यहोवाच्या आशीर्वादाने विस्तार
यहोवा देवाने, त्याच्या साक्षीदारांच्या ब्रुकलिन न्यूयॉर्क येथील जागतिक मुख्यालयातील विस्तारावर खरोखर आशीर्वाद दिला आहे या गोष्टीवर सप्टेंबर १८, १९९५ रोजी संध्याकाळी संपन्न झालेल्या एका समर्पण कार्यक्रमाने जोर दिला.
हा समर्पण कार्यक्रम ६,००० पेक्षा अधिक लोकांनी ऐकला. हे लोक, कार्यक्रम संपन्न झाला तेथे म्हणजेच ब्रुकलिन तसेच पॅटरसन व वॉल्किल, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या विस्तीर्ण सुविधा आणि कॅनडातील टोरोन्टोच्या जवळचे त्यांचे शाखा दफ्तर, अशा इतर ठिकाणीही एकत्रित झाले. ब्रुकलिन व्यतिरिक्त इतर ठिकाणी हा कार्यक्रम दूरध्वनी सहक्षेपण जाळ्याद्वारे ऐकण्यात आला.
उल्हासदायक कार्यक्रम
हा कार्यक्रम ऐकणारे लोक, अर्थात बेथेल सदस्य या नावाने संबोधण्यात येणारे स्वेच्छिक कर्मचारी, १६,४०० पेक्षा अधिक सदस्यांनी बनलेल्या जागतिक बेथेल कुटुंबाचा एक मोठा भाग होते. असे सदस्य जवळजवळ शंभर देशांत सेवा करतात, जेथे ते यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरातील ७८,६०० पेक्षा अधिक मंडळ्यांसाठी बायबल साहित्याचे मुद्रण करतात व सहायक सेवा पुरवतात.
समर्पणाचा कार्यक्रम जेव्हा संध्याकाळी ६:३० वाजता गीत व त्यानंतर कार्ल क्लीइन यांच्या प्रार्थनेद्वारे सुरू झाला, तेव्हा तर उत्कंठा शिगेस पोहचंली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष, लॉयड बॅरी यांनी या प्रसंगाच्या महत्त्वाबद्दल त्रोटक विवेचने देऊन सर्वांचे हार्दिक स्वागत केले. ॲल्बर्ट श्रोडर यांनी आठवड्याच्या टेहळणीबुरूज पाठाची उजळणी केली व यानंतर डॅनिएल सिड्लीक “बेथेलमधील आमची पवित्र सेवा” या विषयावर जवळजवळ १५ मिनिटे बोलले. कार्यक्रमातील हे सर्व सुरवातीचे वक्ते, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य होते.
कार्यक्रमातील पुढील दोन भाग—“आपल्या वाढत्या निवासाच्या गरजा पूर्ण करणे, १९७४-१९९५,” व “ब्रुकलिनमधील बेथेल दुरुस्ती व नविनीकरण बांधकामाचे मुख्य अंश”—यांत समर्पित करण्यात आलेल्या इमारतींचे बांधकाम व त्यांच्या खरेदीसंबंधीचे विशेष मुद्दे सादर करण्यात आले. या विवेचनांनी, अलीकडेच पूर्ण करण्यात आलेल्या निवास इमारतीकडे लक्ष केंद्रित केले जेथे सध्या जवळजवळ एक हजार बेथेल सदस्य राहात आहेत. हे ९० सॅन्ड्स स्ट्रीट वरील ११५-मीटर-उंच निवास गृह, मुद्रण कारखाना संकुलाच्या शेजारी आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीचे अध्यक्ष, मिल्टन हेन्शेल यांचे समर्पणाचे भाषण. त्यांनी, यहोवाच्या सेवेत उपयोगात आणण्यासाठी इमारतींच्या समर्पणाच्या बायबलमधील प्राचीन काळातील उदाहरणांवर जोर दिला. शेवटी एक गीत गाऊन, नियमन मंडळाचेच सदस्य असलेल्या कॅरी बार्बर यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. पण कार्यक्रमाचे काही मुख्य अंश कोणते होते?
समर्पण करण्यात आलेल्या इमारती
मे २, १९६९ या तारखेला ब्रुकलिनमध्ये एका बेथेल निवास गृहाचे समर्पण झाले तेव्हापासून आजपावेतो आणखी १७ निवास गृहे बांधण्यात आली असल्याचे बेथेल गृह पर्यवेक्षक, जॉर्ज काउच यांनी स्पष्ट केले.a ही एकतर नवीन बांधलेली निवास गृहे होती नाहीतर खरेदी करून नविनीकरण केलेल्या इमारती होत्या. १९४० च्या दशकात विकत घेतलेल्या दोन लहान इमारती ज्यांचे बेथेल निवास गृहांत रुपांतर झाले होते व त्याशिवाय, यहोवाच्या साक्षीदारांच्या एक्झिक्युटिव्ह दफ्तरांचे मार्च १५, १९८२ रोजी समर्पण झाल्यापासून, आतापर्यंत बांधण्यात किंवा विकत घेण्यात आलेल्या कारखाना व दफ्तरांच्या सुविधा इमारती, अशा एकूण १७ निवास गृहांचे खरे तर हे समर्पण होते.b
समर्पित करण्यात आलेल्या इमारतींपैकी, ३६० फर्मन स्ट्रीट येथे असलेली इमारत सर्वात मोठी आहे. मुळात १९२८ या वर्षी बांधलेली ही इमारत यहोवाच्या साक्षीदारांनी मार्च १५, १९८३ रोजी विकत घेऊन तिचे संपूर्ण नविनीकरण केले. त्या ठिकाणी ९३,००० चौरस मीटर किंवा २३ एकर इतकी जमीन आहे. समर्पणात समाविष्ट करण्यात आलेल्या इतर इमारतींत, १७५ पर्ल स्ट्रीट येथील कारखाना आहे व अलीकडील वर्षांत बांधण्यात आलेले अनेक मोठे गॅरेज पण आहेत.
अधिक निवास व्यवस्थेची गरज का आहे?
यापूर्वी १९६९ मध्ये जेव्हा ब्रुकलिन बेथेलची निवास इमारत समर्पित करण्यात आली होती, तेव्हा जगभरात देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविणाऱ्या साक्षीदारांचा १३,३६,११२ एवढा उच्चांक होता. परंतु १९९५ मध्ये ही संख्या ५१,९९,८९५ होती, पूर्वीच्या संख्येच्या साडेतीन पटीने अधिक! अशा प्रकारे बायबल साहित्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, ब्रुकलिन बेथेल कुटुंब १९६९ मधील १,०४२ नियमित सदस्यांपासून वाढून आता ३,३६० पेक्षा अधिक झाले आहे व हे सदस्य सध्या २२ निवास गृहांत राहतात!
अधिक निवास व्यवस्थेची गरज, १९७४ ते १९९५ पर्यंत कशी पूर्ण करण्यात आली याबद्दल जॉर्ज काउच यांनी चर्चा केली. उदाहरणार्थ, वाढत्या बेथेल कुटुंबाला सामावून घेण्याच्या उद्देशाने १९७० च्या दशकातील सुरवातीच्या वर्षांत यहोवाच्या साक्षीदारांनी जवळच असलेल्या टावर्स हॉटेलाचे अनेक मजले भाड्याने घेतले होते. सन १९७३ च्या डिसेंबर महिन्यात, वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष नेथन नॉर यांनी बेथेल कार्यालय तसेच टावर्सच्या व्यवस्थापन मंडळाला लिहून, संस्थेने ‘ऑक्टोबर १, १९७४ पर्यंत टावर्स हॉटेल सोडण्याचे’ ठरविले असल्याचे कळविले.
बंधू काउच यांनी आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसल्याचे सांगितले कारण टावर्स येथे राहणाऱ्या बेथेल सदस्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यास इतर ठिकाणी सोयच नव्हती. टावर्सच्या व्यवस्थापन मंडळाला देखील धक्का बसला कारण त्यांचे कायदेशीर कर्ज भरण्यासाठी ते संस्थेच्या पैशावर अवलंबून होते. परिणामी, टावर्सच्या व्यवस्थापन मंडळाने यहोवाच्या साक्षीदारांना ते हॉटेल विकत घेण्याचा आग्रह केला. ते म्हणाले, “आम्ही या परिसरात आहोत तेव्हापासून तुमची संख्या वाढतच गेली आहे, तुम्हाला या इमारतीची गरज आहे.”
संस्थेच्या प्रतिनिधींनी उत्तर दिले, “पण त्यात तर इतर अनेक भाडेकरू देखील आहेत, आम्ही ते विकत घेतल्यास आम्हाला तेथे केवळ आमच्या लोकांना ठेवायला आवडेल.”
टावर्सच्या व्यवस्थापन मंडळाने वचन देऊन म्हटले, “आम्ही तुमच्यासाठी ते रिकामे करू.” यानंतर लवकरच यहोवाच्या साक्षीदारांनी टावर्स इमारत वाजवी किंमतीत विकत घेतली. काउच यांनी तल्लीन होऊन ऐकत असलेल्या श्रोत्यांना विचारले, “बंधू नॉर यांनी ते पत्र का लिहिले? कदाचित, त्यांना स्वतःला देखील माहीत नव्हते, पण वॉच टावर सोसायटीने टावर्स हॉटेल विकत घेतले याला नेमके तेच पत्र कारणीभूत ठरले.”
मूळ बेथेल गृहाच्या समोरील रस्त्यावर, पूर्वी ज्या ठिकाणी सुविख्यात मार्गरेट हॉटेल होते, तेथील ९७, कोलंबिया हाइट्स इमारत यहोवाच्या साक्षीदारांनी कशी विकत घेतली याचे देखील वक्त्याने वर्णन केले. हे ठिकाण अगदी सोयीचे आहे कारण त्यास भुयारी मार्गाने बेथेल इमारतींच्या संकुलासोबत सहज जोडले जाऊ शकत होते. फेब्रुवारी १९८० मध्ये या इमारतीची पुनर्रचना करण्याचे काम सुरू असताना तिला आग लागली. त्यानंतर त्या इमारतीच्या मालकाला त्या ठिकाणी नवीन इमारत उभी करणे शक्य न झाल्यामुळे त्याने ती जागा यहोवाच्या साक्षीदारांना विकली.
बंधू काउच यांनी सांगितले: “या इमारतींपैकी अक्षरशः प्रत्येक इमारतीचा काही न काही रोचक इतिहास आहे जो एक गोष्ट अगदी स्पष्ट करतो—की ती विशिष्ट इमारत प्राप्त करण्यासाठी यहोवानेच दृश्य संघटनेला मार्गदर्शन दिले.”
नव्वद सॅन्ड्स मागील इतिहास
सर्वात नवीन व मोठे निवास गृह ९० सॅन्ड्स स्ट्रीट हे आहे. डिसेंबर १९८६ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी ही जागा विकत घेतली तेव्हा, तेथे १६० जे स्ट्रीट येथे एक मोठा कारखाना होता.c हा कारखाना पाडण्यात आला व या ठिकाणी ३० मजली निवास इमारत बांधण्याचा परवाना मिळाला असल्याचे ऑगस्ट ३०, १९९० रोजी बेथेल कुटुंबास सांगण्यात आले.
नियमन मंडळाचे सदस्य थियोडोर झरॅक यांनी घेतलेल्या मुलाखतीत संस्थेच्या ब्रुकलिन कारखान्याचे पर्यवेक्षक मॅक्स लार्सन यांनी, ९० सॅन्ड्स स्ट्रीट निवासाचे बांधकाम करण्यास कशाप्रकारे परवाना देण्यात आला याचे वर्णन केले. बंधू लार्सन यांनी सांगितले, की तेव्हा १९६५ मध्ये जे घडले ते निर्णायक होते.
त्या वेळी संस्थेला आपल्या इतर कारखान्यांजवळील जागेवर दहा-मजली कारखाना बांधण्याची इच्छा होती पण त्या जागेच्या झोनिंगप्रमाणे तेथे केवळ दोन-मजली बांधकाम करण्याची परवानगी होती. एक आर्किटेक्ट या अलीकडेच योजलेल्या कारखान्यासाठी बांधकामाचे आराखडे बनविण्यास तयार झाला, मात्र तो म्हणाला: “हे आराखडे बोर्डाला सादर करून मी माझी फजिती करून घेणार नाही.” या जागेसाठी बोर्ड ऑफ स्टॅन्डर्ड्स ॲन्ड अपील्स त्यांचे झोनिंगचे कायदे कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही हे त्याला पक्के ठाऊक होते. बांधकामाच्या आराखड्यांना स्वीकृती मिळाली तेव्हा तो आश्चर्याने म्हणाला: “हे झालेच कसे!”
लार्सन पुढे सांगतात त्याप्रमाणे, त्याचे कारण असे होते, की आपल्या दहा-मजली कारखान्यासाठी या गट क्षेत्राचे रीझोनिंग करण्यात आले होते तेव्हा १६० जे स्ट्रीट इमारत असलेल्या गट क्षेत्रासहित जवळच्या काही इतर गट क्षेत्रांचेही रीझोनिंग करण्यात आले. आश्चर्य म्हणजे या गट क्षेत्राच्या रीझोनिंग अंतर्गत त्या जागेवर हॉटेल बांधण्याची परवानगी देण्यात आली. परंतु, लार्सन यांनी सांगितले, की याची कोणीही कधीच दखल घेतली नाही—निदान या घटनेच्या २५ वर्षांनंतर आपण नवीन बेथेल गृह बांधण्यासाठी जागा शोधू लागलो होतो, तोपर्यंत तरी कोणाचेही याकडे लक्ष गेलेले नव्हते. मग, हा झोनिंग कायदा पुन्हा उजेडात आला!
बंधू लार्सन यांनी काय घडले याचे वर्णन करताना म्हटले: “आम्ही आमच्या ३०-मजली निवास गृहाचे आराखडे तयार करून ते बांधकाम खात्याकडे नेले तेव्हा आम्हाला सांगण्यात आले: ‘तुम्हाला तेथे निवास गृह बांधता येणार नाही. ते पूर्णपणे औद्योगिक क्षेत्र आहे व ते लोक तुमच्यासाठी झोनिंग बदलणार नाहीत.’
“आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले, ‘त्यांना बदलण्याची काही गरजच नाही. त्या गट क्षेत्राचे आधीच एका हॉटेलसाठी झोनिंग झालेले आहे.’ त्यांनी अहवाल तपासून पाहिले तेव्हा त्यांना विश्वासच बसेना!” शेवटी लार्सन म्हणाले, “तर मग अशा रितीने आम्हाला आपली ३०-मजली इमारत मिळाली.”
यहोवाच्या आशीर्वादाचा पुरावा
बायबलमधील एका स्तोत्रकर्त्याने लिहिले: “परमेश्वर [यहोवा, NW] जर घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत.” (स्तोत्र १२७:१) येशूने त्याच्या अनुयायांना आज्ञापिलेल्या जागतिक प्रचाराच्या व शिक्षण देण्याच्या कार्याला हातभार लावणाऱ्या बांधकामाच्या हालचालींवर यहोवाचा आशीर्वाद राहिला आहे हे स्पष्टपणे दिसून येते.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.
यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात घडून येत असलेल्या विस्तारावर यहोवाच्या भरपूर आशीर्वादाचा पुरावा पाहून, सप्टेंबर १८, १९९५ चा कार्यक्रम ऐकण्याची सुसंधी प्राप्त झालेले लोक हर्षित झाले. यहोवाचे लोक त्याच्या आज्ञेप्रमाणे आचरण करीत असताना त्याच्या अविरत आशीर्वादांविषयी आश्वासित राहू शकतात.
[तळटीपा]
a टेहळणीबुरूज, जून १५, १९६९ (इंग्रजी) पृष्ठे ३७९-८२.
b टेहळणीबुरूज, डिसेंबर १, १९८२ (इंग्रजी) पृष्ठे २३-३१.
c सावध राहा! डिसेंबर २२, १९८७ चा अंक (इंग्रजी), पृष्ठे १६-१८.
[२३-२६ पानांवरील चित्रं]
समर्पित करण्यात आलेली अतिरिक्त निवास गृहे
९० सॅन्ड्स स्ट्रीट १९९५
९७ कोलंबिया हाइट्स १९८६
बॉसर्ट हॉटेल, ९८ मॉन्टेग्यू स्ट्रीट १९८३
३४ ऑरेन्ज स्ट्रीट १९४५
स्टॅन्डिश हॉटेल, १६९ कोलंबिया हाइट्स १९८१
६७ लिविंगस्टन स्ट्रीट १९८९
१०८ जरॉलमन स्ट्रीट १९८८
टावर्स हॉटेल, ७९-९९ विल्लो स्ट्रीट १९७५
[६ पानांवरील चित्रं]
१७५ पर्ल स्ट्रीट १९८३
६९ ॲडम्स स्ट्रीट १९९१
३६० फर्मन स्ट्रीट १९८३