प्रवासी पर्यवेक्षक विश्वासू कारभाऱ्यांप्रमाणे सेवा कशी करतात
“प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा.”—१ पेत्र ४:१०.
१, २. (अ) “कारभारी” या शब्दाची तुम्ही व्याख्या कशी द्याल? (ब) देव ज्या कारभाऱ्यांचा उपयोग करत आहे त्यामध्ये कोणाचा समावेश होतो?
यहोवा सर्व विश्वासू ख्रिश्चनांचा कारभारी म्हणून उपयोग करतो. कारभारी बहुधा एक नोकर असतो ज्याला घरातील सर्व व्यवस्था स्वाधीन केलेली असते. तो आपल्या धन्याचा व्यापारही सांभाळू शकतो. (लूक १६:१-३; गलतीकर ४:१, २) येशूने पृथ्वीवरील आपल्या निष्ठावान अभिषिक्त जणांच्या वर्गाला ‘विश्वासू कारभारी’ असे संबोधले. या कारभाऱ्याला त्याने ‘आपले सर्वस्व,’ तसेच राज्याचे प्रचार कार्यही सोपवले आहे.—लूक १२:४२-४४; मत्तय २४:१४, ४५.
२ प्रेषित पेत्र म्हणाला, की सर्व ख्रिस्ती, विविध मार्गांनी व्यक्त होणाऱ्या देवाच्या अपात्री कृपेचे कारभारी आहेत. प्रत्येक ख्रिश्चनाचे एक स्थान आहे ज्यातून तो त्याचे विश्वासू कारभारीपण चालवू शकतो. (१ पेत्र ४:१०) नियुक्त ख्रिस्ती वडील कारभारी आहेत व प्रवासी पर्यवेक्षक त्यांच्याचपैकी आहेत. (तीत १:७) या प्रवासी वडिलांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले जावे? त्यांनी कोणते गुण व हेतू बाळगावेत? शिवाय, ते अधिक चांगले कसे साध्य करून देऊ शकतात?
त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञ
३. प्रवासी पर्यवेक्षकांना ‘उत्तम कारभारी’ असे का संबोधले जाऊ शकते?
३ एक प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नीला लिहिताना एका ख्रिस्ती विवाहित जोडप्याने म्हटले: “तुम्ही आमच्याकरता जो वेळ व जी प्रीती दाखवली त्याबद्दल आम्हाला आमची कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. कुटुंब या नात्याने, तुम्ही दिलेल्या उत्तेजनाचा व सल्ल्याचा आम्हा सर्वांना खूप लाभ झाला आहे. आम्ही आध्यात्मिकरीत्या वाढत गेले पाहिजे हे आम्हाला माहीत आहे परंतु यहोवाच्या मदतीमुळे व तुमच्या सारख्या बंधू व भगिनींमुळे तणाव कमी केले जातात.” अशा प्रकारच्या अभिव्यक्ती सर्रासपणे व्यक्त केल्या जातात कारण, एक चांगला कारभारी ज्याप्रमाणे घरातील गरजांची योग्यप्रकारे काळजी घेतो त्याचप्रमाणे प्रवासी पर्यवेक्षक सहविश्वासूंमध्ये व्यक्तिगत आस्था बाळगतात. काही जण उल्लेखनीय वक्ते आहेत. अनेक जणांनी प्रचार कार्यात ख्याती मिळवली आहे तर इतर जण उबदारपणा व दया दाखवण्यात प्रसिद्ध आहेत. इतरांची सेवा करण्यासाठी अशा देणग्यांना विकसित करून व त्यांचा वापर करून प्रवासी पर्यवेक्षकांना उचितपणे ‘उत्तम कारभारी’ संबोधले जाऊ शकते.
४. कोणत्या प्रश्नावर आता विचार केला जाईल?
४ “कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे,” असे प्रेषित पौलाने लिहिले. (१ करिंथकर ४:२) दर आठवडी वेगवेगळ्या मंडळ्यांतील सहख्रिश्चनांची सेवा करणे अद्वितीय व आनंदी सुहक्क आहे. पण ती एक भारी जबाबदारी देखील आहे. मग, प्रवासी पर्यवेक्षक आपले कारभारीपण विश्वासूपणे व यशस्वीपणे कसे पार पाडू शकतात?
यशस्वीपणे आपले कारभारीपण पार पाडणे
५, ६. एखाद्या प्रवासी पर्यवेक्षकांच्या जीवनात यहोवावर प्रार्थनापूर्वक भरवसा इतका महत्त्वपूर्ण का आहे?
५ प्रवासी पर्यवेक्षकांना यशस्वी कारभारी व्हावयाचे आहे तर त्यांनी यहोवावर प्रार्थनापूर्वक भरवसा ठेवणे आवश्यक आहे. त्यांचे वेळापत्रक व अनेक जबाबदाऱ्या यांच्यामुळे त्यांना काहीवेळा भारावून गेल्यासारखे वाटू शकते. (पडताळा २ करिंथकर ५:४.) याकारणास्तव, त्यांनी स्तोत्रकर्ता दावीदाच्या गीताच्या सुसंगत कार्य करणे आवश्यक आहे: “तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) तसेच, “प्रभु धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो,” हे दावीदाचे बोल देखील सांत्वनदायक आहेत.—स्तोत्र ६८:१९.
६ पौलाला त्याच्या आध्यात्मिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी शक्ती कोठून मिळाली? त्याने लिहिले, “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान् आहे.” (फिलिप्पैकर ४:१३) होय, यहोवा देव पौलाच्या शक्तीचा स्रोत होता. त्याचप्रमाणे, पेत्राने सल्ला दिला: “सेवा करणाऱ्याने, ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहो, अशी करावी; ह्यासाठी की, सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे.” (१ पेत्र ४:११) कैक वर्षांकरता प्रवासी पर्यवेक्षक म्हणून कार्य केलेल्या एका बांधवाने देवावर भरवसा ठेवण्याच्या गरजेवर जोर देऊन म्हटले: “समस्या हाताळताना नेहमी यहोवाकडे मार्गदर्शनासाठी पाहा व त्याच्या संघटनेचे साहाय्य मिळवण्याचा प्रयत्न करा.”
७. प्रवासी पर्यवेक्षकांच्या कार्यात समतोलपणा कोणती भूमिका निभावतो?
७ यशस्वी प्रवासी पर्यवेक्षकांना समतोल राखणे आवश्यक आहे. इतर ख्रिश्चनांप्रमाणे ते, ‘अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींची खात्री’ करण्याचा प्रयत्न करतात. (फिलिप्पैकर १:१०)a स्थानीय वडिलांना एखाद्या विशिष्ट बाबीसंबंधाने प्रश्न असल्यास त्यांनी भेट देणाऱ्या विभागीय पर्यवेक्षकांना विचारणे सुज्ञतेचे ठरेल. (नीतिसूत्रे ११:१४; १५:२२) कदाचित, ते गेल्यानंतर वडीलजन जेव्हा ती बाब हाताळतील तेव्हा त्यांचे समतोल निरीक्षण व शास्त्रवचनीय सल्ला मदतदायी ठरेल. काहीशा असाच विचारावर पौलाने तीमथ्याला सांगितले: “ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या, त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे.”—२ तीमथ्य २:२.
८. बायबल अभ्यास, संशोधन आणि मनन आवश्यक का आहेत?
८ विश्वसनीय सल्ला देण्यासाठी शास्त्रवचनीय अभ्यास, संशोधन आणि मनन या गोष्टींची आवश्यकता आहे. (नीतिसूत्रे १५:२८) एका प्रांतीय पर्यवेक्षकांनी म्हटले: “वडिलांसोबत सभा घेताना, एखाद्या विशिष्ट प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नाही हे सांगण्यास आपल्याला भीती वाटू नये.” एखाद्या बाबीविषयी “ख्रिस्ताचे मन” मिळवण्याचा प्रयत्न केल्याने इतरांना देवाच्या इच्छेनुरुप वागण्यास मदत करणारा बायबल आधारित सल्ला देणे शक्य होते. (१ करिंथकर २:१६) काही वेळा एखाद्या प्रवासी पर्यवेक्षकांना मार्गदर्शनाकरता वॉच टावर संस्थेला लिहावे लागते. कोणत्याही बाबतीत, यहोवावरील विश्वास आणि सत्याबद्दलची प्रीती, प्रतिमा अथवा वक्तृत्व यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्त्वपूर्ण आहे. पौलाने करिंथमधील आपल्या सेवेची सुरवात “वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने” नव्हे तर “अशक्त, भयभीत व अतिकंपित” होऊन केली. यामुळे तो निष्फळ ठरला का? उलटपक्षी, त्यामुळे करिंथकरांना ‘मनुष्याच्या बुद्धीमत्तेवर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर’ विश्वास ठेवण्यास मदत मिळाली.—१ करिंथकर २:१-५.
इतर महत्त्वपूर्ण गुण
९. प्रवासी वडिलांनी सहानुभावी असणे जरूरीचा का आहे?
९ सहानुभाव प्रवासी पर्यवेक्षकांना उत्तम प्रतिफळ प्राप्त करण्यास मदत करतो. पेत्राने सर्व ख्रिश्चनांना ‘समसुखदुःख’ किंवा “सहानुभाव” दाखण्यास आर्जवले. (१ पेत्र ३:८, NW तळटीप) एका विभागीय पर्यवेक्षकांना ‘मंडळीतील सर्वांमध्ये आस्था घेण्याची व खरोखर लक्ष देण्याची’ गरज वाटते. अशाच भावनेने पौलाने लिहिले: “आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा.” (रोमकर १२:१५) अशा प्रकारची मनोवृत्ती प्रवासी पर्यवेक्षकांना सहविश्वासूंच्या समस्या व परिस्थिती समजण्यासाठी कळकळीचे प्रयत्न करण्यास प्रवृत्त करते. तेव्हा ते उभारणीकारक शास्त्रवचनीय सल्ला देऊ शकतात, ज्याच्या अवलंबनाने वास्तविकरीत्या चांगले साध्य करता येऊ शकते. सहानुभाव दाखवण्यात ख्याती मिळवलेल्या एका विभागीय पर्यवेक्षकांना इटलीतील, ट्युरीनजवळील एका मंडळीतून एक पत्र मिळाले ज्यात लिहिले होते: “तुम्हाला आवडते व्हायचे आहे तर इतरांमध्ये आवड घ्या; तुम्हाला आल्हाददायक व्हायचे आहे तर स्वतः आल्हाददायक व्हा; इतरांनी प्रेम करावे असे वाटत असल्यास, इतरांवर तुम्ही प्रेम करा; मदत हवी असल्यास, इतरांना मदत करण्यास तयार असा. तुमच्याकडून आम्ही हे सर्व शिकलो आहोत!”
१०. नम्र असण्याबद्दल विभागीय आणि प्रांतीय पर्यवेक्षकांनी काय म्हटले आहे व येशूने या बाबतीत कोणते उदाहरण मांडले आहे?
१० प्रवासी पर्यवेक्षक नम्र व सुगम्य असल्यास अधिक चांगले ते करण्यास त्यांना मदत मिळते. एका विभागीय पर्यवेक्षकाने निरिक्षिले: “नम्र मनोवृत्ती बाळगणे सर्वात महत्त्वाचे आहे.” ते नवीन प्रवासी पर्यवेक्षकांना असा इशारा देत: “अधिक श्रीमंत असलेले बांधव जे काही करतील त्यामुळे तुम्ही फाजील प्रभावित होऊ नका किंवा केवळ अशांसोबत आपली मैत्री सीमित ठेवू नका तर इतरांबरोबरही निःपक्षपातीपणे वागण्यास झटा.” (२ इतिहास १९:६, ७) खरोखरच, नम्र असलेले प्रवासी पर्यवेक्षक संस्थेचा प्रतिनिधी या नात्याने स्वतःला श्रेष्ठ मानणार नाहीत. एका प्रांतीय पर्यवेक्षकांनी अगदी उचितपणे असे विवेचन मांडले: “नम्र असा व बांधवांचे ऐकण्यास तयार असा. नेहमी सुगम्य असा.” सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य, येशू ख्रिस्त याच्या सान्निध्यात असताना लोकांना अस्वस्थ वाटू शकले असते, पण तो इतका नम्र व सुगम्य होता की मुलेही त्याच्यासंगतीत रमत होती. (मत्तय १८:५; मार्क १०:१३-१६) प्रवासी पर्यवेक्षकांना, मुले, किशोरवयीन, वृद्ध जन—होय मंडळीतील कोणीही आणि प्रत्येकांनी—त्यांच्याजवळ बिनदिक्कत यावे असे वाटते.
११. आवश्यकता असते तेव्हा क्षमा मागण्याचा परिणाम काय असू शकतो?
११ अर्थात, “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो,” आणि कोणतेही प्रवासी पर्यवेक्षक चुका करण्यापासून सुटलेले नाहीत. (याकोब ३:२) ते चुका करतात तेव्हा, प्रामाणिकपणे क्षमा मागितल्याने इतर वडिलांसमोर नम्रतेचे उदाहरण मांडले जाते. नीतिसूत्रे २२:४ नुसार, “नम्रता व परमेश्वराचे [आदरयुक्त] भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.” शिवाय, देवाच्या सर्वच सेवकांना ‘देवासंगती नम्रपणे’ चालण्याची गरज नाही का? (मीखा ६:८, पंडिता रमाबाई भाषांतर) एका नवीन प्रवासी वडिलाला तुम्ही कोणता सल्ला द्याल असे विचारले असता एक विभागीय पर्यवेक्षक म्हणाले: “सर्व बांधवांविषयी उच्च आदर व सन्मान बाळगा आणि तुमच्यापेक्षा त्यांना श्रेष्ठ माना. तुम्ही बांधवांकडून पुष्कळ गोष्टी शिकाल. नम्र राहा. स्वाभाविक असा. मोठेपणाचा आव आणू नका.”—फिलिप्पैकर २:३.
१२. ख्रिस्ती सेवेबद्दलचा आवेश इतका महत्त्वपूर्ण का आहे?
१२ ख्रिस्ती सेवेबद्दलचा आवेश एखाद्या प्रवासी पर्यवेक्षकांच्या बोलण्याला भारदस्त बनवतो. वास्तविक पाहता, ते आणि त्यांची पत्नी सुवार्तिक कार्यात आवेशी उदाहरण मांडतात तेव्हा, वडीलजन, त्यांच्या पत्नी आणि मंडळीतील इतरांना त्यांच्या सेवेत असाच आवेश दाखवण्याचे उत्तेजन दिले जाते. “सेवेकरता आवेशी असा,” असे एक विभागीय पर्यवेक्षक आर्जवतात. ते पुढे म्हणतात: “सामान्यपणे मंडळी, सेवेमध्ये जितकी आवेशी असते तितक्याच कमी समस्या असल्याचे मला दिसून आले आहे.” आणखी एक विभागीय पर्यवेक्षक म्हणतात: “वडिलांनी जर बंधू आणि भगिनींबरोबर क्षेत्रात कार्य केले व सेवेत आनंद लुटण्यास त्यांना मदत केली तर त्यामुळे मनाची शांती मिळेल व यहोवाची सेवा करण्याचे सर्वात अधिक समाधान मिळेल असे मला वाटते.” प्रेषित पौलाने ‘थेस्सलनीकातील लोकांना देवाची सुवार्ता सांगण्यासाठी मोठ्या कष्टाने सर्व धैर्य एकवटले.’ म्हणूनच तर, त्यांच्याजवळ त्याच्या भेटीच्या व प्रचार कार्याच्या गोड आठवणी होत्या आणि त्याला पुन्हा पाहण्यासाठी त्यांचे डोळे आसावले होते!—१ थेस्सलनीकाकर २:१, २; ३:६.
१३. एक प्रवासी पर्यवेक्षक जेव्हा सहख्रिश्चनांसोबत क्षेत्र सेवेत कार्य करत असतात तेव्हा कोणती गोष्ट ते लक्षात घेतात?
१३ सह ख्रिश्चनांसोबत क्षेत्र सेवेत भाग घेत असताना, प्रवासी पर्यवेक्षक त्यांच्या परिस्थिती व मर्यादा लक्षात घेतात. त्यांच्या सूचना फायदेकारक असल्या तरी, एका अनुभवी वडिलांबरोबर कार्य करताना काही जण घाबरून जाऊ शकतात हे त्यांना माहीत आहे. यास्तव, काही विशिष्ट बाबतीत, सल्ल्यापेक्षा उत्तेजन अधिक उपयोगी असू शकते. पर्यवेक्षक जेव्हा प्रकाशकांबरोबर अथवा पायनियरांबरोबर एखाद्या बायबल अभ्यासाला जातात तेव्हा पर्यवेक्षकांनीच तो अभ्यास चालवावा असे त्यांना वाटेल. यामुळे स्वतःच्या शिकवणुकीच्या पद्धतींमध्ये सुधार करण्याच्या मार्गांशी त्यांचा परिचय होण्याची शक्यता आहे.
१४. आवेशी प्रवासी पर्यवेक्षक इतरांमध्ये आवेश उत्तेजित करतात असे का म्हटले जाऊ शकते?
१४ आवेशी प्रवासी पर्यवेक्षक इतरांमध्ये आवेश उत्तेजित करतात. युगांडातील एक विभागीय पर्यवेक्षक एका बांधवाबरोबर, अल्प प्रगती करणाऱ्या एका बायबल अभ्यासाला जाण्यासाठी जवळजवळ एक तास दाट जंगलातून पायी गेले. पायी जात असताना इतक्या जोराने पाऊस आला की तेथे पोहंचूपर्यंत दोघेही चिंब भिजले होते. सहा जणांच्या त्या कुटुंबाला जेव्हा कळले की त्यांना भेट देणारे एक प्रवासी पर्यवेक्षक होते तेव्हा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. त्यांच्या चर्चचे सेवक कळपामध्ये इतकी आस्था कधीच घेणार नाहीत हे त्यांना माहीत होते. त्यानंतरच्या रविवारी, ते पहिल्यांदा सभेला उपस्थित राहिले व त्यांनी यहोवाचे साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली.
१५. मेक्सिकोतील एका आवेशी विभागीय पर्यवेक्षकांना कोणता उत्तम अनुभव आला?
१५ ओक्साकाच्या मेक्सिकन राज्यात, एका विभागीय पर्यवेक्षकांनी त्यांच्याकडून अपेक्षिला जाऊ शकत नाही असा एक प्रयत्न केला. राज्य प्रचारक झालेल्या सात सहवासींच्या एका गटाला भेट देण्याकरता त्यांनी चार रात्रींसाठी एका तुरुंग कोठडीत आपली राहण्याची व्यवस्था केली. अनेक दिवसांसाठी, हे कैदी एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत प्रचार कार्य व बायबल अभ्यास संचालित करत असताना ते त्यांच्याबरोबर गेले. आस्था दाखवल्यामुळे, या अभ्यासांपैकी काहींचे अभ्यास रात्री उशिरापर्यंत चालू राहिले. हे आवेशी विभागीय पर्यवेक्षक लिहितात: “या परस्पर उत्तेजनामुळे भेटीच्या शेवटी त्या सहवासींना आणि मला अत्यानंद झाला.”
१६. प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नी उत्तेजन देतात तेव्हा ते फार लाभदायक का ठरू शकते?
१६ प्रवासी पर्यवेक्षक उत्तेजक असण्याचा प्रयत्न करतात. पौलाने मॅसेडोनियातील मंडळ्यांना भेटी दिल्या तेव्हा त्याने त्यांना ‘पुष्कळ उत्तेजन’ दिले. (प्रेषितांची कृत्ये २०:१, २) तरुण आणि वृद्ध दोघांना आध्यात्मिक ध्येयांप्रत नेण्यासाठी उत्तेजनाचे बोल अतिशय मदतदायी ठरू शकतात. वॉचटावर संस्थेच्या एका मोठ्या शाखा कार्यालयात, विभागीय पर्यवेक्षकांनी जवळजवळ २० टक्के स्वयंसेवकांना पूर्ण वेळेची सेवा घेण्याचे उत्तेजन दिले होते हे एका अनौपचारिक सर्वेक्षणाने प्रकट केले. प्रवासी पर्यवेक्षकांची पत्नी सुद्धा पूर्ण वेळेची राज्य उद्घोषक या नात्याने आपल्या उत्तम उदाहरणाद्वारे उत्तेजनाचा स्रोत ठरते.
१७. इतरांना मदत देण्याच्या आपल्या सुहक्काबद्दल एका वयोवृद्ध विभागीय पर्यवेक्षकांना कसे वाटते?
१७ वृद्ध व खिन्न झालेल्यांना विशेषकरून उत्तेजनाची आवश्यकता असते. एक वयोवृद्ध विभागीय पर्यवेक्षक लिहितात: “देवाच्या कळपातील अक्रियाक व अशक्त लोकांना मदत पुरवण्याचा सुहक्क अवर्णनीय आंतरिक आनंद उत्पन्न करणाऱ्या माझ्या कार्याचा पैलू आहे. रोमकरांस पत्र १:११, १२ वचनातील शब्दांचा माझ्याकरता खास अर्थ आहे कारण अशांनी ‘स्थिर व्हावे म्हणून त्यांना काही आध्यात्मिक कृपादान’ देताना मला खूप उत्तेजन व शक्ती मिळते.”
त्यांच्या आनंदी कार्याचा मोबदला
१८. प्रवासी पर्यवेक्षकांचे कोणते शास्त्रवचनीय हेतू असतात?
१८ सहविश्वासूंना मदत करण्याची प्रवासी पर्यवेक्षकांची मनापासून इच्छा आहे. मंडळ्यांना बळकट करण्याची व आध्यात्मिकरीत्या उभारणी करण्याची त्यांची इच्छा आहे. (प्रेषितांची कृत्ये १५:४१) एक प्रवासी पर्यवेक्षक, “उत्तेजन देण्यासाठी, तजेला देण्यासाठी, सेवाकार्य पूर्ण करण्याची इच्छा वाढवण्यासाठी व सत्यानुसार चालण्यासाठी” खूप कष्ट घेतात. (३ योहान ३) दुसरे प्रवासी पर्यवेक्षक सहविश्वासूंना विश्वासामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. (कलस्सैकर २:६, ७) प्रवासी पर्यवेक्षक इतरांच्या विश्वासावर सत्ता गाजवणारे नसून ‘खरे सोबती’ आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेवा. (फिलिप्पैकर ४:३; २ करिंथकर १:२४) त्यांची भेट म्हणजे, उत्तेजन व जादा कार्य करण्याचा प्रसंग आहे तसेच वडील वर्गासाठी, झालेल्या प्रगतीची उजळणी व भावी ध्येयांचा विचार करण्याची एक संधी आहे. त्यांच्या बोलण्याद्वारे व उदाहरणाद्वारे, मंडळीतील प्रचारक, पायनियर, सेवा-सेवक आणि वडीलजन उभारणी होण्याची व समोर असलेल्या कार्यासाठी उत्तेजित होण्याची अपेक्षा करू शकतात. (पडताळा १ थेस्सलनीकाकर ५:११.) तेव्हा, विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटींना पूर्ण मनाने सहयोग द्या आणि प्रांतीय पर्यवेक्षक जी सेवा करतात त्याचा पूर्ण लाभ घ्या.
१९, २०. प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींना आपल्या विश्वासू सेवेचे प्रतिफळ कसे मिळाले आहे?
१९ प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींना आपल्या विश्वासू सेवेचे समृद्ध प्रतिफळ मिळते व ते करत असलेल्या भल्या कामासाठी यहोवा त्यांना आशीर्वाद देईल याची ते खात्री बाळगू शकतात. (नीतिसूत्रे १९:१७; इफिसकर ६:८) प्रवासी कार्यात अनेक वर्षांसाठी सेवा केलेले जॉओर्ज व मॅग्डलेना हे एक वृद्ध जोडपे आहे. लक्झेम्बर्ग येथील एका अधिवेशनात, मॅग्डलेनाकडे एक व्यक्ती आली जिला तिने २० वर्षांपूर्वी साक्ष दिली होती. मॅग्डलेनाने तिला दिलेल्या बायबल साहित्यामुळे या यहुदी स्त्रीला सत्यामध्ये आस्था निर्माण झाली व कालांतराने तिने बाप्तिस्मा घेतला होता. जॉओर्जकडे एक आध्यात्मिक बहिण आली, सुमारे ४० वर्षांपूर्वी ते तिच्या घरी आल्याचे तिला आठवले. त्यांनी इतक्या उत्साहाने सुवार्ता सादर केली होती ज्यामुळे तिने व तिच्या पतीने सत्याचा स्वीकार केला. जॉओर्ज व मॅग्डलेना या दोघांना किती आनंद झाला असेल हे सांगण्याची गरज नाही.
२० इफिसमधील पौलाच्या प्रतिफलदायी सेवेने त्याला आनंद दिला व येशूचे हे शब्द उद्धृत करण्यास त्याला कदाचित प्रवृत्त केले असावे की, “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) प्रवासी कार्यात निरंतर देणे समाविष्ट असल्यामुळे, ते कार्य करणाऱ्यांना विशेषकरून, त्यांच्या कष्टाचे त्यांना चांगले प्रतिफळ मिळाले आहे याची जेव्हा जाणीव होते तेव्हा ते सौख्यानंद अनुभवतात. एका निरुत्साहित वडिलाला मदत करणाऱ्या एका विभागीय पर्यवेक्षकांना पत्रात असे सांगण्यात आले: “तुम्हाला कदाचित याची जाणीव नसेल, की तुम्ही माझ्या आध्यात्मिक जीवनात ‘बळकटी देणारी मदत’ ठरला आहात. . . . ‘पाय सरकण्याच्या लागास’ आलेल्या आधुनिक दिवसातील एका आसाफाची तुम्ही किती मदत केलीत हे कदाचित तुम्हाला कधीच पूर्णपणे माहीत होणार नाही.”—कलस्सैकर ४:११; स्तोत्र ७३:२.
२१. पहिले करिंथकर १५:५८ प्रवासी पर्यवेक्षकांच्या कार्यास लागू होते असे तुम्ही का म्हणाल?
२१ अनेक वर्षांसाठी विभागीय कार्यात असलेल्या एका वृद्ध ख्रिश्चनाला १ करिंथकर १५:५८ वर विचार करायला आवडते जेथे पौलाने आर्जवले: “प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.” प्रवासी पर्यवेक्षकांना निश्चितच प्रभूच्या कार्यात पुष्कळ काम आहे. यहोवाच्या अपात्री कृपेचे विश्वासू कारभारी या नात्याने ते इतक्या आनंदाने सेवा करतात त्याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत!
[तळटीपा]
a टेहळणी बुरूज (इंग्रजी), मे १५, १९९१, पृष्ठे २८-३१ वरील “पुष्कळ काम असूनही तुम्ही आनंदी राहू शकता का?” हा लेख पाहा.
तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?
◻ प्रवासी पर्यवेक्षकांकडे ‘उत्तम कारभारी’ या दृष्टीने का पाहिले जाऊ शकते?
◻ कोणती काही कारणे आहेत जी विभागीय व प्रांतीय पर्यवेक्षकांना अधिक चांगले साध्य करण्यास मदत करतात?
◻ प्रवासी कार्यात जे कार्य करतात त्यांच्याबाबतीत नम्रता आणि आवेश इतका महत्त्वपूर्ण का आहे?
◻ प्रवासी पर्यवेक्षकांचे कोणते उत्तम हेतू असतात?
[१६ पानांवरील चित्रं]
प्रवासी पर्यवेक्षक सहविश्वासूंना उत्तेजन देण्याचा प्रयत्न करतात
[१७ पानांवरील चित्रं]
प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींसोबत सहवास राखल्याने तरुण आणि वृद्ध दोघांनाही लाभ होऊ शकतात
[१८ पानांवरील चित्रं]
प्रवासी पर्यवेक्षकांची आवेशी सेवा इतरांमध्ये आवेश उत्तेजित करते