वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ४/१५ पृ. २८-२९
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • “आपसात क्षमा करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मनापासून क्षमा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • क्षमाशील का असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवाप्रमाणे तुम्ही क्षमा करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ४/१५ पृ. २८-२९

वाचकांचे प्रश्‍न

येशूने म्हटले: “ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.” ख्रिश्‍चनांना पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे असा या शब्दांचा अर्थ होतो का?

सर्वसामान्य ख्रिश्‍चनांना किंवा मंडळीतील नियुक्‍त वडिलांनाही पापांची क्षमा करण्याचा ईश्‍वरी अधिकार आहे, अशा निष्कर्षास पोहंचण्याकरिता कोणताही शास्त्रवचनीय आधार नाही. तरीसुद्धा, वर उल्लेख केलेल्या योहान २०:२३ मध्ये येशूने त्याच्या शिष्यांना जे काही म्हटले, त्यावरून देवाने या संदर्भात प्रेषितांना काही खास अधिकार दिल्याचे सूचित होते. येशूच्या तेथील विधानाचा संबंध, मत्तय १८:१८ मध्ये स्वर्गीय निर्णयांबद्दल त्याने जे काही म्हटले त्याच्याशी असावा.

इफिसकर ४:३२ मध्ये नमूद केलेला प्रेषित पौलाचा सल्ला, जेथे “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा,” असे म्हटले आहे त्याच्या सहमतात ख्रिस्ती काही विशिष्ट अपराधांची क्षमा करू शकतात. या ठिकाणी पौल, ख्रिश्‍चनांमधील अविचारी भाषणासारख्या वैयक्‍तिक समस्यांबाबत बोलत होता. त्यांनी एकमेकांना क्षमा करून या समस्या मिटवण्याकरता झटावे. “ह्‍यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर,” येशूच्या या शब्दांचे स्मरण करा.—मत्तय ५:२३, २४; १ पेत्र ४:८.

तथापि, येशूने त्याच्या खास श्रोत्यांना आणखी जे काही सांगितले त्यावरून तो अधिक गंभीर पापांचा उल्लेख करत होता, हे योहान २०:२३ च्या संदर्भावरून सूचित होते. याचे कारण आपण पाहू या.

येशूचे ज्या दिवशी पुनरुत्थान झाले त्या दिवशी जेरूसलेममधील एका बंद कोठडीत त्याने शिष्यांना दर्शन दिले. वृत्तान्त असे सांगतो: “येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांति असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीहि तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा; ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.”—योहान २०:२१-२३.

बहुधा, उल्लेखिले शिष्य प्रामुख्याने विश्‍वासू प्रेषित होते. (वचन २४ पडताळा.) येशूने त्यांच्यावर फुंकर टाकून “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा,” असे म्हणून, लवकरच त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव केला जाईल अशी सांकेतिकरित्या येशूने त्यांना सूचना दिली. आणखी पुढे, येशूने त्यांना पापांची क्षमा करण्याचा अधिकार असेल असे म्हटले. यथायोग्यपणे, त्याच्या दोन्ही विधानांमध्ये सांगड असून एक विधान दुसऱ्‍याकडे अंगुलीनिर्देश करते.

येशूने त्याच्या पुनरुत्थानाच्या पन्‍नासाव्या दिवसांनंतर पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचा वर्षाव केला. त्यामुळे काय साध्य झाले? एक म्हणजे, ज्यांना आत्मा प्राप्त झाला ते ख्रिस्ताबरोबर स्वर्गात सहराजे होण्याच्या आशेने देवाचे आध्यात्मिक पुत्र या नात्याने नव्याने जन्मले. (योहान ३:३-५; रोमकर ८:१५-१७; २ करिंथकर १:२२) परंतु, आत्म्याच्या त्या वर्षावामुळे आणखी पुष्कळ काही साध्य झाले. आत्मा प्राप्त झालेल्यांना चमत्कारिक सामर्थ्य प्राप्त झाले. त्याच्यायोगे काहीजण, त्यांना अवगत नसलेल्या अन्य भाषा बोलू लागले. इतर जण भविष्य कथन करू शकत होते. तर आणखी इतर काहीजण रोग बरे करू शकत होते किंवा मृतांना उठवू शकत होते.—१ करिंथकर १२:४-११.

येशूचे योहान २०:२२ मधील शब्द, शिष्यांवरील पवित्र आत्म्याच्या या वर्षावाकडे निर्देशित करत असल्यामुळे पापांची क्षमा करण्याबद्दलच्या त्याच्या संबंधित शब्दांचा अर्थ, प्रेषितांना आत्म्याच्या कार्यहालचालीद्वारे पापांची क्षमा करण्याचा किंवा न करण्याचा अद्वितीय अधिकार ईश्‍वरीरित्या देण्यात आला, असा होतो.—पाहा वॉचटावर, मार्च १, १९४९, पृष्ठ ७८.

प्रेषितांनी या अधिकाराचा उपयोग केला याच्या प्रत्येक प्रसंगाचा समग्र अहवाल बायबल आपल्याला देत नसले, तरी अन्य भाषा बोलण्यास, भविष्य सांगण्यास किंवा निरोगी करण्यास चमत्कारिक कृपादानांचा त्यांनी उपयोग केला असेल त्या प्रत्येक घटनेची नोंद देखील बायबल करत नाही.—२ करिंथकर १२:१२; गलतीकर ३:५; इब्री लोकांस २:४.

पापांची क्षमा करण्याचा किंवा न करण्याचा अधिकार समाविष्ट असलेली एक घटना म्हणजे पवित्र आत्म्याशी लबाडी करणाऱ्‍या हनन्या व सप्पीरा यांच्याविषयी होती. आपल्याला वाचावयास मिळणारे योहान २०:२०, २३ मधील येशूचे उद्‌गारलेले शब्द ऐकणाऱ्‍या पेत्राने, हनन्या व सप्पीराच्या कृत्याचा गौप्यस्फोट केला. पेत्र प्रथम हनन्यासउद्देशून बोलला जो जागच्या जागीच मरण पावला. नंतर, जेव्हा सप्पीरा आली व तिनेही लबाडीला पुष्टी दिली तेव्हा पेत्राने सप्पीरावरचा न्यायनिर्णय घोषित केला. पेत्राने तिच्या पापाची क्षमा केली नाही तर उलट म्हटले: “पाहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्‍याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत; ते तुलाहि उचलून बाहेर नेतील.” तिचादेखील जागच्या जागीच मृत्यू झाला.—प्रेषितांची कृत्ये ५:१-११.

या घटनेत, प्रेषित पेत्राने पापाची क्षमा करण्यासंबंधी निश्‍चित नकार व्यक्‍त करण्याकरिता एका खास अधिकाराचा, म्हणजे हनन्या व सप्पीराच्या पापाची देव कदापि क्षमा करणार नाही, या अद्‌भूत ज्ञानाचा उपयोग केला. ज्या घटनांमध्ये ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधारावर पापांची क्षमा झाल्याची खात्री प्रेषितांना पटली होती त्या घटनांमध्ये त्यांना अतिमानुष सुक्ष्म दृष्टी होती असेही दिसून येते. अशा प्रकारे, आत्म्याने सामर्थ्यवान झालेले प्रेषित पापांची क्षमा करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय जाहीर करू शकत होते.a

आत्म्याने अभिषिक्‍त झालेल्या त्या काळच्या सर्व वडिलांना अशा प्रकारचा चमत्कारिक अधिकार होता, असा याचा अर्थ होत नाही. करिंथ मंडळीतून बहिष्कृत केलेल्या मनुष्याबद्दल प्रेषित पौलाने जे काही म्हटले त्यावरून हे स्पष्ट होते. ‘मी त्या मनुष्याच्या पापांची क्षमा करतो’ किंवा ‘त्या मनुष्याच्या पापांची स्वर्गात क्षमा झाली असल्याचे मला माहीत आहे म्हणून त्याचा परत स्वीकार करा,’ असे उद्‌गार पौलाने काढले नाहीत. याउलट, पौलाने संपूर्ण मंडळीस, पुनःस्वीकार केलेल्या या ख्रिस्ती व्यक्‍तीला क्षमा करावयास व त्याच्याप्रती प्रीती प्रदर्शित करावयास आर्जविले. पौलाने आणखी पुढे असे म्हटले: “ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करिता त्याला त्याबाबत मीहि क्षमा करितो.”—२ करिंथकर २:५-११.

एकदा त्या मनुष्याचा मंडळीत पुनःस्वीकार करण्यात आला, तर मग त्याने जे काही केले होते त्याविषयी अढी न बाळगल्याने सर्व ख्रिस्ती बंधू आणि भगिनी, या अर्थाने त्याला क्षमा करू शकतात. परंतु, प्रथम त्याने पश्‍चात्ताप केला पाहिजे व त्याचा पुनःस्वीकार करण्यात आला पाहिजे. हे कसे घडेल बरे?

मंडळीतील वडिलांना, चोरी, लबाडी किंवा घोर अनैतिकता यांसारखी गंभीर पातके हाताळावी लागतात. ते अशा प्रकारचे पातक करणाऱ्‍यांस सुधारण्याचा व त्यांची कानउघाडणी करण्याचा प्रयत्न करून त्यांस पश्‍चात्ताप करण्याकरिता प्रवृत्त करतात. जर एखादा, अपश्‍चात्तापीपणे घोर पातक करतच असेल तर मग हे वडील त्या पातक्यास बहिष्कृत करण्याचे ईश्‍वरी मार्गदर्शन लागू करतात. (१ करिंथकर ५:१-५, ११-१३) येशूने, योहान २०:२३ मध्ये जे काही म्हटले ते अशा बाबतींत लागू होत नाही. या वडिलांकडे, शारीरिकरित्या आजारी असणाऱ्‍यांना बरे करण्याची किंवा मृतांना उठवण्याची क्षमता, यांसारखी चमत्कारिक कृपादाने नाहीत; या कृपादानांनी त्यांचा उद्देश पहिल्या शतकात साध्य केला व नंतर ती संपुष्टात आली. (१ करिंथकर १३:८-१०) यापेक्षा अधिक म्हणजे वडिलांना, एखादे घोर पातक करणाऱ्‍यांस तो यहोवाच्या नजरेत शुद्ध आहे असे घोषित करून, गंभीर पातकाची क्षमा करण्याचा अधिकार मिळालेला नाही. अशा प्रकारची क्षमा खंडणी बलिदानावरच आधारित असावी व त्या आधारावर केवळ यहोवाला क्षमा करण्याचा अधिकार आहे.—स्तोत्र ३२:५; मत्तय ६:९, १२; १ योहान १:९.

प्राचीन करिंथमधील त्या मनुष्याच्या बाबतीत घडले त्याप्रमाणे जर गंभीर पातक करणारा पश्‍चात्ताप करण्यास नकार देत असेल तर त्यास बहिष्कृत करणे भागच आहे. त्याने जर नंतर पश्‍चात्ताप करून पश्‍चात्तापास योग्य असणारे कार्य केले, तर मग ईश्‍वरी क्षमा शक्य आहे. (प्रेषितांची कृत्ये २६:२०) अशा परिस्थितीत शास्त्रवचने, यहोवाने चूक करणाऱ्‍याची खरोखर क्षमा केली आहे, असा विश्‍वास ठेवण्याकरता कारण पुरवतात. मग एकदा त्या व्यक्‍तीचा पुनःस्वीकार करण्यात आल्यावर विश्‍वासात खंभीर होण्याकरिता ते आध्यात्मिकरित्या त्याची मदत करू शकतात. करिंथ मंडळीतील ख्रिश्‍चनांनी ज्याप्रमाणे पुनःस्वीकार केलेल्या बहिष्कृत मनुष्यास क्षमा केली त्याचप्रमाणे मंडळीतील इतर जण क्षमा करू शकतात.

अशा प्रकारे गोष्टी हाताळल्याने, वडिलजण न्यायाबद्दल स्वतःचेच दर्जे बनवत नाहीत. ते बायबलच्या तत्त्वांचा अवलंब करतात व यहोवाने घालून दिलेल्या कार्यपद्धतीचे काळजीपूर्वक पालन करतात. यास्तव, वडिलांचे क्षमा करणे किंवा न करणे हे मत्तय १८:१८ मध्ये नमूद केलेल्या येशूच्या या शब्दांप्रमाणे असेल: “मी तुम्हास खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल.” बायबलमध्ये दाखवून दिल्याप्रमाणे त्यांची कार्ये, याविषयी केवळ यहोवाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतील.

यास्तव, योहान २०:२३ मध्ये नमूद केल्यानुसार येशूने जे काही सांगितले होते ते उर्वरित शास्त्रवचनांच्या परस्पर विरोधात नसून ख्रिस्ती मंडळीच्या सुरवातीच्या काळातील प्रेषितांच्या खास भूमिकेच्या सुसंगतेत त्यांना क्षमा करण्यासंबंधी खास अधिकार असल्याचे सूचित करते.

[तळटीपा]

a येशूला त्याच्या मृत्यूआधी व खंडणी देण्याआधीच, एखाद्याच्या पापांची क्षमा झाली आहे असे जाहीर करण्याचा अधिकार होता.—मत्तय ९:२-६; जून १, १९९५ चे टेहळणीबुरूज यात “वाचकांचे प्रश्‍न” पडताळा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा