वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १/१ पृ. ८-१७
  • यहोवा विपुल शांती आणि सत्य देतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा विपुल शांती आणि सत्य देतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा त्याची अभिवचने पूर्ण करतो
  • ‘सीयोनेसंबंधाने मी अतिशय ईर्ष्यायुक्‍त होईन’
  • “सत्यनगर”
  • यहोवाच्या लोकांकरता शांती
  • यहोवासाठी अतिशय जड?
  • “मी त्यांचा देव होईन”
  • “सत्य व शांति यांची आवड धरा”!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • “देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक या नात्याने कार्य करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • खरी शांती—कोणत्या उगमाकडून?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १/१ पृ. ८-१७

यहोवा विपुल शांती आणि सत्य देतो

“मी त्या लोकांस बरे करीन, आणि . . . शांति व सत्य यांचे वैपुय त्यांच्या ठायी प्रकट करीन.”—यिर्मया ३३:६.

१, २. (अ) शांतीच्या बाबतीत, राष्ट्रांचा अहवाल काय आहे? (ब)सा. यु. पू. ६०७ मध्ये यहोवाने इस्राएलला शांतीविषयी कोणता धडा शिकवला?

शांती! खरेच कितीही इष्ट असली तरी मानवी इतिहासात ती किती दुर्मिळ आहे! विशेषतः २० वे शतक, शांतीचे शतक नव्हते. उलटपक्षी त्याने मानवी इतिहासातील दोन अत्यंत विध्वंसक युद्धे पाहिली आहेत. पहिल्या जागतिक युद्धानंतर जागतिक शांती राखण्यासाठी राष्ट्र संघाची प्रस्थापना करण्यात आली. ती संघटना अपयशी ठरली. दुसऱ्‍या जागतिक युद्धानंतर, त्याच उद्देशाकरता संयुक्‍त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. तो देखील किती सर्वंकशपणे अपयशी ठरत आहे हे जाणण्यासाठी आपल्याला केवळ वर्तमानपत्र वाचण्याची गरज आहे.

२ मानवी संघटना शांती आणू शकत नाहीत याबद्दल आपल्याला आश्‍चर्य वाटावे का? नाही, मुळीच नाही. या अनुषंगाने जवळपास २,५०० वर्षांआधी, देवाच्या निवडलेल्या इस्राएल लोकांना एक धडा शिकवण्यात आला होता. सा. यु. पू. सातव्या शतकात, बॅबिलोन या उदयोन्मुख जागतिक सत्तेमुळे इस्राएलची शांती धोक्यात आली होती. इस्राएलने इजिप्तकडून शांतीची अपेक्षा केली. इजिप्त अपयशी ठरले. (यिर्मया ३७:५-८; यहेज्केल १७:११-१५) सा. यु. पू. ६०७ मध्ये, बॅबिलोनच्या सैन्याने जेरूसलेमचा कोट पाडून टाकला आणि यहोवाचे मंदिर जाळून टाकले. अशाप्रकारे, मानवी संघटनांवर विसंबून राहण्याच्या व्यर्थतेबद्दल इस्राएलने कठीण मार्गाने धडा शिकला. शांती अनुभवण्याऐवजी, त्या राष्ट्राला बॅबिलोनमध्ये जबरदस्तीने बंदिवान करून नेण्यात आले.—२ इतिहास ३६:१७-२१.

३. यिर्मयाद्वारे यहोवाच्या शब्दांच्या पूर्ततेत, कोणत्या ऐतिहासिक घटनांनी इस्राएलला शांतीविषयी दुसरा धडा शिकवला?

३ तथापि, जेरूसलेमचा पाडाव होण्याआधी, यहोवाने प्रगट केले होते की, इजिप्त नव्हे तर तो इस्राएलसाठी खरी शांती आणणार होता. यिर्मयाद्वारे त्याने असे अभिवचन दिले होते: “मी . . . त्या लोकांस बरे करीन, आणि शांति व सत्य यांचे वैपुल्य त्यांच्या ठायी प्रगट करीन. मी यहूदाचा बंदिवास व इस्राएलाचा बंदिवास उलटवीन व त्यांस पूर्ववत स्थापीन.” (यिर्मया ३३:६, ७) यहोवाच्या अभिवचनाची पूर्तता, बॅबिलोनवर कब्जा करण्यात आला व इस्राएली बंदिवानांची सुटका करण्यात आली तेव्हा सा. यु. पू. ५३९ मध्ये होऊ लागली. (२ इतिहास ३६:२२, २३) सा. यु. पू. ५३७ च्या उत्तरार्धात, ७० वर्षांमध्ये पहिल्यांदा, इस्राएलच्या भूमीवर इस्राएलांच्या एका गटाने मांडवांचा सण साजरा केला! सणानंतर, यहोवाच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यास ते निघाले. त्यांना याविषयी कसे वाटले? अहवाल म्हणतो: “परमेश्‍वराच्या [यहोवाच्या, NW] मंदिराचा पाया घालीत आहेत हे जाणून [त्यांनी] उच्च स्वराने जयजयकार केला.”—एज्रा ३:११.

४. यहोवाने इस्राएलांना मंदिराच्या बांधकामाचे कार्य करण्यासाठी कसे उत्तेजित केले, आणि त्याने शांतीविषयी कोणते अभिवचन दिले?

४ तथापि, त्या आनंदी सुरवातीनंतर इस्राएली, विरोधकांकडून निरूत्साही झाले आणि त्यांनी मंदिराच्या बांधणीचे काम थांबवले. काही वर्षांनी, पुनर्बांधणीचे काम पूर्ण करण्यासाठी इस्राएलांना प्रवृत्त करण्यास यहोवाने हाग्गय आणि जखऱ्‍या या संदेष्ट्यांना पाठवले. जे मंदिर बांधले जाणार होते त्याविषयी, हाग्गयने असे म्हणताना ऐकल्यावर त्यांना किती आनंद झाला असावा की, “या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, मी या स्थळाला शांति देईन”!—हाग्गय २:९.

यहोवा त्याची अभिवचने पूर्ण करतो

५. जखऱ्‍याच्या आठव्या अध्यायाबद्दल कोणती लक्षणीय गोष्ट आहे?

५ जखऱ्‍या या बायबल पुस्तकात, सा. यु. पू. सहाव्या शतकात देवाच्या लोकांना ज्या अनेक प्रेरित दृष्टान्तांनी व भविष्यवाण्यांनी बळकट केले होते त्यांविषयी आपण वाचतो. याच भविष्यवाण्या आपल्याला यहोवाच्या आधाराची हमी देत राहतात. यहोवा त्याच्या लोकांना आपल्या दिवसातही शांती देईल यावर विश्‍वास ठेवण्यास ते आपल्याला प्रत्येक कारण देते. उदाहरणार्थ, संदेष्टा जखऱ्‍या त्याच्या नावाच्या पुस्तकाच्या आठव्या अध्यायात, ‘असे सेनाधीश यहोवा म्हणतो’ हे शब्द दहा वेळा उद्‌गारतो. प्रत्येक वेळी, या अभिव्यक्‍तीने एक ईश्‍वरी घोषणा केली जाते जिचा संबंध देवाच्या लोकांच्या शांतीशी आहे. यातील काही अभिवचने जखऱ्‍याच्या दिवसात पूर्ण करण्यात आली होती. बाकी सर्व पूर्ण झाल्या आहेत किंवा पूर्ण होण्याच्या मार्गात आहेत.

‘सीयोनेसंबंधाने मी अतिशय ईर्ष्यायुक्‍त होईन’

६, ७. यहोवा कोणत्या मार्गांनी ‘सियोनेसंबंधी संतप्त आवेशाने ईर्ष्यायुक्‍त’ होता?

६ जखऱ्‍या ८:२ मध्ये आपल्याला ही अभिव्यक्‍ती पहिल्यांदा आढळते, तेथे आपण असे वाचतो: “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, सीयोनेसंबंधाने मी अतिशयित ईर्ष्यायुक्‍त झालो आहे; तिच्याकरिता संतप्त आवेशाने मी ईर्ष्यायुक्‍त झालो आहे.” ईर्ष्यावान असणे किंवा त्याच्या लोकांकरता आवेशी असण्याच्या यहोवाच्या अभिवचनाचा अर्थ तो त्यांची शांती पुनर्स्थापित करण्यास जागरूक असणार असा होता. इस्राएलला त्याच्या मायदेशी पूर्ववत आणणे आणि मंदिराची पुनर्बांधणी त्या आवेशाचा पुरावा होते.

७ तथापि, ज्यांनी यहोवाच्या लोकांचा विरोध केला होता अशांबद्दल काय? त्याच्या लोकांबद्दल असलेल्या त्याच्या आवेशाइतकाच त्याच्या शत्रुंबद्दल त्याला ‘तीव्र संताप’ असेल. पुनर्बांधणी केलेल्या मंदिरात उपासना करताना विश्‍वासू यहुदी आता पाडाव झालेल्या सामर्थ्यशाली बॅबिलोनच्या प्रतिकूल परिणामावर विचार करू शकत होते. ज्यांनी मंदिराची पुनर्बांधणी रोखण्याचा प्रयत्न केला होता त्या शत्रूंच्या पूर्ण अपयशाचाही विचार ते करू शकत होते. (एज्रा ४:१-६; ६:३) तसेच यहोवाने त्याचे अभिवचन पूर्ण केल्यामुळे ते त्याचे आभार मानू शकले. त्याच्या ईर्ष्येमुळे त्यांना विजय प्राप्त झाला!

“सत्यनगर”

८. जखऱ्‍याच्या दिवसात, पूर्वीच्या काळाच्या विरुद्धतेत जेरूसलेम सत्यनगर कसे होणार होते?

८ जखऱ्‍या दुसऱ्‍यांदा लिहितो: “परमेश्‍वर असे म्हणतो.” या प्रसंगी यहोवाचे वचन काय आहे? “मी सीयोनेस परत आलो आहे मी यरुशलेमेत वस्ती करणार; यरुशलेमेस सत्यनगर म्हणतील व सेनाधीश परमेश्‍वराच्या पर्वतास पवित्रगिरी म्हणतील.” (जखऱ्‍या ८:३) सा. यु. ६०७ आधी, जेरूसलेम सत्यनगर मुळीच नव्हते. त्याचे याजक आणि संदेष्टे भ्रष्ट आणि त्याचे लोक अविश्‍वासू होते. (यिर्मया ६:१३; ७:२९-३४; १३:२३-२७) आता देवाचे लोक मंदिराची पुनर्बांधणी करत होते, व शुद्ध उपासना करण्याची त्यांची वचनबद्धता दाखवून देत होते. आत्म्याच्या रूपात यहोवा पुन्हा एकदा जेरूसलेममध्ये वसला. शुद्ध उपासनेची विविध सत्ये पुन्हा जेरूसलेममध्ये सांगितली गेल्यामुळे त्यास “सत्यनगर” संबोधले जाऊ शकत होते. त्याचे अत्युच्च स्थान ‘परमेश्‍वराचा पर्वत’ म्हटले जाऊ शकत होते.

९. सन १९१९ मध्ये, ‘देवाच्या इस्राएलने’ परिस्थितीतील कोणता विलक्षण बदल अनुभवला होता?

९ या दोन घोषणा प्राचीन इस्राएलसाठी अर्थपूर्ण होत्या, तरी २० वे शतक समाप्तीस येत असताना त्यांचा आपल्याकरताही खूप अर्थ होतो. जवळजवळ ८० वर्षांआधी, पहिल्या महायुद्धादरम्यान, त्या वेळी ‘देवाच्या इस्राएलाचे’ प्रतिनिधीत्व करणारे केवळ अल्प हजार अभिषिक्‍त जण, प्राचीन इस्राएल जसे बॅबिलोनच्या दास्यत्वात गेले त्यानुसार तेही आध्यात्मिक दास्यत्वात गेले. (गलतीकर ६:१६) भविष्यसूचकरित्या, त्यांचे वर्णन रस्त्यावर पडलेले मृतदेह असे करण्यात आले होते. तरीही, यहोवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा होती. (योहान ४:२४) यास्तव, १९१९ मध्ये, यहोवाने त्यांना बंदिवासातून मुक्‍त केले व त्यांच्या आध्यात्मिकरित्या मृत स्थितीतून त्यांना बाहेर आणले. (प्रकटीकरण ११:७-१३) अशाप्रकारे, “देश एका दिवसात जन्म पावतो काय? राष्ट्र एका क्षणात जन्मास येते काय?” या यशयाच्या भविष्यसूचक प्रश्‍नाचे उत्तर यहोवाने जोरदारपणे होय असे दिले. (यशया ६६:८) सन १९१९ मध्ये, यहोवाचे लोक स्वतःच्या ‘देशात’ आध्यात्मिक राष्ट्र म्हणून किंवा पृथ्वीवर आध्यात्मिक मिळकत म्हणून अस्तित्वात आले.

१०. सन १९१९ मध्ये सुरवात होऊन, अभिषिक्‍त ख्रिस्ती त्यांच्या ‘देशात’ कोणते आशीर्वाद उपभोगत आले आहेत?

१० अभिषिक्‍त ख्रिस्ती, त्या देशात सुरक्षित असून, त्यांनी यहोवाच्या भव्य आध्यात्मिक मंदिरात सेवा केली. त्यांना येशूच्या पार्थिव मालमत्तेची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारणारा ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ म्हणून नियुक्‍त करण्यात आले होते. २० वे शतक समाप्तीस पोहंचत असले, तरी अद्यापही त्यांना हा विशेषाधिकार आहे. (मत्तय २४:४५-४७) यहोवा हा “शांतीचा देव” आहे हा धडा त्यांनी अगदी चांगल्यारितीने शिकला होता.—१ थेस्सलनीकाकर ५:२३.

११. ख्रिस्ती धर्माच्या धार्मिक नेत्यांनी स्वतःला देवाच्या लोकांचे शत्रू असल्याचे कसे दाखवून दिले आहे?

११ तथापि, देवाच्या इस्राएलाच्या शत्रुंविषयी काय? यहोवाचा त्याच्या लोकांविषयी असणारा आवेश व त्याच्या शत्रुंविषयी असणारा संताप सारखेच आहेत. पहिल्या जागतिक महायुद्धात, ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक पुढाऱ्‍यांनी या सत्य बोलणाऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या लहान गटाचा नायनाट करण्याच्या प्रयत्नात पुष्कळ दबाव आणला, पण ते अपयशी ठरले. दुसऱ्‍या महायुद्धात, ख्रिस्ती धर्मजगताचे सेवक केवळ एकाच बाबतीत एकवाक्यतेत होते: लढाईच्या दोन्ही बाजूंनी त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांवर दडपण आणण्यासाठी सरकारांना आर्जवले. आजही, पुष्कळ देशांमध्ये धार्मिक पुढारी यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती प्रचाराच्या कार्यावर निर्बंध किंवा बंदी घालण्यासाठी सरकारांना प्रवृत्त करत आहेत.

१२, १३. यहोवाचा कोप ख्रिस्ती धर्मजगताविरुद्ध कसा व्यक्‍त करण्यात आला आहे?

१२ हे यहोवाच्या नजरेतून चुकले नाही. पहिल्या महायुद्धानंतर, ख्रिस्ती धर्मजगत, मोठ्या बाबेलच्या उर्वरित भागासह पडले. (प्रकटीकरण १४:८) सन १९२२ पासून सुरवात होऊन, लाक्षणिक पीडांची एक श्रृंखला प्रगट झाली व तिने ख्रिस्ती धर्मजगताची आध्यात्मिकरित्या मृत अवस्था जाहीररित्या उघड केली आणि भावी नाशाचा इशारा दिला तेव्हा तिच्या पतनाची वास्तविकता सर्वज्ञात झाली. (प्रकटीकरण ८:७–९:२१) या पीडा अजूनही आणल्या जात आहेत याचा पुरावा म्हणून “खोट्या धर्माचा अंत समीप आहे” हे भाषण एप्रिल २३, १९९५ रोजी संपूर्ण जगभरात देण्यात आले होते आणि त्यानंतर राज्य वार्ता याच्या खास अंकाच्या कोट्यावधी प्रती वितरित करण्यात आल्या.

१३ आज, ख्रिस्ती धर्मजगत दयनीय अवस्थेत आहे. सबंध २० व्या शतकाच्या दरम्यान, त्याच्या पाळकांनी आणि सेवकांनी आशीर्वादित केलेल्या द्वेषयुक्‍त युद्धांमध्ये त्याच्या सदस्यांनी एकमेकांची कत्तल केली आहे. काही देशांमध्ये त्याचा प्रभाव मुळीच नाही. मोठ्या बाबेलच्या उर्वरित भागासहित नाश होण्यास ते राखले आहे.—प्रकटीकरण १८:२१.

यहोवाच्या लोकांकरता शांती

१४. शांतीत असलेल्या लोकांचे कोणते भविष्यसूचक शाब्दिक वर्णन देण्यात आले आहे?

१४ दुसऱ्‍या बाजूला पाहता, १९९६ या वर्षी, यहोवाच्या तिसऱ्‍या घोषणेत वर्णन केल्याप्रमाणे यहोवाच्या लोकांना त्यांच्या पुनर्स्थापित देशात विपुल शांती प्राप्त होते: “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, म्हातारे व म्हाताऱ्‍या, यरुशलेमेच्या गल्ल्यांत आपल्या वृद्धापकाळामुळे हाती काठी घेऊन बसतील. नगराच्या गल्ल्यांनी खेळ खेळणाऱ्‍या मुलामुलींची गर्दी होईल.”—जखऱ्‍या ८:४, ५.

१५. राष्ट्रांची युद्धे असतानाही, यहोवाचे सेवक कोणती शांती अनुभवतात?

१५ शब्दांचे हे सुखकारक चित्र या युद्ध-ग्रस्त जगात—शांतीत असलेले लोक—याचे विलक्षण चित्रण करते. सन १९१९ पासून, यशयाचे भविष्यसूचक शब्द पूर्ण झाले आहेत: “जे दूर आहेत व जे जवळ आहेत, त्यांस शांति असो, शांति असो; मी त्यांस सुधारीन असे परमेश्‍वर म्हणतो. . . . [पण] दुर्जनांस शांति नाही असे माझा देव म्हणतो.” (यशया ५७:१९-२१) अर्थात, यहोवाचे लोक या जगाचे भाग नसले, तरी राष्ट्रांच्या गोंधळाचा परिणाम चुकवू शकत नाहीत. (योहान १७:१५, १६) काही देशांमध्ये, ते कठीण अडचणींचा सामना करतात व त्यांच्यातील काहींना ठारही मारण्यात आले आहे. तरीही, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना दोन प्रमुख मार्गांनी शांती आहे. प्रथम, त्यांना “[त्यांच्या] प्रभु येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांति आहे.” (रोमकर ५:१) दुसरा, त्यांच्यात परस्पर शांती आहे. ते “वरून येणारे ज्ञान” विकसित करतात जे ‘मुळात शुद्ध शिवाय शांतीप्रिय आहे.’ (याकोब ३:१७; गलतीकर ५:२२-२४) याशिवाय, “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील, [व] ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील,” तेव्हा शांतीचा पूर्ण अर्थाने उपभोग घेण्याची ते वाट पाहत आहेत.—स्तोत्र ३७:११.

१६, १७. (अ) “म्हातारे व म्हाताऱ्‍या” तसेच ‘मुलामुलींनी’ यहोवाची संघटना कशी बळकट केली आहे? (ब) यहोवाच्या लोकांची शांती कशावरून प्रदर्शित होते?

१६ यहोवाच्या लोकांमध्ये अद्यापही “म्हातारे व म्हाताऱ्‍या,” यहोवाच्या संघटनेतील सुरवातीचे विजय स्मरणारे अभिषिक्‍त जण आहेत. त्यांचा विश्‍वासूपणा आणि सहनशीलता यांची खूप प्रसंशा केली जाते. १९३० च्या दशकातील उत्साहाच्या दिवसांत आणि दुसऱ्‍या महायुद्धात तसेच त्यानंतरच्या वाढीच्या प्रोत्साहनदायक वर्षांमध्ये तरुण अभिषिक्‍त जणांनी पुढाकार घेतला. पुढे, विशेषतः १९३५ पासून, ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ ‘मोठ्या लोकसमुदायाने’ स्वतःला प्रगट केले आहे. (योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९) अभिषिक्‍त ख्रिस्ती वृद्ध होऊन त्यांच्यात घट झाली तसे, दुसऱ्‍या मेंढरांनी प्रचाराचे कार्य हाती घेऊन सबंध पृथ्वीमध्ये ते फैलावले आहे. अलीकडील वर्षांमध्ये, दुसरी मेंढरे देवाच्या लोकांच्या देशात झुंडीने आली आहेत. मागील वर्षीच, ३,३८,४९१ जणांनी यहोवाला केलेल्या समर्पणाचे प्रतीक म्हणून बाप्तिस्मा घेतला! आध्यात्मिकरित्या बोलायचे झाल्यास, हे नवीन जण फारच अननुभवी आहेत. ‘राजासनावर बसलेल्या आमच्या देवाला व कोकऱ्‍याला’ जे प्रशंसनीय स्तुतीचे गीत गातात त्यांचा समूह वाढतो तसे त्यांचा तजेला आणि उत्साह जतन करण्यात येतो.—प्रकटीकरण ७:१०.

१७ आज, ‘नगराच्या गल्ल्या मुलामुलींनी’ म्हणजेच तारुण्यासारखा जोम असणाऱ्‍या साक्षीदारांनी ‘भरलेल्या आहेत.’ १९९५ च्या सेवा वर्षात, २३२ देशांतून आणि समुद्राच्या द्वीपांमधून वृत्त मिळाले. परंतु, अभिषिक्‍त आणि दुसऱ्‍या मेंढरांमध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा, आंतरजातीय द्वेष, अयोग्य ईर्ष्या नाही. सर्वांची प्रेमाच्या ऐकतेत आध्यात्मिकरित्या वाढ होते. यहोवाच्या साक्षीदारांचे जागतिक बंधुत्व जगाच्या दृश्‍यात खरोखर अद्वितीय आहे.—कलस्सैकर ३:१४; १ पेत्र २:१७.

यहोवासाठी अतिशय जड?

१८, १९. सन १९१९ पासूनच्या वर्षांमध्ये, मानवी दृष्टिकोनातून कठीण भासलेली गोष्ट यहोवाने कशी साध्य केली आहे?

१८ मागे १९१८ मध्ये, अभिषिक्‍त शेषांमध्ये आध्यात्मिक दास्यत्वात असलेले केवळ अल्प हजारो निरूत्साही झालेल्या व्यक्‍ती होत्या तेव्हा घटना कोणती कलाटणी घेतील याचे पूर्वदृश्‍य कोणीच पाहिले नसेल. तथापि, यहोवाला ठाऊक होते—जसे की, त्याच्या चवथ्या भविष्यसूचक घोषणेकरवी पुष्टी देण्यात आली होती: “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, त्या दिवसात या अवशिष्ट राष्ट्रांस ही गोष्ट अचंब्याची वाटते म्हणून माझ्याहि दृष्टीने अचंब्याची होईल काय, असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.”—जखऱ्‍या ८:६.

१९ सन १९१९ मध्ये, यहोवाच्या आत्म्याने पुढे असलेल्या कार्यासाठी त्याच्या लोकांना पुनरुज्जीवित केले. तरीही, यहोवाच्या उपासकांच्या लहान संघटनेत टिकून राहण्यासाठी विश्‍वासाची आवश्‍यकता होती. ते लोक इतके अल्प होते, आणि अनेक गोष्टींची स्पष्टता मिळाली नव्हती. तथापि, यहोवाने हळूहळू त्यांना संघटनात्मकरित्या बळकट केले आणि सुवार्तेचा प्रचार करणे आणि शिष्य बनवणे या ख्रिस्ती कार्यासाठी त्यांना सज्ज केले. (यशया ६०:१७, १९; मत्तय २४:१४; २८:१९, २०) क्रमाक्रमाने, त्याने त्यांना तटस्थता आणि विश्‍वाचे सार्वभौमत्व यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांची समज प्राप्त करण्यास मदत केली. साक्षीदारांच्या त्या लहान गटाकरवी आपली इच्छा साध्य करून घेणे यहोवाकरता फार कठीण होते का? त्याचे उत्तर निश्‍चितच नाही असे आहे! हे या नियतकालिकाच्या १२ ते १५ पृष्ठांवर आहे जेथे १९९५ सेवा वर्षातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यहालचालीचा तक्‍ता दिला आहे.

“मी त्यांचा देव होईन”

२०. देवाच्या लोकांचे एकत्रीकरण किती विस्तारित असेल असे भाकीत केले होते?

२० पाचवी घोषणा पुढे यहोवाच्या साक्षीदारांची आजची आनंदी स्थिती दाखवते: “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, मी आपल्या लोकांचा उगवतीकडून व मावळतीकडून उद्धार करीन; मी त्यास घेऊन येईन व ते यरुशलेमेत वस्ती करितील, आणि सत्याने व धर्माने ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.”—जखऱ्‍या ८:७, ८.

२१. यहोवाच्या लोकांची विपुल शांती कोणत्या प्रकारे राखण्यात व विस्तारण्यात आली आहे?

२१ सन १९९६ मध्ये आपण कुचराई न करता असे म्हणू शकतो की, सुवार्तेचा प्रचार “उगवतीकडून” ते ‘मावळतीपर्यंत’ सबंध जगभरात करण्यात आला आहे. सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करण्यात आले आहे आणि त्यांनी यहोवाच्या या अभिवचनाची पूर्णता पाहिली आहे: “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांति प्राप्त होईल.” (यशया ५४:१३) आपण यहोवाकडून शिक्षित असल्यामुळे आपल्याला शांती आहे. त्यासाठी, साहित्य, ३०० पेक्षा अधिक भाषेत प्रकाशित करण्यात आले आहे. मागच्या वर्षीच, २१ अधिक भाषांची भर पडली. टेहळणी बुरूज नियतकालिक आता १११ भाषेत आणि सावध राहा! ५४ भाषेत एकाच वेळी प्रकाशित केले जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशने देवाच्या लोकांच्या शांतीचे जाहीर प्रदर्शन करतात. साप्ताहिक सभा आपल्याला एकत्र आणतात आणि खंबीर राहण्यास आवश्‍यक असलेले उत्तेजन देतात. (इब्रीयांस १०:२३-२५) होय, यहोवा त्याच्या लोकांना ‘सत्याची व धर्माची’ शिकवण देत आहे. तो त्याच्या लोकांना शांती प्रदान करत आहे. ती विपुल शांती अनुभवण्यासाठी आपण किती आशीर्वादित आहोत!

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?

◻ आधुनिक दिवसात, यहोवा त्याच्या लोकांकरता ‘अतिशय संतप्त होऊन ईर्ष्यावान’ कसा बनला होता?

◻ यहोवाचे लोक युद्धग्रस्त देशांतही शांती कशी अनुभवतात?

◻ ‘नगराच्या गल्ल्या मुलामुलींनी कशा भरल्या आहेत?’

◻ यहोवाचे लोक त्याच्याकडून शिकवले जाऊ शकतील म्हणून कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत?

[१२-१५ पानांवरील तक्‍ता]

यहोवाच्या साक्षीदारांचा १९९५ चा जगव्याप्त सेवा वर्ष अहवाल

(for fully formatted text, see bond publication)

[८, ९ पानांवरील चित्रं]

सा. यु. पू. सहाव्या शतकात, ज्या विश्‍वासू यहुद्यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली त्यांनी यहोवा शांतीचा एकमेव विश्‍वसनीय स्रोत असल्याचे शिकून घेतले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा