तुम्ही मिणमिणती वात विझवाल का?
येशू ख्रिस्ताने सर्व प्रकारच्या लोकांना देव राज्याची सुवार्ता सांगितली. त्यांच्यातील अनेकजण पिळवणूक केलेले व निरुत्साहित झालेले होते. परंतु येशूने त्यांना सांत्वनदायक संदेश दिला. दुःखित लोकांची त्याला दया येत असे.
यशयाने नमूद केलेल्या भविष्यवाणीकडे लक्ष वेधून शुभवर्तमान लेखक मत्तय याने येशूची दया ठळकपणे मांडली. ख्रिस्ताद्वारे पूर्णत्वास आलेल्या शब्दांना उद्धृत करून, मत्तयाने लिहिले: “चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिणमिणती वात तो विझविणार नाही; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल.” (मत्तय १२:२०; यशया ४२:३) या शब्दांचा काय अर्थ होतो व येशूने ही भविष्यवाणी कशी पूर्ण केली?
भविष्यवाणीवर एक नजर
बोरू सामान्यतः ओलावा असणाऱ्या ठिकाणी वाढतो व त्याचे रोप मजबूत व दृढ नसते. “चेपलेला बोरू” नक्कीच दुर्बल असेल. यास्तव, येशूने शब्बाथ दिवशी ज्याला बरे केले त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्यासारख्या जुलूम केलेल्या किंवा दुःखित लोकांना ते सूचित करते. (मत्तय १२:१०-१४) परंतु वातीबद्दलच्या भविष्यसूचक संदर्भाबद्दल काय?
सा. यु. पहिल्या शतकातील सामान्य घरगुती दिवा, गोल दांडा असलेल्या घड्यासारखे मातीचे भांडे होते. दिवा बहुधा जैतूनाच्या तेलाने भरला जात होता. जवसाची वात अतिसूक्ष्म नलिकेतून ज्योतीकरता तेल वर ओढत असे. निश्चितच, ‘मिणमिणती वात’ विझणारी असेल.
लाक्षणिकरित्या चेपलेल्या बोरूप्रमाणे वाकलेल्या व गैरवागणूक दिलेल्या अनेकांना येशूने त्याचा सांत्वनदायक संदेश सांगितला. हे लोक मिणमिणत्या वातीसारखे देखील होते कारण त्यांच्या जीवनाची शेवटली ठिणगी जवळजवळ विझल्यासारखीच होती. खरोखर, जुलूम केलेले व निरूत्साहित असे ते लोक होते. तथापि, येशूने लाक्षणिकरित्या चेपलेल्या बोरूला मोडले नाही किंवा प्रतिकात्मक मिणमिणत्या वातीला विझवले नाही. त्याच्या प्रेमळ, कोमल, दयाळू शब्दांनी दुःखित लोकांना आणखी निरूत्साहित किंवा खिन्न केले नाही. त्याऐवजी, त्यांच्यासोबतच्या त्याच्या बोलण्याचा व त्याच्या व्यवहाराचा उन्नतीकारक प्रभाव पडला.—मत्तय ११:२८-३०.
आज, देखील अनेकजण नाउमेद करणाऱ्या समस्यांना तोंड देत असल्यामुळे, त्यांना दया व उत्तेजनाची गरज आहे. यहोवाचे सेवक देखील नेहमीच दृढ बुरूज ठरत नाहीत. काहीवेळेस काहीजण मिणमिणत्या वातींसारखे असतात. यास्तव, ख्रिश्चनांनी उत्तेजनात्मक असावे—जणू पंख्याने अग्नीला वारा घालावा—व अशाप्रकारे एकमेकांना बळकट करावे.—लूक २२:३२; प्रेषितांची कृत्ये ११:२३.
ख्रिस्ती या नात्याने आपण उभारणीकारक असले पाहिजे. आध्यात्मिक मदत मिळवणाऱ्या कोणालाही आपण दुर्बळ करण्याचा मुद्दामहून प्रयत्न करणार नाही. उलट, इतरांना बळकट करण्यात येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याची इच्छा आपण बाळगतो. (इब्रीयांस १२:१-३; १ पेत्र २:२१) आपल्याकडून उत्तेजनाची अपेक्षा करणाऱ्या कोणालाही आपण नकळत चिरडून टाकू शकतो ही वास्तविकताच इतरांशी व्यवहार करण्याच्या पद्धतीकडे गंभीरपणे लक्ष देण्याकरता चांगले कारण आहे. आपण निश्चितच ‘मिणमिणत्या वातीला विझवण्याची’ इच्छा बाळगत नाही. या बाबतीत कोणती शास्त्रवचनीय मार्गदर्शने आपली मदत करू शकतात?
उपहासाचे परिणाम
एखादा ख्रिश्चन ‘दोषात सापडला, तर आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांनी त्याला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’ (गलतीकर ६:१) तथापि, इतरांमध्ये चुका शोधणे व त्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेणे हे योग्य असेल का? किंवा त्यांचे सध्याचे प्रयत्न अपुरे आहेत असे सुचवून त्यांना त्याहून चांगले करण्यास लावणे, कदाचित त्यांच्यात दोषी भावना उत्पन्न करणे उचित असेल का? येशूने असे काही केल्याचा पुरावा नाही. इतरांनी सुधारावे असा आपला हेतू असला, तरी ज्यांच्यावर कठोर टीका केली जाते त्यांना दृढ होण्याऐवजी दुर्बळ झाल्यासारखे वाटते. परंतु, विधायक टीका देखील जास्त प्रमाणात केल्यास अतिशय निरुत्साहित करणारी ठरू शकते. एका प्रामाणिक ख्रिश्चनाच्या सर्व उत्तम प्रयत्नांना केवळ अमान्यता दाखवल्यास, तो प्रत्यक्षात सर्वकाही सोडून देईल व म्हणेल: ‘प्रयत्न तरी कशाला करावेत?’ खरोखर, तो प्रयत्न करण्याचे संपूर्णतः सोडून देईल.
शास्त्रवचनीय सल्ला देणे महत्त्वाचे असले, तरी ते नियुक्त वडिलांच्या व मंडळीतील इतरांच्या मनोवृत्तीचे विशेषलक्षण नसावे. ख्रिस्ती सभा प्रामुख्याने सल्ला देणे व घेणे याकरता चालवल्या जात नाहीत. त्याउलट, एकमेकांची उन्नती करण्यासाठी व उत्तेजन देण्याकरता आपण नियमितपणे भेटतो जेणेकरून सर्वजण त्यांच्या सहवासाचा व देवाला देत असलेल्या पवित्र सेवेचा आनंद घेऊ शकतात. (रोमकर १:११, १२; इब्रीयांस १०:२४, २५) एखादी गंभीर चूक व अपरिपूर्णता जिच्याकडे दुर्लक्ष करणे सुज्ञतेचे आणि प्रेमळपणाचे असेल अशा या दोहोंतील भेद आपण जाणतो तेव्हा ते किती चांगले आहे.—उपदेशक ३:१, ७; कलस्सैकर ३:१३.
लोक, टीकेऐवजी उत्तेजनाला लवकर प्रतिसाद देतात. खरे म्हणजे, कोणावर अयोग्य टीका केल्यास, ती व्यक्ती टीका केलेल्या वागणुकीलाच अधिक अनुसरेल! परंतु, त्यांची योग्यपणे प्रशंसा केली जाते त्यावेळी त्यांना उत्तेजन मिळते व सुधारणूक करण्यास ते प्रवृत्त होतात. (नीतिसूत्रे १२:१८) तथापि, आपण येशूप्रमाणे, उत्तेजन देणारे व कधीही ‘मिणमिणत्या वातीला न विझवणारे’ असू या.
तुलना करण्याबाबत काय?
इतर ख्रिश्चनांचे उत्तम अनुभव ऐकणे फार प्रेरणात्मक असू शकते. राज्य संदेशाचा प्रचार करण्यात शिष्यांना यश मिळाल्याचे ऐकल्यावर स्वतः येशूला देखील आनंद झाला. (लूक १०:१७-२१) त्याचप्रमाणे, विश्वासातील इतरांचे यश, चांगले उदाहरण किंवा निष्ठा याबद्दल आपण ऐकतो तेव्हा, आपल्याला उत्तेजन मिळते व आपल्या ख्रिस्ती मार्गाक्रमणाला धरून राहण्यास आपण अधिक दृढनिश्चयी होतो.
परंतु, ‘तुम्ही या ख्रिश्चनांइतके चांगले नाहीत व तुम्ही करत आहात त्यापेक्षा अधिक केले पाहिजे’ असे सुचवणारा अहवाल प्रस्तुत करण्यात आल्यास काय? ऐकणारा लागलीच उत्साहाने सुधारणूक करण्यास सुरवात करील का? तो निरुत्साहित होईल व विशेषतः तुलना केल्या जातात किंवा तसे सुचवले जाते तेव्हा प्रयत्न करण्याचे सोडून देण्याची शक्यता आहे. एखाद्या पालकाने आपल्या मुलाला, ‘तू तुझ्या भावासारखा का असू शकत नाहीस?’ असे विचारण्यासारखेच ते असेल. अशा टीकेमुळे चीड येऊ शकते व निरुत्साह होऊ शकतो, पण ते चागंल्या वागणुकीस चालना देईल अशी मुळीच शक्यता नाही. प्रौढांवर तुलनेचा असाच परिणाम होऊ शकेल, तसेच ज्यांच्यासोबत त्यांची तुलना केली जाते त्यांच्याबद्दल चीड निर्माण होऊ शकते.
देवाच्या सेवेत सर्वांचे एकसारखे प्रमाण असावे अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. येशूच्या एका दृष्टान्तात, एका धन्याने त्याच्या दासांना प्रत्येकी एक हजार, दोन हजार व पाच हजार चांदीचे रूपये दिले. हे “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे” देण्यात आले होते. ज्या दोन दासांनी सुज्ञतेने व्यापार करून आणखी रूपये मिळवले होते त्यांची प्रशंसा करण्यात आली कारण त्यांच्या कार्याचे वेगळे परिणाम मिळाले तरी ते विश्वासू होते.—मत्तय २५:१४-३०.
प्रेषित पौलाने उचितपणे असे लिहिले: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.” (गलतीकर ६:४) तर मग, इतरांना खरोखर उत्तेजन देण्यासाठी आपण नकारात्मक तुलना करण्याचे टाळले पाहिजे.
उभारणी करण्याचे काही मार्ग
निरुत्साहित लोकांची उभारणी करण्यास व ‘मिणमिणत्या वातीला न विझवण्यास’ आपण काय करू शकतो? तसे पाहिले तर, उत्तेजन देण्यासाठी एक विशिष्ट पद्धतच अनुसरली पाहिजे असे काही नाही. तथापि, आपण बायबलची तत्त्वे लागू केली, तर आपले शब्द निश्चितच इतरांची उभारणी करतील. यातील काही कोणते आहेत?
नम्र असा. फिलिप्पैकर २:३ येथे पौलाने “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने” काहीही न करण्यास आपल्याला आर्जवले. त्याऐवजी, आपण नम्रतेने बोलले व वागले पाहिजे. ‘लीनतेने आपण एकमेकांना आपणांपेक्षा श्रेष्ठ मानले पाहिजे.’ आपण स्वतःला एकदमच कमी लेखावे असे पौलाचे म्हणणे नव्हते. तरीही, प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे आपण समजले पाहिजे. येथे दिलेला “श्रेष्ठ” हा शब्द, एक मनुष्य “स्वतःच्या विशेषाधिकारांपासून नजर वळवून दुसऱ्या व्यक्तीच्या श्रेष्ठ देणग्यांबद्दल गांभीर्याने विचार करतो.” (जॉन अल्बर्ट बेंगल यांचे न्यू टेस्टामेंट वर्ड स्टडीझ, खंड २, पृष्ठ ४३२) आपण हे केल्यास व इतरांना श्रेष्ठ समजल्यास, त्यांच्याशी नम्रतेने व्यवहार करू.
आदर दाखवा. स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करून आपला निष्ठावान सह-विश्वासूंवर भरवसा आहे व देवाला संतुष्ट करण्याची इच्छा बाळगणाऱ्या व्यक्ती या नजरेतून आपण त्यांच्याकडे पाहतो हे आपण स्पष्ट करू शकतो. परंतु, समजा त्यांना आध्यात्मिक मदत हवी आहे. तर मग, आपण आदरणीय, प्रतिष्ठित पद्धतीने साहाय्य पुरवू या. पौलाने अशाप्रकारे म्हटले: “तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना.”—रोमकर १२:१०.
चांगले ऐकणारे असा. होय, निरुत्साही करणाऱ्या समस्यांना तोंड देणाऱ्या लोकांना उत्तेजन देण्याकरता आपण भाषणबाजी करणारे नव्हे तर चांगले ऐकणारे असले पाहिजे. तत्कालिक, वरकरणी सल्ले देण्याऐवजी खरोखर गरज भागवणारे शास्त्रवचनीय मार्गदर्शने पुरवण्यास आपण वेळ काढू या. काय म्हणायचे हे सुचत नसल्यास, बायबलचे संशोधन आपल्याला इतरांना सांत्वन देण्यास व बळकट करण्यास मदत देईल.
प्रेमळ असा. आपण ज्यांना उत्तेजन देऊ इच्छितो त्यांच्याबद्दल, प्रेम वाटले पाहिजे. यहोवाच्या सम-सेवकांच्या बाबतीत, केवळ त्यांच्या हितासाठी कार्य करण्यापलीकडेही आपले प्रेम गेले पाहिजे. त्यामध्ये उत्कट भावना असल्या पाहिजेत. यहोवाच्या सर्व लोकांबद्दल आपल्याला असेच प्रेम आहे, तर आपले शब्द त्यांच्याकरता वास्तविक उत्तेजनाचे असतील. सुधारणूक होण्यासाठी आपल्याला एखादा सल्ला देण्याची गरज भासली, तरी आपला हेतू केवळ आपले मत मांडणे नव्हे तर प्रेमळ मदत पुरवण्याचा असतो तेव्हा आपण जे बोलतो त्याचा गैरसमज होईल किंवा त्यामुळे काही हानी पोहंचेल अशी शक्यता मुळीच नसते. पौलाने उचितपणे म्हटल्याप्रमाणे, “प्रीति उन्नति करिते.”—१ करिंथकर ८:१; फिलिप्पैकर २:४; १ पेत्र १:२२.
नेहमी उभारणीकारक असा
या ‘शेवटल्या काळात’ यहोवाचे लोक अनेक परीक्षांना तोंड देतात. (२ तीमथ्य ३:१-५) म्हणूनच, त्यांच्या सहनशीलतेच्या जणू मर्यादेपर्यंत ते काहीवेळेस सहन करतात. आपले सह-उपासक विझणाऱ्या मिणमिणत्या वातींप्रमाणे असल्याचे त्यांना वाटेल असे आपण यहोवाचे सेवक या नात्याने निश्चितच काही बोलण्याची किंवा करण्याची इच्छा बाळगणार नाही.
तर मग, आपण एकमेकांना उत्तेजन द्यावे हे किती महत्त्वाचे आहे! आपण निरुत्साही सह-उपासकांशी नम्र व आदरणीय व्यवहार करून उभारणीकारक असण्याचे सर्व प्रयत्न करू या. ते आपल्यावर भरवसा ठेवून काही गुप्त गोष्टी सांगतात तेव्हा त्यांचे काळजीपूर्वक ऐकू या व देवाचे वचन, बायबल याकडे लक्ष आकर्षित करून नेहमी त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करू या. या सर्वांहून अधिक, आपण प्रेम प्रदर्शित करू या, कारण यहोवाच्या पवित्र आत्म्याचे हे फळ एकमेकांना बळकट करण्यास आपली मदत करील. एखादी ‘मिणमिणती वात विझेल’ अशा पद्धतीने आपण कधीच बोलू नये किंवा काही करू नये.