वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ११/१५ पृ. २१-२३
  • सुवर्णसंधीचा लाभ घ्या!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवर्णसंधीचा लाभ घ्या!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शहाणपणाचा निर्णय घेणे
  • आपला हा समय खास आहे
  • “प्रथम . . . सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • यहोवासोबत निष्ठावंतपणे काम करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • चांगल्याप्रकारे साक्ष देण्याचे प्रशिक्षण मिळालेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ११/१५ पृ. २१-२३

सुवर्णसंधीचा लाभ घ्या!

पिटरचे लक्ष बायबलमधील उद्धाराच्या संदेशाने आकर्षित केले तेव्हा त्याने आपल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांत चांगली प्रगती केली होती. तो पदवीधर झाला आणि एका इस्पितळात डॉक्टरकी करू लागला तेव्हा त्याचे वरिष्ठ लोक त्याने न्युरोसर्जन विशेषतज्ज्ञ व्हावे म्हणून त्याला वारंवार उत्तेजन देत होते. ही अशी एक संधी होती जी नवोदित डॉक्टर हातची घालवत नाहीत.

तरी देखील, पिटरनेa ही संधी दवडण्याचे ठरविले. का? आवश्‍यक महत्त्वकांक्षा आणि प्रेरणा या गोष्टींची त्याच्याकडे कमी होती का? नाही, कारण या प्रस्तावावर पिटरने काळजीपूर्वक विचार केला होता. समर्पित, बाप्तिस्माप्राप्त यहोवाचा साक्षीदार झाल्यानंतर आपला जास्तीत-जास्त वेळ ख्रिस्ती सेवकपणाच्या विविध क्षेत्रांमध्ये घालवावा असे त्याला वाटले. न्युरोसर्जन झाल्यानंतर आपला पेशा आपल्या अधिकाधिक वेळेचा आणि शक्‍तीचा अपव्यय करील, असा त्याने विचार केला. या उज्ज्वल भवितव्याचा त्याग करण्यास तो खुळा होता की शहाणा?

पिटरने घेतलेला निर्णय मुर्खपणाचा असल्याचे काहींना वाटेल. तथापि, त्याने इफिसकर ५:१५, १६ यासारख्या बायबलच्या शास्त्रवचनांवर विचार केला. प्रेषित पौलाने तेथे सहख्रिश्‍चनांना आर्जवले: “अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.”

“वेळेचा सदुपयोग” या अभिव्यक्‍तीकडे कृपया लक्ष द्या. ही अभिव्यक्‍ती बायबलमध्ये वापरलेल्या ग्रीक शब्दापासून भाषांतरित करण्यात आली आहे. विशिष्ट घटकगुण असलेल्या किंवा खास कार्यासाठी उचित यांद्वारे चिन्हांकित केलेल्या वेळेस अथवा काळास सूचित करण्यासाठी तिचा बहुतेकवेळा उपयोग करण्यात आला आहे. ख्रिश्‍चनांनी अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी सवड काढावी, या गोष्टीवर पौलाने येथे जोर दिला. खरोखर, त्यांना “अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींची खात्री” करण्याची गरज आहे. (फिलिप्पैकर १:१०, NW) प्राथमिकता ठरविण्याचा हा प्रश्‍न आहे.

तर मग, आपल्या काळासाठी असणारा ईश्‍वरी उद्देश कोणता आहे? आपणावर प्रेम करणाऱ्‍यांसाठी देवाची इच्छा काय आहे? बायबल भविष्यवाण्या ‘अंतसमय’ किंवा ‘शेवटला काळ’ अशी आपल्या काळाची ओळख स्पष्टपणे देतात. (दानीएल १२:४; २ तीमथ्य ३:१) आपल्या काळासाठी अगदी महत्त्वाची कोणती गोष्ट असणार होती, याविषयी ख्रिस्त येशूने आपल्याला अंधारात ठेवलेले नाही. त्याने विशेषतः असे म्हटले, की या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत होण्याआधी “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.” त्यानंतरच शेवट येईल.—मत्तय २४:३, १४.

यास्तव, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याच्या आणि शिष्य बनविण्याच्या प्रत्येक संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे. (मत्तय २८:१९, २०) या कामाची पुनरावृत्ती होणार नसल्यामुळे या जीवनसंरक्षक कार्यासाठी आपले सर्वकाही देण्याची ही अखेरची संधी आहे. “आताच समय अनुकूल आहे.” खरोखरच “आताच तारणाचा दिवस आहे.”—२ करिंथकर ६:२.

शहाणपणाचा निर्णय घेणे

पिटरने—सुरवातीस उल्लेख केलेल्या तरुणाने—आपल्या निर्णयाचा काळजीपूर्वक विचार केला आणि आपल्यासमोरील पर्याय तोलून पाहिले. न्युरोसर्जन होण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यात काहीही गैर नाही, हे त्याने जाणले. परंतु त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती होती? या ख्रिस्ती सेवकपणाच्या कामाच्या निकडीचा विचार करता ख्रिस्ती सेवकपणातील त्याचे कार्य ही ती गोष्ट होती. त्याचवेळी त्याला अनेक कर्तव्ये पूर्ण करावयाची होती. तो विवाहित होता आणि पूर्ण-वेळेच्या प्रचार कार्यात सहभाग घेणाऱ्‍या त्याच्या पत्नीची त्याला देखभाल करायची होती. (१ तीमथ्य ५:८) शिक्षण पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड देखील पिटरला करायची होती. तर मग, त्याने काय करण्याचा निर्णय घेतला?

रेडिओलॉजीमध्ये विशेषज्ञ होण्याचा आणि अल्ट्रासाऊंड स्कॅन तयार करण्याचे पिटरने ठरविले. हे असे काम होते जे तो रोजच्या रोज पूर्ण करू शकत होता. नियमित कामाच्या तासांच्या दरम्यान त्याला त्याचे प्रशिक्षण देखील प्राप्त होत होते. होय, काही जण असा विचार करतील, की हा काही इतक्या प्रतिष्ठेचा हुद्दा नाही, परंतु यामुळे त्याला आध्यात्मिक गोष्टींना अधिक वेळ देण्यास शक्य होणार होते.

प्रापंचिक बाबींमध्ये अगदी हरवून गेल्यामुळे ख्रिश्‍चनास धोका उद्‌भवतो, हे पिटरला ठाऊक होते; परंतु कदाचित वेगळा निर्णय घेतलेल्यांचा तो न्याय करीत नाही. यामुळे तो आध्यात्मिक जबाबदाऱ्‍यांकडे दुर्लक्ष करू शकतो. हे नोकरीशी संबंधित असलेल्या दुसऱ्‍या उदाहरणाद्वारे सांगण्यात आले आहे.

एक पूर्ण-वेळेचा राज्य प्रचारक प्रशिक्षित कलाकार होता. आपण काढलेली चित्रे विकून तो स्वतःचा आर्थिकरीत्या चरितार्थ चालवू शकत होता. सर्वात महत्त्वपूर्ण असणाऱ्‍या ख्रिस्ती सेवकपणासाठी आपला सर्वाधिक वेळ देत असताना अशा प्रकारे स्वतःचा चरितार्थ सुरळीतपणे चालवणे त्याला सहज शक्य होते. तथापि, आपल्या कौशल्यपूर्ण करीअरमध्ये पुढे वाटचाल करावी, अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. चित्रे काढण्यात आणि कलेच्या क्षेत्रात तो अधिक गुंतू लागला त्यानंतर त्याने पूर्ण-वेळेचे सेवकपण सोडून दिले आणि कालांतराने राज्य-प्रचार कार्याच्या बाबतीत तो पूर्णपणे निष्क्रिय झाला. शेवटी तो अशास्त्रीय आचरणाचा अवलंब करू लागला आणि त्याचा परिणाम म्हणून त्यापुढे तो ख्रिस्ती मंडळीचा भाग राहिला नाही.—१ करिंथकर ५:११-१३.

आपला हा समय खास आहे

यहोवाचे सेवक या नात्याने त्याच्याशी विश्‍वासू राहावे, असे आपल्याला नक्कीच वाटते. मानवी इतिहासातील अगदी असाधारण काळात आपण जगत असल्याचे आपल्याला ठाऊक आहे. देवाची सेवा निरंतर करीत राहण्यासाठी आणि वर्तमान काळातील परिस्थितींना प्रभावशालीपणे तोंड देण्यासाठी आपल्याला विविध तडजोडी कराव्या लागतील. याची तुलना आपण शेतकऱ्‍याच्या सुगीच्या दिवसांशी करू शकतो. या काळात खास कामे करावी लागतात यावेळी शेतमजुरांकडून नेहमीपेक्षा अधिक निकराचा प्रयत्न करण्याची आणि उशिरापर्यंत काम करण्याची अपेक्षा केली जाते. का? कारण पीक मर्यादित कालावधीमध्ये जमा करणे अगत्याचे असते.

सद्य दुष्ट व्यवस्थीकरणासाठी फार थोडा मर्यादित वेळ बाकी आहे. येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यासाठी आणि त्याच्या पदचिन्हांवर चालण्यासाठी ख्रिश्‍चनाला पूर्वीपेक्षा अधिक निकराचा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी सर्वात महान गोष्ट कोणती होती, हे त्याच्या पृथ्वीवरील जीवनमार्गाने स्पष्टपणे दाखविले. त्याने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाहि काम करिता येणार नाही.” (योहान ९:४) रात्र येत आहे, असे म्हणण्याद्वारे येशू परीक्षा, वधस्तंभावर खिळणे व मृत्यू या गोष्टींना सूचित करीत होता कारण त्यावेळी त्याच्या पार्थिव सेवकपणाचा अंत होणार होता आणि त्याच्या स्वर्गीय पित्याच्या कामांत सहभागी होणे त्याला शक्य होणार नव्हते.

हे खरे आहे, की त्याच्या साडेतीन वर्षांच्या सेवकपणात येशूने चमत्कार करण्यात आणि आजाऱ्‍यांना बरे करण्यात त्याचा काही वेळ घालवला. तरी देखील, राज्याच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी आणि खोट्या धर्मातून ‘धरून नेलेल्यांच्या सुटकेची घोषणा करण्यासाठी’ त्याने आपला अधिकांश वेळ दिला. (लूक ४:१८; मत्तय ४:१७) येशूने आपल्या सेवकपणासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आणि आपल्या शिष्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देखील त्याने वेळ काढला जेणेकरून त्याने घातलेल्या पायावर उभारणी करणे आणि प्रचार कार्यात प्रभावशालीपणे अखंड आगेकूच करणे त्यांना शक्य व्हावे. राज्य आस्थांना वाढविण्यासाठी येशूने प्रत्येक संधीचा लाभ घेतला. आणि आपल्या शिष्यांनी देखील असेच करावे अशी त्याची इच्छा होती.—मत्तय ५:१४-१६; योहान ८:१२.

आपण येशूचे आधुनिक दिवसांतील अनुयायी आहोत आणि येशूप्रमाणे आपल्याला देखील यहोवा मानवजातीच्या परिस्थितीकडे जसे पाहतो तसे पाहण्याची गरज आहे. या सद्य व्यवस्थीकरणाची घटका आता भरत आली आहे आणि उद्धार प्राप्त करण्याची संधी प्रत्येकास मिळावी, अशी देवाची प्रेमळ इच्छा आहे. (२ पेत्र ३:९) यास्तव, यहोवाच्या इच्छेप्रमाणे कार्य करण्यापुढे बाकीच्या सर्व गोष्टींना दुय्यम स्थानी ठेवणे शहाणपणाचे होणार नाही का? (मत्तय ६:२५-३३) विशेषतः अशा प्रकारच्या खास काळादरम्यान सामान्यपणे ज्या गोष्टीस महत्त्वपूर्ण मानले जाते ती गोष्ट ख्रिस्ती या नात्याने आपल्या जीवनांत इतकी महत्त्वाची ठरणार नाही.

आपल्या जीवनांत देवाच्या इच्छेला प्रथम स्थानी ठेवले म्हणून आपल्यातील कोणाला पश्‍चात्ताप होईल का? निश्‍चितच नाही, कारण स्वार्थत्यागाचा ख्रिस्ती मार्ग आश्‍चर्यकारकपणे प्रतिफळदायी आहे. उदाहरणार्थ, येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्‍या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत.”—मार्क १०:२९, ३०.

यहोवाची स्तुती करण्यात आणि राज्य संदेशाची घोषणा करण्यात आपला वेळ घालविणाऱ्‍यांना मिळणाऱ्‍या आनंदाची किंमत पैशांमध्ये कोणीही करू शकत नाही. ते अनेक आशीर्वाद अनुभवतात! खरे मित्र, ईश्‍वरी इच्छा पूर्ण केल्याने मिळणारे समाधान, देवाची स्वीकृती आणि अनंत जीवनाची आशा या गोष्टींचा त्यात समावेश होतो. (प्रकटीकरण २१:३, ४) लोकांना आध्यात्मिकरीत्या मदत करणे आणि यहोवाच्या पवित्र नावास त्याचे साक्षीदार या नात्याने सन्मान देणे किती आशीर्वादाचे आहे! यामध्ये कोणताही प्रश्‍न नाही की, “वेळेचा सदुपयोग” करणे खरोखरच शहाणपणाचा आणि प्रतिफळदायी मार्ग आहे. देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याची हीच वेळ आहे. तुम्ही या सुवर्णसंधीचा फायदा घ्याल का आणि घेत राहाल का?

[तळटीपा]

a बदली नाव.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा