राज्य घोषकांचा वृत्तान्त
ग्रीनलँडच्या दूरच्या खेड्यांपर्यंत पोहंचणे
यहोवाचे साक्षीदार सुवार्तेचा प्रचार करण्यामध्ये कित्येक दशकांपासून टेहळणी बुरूज व सावध राहा! या नियतकालिकांचा उपयोग करीत आले आहेत. ही नियतकालिके यहोवाचे वचन बायबलमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या त्याच्या सुज्ञानाला उंचावून धरतात. ते बायबलच्या भविष्यवाणींशी निगडित असणाऱ्या जागतिक घटनांवर लक्ष ठेवतात आणि बायबलच्या व्यवहार्य सल्ल्यास समकालीन समस्यांना लागू करतात.—याकोब ३:१७.
ग्रीनलँडमधील साक्षीदारांनी १९९४ मध्ये टेहळणी बुरूज व सावध राहा! यांचे शक्यतो अधिक लोकांना सादर करण्याचा खास प्रयत्न केला. उन्हाळ्यात त्यांनी ग्रीनलँडच्या अत्यंत दूरवरील काही खेड्यापर्यंत भेट देण्याकरता योजना केल्या. राज्य घोषकांच्या एका गटाने बोटीने पश्चिम किनाऱ्याच्या वरील भागात ग्रॉनॉर्ग (थुले) पर्यंत ४,००० पेक्षा अधिक किलोमीटर्सचा प्रवास केला आणि पृथ्वीच्या अत्यंत उत्तरेकडील खेड्यापर्यंत भेट दिली. त्यांच्या प्रवासाला सात आठवडे लागले. पूर्वेच्या किनाऱ्यावर एक साक्षीदार जोडपे इडॉर्गग्रॉरडॉरमीट येथील खेड्यापर्यंत गेले आणि त्यांनी सुवार्तेद्वारे ते क्षेत्र पहिल्यांदाच पद्धतशीरपणे उरकले.
त्या वर्षी सुरवातीला एप्रिल महिन्यात ग्रीनलँडच्या लोकांमध्ये टेहळणी बुरूज व सावध राहा! यांच्या ७,५१३ प्रतींचे वाटप करण्यात आले. याचा अर्थ, एकंदर १२७ राज्यघोषकांपैकी प्रत्येकाने सरासरी ५९ नियतकालिके वाटली—दर ७ निवासियांमध्ये १ नियतकालिक. त्या महिन्यात सावध राहा! यामध्ये “स्तनाचा कर्करोग—प्रत्येक स्त्रीचे भय” या मुखपृष्ठावरील शीर्षकाखाली लेखांची मालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. एका महिला साक्षीदाराने १४० नियतकालिकांचे वाटप केले; तिने या सावध राहा! नियतकालिकाच्या काही प्रती एका दूरचित्रवाणीच्या महिला बातमीदाराला दिल्या. दोन एक दिवसांनी दूरचित्रवाणीवरील बातम्यांच्या कार्यक्रमात स्तनाच्या कर्करोगावरील लेख सादर करण्यात आले. बातमीदाराने ते नियतकालिक कॅमेऱ्यासमोर धरले व त्यातील कित्येक पाने उघडून दाखवली व ग्रीनलँडिक भाषेत करण्यात आलेल्या भाषांतराच्या उत्तम दर्जाची स्तुती केली. तिने सावध राहा! नियतकालिकात आजार टाळण्याजोग्या आरोग्य विषयक दक्षतेच्या अनुषंगाने देण्यात आलेले व्यावहारिक प्रस्ताव देखील ठळकपणे दाखवले.
ज्या महिला साक्षीदाराने आधी ते नियतकालिक बातमीदाराला दिले होते तिची त्याच दूरचित्रवाणी कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली. तिने यहोवाच्या साक्षीदारांबद्दल बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्या महिन्यातील नियतकालिकांच्या विस्तृत वाटपाबद्दलची माहिती दिली. तिने बायबलमध्ये आढळणाऱ्या व्यावहारिक सुज्ञानावर देखील विवेचन केले आणि त्यातील व्यवहार्य सल्ला आजच्या समस्यांना हाताळण्यात कसा मदतगार ठरू शकतो ते दाखवले.
हा कार्यक्रम ग्रीनलँडिक कॅन्सर सोसायटीच्या महिला अध्यक्षांच्या मुलाखतीने संपला. त्यांनी म्हटले की, या विषयावरील इतके सुंदर माहितीपूर्ण साहित्य त्यांच्या भाषेत त्यांनी कधीच पाहिले नव्हते. नंतर त्यांनी, आस्थेवाईक असणाऱ्या सर्वांना सावध राहा! यामधील स्तनाच्या कर्करोगाबद्दलचा विषय वाचण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी म्हटले की, यहोवाच्या साक्षीदारांनी स्वतःहून हा पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे कृतज्ञ राहण्याचे चांगले कारण आहे.
ग्रीनलँडप्रमाणेच यहोवाचे साक्षीदार जगभर “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्तेचा प्रचार करण्याचे चालू ठेवून आहेत. (कलस्सैकर १:२३; प्रेषितांची कृत्ये १:८) टेहळणी बुरूज व सावध राहा! यांच्यासहित बायबलच्या इतर प्रकाशनांद्वारे ते सर्व प्रकारच्या लोकांना आधुनिक काळातील समस्यांना तोंड देण्याची मदत करतात, तसेच त्यांना एका चांगल्या भवितव्याची सुद्धा आशा देतात.
[८ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
ग्रॉनॉर्ग (थुले)
इडॉर्गग्रॉरडॉरमीट
नुक (गॉडथाब)