“सर्व सांत्वनदाता देव” याजकडून सांत्वन
“आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करितो.” —२ करिंथकर १:३, ४.
१, २. शोकित व्यक्तींना कोणत्याप्रकारच्या सांत्वनाची गरज आहे?
शोकित लोकांना खऱ्या सांत्वनाची गरज आहे—अगदी निरस व नेहमीचीच विधाने नकोत. ‘काळच जखमा भरून काढील’ ही म्हण सर्वांनीच ऐकली असेल, परंतु, मृत्यूमुळे झालेल्या वियोगाच्या सुरवातीच्या टप्प्यात दुःखाने पीडित झालेल्या व्यक्तीला या विचाराने खरोखरच सांत्वन प्राप्त होते का? देवाने पुनरुत्थानाचे अभिवचन दिले आहे हे ख्रिश्चनांना माहीत आहे परंतु, त्यामुळे एखाद्या अचानक दुःखाची खोल इजा व जखम होण्याचे टळत नाही. शिवाय, तुम्ही एखादे मूल गमावले असले तर तुमची इतर मुले त्या मौल्यवान मुलाची जागा कधीच घेऊ शकणार नाहीत.
२ अशा दुःखाच्या काळात, देवाच्या अभिवचनांवर ठामपणे आधारित असलेल्या खऱ्या सांत्वनाने आपल्याला अधिक मदत होते. आपल्याला समभावनेची देखील गरज आहे. आणि हे र्वांडातील लोकांच्या बाबतीत निश्चितच खरे ठरले आहे, विशेषकरून त्या निर्दयी जातीय हत्येमध्ये ज्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शेकडो कुटुंबांनी त्यांचे प्रियजन गमावले त्यांच्याबाबतीत खरे ठरले आहे. दुःख करणारे सर्व कोणाकडून सांत्वन प्राप्त करू शकतात?
यहोवा—सांत्वनदाता देव
३. सांत्वन देण्यात यहोवाने स्वतःचे उदाहरण कसे मांडले आहे?
३ आम्हा सर्वांना सांत्वन देण्यात यहोवाने उत्तम उदाहरण मांडले आहे. त्याने आपल्याला सांत्वन व आशा देण्याकरता त्याचा एकुलता एक पुत्र, ख्रिस्त येशूला ह्या पृथ्वीवर पाठवले. येशूने शिकवले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) त्याने त्याच्या अनुयायांना असेही सांगितले: “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.” (योहान १५:१३) आणखी एका प्रसंगी त्याने म्हटले: “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” (मत्तय २०:२८) शिवाय पौलाने म्हटले: “परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला.” (रोमकर ५:८) या आणि अशा इतर अनेक वचनांतून आपल्याला देवाची व ख्रिस्त येशूची प्रीती समजते.
४. प्रेषित पौल खासकरून यहोवाचा ऋणी का होता?
४ प्रेषित पौलाला यहोवाच्या अपात्री कृपेची जाणीव होती. त्याला आध्यात्मिक मृत स्थितीतून, ख्रिस्ताच्या शिष्यांचा हेकट छळकर्ता होण्यापासून मुक्त करून स्वतः छळग्रस्त ख्रिस्ती बनवण्यात आले होते. (इफिसकर २:१-५) तो त्याचा अनुभव अशाप्रकारे सांगतो: “प्रेषितात मी कनिष्ट आहे; प्रेषित म्हणावयास मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले.”—१ करिंथकर १५:९, १०.
५. देवाकडून येणाऱ्या सांत्वनाबद्दल पौलाने काय लिहिले?
५ उचितपणे मग पौलाने लिहिले: “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करितो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याहि संकटांत आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दुःखे जशी पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनहि पुष्कळ होते. आम्हांवर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते; आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोसतो, ती सहन करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळते. तुम्हाविषयीची आमची आशा दृढ आहे; कारण आम्हाला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दुःखाचे सहभागी आहा तसे सांत्वनाचेहि सहभागी आहा.”—२ करिंथकर १:३-७.
६. भाषांतरीत केलेल्या “सांत्वन” या ग्रीक शब्दातून काय सूचित होते?
६ किती उत्तेजनपर शब्द! येथे भाषांतरीत केलेला ग्रीक शब्द “सांत्वन” याचा संबंध “एखाद्याची बाजू घेण्याचे निमंत्रण” याजशी केला आहे. अशाप्रकारे, ते “तीव्र परीक्षेचा सामना करत असताना एखाद्या व्यक्तीला उत्तेजन देण्यासाठी तिच्याशेजारी उभे राहणे” होय. (अ लिंग्विस्टिक कि टू द ग्रीक न्यू टेस्टमेंट) एका बायबल विद्वानाने लिहिले: “या शब्दाचा अर्थ . . . नेहमी शांत करणारी सहानुभूती, यापेक्षाही अधिक असा होतो. . . . ख्रिस्ती सांत्वन धैर्य आणणारे सांत्वन आहे, हे सांत्वन एखाद्या मनुष्याला जीवनाच्या सर्व समस्यांना तोंड देण्यास साहाय्य करते.” त्यामध्ये मृतांचे पुनरुत्थान या ठोस अभिवचनावर व आशेवर आधारित असलेल्या सांत्वनदायक शब्दांचा समावेश आहे.
येशू व पौल—दयाळू सांत्वनकर्ते
७. पौल त्याच्या ख्रिस्ती बांधवांसाठी सांत्वनदायक कसा होता?
७ सांत्वन देण्यात पौल किती उत्तमप्रकारे उदाहरणीय होता! म्हणूनच तो थेस्सलनीका येथील बांधवांना लिहू शकला: “आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवहि देण्यास राजी होतो. तुम्हास ठाऊकच आहे की, बाप आपल्या मुलांना करितो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो.” प्रेमळ, काळजीपूर्वक पालकांप्रमाणे, आपल्यातील प्रत्येक जण इतरांसोबत त्यांच्या गरजेच्या काळात आपला प्रेमळपणा व समज वाटून घेऊ शकतो.—१ थेस्सलनीकाकर २:७, ८, ११.
८. येशूची शिकवण दुःखितांसाठी सांत्वन का आहे?
८ अशाप्रकारची काळजी व दया दाखवताना पौल त्याचा महान आदर्श असणाऱ्या येशूचे अनुकरण करत होता. येशूने सर्वांना दिलेल्या दयाळू आमंत्रणाची आठवण करा, जे मत्तय ११:२८-३० मध्ये नोंदविण्यात आले आहे: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जूं सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” होय येशूची शिकवण तजेला देणारी आहे कारण त्यामध्ये आशा व अभिवचन—पुनरुत्थानाचे अभिवचन आहे. उदाहरणार्थ, आपण लोकांकडे तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी) हे माहितीपत्रक ठेवून जातो तेव्हा त्यांना एक आशा व अभिवचन सादर करतो. आपण दीर्घकाळापासून दुःख करीत असलो तरी ही आशा आपल्या सर्वांना मदत करू शकते.
दुःख करणाऱ्यांना मदत कशी करावी
९. दुःख करणाऱ्या व्यक्तींबाबत आपण अधीर का असू नये?
९ एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर लगेचच ठराविक काळापर्यंत दुःख करणे हे आधीच ठरवले जात नाही. काही लोक विशेषतः, ज्यांनी आपली मुले गमावली आहेत त्यांना आयुष्यभर दुःख होत असते. स्पेनमधील एका विश्वासू ख्रिस्ती दांपत्याने १९६३ मध्ये त्यांचा ११ वर्षीय मुलगा मस्तिष्कदाहामुळे गमावला. आजही, पेकिटोबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. वर्षदिन, फोटो, मृत व्यक्तीची आठवण करून देणाऱ्या वस्तू अशा गोष्टी पाहिल्यामुळे पुन्हा त्या दुःखद आठवणी येऊ लागतात. यास्तव, आपण केव्हाही अधीर होऊन असा विचार करू नये, की आतापर्यंत इतरांनी कदाचित त्यांचे दुःख विसरले पाहिजे. एक वैद्यकीय अधिकारी कबूल करतात: “खिन्नता आणि भावनिक मनःस्थितीतील बदल अनेक वर्षे राहू शकतात.” म्हणूनच लक्षात ठेवा, की शरीरावरील जखमा जशा आयुष्यभर राहतात त्याचप्रकारे अनेक भावनिक जखमा देखील आयुष्यभर राहतात.
१०. दुःखितांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो?
१० ख्रिस्ती मंडळीमध्ये कोणी दुःख करीत असल्यास आपण त्यांना सांत्वन देऊ शकू अशा काही व्यावहारिक गोष्टी कोणत्या आहेत? सांत्वनाची गरज असलेल्या एखाद्या बंधू किंवा बहिणीला आपण प्रांजळपणे म्हणू शकू, “मी काही करू शकेन असे काही असल्यास मला जरूर सांगा.” परंतु ती दुःखित व्यक्ती वास्तविकतेत आपल्याकडे कितीदा येऊन म्हणते, “तुम्ही मला मदत करू शकाल अशा गोष्टीचा मी विचार केला आहे”? स्पष्टपणे, दुःखितांना मदत करायची आहे तर आपण उचित पुढाकार घेणे जरूरीचे आहे. ते आपण एका हितकारक मार्गाने कसे करू शकतो? येथे काही व्यावहारिक सूचना दिल्या आहेत.
११. ऐकून घेणे हे इतरांसाठी सांत्वन कसे ठरू शकते?
११ ऐका: दुःखित व्यक्तीचे ऐकून तिच्या दुःखात सहभाग घेणे ही सर्वात मदतदायी गोष्ट तुम्ही करू शकता. तुम्ही विचारू शकता, “तुम्हाला त्याविषयी बोलायचे आहे का?” त्या व्यक्तीला निर्णय करू द्या. एक ख्रिस्ती बांधव त्याचे वडील वारले तेव्हाची आठवण करून म्हणाला: “तुमच्या वडिलांना काय झाले होते असे इतरांनी मला विचारले आणि खरोखरच कान देऊन ऐकले त्यामुळे मला अतिशय बरे वाटले.” याकोबाने सल्ला दिल्यानुसार ऐकण्यास तत्पर असा. (याकोब १:१९) धीराने व सहानुभूतीपूर्वक ऐका. रोमकर १२:१५ मध्ये बायबल म्हणते की, “शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा.” येशू मार्था आणि मरीयासोबत रडला हे लक्षात घ्या.—योहान ११:३५.
१२. दुःख करणाऱ्यांसाठी आपण कोणत्या प्रकारचे आश्वासन देऊ शकतो?
१२ धीर द्या: लक्षात असू द्या, की दुःखित व्यक्तीला सुरवातीला दोषी असल्यासारखे वाटू लागेल. तिला वाटते, की ती पुष्कळ काही करू शकत होती. जे काही करावयाचे होते (किंवा तुम्हाला माहीत असलेले वास्तविक व सकारात्मक) ते सर्व करण्यात आले असा त्या व्यक्तीला धीर द्या. तिला आश्वासन द्या की तिला असे वाटणे मुळीच असाधारण नाही. अशाच दुःखातून यशस्वीपणे बरे झालेल्या तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीबद्दल तिला सांगा. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, संवेदनाशील व सहानुभूती दाखवणारे असा. आपली दयापूर्ण मदत अधिक अर्थपूर्ण होऊ शकते! शलमोनाने लिहिले: “रूपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.”—नीतीसूत्रे १६:२४; २५:११; १ थेस्सलनीकाकर ५:११, १४.
१३. आपण स्वतःला उपलब्ध केल्याने ते मदतकारक कसे ठरू शकते?
१३ उपलब्ध असा: सुरवातीच्या काही दिवसांसाठी अनेक मित्र आणि नातेवाईक असतात तेव्हाच केवळ नव्हे तर, आवश्यक असल्यास सर्व जण आपापल्या नित्यक्रमाला गेल्यानंतर काही महिन्यांनंतर देखील तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकता. दुःखाच्या काळात फरक होऊ शकतो कारण तो त्या व्यक्तीवर अवलंबून असतो. आपली ख्रिस्ती आस्था व सहानुभूती कोणत्याही गरजू काळात अर्थपूर्ण असू शकते. बायबल म्हणते: “एकादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाहि आपणास धरून राहतो.” म्हणूनच, “संकटकाळी साहाय्य करणारा तोच खरा मित्र” ही म्हण स्वयंसिद्ध आहे जिच्यानुसार आपण जगले पाहिजे.—नीतिसूत्रे १८:२४; पडताळा प्रेषितांची कृत्ये २८:१५.
१४. दुःखितांना सांत्वन मिळेल असे कोणते बोलणे आपण करू शकतो?
१४ मृत व्यक्तीच्या चांगल्या गुणांबद्दल बोला: योग्य समयी दिली जाणारी ही आणखी एक मदत होय. तुम्हाला आठवत असलेल्या काही सकारात्मक घटना सांगा. मृत व्यक्तीचे नाव घेण्यास कचरू नका. मृत प्रिय व्यक्ती कधी अस्तित्वातच नव्हती किंवा काल्पनिक असल्यासारखे वागू नका. हावर्ड मेडिकल स्कूलमधील एका प्रकाशनाने काय म्हटले ते जाणणे सांत्वनदायक आहे: “भारावून टाकणाऱ्या खिन्नतेविना एक दुःखित व्यक्ती मृत व्यक्तीबद्दल सरतेशेवटी विचार करते तेव्हा तिला पुष्कळ बरे वाटते. . . . नवी वास्तविकता कबूल करून आत्मसात केली जाते तेव्हा, दुःख नाहीसे होऊन आठवणी साठवल्या जातात.” “साठवलेल्या आठवणी”—प्रिय व्यक्तीसोबत घालवलेल्या त्या मौल्यवान क्षणांची आठवण करणे किती सांत्वनदायक आहे! काही वर्षांआधी एका साक्षीदाराचे वडील निवर्तले, त्याबद्दल तो म्हणतो: “बाबांनी सत्याचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला त्यानंतर लगेचच मी त्यांच्याबरोबर बायबल वाचन करत होतो ही माझी खास आठवण आहे. शिवाय त्यांच्याबरोबर नदीच्या काठावर पडून माझ्या काही समस्यांची चर्चा मला आठवते. मी त्यांना तीन किंवा चार वर्षांतून एकदा भेटत होतो म्हणून ते प्रसंग माझ्यासाठी अतिशय मौल्यवान होते.”
१५. मदत करण्यासाठी एखादी व्यक्ती पुढाकार कशी घेऊ शकते?
१५ उचित वेळी पुढाकार घ्या: काही दुःखित व्यक्ती इतरांपेक्षा अधिक, दुःख सहन करू शकतात. यास्तव, परिस्थितीनुरूप मदतीसाठी व्यावहारिक पावले उचला. एक दुःखित ख्रिस्ती स्त्री आठवून असे सांगते: “पुष्कळ जण मला म्हणाले, ‘मी काही करू शकेन असे काही असल्यास मला कळवावे.’ परंतु, एका ख्रिस्ती बहिणीने मला काही विचारले नाही. ती सरळ बेडरूममध्ये गेली, स्वच्छ बिछाना अंथरून मळीन बिछाना धुऊन काढला. दुसऱ्या एका बहिणीने, बादलीभर पाणी व साबण घेतला आणि माझ्या पतीने उलटी केलेला गालीचा घासून धुऊन काढला. ह्या खऱ्या मैत्रिणी होत्या, आणि मी त्यांना कधीच विसरणार नाही.” जेथे मदतीची खरोखरच गरज आहे तेव्हा पुढाकार घ्या—कदाचित स्वयंपाक करणे, साफसफाई करणे किंवा इतर साहाय्यक सेवा करणे. परंतु, जेव्हा दुःखित व्यक्तीला एकांत हवा असतो तेव्हा आपण आगंतुक होता कामा नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे. अशाप्रकारे, आपण पौलाचे शब्द अंतःकरणाप्रत घेऊ या, की “तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा.” दया, सहनशीलता आणि प्रीती कधीही टळत नाही.—कलस्सैकर ३:१२; १ करिंथकर १३:४-८.
१६. एखादे पत्र किंवा कार्ड सांत्वन का देऊ शकते?
१६ एखादे पत्र लिहा किंवा सांत्वनाचे कार्ड पाठवा: दुःख प्रदर्शन करणारे एखादे पत्र किंवा एक सुंदरशा सहानुभूतीपूर्वक कार्डाच्या मूल्याकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. त्याचा फायदा? ते पुनःपुन्हा वाचले जाऊ शकते. अशाप्रकारचे पत्र लांबलचक असण्याची आवश्यकता नाही तर त्यामध्ये तुमची दया दिसून यावी. त्यामध्ये उपदेश नसून त्याद्वारे आध्यात्मिक भावना प्रतिबिंबित झाली पाहिजे. “तुम्हाला मदत करण्यास आम्ही आहोत” हा मूलभूत संदेश सांत्वनदायक असू शकतो.
१७. प्रार्थना सांत्वन कसे पुरवू शकते?
१७ त्यांच्यासोबत प्रार्थना करा: दुःखित सहख्रिश्चनांबरोबर व त्यांच्यासाठी केलेल्या तुमच्या प्रार्थनांच्या मूल्याला कमी लेखू नका. बायबल याकोब ५:१६ मध्ये म्हणते: “नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.” उदाहरणार्थ, दुःखित व्यक्ती आपल्याला तिच्यावतीने प्रार्थना करताना ऐकते तेव्हा, दोषी असल्याच्या नकारात्मक भावनेवर यशस्वीपणे मात करण्यास तिला साहाय्य होते. आपल्या कमतरतेच्या, मानसिक भ्रष्टतेच्या स्थितीत, सैतान त्याच्या ‘डावपेचांद्वारे’ किंवा “कुयुक्तींद्वारे” आपल्याला क्षीण करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशाच वेळी आपल्याला सांत्वन व प्रार्थनेचा आधार हवा, म्हणूनच पौलाने लिहिले: “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा.”—इफिसकर ६:११, १८, किंग्डम इंटरलिनियर; पडताळा याकोब ५:१३-१५.
काय टाळावे
१८, १९. आपण आपल्या संभाषणामध्ये युक्ती कशी दाखवू शकतो?
१८ दुःख करणाऱ्या व्यक्तीसमोर बोलू नयेत किंवा करू नयेत अशाही काही गोष्टी आहेत. नीतीसूत्रे १२:१८ इशारा देते: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” काही वेळा आपण अजाणतेत युक्ती दाखवण्यास अपयशी होतो. उदाहरणार्थ, आपण कदाचित म्हणू, “तुम्हाला कसे वाटते हे मी समजू शकतो.” परंतु तसे खरेच आहे का? तुम्हावर देखील अशाचप्रकारचे दुःख गुदरले होते का? शिवाय काही लोक वेगवेगळी प्रतिक्रिया दाखवतात. तुमच्या प्रतिक्रिया दुःखित व्यक्तीशी तंतोतंत जुळणाऱ्या नसतील. असे म्हणणे अधिक संवेदनाप्रवण होईल की, “मला तुमच्याबद्दल खरोखरच सहानुभूती वाटते कारण काही वर्षांआधी माझी किंवा माझे . . . वारले तेव्हा मला देखील तुमच्यासारख्याच परिस्थितीतून जावे लागले.”
१९ मृत व्यक्तीचे पुनरुत्थान होईल की नाही असे म्हणण्याचे टाळल्याने सुद्धा संवेदनाक्षमता दिसून येईल. ख्रिस्ती विश्वासात नसलेल्या विवाहसोबत्याच्या भवितव्यातील शक्यतांबद्दल ठाम मत मांडल्यामुळे काही बंधु किंवा बहिणींना अतिशय इजा पोहंचली. कोणाचे पुनरुत्थान होईल व कोणाचे होणार नाही हे ठरवणे आपले काम नाही. हृदय पाहणारा यहोवा आपल्याहून कैकपटीने दयाळू असेल हे ऐकून आपल्याला विसावा मिळू शकतो.—स्तोत्र ८६:१५; लूक ६:३५-३७.
सांत्वन देणारी वचने
२०, २१. दुःखितांना सांत्वन देणारी कोणती काही वचने आहेत?
२० योग्य समयी प्रस्तुत केलेले, साहाय्य देणाऱ्या सर्वात मोठ्या उगमातील एक म्हणजे, मृतांसाठी यहोवाने दिलेल्या अभिवचनांवर विचार करणे होय. दुःखित व्यक्ती साक्षीदार असो किंवा क्षेत्र सेवेत आपल्याला भेटलेली एखादी व्यक्ती असो, बायबलचे हे विचार फायदेकारक ठरतील. त्यापैकी काही वचने कोणती आहेत? यहोवा सर्व सांत्वनदाता देव आहे हे आपल्याला ठाऊक आहे, कारण त्याने म्हटले: “तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे.” तो असेही म्हणाला: “जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करिते तसे मी तुमचे सांत्वन करीन.”—यशया ५१:१२; ६६:१३.
२१ स्तोत्रकर्त्याने लिहिले: “माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते. हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे. तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे.” या उताऱ्यांमध्ये “सांत्वन” हा शब्द वारंवार उल्लेखित करण्यात आला आहे याकडे लक्ष द्या. होय, आपल्या दुःखाच्या काळात यहोवाच्या वचनाकडे वळण्याद्वारे स्वतः आपल्याला आणि इतरांसाठी खरे सांत्वन मिळू शकते. यासोबत आपल्या बांधवांची प्रीती व दया आपल्याला या दुःखाच्या समयी टिकून राहण्यास मदत करू शकते आणि आपले जीवन पुन्हा एकदा ख्रिस्ती सेवेतील आनंदाने भरू शकते.—स्तोत्र ११९:५०, ५२, ७६.
२२. आपल्यासमोर कोणती आशा आहे?
२२ इतरांना त्यांच्या संकटसमयी मदत करण्यात व्यग्र राहून आपण काही प्रमाणात आपल्या दुःखावर मात करू शकतो. सांत्वन हवे असणाऱ्यांकडे आपले लक्ष केंद्रित केल्याने, आध्यात्मिक अर्थाने देण्याचा अस्सल आनंद आपल्याला देखील मिळतो. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) आपण त्यांना पुनरुत्थानाच्या दृश्याचे वर्णन करू या. तेव्हा एका पिढीनंतर दुसरी पिढी, सर्व भूतपूर्व राष्ट्रांतील लोक मृत्यूमुळे गमावलेल्या त्यांच्या प्रियजनांचे नव्या जगात स्वागत करील. काय ही आशा! यहोवा खरोखरच “दीनांचे सांत्वन करणारा देव” आहे याची आपल्याला आठवण होईल तेव्हा आपल्या डोळ्यातून किती आनंदाश्रू येतील!—२ करिंथकर ७:६.
तुम्हाला आठवते का?
▫ यहोवा “सर्व सांत्वनदाता देव” कसा आहे?
▫ येशू व पौलाने दुःखितांना सांत्वन कसे दिले?
▫ दुःख करणाऱ्यांना सांत्वन मिळण्यासाठी आपण कोणत्या काही गोष्टी करू शकतो?
▫ दुःखितांसोबत व्यवहार करताना आपण कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
▫ दुःखाच्या काळात सांत्वन देणारी तुमची आवडती वचने कोणती आहेत?
[१५ पानांवरील चित्रं]
दुःख करणाऱ्यांना मदत करण्यासाठी युक्तीने पुढाकार घ्या