जपानमध्ये धर्माच्या स्वातंत्र्याचे समर्थन
जपानमध्ये यहोवाचे साक्षीदार असलेल्या तरुण विद्यार्थ्यांसमोर अनेक वर्षांपासून एक पेच होता: त्यांनी त्यांच्या बायबल प्रशिक्षित विवेकानुसार चालावे की त्यांच्या विवेकाचा भंग करणाऱ्या शालेय अभ्यासक्रमानुसार? हा पेच का सामोरा आला होता बरे? कारण, युद्धविषयक कला कवाईत, त्यांच्या शाळेतील शारीरिक शिक्षण कार्यक्रमाचा एक भाग आहेत. तरुण साक्षीदारांच्या मते, अशा प्रकारच्या कवाईती बायबल तत्त्वांच्या सुसंगत नव्हत्या. असे एक तत्त्व यशया २ रा अध्याय आणि ४ थ्या वचनात आढळते. तेथे लिहिले आहे: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”
दुसऱ्या व्यक्तीला हानी करणे समाविष्ट असलेल्या युद्धासारख्या कला शिकण्याची इच्छा नसल्यामुळे तरुण ख्रिस्ती साक्षीदारांनी, ते युद्धविषयक कलांमध्ये सदसद्विवेकबुद्धीनुसार भाग घेऊ शकत नाहीत याचे स्पष्टीकरण आपल्या शिक्षकांना दिले. शाळेचा अभ्यासक्रम स्वीकारण्यास जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अनेक समजदार शिक्षकांनी सरतेशेवटी विद्यार्थ्यांच्या विवेकांचा आदर करण्यास व पर्यायी कार्यक्रम देण्यास तयारी दर्शवली.
परंतु, काही शिक्षक भावनाविवश झाले व काही शाळांनी तरुण साक्षीदारांना शारीरिक शिक्षणासाठी गुण देण्यास नकार दिला. १९९३ मध्ये, कमीतकमी नऊ साक्षीदारांना युद्धविषयक कलांमध्ये भाग न घेतल्यामुळे पुढील वर्गात जाण्यास परवानगी देण्यात आली नाही व जबरदस्तीने शाळा सोडून देण्यास भाग पाडले किंवा शाळेतून काढून टाकण्यात आले.
आपल्या विवेकाशी हातमिळवणी न करता शिक्षण प्राप्त करण्याच्या तरुण ख्रिश्चनांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची वेळ आली होती हे स्पष्ट होते. कोबे महानगरपालिका औद्योगिक तंत्र महाविद्यालयात (थोडक्यात याला कोबे टेक म्हणतात) दुसऱ्या इयत्तेत प्रवेश करण्यास नकार दिलेल्या पाच विद्यार्थ्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
वादविषय कोणता होता?
१९९० च्या वसंत ऋतुत जेव्हा पाच विद्यार्थ्यांनी कोबे टेकमध्ये प्रवेश घेतला तेव्हा, त्यांच्या बायबल आधारित दृष्टिकोनांमुळे केन्डो (जपानी तलवारबहाद्दरी) कवाईतींमध्ये ते भाग घेऊ शकणार नाहीत हे त्यांनी आपल्या शिक्षकांना सांगितले. शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी याला कट्टा विरोध केला आणि शारीरिक शिक्षणासाठी गुण मिळवायला इतर कोणतेही पर्याय देण्यास नकार दिला. शेवटी, ते विद्यार्थी, शारीरिक शिक्षण वर्गात नापास झाले आणि त्यामुळे त्यांना त्याच इयत्तेत (कॉलेजचे पहिले वर्ष) पुन्हा बसावे लागले. एप्रिल १९९१ मध्ये त्यांनी कोबे जिल्हा न्यायालयात खटला भरला ज्यात त्यांनी, शाळेची कार्यवाही, धर्माचे स्वातंत्र्य देण्याच्या संविधानीक हमीच्या विरुद्ध गेली असा दावा केला.a
शाळेचा दावा होता, की पर्यायी कार्यक्रम पुरवणे एखाद्या विशिष्ट धर्माला अनुग्रह दाखवण्यासारखे ठरले असते ज्यामुळे सार्वजनिक शिक्षणाच्या तटस्थतेचे उल्लंघन झाले असते. याशिवाय त्यांचा असाही दावा होता, की पर्यायी शारीरिक शिक्षण कार्यक्रम पुरवण्यासाठी त्यांच्याकडे सोयी नव्हत्या व कर्मचारी वर्गही नव्हता.
जिल्हा न्यायालयाचा निर्णय माहितगारांना चेतवतो
खटल्यावरील सुनावणी होत असताना, पाच पैकी दोन विद्यार्थी पुन्हा शारीरिक शिक्षण वर्गात नापास झाले, तर इतर तिघे जण काठावर पास होऊन पुढच्या वर्गात गेले. शाळेच्या नियमांत असे नमूद होते, की अभ्यासात ढ असलेले विद्यार्थी लागोपाठ दोन वर्षांसाठी एकाच वर्गात राहिले तर त्यांना शाळेतून काढले जाऊ शकते. या गोष्टी लक्षात ठेवून, दोन विद्यार्थ्यांपैकी एकाने शाळेने त्याला काढून टाकण्याआधीच स्वतः शाळा सोडून देण्याचे ठरवले, पण दुसरा विद्यार्थी, कुनिहितो कोबायाशी याने शाळा सोडण्यास नकार दिला. म्हणून त्याला शाळेतून काढण्यात आले. मनोवेधक गोष्ट म्हणजे, ४८ गुणांनी नापास झालेल्या शारीरिक शिक्षण विषयासोबत इतर सर्व विषयांची कुनिहितोची सरासरी, १०० पैकी ९०.२ गुण इतकी होती. वर्गातील ४२ विद्यार्थ्यांमध्ये त्याचा पहिला क्रमांक आला होता.
फेब्रुवारी २२, १९९३ रोजी, कोबे जिल्हा न्यायालयाने कोबे टेकच्या बाजूने न्याय दिला व म्हटले: “शाळेने घेतलेल्या कारवाईने संविधानाचा भंग झाला नाही,” तरीही तिने हे मान्य केले की, “केन्डो कवाईतींमध्ये भाग घेण्याच्या शाळेच्या अपेक्षेमुळे फिर्यादीच्या उपासनेच्या स्वातंत्र्यावर काहीप्रमाणात प्रतिबंध घालण्यात आला होता ही गोष्ट नाकारता येत नाही.”
पहिल्या शतकातील प्रेषित पौलाप्रमाणे, फिर्यादींनी वरिष्ठ विधि अधिकाऱ्यांकडे अपील करण्याचे ठरवले. (प्रेषितांची कृत्ये २५:११, १२) हे प्रकरण ओसाका उच्च न्यायालयात गेले.
फिर्यादींची निःस्वार्थ मनोवृत्ती
त्सुकूबा विद्यापीठाचे एक प्रख्यात विद्वान, प्राध्यापक तेत्सुओ शिमोमुरा यांनी ओसाका उच्च न्यायालयात प्रवीण साक्षीदार या नात्याने आपली साक्ष देण्यास तयारी दाखवली. शिक्षण व कायदा या दोन्ही विषयांत तज्ज्ञ असल्यामुळे, विद्यार्थ्यांबरोबर व्यवहार करताना शाळेच्या कारवाया किती अविचारीपणाच्या होत्या यावर त्यांनी जोर दिला. कुनिहितो कोबायाशीने न्यायालयात आपले मनोगत व्यक्त केले व त्याची प्रामाणिक मनोवृत्ती न्यायालयातील सर्वांच्या अंतःकरणास भिडली. पुढे फेब्रुवारी २२, १९९४ रोजी, कोबे बार असोसिएशनने, शाळेच्या कारवायांनी कुनिहितोच्या उपासनेच्या स्वातंत्र्याचे व शिक्षण मिळण्याच्या त्याच्या हक्काचे उल्लंघन केले असे घोषित करून त्याला पुन्हा शाळेत घ्यावे अशी शिफारस केली.
ओसाका उच्च न्यायालयात निर्णय देण्याचा दिवस जवळ आला तेव्हा, या प्रकरणात गोवलेले सर्व तरुण ख्रिस्ती शेवटपर्यंत या लढतीचा भाग असण्यास उत्सुक होते. त्यांना असे वाटले, की संपूर्ण जपानमधील शाळांत ह्याच प्रश्नाचा सामना करणाऱ्या हजारो युवा साक्षीदारांकरता ते हे न्यायालयीन युद्ध लढत होते. परंतु, त्यांना शाळेतून काढले नसल्यामुळे, न्यायालय त्यांचा खटला फेटाळून लावण्याची दाट शक्यता होती. तसेच, त्यांनी आपली विनंती मागे घेतली, तर कुनिहितोला बाहेर काढण्याचा शाळेचा अवाजवीपणा ठळक होईल असे त्यांच्या प्रतीतीस आले. यास्तव, कुनिहितोव्यतिरिक्त सर्वांनी प्रकरण सोडून देण्याचे ठरवले.
डिसेंबर २२, १९९४ रोजी, ओसाका उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, रेसुके शिमॉडॉ यांनी कोबे जिल्हा न्यायालयाचा निर्णय उलटविणारा निकाल दिला. न्यायालयाला आढळले, की केन्डो कवाईत नाकारण्याचे कुनिहितोचे कारण अगदी प्रामाणिक होते तसेच त्याच्या धार्मिक विश्वासानुसार कार्य केल्यामुळे त्याला झालेला तोटा अतिशय मोठा होता. मुख्य न्यायाधीश शिमॉडॉ यांनी म्हटले, की शाळेने पर्यायी कार्यक्रम पुरवावयास हवा होता. या उत्तम निकालामुळे, मानवी हक्कांबद्दल चिंता बाळगणाऱ्यांमधील प्रतिसादात्मक तार छेडण्यात आली. तथापि, शाळेने जपानच्या सर्वोच्च न्यायालयात अपील केले व कुनिहितोला आणखी एका वर्षापेक्षा अधिक कालावधीपर्यंत शिक्षणापासून वंचित ठेवले.
सर्वोच्च न्यायालयात
कोबे शिबुन या वृत्तपत्रातील एका संपादकीय लेखात नंतर असे नमूद केले: “कोबे शहर विद्यालय मंडळाने आणि शाळेने श्री. कोबायाशी यांना त्या क्षणी [ओसाका उच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर] शाळेत पुन्हा घ्यावयाचे होते. . . . त्यांच्या या अनावश्यक संघर्षात्मक वृत्तीमुळे एका व्यक्तीला तिच्या तारुण्यातील महत्त्वपूर्ण वेळेपासून वंचित करण्यात आले आहे.” असे असतानाही, कोबे टेकने या प्रकरणात अट्टाहास धरला. परिणामस्वरूप, तो देशव्याप्त वृत्ताचा विषय बनला. देशभर, शिक्षकांनी आणि शाळा अधिकाऱ्यांनी याची नोंद घेतली, आणि देशाच्या उच्च न्यायालयाचा निकाल भवितव्यातील अशाच प्रकरणांकरता दृढ न्यायालयीन पूर्वोदाहरण ठरणार होता.
जानेवारी १७, १९९५ रोजी, म्हणजे शाळेने सर्वोच्च न्यायालयात अपील केल्याच्या सुमारे एका आठवड्यानंतर, कोबे भूकंपाने ऑशियॉ शहराला ग्रासले जेथे कुनिहितो आणि त्याचे कुटुंब राहत होते. सकाळी, साडेपाचच्या सुमारास, म्हणजे भूकंप होण्याच्या काही मिनिटांआधीच, कुनिहितो त्याच्या अर्ध-वेळेच्या नोकरीवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. तो हॉनशीन महामार्गाखालून जाणाऱ्या रस्त्यावरून सायकलने जात होता आणि भूकंप झाला तेव्हा तो नुकताच कोसळलेल्या भागाजवळ येत होता. तो तत्काळ घरी गेला आणि तेथे जाऊन त्याला आढळले की, त्याच्या घराचा तळ मजला पूर्णतः दबला होता. कुनिहितोने पाहिले, की त्या भूकंपात त्याचा जीव सहजासहजी गेला असता आणि यहोवाने त्याला वाचवल्याबद्दल त्याने त्याचे आभार मानले. तो मरण पावला असता, तर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल न लागता केन्डो प्रकरणाचा तेथल्या तेथेच शेवट होण्याची शक्यता होती.
बहुधा जपानमधील सर्वोच्च न्यायालय, अपीलांचे केवळ कागदावरच तपास करते आणि कनिष्ट न्यायालयांचे निकाल योग्य आहेत की नाहीत हे ठरवते. कनिष्ट न्यायालयाचा निकाल उलटविण्याचे एखादे गंभीर कारण असल्याशिवाय सुनावणी होत नसते. न्यायालय, संबंधित पक्षांना निकाल कधी देण्यात येईल याची सूचना देत नाही. म्हणून, मार्च ८, १९९६ रोजी त्या सकाळी निकाल घोषित करण्यात येईल असे कुनिहितोला सांगण्यात आले तेव्हा त्याला आश्चर्यच वाटले. सर्वोच्च न्यायालयाने ओसाका उच्च न्यायालयाच्या निकालाचे समर्थन केले होते असे त्याला कळाले तेव्हा त्याच्या आनंदास पारावार राहिला नाही.
चार न्यायाधीश व त्यांसोबत अध्यक्षस्थानी असलेल्या न्यायाधीश शिनीची कॉवाय यांनी एकमताने असा निर्णय दिला, की “चर्चेचा विषय असलेल्या शाळेच्या कार्यहालचाली सामाजिकरित्या स्वीकृत असलेल्या तत्त्वांनुसार अतिशय अनुचित व विवेकाधिकारांपासून परावृत्त असल्याचे मानावे लागेल, यास्तव त्या बेकायदेशीर ठरवल्या जात आहेत.” कोर्टाने, केन्डो कवाईतींसाठी कुनिहितोच्या नकार देण्याच्या प्रामाणिकतेस कबूल केले व म्हटले: “आरोपीने केन्डो कवाईतींमध्ये भाग घेण्यासाठी जो नकार दिला त्याचे कारण प्रांजळ असून त्याच्या पायाभूत विश्वासाशी जवळून संबंधित होते.” सर्वोच्च न्यायालयाने असा न्याय दिला, की आरोपीच्या धार्मिक विश्वासाप्रती आदर दाखवण्याकरता शाळेला असे पर्यायी साधन पुरवता आले असते आणि तिने ते पुरवायला हवे होते.
दूरगामी परिणाम
या निकालामुळे, शाळांमध्ये धर्माच्या स्वातंत्र्याबाबत उत्तम पूर्वोदाहरण मांडले जाईल यात काहीच शंका नाही. द जपान टाईम्सने म्हटले: “शिक्षण आणि धर्माचे स्वातंत्र्य या प्रश्नाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा पहिलाच निकाल आहे.” परंतु, या निर्णयामुळे विश्वासाच्या परीक्षांना तोंड देताना सदसद्विवेकबुद्धीनुसार स्वतः भूमिका घेण्याची प्रत्येक तरुण विद्यार्थ्याची जबाबदारी कमी होत नाही.
त्सुकूबा विद्यापीठाचे प्राध्यापक, मॉसॉयुकी उचीनो यांनी म्हटले, की कुनिहितोला न्यायाधीशांनी विजय दिल्याचे एक कारण म्हणजे, तो “प्रामाणिक विद्यार्थी असून त्याची शालेय कार्यसिद्धी उल्लेखनीय होती.” जे ख्रिस्ती आपल्या विश्वासाची परीक्षा देतात त्यांना बायबल असा सल्ला देते: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हांविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचे गौरव करावे.” (१ पेत्र २:१२) विश्वासू युवा ख्रिस्ती, त्यांचे संपूर्ण जीवन बायबल दर्जांनुसार व्यतीत करून बायबलनुसारची त्यांची भूमिका लोकांकडील आदर मिळवण्यास पात्र आहे हे दाखवू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर, कुनिहितो कोबायाशीला कोबे टेकमध्ये पुन्हा घेण्यात आले. कुनिहितोसोबत शाळेत प्रवेश केलेली बहुतांश मुले पदवीधर झाली होती. कुनिहितो आता, त्याच्यापेक्षा पाच वर्षे लहान असलेल्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेत आहे. जगातील अनेकांच्या दृष्टीत, त्याच्या तारुण्यातील पाच मौल्यवान वर्षे जणू वाया गेली आहेत. तथापि, कुनिहितोची निष्ठा यहोवा देवाच्या नजरेत मौल्यवान आहे, आणि त्याचा त्याग निश्चितच व्यर्थ नाही.
[तळटीपा]
a सविस्तर माहितीसाठी, कृपया वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित केलेल्या सावध राहा! (इंग्रजी), नियतकालिकाच्या ऑक्टोबर ८, १९९५ अंकातील पृष्ठे १० ते १४ पाहा.
[२० पानांवरील चित्रं]
डावीकडे: भूकंपानंतरचे कुनिहितोचे घर
खाली: सध्याचा कुनिहितो