वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १०/१५ पृ. १२-१७
  • मनापासून क्षमा करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मनापासून क्षमा करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सर्वांनाच क्षमा करण्यात आली आहे
  • क्षमाशील होण्याकरता प्रयत्नांची गरज
  • शांती राखा—क्षमा करा
  • “आपसात क्षमा करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • एकमेकांना मनापासून क्षमा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • क्षमाशील का असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवाप्रमाणे तुम्ही क्षमा करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १०/१५ पृ. १२-१७

मनापासून क्षमा करा

“जर तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताहि त्याप्रमाणेच तुमचे करील.”—मत्तय १८:३५.

१, २. (अ) पापी म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या एका स्त्रीने येशूची कशी कदर केली? (ब) प्रतिक्रिया व्यक्‍त करताना येशूने कोणता मुद्दा स्पष्ट केला?

तीकदाचित वेश्‍या असावी, आणि खरे तर तिने धार्मिक व्यक्‍तीच्या घरी पाऊल देखील ठेवायला नको होते. ती घरात आली तेव्हा सर्वांना धक्काच बसला, पण त्यानंतर तिने जे केले ते पाहून तर सर्व जण स्तब्ध झाले. अतिशय उच्च धार्मिक दर्जांनुरूप चालणाऱ्‍या व्यक्‍तीपाशी ती आली आणि त्याच्या सेवेची आपण किती कदर करतो हे दाखवण्याकरता तिने आपल्या अश्रूंनी त्याचे पाय धुतले आणि त्यानंतर स्वतःच्या केसांनी ते पुसले.

२ ‘गावातील ही कोणीएक पापी स्त्री’ आहे असे समजून त्या मनुष्याने, येशूने तिला झिडकारले नाही. ज्या घरात हा प्रसंग घडला ते घर शिमोन या परूश्‍याचे होते, ती स्त्री पापी आहे या विचाराने तो मात्र अस्वस्थ झाला होता. तेव्हा येशूने सावकाराच्या दोन कर्जदारांचा दृष्टान्त सांगितला. त्यांपैकी एकाने सावकाराकडून खूप मोठी रक्कम घेतली होती—मजुराच्या दोन वर्षांच्या मजुरीइतकी. दुसऱ्‍याने पहिल्याच्या एक दशांश रक्कम कर्जाच्या स्वरूपात सावकाराकडून घेतली होती—मजुराच्या तीन महिन्यांच्या मजुरीपेक्षा कमी. या दोन्ही कर्जदारांना सावकाराचे कर्ज फेडता आले नाही तेव्हा त्याने “त्या दोघांस ते सोडले.” दोघांपैकी ज्याचे जास्त कर्ज माफ झाले तो सावकारावर अधिक प्रेम करील हे स्पष्टच आहे. येशूने या दृष्टान्ताशी त्या स्त्रीच्या प्रेमळ कृत्याचा कसा संबंध आहे हे दाखवून दिल्यानंतर एक तत्त्व सांगितले: “ज्याला थोडक्याची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीति करितो.” त्यानंतर त्याने त्या स्त्रीला म्हटले: “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”—लूक ७:३६-४८.

३. आपण स्वतःविषयी कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत?

३ स्वतःला विचारा, ‘मी त्या स्त्रीच्या ठिकाणी असतो किंवा त्यासारख्या परिस्थितीत असतो आणि माझ्यावर दया करण्यात आली असती तर इतरांना क्षमा करण्याची वेळ आल्यावर मी कठोर आणि अक्षमाशील वृत्ती दाखवली असती का?’ तुम्ही उत्तर द्याल, ‘मुळीच नाही!’ पण, आपण क्षमाशील वृत्तीचे आहोत असे तुम्हाला खरोखरच वाटते का? क्षमा करणे तुमच्या स्वभावातच आहे का? तुम्ही बहुतेक वेळा काही आढेवेढे न घेता लोकांना क्षमा केल्याचे तुम्हाला आठवते का आणि तुम्ही क्षमाशील आहात असे लोक मानतात का? याबाबतीत प्रत्येकाने प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करणे का आवश्‍यक आहे हे आपण पाहू.

सर्वांनाच क्षमा करण्यात आली आहे

४. आपण स्वतःविषयी कोणती गोष्ट मान्य केली पाहिजे?

४ तुम्हाला हे माहीतच आहे, की तुम्ही अपरिपूर्ण आहात. कोणी विचारले तर तुम्ही हे कबूलही कराल; कदाचित त्याक्षणी तुम्हाला १ योहान १:८ येथील शब्द आठवतील: “आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवितो, व आपल्या ठायी सत्य नाही.” (रोमकर ३:२३; ५:१२) काहींच्या हातून तर गंभीर, भयंकर पाप घडले आहेत. पण तुमच्याकडून असे पाप घडले नसतील तरीसुद्धा अशा बऱ्‍याच गोष्टी आहेत ज्यांत तुम्ही कित्येकदा देवाच्या दर्जांनुसार चालण्यात कमी पडता, दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास तुम्ही पाप करता. नाही का?

५. आपण का देवाचे कृतज्ञ असले पाहिजे?

५ यामुळे तुमची परिस्थिती देखील प्रेषित पौलाने सांगितल्याप्रमाणे असेल: “जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हास ज्याने त्याच्याबरोबर [येशूबरोबर] जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली.” (कलस्सैकर २:१३; इफिसकर २:१-३) “आपल्या सर्व अपराधांची क्षमा” या वाक्यांशाकडे लक्ष द्या. यामध्ये खूप काही समाविष्ट आहे. दावीदाप्रमाणे आपण प्रत्येकाने खरे तर अशी याचना केली पाहिजे: “हे देवा, माझी पातके कितीतरी आहेत! . . . तुझ्या नामाच्या गौरवासाठी त्यांची क्षमा कर.” (तिरपे वळण आमचे.)—स्तोत्र २५:११, सुबोध भाषांतर.

६. यहोवा आणि क्षमा यांविषयी आपण कोणत्या गोष्टीची खात्री बाळगू शकतो?

६ तुम्हाला—किंवा आपल्यांपैकी कोणालाही—क्षमा कशी मिळू शकते? एक मुख्य गोष्ट म्हणजे यहोवा मुळातच क्षमाशील आहे. त्याच्या व्यक्‍तित्वाचे हे एक वैशिष्ट्य आहे. (निर्गम ३४:६, ७; स्तोत्र ८६:५) अर्थात, देव आपल्याकडून ही अपेक्षा करतो, की आपण प्रार्थनेद्वारे त्याच्याकडे दिलगिरी व्यक्‍त करावी, त्याच्याकडे माफीची याचना करावी. (२ इतिहास ६:२१; स्तोत्र १०३:३, १०, १४) आणि अशी क्षमा आपल्याला मिळावी म्हणून त्याने कायदेशीर पद्धतीने तरतूदही केली आहे—येशूचे खंडणी बलिदान.—रोमकर ३:२४; १ पेत्र १:१८, १९; १ योहान ४:९, १४.

७. आपण कशाप्रकारे यहोवाचे अनुकरण केले पाहिजे?

७ देवाने मोठ्या मनाने आपल्याला केलेली ही क्षमा खरे तर एक आदर्श आहे. त्यावरून आपण दुसऱ्‍यांशी कसे वागावे हे शिकू शकतो. याच गोष्टीवर पौलाने असे लिहून जोर दिला: “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.” (इफिसकर ४:३२) आपण देवाच्या उदाहरणाचे अनुकरण करावे हेच पौलाला सांगायचे होते. कारण त्यानंतरच्या वचनात पौल असे म्हणतो: “तर मग देवाची प्रिय मुले ह्‍या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” (इफिसकर ५:१) तुम्हाला या दोन गोष्टींमधला संबंध स्पष्ट झाला का? पौल अतिशय प्रभावी युक्‍तिवाद करतो, की ज्याअर्थी यहोवा देवाने तुम्हाला क्षमा केली आहे,—त्याअर्थी तुम्ही त्याचे अनुकरण केले पाहिजे आणि ‘कनवाळू होऊन एकमेकांना क्षमा’ केली पाहिजे. पण स्वतःला विचारा, ‘मी हे करत आहे का? तसे करणे माझ्या स्वभावात नसल्यास त्या दिशेने मी प्रयत्न करत आहे का, क्षमा करण्याच्या बाबतीत मी देवाचे अनुकरण करण्याचा खरोखरच प्रयत्न करत आहे का?’

क्षमाशील होण्याकरता प्रयत्नांची गरज

८. आपल्या मंडळीच्या रचनेविषयी आपण काय ओळखले पाहिजे?

८ तसे पाहिले तर, कोणाला क्षमा करावी लागेल असे फार क्वचितच प्रसंग ख्रिस्ती मंडळीत येतील असा विचार मनात येणे साहजिक आहे. पण परिस्थिती वेगळी आहे. हे खरे, की आपले ख्रिस्ती भाऊबहीण येशूच्या प्रेमाच्या आदर्शाप्रमाणे चालण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. (योहान १३:३५; १५:१२, १३; गलतीकर ६:२) या जगातील सर्वसामान्य विचारसरणी आणि बोलणे-चालणे टाळण्यासाठी त्यांनी खूप काळापासून प्रयत्न केला आहे आणि अद्यापही करत आहेत. नव्या व्यक्‍तिमत्त्वानुसार आपले वर्तन असावे असे त्यांना खरोखर वाटते. (कलस्सैकर ३:९, १०) पण आपल्याला वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संपूर्ण जगातील देवाचे सेवक आणि प्रत्येक मंडळीतील लोक अपरिपूर्ण मानवच आहेत. अर्थात, ते सर्वजण एकेकाळी होते त्यापेक्षा निश्‍चितच आता चांगले आहेत पण तरीसुद्धा शेवटी ते अपरिपूर्णच आहेत.

९, १०. दोघा बांधवांमध्ये समस्या निर्माण झाल्यास त्याचे आपल्याला आश्‍चर्य का वाटू नये?

९ मंडळीमध्ये, आपल्या भाऊबहिणींमध्ये अपरिपूर्णता असेल अशी आपण अपेक्षा करू शकतो, असे देव आपल्याला बायबलमध्ये हेतुपुरस्सर सांगतो. उदाहरणार्थ, कलस्सैकर ३:१३ येथील पौलाच्या शब्दांचा विचार करा: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.”

१० अशारितीने, बायबल आपल्याला याची आठवण करून देते, की देव आपल्याला क्षमा करतो, त्याअर्थी आपलेही इतरांना क्षमा करण्याचे कर्तव्य आहे आणि असे करणे आवश्‍यकही आहे. पण इतरांना क्षमा करणे इतके कठीण का जाते? कारण “कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे” असू शकते हे पौलाने मान्य केले. एखाद्या वाजवी कारणामुळे दुसऱ्‍याविरुद्ध गाऱ्‍हाणे करण्याचे प्रसंग मंडळीत येतील याची त्याला जाणीव होती. किंबहुना पहिल्या शतकात अशा ख्रिस्ती ‘पवित्र जनांमध्येही’ ज्यांच्यासाठी ‘स्वर्ग राखून ठेवलेली’ आशा होती असे प्रसंग उद्‌भवले असावेत. (कलस्सैकर १:१, ३) आज तर बहुतेक ख्रिश्‍चनांना आपण “देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक” आहोत अशी पवित्र आत्म्याद्वारे साक्ष मिळालेली नाही, मग त्यांच्यातही असे प्रसंग उद्‌भवणे अपेक्षितच नाही का? (कलस्सैकर ३:१२) त्यामुळे मंडळीमध्ये काही तक्रारी असल्यास—वास्तविक किंवा गृहीत धरलेल्या चुकांमुळे भावना दुःखावल्या असल्यास आपल्याला आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.

११. शिष्य याकोबाने आपल्याला कशाविषयी दक्ष राहण्यास सांगितले?

११ याकोब या येशूच्या सावत्र भावाने देखील हे दाखवून दिले, की आपल्या समोर नेहमीच नाही तरी काहीवेळा असे प्रसंग जरूर येतील जेव्हा आपल्याला आपल्या बांधवांना क्षमा करण्याची आवश्‍यकता असेल. “तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी; पण तुमच्या मनांत तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका, व सत्याविरुद्ध लबाडी करू नका.” (याकोब ३:१३, १४) खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या “मनांत तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव?” होय, याकोबाच्या शब्दांवरून हे स्पष्ट होते, की अशी प्रवृत्ती पहिल्या शतकातील मंडळीच्या लोकांमध्ये होती आणि आजही मंडळीमध्ये अशी प्रवृत्ती पाहायला मिळते.

१२. प्राचीन फिलिप्पै मंडळीमध्ये कोणती समस्या निर्माण झाली होती?

१२ दोन अभिषिक्‍त बहिणींच्या बाबतीत देखील हेच घडले; या दोघी जणींनी पौलाबरोबर पुष्कळ काम केल्यामुळे त्या नावाजलेल्या होत्या. फिलिप्पै मंडळीच्या सदस्या असलेल्या युवदीया आणि संतुखे यांच्याविषयी वाचल्याचे तुम्हाला कदाचित आठवत असेल. त्या दोघींच्यामध्ये नेमके काय घडले याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही, पण फिलिप्पैकर ४:२, ३ या वचनांवरून दिसून येते, की त्या दोघींमध्ये काहीतरी समस्या होती. विचार न करता मनाला टोचणारे असे काहीतरी बोलल्यामुळे, किंवा एकमेकींच्या घरच्या लोकांचा अपमान केल्यामुळे, किंवा मत्सरी वृत्तीने काहीतरी केल्यामुळे ही समस्या उद्‌भवली असावी? नेमके कारण आपल्याला ठाऊक नाही, पण ती समस्या इतकी वाढली, की दूरवर असलेल्या रोममधील पौलाच्या कानावर ही बातमी आली. या दोन आध्यात्मिक बहिणींनी एकमेकींशी बोलण्याचे कदाचित सोडले असेल, सभांमध्ये त्या एकमेकींना कदाचित टाळत असतील किंवा आपल्या जवळच्या लोकांजवळ एकमेकींविषयी दुर्भाषण करत असतील.

१३. युवदीया आणि संतुखे या दोघींनी ज्याप्रकारे त्यांचा तंटा मिटवला त्यातून आपण काय शिकू शकतो?

१३ यांपैकी काही गोष्टी तुम्हाला परिचयाच्या वाटतात का, कदाचित तुमच्या मंडळीतील दोघा व्यक्‍तींमध्ये असे कधी झाले का किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत असे कधी घडले का? कदाचित अजूनही ती समस्या पूर्णपणे सुटली नसेल. अशा परिस्थितीत, आपल्याला काय करता येण्यासारखे आहे? पहिल्या शतकातील त्या समर्पित बहिणींना पौलाने असे आग्रहपूर्वक विनवले, की त्यांनी “प्रभूच्या ठायी एकचित्त” व्हावे. त्यानंतर कदाचित या दोघी बहिणी समस्येवर चर्चा करण्याकरता, आपसांतील मतभेद दूर करण्याकरता तयार झाल्या असतील, एकमेकींना क्षमा करण्याची त्यांनी तयारी दाखवली असेल आणि खरे तर यहोवाच्या क्षमाशील प्रवृत्तीचे अनुकरण करण्याचे त्यांनी ठरवले असेल. त्यामुळे युवदीया आणि संतुखे या दोघींमधला तंटा मिटला, आपणही अशाप्रकारे तंटा मिटवू शकतो. अशाप्रकारची क्षमाशील प्रवृत्ती आजही दाखवणे शक्य आहे आणि असे केल्यामुळे निश्‍चितच चांगले परिणाम मिळतील.

शांती राखा—क्षमा करा

१४. व्यक्‍तिगत मतभेद मागे टाकणेच बहुतेक वेळा जमण्यासारखा आणि उत्तम मार्ग का असतो?

१४ एखाद्या ख्रिस्ती बांधवाशी तुमचे बिनसले असल्यास त्याला क्षमा करण्याकरता काय करण्याची आवश्‍यकता आहे? खरे तर, प्रत्येक परिस्थितीला लागू होणारी अशी कोणतीही खास पद्धत त्यासाठी नाही, पण बायबलमध्ये अनेक उदाहरणे आणि वास्तविक सल्ला देण्यात आला आहे जो याबाबतीत उपयोगी ठरू शकतो. सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे झालेली गोष्ट विसरून जा, निव्वळ सोडून द्या, अर्थात हा सल्ला स्वीकारणे आणि त्याप्रमाणे वागणे सोपे नाही. युवदीया आणि संतुखे यांच्यात आली होती त्याप्रकारची समस्या दोन बांधवांत निर्माण होते तेव्हा दोघांनाही असेच वाटते की सगळा दोष दुसऱ्‍याचाच आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हालाही कदाचित वाटेल, की दुसरी व्यक्‍तीच दोषी आहे आणि तिच्याच चुकीमुळे समस्या निर्माण झाली आहे. पण, त्या व्यक्‍तीला क्षमा करून हे सबंध प्रकरणच मिटवता येणार नाही का? सहसा असे होणार तर नाही, पण असे समजा की तिचाच पुष्कळसा किंवा सगळा दोष आहे, तरीसुद्धा तिला क्षमा करून हा वाद कायमचा मिटवणे खरे तर तुमच्या हातात आहे.

१५, १६. (अ) मीखाने यहोवाचे वर्णन कसे केले? (ब) देव ‘अपराध मागे टाकतो’ याचा काय अर्थ होतो?

१५ क्षमा करण्यात देवाने मांडलेल्या उदाहरणाचे आपण कधीही विस्मरण होऊ देऊ नये. (इफिसकर ४:३२–५:१) अपराध मागे टाकण्याच्या यहोवाच्या आदर्शाविषयी मीखाने असे लिहिले: “तुजसमान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करितोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकितोस, तो आपला राग सर्वकाळ ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो.”—मीखा ७:१८.

१६ ‘अपराध मागे टाकणारा’ असे बायबल यहोवाविषयी म्हणते त्याअर्थी त्याला चुकांचे स्मरण होत नाही, त्याला जणू स्मृतिभ्रंश झाला आहे असा याचा अर्थ नाही. शमशोनाचे आणि दावीदाचे उदाहरण पाहा; त्या दोघांनी गंभीर चुका केल्या होत्या. पण प्रदीर्घ कालावधी गेल्यावरही त्यांनी केलेल्या चुका देवाच्या लक्षात होत्या; त्यांच्या काही चुका आपल्यालाही माहीत आहेत कारण यहोवाने त्या बायबलमध्ये नमूद करून ठेवल्या आहेत. तरीसुद्धा आपल्या क्षमाशील देवाने या दोघांवर दया केली; त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करण्याकरता आपल्याला सांगितले.—इब्री लोकांस ११:३२, १२:१.

१७. (अ) दुसऱ्‍यांनी केलेल्या चुका, अपराध मागे टाकण्याकरता आपण कोणता उद्देश मनात बाळगून त्यांची भेट घ्यावी? (ब) आपण तसे करण्याचा प्रयत्न केल्यास, आपण यहोवाचे अनुकरण कसे करू? (तळटीप पाहा.)

१७ होय, यहोवा अपराध ‘मागे टाकू’a शकत होता आणि तसे करण्याकरता दावीदाने वारंवार देवाला प्रार्थना केली होती. (२ शमुवेल १२:१३, NW; २४:१०, NW) याबाबतीत आपल्याला यहोवाचे अनुकरण करता येईल का? आपल्यासोबत यहोवाची सेवा करणाऱ्‍या आपल्या अपरिपूर्ण बांधवांच्या चुका आणि अपराध आपल्याला मागे टाकता येतील का? धावपट्टीवरून उड्डाण भरण्याच्या बेतात असलेल्या जेट विमानात तुम्ही आहात अशी कल्पना करा. विमानातून बाहेर पाहिल्यानंतर तुमच्या ओळखीची कोणी व्यक्‍ती तुम्हाला वाकुल्या दाखवत असल्याचे तुम्हाला दिसते. तुम्ही हे ओळखता, की ती व्यक्‍ती रागावलेली आहे आणि कदाचित तुमच्यावर तिचा राग आहे. किंवा असे देखील असू शकेल, की त्या व्यक्‍तीच्या मनात तुमचा विचार देखील नसेल. तुमचे विमान वेग घेते आणि त्या व्यक्‍तीपासून कितीतरी उंचावर तुम्ही जाता. तिथून ती व्यक्‍ती नव्हे तर अगदी लहानशी आकृती तुम्हाला दिसते. तासाभरात तुम्ही शेकडो किलोमीटर दूर गेलेले असता आणि त्या व्यक्‍तीच्या अपमानास्पद हावभावांना तुम्ही केव्हाच मागे टाकलेले असते. अशाप्रकारे आपण यहोवाप्रमाणे होण्याचा प्रयत्न केल्यास आणि दुसऱ्‍यांचे अपराध मागे टाकल्यास सहसा आपल्याला इतरांना मदत करण्यास मदत होईल. (नीतिसूत्रे १९:११) आजपासून दहा वर्षांनंतर किंवा येशूच्या हजार वर्षांच्या काळात दीडशे दोनशे वर्षांनंतर बांधवांकडून झालेल्या चुका आपल्याला क्षुल्लक वाटणार नाही का? मग आताच त्यांचे अपराध मागे टाकण्यात काय हरकत आहे?

१८. बांधवाचे अपराध आपल्याला मागे टाकता येत नसल्यास कोणता सल्ला लागू करता येण्यासारखा आहे?

१८ क्वचित प्रसंगी तुम्ही कदाचित घडलेल्या प्रसंगाविषयी देवाला प्रार्थना केली असेल आणि क्षमा करण्याचा प्रयत्नही केला असेल, पण तरीही तुम्हाला क्षमा करणे जड जात असेल. तेव्हा तुम्ही काय कराल? येशूने असे आर्जवले, की तुम्हाला ज्याने दुःखावले त्या भावाकडे तुम्ही जा आणि त्याच्याशी समेट करण्याचा उद्देश मनात बाळगून, एकांतात हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा. “ह्‍यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.”—मत्तय ५:२३, २४.

१९. आपल्या बांधवासोबत समेट करण्यासाठी आपण कोणती प्रवृत्ती राखली पाहिजे आणि कोणती टाळली पाहिजे?

१९ एक महत्त्वाची गोष्ट. आपल्या बांधवाकडे जाऊन आपले नव्हे तर त्याचे चुकले होते हे पटवून सांग असे येशूने सांगितले नाही. कदाचित त्या बांधवाच्या हातून चूक झालीही असेल. सहसा दोघांकडून काही प्रमाणात चूक झालेली असते. दोन्ही परिस्थितीत, तुमचा उद्देश त्या बांधवाला कसेही करून नमते घेण्याचा किंवा दुसऱ्‍या शब्दांत तुमच्या पाया पडायला लावण्याचा नसावा. या उद्देशाने तुम्ही बांधवाची भेट घेतली, तर तुमच्या दोघांतील चर्चा अर्थातच निष्फळ ठरेल. शिवाय, नक्की कोणती चूक घडली का घडली यावर सविस्तर चर्चा करण्याचीही काही गरज नाही. ख्रिस्ती प्रेमाच्या वातावरणात शांतपणे चर्चा केल्यावर समस्येचे मूळ अर्थात झालेला गैरसमज दोघांना कळून येईल आणि त्यामुळे तुम्ही दोघेही निर्माण झालेला गैरसमज दूर करू शकाल. पण कधीकधी अशी चर्चा केल्यावरही तुम्हा दोघांचे काही बाबतीत एकमत होणार नाही, आणि ते झालेच पाहिजे असे आहे का? तुम्हा दोघांना क्षमाशील देवाची प्रामाणिकपणे सेवा करायची आहे या गोष्टीवर तुमच्या दोघांचे एकमत झाले ही काय लहान गोष्ट आहे? तुम्हाला ही वास्तविकता कळून येते तेव्हा तुम्हा दोघांना मनापासून असे म्हणायला सोपे जाईल, “मला क्षमा करा; आपल्या अपरिपूर्णतेमुळे आपल्यांत मतभेद झाला. कृपया झालेगेले विसरून जा.”

२०. प्रेषितांच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

२० हे लक्षात असू द्या, की प्रेषितांमध्येही आपल्यांत मोठा कोण याविषयी वाद झाला होता; त्यांच्यातही मतभेद झाले होते. (मार्क १०:३५-३९; लूक ९:४६; २२:२४-२६) त्यामुळे तणाव निर्माण झाला; कदाचित एकमेकांच्या भावना दुखवल्या गेल्या असतील, एकमेकांचा अनादर केला असेल. पण त्यांनी अशाप्रकारचे मतभेद मागे टाकले, आणि ते एकत्र मिळून काम करत राहिले. त्यांच्यापैकी एकाने नंतर असे लिहिले: “जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाइटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे; त्याने वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.”—१ पेत्र ३:१०, ११.

२१. क्षमा करण्याच्या बाबतीत येशूने कोणता महत्त्वाचा सल्ला दिला?

२१ आपण आधी एक क्रम पाहिला: आपण भूतकाळात केलेल्या अनेक पातकांची देवाने क्षमा केली, त्यामुळे आपण त्याचे अनुकरण करून आपल्या बांधवांना क्षमा केली पाहिजे. (स्तोत्र १०३:१२; यशया ४३:२५) पण आणखी एक क्रम किंवा टप्पा आहे. आदर्श प्रार्थनेविषयी सांगितल्यानंतर येशूने असे म्हटले: “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाहि क्षमा करील.” एका वर्षानंतर येशूने त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवताना याच गोष्टीविषयी पुन्हा सांगितले: “आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करितो.” (मत्तय ६:१२, १४; लूक ११:४) त्यानंतर त्याच्या मृत्यूच्या आधी त्याने असेही सांगितले: “तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्यानेहि तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी.”—मार्क ११:२५.

२२, २३. दुसऱ्‍यांना क्षमा करण्यावर आपले भवितव्य कसे अवलंबून आहे?

२२ होय, आपल्याला नेहमी देवाची क्षमा हवी असल्यास आपणही आपल्या बांधवांना क्षमा करायला तयार असले पाहिजे. दोघा ख्रिश्‍चनांमध्ये एखादी व्यक्‍तिगत समस्या निर्माण होते तेव्हा, स्वतःला विचारा, ‘त्या भावाचे किंवा बहिणीचे चुकले, त्याने किंवा तिने माझे मन दुःखवले अथवा मानवाच्या अपरिपूर्णतेमुळे त्याने किंवा तिने न शोभणारे काम केले हे सर्व सिद्ध करून दाखविण्यापेक्षा देवाची क्षमा प्राप्त करणे आपल्याकरता अधिक महत्त्वाचे नाही का?’ उत्तर तुम्हाला माहीत आहे.

२३ व्यक्‍तिगत अपमान किंवा समस्या यापेक्षा बाब गंभीर असल्यास काय करावे? मत्तय १८:१५-१८ येथील येशूचा सल्ला केव्हा लागू होतो? आपण पुढील लेखात पाहू या.

[तळटीपा]

a एका अभ्यासकाने असे म्हटले, की इब्री भाषेतील जे रूपक मीखा ७:१८ मध्ये वापरण्यात आले आहे ते “अशा प्रवाशाच्या प्रवृत्तीवरून घेण्यात आले आहे जो प्रवास करताना त्याला अनावश्‍यक वाटणाऱ्‍या गोष्टींकडे लक्ष देत नाही, त्या मागे टाकतो. याचा असा अर्थ होत नाही, की देव पातकाकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याच्याकरता पाप म्हणजे साधीशी किंवा क्षुल्लक गोष्ट आहे, तर त्याचा असा अर्थ होतो, की शिक्षा करण्याच्या दृष्टीने देव विशिष्ट घटनांची नोंद ठेवत नाही; तो शिक्षा करत नाही, तर तो क्षमा करतो.”—शास्ते ३:२६, NW; १ शमुवेल १६:८, NW.

तुम्हाला आठवते का?

◻ क्षमा करण्याच्या बाबतीत यहोवा आपल्याला कशाप्रकारे एक आदर्श देतो?

◻ आपल्या मंडळीतील लोकांविषयी आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?

◻ चुका आणि अपराध यांविषयी बहुतेक प्रसंगी आपण काय केले पाहिजे?

◻ आवश्‍यकता असल्यास, आपल्या बांधवासोबत समेट करण्यासाठी आपल्याला काय करता येण्यासारखे आहे?

[१५ पानांवरील चित्र]

एखाद्या ख्रिश्‍चनाशी मतभेद झाल्यास, ते मतभेद मागे टाकण्याचा प्रयत्न करा; झालेल्या चुका काळाच्या ओघात अगदी क्षुल्लक वाटतील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा