प्रवासी पर्यवेक्षक मानवरूपी देणग्या
“त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करुन नेले व मानवरूपी देणग्या दिल्या.” —इफिसकर ४:८, NW.
१. सन १८९४ मध्ये या नियतकालिकात कोणत्या नव्या कार्याची घोषणा करण्यात आली होती?
टेहळणी बुरूज नियतकालिकाने सुमारे एका शतकाआधी एक नवीन घोषणा केली. “कार्याची आणखी एक शाखा” असे त्याचे वर्णन करण्यात आले होते. या नवीन कार्यात काय समाविष्ट होते? प्रवासी पर्यवेक्षकांच्या कार्याचे आधुनिक उद्घाटन. या नियतकालिकाच्या सप्टेंबर १, १८९४ या अंकाने स्पष्टीकरण दिले, की एथूनपुढे पात्र बांधव, बायबल विद्यार्थ्यांच्या गटांची ‘सत्यामध्ये उभारणी करण्याकरता’ त्यांना जाऊन भेटी देतील.
२. विभागीय व प्रांतीय पर्यवेक्षकांची कोणती कार्ये असतात?
२ सा.यु. पहिल्या शतकात, अशा प्रकारच्या पर्यवेक्षकांनी, जसे की पौल व बर्णबा, ख्रिस्ती मंडळ्यांना भेटी दिल्या. मंडळीची ‘उन्नती’ करणे हा या विश्वासू पुरुषांचा उद्देश होता. (२ करिंथकर १०:८) आज, अशा प्रकारचे कार्य पद्धतशीर मार्गाने करणारे हजारो पुरुष आपल्याकरता एक आशीर्वाद आहेत. यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाने त्यांना विभागीय व प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले आहे. विभागीय पर्यवेक्षक, वर्षातून दोन वेळा सुमारे २० मंडळ्यांमध्ये, प्रत्येकी एक आठवड्याकरता कार्य करतात, अहवालांची तपासणी करतात, भाषणे देतात, स्थानीय राज्य प्रचारकांसोबत क्षेत्र सेवेत भाग घेतात. प्रांतीय पर्यवेक्षक, अनेक विभागांच्या प्रत्येक वार्षिक विभागीय संमेलनाचे अध्यक्ष असतात, यजमान मंडळीसोबत क्षेत्र सेवेत भाग घेतात व बायबल आधारित भाषणांद्वारे उत्तेजन देतात.
त्यांचा स्व-त्यागी आत्मा
३. प्रवासी पर्यवेक्षकांना स्व-त्यागी आत्मा प्रदर्शित करण्याची आवश्यकता का आहे?
३ प्रवासी पर्यवेक्षक निरंतर दौऱ्यावर असतात. यासाठीच स्व-त्यागी आत्म्याची आवश्यकता भासते. एका मंडळीतून दुसऱ्या मंडळीत प्रवास करणे बहुधा कठीण असू शकते, पण हे पुरुष आणि त्यांच्या पत्नी आनंदाने या कामाला वाहून घेतात. एक विभागीय पर्यवेक्षक म्हणाले: “माझी पत्नी अतिशय आधार देणारी व कुरकूर न करणारी आहे . . . तिच्या स्व-त्यागी आत्म्यासाठी तिला पुष्कळ श्रेय मिळाले पाहिजे.” काही विभागीय पर्यवेक्षक मंडळ्यांदरम्यान १,००० पेक्षा अधिक किलोमीटर अंतर प्रवास करतात. पुष्कळांकडे स्वतःच्या मोटार गाड्या असतात, पण इतरजण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सार्वजनिक परिवहनाने, सायकलीने, घोड्यावरून किंवा पायी जातात. एका आफ्रिकन विभागीय पर्यवेक्षकाला तर एका मंडळीत जाण्यासाठी आपल्या पत्नीला आपल्या खांद्यावर बसवून एक नदी ओलांडावी लागते. प्रेषित पौलाला आपल्या मिशनरी दौऱ्यांमध्ये उष्णता व थंडी, तहानभूक, जागरणे, विविध संकटे आणि हिंसक छळ यांचा सामना करावा लागला. याशिवाय, आज सर्व प्रवासी पर्यवेक्षकांच्या सामान्य अनुभवाप्रमाणे त्याला “सर्व मंडळ्यांविषयीची चिंता” होती.—२ करिंथकर ११:२३-२९.
४. प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींच्या जीवनांवर आरोग्याच्या समस्यांचा कोणता प्रभाव होऊ शकतो?
४ पौलाचा सोबती तीमथ्य याच्याप्रमाणे, प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींना कधी कधी आरोग्याच्या समस्या असतात. (१ तीमथ्य ५:२३) यामुळे त्यांच्यावर जास्त ताण पडतो. एका पर्यवेक्षकाच्या पत्नीने म्हटले: “मला जेव्हा बरं वाटत नसतं तेव्हा नेहमीच बांधवांसोबत राहिल्याने माझ्यावर ताण पडतो. ऋतुनिवृत्तीची सुरवात होते तेव्हा विशेषकरून मला हे जास्त कठीण वाटलं. प्रत्येक आठवडी आमच्या सर्व चीजवस्तू भरणं व दुसरीकडे जाणं खरोखरच एक आव्हान आहे. मला पुष्कळवेळा थांबून यहोवाला प्रार्थना करावी लागली, की त्याने मला पुढे जात राहण्यासाठी शक्ती द्यावी.”
५. विविध प्रकारच्या परीक्षा असतानाही, प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींनी कोणता आत्मा प्रदर्शित केला आहे?
५ आरोग्याच्या समस्या व इतर परीक्षा असतानाही, प्रवासी पर्यवेक्षकांना आणि त्यांच्या पत्नींना आपल्या सेवेत आनंद मिळतो व ते स्व-त्यागी प्रीती प्रदर्शित करतात. काहींनी छळ होत असताना किंवा युद्धाच्या वेळी आध्यात्मिक मदत देण्याकरता आपले प्राण धोक्यात घातले आहेत. मंडळ्यांना भेटी देताना त्यांनी पौलासारखा आत्मा प्रदर्शित केला ज्याने थेस्सलनीकाकर ख्रिश्चनांना सांगितले: “आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवहि देण्यास राजी होतो.”—१ थेस्सलनीकाकर २:७, ८.
६, ७. कष्टाळू प्रवासी पर्यवेक्षक कोणता सकारात्मक प्रभाव पाडू शकतात?
६ ख्रिस्ती मंडळीतील इतर वडिलांप्रमाणे, प्रवासी पर्यवेक्षक “उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात.” अशा प्रकारचे सर्व वडील “दुप्पट सन्मानास योग्य गणले” पाहिजेत. (१ तीमथ्य ५:१७) “त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण” केल्यास त्यांचे उदाहरण फायदेकारक ठरू शकते. —इब्री लोकांस १३:७.
७ विशिष्ट प्रवासी वडिलांचा इतरांवर कोणता प्रभाव पडला आहे? यहोवाच्या एका साक्षीदाराने लिहिले, “बंधु प—— यांचा माझ्या जीवनावर किती विलक्षण प्रभाव पडला! ते सन १९६० पासून मेक्सिकोत प्रवासी पर्यवेक्षक होते. मी लहान होतो तेव्हा त्यांच्या भेटींची आशेने व आनंदाने वाट पाहत असे. मी दहा वर्षांचा झालो तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘तूही एक दिवस विभागीय पर्यवेक्षक होशील.’ माझ्या किशोरावस्थेतील कठीण वर्षांमध्ये मी नेहमी त्यांची मदत घ्यायचो कारण त्यांच्याजवळ नेहमी सुज्ञ विचार होते. ते खरं तर कळपाची काळजी घेण्यासाठी जगत होते! आता मी एक विभागीय पर्यवेक्षक असल्यामुळे, तरुणांसाठी नेहमी वेळ खर्च करण्याचा व त्यांनी माझ्यासाठी केल्याप्रमाणे या तरुणांसमोर ईश्वरशासित ध्येये ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या जीवनाच्या शेवटल्या वर्षांमध्ये, हृदयविकाराच्या समस्या असतानाही, बंधु प—— यांनी उत्तेजनपर शब्द सांगण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारी १९९५ मध्ये त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच ते माझ्यासोबत एका खास संमेलनाला उपस्थित राहिले व वास्तुशास्त्रज्ञ असलेल्या एका बांधवासमोर उत्तम ध्येय मांडले. त्या बांधवाने बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी लागलीच एक अर्ज भरला.”
त्यांची कदर केली जाते
८. इफिसकराच्या ४ थ्या अध्यायात वर्णन केलेल्या ‘मानवरूपी देणग्या’ कोण आहेत व मंडळीला त्यांचा फायदा कसा होतो?
८ देवाच्या अपात्री कृपेमुळे सेवेच्या नेमणुकींनी संपन्न असलेल्या प्रवासी पर्यवेक्षकांना व इतर वडिलांना “मानवरूपी देणग्या” असे संबोधले आहे. यहोवाचा प्रतिनिधी व मंडळीचा मस्तक या नाते येशूने, आपली व्यक्तिगतरीत्या उभारणी व्हावी व आपण प्रौढतेप्रत जावे म्हणून या आध्यात्मिक पुरुषांची तरतूद केली आहे. (इफिसकर ४:८-१५) कोणतीही देणगी कृतज्ञतेच्या पात्रतेची असते. यहोवाची सेवा करत राहण्यास आपल्याला दृढ बनवणाऱ्या देणगीच्या बाबतीत ही गोष्ट विशेषकरून खरी आहे. यास्तव, प्रवासी पर्यवेक्षकांच्या कार्याची कदर आपण कशी व्यक्त करू शकतो? ‘या पुरुषांना आपण प्रिय मानतो’ हे कोणत्या मार्गांनी आपण दाखवू शकतो?—फिलिप्पैकर २:२९.
९. कोणकोणत्या मार्गांनी आपण प्रवासी पर्यवेक्षकांबद्दल कदर प्रदर्शित करू शकतो?
९ विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीची घोषणा केली जाते तेव्हा त्या आठवड्यादरम्यान मंडळीच्या कार्यांमध्ये पूर्ण सहभाग घेण्यासाठी आपण योजना बनवण्यास सुरवात करू शकतो. भेटीदरम्यान असलेल्या क्षेत्र सेवेच्या व्यवस्थेला पाठिंबा देण्याकरता आपण जादा वेळ बाजूला राखू शकतो. त्या महिन्यात कदाचित आपण सहायक पायनियर या नात्याने सेवा करू शकतो. आपल्या सेवेत सुधारणा करण्यासाठी विभागीय पर्यवेक्षकांनी दिलेल्या सूचना अनुसराव्यात असे आपल्याला नक्कीच वाटेल. अशा प्रकारच्या ग्रहणक्षम आत्म्याचा आपल्याला लाभ होईल व त्यांची भेट खरोखरच उपयोगी होती याचा त्यांना दिलासा मिळेल. होय, प्रवासी पर्यवेक्षक उभारणी करण्यासाठी मंडळीला भेट देतात, पण त्यांनाही आध्यात्मिकरीत्या स्वतःची उभारणी करण्याची गरज असते. असेही काही प्रसंग होते जेव्हा पौलाला देखील उत्तेजनाची गरज होती व त्याने बहुतेक वेळा सहख्रिश्चनांना त्याच्यासाठी प्रार्थना करावयास सांगितली. (प्रेषितांची कृत्ये २८:१५; रोमकर १५:३०-३२; २ करिंथकर १:११; कलस्सैकर ४:२, ३; १ थेस्सलनीकाकर ५:२५) त्याचप्रमाणे, सध्याच्या प्रवासी पर्यवेक्षकांना आपल्या प्रार्थना व उत्तेजन यांची गरज आहे.
१०. प्रवासी पर्यवेक्षकांना त्यांचे काम आनंदाने करण्यासाठी आपण त्यांची कशी मदत करू शकतो?
१० विभागीय पर्यवेक्षकांना व त्यांच्या पत्नीला, आपण त्यांच्या भेटींची केवढी कदर करतो हे कधी सांगितले आहे का? ते आपल्याला देत असलेल्या लाभदायक सल्ल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो का? क्षेत्र सेवेबद्दल त्यांनी दिलेल्या सुचनांमुळे सेवेतील आपला आनंद वाढला आहे हे आपण त्यांना कधी माहीत होऊ दिले आहे का? असे केल्यास, त्यांना त्यांचे कार्य आनंदाने करण्यास मदत होईल. (इब्री लोकांस १३:१७) स्पेनमधील एका विभागीय पर्यवेक्षकाने, ते आणि त्यांची पत्नी, मंडळींना भेटी देऊन झाल्यावर त्यांना मिळणाऱ्या आभार-प्रदर्शनाची कार्डे किती जपून ठेवतात यावर विशेषकरून विवेचन केले. ते म्हणतात, “आम्ही ही कार्डे जपून ठेवतो व जेव्हा कधी निरुत्साहित होतो तेव्हा ती वाचतो. ती खरोखरच उत्तेजनाचा स्रोत आहेत.”
११. विभागीय व प्रांतीय पर्यवेक्षकांच्या पत्नी आपल्याला प्रिय वाटतात व आपण त्यांची कदर करतो हे त्यांना आपण का माहीत करून दिले पाहिजे?
११ प्रवासी पर्यवेक्षकांच्या पत्नीची प्रशंसा केल्याने तिला निश्चितच लाभ होतो. सेवेच्या या क्षेत्रामध्ये आपल्या पतीला सहयोग देण्यासाठी तिने मोठे त्याग केले आहेत. या विश्वासू भगिनी, स्वतःचे घर असण्याबद्दल आणि पुष्कळ वेळा मुले असण्याबद्दलच्या आपल्या स्वाभाविक इच्छेचा त्याग करतात. इफ्ताहची मुलगी यहोवाच्या सेवकांमधील एक होती जिने स्वेच्छेने, तिच्या पित्याने केलेल्या नवसास्तव पती व कुटुंब असण्याच्या संधीचा त्याग केला. (शास्ते ११:३०-३९) तिच्या या त्यागाकडे कोणत्या दृष्टीने पाहण्यात आले? शास्ते ११:४०, [NW] म्हणते: “प्रतिवर्षी, इस्राएलच्या कन्या वर्षाचे चार दिवस इफ्ताह गिलादीच्या कन्येची प्रशंसा करण्यासाठी जात असत.” विभागीय व प्रांतीय पर्यवेक्षकांच्या पत्नींना, त्या आपल्याला प्रिय वाटतात व आपण त्यांची कदर बाळगतो हे त्यांना सांगण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा किती उत्तम करतो!
‘आतिथ्याचा विसर पडू देऊ नका’
१२, १३. (अ)प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींना आतिथ्य दाखवण्याबद्दल कोणता शास्त्रवचनीय आधार आहे? (ब) अशा प्रकारचे आतिथ्य कशा प्रकारे परस्परांसाठी लाभदायक ठरू शकते याचे उदाहरण द्या.
१२ ख्रिस्ती प्रवासी कार्यात असलेल्यांबद्दल प्रीती व कदर प्रदर्शित करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आतिथ्य दाखवणे. (इब्री लोकांस १३:२) प्रवासी मिशनरी म्हणून मंडळीला भेट देणाऱ्यांना आतिथ्य दाखवल्याबद्दल प्रेषित योहानाने गायसची प्रशंसा केली. योहानाने लिहिले: “प्रिय बंधो, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करितोस ते विश्वासूपणाने करितोस; त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली; देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटे लावशील तर बरे करिशील; कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काहीएक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत. म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.” (३ योहान ५-८) आज, आपणही प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींना अशाच प्रकारचे आतिथ्य दाखवून राज्याचे प्रचार कार्य पुढे नेऊ शकतो. अर्थात, स्थानीय वडिलांनी त्यांच्या राहण्याच्या सोयी समाधानकारक आहेत की नाहीत याची खात्री केली पाहिजे, पण एक प्रांतीय पर्यवेक्षक म्हणाले: “आमच्यासाठी कोण काय करू शकतो यावर, बांधवांसोबतचा आमचा नातेसंबंध आधारला जाऊ शकत नाही. आम्हाला तशी छापही पाडायची नाही. श्रीमंत असो अथवा गरीब, आपल्या कोणत्याही बांधवांचा आतिथ्य स्वीकारण्यास आपण तयार असले पाहिजे.”
१३ आतिथ्य परस्परांसाठी लाभदायक असू शकतो. पूर्वी विभागीय पर्यवेक्षक असलेले व सध्या बेथेलमध्ये कार्य करणारे झॉर्झे म्हणतात: “प्रवासी पर्यवेक्षकांना आमच्या घरी राहण्यासाठी बोलावण्याची आमच्या कुटुंबात एक रीत होती. मला वाटते, या भेटी माझ्यासाठी अत्यंत लाभदायक ठरल्या, पण, त्यावेळी मला याची जाणीव नव्हती. माझ्या पौगंडावस्थेत माझ्या आध्यात्मिक समस्या होत्या. माझ्या आईला याची काळजी लागली होती पण मला मदत कशी करावी हे माहीत नसल्यामुळे तिने विभागीय पर्यवेक्षकांना माझ्यासोबत बोलायला सांगितले. सुरवातीला मी त्यांना टाळत होतो, कारण ते माझी टीका करतील अशी मला भीती वाटत होती. पण त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावाने शेवटी मला जिंकले. एके सोमवारी त्यांनी मला त्यांच्यासोबत भोजन घेण्याचे आमंत्रण दिले आणि मी माझं अंतःकरण त्यांच्यासमोर खुलं केलं, कारण ते मला समजू शकत होते याची मला खात्री होती. त्यांनी माझे लक्षपूर्वक ऐकले. त्यांनी दिलेल्या व्यावहारिक सूचना खरोखरच कामी आल्या व मी आध्यात्मिकरीत्या प्रगती करू लागलो.”
१४. प्रवासी वडिलांची टीका करण्याऐवजी आपण त्यांची प्रशंसा का केली पाहिजे?
१४ प्रवासी पर्यवेक्षक तरुण व वृद्ध दोघांच्याही आध्यात्मिक मदतीचे होण्याचा प्रयत्न करत असतात. यास्तव, आपण निश्चितच त्यांच्या प्रयत्नांबद्दल आपली कृतज्ञता दाखवली पाहिजे. परंतु, आपण त्यांच्या कमजोरीची टीका केली किंवा मंडळीला आधी भेट दिलेल्यांसोबत त्यांची अननुकूलरीत्या तुलना केल्यास काय? असे कदाचित नाउमेद करणारे ठरेल. पौल आपल्या कार्याबद्दल केलेली टीका ऐकून प्रोत्साहित झाला नाही. खरे तर, काही करिंथकर ख्रिस्ती त्याच्या स्वरूपाची व बोलण्याच्या क्षमतेची तुच्छतेने टीका करत होते. हे टीकाकार जे म्हणत होते त्याचा त्याने असे म्हणून उल्लेख केला की, “त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत; परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे.” (२ करिंथकर १०:१०) परंतु, प्रवासी पर्यवेक्षकांना बहुधा प्रेमळ प्रशंसेचे शब्द ऐकावयास मिळतात ही आनंदाची गोष्ट आहे.
१५, १६. प्रवासी पर्यवेक्षकांना आणि त्यांच्या पत्नींना जेव्हा त्यांचे सहविश्वासू जण प्रीती व आवेश दाखवतात तेव्हा त्यांच्यावर कोणता प्रभाव पडतो?
१५ लॅटिन अमेरिकेतील एक विभागीय पर्यवेक्षक गनिमांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात राहणाऱ्या आपल्या बंधू व भगिनींना भेट देण्यासाठी एक संपूर्ण दिवस चिखलाचा रस्ता तुडवत जातात. ते लिहितात: “बांधव या भेटीबद्दल त्यांची कृतज्ञता ज्याप्रकारे दाखवतात ते पाहणे हृदयाला भिडणारे आहे. पुष्कळ धोक्यांचा व कठीण परिस्थितींचा सामना करत मला तेथे पोहंचण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करावे लागत असले तरी, बांधव दाखवत असलेली प्रीती व आवेश यामुळे मला माझ्या कष्टाचे प्रतिफळ मिळते.”
१६ आफ्रिकेतील एक विभागीय पर्यवेक्षक लिहितात: “बांधवांनी आम्हाला इतके प्रेम दिले की आम्हाला टान्झानियाचे क्षेत्र खूपच आवडले! आमच्याकडून काही शिकून घेण्यास बांधव तयार होते व आम्ही त्यांच्या घरी गेल्याने त्यांना आनंद वाटायचा.” प्रेषित पौल व पहिल्या शतकातील ख्रिस्ती विवाहित जोडपे अक्विला आणि प्रिस्क यांच्यात प्रेमळ व आनंदी नातेसंबंध होते. वास्तविक पाहता, पौल त्यांच्याविषयी म्हणाला: “ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी, प्रिस्क व अक्विला ह्यांना सलाम सांगा; त्यांनी माझ्या जिवाकरिता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्याहि मानतात.” (रोमकर १६:३, ४) प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नी, आतिथ्य दाखवण्याचा व साहचर्य देण्याचा विशेष प्रयत्न करणाऱ्या आधुनिक दिवसातील अक्विला व प्रिस्क यांच्यासारखे स्नेही त्यांना मिळाल्यामुळे कृतज्ञ आहेत.
मंडळ्यांना बळकट करणे
१७. प्रवासी पर्यवेक्षकांच्या व्यवस्थेमागे सुज्ञता आहे असे का म्हटले जाऊ शकते व त्यांना प्रशिक्षण कोठून मिळते?
१७ येशू म्हणाला: “ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.” (मत्तय ११:१९) प्रवासी पर्यवेक्षकांच्या व्यवस्थेमागे असलेली सुज्ञता, देवाच्या लोकांच्या मंडळ्यांना बळकट होण्यास मदत करते यावरून ती स्पष्ट दिसते. पौलाच्या दुसऱ्या मिशनरी दौऱ्यादरम्यान, तो व सीला ‘मंडळ्यांना स्थैर्य देत देत सूरिया व किलिकिया ह्यांमधून गेले.’ प्रेषितांची कृत्ये पुस्तक आपल्याला सांगते की, “त्यांनी नगरांमधून जाता जाता यरुशलेमेतील प्रेषित व वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळावयास नेमून दिले. ह्यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.” (प्रेषितांची कृत्ये १५:४०, ४१; १६:४, ५) सध्याच्या प्रवासी पर्यवेक्षकांना इतर सर्व ख्रिश्चनांप्रमाणे शास्त्रवचनांतून आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ याजकडून आलेल्या प्रकाशनांतून आध्यात्मिक शिक्षण मिळते.—मत्तय २४:४५.
१८. प्रवासी पर्यवेक्षक कशाप्रकारे मंडळ्यांना बळकट करतात?
१८ होय, प्रवासी वडिलांनी यहोवाच्या आध्यात्मिक मेजावरील अन्न निरंतर सेवन करीत राहिले पाहिजे. त्यांनी देवाच्या संघटनेत अनुसरल्या जाणाऱ्या पद्धती व मार्गदर्शनांशी सुपरिचित असले पाहिजे. तेव्हाच, अशा प्रकारचे पुरुष इतरांकरता खरोखरचा आशीर्वाद ठरू शकतात. क्षेत्र सेवेतील आवेशाच्या त्यांच्या उत्तम उदाहरणाद्वारे ते सहविश्वासूंना त्यांच्या ख्रिस्ती सेवेत सुधारणा करण्यास मदत करू शकतात. भेट देणारे हे वडील बायबल आधारित भाषणे देतात तेव्हा श्रोत्यांची आध्यात्मिक उभारणी होते. देवाच्या वचनातील सल्ला लागू करण्यास, संपूर्ण जगभरातील यहोवाच्या लोकांच्या सुसंगतेत कार्य करण्यास व ‘विश्वासू दासाद्वारे’ देव ज्या आध्यात्मिक तरतुदी पुरवतो त्यांचा वापर करण्यास इतरांना मदत केल्याने, प्रवासी पर्यवेक्षकांना ज्या मंडळ्यांमध्ये सेवा करण्याचा सुहक्क मिळतो त्यांना ते बळकट करतात.
१९. कोणत्या प्रश्नांवर विचार करणे बाकी आहे?
१९ सुमारे शंभर वर्षांपूर्वी यहोवाच्या संघटनेने बायबल विद्यार्थ्यांमध्ये प्रवासी वडिलांच्या कार्याची स्थापना केली तेव्हा या नियतकालिकाने असे म्हटले: “आम्ही परिणाम व प्रभूचे पुढील मार्गदर्शन याकडे डोळे लावून आहोत.” यहोवाचे मार्गदर्शन स्पष्टपणे प्रकट झाले आहे. त्याच्या आशीर्वादामुळे व नियमन मंडळाच्या देखरेखीखाली हे कार्य अनेक वर्षांपासून विस्तृत व शुद्ध झाले आहे. परिणाम, संपूर्ण पृथ्वीवरील यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्या विश्वासात दृढ केल्या जात आहेत व दिवसेंदिवस संख्येने वाढत आहेत. स्पष्टतः, मानवरूपी देणग्या असलेल्या या पुरुषांच्या स्व-त्यागी आत्म्यावर यहोवा आपला आशीर्वाद बरसत आहे. पण, प्रवासी पर्यवेक्षक आपले कार्य यशस्वीरीत्या कसे पार पाडू शकतात? त्यांचे हेतू काय आहेत? ते होता होईल तितका फायदा कसा करून देऊ शकतात?
तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?
◻ विभागीय व प्रांतीय पर्यवेक्षकांची काही कार्ये कोणती आहेत?
◻ प्रवासी पर्यवेक्षकांना स्व-त्यागी आत्म्याची आवश्यकता का भासते?
◻ प्रवासी वडील आणि त्यांच्या पत्नींच्या कार्याबद्दल कृतज्ञता कशी दाखवली जाऊ शकते?
◻ मंडळ्यांना विश्वासात दृढ करण्यासाठी प्रवासी पर्यवेक्षक काय करू शकतात?
[१० पानांवरील चित्र]
निरंतर दौऱ्यावर असण्याकरता स्व-त्यागी आत्म्याची आवश्यकता आहे
[१३ पानांवरील चित्रं]
प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींना तुम्ही आतिथ्य दाखवले आहे का?