अभ्यास लेख ४६
गीत १७ निःस्वार्थ प्रेम दाखवू या
येशू—सहानुभूती दाखवणारा महायाजक
“आपला महायाजक असा नाही, जो आपल्या दुर्बलतांबद्दल सहानुभूती दाखवू शकणार नाही.”—इब्री ४:१५.
या लेखात:
येशू सगळ्यात चांगला महायाजक आहे असं आपण का म्हणू शकतो? आणि आज तो आपल्याला कोणकोणत्या मार्गांनी मदत करतोय, ते पाहा.
१-२. (क) यहोवाने त्याच्या मुलाला या पृथ्वीवर का पाठवलं? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत? (इब्री लोकांना ५:७-९)
जवळपास २,००० वर्षांआधी यहोवाने त्याच्या सगळ्यात लाडक्या मुलाला या पृथ्वीवर पाठवलं. त्याचं एक कारण म्हणजे, मानवांना पाप आणि मृत्यूतून सोडवणं आणि सैतानामुळे आलेल्या समस्या काढून टाकणं. (योहा. ३:१६; १ योहा. ३:८) यहोवाला माहीत होतं की येशूने माणसाचं जीवन जगल्यामुळे, त्याला इतरांचं दुःख समजून घेणारा आणि त्यांना सहानुभूती दाखवणारा महायाजक बनता येणार होतं. इ.स. २९ मध्ये त्याचा बाप्तिस्मा झाला तेव्हापासून तो महायाजक म्हणून काम करू लागला.a
२ माणूस म्हणून जीवन जगल्यामुळे येशूला इतरांना सहानुभूती दाखवणारा महायजक कसं बनता आलं हे आपण या लेखात पाहणार आहोत. हे समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण यामुळे आपल्याला यहोवाला प्रार्थना करायला आणि त्याच्या आणखी जवळ जायला मदत होईल; खासकरून आपल्या हातून एखादी चूक झाल्यामुळे आपण दुःखी असतो तेव्हा.—इब्री लोकांना ५:७-९ वाचा.
देवाचा लाडका मुलगा पृथ्वीवर येतो
३-४. (क) पृथ्वीवर येण्यासाठी येशूने कोणत्या गोष्टींचा त्याग केला? (ख) पृथ्वीवरचं त्याचं जीवन कसं होतं?
३ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या जीवनात काही न् काही बदल अनुभवले असतील. कदाचित आपल्याला आपल्या घरच्यांना आणि मित्रांना सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जावं लागलं असेल. अशा प्रकारचे बदल करणं खूप कठीण असतं. पण येशूने जसा बदल अनुभवला तसा बदल कोणत्याच माणसाने अनुभवला नाही. स्वर्गात सगळ्या स्वर्गदूतांमध्ये त्याचं एक महत्त्वाचं स्थान होतं. तो यहोवाचा लाडका मुलगा होता आणि नेहमी त्याच्या “उजव्या हाताला” असायचा. (स्तो. १६:११; नीति. ८:३०) असं असलं तरी, फिलिप्पैकर २:७ मध्ये म्हटलंय, की त्याने स्वतःहून “सगळ्या गोष्टींचा त्याग केला” आणि पृथ्वीवर अपरिपूर्ण माणसांसोबत राहायला आला.
४ येशूच्या जन्माच्या वेळी आणि त्यानंतरची काही वर्षं परिस्थिती कशी होती याचा विचार करा. येशूच्या आईवडिलांनी त्याच्या जन्माच्या वेळी जे बलिदान दिलं त्यावरून कळतं, की तो एका गरीब कुटुंबात जन्माला आला होता. (लेवी. १२:८; लूक २:२४) त्याच्या जन्माची बातमी दुष्ट राजा हेरोदला कळली तेव्हा त्याने त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून येशूला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाला इजिप्तला पळून जावं लागलं आणि काही काळासाठी तिथे शरणार्थी म्हणून राहावं लागलं. (मत्त. २:१३, १५) खरंच, येशूचं पृथ्वीवरचं जीवन त्याच्या स्वर्गातल्या जीवनापेक्षा किती वेगळं होतं!
५. पृथ्वीवर असताना येशूने काय पाहिलं? आणि पृथ्वीवर जीवन जगल्यामुळे त्याला सहानुभूती दाखवणारा महायाजक बनायला कशी मदत झाली? (चित्रसुद्धा पाहा.)
५ येशू पृथ्वीवर होता तेव्हा, त्याने त्याच्या आजूबाजूच्या लोकांना दुःख सहन करताना पाहिलं. आपल्या जवळच्या लोकांना मृत्यूमध्ये गमवण्याचं दुःख काय असतं हे त्यानेसुद्धा अनुभवलं यात काही शंका नाही. कदाचित, तो लहान असतानाच त्याच्या मानवी पित्याचा, योसेफचा मृत्यू झाला असावा. त्याच्या सेवाकार्याच्या वेळी त्याने बऱ्याच कुष्ठरोग्यांना, अंधांना, लकवा मारलेल्यांना आणि अशा आईवडिलांना पाहिलं ज्यांनी आपल्या मुलांना मृत्यूत गमावलंय. त्या सगळ्यांचं दुःख पाहून त्याला त्यांचा कळवळा आला. (मत्त. ९:२, ६; १५:३०; २०:३४; मार्क १:४०, ४१; लूक ७:१३) हे खरंय, की त्याने स्वर्गातूनसुद्धा लोकांना दुःख सहन करताना पाहिलं होतं. पण मानव म्हणून जगल्यामुळे तो आता त्यांचं दुःख आणखी चांगल्या प्रकारे समजू शकत होता. (यश. ५३:४) वेगवेगळ्या परिस्थितींत मानवांना कसं वाटतं आणि जीवनातल्या समस्यांमुळे त्यांना किती त्रास सहन करावा लागतो, हे तो आता पूर्णपणे समजू शकत होता. कारण तोसुद्धा थकायचा, दुःखी व्हायचा आणि त्यालाही चिंता असायच्या.
येशूला लोकांची मनापासून काळजी होती आणि त्यांना समस्येत पाहून त्याला त्यांचा कळवळा यायचा (परिच्छेद ५ पाहा)
येशू लोकांना सहानुभूती दाखवतो
६. यशया संदेष्याने वापरलेल्या शब्दचित्रांवरून आपल्याला येशूच्या दयेबद्दल आणि सहानुभूतीबद्दल काय शिकायला मिळतं? (यशया ४२:३)
६ येशू त्याच्या सेवाकार्याच्या वेळी कमजोर आणि दीनदुबळ्या लोकांशी खूप दयेने वागला. असं करून त्याने एक भविष्यवाणी पूर्ण केली. इब्री शास्त्रवचनांत काही वेळा, समृद्ध आणि मजबूत असलेल्यांची तुलना भरपूर पाणी मिळालेल्या बागेशी किंवा मोठ्या वृक्षाशी करण्यात आली आहे. (स्तो. ९२:१२; यश. ६१:३; यिर्म. ३१:१२) पण याउलट, गरीब आणि दीनदुबळ्या लोकांची तुलना गवताच्या वाकलेल्या काडीशी आणि मिणमिणत्या वातीशी करण्यात आली आहे. (यशया ४२:३ वाचा; मत्त. १२:२०) या शब्दचित्रांचा वापर करून येशू गरीब आणि दीनदुबळ्या लोकांशी कसा वागणार होता हे यशया संदेष्ट्याने, देवाच्या प्रेरणेने सांगितलं. येशू अशा लोकांशी खूप प्रेमाने आणि दयेने वागणार होता.
७-८. येशूने यशयाची भविष्यवाणी कशी पूर्ण केली?
७ आनंदाच्या संदेशाचं एक पुस्तक लिहिणारा लेखक मत्तय याने यशयाचे हे शब्द येशूला लागू केले: “तो गवताची वाकलेली काडी तोडणार नाही आणि मिणमिणती वात विझवणार नाही.” समाजात तुच्छ समजल्या जाणाऱ्या आणि भविष्याची काहीच आशा नसलेल्या लोकांना येशूच्या काही चमत्कारांचा खूप फायदा झाला. उदाहरणार्थ, येशू एकदा एका कुष्ठरोग्याला भेटला. कदाचित तो कुष्ठरोगी, मी कधी बरा होईन का? मला कधी माझ्या घरच्यांसोबत आणि मित्रांसोबत राहता येईल का? असा विचार करत असेल. (लूक ५:१२, १३) तसंच, येशू एकदा एका बहिऱ्या माणसाला भेटला. त्याला स्पष्टपणे बोलताही येत नव्हतं. विचार करा, तो इतरांना बोलताना पाहत असेल आणि त्याला त्यांचं बोलणं काहीच कळत नसेल तेव्हा त्याला नेमकं कसं वाटत असेल? (मार्क ७:३२, ३३) पण या बिचाऱ्या लोकांना फक्त एवढंच सोसावं लागत नव्हतं.
८ येशूच्या दिवसांत बऱ्याच यहुदी लोकांची आजारी आणि अपंग लोकांबद्दल एक चुकीची समज होती. त्यांना वाटायचं की असे लोक त्यांच्या किंवा त्यांच्या आईवडिलांच्या पापांची फळं भोगत आहेत. (योहा. ९:२) या चुकीच्या समजूतीमुळे समाजातले लोक अशा दीनदुबळ्या लोकांशी खूप वाईट वागायचे. पण येशूने यशयाची भविष्यवाणी पूर्ण केली आणि अशा दीनदुबळ्या लोकांना बरं केलं. तसंच, देवाला त्यांची काळजी असल्याचीसुद्धा त्याने त्यांना जाणीव करून दिली. पण आपल्याला यातून कशाची खातरी मिळते?
९. स्वर्गातला आपला महायाजक अपरिपूर्ण मानवांना सहानुभूती दाखवतो हे इब्री लोकांना ४:१५, १६ वरून आपल्याला कसं म्हणता येईल?
९ इब्री लोकांना ४:१५, १६ वाचा. आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो की, येशू नेहमी आपल्याला सहानुभूती दाखवेल. ज्या ग्रीक शब्दाचं भाषांतर “सहानुभूती” असं करण्यात आलंय, त्याचा अर्थ त्रासात असलेल्या व्यक्तीला पाहून कळवळा वाटणं असा होतो. (इब्री लोकांना १०:३४ सुद्धा पाहा, इथे पौलने हेच ग्रीक क्रियापद वापरलं.) येशूने केलेल्या चमत्कारांवरून हे समजतं की इतरांना दुःखात पाहून त्याला खूप वाईट वाटलं. त्याने लोकांना फक्त बरं करायचं म्हणून केलं नाही. तर, त्याला त्यांची काळजी होती आणि त्यांना मदत करायची त्याची मनापासून इच्छा होती. उदाहरणार्थ, त्याने जेव्हा एका कुष्ठरोग्याला बरं केलं तेव्हा त्याने त्याला स्पर्श केला. खरंतर तो लांबूनही त्याला बरं करू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. कदाचित त्या कुष्ठरोग्याला स्पर्श करणारा पहिला व्यक्ती येशूच असावा! तसंच, एकदा एका बहिऱ्या माणसाला बरं करण्यासाठी तो त्याला लोकांच्या गर्दीतून दूर एका शांत ठिकाणी घेऊन गेला. त्यासोबतच जेव्हा एका पश्चातापी स्त्रीने तिच्या अश्रूंनी येशूचे पाय धुतले आणि तिच्या केसांनी ते पुसले, तेव्हा एका परूश्याने तिच्याकडे खालच्या नजरेने पाहिलं. पण येशूने त्याला दटावलं आणि ठामपणे त्या स्त्रीची बाजू घेतली. (मत्त. ८:३; मार्क ७:३३; लूक ७:४४) येशूने आजारी लोकांकडे किंवा गंभीर पापं केलेल्यांकडे पाठ फिरवली नाही. याउलट त्याने त्यांना स्वतःजवळ येऊ दिलं. येशूने जितकी सहानुभूती त्यांना दाखवली तितकीच तो आज आपल्यालाही दाखवतोय.
आपण आपल्या महायाजकाचं अनुकरण करतो
१०. ऐकता आणि पाहता येत नसलेल्यांना मदत करण्यासाठी आपण कोणत्या आध्यात्मिक तरतुदींचा उपयोग करू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
१० आपण येशूचे खरे शिष्य आहोत. म्हणून आपण येशूसारखंच लोकांवर प्रेम करतो, त्यांना दया आणि सहानुभूती दाखवतो. (१ पेत्र २:२१; ३:८) येशूसारखं चमत्कार करून आपण बहिऱ्यांना आणि अंधांना बरं करू शकत नसलो तरी आपण त्यांना यहोवाच्या जवळ यायला मदत करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्या संघटनेने १०० पेक्षा जास्त साईन लँग्वेजमध्ये बायबलवर आधारित प्रकाशनं उपलब्ध केली आहेत. आणि ज्यांना पाहता येत नाही त्यांच्यासाठी ६० पेक्षा जास्त भाषांमध्ये ब्रेलमधली प्रकाशनं उपलब्ध केली आहेत. तसंच, १०० पेक्षा जास्त भाषांमधल्या व्हिडिओसाठी ऑडिओ डिस्क्रिप्शन उपलब्ध आहेत. या तरतुदींमुळे ऐकता आणि पाहता येत नसलेल्यांना यहोवाच्या आणि त्याच्या मुलाच्या आणखी जवळ यायला मदत होते.
बायबलवर आधारित आपली प्रकाशनं १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत
डावीकडे: १०० पेक्षा जास्त साईन लँग्वेजमध्ये
उजवीकडे: ६० पेक्षा जास्त ब्रेल भाषांमध्ये
(परिच्छेद १० पाहा)
११. यहोवाची संघटना इतरांना येशूसारखीच सहानुभूती कशा प्रकारे दाखवते? (प्रेषितांची कार्यं २:५-७, ३३) (चित्रंसुद्धा पाहा.)
११ सगळ्या प्रकारच्या लोकांना यहोवाबद्दल शिकता यावं म्हणून आपली संघटना खूप मेहनत घेत आहे. येशूच्या पुनरुत्थानानंतर काय झालं याचा विचार करा. पेन्टेकॉस्ट सणाच्या दिवशी येशूने त्याच्या शिष्यांवर पवित्र शक्ती ओतली. यामुळे त्यांना तिथे जमलेल्यांना त्यांच्या भाषेत आनंदाचा संदेश सांगता आला. (प्रेषितांची कार्यं २:५-७, ३३ वाचा.) आज आपल्या संघटनेने येशूच्या मार्गदर्शनाखाली १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये बायबलवर आधारित प्रकाशनं उपलब्ध केली आहेत. यातल्या काही भाषा तर खूप कमी लोक बोलतात. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत अशा काही अमेरिंडिएन भाषा बोलल्या जातात, ज्या फक्त थोड्याफार लोकांनाच येतात. तरीसुद्धा या भाषांमधल्या १६० पेक्षा जास्त भाषांमध्ये आपली प्रकाशनं उपलब्ध आहेत. तसंच, २० पेक्षा जास्त रोमानी भाषांमध्ये आपली प्रकाशनं उपलब्ध आहेत. या भाषा बोलणाऱ्या हजारो लोकांना सत्याबद्दल जाणून घेता आलंय.
डावीकडे: १६० पेक्षा जास्त अमेरिंडिएन भाषांमध्ये
उजवीकडे: २० पेक्षा जास्त रोमानी भाषांमध्ये
(परिच्छेद ११ पाहा)
१२. यहोवाची संघटना आणखी कोणकोणत्या मार्गांनी इतरांची मदत करते?
१२ आपली संघटना लोकांना आनंदाचा संदेश सांगण्यासोबतच, नैसर्गिक विपत्तींमुळे नुकसान झालेल्यांना मदतही करते. गरज असलेल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी हजारो स्वयंसेवक तयार असतात. आपल्याला देवाबद्दल शिकण्यासाठी एकत्र येता यावं, म्हणून आपली संघटना उपासनेसाठी राज्यसभागृहसुद्धा तयार करते.
आपला महायाजक आपल्याला मदत करू शकतो
१३. येशू आपल्याला कोणकोणत्या मार्गांनी मदत करतो?
१३ चांगला मेंढपाळ या नात्याने येशू आपल्यापैकी प्रत्येकाच्या आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देतो. (योहा. १०:१४; इफिस. ४:७) कधीकधी, परिस्थितीमुळे आपल्याला गवताच्या वाकलेल्या काडीसारखं किंवा मिणमिणत्या वातीसारखं वाटू शकतं. कदाचित गंभीर आजारामुळे, आपण केलेल्या चुकांमुळे किंवा भाऊबहिणींसोबत मतभेद झाल्यामुळे आपण निराश होऊ शकतो. अशा वेळी आपल्या समस्यांपलिकडे पाहणं आणि भविष्यातल्या आशेवर लक्ष लावणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. पण नेहमी लक्षात असू द्या, आपण कोणत्या परिस्थितीतून जातोय आणि आपल्याला कसं वाटतंय हे येशू पाहतो. येशूला आपल्याबद्दल सहानुभूती वाटत असल्यामुळे त्याला आपल्याला मदत करावीशी वाटते. उदाहरणार्थ, आपण कमजोर असतो, तेव्हा तो पवित्र शक्तीचा वापर करून आपल्याला ताकद देतो. (योहा. १६:७; तीत ३:६) इतकंच काय, तर आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी तो “माणसांच्या रूपात भेटी” असलेल्यांचा आणि भाऊबहिणींचाही वापर करतो.—इफिस. ४:८.
१४. आपण निराश होतो तेव्हा आपण काय करू शकतो?
१४ जर तुम्ही निराश झाला असाल, तर नेहमी लक्षात ठेवा की येशू आपला महायाजक आहे. यहोवाने येशूला फक्त खंडणी बलीदान द्यायला या पृथ्वीवर पाठवलं नाही, तर त्याला अपरिपूर्ण माणसांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेता याव्यात यासाठीसुद्धा पाठवलं. हे खरंय, की आपण आपल्या पापांमुळे किंवा कमतरतेमुळे कधीकधी निराश होऊ शकतो. पण येशू “आपल्याला मदतीची गरज असेल,” तेव्हा मदत करायला नेहमी तयार असतो.—इब्री ४:१५, १६.
१५. स्टिवन नावाच्या भावाला मंडळीत पुन्हा यायला कशामुळे मदत झाली?
१५ यहोवाच्या कळपापासून दूर गेलेल्यांना शोधण्यासाठीसुद्धा येशू त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करतो. (मत्त. १८:१२, १३) स्टिवनb नावाच्या भावाच्या उदाहरणाचा विचार करा. या भावाला मंडळीतून काढून १२ वर्षं झाली होती. त्यानंतर त्याने सभेला यायचं ठरवलं. तो म्हणतो: “मला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. पण मला पुन्हा एकदा यहोवाच्या प्रेमळ कुटुंबाचा भाग व्हायचं होतं. मला भेटायला आलेल्या वडिलांनी माझं खूप प्रेमाने स्वागत केलं. कधीकधी मी केलेल्या चुकांमुळे मी खूप निराश व्हायचो. आणि मला हे जमणार नाही असं मला वाटायचं. पण भावांनी मला याची आठवण करून दिली, की मी हार मानू नये अशी यहोवाची आणि येशूची इच्छा आहे. मला मंडळीत पुन्हा घेण्यात आलं, तेव्हा संपूर्ण मंडळीने माझं आणि माझ्या कुटुंबाचं प्रेमाने स्वागत केलं. काही काळाने माझी बायको बायबलचा अभ्यास करू लागली. आणि आज मी आणि माझं संपूर्ण कुटुंब मिळून यहोवाची सेवा करत आहोत.” आपण पश्चाताप करणाऱ्यांना मंडळीत पुन्हा यायला मदत करतो तेव्हा आपल्या प्रेमळ महायाजकाला नक्कीच खूप आनंद होत असेल!
१६. आपल्याला सहानुभूती दाखवणाऱ्या आपल्या महायाजकाबद्दल कसं वाटतं?
१६ येशू पृथ्वीवर असताना त्याने बऱ्याच लोकांना मदत केली. आज आपल्याला मदतीची गरज असते, तेव्हा तो आपल्याला अगदी योग्य वेळी मदत करेल यावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. तसंच, येणाऱ्या नवीन जगात आज्ञाधारक मानवांना तो पाप आणि अपरिपूर्णतेतून कायमचं मुक्त होण्यासाठीसुद्धा मदत करेल. यहोवाने प्रेमाने आणि दयेने प्रवृत्त होऊन येशूला आपला महायाजक म्हणून नेमलंय, यासाठी आपण त्याचे किती आभारी आहोत!
गीत १३ ख्रिस्ताचा आदर्श
a येशू महायाजक बनल्यामुळे यहुदी महायाजकाची गरज का उरली नाही याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी ऑक्टोबर २०२३ च्या टेहळणी बुरूज अंकातल्या पान २६ वरच्या “यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात उपासना करण्याच्या बहुमानाची कदर करा” या लेखाचे परिच्छेद ७-९ पाहा.
b नाव बदलण्यात आलं आहे.