मायकल फॅरॅडे शास्त्रज्ञ व विश्वासी पुरुष
“विद्युत् शक्तीचा जनक.” “अभूतपूर्व, सर्वश्रेष्ठ प्रायोगिक शास्त्रज्ञ.” या आहेत, १७९१ साली इंग्लंड येथे जन्मलेले मायकल फॅरॅडे यांचे वर्णन करणाऱ्या दोन उपाधी; विद्युत-चुंबकीय प्रवर्तनासंबंधी त्यांनी लावलेले शोध, विद्युत चलित्र व विद्युत जनित्र यांच्या विकासाला आधारभूत ठरले आहेत.
लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांवर अनेक व्याख्याने दिली. विज्ञानाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने निर्मिलेल्या त्यांच्या व्याख्यानांद्वारे, तरुण लोकांना गुंतागुंतीचे वैज्ञानिक दृष्टिकोन समजण्यास मदत मिळाली. त्यांना विविध विश्वविद्यालयांतर्फे बहुमान मिळाले. तथापि, त्यांनी प्रसिद्धीस नाकारले. ते एक अत्यंत धार्मिक गृहस्थ होते; आपल्या तीन खोल्यांच्या घरातील एकांतात व आपले कुटुंबीय व सहविश्वासू यांच्या सहवासात त्यांना सर्वाधिक आनंद प्राप्त होई. फॅरॅडे हे, त्यांच्याच शब्दांत बोलायचे झाल्यास, “सॅन्डेमेनियन्स . . . म्हणण्यात आलेल्या ख्रिश्चनांच्या लहानशा व तुच्छ लेखलेल्या पंथाचे” सदस्य होते. हे लोक कोण होते? त्यांचा काय विश्वास होता? शिवाय, याचा फॅरॅडे यांवर कशाप्रकारे परिणाम झाला?
सॅन्डेमेनियन लोक
मायकल फॅरॅडे: सॅन्डेमेनियन व शास्त्रज्ञ (इंग्रजी) या ग्रंथाचे लेखक जेफ्री कँटर सांगतात की, “फॅरॅडे कुटुंबाचा सॅन्डेमेनियन चर्चशी आरंभीचा संबंध मायकल फॅरॅडे यांच्या आजीआजोबांद्वारे ठरवण्यात आला होता.” ते रूढ परंपरेच्या विरोधात असलेल्या एका प्रवासी सेवकाच्या अनुयायांबरोबर संबंधित होते; या सेवकाच्या सोबत्यांनी सॅन्डेमेनियन समजुतींचा स्वीकार केला.
रॉबर्ट सॅन्डेमॅन (१७१८-७१) हे एडिनबर्ग येथील विश्वविद्यालयात गणित, ग्रीक व इतर भाषांचा अभ्यास करणारे विद्यार्थी होते; अशातच एके दिवशी त्यांनी माजी प्रेस्बीटेरियन सेवक जॉन ग्लॅस यांचा उपदेश ऐकला. तेथे ऐकलेल्या गोष्टींनी ते इतके प्रभावित झाले की विश्वविद्यालय सोडून ते घरी, अर्थात पर्थ येथे परतले व ग्लॅस आणि त्यांच्या सोबत्यांना जाऊन मिळाले.
जॉन ग्लॅस यांच्या मनात १७२० च्या दशकादरम्यान चर्च ऑफ स्कॉटलंडच्या काही शिकवणुकींबद्दल साशंकता निर्माण होऊ लागली होती. देवाच्या वचनाच्या अभ्यासातून ते या निष्कर्षास आले की, बायबलमधील इस्राएल राष्ट्र हे अनेक राष्ट्रांतून येणाऱ्या नागरिकांनी बनलेल्या एका आध्यात्मिक राष्ट्रास सूचित करते. प्रत्येक राष्ट्रासाठी एक स्वतंत्र चर्च असण्याच्या प्रकाराला त्यांना कोठेही सबळ पुरावा गवसला नाही.
स्कॉटलंड येथील डन्डी येथून काही अंतरावर बाहेर असलेल्या टीलिंग येथील आपल्या चर्चमध्ये आता ग्लॅस यांना अस्वस्थ वाटू लागले; शेवटी त्यांनी चर्च ऑफ स्कॉटलंडचा त्याग केला व आपल्या स्वतःच्या सभा आयोजित केल्या. जवळजवळ शंभर लोक त्यांना येऊन मिळाले व सुरवातीपासूनच त्यांच्या गटामध्ये एकता राखण्याची गरज त्यांना जाणवली. त्यांनी, काही मतभेद झाल्यास सोक्षमोक्ष लावण्यासाठी मत्तयाच्या १८ व्या अध्यायातील १५ ते १७ वचनांत नमूद केलेल्या ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाचा अवलंब करण्याचे ठरवले. नंतर ते दर आठवड्याला सभा चालवू लागले; या सभांमध्ये समविश्वासू जन प्रार्थना व उत्साहवर्धन यांकरता एकत्रित होत असत.
वेगवेगळ्या गटांतील लोक, पुरेशा संख्येने नियमितपणे या सभांना उपस्थित राहू लागले तेव्हा त्यांच्या उपासनेच्या कार्यहालचालींवर देखरेख करण्यासाठी जबाबदार पुरुषांची गरज भासली. परंतु, कोण पात्र ठरत असत? जॉन ग्लॅस व त्यांच्या सोबत्यांनी, या विषयावर प्रेषित पौलाने जे लिहिले होते त्याकडे विशेष लक्ष दिले. (१ तीमथ्य ३:१-७; तीत १:५-९) त्यांना यात विश्वविद्यालयीन शिक्षणाचा किंवा हिब्रू अथवा ग्रीक या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचा कोठेही उल्लेख आढळला नाही. यास्तव, शास्त्रवचनीय मार्गदर्शनावर प्रार्थनापूर्वक विचार केल्यावर त्यांनी पात्र ठरणाऱ्या पुरुषांना वडील होण्यास नेमले. चर्च ऑफ स्कॉटलंडला एकनिष्ठ असलेल्यांच्या नजरेत, विणकऱ्यांच्या, शिंप्यांच्या किंवा शेतकऱ्यांच्या घराण्यांत वाढलेल्यांनी बायबल समजून घेण्याची आणि त्याच्या संदेशाचा प्रचार करण्याची चेष्टा करणे हे “इशनिंदेपेक्षा काही कमी नव्हते.” ग्लॅस व त्यांच्या सहविश्वासू जनांनी, १७३३ साली आपले स्वतःचे सभागृह बांधले, तेव्हा स्थानिक पाळक वर्गाने त्यांना गावाबाहेर घालवण्यासाठी न्यायाधीशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले व ही चळवळ पुढे वाटचाल करीत राहिली.
रॉबर्ट सॅन्डेमॅन यांनी ग्लॅस यांच्या थोरल्या कन्येशी विवाह केला व वयाच्या २६ व्या वर्षी ते ग्लॅसाइट लोकांच्या पर्थ येथील मंडळीचे एक वडील बनले. वडील या नात्याने त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या इतक्या मोठ्या होत्या की शेवटी त्यांनी आपला पूर्ण वेळ पाळकीय कार्यास वाहण्याचे ठरवले. नंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यावर, रॉबर्ट यांनी “त्यांच्या वाट्याला येणाऱ्या कोणत्याही ठिकाणी प्रभूची सेवा करण्याचे स्वखुषीने स्वीकारले,” असे एका चरित्रविषयक लिखाणात सांगण्यात आले आहे.
सॅन्डेमेनियन मतप्रणालीचा प्रसार
सॅन्डेमॅन यांनी स्कॉटलंडपासून इंग्लंडपर्यंत आपल्या सेवेचे क्षेत्र वाढवले; येथे सहविश्वासू जनांचे नवीन गट वाढीस लागले. त्या काळात, इंग्लंडचे कॅल्विन मतवादी हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले होते. आपण तारणासाठी पूर्वनिश्चित आहोत असा काहींचा समज होता. उलटपक्षी सॅन्डेमॅन यांनी, विश्वास तारणासाठी एक अत्यावश्यक अट असल्याचे मानणाऱ्या लोकांची बाजू उचलून धरली. या दृष्टिकोनाच्या समर्थनार्थ त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केले; या पुस्तकाचे चार वेळा पुनर्मुद्रण झाले व त्याच्या दोन अमेरिकन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. जेफ्री कँटर यांच्या मतानुसार, “या खंडाचे प्रकाशन म्हणजे, [सॅन्डेमेनियन] पंथास त्याच्या संकुचित अशा स्कॉटिश आरंभांपासून वर आणणारी एकमात्र अतिमहत्त्वपूर्ण घटना होती.”
सॅन्डेमॅन यांच्यासहित इतर ग्लॅसाइट वडिलांनी, १७६४ साली अमेरिकेचा प्रवास केला; या भेटीने चांगलाच वादविवाद व प्रतिरोध ओढवला. तथापि, यामुळे कनेक्टिकटमधील डॅनबरी येथे समान मताच्या ख्रिश्चनांचा गट स्थापन होऊ शकला.a याच ठिकाणी १७७१ साली सॅन्डेमॅन यांचा मृत्यू झाला.
फॅरॅडे यांच्या धार्मिक समजुती
लहानग्या मायकलने आपल्या पालकांच्या सॅन्डेमेनियन शिकवणुकी आत्मसात केल्या. बायबलच्या शिकवणुकींचे पालन न करणाऱ्यांपासून सॅन्डेमेनियन लोक स्वतःस अलिप्त ठेवतात, हे तो शिकला. उदाहरणार्थ, ते अँग्लिकन लग्न सोहळ्यात सहभागी होण्यास नकार देत असत व त्यांचे स्वतःचे लग्न सोहळे देखील केवळ कायदेशीर आवश्यकतांपुरतेच मर्यादित ठेवत.
सरकारांना अधीनता तथापि, राजकारणात तटस्थता हे सॅन्डेमेनियन लोकांबद्दल वैशिष्ट्यपूर्ण होते. समाजात सहसा मानांकित लोक असले तरीसुद्धा ते क्वचितच मोठे हुद्दे स्वीकारीत होते. काही मोजक्या लोकांनी ते स्वीकारले तेव्हा त्यांनी पक्ष राजनिती मात्र टाळली. ही भूमिका राखल्यामुळे त्यांची मानहानी झाली. (पडताळा योहान १७:१४.) देवाचे स्वर्गीय राज्य, शासन करण्याच्या अनुषंगाने एक निर्दोष सरकारी व्यवस्था आहे या विचारास सॅन्डेमेनियन लोकांनी उंचावून धरले. त्यांच्या मते राजनिती, “व्यर्थ असून कोणतीही नैतिकता नसलेला एक स्वार्थांध खेळ होता,” असे कँटर सांगतात.
इतरांपासून अलिप्त राहूनही त्यांच्या अंगी परुशांसारखे मनोभाव नव्हते. त्यांनी घोषित केले: “शास्त्रवचनांनी ठरविले त्यापलीकडे जाऊन पाप किंवा कर्तव्ये ठरविण्याची व मानवी संप्रदायांना किंवा तर्कसंगत सबबींना प्राधान्य देऊन ईश्वरी आज्ञांना रद्द करण्याची, प्राचीन परुशांची प्रवृत्ती व प्रथा टाळणे हे अत्यंत आवश्यक आहे असे आम्ही समजतो.”
त्यांच्या सदस्यांपैकी कोणीही मद्यपी, वित्त हरण करणारा, जारकर्मी किंवा इतर गंभीर पापांत पडलेला असल्यास अशा माणसास बहिष्कृत करण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली. या पातक्याने खरा पश्चात्ताप केल्यास हे लोक त्यास परत आणण्याचे प्रयत्न करीत असत. अन्यथा, ते “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून” देण्याविषयीचा शास्त्रवचनीय हुकूम पाळत असत.—१ करिंथकर ५:५, ११, १३.
सॅन्डेमेनियन लोक रक्तापासून अलिप्त राहण्याविषयी बायबलमधील आज्ञेच्या अधीन होते. (प्रेषितांची कृत्ये १५:२९) जॉन ग्लॅस यांनी असा तर्क केला की देवाने पहिल्या मानवांना बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ न खाण्याची आज्ञा दिली होती व त्याच धर्तीवर रक्ताविषयीचा निर्बंधही पाळण्यास देवाचे लोक वचनबद्ध आहेत. (उत्पत्ति २:१६, १७) रक्ताविषयीच्या या आज्ञेचे उल्लंघन करणे हे ख्रिस्ताने वाहिलेल्या रक्ताच्या योग्य उपयोगाचा अर्थात पापापासून मुक्ततेचा अव्हेर करण्यासारखे होते. ग्लॅस यांचा निष्कर्ष असा होता की, “रक्ताचे सेवन करण्यासंबंधीचा निर्बंध हा पूर्वीपासूनच व आजही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.”
सॅन्डेमेनियन लोक शास्त्रवचनांवर युक्तिवाद करत असल्यामुळे त्यांना अनेक पाश टाळता आले. उदाहरणार्थ, करमणुकीच्या बाबतीत त्यांनी ख्रिस्ताच्या सुचनांतून मार्गदर्शन मिळविले. ते म्हणत, “ख्रिस्ताने ज्या बाबतीत नियम घालून दिले नाही त्या बाबतीत स्वतःच्या मनाने नियम बनविणे किंवा त्याने दिलेला कोणताही नियम रद्द करणे यांपैकी आपण काहीही करता कामा नये. यास्तव विरंगुळा, मग तो सार्वजनिक असो अथवा खासगी असो, त्यावर प्रतिबंध असल्याचे आम्हाला आढळले नसल्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने पापमय अशा परिस्थितींना न गोवणाऱ्या सर्व मनोरंजनास कायदेशीर लेखतो.”
अशा प्रकारे, सॅन्डेमेनियन लोकांनी शास्त्रवचनांवर यथार्थपणे आधारित असलेल्या अनेक समजुती उंचावून धरल्या; तरीसुद्धा खऱ्या ख्रिश्चनांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचे अर्थात इतरांना सुवार्ता सांगण्याच्या अत्यावश्यक कार्याचे महत्त्व मात्र त्यांनी पुरते ओळखले नव्हते. (मत्तय २४:१४) तथापि, त्यांच्या सभा सर्वांसाठी खुल्या होत्या व तेथे त्यांच्या आशेविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्याचा ते प्रयत्न करत असत.—१ पेत्र ३:१५.
विश्वासाच्या या नमुन्याने मायकल फॅरॅडे यांवर कोणता प्रभाव पाडला?
सॅन्डेमेनियन फॅरॅडे
उल्लेखनीय आविष्कारांसाठी लोकांकडून बहुमान, सत्कार व आदर यांस पात्र ठरलेल्या मायकल फॅरॅडे यांचे जीवन मात्र साधेसुधे होते. प्रसिद्ध लोकांचा मृत्यू झाल्यावर जनविख्यात व्यक्तिमत्त्वांकडून त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची अपेक्षा केली जात असे तेव्हा फॅरॅडे यांची अनुपस्थिती सर्वांना प्रकर्षाने जाणवत असे; तथापि, उपस्थित राहण्याकरवी चर्च ऑफ इंग्लंडच्या धार्मिक विधीत सहभागी होण्यास त्यांचा विवेक त्यांना संमती देत नसे.
शास्त्रज्ञ या नात्याने फॅरॅडे, अशाच गोष्टींना धरून राहिले, ज्यांची सत्यता सिद्ध करता येईल. याच कारणास्तव त्यांनी, गृहित अभिप्रायांना प्राधान्य देणाऱ्या व वादविषयांत पक्षपात करणाऱ्या विद्यासंपन्न पुरुषांशी जवळीक साधण्याचे टाळले. त्यांनी एकदा आपल्या श्रोत्यांना सांगितले होते त्यानुसार, ‘मूलभूत सत्य कधीही आपणांस निराश करत नाही, त्याचा पुरावा नेहमीच खरा असतो.’ विज्ञान हे ‘बारकाईने निरिक्षिलेल्या सत्यांवर’ अवलंबून आहे अशाप्रकारे त्यांनी त्याचे वर्णन केले. निसर्गाच्या मूळ शक्तींविषयी एक प्रस्तुती सादर केल्यावर शेवटी त्यांनी आपल्या श्रोत्यांना, ‘या शक्तींना घडवून आणणाऱ्याबद्दल’ विचार करण्याचे प्रोत्साहन दिले. मग त्यांनी ख्रिस्ती प्रेषित पौल याचे शब्द उद्धृत केले: “कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.”—रोमकर १:२०.
फॅरॅडे हे इतर असंख्य शास्त्रज्ञांपेक्षा वेगळे असण्याचे कारण म्हणजे देवाचे प्रेरित पुस्तक व निसर्गरूपी पुस्तक यांतून शिकून घेण्यास ते इच्छुक होते. “त्यांना आपल्या सॅन्डेमेनियन मतप्रणालीतून देवाच्या नैतिक कायद्यानुरूप व सार्वकालिक जीवनाची आशा बाळगून जीवन जगण्याचा मार्ग गवसला होता,” असे कँटर सांगतात. “विज्ञानाकरवी ते, देवाने विश्वाचे नियंत्रण करण्यासाठी ठरवलेल्या भौतिक सिद्धांताच्या संपर्कात आले.” फॅरॅडे यांचे असे मत होते की, “विज्ञानामुळे बायबलचा निर्विवाद अधिकार कमी होत नाही, पण विज्ञानाचा उपयोग खऱ्या ख्रिश्चन पद्धतीने केल्यास ते देवाच्या दुसऱ्या पुस्तकावर प्रकाश टाकू शकते.”
फॅरॅडे यांना इतर लोक देऊ इच्छित होते असे अनेक बहुमान त्यांनी विनयशीलपणे नाकारले. नाइटची पदवी मिळविण्याबद्दल त्यांनी सदोदित अनिच्छा व्यक्त केली. त्यांना ‘साधेसुधे श्रीयुत फॅरॅडे’ म्हणूनच राहायचे होते. वडील या नात्याने आपल्या कार्यहालचालींना त्यांनी आपला बहुतांश वेळ दिला, यात नॉरफोक येथे राहणाऱ्या समान मत असलेल्या सहविश्वासू जनांच्या लहान गटावर देखरेख करण्यासाठी नियमितपणे, राजधानी लंडनहून या खेड्यात प्रवास करणे समाविष्ट होते.
मायकल फॅरॅडे यांचे ऑगस्ट २५, १८६७ या दिवशी निधन झाले व त्यांना उत्तर लंडनमधील हायगेट कबरस्थानात दफन करण्यात आले. चरित्र लेखक जॉन थॉमस आपल्याला सांगतात की फॅरॅडे यांनी, “भावी पिढीला, पदार्थविज्ञानाच्या इतर कोणत्याही शास्त्रज्ञाने दिला नव्हता अशा निर्भेळ वैज्ञानिक उपलब्धींच्या मोठ्या संचयाचा जणू वारसा दिला; व त्यांच्या आविष्कारांच्या व्यावहारिक परिणामांमुळे सुसंस्कृत जीवनशैलीवर अतिशय प्रभाव पडला आहे.” त्यांच्या मृत्यूनंतर विधवा झालेली त्यांची पत्नी सारा, हिने लिहिले: “त्यांचा मार्गदर्शक व कायदा म्हणून मी केवळ नव्या कराराकडे बोट दाखवू शकते; कारण हे देवाचे वचन आहे . . . व हे लिहिण्यात आले होते त्या काळाप्रमाणे विद्यमान काळातील ख्रिश्चनांवर तेवढेच बंधनकारक आहे असे ते मानत होते”—आपल्या विश्वासानुरूप नेमस्तपणे जगलेल्या एका उच्चपदस्थ शास्त्रज्ञाविषयी खरोखर एक बोलकी साक्ष.
[तळटीपा]
a अमेरिकेत सॅन्डेमेनियन किंवा ग्लॅसाइट गटांपैकी शेवटल्या गटाचे अस्तित्व जास्तीतजास्त या शतकाच्या सुरवातीला संपुष्टात आले.
[२९ पानांवरील चौकट]
ब्रिटनच्या रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये नेमलेले प्राध्यापक या नात्याने मायकल फॅरॅडे यांनी लहान मुलांना समजेल अशा पद्धतीने विज्ञानाचा प्रसार केला. सहप्राध्यापकांना त्यांनी दिलेल्या सल्ल्यात अनेक व्यावहारिक सूचना आहेत व सार्वजनिक शिक्षण देणाऱ्या आधुनिक दिवसाच्या ख्रिश्चनांनी या सूचना विचारात घेतल्यास त्यांना लाभ होईल.
◻ “बोलणे हे जलद व घाईघाईचे असू नये कारण परिणामी ते अर्थहीन बनते, उलटपक्षी ते सावकाश व विचारशील असावे.”
◻ वक्त्याने “व्याख्यानाच्या सुरवातीला,” श्रोत्यांची उत्सुकता वाढवावी, “व कळत नकळत क्रमवारपणे त्यांच्या नजरेत येणार नाही अशा सफाईने, विषयाला आवश्यक आहे तोवर ही उत्सुकता जागृत ठेवावी.”
◻ “व्याख्यान देणारा हा टाळ्या किंवा वाहवा मिळावी अशी मागणी करण्याइतपत खालच्या पातळीवर जातो तेव्हा त्याच्या चरित्राची माननीयता अगदी रसातळाला जाते.”
◻ लेखी रूपरेषेच्या उपयोगासंबंधाने: “कागदावर [विषयाचा] आराखडा तयार करून, एकेक मुद्दा आठवून एकतर त्यांचा संबंध जोडून नाहीतर दुसऱ्या प्रकारे त्यांतील रिक्त भाग भरून काढणे, हीच माझी नेहमीची पद्धत आहे. . . . माझ्याजवळ लहानमोठ्या शीर्षकांची क्रमवार यादी असते व यावरून मी आपले विषयांवर विश्लेषण मांडतो.”