त्यांना त्रस्त जगात शांती प्राप्त झाली
या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावरील चित्र बोस्निया आणि हर्जेगोव्हिना येथे चाललेल्या जहाल युद्धाचे चित्रण करते. अशा ठिकाणी शांती असू शकेल का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, होय. त्या शोचनीय देशातील रोमन कॅथलिक, पूर्व कर्मठवादी आणि मुसलमान समाजाच्या मुलूखासाठी लढत असलेले पुष्कळ असे लोक आहेत ज्यांना शांती हवी आहे व काहींना ती प्राप्त देखील झाली आहे.
डोरेम नावाचे कुटुंब सारायेव्होचे रहिवाशी आणि यहोवाचे साक्षीदार होते. त्या शहरात इतका गोंधळ असतानाही या कुटुंबाने देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी त्यांच्या शेजाऱ्यांना नित्य भेटी दिल्या. (मत्तय २४:१४) का बरे? कारण हे राज्य, वास्तविक आहे, त्याची स्वर्गामध्ये स्थापना झालेली आहे व ते राज्य मानवजातीकरता शांतीची उत्तम आणि एकमात्र आशा आहे हे डोरेम कुटुंबाला ठाऊक होते. प्रेषित पौलाने जिला “शांतीची सुवार्ता” म्हटले त्यावर यहोवाच्या साक्षीदारांचा पूर्ण विश्वास आहे. (इफिसकर २:१७) बोझो आणि हेना डोरेमसारख्या लोकांमुळे पुष्कळांना बोस्निया आणि हर्जेगोव्हिनामध्ये शांती प्राप्त होत आहे.
खरी शांती अद्याप यायची आहे
डोरेम कुटुंबाविषयी आणखी सांगण्याजोगे आहे. पण त्याआधी देवाच्या राज्यामध्ये विश्वास संपादलेल्या दुसऱ्या एका जोडप्याबद्दल आपण बोलू या. त्यांची नावे ऑर्टूर आणि ऑरिना अशी आहेत. भूतपूर्व सोवियत युनियनच्या क्षेत्रातील प्रजासत्ताक येथे त्यांच्या तरुण मुलांसमवेत ते राहत असत. मुलकी युद्धाचा उद्रेक झाला तेव्हा ऑर्टूर, एका पक्षाच्या बाजूने लढला. परंतु लवकरच त्याने स्वतःला विचारले: ‘हे लोक जे माझे शेजारी होते त्यांच्याविरुद्ध मी का लढतोय?’ त्याने ते राष्ट्र सोडले आणि पुष्कळ अडचणींनंतर, त्याच्या तरुण कुटुंबासोबत एस्टोनियात राहावयास आला.
एकदा सेंट पिट्सबर्गला भेट देताना ऑर्टूर यहोवाच्या साक्षीदारांना भेटला आणि देवाच्या राज्याबद्दल तो जे काही शिकला त्यामुळे खूप प्रभावित झाला. फार लवकर संपूर्ण मानवजातीवर देवाचे राज्य हे एकमात्र शासन असावे ही यहोवाची इच्छा आहे. (दानीएल २:४४) तेव्हा पृथ्वी शांतीपूर्ण ठिकाण असेल, जेथे मुलकी युद्धे किंवा आंतरराष्ट्रीय झगडे नसतील. त्या काळाबद्दल यशयाने अशाप्रकारे भाकीत केले: “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या [यहोवाच्या, NW] ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”—यशया ११:९.
एका साक्षीदाराने ऑर्टूरला, एका बायबल साहित्यातील, चित्रकाराने भवितव्याच्या शांतीमय पृथ्वीचे रेखाटलेले चित्र दाखवल्यावर ऑर्टूर म्हणाला, की तो अशा एका ठिकाणी राहत होता जे हुबेहुब असेच होते. पण आता मुलकी युद्धामुळे त्याचा पूर्ण नाश झाला होता. ऑर्टूर आणि त्याचे कुटुंब एस्टोनियात यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलच्या अभ्यासाद्वारे देवाच्या राज्याबद्दल आणखी शिकत आहेत.
गोंधळामध्ये शांती
स्तोत्र ३७:३७ म्हणते: “सात्त्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा, शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील.” वास्तविक पाहता, देवाच्या नजरेतील निष्कलंक आणि सात्त्विक मनुष्याची शांती त्याच्या भवितव्यापुरतीच मर्यादित नाही. तो आत्ताही त्याचा आनंद उपभोगत आहे. ते कसे शक्य आहे? पॉल नावाच्या मनुष्याचा अनुभव पहा.
पॉल, नैर्ऋत्य इथियोपियातील एका दूरवरच्या निर्वासित छावणीत राहतो. तसे पाहता तो शेजारच्याच एका देशाचा रहिवाशी आहे. त्याच्या मातृदेशात तो, पेट्रोलियम कारखान्यात काम करणाऱ्या एका यहोवाच्या साक्षीदाराला भेटला व या मनुष्याने त्याला सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते,a हे बायबल अभ्यासाचे साधन दिले. पॉल त्या साक्षीदाराला पुन्हा कधीच भेटू शकला नाही, पण त्याने मात्र अगदी काळजीपूर्वक त्या पुस्तकाचा अभ्यास केला. मुलकी युद्धामुळे तो इथियोपियातील एका निर्वासित छावणीत आला होता आणि तो जे काही शिकला होता त्याबद्दल त्याने इतरांना तेथे सांगितले. हेच सत्य असल्याचे एका लहानशा गटाने स्वीकारले. ते जे काही शिकले होते त्याच्या आधारावर लगेचच छावणीतील इतरांना प्रचार करू लागले.
पॉलने वॉच टावर संस्थेच्या मुख्यालयास पत्र लिहून त्यांचे साहाय्य मागितले. आदीस अबाबा येथून पाठवलेला सेवक, ३५ जण देवाच्या राज्याबद्दल आणखी शिकून घेण्यासाठी त्याची वाट पाहत होते हे पाहून आश्चर्यचकित झाला. नियमितरीत्या साहाय्य दिले जाईल अशा हेतूने योजना करण्यात आल्या.
पॉलसारखे लोक शांतीचा आनंद लुटत आहेत हे कशावरून म्हणता येते? त्यांचे जीवन इतके सुखदायक नाही, पण त्यांचा देवावर विश्वास आहे. या जगाच्या गोंधळाचा परिणाम त्यांच्यावर झाल्यावर ते बायबलचा सल्ला लागू करतात: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” त्यामुळे त्यांना असे समाधान मिळते जे आज अतिशय दुर्मिळ आहे. फिलिप्पैकर मंडळीस उद्देशून म्हटलेले प्रेषित पौलाचे शब्द त्यांना लागू होतात: “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” होय, “शांतिदाता, देव” यहोवासोबत जवळच्या नातेसंबंधात असल्यासारखे त्यांना वाटते.—फिलिप्पैकर ४:६, ७, ९.
वर्तमान शांती
येशू ख्रिस्त, देवाच्या राज्याचा सिंहासनाधिष्ठ राजा आहे ज्याला बायबलमध्ये “शांतीचा अधिपति” म्हटले आहे. (यशया ९:६) त्याच्याबद्दल प्राचीन संदेष्ट्याने म्हटले: “तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल; त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदीपासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल.” (जखऱ्या ९:१०) अशाप्रकारच्या प्रेरित शब्दांचा सखोल परिणाम होसे नावाच्या मनुष्याच्या जीवनावर झाला.
एकेकाळी होसे तुरुंगात होता. तो एक दहशतवादी होता आणि एक पोलिस बराक उडवण्याची तयारी करत असताना त्याला अटक करण्यात आली होती. केवळ हिंसाच त्याच्या देशातील परिस्थिती सुधारण्यास सरकारला भाग पाडू शकते असे त्याला वाटत होते. तो तुरुंगात असताना, यहोवाचे साक्षीदार त्याच्या पत्नीसमवेत बायबलचा अभ्यास करू लागले.
तुरुंगातून सुटल्यावर तोही बायबलचा अभ्यास करू लागला आणि लवकरच स्तोत्र ८५:८, [NW], मधील शब्द त्याच्याबाबतीत खरे होऊ लागले: “खरा परमेश्वर यहोवा जे काय बोलेल ते मी ऐकून घेईन; कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करील.” पण त्या वचनाच्या शेवटी एक इशारा आहे: “मात्र त्यांनी आत्मविश्वासाकडे पुन्हा वळू नये.” यास्तव, यहोवाची शांती शोधू पाहणारा स्वतंत्र किंवा त्याच्या इच्छेच्या विरुद्ध कार्य करण्याचे धाडस करणार नाही.
आज, होसे आणि त्याची पत्नी ख्रिस्ती सेवक आहेत. ते इतरांना यहोवाच्या राज्याचा मार्ग दाखवतात जे राज्य, होसेने पूर्वी घरगुती बॉम्बने समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता त्या समस्यांना सोडवील. ते बायबलवर भरवसा ठेवण्यास तयार आहेत जे म्हणते: “जे उत्तम ते परमेश्वर [यहोवा] देईल.” (स्तोत्र ८५:१२) आणि होसेने अलीकडेच, त्याने जी बराक उडवण्याची तयारी केली होती तिला भेट दिली. कशासाठी? तेथील कुटुंबांसोबत देवाच्या राज्याविषयी बोलण्यासाठी.
शांतीपूर्ण लोक
बायबल स्तोत्र ३७:१०, ११ मध्ये म्हणते: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधिशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही; पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” किती वैभवशाली आशा!
परंतु यहोवाची शांती केवळ ‘लीन जनांसाठीच’ आहे याची नोंद घ्या. शांती प्राप्त करू इच्छिणाऱ्यांना शांतीपूर्ण होण्याचे शिकावे लागेल. न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या कीथच्या बाबतीत असेच झाले. “भारदस्त शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्त्वाचा, आक्रमक आणि वादशील” असे कीथचे वर्णन केले जाई. तो एका टोळीचा सदस्य होता. त्याचे घर तर अक्षरशः किल्ल्यासारखे वाटत होते आणि घुसखोरांपासून संरक्षण व्हावे म्हणून बागेत तीन राखणकर्ती कुत्री गस्त घालत असत. सहा मुलांची आई असलेल्या त्याच्या पत्नीने त्याच्यापासून फारकत घेतली होती.
कीथची यहोवाच्या साक्षीदारांशी भेट झाली तेव्हा, सुवार्तेचा त्याच्यावर सखोल परिणाम झाला होता. काही दिवसांमध्येच तो आणि त्याची मुले साक्षीदारांबरोबर सभांना उपस्थित राहू लागले. त्याचे खांद्यापर्यंत वाढलेले केस त्याने कापले व तो त्याच्या पूर्वीच्या साथीदारांना देवाच्या राज्याबद्दल सांगू लागला. त्यांच्यातील काहीजणांनी तर बायबलचा अभ्यासही करण्यास सुरवात केली.
संपूर्ण जगभरातील लाखो लीन लोकांप्रमाणेच, कीथही प्रेषित पेत्राचे शब्द स्वतःच्या बाबतीत लागू करू लागला: “जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल, . . . त्याने वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग शोधावा.” (१ पेत्र ३:१०, ११) कीथच्या माजी पत्नीने त्याच्याशी पुनर्विवाह करण्यास संमती दिली, व आता तो ‘शांतीच्या प्राप्तीसाठी झटण्यास व तिचा मार्ग शोधण्यास’ शिकत आहे.
यहोवाकडील शांती पुष्कळांसाठी, पूर्वीच्या यु.एस.एस.आर मध्ये जन्मलेल्या एकेकाळच्या व्यायामपट्टुसाठी देखील जीवनरक्षक ठरली आहे. या मनुष्याने ऑलम्पिक खेळांमध्ये पदके जिंकली होती पण त्याचा भ्रमनिरास झाल्यामुळे तो मादक औषधे घेऊ लागला व मद्यपान करू लागला. एकूण १९ महत्त्वपूर्ण वर्षांनंतर, ज्यामध्ये सायबेरियातील एका कामगार छावणीत तीन वर्षांचा शिक्षादेश, चोरटा उतारु म्हणून कॅनडाला जहाजातून प्रवास आणि मादक औषधांच्या सवयीमुळे मृत्यूच्या विळख्यात असल्यासारखे वाटण्याचे दोन अनुभव या सर्वांचा समावेश होतो, त्याने जीवनातील खरा उद्देश शोधून काढण्यास मदत करावी अशी देवाला प्रार्थना केली. रशियन भाषिक यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास केल्यामुळे त्याला त्याच्या प्रश्नांना उत्तरे मिळण्यास मदत मिळाली. आज हाच मनुष्य इतर लाखोंप्रमाणे देवासोबत व स्वतःशी शांतीत आहे.
पुनरुत्थानाची आशा
शेवटी आपण सारायेव्हो येथील बोझो आणि हिनाकडे पुन्हा जाऊ या. यांना मग्दालिना नावाची पाच वर्षांची मुलगी होती. मागील जुलै महिन्यात, हे तिघेही त्यांच्या प्रचारकार्यात पुन्हा एकदा जाण्यासाठी घरातून निघणार होते पण एका स्फोटकाचा स्फोट झाल्यामुळे ते तिघेही ठार झाले. त्यांनी इतरांना ज्या शांतीबद्दल सांगितले होते त्याविषयी काय झाले? ज्या स्फोटकाने त्यांचे प्राण घेतले होते त्याने ही शांती वास्तविक नसल्याचे दाखवून दिले का?
नाही, मुळीच नाही! या व्यवस्थीकरणात तर दुःखद घटना घडतातच. लोक बॉम्ब आणि स्फोटकांमुळे ठार मारले जातात. इतर आजारपणामुळे किंवा अपघातात मारले जातात. पुष्कळजण वृद्धापकाळाने मरण पावतात. देवाच्या शांतीचा उपभोग घेणारे यातून बचावतात असे नाही, पण अशा घटनांची शक्यता त्यांना कोणत्याही आशेविना सोडत नाही.
येशूने त्याची स्नेही मार्था हिला अभिवचन दिले: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल.” (योहान ११:२५) डोरेम परिवाराचा सुद्धा इतर सर्व यहोवाच्या साक्षीदारांप्रमाणे हाच विश्वास होता. शिवाय त्यांचा असाही विश्वास होता, की जरी त्यांच्यावर मृत्यू ओढवला तरी, खरोखरच शांतीपूर्ण ठिकाण असलेल्या पृथ्वीवर त्यांचे पुनरुत्थान होईल. यहोवा देव “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.
येशू, त्याच्या मृत्यूच्या काही काळाआधी त्याच्या शिष्यांना म्हणाला: ‘मी तुम्हांस शांती देऊन ठेवितो. . . . तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका.’ (योहान १४:२७) ज्यांच्याकडे अशाप्रकारची शांती होती व पुनरुत्थानासमयी ते जिचा आणखी आनंद घेतील त्या डोरेम परिवाराप्रमाणेच आम्ही आनंद करतो. शांतीचा देव यहोवा याची उपासना करणाऱ्या सर्वांबद्दल आम्हाला आनंद वाटतो. अशा लोकांकडे मनःशांती आहे. ते देवासोबत शांतीचा उपभोग घेतात. ते इतरांबरोबर शांती विकसित करतात. शिवाय शांतीपूर्ण भवितव्याचा त्यांना भरवसा आहे. होय, त्रस्त जगात राहत असताना देखील त्यांना शांती प्राप्त झाली आहे. खरेच, आत्म्याने व खरेपणाने देवाची उपासना करणारे सर्व ही शांती उपभोगतात. तुम्हालाही ती शांती प्राप्त होवो.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांद्वारे प्रकाशित केले आहे.
[७ पानांवरील चित्रं]
त्यांना त्रस्त जगात राहत असताना देखील शांती प्राप्त झाली आहे