सांत्वनासाठी यहोवाची आस धरा
‘धीराचा व समाधानाचा [सांत्वनाचा] देव, तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे परस्पर एकचित्त व्हावे असे दान तुम्हास देवो.’—रोमकर १५:५, पंडिता रमाबाई भाषांतर.
१. प्रत्येक दिवस सांत्वनाची वाढती गरज घेऊन उजाडतो, असे का?
प्रत्येक नवीन दिवस सांत्वनाची वाढती गरज घेऊनच उजाडतो. १,९०० वर्षांपूर्वी एका बायबल लेखकाच्या निदर्शनास आले त्याप्रमाणे, “सबंध सृष्टि आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.” (रोमकर ८:२२) आपल्या काळात ‘कण्हणे’ व “वेदना” पूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या वाढलेल्या आहेत. पहिल्या जागतिक महायुद्धापासून, मानवजातीने युद्ध, गुन्हेगारी व सहसा पृथ्वीसंबंधाने मानवाच्या गैरव्यवस्थेमुळे घडणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या रूपात एका पाठोपाठ एक संकटे सोसली आहेत.—प्रकटीकरण ११:१८.
२. (अ) मानवजातीच्या विद्यमान दुःखांसाठी कोण सर्वात अधिक दोषी आहे? (ब) कोणती वस्तुस्थिती आपल्याला सांत्वनासाठी आधार पुरवते?
२ आपल्या काळात एवढे दुःख का अस्तित्वात राहिले आहे? १९१४ साली राज्याचा जन्म झाल्यावर लगेच सैतानाला स्वर्गाबाहेर घालविण्याचे वर्णन करताना बायबल या प्रश्नाचे उत्तर देते: “पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:१२) त्या भविष्यवादाची पूर्णता झाल्याचा स्पष्ट पुरावा सूचित करतो की, आपण सैतानाच्या दुष्ट शासनाच्या अंतास जवळजवळ पोहंचलोच आहोत. थोड्याच अवधीत पृथ्वीवरील जीवन, सैतानाने आपल्या प्रथम पालकांना विद्रोह करण्यास लावला त्यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या शांतिमय स्थितीत परिवर्तित होईल!
३. मानवांना केव्हा सांत्वनाची गरज नव्हती?
३ सुरवातीला, मानवाच्या निर्माणकर्त्याने प्रथम मानवी जोडप्यासाठी निवासस्थान म्हणून एका आल्हाददायक उद्यानाची सोय केली होती. ते एदेन म्हटलेल्या ठिकाणी होते; एदेन याचा अर्थ “आनंद” किंवा “सौख्य” असा होतो. (उत्पत्ति २:८, NW, तळटीप) शिवाय, आदाम व हव्वा यांना परिपूर्ण आरोग्य आणि कधी न मरण्याचे अद्भुत भवितव्य लाभले होते. बागकाम, कला, बांधकाम, संगीत—कितीतरी असंख्य क्षेत्रांत ते आपल्या कौशल्यांचा विकास करू शकले असते याची जरा कल्पना करा. तसेच, पृथ्वी सत्तेखाली आणून तिचे परादीसमध्ये रूपांतर करण्याची त्यांची कार्य नेमणूक पार पाडत असताना ते कितीतरी निर्मितीकृत्यांचे निरीक्षण करू शकले असते याचाही विचार करा. (उत्पत्ति १:२८) खरोखर, आदाम व हव्वा यांचे जीवन, कण्हणे व वेदना यांनी नव्हे तर सौख्यानंदाने पूर्ण झाले असते. साहजिकच, त्यांना सांत्वनाची गरज भासली नसती.
४, ५. (अ) आदाम व हव्वा आज्ञापालनाच्या कसोटीत अपेशी का ठरले? (ब) मानवजातीला सांत्वनाची गरज कशाप्रकारे भासू लागली?
४ तथापि, आदाम व हव्वा यांना जर कशाची गरज होतीच तर ती त्यांच्या दयाळू स्वर्गीय पित्याविषयी उत्कट प्रीती व कृतज्ञता विकसित करण्याची होती. अशा प्रीतीने त्यांना सर्व परिस्थितीत देवाचे आज्ञापालन करण्यास चालना दिली असती. (पडताळा योहान १४:३१.) खेदाची बाब अशी की आपले दोन्ही मूळ पालक, त्यांच्या खऱ्या हक्काच्या सार्वभौमाचे अर्थात यहोवाचे आज्ञापालन करण्यात अपेशी ठरले. त्याउलट, त्यांनी स्वतःस एका नीच देवदूताच्या म्हणजे दियाबल सैतानाच्या दुष्ट शासनाधीन केले. हव्वेला निषिद्ध फळ खाण्याद्वारे पाप करण्यास भुरळ पाडणारा आणखी कोणी नसून सैतान होता. “ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील,” अशी ज्या वृक्षाच्या फळाविषयी देवाने स्पष्ट ताकीद दिली होती ते फळ आदामानेही खाल्ले तेव्हा त्याने पाप केले.—उत्पत्ति २:१७.
५ अशा प्रकारे, या पापी जोडप्याच्या मरणास सुरवात झाली. मृत्यूदंड ठोठावताना, देवाने आदामास असेही म्हटले: “तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करुन तिचा उपज खाशील; ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील.” (उत्पत्ति ३:१७, १८) या प्रकारे, आदाम व हव्वा पडीक असलेल्या पृथ्वीस एक परादीस बनवण्याचे अद्भुत भवितव्य गमावून बसले. एदेनमधून बाहेर हाकलण्यात आल्यावर, त्यांना काबाड कष्ट करून, शाप देण्यात आलेल्या एका भूमीतून कसेबसे अन्न उत्पन्न करण्यासाठी आपली शक्ती खर्च करावी लागली. त्यांची ही पापमय मर्त्य स्थिती वारशाने मिळाल्यामुळे त्यांच्या वंशजांना सांत्वनाची आत्यंतिक गरज भासू लागली.—रोमकर ५:१२.
एका सांत्वनदायक भविष्यवादाची पूर्णता
६. (अ) मानवजात पापात पडल्यानंतर देवाने कोणते सांत्वनदायक अभिवचन दिले? (ब) सांत्वनाविषयी लामेखाने कोणत्या भविष्यवादाचे कथन केले?
६ मानवी विद्रोहाच्या प्रवर्तकाला दंड ठोठावताना, यहोवाने तो खरोखर ‘सांत्वन देणारा देव’ असल्याचे सिद्ध केले. (रोमकर १५:५, पं. र. भा.) आदामाच्या विद्रोहामुळे घडून आलेल्या विनाशकारक परिणामांपासून आदामाच्या वंशजांना सोडवील अशा एका ‘संततीस’ पाठवण्याचे अभिवचन देण्याद्वारे त्याने असे केले. (उत्पत्ति ३:१५) कालांतराने, देवाने या सुटकेचे विविध प्रसंगी पूर्वदर्शन देखील घडवले. उदाहरणार्थ, त्याने आदामाचा पुत्र शेथ याच्याद्वारे आदामाचा एक दूरचा वंशज बनलेल्या लामेखास त्याचा पुत्र काय करील त्याविषयी असा भविष्यवाद करण्यास प्रेरित केले: “जी भूमि परमेश्वराने शापिली तिच्यासंबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट याविषयी हा आमचे सांत्वन करील.” (उत्पत्ति ५:२९) या अभिवचनाच्या एकवाक्यतेत या पुत्राचे नाव नोहा ठेवण्यात आले ज्याचा अर्थ “विसावा” किंवा “समाधान” असा होतो.
७, ८. (अ) कोणत्या स्थितीमुळे यहोवाला मानव उत्पन्न केल्याचा अनुताप झाला व याची प्रतिक्रिया म्हणून त्याने काय करण्याचे योजिले? (ब) नोहाने कशाप्रकारे आपल्या नावास सार्थ केले?
७ त्यादरम्यान, सैतानास स्वर्गीय देवदूतांमधून काही अनुगामी मिळू लागले होते. त्यांनी मानवी शरीरे धारण केली व आदामाच्या वंशजांतील मोहक स्त्रियांना बायका करून घेतले. अशा अनैसर्गिक संगमांमुळे मानवी समाज आणखीनच भ्रष्ट झाला व त्यातून नफिलीम यांची अधर्मी जात, अर्थात “खाली पाडणारे” निपजले ज्यांनी पृथ्वी अत्याचाराने भरली. (उत्पत्ति ६:१, २, ४, ११; यहूदा ६) “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे . . . असे परमेश्वराने पाहिले; म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला.”—उत्पत्ति ६:५, ६.
८ यहोवाने त्या दुष्ट जगाचा एका जागतिक जलप्रलयाद्वारे नाश करण्याचे योजिले, तथापि, त्याने त्याआधी नोहास जीवन जतन करण्यासाठी एक तारू बांधावयास लावला. अशा प्रकारे, मानवजातीचे व प्राण्यांच्या जातींचे रक्षण झाले. नोहा व त्याच्या कुटुंबाने तारवातून बाहेर पडून एका स्वच्छ केलेल्या पृथ्वीत प्रवेश केला तेव्हा त्यांना केवढे हायसे वाटले असावे! भूमीवरील शाप नाहीसा झाल्यामुळे शेतकामे पूर्वीपेक्षा कितीतरी सोपी झालेली पाहून त्यांना केवढे सांत्वन मिळाले असावे! खरोखर लामेखाचा भविष्यवाद खरा ठरला व नोहाचे नाव देखील सार्थ झाले. (उत्पत्ति ८:२१) देवाचा विश्वासू सेवक या नात्याने नोहाने मानवजातीला काही अंशी “सांत्वन” देण्यात हातभार लावला. तथापि, सैतान व त्याच्या दुरात्मिक देवदूतांचा प्रभाव जलप्रलयानंतर संपुष्टात आला नाही ज्यामुळे मानवजात अजूनही पाप, आजार व मृत्यूच्या ओझ्याखाली कण्हतच आहे.
नोहापेक्षा थोर
९. येशू ख्रिस्त कशाप्रकारे पश्चात्तापी मानवांसाठी एक कैवारी व सांत्वनकर्ता ठरला आहे?
९ शेवटी, मानवी इतिहासाची सुमारे ४,००० वर्षे लोटल्यावर, वचनदत्त संतान सामोरे आले. मानवजातीबद्दल अगाध प्रीतीने प्रेरित होऊन यहोवा देवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला, पापी मानवांसाठी खंडणी म्हणून मृत्यू पावण्यास पृथ्वीवर पाठविले. (योहान ३:१६) येशू ख्रिस्त, त्याच्या बलिदानरूपी मृत्यूवर विश्वास ठेवणाऱ्या पश्चात्तापी पातक्यांना मोठी सुटका मिळवून देतो. यहोवा देवाला आपले जीवन समर्पित करून त्याच्या पुत्राचे बाप्तिस्माप्राप्त अनुयायी बनणारे सर्व लोक चिरकालिक नवचैतन्य व सांत्वन अनुभवतात. (मत्तय ११:२८-३०; १६:२४) ते अपरिपूर्ण असले तरीही, त्यांना एका निष्कलंक विवेकाने देवाची सेवा करण्यात आत्यंतिक सुख प्राप्त होते. ते येशूवर विश्वास ठेवत राहिले तर त्यांना सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ प्राप्त होईल ही जाणीव त्यांच्यासाठी केवढी सांत्वनदायक आहे! (योहान ३:३६; इब्री लोकांस ५:९) दुर्बलतेमुळे त्यांच्या हातून एखादे गंभीर पातक घडल्यास, त्यांच्यासाठी पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या रूपात एक कैवारी किंवा सांत्वनकर्ता आहे. (१ योहान २:१, २) अशा प्रकारचे पाप कबूल करण्याद्वारे व वारंवार पाप करत राहण्याचे टाळण्यासाठी शास्त्रवचनीय पावले उचलण्याद्वारे, ते सुटका मिळवतात कारण देव “विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील,” हे त्यांना माहित आहे.—१ योहान १:९; ३:६; नीतिसूत्रे २८:१३.
१०. पृथ्वीवर असताना येशूने केलेल्या अद्भुत कृत्यांतून आपण काय शिकतो?
१० पृथ्वीवर असताना, येशूने देखील दुष्टात्म्यांनी पीडित असणाऱ्यांना सुटका देण्याद्वारे, सर्व प्रकारचे रोग बरे करण्याद्वारे व मृत प्रियजनांना पुन्हा जिवंत करण्याद्वारे नवचैतन्य दिले. ही अद्भुत कृत्ये केवळ तात्पुरत्या लाभाकरता होती हे कबूल आहे, कारण ज्यांना हा आशीर्वाद प्राप्त झाला ते नंतर वृद्ध होऊन मृत्यू पावले. तथापि, त्यांद्वारे येशूने, तो सर्व मानवजातीवर भविष्यात ज्या चिरकालिक आशीर्वादांचा वर्षाव करणार होता त्यांकडे लक्ष वेधले. आता एक सामर्थ्यवान स्वर्गीय राजा असल्यामुळे तो दुष्टात्म्यांना निव्वळ घालवून देण्यापेक्षा अधिक करील. तो त्यांना त्यांचा नेता सैतान याजसोबत अक्रियाशील स्थितीत, अर्थात एका अगाधकुपात टाकून देईल. यानंतर, ख्रिस्ताच्या वैभवी हजार वर्षांच्या राजवटीचा आरंभ होईल.—लूक ८:३०, ३१; प्रकटीकरण २०:१, २, ६.
११. येशूने स्वतःस “शब्बाथाचा धनी” का म्हणविले?
११ येशूने तो स्वतः “शब्बाथाचा धनी” असल्याचे सांगितले व त्याने अनेक वेळा शब्बाथाच्या दिवशी लोकांना बरे केले. (मत्तय १२:८-१३; लूक १३:१४-१७; योहान ५:१५, १६; ९:१४) असे का बरे? देवाने इस्राएलास दिलेल्या नियमशास्त्रात शब्बाथाचा समावेश होता व अशाप्रकारे तो ‘पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींची छाया’ होता. (इब्री लोकांस १०:१) सप्ताहातील कामाचे सहा दिवस आपल्याला सैतानाच्या अत्याचारी अधिपत्याखाली मानवांच्या मागील ६,००० वर्षांच्या दास्याची आठवण करून देतात. सप्ताहाच्या शेवटी येणारा शब्बाथ दिवस, थोर नोहा अर्थात येशू ख्रिस्त याच्या हजार वर्षीय राजवटीत मानवजात कशाप्रकारे सांत्वनदायक विश्रांती उपभोगील याचे स्मरण घडवतो.—पडताळा २ पेत्र ३:८.
१२. आपण कोणत्या सांत्वनदायक अनुभवांची आतुरतेने वाट पाहू शकतो?
१२ ख्रिस्ताच्या अधिपत्याखाली असणाऱ्या मानवी प्रजाजनांना, आपण सैतानाच्या दुष्ट प्रभावातून संपूर्णपणे स्वतंत्र झालो आहोत हे पाहून केवढे हायसे वाटेल! त्यांची शारीरिक, भावनिक व मानसिक दुखणी बरी होण्याच्या अनुभवाने तर त्यांना आणखीनच सांत्वन मिळेल. (यशया ६५:१७) यानंतर, मृतांतून उठणाऱ्या आपल्या प्रियजनांचे ते स्वागत करू लागतील तेव्हाच्या त्यांच्या अत्यानंदाची कल्पना करा! अशाप्रकारे देव “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” (प्रकटीकरण २१:४) येशूच्या खंडणी बलिदानाचे लाभ क्रमाक्रमाने लागू करण्यात येतील तसतसे देवाच्या राज्याचे आज्ञाधारक प्रजाजन आदामाच्या पापाच्या अनिष्ट परिणामांपासून पूर्णपणे स्वतंत्र होऊन परिपूर्णतेप्रत वाटचाल करतील. (प्रकटीकरण २२:१-५) मग सैतानास “थोडा वेळ” बंधमुक्त केले जाईल. (प्रकटीकरण २०:३, ७) यहोवाच्या खऱ्या हक्काच्या सार्वभौमत्त्वास विश्वासूपणे समर्थन देणाऱ्यांना सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ देण्यात येईल. ‘नश्वरतेच्या दास्यातून पूर्णपणे मुक्त झाल्यावर’ त्यांच्या अवर्णनीय हर्षाची व सुटकेची जरा कल्पना करा! अशाप्रकारे आज्ञाधारक मानवजात “देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता” उपभोगील.—रोमकर ८:२१.
१३. सर्व खऱ्या ख्रिश्चनांना देव पुरवत असलेल्या सांत्वनाची गरज का आहे?
१३ त्यादरम्यान, सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणात राहाणारे सर्वच लोक भोगत असलेले कण्हणे व वेदना यांच्या प्रभावाखाली आपण अद्यापही आहोत. शारीरिक रोग व भावनिक विकार यांत होणारी वाढ, सर्वच प्रकारच्या लोकांवर परिणाम करते, यात विश्वासू ख्रिश्चनही आलेच. (फिलिप्पैकर २:२५-२७; १ थेस्सलनीकाकर ५:१४) तसेच, ‘मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानल्यामुळे’ आपल्यावर सैतान जी अन्यायी थट्टा व जो छळ आणतो तो आपल्याला ख्रिश्चन या नात्याने अनेकवेळा सोसावा लागतो. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) यास्तव, सैतानाच्या जगाचा अंत होईपर्यंत आपल्याला देवाची इच्छा पूर्ण करत टिकून राहावयाचे असल्यास, तो पुरवत असलेले सांत्वन, मदत व सामर्थ्य यांची आपल्याला गरज आहे.
सांत्वन कोठून मिळवावे
१४. (अ) येशूने त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री कोणते अभिवचन दिले? (ब) देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे मिळणाऱ्या सांत्वनाचा पूर्णपणे लाभ घ्यावयाचा असल्यास काय करणे अगत्याचे आहे?
१४ येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने त्यांच्या विश्वासू प्रेषितांना अगदी स्पष्ट सांगितले की तो लवकरच त्यांना सोडून आपल्या पित्याकडे परतणार होता. हे कळताच ते अस्वस्थ व दुःखित झाले. (योहान १३:३३, ३६; १४:२७-३१) त्यांना पुढेही सांत्वनाची गरज पडेल हे ओळखून, येशूने अभिवचन दिले: “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी [“सांत्वनकर्ता,” NW, तळटीप] . . . देईल; अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे.” (योहान १४:१६) येशूने येथे देवाच्या पवित्र आत्म्याचा उल्लेख केला जो त्याच्या पुनरुत्थानानंतर ५० दिवसांनी त्याच्या अनुयायांवर ओतण्यात आला होता.a इतर गोष्टींसोबतच देवाच्या पवित्र आत्म्याने त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये सांत्वन दिले व देवाची इच्छा पूर्ण करत राहण्यासाठी त्यांना समर्थ केले. (प्रेषितांची कृत्ये ४:३१) तथापि, अशा प्रकारची मदत आपोआप मिळेल असे समजता कामा नये. तिचा पूर्णपणे लाभ घ्यावयाचा असल्यास प्रत्येक ख्रिश्चनाने, पवित्र आत्म्याद्वारे देव पुरवत असलेल्या सांत्वनदायक मदतीसाठी निरंतर प्रार्थना करावी.—लूक ११:१३.
१५. यहोवा ज्या मार्गांनी आपल्याला सांत्वन देतो त्यांपैकी काही मार्ग कोणते आहेत?
१५ देव ज्या आणखी एका मार्गाने सांत्वन देतो तो म्हणजे त्याचे वचन अर्थात बायबल. पौलाने लिहिले: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या [सांत्वनाच्या] योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” (रोमकर १५:४) बायबल व बायबल आधारित प्रकाशनांत लिहिलेल्या गोष्टींचा नियमितपणे अभ्यास व त्यांवर मनन करण्याची गरज यातून स्पष्ट होते. ख्रिस्ती सभांमध्ये देवाच्या वचनातून सांत्वनदायक विचारांची देवाणघेवाण होत असते; तेथेही आपली उपस्थिती नियमित असावयास हवी. एकमेकांना प्रोत्साहित करणे हा अशा प्रकारच्या सभांचा एक मुख्य हेतू आहे.—इब्री लोकांस १०:२५.
१६. देवाच्या सांत्वनदायक तरतुदींमुळे आपल्याला काय करण्याची प्रेरणा प्राप्त होण्यास हवी?
१६ देवाच्या सांत्वनदायक तरतुदींचा उपयोग केल्याने आपल्याला कोणकोणते चांगले परिणाम मिळतात हे पौलाने रोमकरांस लिहिलेल्या पत्रांत दाखवलेले आहे. पौलाने लिहिले, ‘आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचे गौरव करावे म्हणून धीर व सांत्वन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे.’ (रोमकर १५:५, ६) होय, देवाच्या सांत्वनदायक तरतुदींचा पुरेपूर लाभ घेतल्यामुळे आपल्याला आपला धैर्यवान नेता म्हणजेच येशू ख्रिस्त याच्याशी अधिकाधिक समरूप होता येईल. यामुळे आपल्या साक्षकार्यात, आपल्या सभांमध्ये, सहविश्वासू जनांसोबत खासगी संवादात व आपल्या प्रार्थनांतून देवाला गौरव देण्यासाठी आपल्या मुखाचा उपयोग करत राहण्यास आपल्याला प्रेरणा प्राप्त होईल.
कठीण परीक्षेच्या काळात
१७. यहोवाने त्याच्या पुत्रास कशाप्रकारे सांत्वन दिले व यामुळे काय झाले?
१७ येशू त्याच्या यातनामय मृत्यूच्या आदल्या रात्री “अति कष्टी” व “अति खिन्न” झाला. (मत्तय २६:३७, ३८) म्हणून तो आपल्या शिष्यांपासून थोड्या अंतरावर गेला व त्याने त्याच्या पित्याजवळ मदतीसाठी प्रार्थना केली. “ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली.” (इब्री लोकांस ५:७) बायबल अहवाल देते की, ‘स्वर्गातून एका देवदूताने येऊन येशूला शक्ती दिली.’ (लूक २२:४३) येशूने ज्या धैर्याने व पुरुषत्वाने त्याच्या विरोधकांना तोंड दिले त्यावरून देवाचा आपल्या पुत्राला सांत्वन देण्याचा मार्ग अत्यंत परिणामकारक होता हे शाबीत झाले.—योहान १८:३-८, ३३-३८.
१८. (अ) प्रेषित पौलाच्या जीवनातील कोणता काळ विशेषपणे संकटमय होता? (ब) परिश्रमी, दयाळू वडिलांना आपण कशाप्रकारे सांत्वन देऊ शकतो?
१८ प्रेषित पौल देखील कठीण परीक्षेच्या काळातून गेला. उदाहरणार्थ, इफिस येथील त्याची सेवा वैशिष्ट्यपूर्ण ठरली कारण त्याने ती “आसवे गाळीत आणि यहूद्यांच्या कटामुळे [त्याच्यावर] आलेली संकटे सोशीत” पार पाडली होती. (प्रेषितांची कृत्ये २०:१७-२०) शेवटी, अर्तमी देवीच्या समर्थकांनी पौलाच्या प्रचार कार्यामुळे नगरात गोंधळ माजवला तेव्हा त्याने इफिस सोडले. (प्रेषितांची कृत्ये १९:२३-२९; २०:१) पौल त्रोवस नगराकडे उत्तर दिशेने जात होता तेव्हा, त्याच्या मनावर आणखीन एका गोष्टीचे फार दडपण होते. इफिसमध्ये गोंधळ माजण्यापूर्वी त्याला एक खळबळजनक अहवाल मिळाला होता. करिंथ येथील अननुभवी मंडळीत फुटी होत्या व तिच्यात जारकर्मासही खपवून घेतले जात होते. या कारणास्तव, ही स्थिती सुधारण्याच्या आशेने पौलाने इफिसातून कडक वाग्दंडाचे एक पत्र लिहिले होते. त्याला हे सहजासहजी करता आले नाही. त्याने दुसऱ्या एका पत्रात सांगितले, “मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रु गाळीत तुम्हास लिहिले होते.” (२ करिंथकर २:४) पौलाप्रमाणे, दयाळू वडिलांसाठी सुधारणुकीकरता सल्ला व वाग्दंड देणे म्हणावे तितके सोपे नसते; काही अंशी त्यांच्या स्वतःच्या कमतरतांबद्दल त्यांना चांगली जाणीव असल्यामुळे असे होते. (गलतीकर ६:१) यास्तव, आपण बायबलवर आधारित असलेल्या प्रेमळ सल्ल्यास तत्परतेने योग्य प्रतिसाद देण्याकरवी आपल्यामध्ये नेतृत्त्व करणाऱ्यांना सांत्वन द्यावे.—इब्री लोकांस १३:१७.
१९. पौल त्रोवसातून पुढे मासेदोनियास का गेला, व त्याला शेवटी कशाप्रकारे समाधान लाभले?
१९ इफिसमध्ये असताना पौलाने करिंथ येथील बांधवांना केवळ पत्रच लिहिले नाही, तर त्यांना मदत करण्यासाठी त्याने तीतासही पाठविले व पत्राबद्दल त्यांची कशी प्रतिक्रिया होती यावर अहवाल देण्यास त्यास नेमले. त्रोवसात तीताची गाठ पडेल अशी पौलास आशा होती. तेथे पौलास शिष्य बनवण्याच्या सुसंधी लाभल्या. तथापि, यामुळे त्याचा चिंतातूरपणा कमी झाला नाही कारण तीत एव्हाना तेथे पोहंचला नव्हता. (२ करिंथकर २:१२, १३) म्हणून, तो पुढे प्रवास करीत मासेदोनियास गेला, या आशेने की कदाचित तेथे तीताची भेट घडेल. पौलाच्या चिंताकूल स्थितीत, त्याच्या सेवेला झालेल्या भयंकर विरोधामुळे आणखीनच भर पडली. “आम्ही मासेदोनियात आल्यावरहि आम्हाला शारीरिक स्वस्थता अशी नव्हतीच, तर आम्ही चहूकडून गांजलेले होतो; बाहेर भांडणतंटे, आत भीति. तथापि दीनांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले.” (२ करिंथकर ७:५, ६) शेवटी तीत आला व त्याने पौलास त्याच्या पत्राला करिंथकरांच्या मंडळीने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल सांगितले तेव्हा त्यास केवढे समाधान लाभले असावे!
२०. (अ) पौलाच्या बाबतीत घडल्याप्रमाणे, यहोवा सांत्वन पुरवत असलेल्या मार्गांपैकी आणखी एक महत्त्वपूर्ण मार्ग कोणता? (ब) पुढील लेखात कशावर विचार करण्यात येईल?
२० आजच्या काळातील देवाचे सेवक ज्यांतील अनेक जण “दीन” अथवा “निराश” व्हावयास लावणाऱ्या संकटांना तोंड देतात त्यांच्यासाठी पौलाचा अनुभव सांत्वनदायक आहे. (सुबोध भाषांतर) होय, ‘सांत्वन देणारा देव’ आपल्या वैयक्तिक गरजा जाणतो व करिंथकरांच्या पश्चात्तापी मनोवृत्तीबद्दल तीताने दिलेल्या अहवालामुळे जसे पौलास सांत्वन लाभले तसेच एकमेकांस सांत्वन देण्यासाठी तो आपलाही उपयोग करून घेऊ शकतो. (२ करिंथकर ७:११-१३) आमच्या पुढील लेखात, आपण करिंथकरांबद्दल पौलाने दाखवलेल्या प्रेमळ प्रतिक्रियेवर, तसेच ती आपल्याला प्रभावीपणे देवाचे सांत्वन देणारे बनण्यात कशी मदत करू शकते यावर विचार करू.
[तळटीपा]
a पहिल्या शतकातील ख्रिश्चनांसंबंधी देवाच्या आत्म्याच्या कार्यवहनातील एक प्रमुख कार्य म्हणजे त्यांना देवाचे आध्यात्मिक दत्तक पुत्र व येशूचे बंधू या नात्याने अभिषिक्त करणे हे होते. (२ करिंथकर १:२१, २२) हे केवळ ख्रिस्ताच्या १,४४,००० अनुयायांपर्यंतच मर्यादित आहे. (प्रकटीकरण १४:१, ३) आज, ख्रिश्चनांतील अधिकांश जनांना दयाळुपणे परादीस पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा देण्यात आली आहे. अभिषिक्त नसले तरीही त्यांना देखील देवाच्या पवित्र आत्म्याची मदत व सांत्वन लाभते.
तुम्ही उत्तर देऊ शकता का?
◻ मानवजातीला कशाप्रकारे सांत्वनाची गरज भासू लागली?
◻ येशू कशाप्रकारे नोहापेक्षा थोर ठरला आहे?
◻ येशूने स्वतःस “शब्बाथाचा धनी” का म्हणविले?
◻ देव आज आपल्याला कशाप्रकारे सांत्वन पुरवतो?
[१० पानांवरील नकाशा/चित्रं]
(For fully formatted text, see bond publication)
करिंथकरांविषयी तीताच्या अहवालामुळे पौलाने मोठे सांत्वन अनुभवले
मासेदोनिया
ग्रीस
फिलिप्पै
करिंथ
त्रोवस
आशिया
इफिस