मद्यार्कयुक्त पेयांविषयी तुम्ही ईश्वरी दृष्टिकोन बाळगता का?
सुमारे २० वर्षांपूर्वी पुरातत्त्व-शास्त्रज्ञांनी इराणमधील, युरमाया शहरापासून जवळच असणाऱ्या मातीच्या विटांच्या एका पुरातन इमारतीचे उत्खनन केले. त्यांना तेथे एक चिनीमातीची बरणी मिळाली, शास्त्रज्ञांच्या मते ही बरणी हजारो वर्षांपूर्वीची म्हणजे जेव्हा अगदी आरंभीच्या मानवी वसाहतींचे वसन झाले त्या काळातील आहे. अलीकडेच, या बरणीचे पृथ्थकरण करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. बरणीतील मद्य तयार करण्याचा प्राचीन रसायन पुरावा पाहून शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटले.
प्राचीन काळापासून द्राक्षारस, बिअर आणि इतर मद्यार्कयुक्त पेये प्राशन करण्यात आली आहेत, असे बायबल देखील अगदी स्पष्टपणे सांगते. (उत्पत्ति २७:२५; उपदेशक ९:७; नहूम १:१०) इतर अन्नाप्रमाणे यहोवा आपल्यासमोर व्यक्तिगत निवड ठेवतो—मद्यार्कयुक्त पेये प्राशन करावीत अथवा करू नयेत. येशूने अनेकदा आपल्या जेवणासोबत द्राक्षारस घेतला. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने द्राक्षारस वर्ज्य केला होता.—मत्तय ११:१८, १९.
बायबल पिण्यातील अतिरेकास मज्जाव करते. मद्यपीपणा देवाच्या विरोधात पाप आहे. (१ करिंथकर ६:९-११) या गोष्टीच्या एकवाक्यतेत यहोवाचे साक्षीदार अपश्चात्तापी मद्यप्यास ख्रिस्ती मंडळीत राहण्याची परवानगी देत नाहीत. मद्यार्कयुक्त पेये प्राशन करण्याची निवड करणाऱ्या मंडळीतील ख्रिस्ती जणांनी ती पेये मर्यादशीलपणे घ्यावीत.—तीत २:२, ३.
अभक्त दृष्टिकोन
आज अनेक जण मद्यार्कयुक्त पेयांविषयी ईश्वरी दृष्टिकोन बाळगत नाहीत. सैतान या प्राचीन उत्पादनाच्या गैरवापरास प्रेरित करीत असल्याचे सहज दिसून येते. उदाहरणार्थ, दक्षिण पॅसिफिकच्या काही बेटांवर, पुरुषांनी एकत्र येऊन किण्वन प्रक्रियेद्वारे घरीच तयार केलेली पेये प्राशन करण्याची चाल आहे. हे कार्यक्रम कित्येक तासांपर्यंत चालतील आणि त्यांचे वारंवार आयोजन केले जाईल—अनेक पुरुषांना तर दररोज पिण्याचे व्यसन जडले आहे. काही जण असा विचार करतात, की हा संस्कृतीचा निव्वळ एक भाग आहे. बहुतेक वेळा स्थानिक गृह-निर्मित पेयांऐवजी—किंवा त्यांशिवाय बिअर आणि स्पिरिटे प्राशन केली जातात. याचा बहुतेकवेळा मद्यपीपणात परिणाम होतो.
पुरुषांनी नेमस्तपणे मद्यार्क प्राशन करावे, असे कधी ऐकण्यातच नसलेले पॅसिफिकचे आणखी एक बेट आहे. एखाद्या सामान्य नियमाप्रमाणे, ते ज्या-ज्यावेळी पितात ते केवळ झिंगण्यासाठीच. विशेषतः, पगाराच्या दिवशी लोकांचा गट एकत्र येऊन बिअरची अनेक खोकी विकत घेतो आणि प्रत्येक खोक्यात २४ बाटल्या असतात. बिअर संपल्यानंतरच ते पिण्याचे थांबतात. याचा परिणाम म्हणून लोकांमधील मद्यपीपणा ही अगदी सामान्य बाब झाली आहे.
किण्वन पेये जसे की, ताडा-माडापासून तयार केलेले मद्य आणि इतर स्थानिक मदिरा आफ्रिकी देशांमध्ये पारंपारिकपणे घेण्यात येते. काही समाजांतील परंपरा, पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना मद्यार्क देण्याचे अगत्य करतात. पाहुणचार करणारा घरधनी आगंतुक प्राशन करू शकेल त्यापेक्षा जास्तच मद्यार्क प्रघातानुसार त्याच्यापुढे ठेवतो. प्रत्येक अतिथीसमोर बिअरच्या १२ बाटल्या ठेवण्याची एका ठिकाणी चाल आहे.
अनेक जपानी कंपन्या आपल्या कामगारांसाठी बसने सहलीला जाण्याची योजना आखतात. ते मोठ्या प्रमाणात मद्यार्कयुक्त पेये बरोबर घेतात आणि मद्यपीपणाकडे सर्रास डोळेझाक केली जाते. काही कंपन्यांची ही भटकंती तर दोन किंवा तीन दिवसांपर्यंत चालते. एशियाविक या नियतकालिकानुसार, जपानमध्ये “भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते श्रीमंत राजकीय व्यक्तीपर्यंत, एखादा मनुष्य पारंपारिकरीत्या किती मद्य प्राशन करू शकतो यावरून त्याची मर्दुमकी ठरवली जाते.” अशाच प्रकारच्या विचारांचा इतर आशियाई देशांत अवलंब केला जात आहे. एशियाविक या नियतकालिकाने म्हटले की, “जगातील कोणत्याही ठिकाणी पिणाऱ्यांच्या तुलनेत दक्षिण कोरीयातील लोक प्रत्येक व्यक्तीमागे अधिक स्पिरिटे प्राशन करतात.”
संयुक्त संस्थानांतील कॉलेज क्षेत्रांत यथेच्छ पिण्याच्या प्रघाताचा सर्वत्र प्रसार झाला आहे. अमेरिकी वैद्यकीय संघटनेचे नियतकालिक (इंग्रजी) यानुसार, “आपल्याला पिण्याची समस्या आहे, असे यथेच्छपणे पिणाऱ्या बहुतेकांना वाटत नाही.”a यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण अनेक देशांत साहसी, अद्ययावत आणि जगिक सुज्ञतेचे कार्य म्हणून पिण्यास प्रसार माध्यमाद्वारे प्रेरित केले जाते. अनेकदा या प्रसार माध्यमाद्वारे युवकांना लक्ष्य बनविले जाते.
ब्रिटनमध्ये २० वर्षांच्या दरम्यान बिअर प्राशन करण्याच्या मात्रेत दुप्पट वाढ झाली आहे तर तीव्र मद्य घेण्याचे प्रमाण तिप्पटीने वाढले आहे. पिणारे हे कोवळ्या वयातील मुले आहेत आणि स्त्रियांच्या पिण्यात देखील वाढ झाली आहे. अशाचप्रकारचे प्रघांत पूर्वेकडील युरोपीय आणि लॅटीन अमेरिकी देशांत आचरले जातात. एकसारखे मद्यपानाचे वाढते प्रमाण आणि मद्यार्कसंबंधित आजारांमुळे होणारे मृत्यूंचे वाढते प्रमाण यांवरून हे स्पष्ट होते. स्पष्टपणे, संपूर्ण जगात मद्यार्काचा दुरुपयोग केला जात असल्याचे अगदी स्वच्छ आहे.
फार मद्यपान म्हणजे नेमके किती?
मद्यार्कयुक्त पेयांविषयी बायबलचा दृष्टिकोन संतुलित आहे. शास्त्रवचने सांगतात, की मद्यार्क एका प्रकारे यहोवा देवाचे बक्षीस आहे जे “मनुष्याचे अंतःकरण आनंदित” करते. (स्तोत्र १०४:१, १५) दुसरीकडे पाहता, पिण्याच्या अतिरेकास मज्जाव करतेवेळी “दारूबाजी”, “मद्यासक्ति, रंगेलपणा, बदफैली [पिण्याच्या स्पर्धा, NW],” “फार मद्यपान” आणि “दारूच्या अधीन” अशा संज्ञांचा बायबल प्रयोग करते. (लूक २१:३४; १ पेत्र ४:३ १ तीमथ्य ३:८ पंडिता रमाबाई भाषांतर; तीत २:३ कॉमन लँग्वेज भाषांतर.) पण “फार मद्यपान” म्हणजे नेमके किती? कशाच्या आधारावर मद्यार्कयुक्त पेयांचा ईश्वरी दृष्टिकोन बाळगला जातो हे एखादा ख्रिस्ती कसे ठरवू शकतो?
मद्यपीपणास ओळखणे अवघड नाही. त्याच्या परिणामांचे वर्णन बायबलमध्ये करण्यात आले आहे: “हाय हाय कोण म्हणतो? अरे अरे कोण करितो? भांडणतंट्यात कोण पडतो? गाऱ्हाणी कोण सांगतो? विनाकारण घाय कोणास होतात? धुंदी कोणाच्या डोळ्यांत असते? जे फार वेळपर्यंत द्राक्षारस पीत राहतात, जे मिश्रमद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात. . . . तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील; तुझ्या मनांतून विपरित गोष्टी बाहेर पडतील.”—नीतिसूत्रे २३:२९-३३.
फार मद्य झाल्यामुळे संभ्रम, भ्रम, बधिरपणा आणि इतर मानसिक आणि शारीरिक अनावस्था परिणीत होतात. मद्याच्या प्रभावामुळे एखादा इसम आपल्या स्वतःच्या वागणुकीवरील नियंत्रण गमावेल आणि तो स्वतःस किंवा इतरांस देखील हानी पोहंचवू शकतो. मद्य प्राशन करणारे लोक उपहासक, चढाईखोर किंवा अनैतिक वर्तनात गोवलेले असल्याचे समजले जाते.
मद्यपीपणापर्यंत पिणे किंबहुना मद्यपीपणाचे वरील उल्लेखित परिणाम परिणीत होत असल्यास अशा प्रकारचे पिणे फार आहे. तथापि, एखादी व्यक्ती मद्यपीपणाच्या या सर्व विशिष्ट चिन्हांशिवाय मर्यादशीलपणात कमी असल्याचे प्रदर्शित करू शकते. यामुळे, एखाद्याला मद्यपान जास्त झाले किंवा नाही या प्रश्नाच्या उत्तरात अनेकदा मतभेद होतात. मर्यादशीलपणा आणि अतिरेक यांतील सीमा कोठे आहे?
तुमची वैचारिक क्षमता सुरक्षित ठेवा
रक्त-मद्यार्क संहतींची टक्केवारी किंवा इतर मोजमाप देण्याद्वारे बायबल मद्यपानावर मर्यादा घालून देत नाही. एका व्यक्तीची मद्यार्क सह्यता दुसऱ्या व्यक्तीपेक्षा भिन्न असते. तरी देखील, बायबल तत्त्वे सर्व ख्रिश्चनांना लागू होतात आणि मद्यार्कयुक्त पेयांविषयी ईश्वरी दृष्टिकोन विकसित करण्यास आपल्याला मदत करू शकतात.
येशूने म्हटले पहिली आज्ञा अशी आहे की, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” (मत्तय २२:३७, ३८) मद्यार्काचा मनावर थेट परिणाम होतो आणि मद्यार्काचा अतिरेकीपणा सर्वश्रेष्ठ असलेल्या या आज्ञेचे पालन करण्यात व्यत्यय आणील. योग्य निर्णय घेणे, समस्या निवारण करण्याची क्षमता, आत्मसंयमन बाळगणे आणि मनाच्या इतर कार्यांत मद्याच्या अतिरेकामुळे गंभीर व्यत्यय येऊ शकतो. शास्त्रवचने आपल्याला आर्जवतात: “चातुर्य व विवेक ही संभाळून ठेव. म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील.”—नीतिसूत्रे ३:२१, २२.
प्रेषित पौल ख्रिश्चनांना विनंती करतो: “तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून [तुमच्या तर्कशक्तीसह, NW] समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.” (रोमकर १२:१) आपल्या “तर्कशक्तीचा” विसर पडेपर्यंत एखादा ख्रिस्ती पीत असल्यास तो “देवाला ग्रहणीय” असेल का? सामान्यतः, अमर्यादशीलपणे पिणाऱ्या मनुष्याच्या मद्यार्क सह्यतेत हळूहळू वाढ होत असते. त्याला वाटत असेल, की त्याचे अवाजवी मद्यप्राशन—त्याच्याकरिता—मद्यपीपणाच्या सीमारेषेच्या खाली आहे. तथापि, तो मद्यार्कावरील हानीकारक अवलंबित्व वेगाने विकसित करीत असेल. अशा प्रकारचा मनुष्य आपले शरीर “जिवंत, पवित्र . . . यज्ञ” म्हणून सादर करू शकतो का?
तुमचे “चातुर्य व विवेक” यांस हानी पोहंचविणारे कितीही प्रमाणातील मद्यार्क ख्रिस्ती या नात्याने तुमच्यासाठी फार आहे.
तुमचा मद्यार्काविषयी दृष्टिकोन कशावर निर्धारित होतो?
आपला पिण्याबद्दलचा दृष्टिकोन प्रचलित प्रथा किंवा संप्रदायांनी प्रभावित होतो किंवा नाही याबाबतीत ख्रिश्चनाने मूल्यमापन करण्यास हवे. मद्यार्कयुक्त पेयांची बाब येते तेव्हा सांस्कृतिक कल किंवा प्रसार माध्यम यांवर आपली निवड करण्यास तुम्हाला निश्चितच आवडणार नाही. तुमच्या प्रवृत्तीचे मूल्यमापन करतेवेळी, तुम्ही स्वतःला विचारा: ‘समाजात काय ग्रहणीय आहे यामुळे माझा दृष्टिकोन प्रभावित होतो का? किंवा माझे पिणे बायबल तत्त्वांद्वारे प्रशासित होते का?’
यहोवाचे साक्षीदार संस्कृतीच्या विरोधात नसले तरी त्यांना याची कल्पना आहे, की आज सर्वत्र स्वीकारयोग्य असणाऱ्या अनेक प्रघातांची यहोवा घृणा करतो. काही समाजांत गर्भपात, रक्त संक्रमण, समलैंगिकता किंवा बहुपत्नीकत्वाकडे दुर्लक्ष केले जाते. तथापि, ख्रिश्चन यांविषयी असणाऱ्या देवाच्या दृष्टिकोनाच्या एकवाक्यतेत वागतात. होय, अशा प्रकारचे प्रघात सांस्कृतिकरीत्या स्वीकारयोग्य आहेत किंवा नाहीत याची पर्वा न करता त्यांचा द्वेष करण्यास ईश्वरी दृष्टिकोन ख्रिश्चनास प्रेरित करील.—स्तोत्र ९७:१०.
बायबल ‘परराष्ट्रीयांना आवडणाऱ्या कृत्यांविषयी’ सांगते ज्यांत “मद्यासक्ति” आणि “पिण्याच्या स्पर्धा” या बाबींचा आंतर्भाव होतो. “पिण्याच्या स्पर्धा” या संज्ञेमुळे, मद्यार्क मोठ्या मात्रेत प्राशन करण्याच्या खास उद्देशास्तव आयोजित केलेल्या एकत्रिकरणांच्या कल्पनेचा अर्थबोध होतो. आपल्या मद्यार्क सह्यतेचा अभिमान बाळगणारे, पिण्यात इतरांना हरविण्याचा प्रयत्न करणारे किंवा कोण जास्त पितो हे पाहण्याचा प्रयास करणारे काही लोक बायबल काळात अस्तित्वात होते, असे भासते. प्रेषित पेत्र अशा प्रकारच्या वागणुकीला ‘बेतालपणा’ असे सूचित करतो ज्यात पश्चात्तापी ख्रिस्ती कधीही सहभागी होणार नाहीत.—१ पेत्र ४:३, ४.
आपण पिऊन झिंगलो नाही म्हणून कोठे, केव्हा किंवा किती प्यालो याचा काही विशेष परिणाम होणार नाही, असा दृष्टिकोन बाळगणे ख्रिश्चनाकरिता उचित होईल का? आपण विचारू शकतो, तो ईश्वरी दृष्टिकोन आहे का? बायबल म्हणते: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.” (१ करिंथकर १०:३१) जेव्हा पुरुषांचा एक घोळका मोठ्या प्रमाणात मद्यार्क पिण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमतो तेव्हा सर्वांनाच नशा चढणार नाही, परंतु त्यांच्या या वर्तनामुळे यहोवाचे गौरव होईल का? बायबल आर्जवते: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.”—रोमकर १२:२.
इतरांना अडखळण होण्याचे टाळणे
अनेक संस्कृती बहुतेकवेळा मद्याच्या अतिरेकाकडे दुर्लक्ष करतात पण जेव्हा मोठ्या मात्रेत मद्य प्राशन करणारा आपण देवाचा मनुष्य असल्याचा दावा करतो तेव्हा याच संस्कृती मद्याच्या अतिरेकास अमान्य करतात, हे मनोरंजक आहे. दक्षिण पॅसिफिकच्या एका लहानशा समाजातील एका निरीक्षकाने म्हटले: “मी तुमच्या लोकांची वाखाणणी करतो. तुम्ही सत्याचा प्रचार करता. पण एक समस्या आहे आणि ती म्हणजे तुम्ही लोक मोठ्या मात्रेत मद्यार्क घेता.” अहवालानुसार, व्यक्तिगत जण झिंगले नव्हते, तरी देखील ही वास्तविकता त्या समाजातील अनेकांच्या बाबतीत इतकी उघड नव्हती. निरीक्षक अनायासे असा समारोप करू शकत होता, की पिण्याच्या कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या इतर लोकांप्रमाणे साक्षीदार देखील झिंगतात. दीर्घ काळापर्यंत चालणाऱ्या पिण्याच्या कार्यक्रमांत भाग घेणारा ख्रिस्ती सेवक आपली ख्याती कायम ठेवू शकतो का आणि आपले सेवाकार्य मनमोकळ्यापणाने पूर्ण करू शकतो का?—प्रेषितांची कृत्ये २८:३१.
युरोपीय देशातील अहवाल हे दाखवून देतात, की काही बंधुभगिणी राज्य सभागृहात येतात तेव्हा त्यांच्या तोंडातून अनेकदा मद्यार्काचा तीव्र भपका येतो. या गोष्टीने इतरांच्या विवेकास अस्वस्थ केले आहे. बायबल आर्जवते: “मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो [किंवा अडखळतो अथवा अशक्त होतो] ते न करणे हे चांगले.” (रोमकर १४:२१) मद्यार्कयुक्त पेयांविषयी ईश्वरी दृष्टिकोन, इतरांच्या विवेकाबद्दल संवेदनाक्षम असण्यास किंबहुना काही परिस्थितींमध्ये मद्यार्क घेण्याचे टाळण्यास प्रौढ ख्रिश्चनास प्रेरित करील.
ख्रिस्ती अगदी स्पष्टपणे भिन्न आहेत
यहोवाने मद्यार्कयुक्त पेयांसहित उत्तम गोष्टी दिल्या आहेत आणि त्यांचा गैरवापर करण्याद्वारे या जगाने यहोवाच्या विरोधात पुष्कळ काही केले आहे, ही एक शोकांतिका आहे. सर्वव्याप्त अभक्त दृष्टिकोन टाळण्यासाठी प्रत्येक समर्पित ख्रिश्चनाने सर्वंकष प्रयास केला पाहिजे. अशा प्रकारे, “धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद” लोकांना पाहता येऊ शकेल.—मलाखी ३:१८.
मद्यार्कयुक्त पेयांची बाब येते तेव्हा यहोवाचे साक्षीदार आणि हे जग यांतील “भेद” अगदी स्पष्ट होणे अगत्याचे आहे. खऱ्या ख्रिश्चनांच्या जीवनांत मद्यार्कयुक्त पेये प्राशन करणे प्रमुख बाब नाही. मद्यपीपणाच्या धोक्याची संभावना असल्यामुळे ते आपल्या मद्यार्क सह्यतेच्या मर्यादांवर प्रयोग करीत नाहीत तसेच ते पूर्ण अंतःकरणाने व स्वच्छ मनाने आपल्या देवाची सेवा करण्यात अडथळा अथवा कोणत्याही प्रकारे व्यत्यय आणण्यास मद्यार्कयुक्त पेयांना अनुमती देत नाहीत.
यहोवाचे साक्षीदार एक गट या नात्याने मद्यार्कयुक्त पेयांविषयी ईश्वरी दृष्टिकोन बाळगतात. तुमच्याबद्दल काय? “अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, व सुभक्तीने वागावे,” या बायबल सूचनांचा आपण अवलंब केल्यास आपल्यांतील प्रत्येकाला यहोवाच्या आशीर्वादांचा प्रत्यय येऊ शकतो.—तीत २:१२, १३.
[तळटीपा]
a “पुरुषांसाठी पाच किंवा त्यापेक्षा अधिक पेये आणि स्त्रियांसाठी चार अथवा त्यापेक्षा अधिक पेये क्रमाक्रमाने प्राशन करणे, अशी यथेच्छ पिण्याची व्याख्या करण्यात आली.”—अमेरिकी वैद्यकीय संघटनेचे नियतकालिक.
[२८ पानांवरील चौकट]
तुमच्या प्रियजनांचे ऐका
आपण समस्याग्रस्त आहोत, या गोष्टीची अमर्यादशील मद्यप्याला बहुतेकवेळा फार उशिरा जाणीव होते. नातेवाईक, मित्र आणि ख्रिस्ती वडिलांनी मर्यादशीलपणाचा अभाव असलेल्या प्रियजणांस मदत देण्यात हयगय करू नये. दुसऱ्या बाजुला पाहता, तुमच्या पिण्याच्या सवयीमुळे तुमचे आप्तेष्ट नाराजी व्यक्त करीत असल्यास तसे करण्याचे त्यांच्याकडे कदाचित सबळ कारण असू शकेल. ते काय म्हणतात त्याकडे लक्ष द्या.—नीतिसूत्रे १९:२०; २७:६.