ राजे १८:३०-३७.

७, ८. (अ) यहोवा एलीयाच्या प्रार्थनेचे कसे उत्तर देतो? (ब) कर्मेल पर्वतावर घडलेल्या घटनांमुळे काय सिद्ध झाले?

७ एलीयाच्या प्रार्थनेच्या उत्तरादाखल, ‘परमेश्‍वरापासून अग्नी उतरतो आणि तो होमबली, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकतो आणि त्या खळगीतले पाणी चाटतो.’ तेव्हा सर्व लोक पालथे पडतात आणि म्हणतात: “परमेश्‍वर [यहोवा] हाच देव आहे! परमेश्‍वर [यहोवा] हाच देव आहे!” (१ राजे १८:३८, ३९) एलीया आता निर्णायक पाऊल उचलतो. तो आज्ञा देतो: “बआलाच्या संदेष्ट्यांस पकडा; त्यातल्या एकासहि निसटून जाऊ देऊ नका!” किशोनच्या खोऱ्‍यात त्यांचा फडशा पाडल्यानंतर आकाशात काळे ढग जमा होतात. अखेरीस, पाऊस कोसळण्यास सुरवात होते आणि दुष्काळ संपतो!—१ राजे १८:४०-४५; पडताळा अनुवाद १३:१-५.

८ किती महान तो दिवस! देवत्वाच्या या विलक्षण परीक्षेत यहोवा त्याच्या विरोधकांना चारही मुंड्या चीत करतो. तसेच या घटनांमुळे अनेक इस्राएल लोकांची मने यहोवाकडे पुन्हा वळतात. अशा प्रकारे आणि इतर मार्गांनी देखील, आपण विश्‍वासू संदेष्टा असल्याचे एलीया सिद्ध करतो तसेच व्यक्‍तीशः संदेष्टा या नात्याने तो आपली भूमिका पार पाडतो.

‘एलीया संदेष्टा’ अद्यापही यायचा आहे?

९. मलाखी ४:५, ६ येथे कोणत्या भविष्यवाणीविषयी भाकीत करण्यात आले होते?

९ नंतर, मलाखीद्वारे देवाने असे भाकीत केले: “पाहा! परमेश्‍वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्यास तुम्हाकडे पाठवीन. तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील; मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न होवो.” (मलाखी ४:५, ६) हे शब्द उच्चारण्यात आले त्याच्या सुमारे ५०० वर्षांपूर्वीच एलीया मरण पावला होता. परंतु ही एक भविष्यवाणी असल्यामुळे सा. यु. पहिल्या शतकातील यहुदी या भविष्यवाणीची पूर्णता होण्यासाठी एलीयाच्या येण्याची वाट पाहत होते.—मत्तय १७:१०.

१०. भाकीत केलेला एलीया कोण होता आणि आपल्याला हे कसे कळते?

१० तर मग, येणारा एलीया कोण होता? येशू ख्रिस्ताने पुढीलप्रमाणे म्हटले तेव्हा त्याची ओळख पटली: “बाप्तिस्मा करणारा योहान ह्‍याच्या दिवसापासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावीत आहेत. कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्‍यांनी संदेश दिले; आणि हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलीया येणार तो हाच आहे.” होय, बाप्तिस्मा करणारा योहान भाकीत केलेल्या एलीयाप्रमाणे होता. (मत्तय ११:१२-१४; मार्क ९:११-१३) योहानाकडे ‘एलीयाचा आत्मा आणि त्याचे सामर्थ्य’ असेल आणि तो ‘यहोवासाठी सिद्ध प्रजा तयार’ करील असे योहानाच्या वडिलांना अर्थात जखऱ्‍याला देवदूताद्वारे सांगण्यात आले होते. (लूक १:१७) योहानाने दिलेला बाप्तिस्मा म्हणजे एखाद्या व्यक्‍तीने नियमशास्त्राच्या विरोधात पातके केली असल्यास त्या पातकांबद्दल सदर व्यक्‍तीच्या पश्‍चात्तापाचे जाहीर प्रतीक होते आणि यामुळे यहुदी लोकांना ख्रिस्ताकडे येण्यास मदत झाली. (लूक ३:३-६; गलतीकर ३:२४) अशा प्रकारे, योहानाच्या कार्याने ‘यहोवासाठी सिद्ध प्रजा तयार केली.’

११. पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राने ‘यहोवाच्या दिवसाविषयी’ काय म्हटले आणि तो दिवस केव्हा आला?

११ “एलीया” प्रमाणे बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने जे काम केले त्यावरून दिसून आले, की ‘यहोवाचा दिवस’ जवळ आला होता. जेव्हा देव त्याच्या शत्रूंच्या विरोधात कार्यवाही करणार आणि त्याच्या लोकांना सुरक्षित ठेवणार, त्या दिवसाची निकटता देखील प्रेषित पेत्राने दाखवून दिली. सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी घडलेल्या चमत्कारिक घटना देवाच्या आत्म्याच्या वर्षावाबद्दल योएलने केलेल्या भविष्यवाणीची पूर्णता असल्याचे त्याने सांगितले. “परमेश्‍वराचा [यहोवाचा] महान व प्रसिद्ध दिवस” येण्यापूर्वी हे घडणार असल्याचे पेत्राने दाखवले. (प्रेषितांची कृत्ये २:१६-२१; योएल २:२८-३२) तो दिवस सा. यु. ७० मध्ये आला तेव्हा यहोवाने त्याच्या पुत्राचा धिक्कार केलेल्या राष्ट्रावर ईश्‍वरी न्यायदंड बजावण्यास रोमी सैन्याला कारणीभूत ठरविण्याद्वारे आपल्या शब्दाची पूर्णता केली.—दानीएल ९:२४-२७; योहान १९:१५.

१२. (अ) ‘यहोवाच्या येणाऱ्‍या दिवसाविषयी’ पौलाने आणि पेत्राने काय म्हटले? (ब) एलीयाच्या कार्याने दाखविल्याप्रमाणे निश्‍चितच आणखीन काहीतरी का होणार होते?

१२ तथापि, सा. यु. ७० नंतरही आणखी काही घडणार होते. प्रेषित पौलाने ‘यहोवाच्या येणाऱ्‍या दिवसाचा’ संबंध येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीशी लावला. अद्यापही भवितव्यात असलेले “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांच्याशी संबंध लावून प्रेषित पेत्र त्या दिवसाविषयी बोलला. (२ थेस्सलनीकाकर २:१, २; २ पेत्र ३:१०-१३) हे लक्षात असू द्या, की बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने ‘यहोवाचा दिवस’ सा. यु. ७० मध्ये येण्यापूर्वी एलीयाप्रमाणे कार्य केले. या सर्व गोष्टींवरून हे स्पष्ट होते, की एलीयाच्या कार्याने सूचविल्यानुसार पुढे आणखीन काही व्हायचे होते. ते काय आहे?

त्यांच्याकडे एलीयाचा आत्मा आहे

१३, १४. (अ) एलीयाने केलेल्या कामांत आणि आजच्या काळातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या कामांत कोणती समानता आहे? (ब) ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मत्यागी लोकांनी काय केले आहे?

१३ एलीयाचे काम बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाच्याच कामाप्रमाणे नव्हते, तर ‘यहोवाच्या दिवसाकडे’ आगेकूच करणाऱ्‍या या कठीण काळातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या कामाप्रमाणेही होते. (२ तीमथ्य ३:१-५) एलीयाच्या आत्म्यासह तसेच सामर्थ्यासह ते खऱ्‍या उपासनेचे एकनिष्ठ समर्थक आहेत. आणि असे असणे खरोखरच किती आवश्‍यक राहिले आहे! ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या मृत्यूनंतर खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासात धर्मत्यागाचा उद्रेक झाला, एलीयाच्या दिवसांत बआल उपासनेची जशी भरभराट झाली होती अगदी त्याप्रमाणे. (२ पेत्र २:१) स्वतःला ख्रिस्ती म्हणविणाऱ्‍यांनी ख्रिस्ती विश्‍वासाची खोट्या धर्माच्या तत्त्वांसोबत आणि रीतीरिवाजांसोबत सरमिसळ करण्यास सुरवात केली. उदाहरणार्थ, मनुष्यामध्ये अमर आत्मा असतो, ही मूर्तिपूजक आणि अशास्त्रवचनीय शिकवण त्यांनी अंगीकारली. (उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४) ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मत्यागी लोकांनी यहोवा, हे एकाच खऱ्‍या देवाचे नाव वापरण्याचे सोडून दिले आहे. उलटपक्षी, ते त्रैक्याची उपासना करत आहेत. बआल उपासकांच्या परिपाठाप्रमाणे त्यांनी येशू आणि त्याची आई, मरिया यांच्या मूर्तींपुढे नतमस्तक होण्याचा प्रघातही स्वीकारला आहे. (रोमकर १:२३; १ योहान ५:२१) परंतु एवढ्यावरच ते थांबले नाहीत.

१४ ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चमधील नेत्यांनी १९ व्या शतकांपासून बायबलच्या अनेक भागांवर शंका घेण्यास सुरवात केली आहे. उदाहरणार्थ, त्यांनी उत्पत्तीमधील निर्मितीच्या अहवालास अमान्य केले आणि उत्क्रांतीवादाला “शास्त्रोक्‍त” म्हणून त्याचे समर्थन केले आहे. हे, येशू ख्रिस्ताच्या आणि त्याच्या प्रेषितांनी दिलेल्या शिकवणुकींच्या अगदी विरोधात होते. (मत्तय १९:४, ५; १ करिंथकर १५:४७) तथापि, येशूप्रमाणे आणि त्याच्या आरंभीच्या अनुयायांप्रमाणे आत्म्याने अभिषिक्‍त असलेले ख्रिस्ती आजही बायबलमधील निर्मितीचा अहवाल उचलून धरतात.—उत्पत्ति १:२७.

१५, १६. ख्रिस्ती धर्मजगताच्या विषमतेत आध्यात्मिक अन्‍नाच्या नियम्ति तरतुदींचा कोणी उपभोग घेतला आहे आणि कोणत्या मार्गाने?

१५ या जगाने ‘अंतसमयात’ प्रवेश केल्यानंतर ख्रिस्ती धर्मजगत आध्यात्मिक दुष्काळाच्या विळख्यात सापडले आहे. (दानीएल १२:४; आमोस ८:११, १२) परंतु अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या लहान गटाने, देवाने “यथाकाळी” पुरविण्यात आलेल्या आध्यात्मिक अन्‍नाच्या नियमित तरतुदींचा उपभोग घेतला आहे; एलीयाला देखील तत्कालीन दुष्काळात खाण्यास मिळेल याची व्यवस्था यहोवाने केली होती. (मत्तय २४:४५; १ राजे १७:६, १३-१६) एकेकाळी आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थी या नावाने ओळखण्यात येणाऱ्‍या या देवाच्या विश्‍वासू सेवकांना नंतर यहोवाचे साक्षीदार हे शास्त्रवचनीय नाव प्राप्त झाले.—यशया ४३:१०.

१६ एलीया या नावाचा अर्थ “यहोवा माझा देव आहे,” असा होतो आणि एलीया त्या नावाप्रमाणे जगला. टेहळणी बुरूज, या यहोवाच्या पार्थिव सेवकांच्या अधिकृत नियतकालिकाने वारंवार देवाच्या नावाचा उपयोग केला आहे. खरे तर, या नियतकालिकाच्या मागे यहोवा आहे, असा विश्‍वास या नियतकालिकाच्या दुसऱ्‍याच अंकात (ऑगस्ट १८७९, [इंग्रजी]) प्रकट करण्यात आला. हे नियतकालिक आणि वॉच टावर सोसायटीची इतर प्रकाशने ख्रिस्ती धर्मजगताच्या तसेच उर्वरित मोठ्या बाबेलच्या अर्थात खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याच्या अशास्त्रवचनीय शिकवणी चव्हाट्यावर आणतातच शिवाय, देवाच्या वचनाची म्हणजे बायबलची सत्यताही उचलून धरतात.—२ तीमथ्य ३:१६, १७; प्रकटीकरण १८:१-५.

परीक्षेत विश्‍वासू

१७, १८. बआलच्या संदेष्ट्यांना जिवे मारल्यानंतर ईजबेलने कोणती प्रतिक्रिया दाखवली, परंतु एलीयाला कशा प्रकारे मदत करण्यात आली?

१७ एलीयाने बआलच्या संदेष्ट्यांना ठार मारले हे कळल्यानंतर ईजबेलची जी प्रतिक्रिया होती तशाच प्रकारची प्रतिक्रिया पाळकवर्गाने त्यांचे पितळ उघडे पडल्यानंतर दाखवली. यहोवाच्या विश्‍वासू एलीया संदेष्ट्याला ठार मारण्याचा आपण विडा उचलला आहे, असा सांगावा तिने धाडला. तिचे भय वाटणे साहजिकच होते कारण ईजबेलने याआधीच देवाच्या अनेक संदेष्ट्यांना ठार मारले होते. जीव टांगणीला लागल्यामुळे एलीयाने नैर्ऋत्य बेर-शेबाकडे पोबारा केला. त्याने याठिकाणी आपल्या मदतनीसाला मागे ठेवले आणि तो आणखी पुढे अरण्यात गेला; आपला प्राण गेल्यास बरे होईल अशी देखील त्याने प्रार्थना केली होती. परंतु यहोवाने आपल्या या संदेष्ट्याला वाऱ्‍यावर सोडले नाही. होरेब, या डोंगरापर्यंतचा लांबचा प्रवास करण्यास्तव एलीयाला तयार करण्यासाठी त्याच्याकडे एक देवदूत येतो. सुमारे ३०० पेक्षा अधिक किलोमीटरचा ४० दिवसांचा प्रवास करण्यासाठी एलीयाची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येते. सुसाट्याचा वारा, भूमिकंप आणि अग्नी यांच्याद्वारे आपल्या शक्‍तीच्या असामान्य प्रदर्शनानंतर होरेब येथे देव त्याच्याशी बोलला. परंतु प्रत्यक्षात यहोवा त्या आविष्कारांत नव्हता. त्या घटना यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या किंवा क्रियाशील शक्‍तीच्या अभिव्यक्‍ती होत्या. नंतर यहोवा त्याच्या संदेष्ट्याशी बोलला. या अनुभवामुळे एलीया किती दृढ झाला असेल याची कल्पना करा. (१ राजे १९:१-१२) खऱ्‍या उपासनेच्या शत्रूंद्वारे आपल्याला धमकावण्यात येते तेव्हा एलीयाप्रमाणे आपलेही हातपाय गळत असल्यास काय? त्याच्या या अनुभवाने आपल्याला हे जाणण्यास मदत व्हावी, की यहोवा त्याच्या सेवकांचा त्याग करत नाही.—१ शमुवेल १२:२२.

१८ संदेष्टा म्हणून एलीयाला अद्यापही काम करायचे होते, हे देवाने स्पष्ट केले. शिवाय, इस्राएलमध्ये केवळ आपणच खऱ्‍या देवाचे उपासक आहोत असे एलीयाला वाटले होते, पण इतर ७,००० लोकांनीही बआलला दंडवत न केल्याचे यहोवाने त्याला दाखवून दिले. त्यानंतर देवाने एलीयाला पुन्हा एकदा नियुक्‍तीवर पाठविले. (१ राजे १९:१३-१८) एलीयाप्रमाणे कदाचित आपल्या मागेही खऱ्‍या उपासनेचे शत्रू हात धुऊन लागतील. येशूने भाकीत केल्याप्रमाणे, आपण कदाचित जबर छळाचा विषय होऊ. (योहान १५:१७-२०) पोटात गोळा येण्याचा अनुभव आपल्याला काहीवेळा येईल. तथापि, ईश्‍वरी खात्री मिळाल्यानंतर यहोवाची सेवा विश्‍वासूपणे पार पाडलेल्या एलीयाप्रमाणे होणे आपल्याला शक्य आहे.

१९. पहिल्या जागतिक युद्धाच्या काळादरम्यान अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी कशाचा अनुभव घेतला?

१९ पहिल्या जागतिक युद्धातील भारी छळामुळे काही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी भयापुढे मान टाकली आणि प्रचारास पूर्ण विराम दिला. त्यांचे पृथ्वीवरचे कार्य संपले आहे, असा त्यांनी चुकीचा विचार केला. परंतु देवाने त्यांना तिलांजली दिली नाही. उलटपक्षी, त्याने त्यांना मोठ्या दयेने पाठबळ पुरवले, त्याने एलीयाला अन्‍न पुरवले होते अगदी त्याचप्रमाणे. एलीयाप्रमाणे विश्‍वासू अभिषिक्‍त जनांनी ईश्‍वरी सुधारणा स्वीकारली आणि ते पुन्हा क्रियाशील बनले. राज्याचा संदेश प्रचार करण्याच्या महान विशेषाधिकारासाठी त्यांचे डोळे उघडण्यात आले.

२०. आज, एलीयाप्रमाणे विश्‍वासू असणाऱ्‍यांना कोणता विशेषाधिकार देण्यात आला आहे?

२० येशूने स्वतःच्या उपस्थितीबद्दल केलेल्या भविष्यवाणीत या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत होण्यापूर्वी एक विश्‍वव्यापी कार्य पूर्ण होणार असल्याचे सांगितले. (मत्तय २४:१४) आज, हे कार्य अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांद्वारे आणि परादीस पृथ्वीवर राहण्याची आशा बाळगणाऱ्‍या त्यांच्या लाखो साथीदारांद्वारे पार पाडले जात आहे. देवाच्या राज्याचे प्रचारकार्य, पूर्ण होईपर्यंत करत राहण्याचा विशेषाधिकार केवळ एलीयाप्रमाणे विश्‍वासू असलेल्यांनाच प्रदान करण्यात आला आहे.

एलीप्रमाणे विश्‍वासू असा

२१, २२. (अ) आज अभिषिक्‍त ख्रिश्‍चन कोणते कार्य पुढे चालू ठेवत आहेत (ब) प्रचार कार्य कोणाच्या मदतीने पार पाडले जाते आणि ती मदत इतकी गरजेची का आहे?

२१ एलीयाकडे जो आवेश होता अगदी त्याच आवेशाने खऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या लहान शेषाने सिंहासनाधिष्ठ राजा, येशू ख्रिस्त याच्या पार्थिव मालमत्तेची देखभाल करण्याची त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. (मत्तय २४:४७) आणि आता ६० पेक्षा अधिक वर्षे उलटून गेली आहेत; देव या अभिषिक्‍त जनांचा उपयोग लोकांना शिष्य बनविण्याचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी करत आला आहे आणि या लोकांना त्याने परादीस पृथ्वीवर अनंत काळच्या जीवनाची विलक्षण आशा दिली आहे. (मत्तय २८:१९, २०) सापेक्षतः अल्प असलेले उर्वरित अभिषिक्‍त जन त्यांच्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यात आवेशी आणि विश्‍वासू असल्यामुळे हे लाखो जन किती कृतज्ञ आहेत!

२२ राज्याचा प्रचार करण्याचे काम अपरिपूर्ण मानवांद्वारे पार पाडण्यात आले आहे आणि हे सर्व यहोवाच्या सामर्थ्यामुळे शक्य झाले आहे व त्याच्यावर प्रार्थनापूर्वक विसंबून राहणाऱ्‍यांना तो हे सामर्थ्य देतो. धार्मिक मनुष्याच्या प्रार्थनेचे सामर्थ्य दाखविण्यासाठी शिष्य याकोबाने एलीया संदेष्ट्याच्या प्रार्थनेचे उदाहरण दिले तेव्हा त्याने लिहिले: “एलीया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता.” (याकोब ५:१६-१८) एलीया नेहमीच भविष्यवाणी किंवा चमत्कार करत नव्हता. त्याच्याकडेही सामान्य मानवासारख्या भावना आणि उणिवा होत्या ज्या आपल्यातही आहेत, तरीही त्याने देवाची विश्‍वासूपणे सेवा केली. आपल्यालाही देवाची मदत आहे आणि तो आपल्याला शक्‍तिशाली बनवतो त्यामुळे आपण एलीयाप्रमाणे विश्‍वासू राहू शकतो.

२३. विश्‍वासू आणि आशावादी असणे आपल्याकरता केव्हाही उचित का आहे?

२३ विश्‍वासू आणि आशावादी असणे आपल्याकरता केव्हाही उचितच आहे. सा. यु. ७० मध्ये ‘यहोवाचा दिवस’ येण्यापूर्वी बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने केलेले काम एलीयाप्रमाणेच होते, हे लक्षात ठेवा. एलीयाच्या आत्म्यासह आणि सामर्थ्यासह अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी देवाने दिलेले तशाच प्रकारचे कार्य संपूर्ण पृथ्वीवर केले आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे ‘यहोवाचा दिवस’ जवळ आहे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ कर्मेल डोंगरावर यहोवाचे देवत्व कसे सिद्ध झाले?

◻ ‘येणारा एलीया’ कोण होता आणि त्याने काय केले?

◻ आपल्याकडे एलीयाचा आत्मा आहे, हे आजच्या काळातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी कसे दाखवून दिले आहे?

◻ एलीयाप्रमाणे विश्‍वासू राहणे आपल्याला का शक्य आहे?

[१५ पानांवरील चौकट]

एलीया कोणत्या स्वर्गात गेला?

”ते [एलीया आणि एलीशा] बोलत चालले असता पाहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांना अलग केले; एलीया वावटळीतून स्वर्गास गेला.”—२ राजे २:११.

या ठिकाणी ‘स्वर्ग’ या शब्दाचा काय अर्थ होतो? इब्री भाषेत ही संज्ञा देव आणि त्याचे देवदूतीय पुत्र ज्या आत्मिक ठिकाणी राहतात त्या ठिकाणाला आणि आकाशाला अर्थात भौतिक विश्‍वाला देखील लागू होते. (मत्तय ६:९; १८:१० आणि अनुवाद ४:१९) याशिवाय, बायबल या संज्ञेचा उपयोग पृथ्वीभोवती असणाऱ्‍या वातावरणाला सूचित करण्यासाठीही करते, जेथे पक्षी विहार करतात आणि जेथे हवा वाहते.—स्तोत्र ७८:२६; मत्तय ६:२६.

तर मग, यांपैकी कोणत्या स्वर्गात किंवा आकाशात एलीया गेला होता? हे स्पष्ट आहे, की तो पृथ्वीच्या एका वातावरणातून निघून दुसऱ्‍या एका भागात गेला होता. परंतु त्यानंतरच्या वर्षांतही एलीया या पृथ्वीवर हयात होता कारण त्याने यहुदाचा राजा यहोरामास एक पत्र लिहिले होते. (२ इतिहास २१:१, १२-१५) एलीया, यहोवा देवाच्या आत्मिक वास्तव्यात गेला नव्हता याची आपल्याला खात्री पटते कारण येशूने असे घोषित केले: “स्वर्गात उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र [येशू] याच्यावाचून कोणीहि स्वर्गात चढून गेला नाही.” (योहान ३:१३) येशू ख्रिस्ताचा मृत्यू, त्याचे पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण यानंतर अपरिपूर्ण मानवांना पहिल्यांदाच स्वर्गाचा मार्ग खुला झाला होता.—योहान १४:२, ३; इब्री लोकांस ९:२४; १०:१९, २०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा