बहिष्कृत करणे प्रेमळ तरतूद?
“पवित्र, पवित्र, पवित्र . . . सर्वसमर्थ प्रभू [यहोवा, NW] देव.” (प्रकटीकरण ४:८) त्या वर्णनाच्या एकवाक्यतेत, यहोवा पवित्र दर्जांचा उगम आहे. हे दर्जे ‘पवित्र शास्त्रात’ लिहिलेले आहेत व ख्रिश्चनांना त्या सूचना पाळणे बंधनकारक आहे. होय, त्यांनी यहोवाच्या नजरेतील प्रत्येक अशुद्ध गोष्ट टाळलीच पाहिजे.—२ तीमथ्य ३:१५; यशया ५२:११.
बायबल स्पष्टपणे आज्ञा देते: “तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीहि सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.’“ (१ पेत्र १:१५, १६) ख्रिस्ती मंडळी १९ शतकांपूर्वी अस्तित्वात आल्यापासून, आध्यात्मिक आणि नैतिक अशुद्धतेपासून तिचे संरक्षण करण्यासाठी खरे ख्रिस्ती खूप झटले आहेत.—यहूदा ३.
संरक्षणाची गरज का आहे
देवाचे सर्व सेवक नैतिकरीत्या आणि आध्यात्मिकरीत्या शुद्ध राहण्याच्या आव्हानाला तोंड देत असतात. त्यासाठी, तीन शक्तिशाली शत्रूंचा प्रतिकार केला पाहिजे—सैतान, त्याचे जग आणि आपला पापी दैहिक कल. (रोमकर ५:१२; २ करिंथकर २:११; १ योहान ५:१९) सैतानाचे जग तुम्हाला अनैतिक होण्यास, त्याचे मार्ग अंगीकारण्यास भुरळ पाडील व तुम्हाला भौतिक संपत्ती, नावलौकिक, हुद्दा, प्रसिद्धी आणि अधिकार देईल. परंतु खऱ्या उपासनेचा पाठलाग करण्याचा दृढनिश्चय केलेले, सैतान जे काही सादर करतो त्याला नाकारतात आणि “जगापासून निष्कलंक” राहतात. का बरे? कारण त्यांना यहोवाच्या शुद्ध संघटनेच्या संरक्षणात्मक आणि प्रेमळ काळजीच्या अधीन राहण्याची इच्छा आहे.—याकोब १:२७; १ योहान २:१५-१७.
मानवी अपरिपूर्णतेमुळे सैतानाच्या मोहाला बळी पडलेल्या ख्रिस्ती मंडळीतील कोणत्याही सदस्यासाठी यहोवाने साहाय्य पुरवले आहे. आध्यात्मिक योग्यता असलेल्या वडिलांना मंडळीचे संरक्षण करण्यासाठी आणि चुका करणाऱ्यांना प्रेमळपणे त्यांच्या पापाबद्दल पश्चात्ताप करून सुधारणा करण्यासाठी तसेच बरे होण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा पुरवण्यासाठी नेमले आहे. चुका करणाऱ्या कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीला पश्चात्ताप करण्यास व त्याचा मार्ग बदलण्यास सहनशीलतेने मदत केली पाहिजे.—गलतीकर ६:१, २; याकोब ५:१३-१६.
बहिष्कृत करणे प्रेमळपणा कसा
जाणूनबुजून दुष्ट मार्ग अनुसरणाऱ्या व बदल करण्यास नकार दर्शवणाऱ्या यहोवाच्या बाप्तिस्मा प्राप्त सेवकाला अपश्चात्तापी व ख्रिस्ती सहवासासाठी अयोग्य असे समजले पाहिजे. (पडताळा १ योहान २:१९.) अशा प्रकारच्या लोकांना शुद्ध ख्रिस्ती मंडळीत राहून तिला दूषित करण्यास वाव दिला जाऊ शकत नाही. त्यांना बहिष्कृत केलेच पाहिजे.
वाईट कृत्ये आचरणाऱ्यांना बहिष्कृत करण्याच्या उचिततेचे उदाहरण खालील परिस्थितीत स्पष्ट केले जाऊ शकते: विद्यार्थ्यांविरुद्ध हल्ले आणि हिंसात्मक गुन्हे यांमध्ये वाढ होत असल्यामुळे, काही शाळांनी, “शस्त्रांचा उपयोग करणारे किंवा त्यांचा वापर करण्याचा धाक देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरुपी निलंबन” म्हटले जाणारे धोरण अंगीकारले आहे असे टोरंटो, कॅनडातील द ग्लोब ॲण्ड मेल या वृत्तपत्राने अहवाल दिला. निलंबित करण्याची ही व्यवस्था हिंसात्मक कृत्यांना बळी न पडता शैक्षणिक कार्यक्रमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आहे.
अपश्चात्तापी अपराध्याला मंडळीतून बहिष्कृत करणे प्रेमळपणाचे का आहे? असे करणे यहोवाबद्दलची आणि त्याच्या मार्गांबद्दलची प्रीती व्यक्त करण्याची एक अभिव्यक्ती आहे. (स्तोत्र ९७:१०) हे कृत्य, धार्मिक मार्गाक्रमण करू इच्छिणाऱ्या व्यक्तींबद्दल प्रीती प्रदर्शित करते, कारण त्यामुळे अशा लोकांवर वाईट प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तीलाच बाहेर काढण्यात येते. शिवाय ते मंडळीच्या शुद्धतेलाही सुरक्षित ठेवते. (१ करिंथकर ५:१-१३) मंडळीमध्ये घोर अनैतिकतेला किंवा आध्यात्मिक अशुद्धतेला अनुमती दिल्यास ती अशुद्ध झाली असती आणि पवित्र असलेल्या यहोवाची सेवा करण्यास अनुचित स्थान बनली असती. शिवाय, अपराध्याचे हे बहिष्कृत करणे त्याला त्याच्या स्वच्छंदी मार्गाचे गांभिर्य पाहण्यास, पश्चात्ताप करण्यास व आवश्यक त्या सुधारणा करून मंडळीमध्ये पुन्हा एकदा स्वीकृत होण्यासाठी मदत करील.
इतरांवर त्याचा परिणाम
मंडळीतील कोणा सदस्याने, एखादे गंभीर पाप जसे की व्यभिचार केले तर तो मुळीच यहोवाचे अंतःकरण आनंदित करीत नाही. (नीतिसूत्रे २७:११) आणि लैंगिक अनैतिकतेला बळी पडणारा कोणताही ख्रिस्ती खरोखरच, पोटीफरच्या बायकोने तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यास योसेफाला गळ घातली तेव्हा त्याचा जो विचार होता त्याप्रकारचा विचार करत नाही. “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” अशी योसेफाची प्रतिक्रिया होती. (उत्पत्ती ३९:६-१२) योसेफाने यहोवाच्या पवित्र दर्जांचा आदर केला आणि तेथून पळून गेला. दुसऱ्या बाजूला पाहता, व्यभिचारी व्यक्तीमध्ये, स्वतःच्या दैहिक वासनेला तृप्त करण्यापासून परावृत्त होण्यासाठी देवाबद्दलच्या पुरेशा प्रीतीची उणीव असते.—गलतीकर ५:१९-२१.
देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करणारी बाप्तिस्मा प्राप्त व्यक्ती, विश्वासातील तिच्या नातेवाईकांना पोचणारी हानी आणि दुःख याबद्दल जरा देखील चिंता प्रदर्शित करीत नसते. मानसिक परिणाम, एखादा सहन करू शकण्यापेक्षाही अधिक असतो. “तुम्हाला किती इजा पोहंचली आहे किंवा आपला किती मनोभंग झाला आहे हे फार कमी बंधू आणि भगिणी, जर असतील तर, समजू शकतात. . . . आपल्या अंतःकरणाचा चुराडा होऊन जातो,” असा विलाप एका ख्रिस्ती स्त्रीने केला जेव्हा तिचा मुलगा अनैतिक असल्याचे तिला समजले. संपूर्ण कुटुंबाच्या नावलौकिकतेबद्दल संशय घेतला जातो. निराशा आणि काही प्रमाणात दोषी भावना विश्वासू कौटुंबिक सदस्यांना पीडित करू शकते. अशा प्रकारे एका अपराध्याचा कुमार्ग कुटुंबावर दुःख ओढवतो.
कौटुंबिक सदस्यांसाठी प्रेमळ मदत
बहिष्कृत करणे प्रेमळ आणि संरक्षणात्मक असते, हे बहिष्कृत व्यक्तीच्या विश्वासू ख्रिस्ती कौटुंबिक सदस्यांनी ध्यानात ठेवावे. अपराध्याला मदत करण्यासाठी शक्य तो प्रत्येक प्रयत्न केला जातो. परंतु तो जर देवाची अवज्ञा करतो आणि हट्टीपणाने अपश्चात्तापी आहे तर मंडळीचे संरक्षण केले पाहिजे व याला काहीही पर्याय नसून “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या” या देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनानुसार कार्य केलेच पाहिजे. (१ करिंथकर ५:१३) एका साक्षीदाराने म्हटल्याप्रमाणे, “बहिष्कृत करणे, यहोवाला निष्ठा दाखवण्याची एक बाब आहे.”
एखाद्या कौटुंबिक सदस्याला बहिष्कृत करण्यात येते तेव्हा, ख्रिस्ती नातेवाईकांना दुःख होते. यास्तव, नियुक्त वडिलांनी होता होईल तितके त्यांना आध्यात्मिकरीत्या तजेला देणारे असले पाहिजे. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) वडीलजन त्यांच्यासाठी आणि त्यांच्याबरोबर प्रार्थना करू शकतात. बहुतेक वेळा या विश्वासू ख्रिश्चनांना भेट देऊन त्यांच्यासोबत उभारणीकारक शास्त्रवचनीय विचारांची चर्चा करता येते. कळपाच्या मेंढपाळांनी या प्रिय जनांना आध्यात्मिकरीत्या बळकट करण्यासाठी ख्रिस्ती सभांच्या आधी आणि नंतर प्रत्येक संधीचा उपयोग करावा. त्यांच्यासोबत क्षेत्र सेवेमध्ये जाऊन त्यांना आणखी उत्तेजन दिले जाऊ शकते. (रोमकर १:११, १२) आध्यात्मिक मेंढपाळांनी, यहोवाच्या या विश्वासू सेवकांना ते पात्र असलेली प्रीती आणि लक्ष दिले पाहिजे.—१ थेस्सलनीकाकर २:७, ८.
एखाद्या व्यक्तीच्या पापी मार्गाक्रमणामुळे, यहोवाला विश्वासू राहिलेल्या तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडे दुर्लक्ष करण्याचे काहीच कारण नाही. इस्राएलचा दुष्ट राजा शौलाला देवाने नाकारले, पण यामुळे दावीदाने शौलाचा पुत्र योनाथान याला प्रीती दाखवण्यात खंड पडू दिला नाही. वास्तविक पाहता, दावीद आणि योनाथान यांच्यामधील बंधन खूपच बळकट बनले. (१ शमुवेल १५:२२, २३; १८:१-३; २०:४१) यास्तव मंडळीतील सर्वांनी, यहोवाविरुद्ध पाप करणाऱ्यांच्या ख्रिस्ती नातेवाईकांना आधार दिला पाहिजे व प्रीती दाखवली पाहिजे.
अशा विश्वासू जणांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांच्याशी निर्दयीपणे वागणे किती निष्ठुरतेचे असेल! निष्ठावान कौटुंबिक सदस्यांना उत्तेजनाची खास गरज आहे. त्यांना एकाकी आणि त्यांची परिस्थिती अतिशय कठीण वाटेल. तुम्ही कदाचित त्यांना दूरध्वनीने काही आध्यात्मिक मनोरंजक गोष्टी किंवा एखादा उभारणीकारक अनुभव सांगू शकता. बहिष्कृत व्यक्तीने फोन उचलला तर तुम्हाला ख्रिस्ती नातेवाईकाबरोबर बोलायचे आहे असे केवळ सांगा. अशा घराण्यातील विश्वासू सदस्यांना तुम्ही कदाचित एखाद्या स्नेहसंमेलनाला किंवा तुमच्या घरी भोजनाकरता आमंत्रित करू शकता. खरेदी करताना तुम्ही त्यांना भेटला तर उभारणीकारक सहवासासाठी तुम्ही त्या प्रसंगाचा उपयोग करू शकता. लक्षात ठेवा, बहिष्कृत नातेवाईक असलेले निष्ठावान ख्रिस्ती अजूनही यहोवाच्या शुद्ध संघटनेचे भाग आहेत. ते सहजपणे एकाकी व निरुत्साहित होऊ शकतात. यास्तव, त्यांना दया आणि प्रीती दाखवण्यास नेहमी दक्ष असा. तुमच्या “विश्वासाच्या घराण्यांतल्यांचे बरे” करीत राहा.—गलतीकर ६:१०, पंडिता रमाबाई भाषांतर.
यहोवाच्या तरतुदीची गुणग्राहकता बाळगा
यहोवा देव त्याच्या उपासकांच्या जगव्याप्त कुटुंबातील प्रत्येक सदस्याची कोमलतेने काळजी घेतो यासाठी आपण किती आभारी असू शकतो. त्याच्या संघटनेद्वारे त्याने आपल्याला त्याच्या समोर धार्मिक मार्गाने चालण्यास मदत मिळावी म्हणून प्रेमळपणे व्यवस्था केली आहे. एखाद्या कौटुंबिक सदस्याने जाणुनबुजून पाप केले आणि त्याला मंडळीतून बहिष्कृत करावे लागले तरी, त्या व्यक्तीने पश्चात्ताप केला तर तिला मंडळीत पुन्हा येण्यासाठी एक मार्ग आहे. हे पुढील उदाहणावरून दाखवण्यात आले आहे:
वडिलांनी एका स्त्रीला, आपण तिला ॲना म्हणू, मदत करण्याचा प्रयत्न केला होता, पण ती धूम्रपान, मद्यपान, आणि मादक पदार्थांचे सेवन करण्याकडे वळाली. ती अपश्चात्तापी होती व मंडळीत राहली नाही. परंतु, लगेचच यहोवाच्या शुद्ध मंडळीतील प्रेमळ सहवास मिळत नसल्याचा पस्तावा ॲनाला होऊ लागला आणि तिने मदतीसाठी यहोवाकडे प्रार्थना केली. वडील जन, भटकलेल्यांची किती काळजी घेतात याची पूर्ण गुणग्राहकता तिने बाळगली नव्हती हे तिने कबूल केले. ॲना पुन्हा एकदा सभांना उपस्थित राहू लागली आणि त्यामुळे तिने पश्चात्ताप व्यक्त केला. त्यानंतर, तिला प्रेमळ आणि संरक्षणात्मक मंडळीमध्ये पुन्हा स्वीकारण्यात आले. पुन्हा एकदा, ॲना नैतिकतेविषयी असलेल्या यहोवाच्या उच्च दर्जांनुरूप वागत आहे. वडिलांनी दाखवलेल्या प्रीतीबद्दल ती कृतज्ञ आहे व असेही म्हणते: “ख्रिस्ती प्रकाशने माझ्यासाठी किती मदतदायी ठरली आहेत याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. यहोवा खरोखरच आपल्या गरजांकडे चांगल्या प्रकारे लक्ष देतो.”
होय, मंडळीतून बहिष्कृत झालेले परंतु काही काळानंतर पश्चात्ताप करणाऱ्यांसाठी यहोवाने मागे वळण्याचा मार्ग पुरवला आहे. आपण पाहिल्याप्रमाणे बहिष्कृत करणे हीच एक प्रेमळ तरतूद आहे. परंतु त्यापेक्षा, आपल्या पवित्र देवाच्या धार्मिक मार्गांना नेहमी जडून राहून हा दुःखद अनुभव टाळणे किती उत्तम आहे बरे! यहोवाच्या शुद्ध, प्रेमळ आणि सुरक्षित संघटनेचे भाग या नात्याने त्याची स्तुती करण्याच्या सुहक्कासाठी आपण नेहमी कृतज्ञ असू या.
[२६ पानांवरील चित्रं]
मंडळीतून बहिष्कृत केलेल्यांच्या विश्वासू नातेवाईकांना तुम्ही प्रीती दाखवत आहात का?