इतरांवर भरवसा ठेवण्यास तुम्हाला भय वाटते का?
‘मला ज्याच्याशी बोलता येईल असं कुणी देखील नाही. लोक मला समजूनच घेत नाहीत. ते आपल्याच समस्यांत मश्गूल आहेत. त्यांना माझ्यासाठी एवढी सुद्धा सवड नाही.’ अनेक जणांना असे वाटत असल्यामुळे त्यांचे विचार ते इतरांना सांगत नाहीत. कसं काय चाललंय, असे इतर जण त्यांना विचारतात तेव्हा बहुतेकवेळा त्यांना इतरांना सांगायचे असते, पण ते तसे करत नाहीत. स्वतःच्या भावना व्यक्त करणे त्यांच्यासाठी निव्वळ अशक्य असते.
हे खरे आहे, की काही लोकांना इतरांची मदत नको असते. तरी देखील असे अनेक जण असतात ज्यांना मदतीची फार आवश्यकता असते पण आपले व्यक्तिगत विचार, भावना आणि अनुभव सांगण्यास त्यांना भय वाटते. तुम्हीही त्यांच्यापैकी आहात का? तुम्ही भरवसा ठेवू शकता, असे खरोखरच कोणी नाही का?
भय समजावून घेणे
आजच्या जगात बेभरवशाचे वातावरण आहे. युवक आपल्या पालकांशी बोलत नाहीत. पालकांना आपसांत बोलणे अशक्य आहे. अधिकाऱ्यांसोबत बोलण्यासाठी फार कमी लोक तयार असतात. इतरांवर भरवसा टाकणे शक्य न झाल्यामुळे काही जण आपल्या समस्यांपासून पळ काढण्यासाठी दारू, अंमली पदार्थ किंवा जंगली जीवन शैलीकडे वळतात.—नीतिसूत्रे २३:२९-३५; यशया ५६:१२.
पाळक, डॉक्टर, उपचारतज्ज्ञ तसेच शिक्षक अशा अधिकार पदावर असणाऱ्या लोकांच्या अप्रामाणिकपणाच्या आणि अनैतिकतेच्या बारा-भानगडी उघडकीस आल्याने त्यांच्यावरील विश्वासास तडा गेला आहे. उदाहरणार्थ, एका आकडेवारीनुसार १० टक्क्यांपेक्षा अधिक पाळक लैंगिक गैरवर्तनात गुंतलेले आहेत. एक लेखक टिपणी करतो: हे “भरवसा-भंजक लोक, मानवी नातेसंबंधांत खिंड आणि दरा निर्माण करतात.” याचा त्यांच्या मंडळ्यांवर कसा परिणाम होतो? यामुळे त्यांच्या भरवशास तडा जातो.
सगळीकडे नैतिकतेला उतरती कळा लागल्यामुळे कुटुंबात देखील संघर्ष निर्माण झाला आहे आणि अशा प्रकारची मोडकळीस आलेली कुटुंबे अपवाद न राहता जवळजवळ सर्वसामान्य झाली आहेत. घरात एके काळी संवर्धनाचे वातावरण होते. आज ते दुसरे तिसरे काही नसून निव्वळ एखाद्या खाणावळीसारखे झाले आहे. “ममताहीन” कुटुंबात एखादे मूल लहानाचे मोठे होते तेव्हा त्याचा सामान्य परिणाम म्हणजे ते मूल आपल्या प्रौढावस्थेत इतरांवर भरवसा ठेवू शकत नाही.—२ तीमथ्य ३:३.
याखेरीज, जसजशी या जगाची परिस्थिती रसातळाला पोहंचते तसतसे आपण संभाव्यपणे आघातजन्य अनुभवांना तोंड देतो. अशाच प्रकारच्या परिस्थितीमध्ये मीखा नामक संदेष्ट्याने लिहिले: ‘जिवलग मित्रावर भरवसा ठेवू नको.’ (मीखा ७:५) तुम्ही थोडेसे निराश झाल्यावर, तुमच्या भरवशास तडा गेल्यावर किंवा तुमचे जीवन धोक्यात येईल अशी एखादी घटना घडल्यानंतर तुम्हालाही असे वाटू शकते. दररोजच्या भावनात्मक अडथळ्यांना तोंड देत जीवन कंठत असताना इतरांवर पुन्हा एकदा भरवसा ठेवण्यास तुम्हाला कठीण जाते आणि तुम्ही भावनिकरीत्या सुन्न होता. (पडताळा स्तोत्र १०२:१-७.) हे खरे, की अशा प्रकारची मनोवृत्ती कार्य करण्यास तुम्हाला मदत करील; परंतु तुमच्या ‘मनातील खेद’ जीवनातील खरा आनंद तुमच्यापासून हिरावून घेतो. (नीतिसूत्रे १५:१३) सत्य हे आहे, की तुम्हाला आध्यात्मिक, भावनिक, मानसिक आणि शारीरिकरीत्या सुदृढ व्हावयाचे असल्यास भावनात्मक अडथळा दूर होणे तसेच लोकांवर विश्वास ठेवण्याचे शिकणे तुमच्यासाठी अगत्याचे आहे. ते शक्य आहे का? होय, ते शक्य आहे.
तुम्ही ते अडथळे दूर का करावेत?
इतरांना खासगी गोष्टी सांगितल्यामुळे उद्विग्न मनाला हायसे वाटते. हन्नेला याचा अनुभव आला. तिचा विवाह एका चांगल्या पुरुषाशी झाला होता, तिला एक सुरक्षित घर होते, तरी देखील ती खूप खिन्न होती. तिचे “मन व्यथित” होते तरी तिने सुज्ञपणे “परमेश्वराची करुणा” भाकण्यास सुरवात केली तेव्हा केवळ तिचे ओठ हालत होते. होय, तिचा यहोवावर पूर्ण विश्वास होता. मग तिने आपले मन एली नामक देवाच्या प्रतिनिधीकडे मोकळे केले. याचा परिणाम काय झाला? “[हन्नाने] परत जाऊन अन्न सेवन केले, व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.”—१ शमुवेल १:१-१८.
खासगीत गोष्टी सांगितल्यामुळे होणारे लाभ बहुतेक सर्व संस्कृतींना माहिती झाले आहेत. उदाहरणार्थ, आपल्यासारख्याच परिस्थितींचा ज्यांनी अनुभव घेतला आहे, अशा लोकांना आपले विचार आणि अनुभव सांगणे लाभदायक होऊ शकते. संशोधक अखेरीस असे म्हणतात: “भावनिकरीत्या फटकून राहिल्याने आजारपण येते—भावनात्मकरीत्या सुस्थितीत राहण्यासाठी घडलेल्या गोष्टी इतरांना सांगणे आपल्यासाठी गरजेचे आहे.” शास्त्रोक्त संशोधकाच्या प्रगतशील वर्गाने प्रेरित नीतिसूत्राच्या सत्यतेला पुष्टी दिली: “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.”—नीतिसूत्रे १८:१.
तुम्ही तुमची समस्या इतरांना सांगितलीच नाही, तर ते तुम्हाला मदत तरी कशी करू शकतील? यहोवा देव अंतःकरणे वाचू शकतो, परंतु तुमच्या अंतर्मनातील विचार आणि भावना तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना सांगितल्या नाहीत तर ते त्यांच्यासाठी केवळ एक बंद पुस्तक आहे. (१ इतिहास २८:९) जेव्हा तुम्ही देवाच्या नियमाच्या विरोधात पाप करता तेव्हा त्यावर पांघरुण घातल्याने परिस्थिती आणखीनच विकोपाला जाते.—नीतिसूत्रे २८:१३.
निश्चितच, आपले दुःख मनमोकळेपणाने बोलून दाखविल्यामुळे भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असली तरीसुद्धा असे करण्याचे फायदेच जास्त आहे. अर्थातच, आपण आपल्या बारीकसारीक सर्व गोष्टी सरसकट जाहीर केल्या पाहिजेत, असा याचा अर्थ होत नाही. (पडताळा शास्ते १६:१८; यिर्मया ९:४; लूक २१:१६.) “जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो,” असा नीतिसूत्रे १८:२४ इशारा देते व पुढे असे म्हणते: “एकादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपक्षाहि आपणास धरून राहतो.” असा मित्र तुम्हाला कोठे मिळू शकतो?
तुमच्या कुटुंबावर विश्वास ठेवा
तुम्हाला एखादी समस्या असल्यास, तुमच्या वैवाहिक सोबत्याबरोबर किंवा तुमच्या कुटुंबासोबत तिची चर्चा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? “तुमच्या सर्व समस्यांविषयी सविस्तरपणे बोलण्याची आवश्यकता आहे,” असे एक अनुभवी सल्लागार मान्य करतो. (नीतिसूत्रे २७:९) ‘स्वतःप्रमाणे आपल्या पत्नीवर प्रेम करणारे’ ख्रिस्ती पती, “आपआपल्या पतीच्या अधीन” असणाऱ्या पत्नी आणि आपल्या मुलांना ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवण्याची’ देवाने दिलेली जबाबदारी गांभिर्याने पार पाडणारे पालक सहानुभूतीशील ऐकणारे आणि मदतदायी सल्लागार होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करतील. (इफिसकर ५:२२, ३३; ६:४) येशूला शारीरिक पत्नी आणि मुले नव्हती तरी देखील त्याने या संदर्भात किती चांगले उदाहरण मांडले आहे!—मार्क १०:१३-१६; इफिसकर ५:२५-२७.
एखादी समस्या कुटुंबाला हाताळण्याच्या पलीकडे गेल्यास काय? ख्रिस्ती मंडळीमध्ये आपण कधीही एकाकी पडत नाही. “एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय?” असे प्रेषित पौलाने म्हटले. (२ करिंथकर ११:२९) त्याने असा बोध केला: “एकमेकांची ओझी वाहा.” (गलतीकर ६:२; रोमकर १५:१) आपल्या आध्यात्मिक भाऊबहिणींमध्ये आपल्याला निश्चितपणे अनेक बांधव मिळू शकतात जे ‘विपत्कालासाठी बंधू म्हणून निर्माण झालेले असतात.’—नीतिसूत्रे १७:१७.
मंडळीवर भरवसा ठेवा
संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या ८०,००० पेक्षा अधिक मंडळ्यामधील नम्र पुरुष “तुमच्या आनंदात साहाय्यकारी” म्हणून सेवा करतात. (२ करिंथकर १:२४) हे लोक वडील आहेत. यशयाने लिहिले: “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया असा तो होईल.” वडील या वर्णनाशी उतरण्याचा प्रयत्न करतात.—यशया ३२:२; ५०:४; २ थेस्सलनीकाकर ५:१४.
‘पवित्र आत्म्याने नियुक्त’ होण्याआधी वडील शास्त्रवचनीय अपेक्षा पूर्ण करतात. हे जाणल्याने तुमचा त्यांच्यावरील भरवसा आणखी वाढेल. (प्रेषितांची कृत्ये २०:२८; १ तीमथ्य ३:२-७; तीत १:५-९) तुम्ही वडिलांसोबत ज्या गोष्टीची चर्चा करता ती पूर्णपणे गोपनीय राहील. विश्वासू असणे, ही वडिलांकडून केली जाणारी एक अपेक्षा आहे.—पडताळा निर्गम १८:२१; नहेम्या ७:२.
मंडळीतील वडील “आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात.” (इब्री लोकांस १३:१७) यामुळे अशा पुरुषांवर तुम्ही आपला भरवसा टाकावा, असे तुम्हाला वाटत नाही का? हे साहजिक आहे, की सर्वच वडील समान गुणांमध्ये श्रेष्ठ नाहीत. काही जण सुगम्य, दयाळू वाटतील किंवा त्यांच्याकडे इतरांपेक्षा अधिक समजबुद्धी सुद्धा असेल. (२ करिंथकर १२:१५; १ थेस्सलनीकाकर २:७, ८, ११) तुम्हाला ज्या वडिलाकडे जाण्यास सुकर वाटते त्याच्याशी तुम्ही कोणतीही आडकाठी न ठेवता का बोलू नये?
हे पुरुष आर्थिक लाभासाठी काम करत नाहीत. उलटपक्षी, यहोवाने “मानवांना देणग्या” म्हणून आपल्या मदतीसाठी त्यांना दिले आहे. (इफिसकर ४:८, ११-१३; गलतीकर ६:१) ते कसे काय? बायबलचा कौशल्याने वापर करून त्याच्या बरे करण्याच्या सामर्थ्याचा उपयोग ते तुमच्या व्यक्तिगत परिस्थितीसाठी करतील. (स्तोत्र १०७:२०; नीतिसूत्रे १२:१८; इब्री लोकांस ४:१२, १३) ते तुमच्यासोबत आणि तुमच्यासाठी प्रार्थना करतील. (फिलिप्पैकर १:९; याकोब ५:१३-१८) अशा प्रेमळ सल्लागारांची मदत दुःखित मनास हायसे वाटण्यासाठी आणि मनःशांती पुन्हा प्राप्त करण्यासाठी पुष्कळ काही करू शकते.
भरवशाचे नातेसंबंध कसे वाढवावेत
मदतीसाठी, सल्ल्यासाठी विचारणे किंवा ऐकणे म्हणजे दुर्बळतेचे अथवा अपेशाचे चिन्ह नाही. असे करणे म्हणजे या वास्तविकतेचा स्वीकार करणे, की आपण अपरिपूर्ण आहोत आणि कोणाकडेही सर्व प्रश्नांची उत्तरे नाहीत. निश्चितपणे, आपला स्वर्गीय पिता यहोवा देव आपला महान सल्लागार तसेच अगदी खात्रीचा देखील आहे. आपण स्तोत्रकर्त्याशी सहमत आहोत ज्याने लिहिले: “परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेविला आणि मी साहाय्य पावलो.” (स्तोत्र २८:७) तो आपले ऐकतो आणि आपली काळजी घेतो, असा विश्वास बाळगून आपण कोणत्याही समयी प्रार्थनेत त्याच्याजवळ “आपले मन” पूर्णपणे मोकळे करू शकतो.—स्तोत्र ६२:७, ८; १ पेत्र ५:७.
परंतु, मंडळीतील वडिलांवर आणि इतरांवर विश्वास ठेवण्याचे तुम्ही कसे शिकू शकता? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुमच्या भीतीला योग्य आधार आहे का? तुम्ही इतरांच्या उद्देशांविषयी संशयखोर आहात का? (१ करिंथकर १३:४, ७) इजा पोहंचण्याचा धोका कमी करण्याचा एखादा मार्ग आहे का? होय. कशा प्रकारे? आध्यात्मिक कार्यहालचालींत इतरांशी व्यक्तिगतरीत्या परिचित होण्याचा प्रयत्न करा. मंडळीच्या सभांच्यावेळी त्यांच्याशी बोला. त्यांच्यासोबत घरोघरच्या कार्यात भाग घ्या. आदराप्रमाणे भरवसा देखील संपादन करावा लागतो. त्यामुळे संयम बाळगा. उदाहरणार्थ, तुम्ही आध्यात्मिक मेंढपाळ या नात्याने एखाद्यास जसजसे जाणता तसतसे त्याच्यावरील तुमचा विश्वास आणखी दृढ होईल. हळूहळू तुमच्या काळज्या त्याला सांगा. तो उचित, सहानुभूतीशील आणि विवेकी प्रतिक्रिया दाखवत असल्यास तुम्ही त्याला अधिक काही सांगण्याचा प्रयत्न करू शकता.
यहोवाचे सहउपासक, विशेषतः ख्रिस्ती वडील एकमेकांसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधात देवाच्या आकर्षक गुणांचे अनुसरण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. (मत्तय ५:४८) याचा परिणाम म्हणून मंडळीमध्ये भरवशाचे वातावरण तयार होते. दीर्घकाळापासून वडील असलेला एक बंधू म्हणतो: “बांधवांनी एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे: एखाद्या मनुष्याने काहीही केले तरी वडील त्याच्यावरील आपल्या ख्रिस्ती प्रीतीचा केव्हाही त्याग करत नाहीत. त्याने जे केले आहे ते कदाचित वडिलाला आवडणारही नाही, परंतु तरीही वडील त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याला मदत करण्याची त्याची इच्छा असते.”
समस्या उद्भवते तेव्हा आपण एकटे आहोत, असे वाटण्याची काही एक आवश्यकता नाही. “आध्यात्मिक वृत्तीचे” असणाऱ्यांशी बोला जे तुम्हाला तुमचे ओझे हलके करण्यासाठी मदत करू शकतील. (गलतीकर ६:१) हे लक्षात ठेवा की, “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते,” परंतु “ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांस आरोग्य देणारी आहेत.”—नीतिसूत्रे १२:२५; १६:२४.
[२६ पानांवरील चौकट]
एखाद्या नातेवाईकाची, मित्राची किंवा आध्यात्मिक बांधवाची व्यक्तिगत समस्या दूर करण्यासाठी मदत म्हणून कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीची मदत होऊ शकते. मदत कशी करावी, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
प्रभावी सल्लागार
सुगम्य असतो: मत्तय ११:२८, २९; १ पेत्र १:२२; ५:२, ३
योग्य वेळ निवडतो: मार्क ९:३३-३७
समस्या समजावून घेण्याचा प्रयत्न करतो: लूक ८:१८; याकोब १:१९
अवाजवी वागत नाही: कलस्सैकर ३:१२-१४
दुःखद भावनांना तोंड देण्यास मदत करतो: १ थेस्सलनीकाकर ५:१४; १ पेत्र ३:८
स्वतःच्या मर्यादा जाणतो: गलतीकर ६:३; १ पेत्र ५:५
स्पष्ट सल्ला देतो: स्तोत्र १९:७-९; नीतिसूत्रे २४:२६
गोपनीयता पाळतो: नीतिसूत्रे १०:१९; २५:९