वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ५/१५ पृ. ९-१४
  • येशू जेव्हा राज्य वैभवात येईल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशू जेव्हा राज्य वैभवात येईल
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वास बळकट केला जातो
  • येशूचे गौरवप्राप्त सोबती
  • मोशे आणि एलीयासारखे साक्षीदार
  • येशूचे बंधू वैभवात येतात
  • तुम्ही एलीयाप्रमाणे विश्‍वासू राहाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • ख्रिस्ताच्या राज्यवैभवाचे आगाऊ दर्शन
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • ख्रिस्ताच्या राज्यवैभवाचा पूर्व देखावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • त्याने देवाकडून सांत्वन मिळवले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ५/१५ पृ. ९-१४

येशू जेव्हा राज्य वैभवात येईल

“येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”—मत्तय १६:२८.

१, २. सा.यु. ३२ च्या पेन्टेकॉस्ट नंतर लगेचच काय घडले व त्या घटनेचा उद्देश काय होता?

सा.यु. पेन्टेकॉस्ट ३२ नंतर लगेच, येशू ख्रिस्ताच्या तीन प्रेषितांनी एक संस्मरणीय दृष्टान्त पाहिला. ईश्‍वरप्रेरित अहवालानुसार, “येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्‍यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले.”—मत्तय १७:१, २.

२ रूपांतराचा दृष्टान्त महत्त्वपूर्ण वेळेला घडला. जेरुसलेममध्ये आपल्याला दुःख सहन करून मरावे लागणार होते हे आपल्या अनुयायांना सांगण्यास येशूने सुरवात केली होती, पण त्यांना त्याचे बोलणे समजण्यास कठीण वाटले. (मत्तय १६:२१-२३) या दृष्टान्ताने, येशूच्या येणाऱ्‍या मृत्यूच्या व ख्रिस्ती मंडळीला कार्य व परीक्षा यांच्या कठीण वर्षांच्या तयारीत असण्यासाठी त्याच्या तीन प्रेषितांचा विश्‍वास बळकट केला. या दृष्टान्तातून आपण आज काही शिकू शकतो का? होय, कारण त्या दृष्टान्ताने जे काही पूर्वचिन्हित केले ते वास्तविकतेत आपल्या काळात पूर्ण होते.

३, ४. (अ) रूपांतर होण्याच्या सहा दिवस आधी येशू काय म्हणाला होता? (ब) रूपांतराच्या वेळी काय घडले त्याचे वर्णन द्या.

३ रूपांतराच्या सहा दिवस आधी, येशूने आपल्या अनुयायांना सांगितले: “मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल.” या शब्दांची पूर्णता ‘युगाच्या समाप्तीला’ होणार होती. येशूने पुढे म्हटले: “मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” (मत्तय १६:२७, २८; २४:३; २५:३१-३४, ४१; दानीएल १२:४) वरील वचनाच्या शेवटल्या शब्दांच्या पूर्णतेत रूपांतर घडले.

४ तीन प्रेषितांनी नक्की काय पाहिले? घडलेल्या घटनेचे लूकने केलेले वर्णन पुढील प्रमाणे आहे: “[येशू] प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. आणि पाहा, मोशे व एलीया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत होते; ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते.” मग, “मेघ उतरून [प्रेषितांवर] छाया करू लागला; आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे; ह्‍याचे तुम्ही ऐका.”—लूक ९:२९-३१, ३४, ३५.

विश्‍वास बळकट केला जातो

५. प्रेषित पेत्रावर रूपांतराचा काय परिणाम झाला?

५ प्रेषित पेत्राने येशूची “ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र” अशी आधीच ओळख करून दिली होती. (मत्तय १६:१६) स्वर्गातून आलेल्या यहोवाच्या वाणीने या ओळखीची पुष्टी दिली व येशूच्या रूपांतराचा दृष्टान्त, कालांतराने ख्रिस्ताचे राज्य सामर्थ्यात व वैभवात येऊन मानवजातीचा न्याय करण्याबद्दलची आगाऊ सूचना होती. रूपांतर होऊन ३० पेक्षा अधिक वर्षे उलटल्यावर पेत्राने लिहिले: “चातुर्याने कल्पिलेल्या कथांस अनुसरुन आम्ही आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्‍यांसंबंधाने तुम्हांस कळविले असे नाही; तर आम्ही त्याचे ऐश्‍वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्‍वर्ययुक्‍त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.”—२ पेत्र १:१६-१८; १ पेत्र ४:१७.

६. रूपांतरानंतर कोणत्या घटनांचा विकास होत गेला?

६ या तीन प्रेषितांनी जे पाहिले त्यामुळे आज आपलाही विश्‍वास बळकट होतो. अर्थात, सा.यु. ३२ पासून प्रगतिशीलपणे घटना घडत गेल्या. त्याच्या पुढील वर्षी येशूचा मृत्यू झाला व पुनरुत्थान होऊन तो आपल्या पित्याच्या उजव्या हाताला बसला. (प्रेषितांची कृत्ये २:२९-३६) त्या वर्षाच्या पेन्टेकॉस्ट दिवशी, ‘देवाच्या नव्या इस्राएलचा’ उदय झाला व तेव्हापासून प्रचाराची एक मोहीम सुरू झाली जिची सुरवात जेरुसलेममध्ये होऊन नंतर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरत गेली. (गलतीकर ६:१६; प्रेषितांची कृत्ये १:८) त्यानंतर लगेचच येशूच्या अनुयायांच्या विश्‍वासाची परीक्षा झाली. प्रेषितांनी प्रचार करण्याचे थांबवण्यास नकार दिल्यामुळे त्यांना अटक झाली व खूप मार पडला. लगेचच, स्तेफनची हत्या करण्यात आली. मग, रूपांतर प्रत्यक्ष पाहिलेल्या याकोबाला ठार मारण्यात आले. (प्रेषितांची कृत्ये ५:१७-४०; ६:८–७:६०; १२:१, २) परंतु, पेत्र आणि योहान आणखी अनेक वर्षांपर्यंत यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करण्याकरता कसेबसे वाचले. वास्तविक पाहता, सा.यु. पहिल्या शतकाच्या समाप्तीला योहानाने, येशूच्या स्वर्गीय वैभवाचे पुढील दृष्टान्तात्मक ओझरते देखावे लिहून ठेवले.—प्रकटीकरण १:१२-२०; १४:१४; १९:११-१६.

७. (अ) रूपांतराच्या दृष्टान्ताची पूर्णता व्हावयास केव्हा सुरवात झाली? (ब) येशूने काहींना त्यांच्या कृत्याप्रमाणे केव्हा प्रतिफळ  दिले?

७ वर्ष १९१४ मधील ‘प्रभूच्या दिवसाच्या’ सुरवातीपासूनच, योहानाने पाहिलेले अनेक दृष्टान्त पूर्ण झाले आहेत. (प्रकटीकरण १:१०) रूपांतराने पूर्वचिन्हित केल्याप्रमाणे येशूचे, “आपल्या पित्याच्या गौरवानिशी” येणे याविषयी काय? १९१४ मध्ये देवाच्या स्वर्गीय राज्याचा जन्म झाला तेव्हा या दृष्टान्ताची पूर्णता व्हावयास सुरवात झाली. येशूचा, पहाटच्या ताऱ्‍याप्रमाणे, नवीन सिंहासनाधिष्ठीत राजा म्हणून विश्‍वव्यापी दृश्‍यावर उदय झाला तेव्हा जणू एका नवीन दिवसाचाच उदय झाला. (२ पेत्र १:१९; प्रकटीकरण ११:१५; २२:१६) येशूने त्यावेळी, काहींना ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे फळ दिले का? होय. त्यानंतर काही काळातच, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या स्वर्गीय पुनरुत्थानास सुरवात झाल्याचा ठोस पुरावा आहे.—२ तीमथ्य ४:८; प्रकटीकरण १४:१३.

८. कोणत्या घटना रूपांतराच्या दृष्टान्ताच्या पूर्णतेची समाप्ती चिन्हित करतील?

८ परंतु लवकरच, संपूर्ण मानवजातीचा न्याय करण्याकरता येशू “आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल.” (मत्तय २५:३१) त्यावेळी, तो आपल्या दिमाखदार वैभवात स्वतःला प्रकट करील आणि “प्रत्येकाला,” त्यांच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. मेंढरासमान लोक त्यांच्यासाठी तयार केलेल्या राज्यात सार्वकालिक जीवनाचा वारसा प्राप्त करतील आणि शेरडासमान लोक “सार्वकालिक शिक्षा” भोगावयास जातील. रूपांतराच्या दृष्टान्ताच्या पूर्णतेचा तो केवढा भव्य कळस असेल!—मत्तय २५:३४, ४१, ४६; मार्क ८:३८; २ थेस्सलनीकाकर १:६-१०.

येशूचे गौरवप्राप्त सोबती

९. रूपांतराच्या दृष्टान्ताच्या पूर्णतेत येशूसोबत मोशे व एलीया हे दोघे असावेत अशी अपेक्षा आपण केली पाहिजे का? वर्णन करा.

९ रूपांतरात येशू एकटाच नव्हता. मोशे आणि एलीया त्याच्याबरोबर दिसत होते. (मत्तय १७:२, ३) ते खरोखरच उपस्थित होते का? नाही, कारण दोघेही केव्हाचेच मरण पावून मातीस मिळाले होते व पुनरुत्थानाची वाट पाहत होते. (उपदेशक ९:५, १०; इब्रीयांस ११:३५) येशू आपल्या स्वर्गीय वैभवात येईल तेव्हा ते त्याच्यासोबत प्रकट होतील का? नाही, कारण मोशे आणि एलीया, मानवांना स्वर्गीय आशा बहाल करण्याआधीच्या काळात हयात होते. ते ‘नीतीमानांच्या पार्थिव पुनरुत्थानाचा’ भाग असतील. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) म्हणूनच रूपांतराच्या दृष्टान्तातील त्यांचे दिसणे लाक्षणिक आहे. ते लाक्षणिकरीत्या कशाला सूचित करत होते?

१०, ११. एलीया व मोशे वेगवेगळ्या संदर्भात कोणाला चित्रित करतात?

१० इतर संदर्भांत, मोशे आणि एलीया भविष्यसूचक व्यक्‍ती आहेत. नियमशास्त्राच्या कराराचा मध्यस्थ या नात्याने मोशेने, नवीन कराराचा मध्यस्थ असणाऱ्‍या येशूला पूर्वचिन्हित केले. (अनुवाद १८:१८; गलतीकर ३:१९; इब्री लोकांस ८:६) एलीयाने, मशीहाचा अग्रदूत अर्थात बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाला पूर्वचिन्हित केले. (मत्तय १७:११-१३) पुढे, प्रकटीकरण अध्याय ११ च्या संदर्भात मोशे व एलीया, अंत समयातील अभिषिक्‍त शेषांना पूर्वचिन्हित करतात. हे आपल्याला कसे माहीत होते?

११ प्रकटीकरण ११:१-६ पाहा. ३ ऱ्‍या वचनात आपण असे वाचतो: “माझे दोन साक्षी ह्‍यांस मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.” ही भविष्यवाणी, पहिल्या महायुद्धादरम्यानच्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या शेषांच्या बाबतीत पूर्ण झाली.a दोन साक्षीदार का? कारण अभिषिक्‍त शेष अशी कार्ये करतात जी आध्यात्मिक मार्गाने मोशे आणि एलीयाच्या कार्यांसारखी आहेत. ५ आणि ६ वचने पुढे म्हणतात: “त्यास कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नि निघून त्यांच्या वैऱ्‍यांस खाऊन टाकतो; कोणी त्यांस उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला ह्‍याचप्रमाणे जिवे मारण्यात यावे. त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यांस अधिकार दिलेला आहे; पाण्याचे रक्‍त करण्याचा अधिकार त्यांस पाण्यावर आहे, आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाहि त्यांस अधिकार आहे.” अशा प्रकारे आपल्याला एलीया आणि मोशेने केलेल्या चमत्कारांची आठवण करून दिली जाते.—गणना १६:३१-३४; १ राजे १७:१; २ राजे १:९-१२.

१२. रूपांतराच्या संदर्भात मोशे आणि एलीया कोणाला चित्रित करतात?

१२ मग, रूपांतराच्या संदर्भात मोशे आणि एलीया कोणाला पूर्वचिन्हित करतात? लूक म्हणतो, की ते येशूसोबत “तेजोमय” दिसले. (लूक ९:३१) स्पष्टपणे, येशूचे “सोबतीचे वारीस” म्हणून पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त केलेल्या व यामुळे “त्याच्याबरोबर गौरव प्राप्त” करण्याची आश्‍चर्यकारक आशा मिळालेल्या ख्रिश्‍चनांना ते पूर्वचिन्हित करतात. (रोमकर ८:१७) येशू आपल्या पित्याच्या गौरवानिशी, “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ” देण्यासाठी येईल तेव्हा हे पुनरुत्थित अभिषिक्‍त जन त्याच्यासोबत असतील.—मत्तय १६:२७.

मोशे आणि एलीयासारखे साक्षीदार

१३. कोणती उल्लेखनीय लक्षणे मोशे आणि एलीयाला, येशूसोबत गौरविलेल्या अभिषिक्‍त सहवारिसांच्या उचित भविष्यसूचक प्रतिमा या नात्याने चिन्हित करतात?

१३ मोशे आणि एलीयाला येशूच्या अभिषिक्‍त सहवारीसांच्या उचित भविष्यसूचक प्रतिमा या नात्याने चिन्हित करणारी उल्लेखनीय लक्षणे आहेत. मोशे आणि एलीया या दोघांनी अनेक वर्षांपर्यंत यहोवाचे प्रवक्‍ते या नात्याने कार्य केले. दोघांना शासकाचा रोष सहन करावा लागला. गरजेच्या काळात, प्रत्येकाला एका विदेशी कुटुंबाने आधार दिला. दोघांनी राजांपुढे निडरतेने भविष्य सांगितले व दोघेही खोट्या संदेष्ट्यांविरुद्ध दृढ उभे राहिले. मोशे आणि एलीया या दोघांनी सीनाय पर्वतावर (होरेब असेही संबोधले जाते) यहोवाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन पाहिले. दोघांनी यार्देनेच्या पूर्वेस वारस नेमले. येशूच्या जीवनकाळादरम्यान घडलेल्या चमत्कारांव्यतिरिक्‍त मोशे (यहोशवासोबत) आणि एलीया (एलीशासोबत) या दोघांच्या समयात, पुष्कळ चमत्कार करण्यात आले.b

१४. अभिषिक्‍तांनी, मोशे व एलीयाप्रमाणे यहोवाचा प्रवक्‍ता या नात्याने कसे कार्य केले आहे?

१४ या सर्वांवरून आपल्याला देवाच्या इस्राएलची आठवण होत नाही का? होय निश्‍चितच. येशूने आपल्या विश्‍वासू अनुयायांना सांगितले: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१९, २०) या शब्दांचे पालन करून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी सा.यु. ३३ मधील पेन्टेकॉस्ट पासून आजपर्यंत यहोवाचा प्रवक्‍ता या नात्याने कार्य केले आहे. मोशे आणि एलीयाप्रमाणे, त्यांनी शासकांचा रोष सहन केला व साक्ष दिली आहे. येशूने आपल्या १२ प्रेषितांना सांगितले: “तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्‍यांच्यापुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल.” (मत्तय १०:१८) ख्रिस्ती मंडळीच्या इतिहासादरम्यान त्याच्या या शब्दांची वारंवार पूर्णता झाली आहे.—प्रेषितांची कृत्ये २५:६, ११, १२, २४-२७; २६:३.

१५, १६. एका बाजूला अभिषिक्‍त आणि दुसऱ्‍या बाजूला मोशे व एलीया यांच्यात (अ) निर्भीडपणे सत्याच्या बाजूने उभे राहण्याबाबत? (ब) गैर-इस्राएलींकडून साहाय्य मिळण्याबाबत? कोणते साम्य आहे?

१५ पुढे, अभिषिक्‍त ख्रिस्ती निर्भयतेने मोशे व एलीयाप्रमाणे धार्मिक खोटेपणाविरुद्ध सत्याच्या बाजूने उभे राहिले आहेत. पौलाने यहुदी खोटा संदेष्टा बर्येशूला कसे धिक्कारले व चतुराईने पण दृढतेने अथेनियन दैवतांच्या खोटेपणाचे बिंग बाहेर काढले ते आठवा. (प्रेषितांची कृत्ये १३:६-१२; १७:१६, २२-३१) तसेच, आधुनिक समयात अभिषिक्‍त शेषांनी निडरतेने ख्रिस्ती धर्मजगताचे बिंग बाहेर काढले व या साक्षकार्यामुळे ख्रिस्ती धर्मजगत पीडित झाले याचीही आठवण करा.—प्रकटीकरण ८:७-१२.c

१६ मोशे फारोच्या क्रोधापासून पळून गेला तेव्हा त्याला रगुवेल, ज्याला इथ्रो असेही म्हटले जाते त्या गैर-इस्राएली व्यक्‍तीच्या घरी आश्रय मिळाला. काही काळानंतर मोशेला, इस्राएलला रानातून मार्ग दाखवणाऱ्‍या होबाबच्या पित्याकडून अर्थात रगुवेलकडून मौल्यवान संघटनात्मक सल्ला मिळाला.d (निर्गम २:१५-२२; १८:५-२७; गणना १०:२९) अशाच प्रकारे, देवाच्या इस्राएलचे अभिषिक्‍त सदस्य नसलेल्या व्यक्‍तींकडून देवाच्या इस्राएलच्या सदस्यांना कधी साहाय्य मिळाले का? होय, या शेवटल्या दिवसांमध्ये दृश्‍यमान झालेल्या ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ ‘मोठ्या लोकसमुदायाने’ त्यांना साहाय्य दिले आहे. (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६; यशया ६१:५) ही “मेंढरे” आपल्या अभिषिक्‍त बांधवांना जे सस्नेह, प्रेमळ साहाय्य देतील याविषयी भाकीत करताना येशू त्यांना भविष्यसूचकपणे म्हणाला: “कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. . . . मी तुम्हास खचित सांगतो की, ज्याअर्थी तुम्ही ह्‍या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्याअर्थी ते मला केले आहे.”—मत्तय २५:३५-४०.

१७. होरेब पर्वतावर एलीयासारखाच अभिषिक्‍तांना अनुभव कसा आला?

१७ पुढे, होरेब पर्वतावर एलीयाला जसा अनुभव आला तसाच अतुलनीय अनुभव देवाच्या इस्राएलासही आला.e त्या काळी, ईजबेलीपासून दूर पळणाऱ्‍या एलीयाप्रमाणे, घाबरलेल्या अभिषिक्‍त शेषाला वाटले, की पहिल्या महायुद्धाचा अंत झाल्यावर त्यांचेही कार्य संपले. शिवाय, ‘देवाचे घर’ असल्याचा दावा करणाऱ्‍या संघटनांचा न्याय करण्यासाठी आलेल्या यहोवाशी एलीयाप्रमाणेच त्यांचा संपर्क आला. (१ पेत्र ४:१७; मलाखी ३:१-३) ख्रिस्ती धर्मजगत उणे पडत असल्याचे दिसून आल्यावर, अभिषिक्‍त शेषाला ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ म्हणून ओळखण्यात आले व येशूच्या पृथ्वीवरील सर्वस्वांवर त्यांना नेमण्यात आले. (मत्तय २४:४५-४७) होरेबवर, एलीयाने यहोवाची “शांत, मंद वाणी” ऐकली आणि त्याला आणखी कार्यनियुक्‍ती सोपवण्यात आली. युद्धोत्तर वर्षांच्या त्या शांत काळात, यहोवाच्या विश्‍वासू अभिषिक्‍त सेवकांनी बायबलमधून त्याची वाणी ऐकली. त्यांनाही एक कामगिरी पूर्ण करावयाची होती याचे त्यांना आकलन झाले.—१ राजे १९:४, ९-१८; प्रकटीकरण ११:७-१३.

१८. यहोवाच्या सामर्थ्याची उल्लेखनीय प्रदर्शने देवाच्या इस्राएलद्वारा कशी दाखवण्यात आली आहेत?

१८ सरतेशेवटी, यहोवाच्या सामर्थ्याची उल्लेखनीय प्रदर्शने देवाच्या इस्राएलद्वारा दाखवण्यात आली आहेत का? येशूच्या मृत्यूनंतर, प्रेषितांनी अनेक चमत्कार केले पण ते कालांतराने लोप पावत गेले. (१ करिंथकर १३:८-१३) आजकाल, आपण प्रत्यक्षात चमत्कार पाहत नाही. दुसऱ्‍या बाजूला पाहता, येशूने आपल्या अनुयायांना म्हटले: “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करितो, ती माझ्यावर विश्‍वास ठेवणाराहि करील, आणि त्यापेक्षा मोठी करील.” (योहान १४:१२) येशूच्या शिष्यांनी पहिल्या शतकात संपूर्ण रोमी साम्राज्यात सुवार्तेचा प्रचार केला तेव्हा या वचनाची पहिली पूर्णता झाली. (रोमकर १०:१८) आज, त्याहीपेक्षा महान कार्ये पूर्ण करण्यात आली आहेत, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी ‘सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याच्या सुवार्तेच्या प्रचारकार्यात’ नेतृत्व घेतले आहे. (मत्तय २४:१४) याचा परिणाम? २० व्या शतकाने, इतिहासातील सर्वात मोठ्या संख्येने यहोवाच्या समर्पित, विश्‍वासू सेवकांचे एकत्रीकरण प्रत्यक्ष पाहिले आहे. (प्रकटीकरण ५:९, १०; ७:९, १०) यहोवाच्या सामर्थ्याचा केवढा हा महान पुरावा!—यशया ६०:२२.

येशूचे बंधू वैभवात येतात

१९. येशूचे अभिषिक्‍त बंधू त्याच्यासोबत गौरवानिशी केव्हा दिसतात?

१९ येशूच्या अभिषिक्‍त बांधवांतील शेषांनी आपले पार्थिव जीवन समाप्त केल्यावर त्याच्यासोबत त्यांचा गौरव करण्यात येतो. (रोमकर २:६, ७; १ करिंथकर १५:५३; १ थेस्सलनीकाकर ४:१४, १७) म्हणूनच ते स्वर्गीय राज्यात अमर राजे व याजक होतात. मग ते येशूसोबत, ‘जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करितात तसा लोहदंडाने लोकांवर अधिकार’ गाजवतील. (प्रकटीकरण २:२७; २०:४-६; स्तोत्र ११०:२, ५, ६) येशूबरोबर ते “इस्राएलाच्या बारा वंशांचा” न्यायनिवाडा करण्याकरता राजासनांवर बसतील. (मत्तय १९:२८) ‘देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याचा’ भाग असलेल्या या घटनांची, उसासे टाकणारी सृष्टी आतुरतेने वाट पाहत आहे.—रोमकर ८:१९-२१; २ थेस्सलनीकाकर १:६-८.

२०. (अ) रूपांतराने कोणत्या आशेसंबंधी पेत्राचा विश्‍वास बळकट केला? (ब) रूपांतर आज ख्रिश्‍चनांना बळकट कसे करते?

२० ‘मोठ्या संकटादरम्यान’ येशूच्या प्रकटीकरणाविषयी लिहिताना पौल म्हणाला: “आपल्या पवित्र जनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून, आणि त्या दिवशी विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांच्या ठायी आश्‍चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल.” (मत्तय २४:२१; २ थेस्सलनीकाकर १:१०) पेत्र, याकोब, योहान आणि आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या सर्व ख्रिश्‍चनांसाठी किती महान आशा! रूपांतराने पेत्राचा विश्‍वास बळकट केला. निश्‍चितच, रूपांतराचा अहवाल वाचल्यामुळे आपलाही विश्‍वास बळकट होतो तसेच येशू लवकरच “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ” देईल हा आपला भरवसा दृढ होतो. आजपर्यंत जिवंत असलेले विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चन, आपल्याला येशूसोबत गौरविले जाईल हा त्यांचा आत्मविश्‍वास दृढ होताना पाहतात. येशू आपल्याला या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंतापासून बचावून एका वैभवी नवीन जगात नेईल या जाणिवेने दुसऱ्‍या मेंढरांचा विश्‍वास मजबूत होतो. (प्रकटीकरण ७:१४) शेवटपर्यंत टिकून राहण्याकरता केवढे हे उत्तम प्रोत्साहन! शिवाय, हा दृष्टान्त आपल्याला पुष्कळ काही शिकवू शकतो; त्याबद्दल आपण पुढील लेखात पाहणार आहोत.

[तळटीपा]

a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित “तुझे नाम पवित्र मानले जावो,” (इंग्रजी) पृष्ठे ३१३-१४, तसेच प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! पृष्ठे १६४-५ ही पुस्तके पाहा.

b निर्गम २:१५-२२; ३:१-६; ५:२; ७:८-१३; ८:१८; १९:१६-१९; अनुवाद ३१:२३; १ राजे १७:८-१६; १८:२१-४०; १९:१, २, ८-१८; २ राजे २:१-१४.

c प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! पृष्ठे १३३-४१ पाहा.

d वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित तुम्ही हर्मगिदोनातून बचावून देवाच्या नव्या जगात प्रवेश करू शकता (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठे २८१-३ पाहा.

e “तुझे नाम पवित्र मानिले जावो,” (इंग्रजी) पृष्ठे ३१७-२० पाहा.

तुम्हाला आठवते का?

◻ रूपांतराच्या वेळी येशूसोबत कोण दिसत होते?

◻ रूपांतरामुळे प्रेषितांचा विश्‍वास कशाप्रकारे बळकट झाला?

◻ मोशे व एलीया रूपांतराच्या वेळी येशूसोबत “तेजोमय” दिसले तेव्हा ते कोणाला चित्रित करत होते?

◻ एका बाजूला देवाचे इस्राएल आणि दुसऱ्‍या बाजूला मोशे व एलीया असून यांच्यात कोणते साम्य आहे?

[१० पानांवरील चित्र]

रूपांतराच्या दृष्टान्ताने गत काळातील आणि सध्याच्या ख्रिश्‍चनांचा विश्‍वास बळकट केला आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा