सामान्य युगातील ईश्वरशासित प्रशासन
“त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप . . . स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.” —इफिसकर १:९, १०.
१, २. (अ) सा.यु. ३३ पासून सुरवात झालेल्या ‘स्वर्गातील गोष्टींच्या’ एकत्रीकरणाचे कार्य कसे पुढे चालू राहिले? (ब) सन १९१४ पासून अभिषिक्त ख्रिश्चनांनी कशाप्रकारे मोशे आणि एलीयासारखा आत्मा प्रदर्शित केला आहे?
‘देवाच्या इस्राएलचा’ जन्म झाला तेव्हा, अर्थात सा.यु. ३३ मध्ये ‘स्वर्गातील गोष्टी’ एकत्र करण्याच्या कार्यास प्रारंभ झाला. (गलतीकर ६:१६; यशया ४३:१०; १ पेत्र २:९, १०) सा.यु. पहिल्या शतकानंतर, एकत्रीकरणाचे काम मंदावले कारण सैतानाने पेरलेल्या धर्मत्यागी ‘निदणाने’ खऱ्या ख्रिश्चनांना (येशूने ज्यांना “गहू” संबोधले त्यांना) झाकून टाकले होते. पण ‘अंतसमय’ जसजसा जवळ येत गेला, देवाचे खरे इस्राएल पुन्हा एकदा दृश्यमान होऊ लागले आणि १९१९ मध्ये त्यांना येशूच्या सर्वस्वांवर नियुक्त करण्यात आले.a—मत्तय १३:२४-३०; ३६-४३; २४:४५-४७; दानीएल १२:४.
२ पहिल्या महायुद्धादरम्यान, अभिषिक्त ख्रिश्चनांनी मोशे आणि एलीयाप्रमाणे सामर्थ्यशाली कार्ये केली.b (प्रकटीकरण ११:५, ६) १९१९ पासून त्यांनी एलीयाने दाखवलेल्या धैर्याप्रमाणे एका विरोधी जगात सुवार्तेचा प्रचार केला आहे. (मत्तय २४:९-१४) आणि मोशेने जसे प्राचीन इजिप्तवर येणाऱ्या देवाच्या पिडांबद्दल सांगितले तसेच १९२२ पासून त्यांनी मानवजातीवरील यहोवाचे न्यायदंड घोषित केले आहेत. (प्रकटीकरण १५:१; १६:२-१७) या अभिषिक्त ख्रिश्चनांचा शेष आज, यहोवाच्या साक्षीदारांच्या नवीन जग संस्थेचा केंद्रबिंदू आहे.
कार्यरत असलेले नियमन मंडळ
३. कोणत्या घटना आरंभीची ख्रिस्ती मंडळी सुसंघटित असल्याचे दाखवतात?
३ सुरवातीपासूनच येशूचे अभिषिक्त अनुयायी सुसंघटित होते. शिष्यांची संख्या जसजशी वाढत गेली तसतशा स्थानिक मंडळ्या स्थापन करण्यात आल्या व वडिलांना नियुक्त करण्यात आले. (तीत १:५) सा.यु. ३३ नंतर १२ प्रेषितांनी, अधिकृत केंद्रीय नियमन मंडळ या नात्याने काम केले. म्हणूनच त्यांनी साक्षीकार्यात निर्भीडपणे पुढाकार घेतला. (प्रेषितांची कृत्ये ४:३३, ३५, ३७; ५:१८, २९) त्यांनी गरजवंतांना अन्नाचे वाटप करण्याची व्यवस्था केली तसेच समारियात आस्था असल्याची बातमी मिळाल्यावर त्या आस्थेचा मागोवा घेण्याकरता पेत्र आणि योहानाला पाठवले. (प्रेषितांची कृत्ये ६:१-६; ८:६-८, १४-१७) पूर्वी छळ करणारा पौल आता येशूचा अनुयायी झाला होता याची खातरी करून घेण्यासाठी बर्णबाने त्याला त्यांच्याकडे नेले. (प्रेषितांची कृत्ये ९:२७; गलतीकर १:१८, १९) आणि पेत्राने कर्नेल्यास व त्याच्या घराण्यास प्रचार केल्यानंतर, तो जेरुसलेमेस परतला. या बाबतीत पवित्र आत्म्याने देवाची इच्छा कशी सूचित केली होती ते त्याने प्रेषितांना व इतर यहुदी बांधवांना सांगितले.—प्रेषितांची कृत्ये ११:१-१८.
४. पेत्राला ठार मारण्याकरता कोणता प्रयत्न करण्यात आला होता पण तो कसा वाचला?
४ मग नियमन मंडळावर निर्दयी हल्ला झाला. पेत्राला तुरुंगात डांबण्यात आले पण देवदूतीय हस्तक्षेपामुळे त्याचा जीव वाचला. (प्रेषितांची कृत्ये १२:३-११) आता, १२ प्रेषितांव्यतिरिक्त कोणी दुसरा जेरुसलेममध्ये एका प्रमुख हुद्द्यावर आला, हे असे पहिल्यांदाच घडले. पेत्र तुरुंगातून मुक्त झाल्यावर त्याने योहान मार्कच्या आईच्या घरात एकत्र आलेल्या लोकांना सांगितले: “हे याकोबास [येशूचा सावत्र भाऊ] व बंधुजनांस सांगा.”—प्रेषितांची कृत्ये १२:१७.
५. याकोबाच्या हुतात्मिक मृत्यूनंतर नियमन मंडळाच्या रचनेत बदल कसा झाला?
५ पूर्वी, त्या विश्वासघातकी प्रेषिताने, अर्थात यहुदा इस्कर्योत याने आत्महत्या केल्यानंतर, येशूबरोबर त्याच्या सेवेदरम्यान असणारा व ज्याने त्याचा मृत्यू व पुनरुत्थान पाहिले होते अशा कोणा दुसऱ्याला प्रेषित या नात्याने “त्याचा हुद्दा” देण्याची गरज भासली होती. पण, योहानाचा भाऊ याकोब याचा वध केला तेव्हा १२ पैकी एक होण्यासाठी कोणालाही त्याच्याबदली नेमण्यात आले नाही. (प्रेषितांची कृत्ये १:२०-२६; १२:१, २) उलट, नियमन मंडळाविषयीचा पुढील शास्त्रीय संदर्भ दाखवतो, की ते वाढवण्यात आले होते. येशूचे अनुसरण करणाऱ्या विदेशांनी मोशेच्या नियमाच्या अधीन व्हायचे की नाही यावर जेव्हा वादविवाद निर्माण झाला तेव्हा निर्णयासाठी “यरुशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग ह्यांच्याकडे” ती बाब सोपवण्यात आली. (प्रेषितांची कृत्ये १५:२, ६, २०, २२, २३; १६:४) आता “वडीलवर्ग” नियमन मंडळात का होते बरे? बायबल त्याचे कारण सांगत नाही, पण त्यामुळे स्पष्टपणे लाभ झाला. याकोबाच्या मृत्यूमुळे व पेत्राच्या तुरुंगवासामुळे हे जाहीर झाले, की एक ना एक दिवस प्रेषितांना तुरुंगात डांबले जाईल किंवा त्यांची हत्या करण्यात येईल. ही शक्यता असताना, नियमन मंडळाच्या कार्यपद्धतींची जाण असणारे इतर पात्र वडिलजन असल्यामुळे सतत सुव्यवस्थित देखरेखीची हमी मिळणार होती.
६. जेरुसलेममधील नियमन मंडळाचे मूळ सदस्य त्या शहरात नव्हते तरीदेखील नियमन मंडळ कसे कार्य करीत राहिले?
६ सा.यु. ५६ मध्ये पौल जेरुसलेमेस आला तेव्हा, तो याकोबाकडे गेला आणि बायबल म्हणते की, “सर्व वडीलहि तेथे आले” होते. (प्रेषितांची कृत्ये २१:१८) या सभेला प्रेषित उपस्थित असल्याचा उल्लेख का नाही बरे? पुन्हा बायबल त्याविषयी काही सांगत नाही. पण इतिहासकार युसीबियसने नंतर कळवले, की सा.यु. ६६ च्या काही काळाआधी “खुनी कटांचा सतत धोका असलेल्या उर्वरित प्रेषितांना यहुदियातून हाकलून लावण्यात आले. पण आपला संदेश शिकवण्याकरता त्यांनी ख्रिस्ताच्या सामर्थ्याने सर्व देशात प्रवास केला.” (युसीबियस, पुस्तक ३, ५, वचन २) खरेच, युसीबियसचे बोल ईश्वरप्रेरित अहवालातील नसले तरी अहवाल जे सांगतो त्याच्या सुसंगतेत आहेत. उदाहरणार्थ, सा.यु. ६२ च्या सुमारास पेत्र—जेरुसलेमपासून दूरवर असलेल्या बॅबिलोनमध्ये होता. (१ पेत्र ५:१३) परंतु, सा.यु. ५६ मध्ये आणि कदाचित सा.यु. ६६ पर्यंत जेरुसलेममध्ये एक नियमन मंडळ निश्चितपणे कार्यशील होते.
आधुनिक दिवसातील प्रशासन
७. पहिल्या शतकाच्या नियमन मंडळाच्या तुलनेत पाहता, आजच्या नियमन मंडळातील रचनेत कोणता उल्लेखनीय फरक आहे?
७ सा.यु. ३३ पासून ते जेरुसलेमवर आलेल्या संकटापर्यंत नियमन मंडळ स्पष्टपणे यहुदी ख्रिश्चनांचे मिळून बनलेले होते. सा.यु. ५६ मध्ये आपल्या भेटीदरम्यान पौलाला दिसून आले, की जेरुसलेममधील अनेक यहुदी ख्रिस्ती, ‘येशू ख्रिस्तावर विश्वास’ ठेवून होते तरीसुद्धा ‘त्या सर्वांना मोशेच्या नियमशास्त्राचा अभिमान’ होता.c (याकोब २:१; प्रेषितांची कृत्ये २१:२०-२५) अशा यहुद्यांना, एका विदेशाला नियमन मंडळात असल्याची कल्पना करणे कठीण वाटले असावे. पण, आधुनिक दिवसांमध्ये या मंडळाच्या रचनेत दुसरा बदल झाला आहे. आज ते पूर्णपणे, अभिषिक्त विदेशी ख्रिश्चनांचे मिळून बनले आहे व यहोवाने त्यांच्या देखरेखीवर खूप आशीर्वाद दिला आहे.—इफिसकर २:११-१५.
८, ९. आधुनिक काळादरम्यान नियमन मंडळात कोणते विकास घडले आहेत?
८ सन १८८४ मध्ये पेन्सिल्व्हानियात वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी स्थापन झाली तेव्हापासून १९७२ पर्यंत, यहोवाच्या संघटनेत संस्थेच्या अध्यक्षांकडे जास्त अधिकार होता व नियमन मंडळ संस्थेच्या संचालक मंडळाशी जवळचा संबंध राखून होते. त्या वर्षांदरम्यान त्यांनी उपभोगलेल्या आशीर्वादांवरून हे शाबीत होते की यहोवाला ही व्यवस्था मान्य होती. १९७२ व १९७५ दरम्यान, नियमन मंडळात भर पडून त्यातील सभासदांची संख्या १८ झाली. ज्या मंडळातील काही जण पेन्सिल्व्हानियाच्या वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे व्यवस्थापक आहेत त्या विस्तारित मंडळाकडे जास्त अधिकार देण्यात आल्यावर सर्वकाही कमीअधिक प्रयत्नानंतर पहिल्या शतकाच्या व्यवस्थेसारखेच बनले.
९ सन १९७५ पासून या १८ सदस्यांपैकी पुष्कळ जणांनी त्यांची पार्थिव सेवा पूर्ण केली आहे. त्यांनी जगाला जिंकले आहे व ‘येशूच्या स्वर्गीय सिंहासनावर त्याच्यासोबत बसले आहेत.’ (प्रकटीकरण ३:२१) या आणि इतर कारणांसाठी, नियमन मंडळात आता, १९९४ मध्ये एकाची भर पडल्यापासून एकूण दहा सदस्य आहेत. बहुतेक जण वयोवृद्ध आहेत. पण हे अभिषिक्त बांधव आपल्या भारी जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांना उत्तम आधार दिला जातो. हा आधार कोठून मिळतो? देवाच्या लोकांतील आधुनिक विकासावरील एक कटाक्ष या प्रश्नाचे उत्तर देतो.
देवाच्या इस्राएलास आधार
१०. या शेवटल्या दिवसांमध्ये यहोवाच्या सेवेतील अभिषिक्तांमध्ये कोण सामील झाले आहेत व याविषयी कशी भविष्यवाणी करण्यात आली होती?
१० सन १८८४ मध्ये देवाच्या इस्राएलसोबत सहवास राखणारे जवळजवळ सर्वच अभिषिक्त ख्रिस्ती होते. परंतु, हळूहळू दुसरा एक गट दृश्यमान होऊ लागला आणि १९३५ मध्ये हा गट प्रकटीकरण अध्याय ७ मधील ‘मोठा लोकसमुदाय’ असल्याची ओळख पटली. या गटातील लोकांना पार्थिव आशा असून, ख्रिस्तामध्ये यहोवा एकत्र करू इच्छितो त्या ‘पृथ्वीवरील गोष्टींना’ तो चित्रित करतो. (इफिसकर १:१०) ते, येशूने दिलेल्या मेंढवाड्यांच्या दाखल्यातील ‘दुसऱ्या मेंढरांचे’ प्रतिनिधीत्व करतात. (योहान १०:१६) १९३५ पासून, दुसरी मेंढरे यहोवाच्या संघटनेत झुंडीने येत आहेत. ते ‘मेघाप्रमाणे धावत आले आहेत, व कबुतरे आपल्या घरकुंड्याकडे उडून जातात तसे उडत आले आहेत.’ (यशया ६०:८) मोठ्या लोकसमुदायातील वाढ आणि अभिषिक्त वर्गातील अनेकांचे मृत्यूद्वारे पार्थिव जीवन समाप्त होत असल्यामुळे होणारी घट, यामुळे योग्यता प्राप्त दुसऱ्या मेंढरांना ख्रिस्ती कार्यांमध्ये अधिकाधिक भूमिका निभावावी लागत आहे. कोणकोणत्या मार्गांनी?
११. सुरवातीला केवळ अभिषिक्त ख्रिश्चनांपुरतेच मर्यादित असलेले कोणते सुहक्क दुसऱ्या मेंढरांना देण्यात आले आहेत?
११ यहोवाचे सर्वोत्कृष्ट गुण घोषित करणे, हे देवाच्या ‘पवित्र राष्ट्राचे’ नेहमीच एक खास कर्तव्य राहिले आहे. पौलाने त्यास मंदिरातील बलिदान असे संबोधले व ‘राजकीय याजकगणाचे’ भाग होणाऱ्यांवर येशूने प्रचार करण्याची व शिकवण्याची कामगिरी सोपवली. (निर्गम १९:५, ६; १ पेत्र २:४, ९; मत्तय २४:१४; २८:१९, २०; इब्री लोकांस १३:१५, १६) तरीसुद्धा, टेहळणी बुरूज (इंग्रजी) ऑगस्ट १, १९३२ च्या अंकाने विशेषकरून योनादाबास चित्रित करणाऱ्यांना या कार्यात भाग घेण्याचे उत्तेजन दिले. होय, दुसऱ्या मेंढरातील अनेक जण यात आधीपासूनच भाग घेत होते. आज, प्रचाराचे बहुतेक कार्य दुसरी मेंढरेच पार पाडीत आहेत; ‘अहोरात्र देवाच्या मंदिरात त्याची पवित्र सेवा’ करण्याचा तो त्यांचा प्रमुख भाग आहे. (प्रकटीकरण ७:१५) तसेच, यहोवाच्या लोकांच्या आधुनिक इतिहासातील सुरवातीच्या काळात, मंडळीतील वडील हे अभिषिक्त ख्रिस्ती, अर्थात येशू ख्रिस्ताच्या उजव्या हातातील “तारे” होते. (प्रकटीकरण १:१६, २०) पण मे १, १९३७ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी), अंकाने घोषित केले, की योग्यता प्राप्त दुसरी मेंढरे सहसेवक (अध्यक्षीय पर्यवेक्षक) असू शकतात. अभिषिक्त पुरुष असले व त्यांना ही जबाबदारी घेता येत नसली तरीसुद्धा, दुसऱ्या मेंढरांचा उपयोग करता येत होता. आज, मंडळीतील बहुतेक सर्व वडील दुसऱ्या मेंढरांपैकी आहेत.
१२. भारी संघटनात्मक जबाबदाऱ्या प्राप्त करणाऱ्या योग्यता प्राप्त दुसऱ्या मेंढरांसाठी कोणती शास्त्रवचनीय पूर्वोदाहरणे आहेत?
१२ दुसऱ्या मेंढरांना इतक्या भारी जबाबदाऱ्या देणे चुकीचे आहे का? नाही, ते ऐतिहासिक पूर्वोदाहरणानुसार आहे. काही विदेशी यहुदीय मतानुसारी (परराष्ट्रीय), प्राचीन इस्राएलमध्ये मोठ्या हुद्द्यांवर होते. (२ शमुवेल २३:३७, ३९; यिर्मया ३८:७-९) बॅबिलोनमधील बंदिवासानंतर, योग्यता प्राप्त नेथीनीम (गैर-इस्राएली मंदिर सेवक) यांना, पूर्वी केवळ लेवी करत असलेल्या मंदिरातील सेवांचा सुहक्क देण्यात आला. (एज्रा ८:१५-२०; नहेम्या ७:६०) याशिवाय, येशूसोबत रूपांतरात दिसलेल्या मोशेने मिद्यानी इथ्रोकडचा उत्तम सल्ला स्वीकारला होता. नंतर, त्याने इथ्रोचा पुत्र होबाब याला आपणास रानांतून मार्गदर्शन देण्यासाठी बोलावले.—निर्गम १८:५, १७-२४; गणना १०:२९.
१३. योग्यता प्राप्त दुसऱ्या मेंढरांना नम्रपणे जबाबदारी देण्यात अभिषिक्त कोणाचे उत्तम उदाहरण अनुसरत आहेत?
१३ रानांतील ४० वर्षांच्या अंताला, आपण वचनयुक्त देशात जाणार नाही हे माहीत असल्यामुळे मोशेने यहोवाला प्रार्थना केली, की त्याने एक वारस पाठवावा. (गणना २७:१५-१७) यहोवाने त्याला सर्व लोकांसमक्ष यहोशवाला नियुक्त करण्यास सांगितले, आणि मोशे शारीरिकरीत्या अजूनही सशक्त असताना व इस्राएलची सेवा करण्याचे अद्यापही थांबवलेले नसतानाही त्याने यहोवाने सांगितल्याप्रमाणेच केले. (अनुवाद ३:२८; ३४:५-७, ९) त्याच नम्रतेच्या आत्म्याने, अभिषिक्तांनी दुसऱ्या मेंढरांतील योग्यता प्राप्त पुरुषांना वाढते सुहक्क देण्यास केव्हाच सुरवात केली आहे.
१४. कोणत्या भविष्यवाण्या दुसऱ्या मेंढरांच्या वाढत्या संघटनात्मक भूमिकेकडे अंगुली दर्शवतात?
१४ दुसऱ्या मेंढरांची वाढती संघटनात्मक भूमिका देखील भविष्यवाणीचा विषय आहे. गैर-इस्राएली पलिष्टी “यहुदातल्या सरदारासारखा होईल,” असे जखऱ्याने भाकीत केले होते. (जखऱ्या ९:६, ७) हे सरदार जमात प्रमुख होते, यास्तव इस्राएलचा पूर्वी शत्रू असलेला, खरी उपासना स्वीकारून वचनयुक्त देशात जमात प्रमुखासारखा होईल असे जखऱ्या म्हणत होता. पुढे, देवाच्या इस्राएलला संबोधताना यहोवा म्हणाला: “परके उभे राहून तुमचे कळप चारितील. परदेशी तुमचे नांगऱ्ये व द्राक्षांचे मळे लावणारे होतील. तुम्हास तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल, लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील.” (यशया ६१:५, ६) “परके” आणि “परदेशी” दुसरी मेंढरे आहेत. यांना अधिकाधिक कार्याला हातभार लावण्याकरता जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, कारण वयोवृद्ध अभिषिक्त शेष आपले पार्थिव जीवन समाप्त करून पूर्णार्थाने ‘यहोवाचे स्वर्गीय याजक’ या नात्याने कार्य करण्यासाठी स्वर्गात जाऊन यहोवाच्या भव्य सिंहासनाभोवती “देवाचे सेवक” या नात्याने उभे राहत आहेत.—१ करिंथकर १५:५०-५७; प्रकटीकरण ४:४, ९-११; ५:९, १०.
‘भावी पिढी’
१५. या अंतसमयात ख्रिश्चनांचा कोणता गट “वयोवृद्ध” झाला आहे व कोणता गट ‘भावी पिढीचे’ प्रतिनिधीत्व करतो?
१५ अभिषिक्त शेषांस, वाढत्या जबाबदाऱ्यांविषयी दुसऱ्या मेंढरांना प्रशिक्षित करण्याची उत्कट इच्छा आहे. स्तोत्र ७१:१८ म्हणते: “मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांस तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नको.” या वचनावर विवेचन मांडताना, टेहळणी बुरूज (इंग्रजी), डिसेंबर १५, १९४८ च्या अंकाने अभिषिक्त ख्रिश्चनांची मंडळी खरोखरच वयोवृद्ध झाल्याचे निदर्शनास आणले. ते पुढे म्हणते, की अभिषिक्त आनंदाने “बायबल भविष्यवाणीच्या दृष्टिकोनानुसार उत्कंठेने पाहतात तेव्हा त्यांना एक नवी पिढी दिसते.” हे खासपणे कोणाला सूचित होते? टेहळणी बुरूज ने म्हटले: “येशू त्यांना ‘दुसरी मेंढरे’ म्हणतो.” ‘भावी पिढी,’ स्वर्गाच्या राज्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या नव्या पार्थिव प्रशासनाखाली जगणाऱ्या मानवांना सूचित होते.
१६. ‘भावी पिढी’ कोणत्या आशीर्वादांची आतुरतेने वाट पाहत आहे?
१६ सर्व अभिषिक्त ख्रिस्ती, येशू ख्रिस्तासोबत तेजोमय होण्याकरता ‘भावी पिढीच्या’ बांधवांना केव्हा सोडून जातील याबद्दल बायबल स्पष्टपणे काहीच सांगत नाही. पण या अभिषिक्त जणांना याची खात्री आहे, की ती वेळ जवळ येत आहे. ‘अंतसमयाच्या’ येशूच्या महान भविष्यवाणीत भाकीत केलेल्या घटना, १९१४ पासून पूर्ण होत आल्या आहेत व त्यावरून दिसते, की या जगाचा नाश अतिशय जवळ आहे. (दानीएल १२:४; मत्तय २४:३-१४; मार्क १३:४-२०; लूक २१:७-२४) लवकरच, यहोवा भावी पिढीला एका नव्या जगात घेऊन जाईल व ती पिढी ‘जे राज्य [पार्थिव राज्य] जगाच्या स्थापनेपासून त्यांच्याकरिता सिद्ध केले आहे ते वतन घेईल.’ (मत्तय २५:३४) त्यांना परादीसच्या पुनर्स्थापनेची तसेच हेडीजमधून कोट्यवधी मृतांच्या पुनरुत्थानाची प्रत्याशा बाळगण्यास आनंद वाटतो. (प्रकटीकरण २०:१३) या पुनरुत्थित लोकांचे स्वागत करण्यासाठी अभिषिक्त जन तेथे हजर असतील का? मागे १९२५ मध्ये, मे १ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी), अंकाने म्हटले: “देव काय करील वा काय करणार नाही याविषयी आपण आपल्या मनानुसार बोलू नये. . . . [पण] आम्हाला असे म्हणावे लागत आहे, की प्राचीन योग्य मनुष्यांचे [विश्वासू पूर्व-ख्रिस्ती साक्षीदारांचे] पुनरुत्थान होण्याआधीच चर्च सदस्यांना [अभिषिक्त ख्रिश्चनांना] गौरविले जाईल.” त्याचप्रमाणे, पुनरुत्थित लोकांचे स्वागत करण्याकरता काही अभिषिक्त उपस्थित असतील का याविषयी चर्चा करताना, मे १, १९९० च्या टेहळणी बुरूज अंकाने म्हटले: “हे जरूरीचे भासणार नाही.”d
१७. अभिषिक्त जन, गट या नात्याने राज्यारोहण झालेल्या राजा येशू ख्रिस्तासोबत कोणत्या आश्चर्यकारक सुहक्कांमध्ये सहभाग घेतील?
१७ प्रत्येक अभिषिक्त ख्रिश्चनाच्या बाबतीत काय होणार आहे ते आपल्याला माहीत नाही, हे खरे. पण रूपांतराच्या दृष्टान्तात येशूसोबत मोशे व एलीयाची उपस्थिती सूचित करते की येशू, आपला न्यायदंड ठोठावताना व बजावताना “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ” देण्याकरता आपल्या वैभवात येतो तेव्हा पुनरुत्थित अभिषिक्त ख्रिस्ती त्याच्यासोबत असतील अशी अपेक्षा केली जाते. शिवाय, “विजय” मिळवलेले अभिषिक्त ख्रिस्ती येशूसोबत हर्मगिदोनात ‘राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार’ गाजवतील हे त्याने दिलेले अभिवचनही आपल्याला आठवते. येशू आपल्या वैभवात येतो तेव्हा ते त्याच्याबरोबर “बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा” करतील. येशूसोबत तेही ‘सैतानाला आपल्या पायांखाली तुडवतील.’—मत्तय १६:२७–१७:९; १९:२८; प्रकटीकरण २:२६, २७; १६:१४, १६; रोमकर १६:२०; उत्पत्ति ३:१५; स्तोत्र २:९; २ थेस्सलनीकाकर १:९, १०.
१८. (अ) ‘ख्रिस्तामध्ये स्वर्गांतील सर्व गोष्टी एकत्र करण्याबाबतची’ परिस्थिती काय आहे? (ब) ‘ख्रिस्तामध्ये पृथ्वीवरील सर्व गोष्टी एकत्र करण्याविषयी’ आपण काय म्हणू शकतो?
१८ यहोवा, आपल्या प्रशासनाच्या एकवाक्यतेत ‘ख्रिस्तामध्ये सर्व एकत्र करण्यास’ प्रगतिशीलपणे पुढे जात आहे. ‘स्वर्गातील गोष्टी एकत्र’ करण्याबाबत पाहू जाता, त्याचा उद्देश पूर्ण होत आला आहे. स्वर्गामध्ये ‘कोकऱ्याच्या लग्नासाठी’ सर्व १,४४,००० जणांसोबत येशूचे संयुक्त होणे जवळ आले आहे. यास्तव, ‘पृथ्वीवरील गोष्टींचे’ प्रतिनिधीत्व करणाऱ्या व अधिक काळापासून असलेल्या दुसऱ्या मेंढरांतील प्रौढ बांधवांना, त्यांच्या अभिषिक्त बंधूंना आधार म्हणून भारी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आपण केवढ्या मनोरंजक समयात जगत आहोत! यहोवाचे उद्देश पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत हे पाहणे किती रोमांचकारी आहे! (इफिसकर १:९, १०; ३:१०-१२; प्रकटीकरण १४:१; १९:७, ९) राजा येशू ख्रिस्ताच्या अधीन राहून ‘एक मेंढपाळाच्या एका कळपात’ आणि विश्वाचा महान सार्वभौम, यहोवा देवाच्या गौरवासाठी सेवा करत असताना या आपल्या अभिषिक्त बांधवांस आधार देण्यास दुसऱ्या मेंढरातील लोकांना केवढा आनंद वाटतो!—योहान १०:१६; फिलिप्पैकर २:९-११.
[तळटीपा]
a टेहळणी बुरूज ऑगस्ट १, १९८१, पृष्ठे १६-२६ (इंग्रजी) पाहा.
b उदाहरणार्थ, १९१४ पासून सुरू झालेली “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन”—चार भागांची दृश्य व ध्वनिमुद्रित सादरता—अख्ख्या पाश्चात्य देशातील तुडूंब भरलेल्या थिएटरांमधील श्रोत्यांना दाखवण्यात आली.
c काही यहुदी ख्रिस्ती नियमशास्त्राभीमानी का होते याची संभावनीय कारणे पाहण्यासाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित शास्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड २, पृष्ठे ११६३-४ पाहा.
d टेहळणी बुरूज ऑगस्ट १५, १९९०, पृष्ठे ३०-१ (इंग्रजी); डिसेंबर १५, १९९०, पृष्ठे ३० (इंग्रजी) पाहा.
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल?
◻ देवाच्या संघटनेने पहिल्या शतकात प्रगमन कसे केले?
◻ यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक इतिहासात नियमन मंडळाचा विकास कसा झाला आहे?
◻ कोणती शास्त्रवचने, यहोवाच्या संघटनेतील दुसऱ्या मेंढरांना अधिकार देण्याची परवानगी देतात?
◻ “स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते” कशाप्रकारे ख्रिस्तामध्ये एकत्र करण्यात आले आहे?
[१६ पानांवरील चित्र]
नियमन मंडळाचे मूळ सदस्य जेरुसलेममध्ये नव्हते तरीसुद्धा एक नियमन मंडळ तेथे कार्यरत होते
[१८ पानांवरील चित्र]
प्रौढ अभिषिक्त ख्रिस्ती, यहोवाच्या लोकांकरता आशीर्वाद ठरले आहेत
सी. टी. रस्सल १८८४-१९१६
जे. एफ. रदरफोर्ड १९१६-४२
एन. एच. नॉर १९४२-७७
एफ. डब्ल्यू. फ्रान्झ १९७७-९२
एम. जी. हेन्शल १९९२-