वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 १०/८ पृ. २५-२६
  • बहिष्कृती ही एक प्रेमळ तरतूद का आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बहिष्कृती ही एक प्रेमळ तरतूद का आहे
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ती देवाच्या नावाला समर्थन देते
  • ती मंडळीस सुरक्षित ठेवते
  • वैयक्‍तिकांसाठी संरक्षण
  • देवाकडे परत या
  • बहिष्कृत करणे—एक प्रेमळ तरतूद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • शांतीकारक फळ देणारी शिस्त
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • यहोवाची शिक्षा नेहमी स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • बहिष्कृत करणे प्रेमळ तरतूद?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९६
g96 १०/८ पृ. २५-२६

बायबलचा दृष्टिकोन

बहिष्कृती ही एक प्रेमळ तरतूद का आहे

धर्मबाह्‍य करणे—याची कल्पना करताच अनेक धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांच्या मनांत संमिश्र भावना उत्पन्‍न होतात.a धर्मांत कोणत्या न कोणत्या प्रकारची शिक्षा असणे अगत्याचे आहे या विचाराशी बरेचसे लोक सहमत आहेत. तथापि अनेकजण, धर्मबाह्‍य करणे ही भूतकाळातील एक कालबाह्‍य पद्धत—चेटकिणींचा शोध व इन्क्विझिशनची आठवण करून देणारी एक क्रूर प्रकारची शिक्षा आहे असे समजतात.

ऐहिक जगाच्या व्यापक प्रभावामुळे देखील समस्येत आणखी भर पडते. त्यामुळेच, ख्रिस्ती धर्मजगताच्या अनेक धर्मांनी पापाबद्दल एक अधिक सोशीक दृष्टिकोन पत्करला आहे. तर मग, “धर्मबाह्‍य करणे हे आमच्या परंपरेत अंतर्भूत आहे पण ते या शतकांत लागू करण्यात आले आहे असे मला वाटत नाही,” असे एक एपिस्कोपेलियन सेवकाने म्हटले यात फारसे नवल नाही.

तथापि, अनेक लोकांना जाणून आश्‍चर्य होईल की यहोवाच्या साक्षीदारांत बहिष्कृतीची (धर्मबाह्‍य करणे यासमान) अजूनही बरीच गंभीर दखल घेण्यात येते. ही कारवाई करणे सोपे नसते हे कबूल आहे, परंतु ती एक प्रेमळ तरतूद आहे. कशाप्रकारे?

ती देवाच्या नावाला समर्थन देते

यहोवा पवित्र देव आहे. त्याची उपासना करण्याचा दावा करणाऱ्‍यांनी हेतुपुरस्सर पाप केल्यास तो ते खपवून घेत नाही. प्रेषित पेत्राने ख्रिश्‍चनांना लिहिले: “तुम्हीहि सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.’” (१ पेत्र १:१५, १६) यास्तव, अपश्‍चात्तापी अपराध्यांना बहिष्कृत केल्याने देवाच्या पवित्र नामास समर्थन दिले जाते; त्यामुळे त्या नावाबद्दल प्रीती प्रदर्शित होते.—पडताळा इब्री लोकांस ६:१०.

याअर्थी, एखादा ख्रिस्ती कमकुवतपणाला बळी पडतो किंवा चुकून गंभीर पाप करून बसतो तेव्हा मागेपुढे न पाहता त्याला मंडळीतून बाहेर काढले जाते का? निश्‍चितच नाही! यहोवा एक भावनाशून्य हुकूमशहा नाही. तो दयाळू व समंजस आहे. आपण अपरिपूर्ण आहोत हे तो लक्षात ठेवतो. (स्तोत्र १०३:१४) यहोवा जाणतो, की “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) देवाने मंडळीतच आध्यात्मिक मदतीची तरतूद केलेली आहे जेणेकरून एखादा ख्रिस्ती “दोषात सापडला” किंवा जरी त्याने गंभीर पाप केले तरी त्याला प्रेमपूर्वक व सौम्य वृत्तीने ‘ताळ्यावर आणता’ येईल. (गलतीकर ६:१) देवाच्या वचनातील मार्गदर्शन स्वीकारल्यामुळे व मनःपूर्वक दुःख आणि खरा पश्‍चात्ताप प्रदर्शित केल्यामुळे, नीतिमत्तेच्या मार्गातून भरकटलेल्यास आध्यात्मिकरीत्या ‘निरोगी होता’ येते.—याकोब ५:१३-१६.

तथापि, बाप्तिस्मा घेतलेला एखादा गंभीर अपराध करतो व त्याला परत आणण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात अशा वेळेस काय? दुसऱ्‍या शब्दांत, त्याने आपला पापी मार्ग दुरुस्त करण्यास हेकेखोरपणे नकार दिला तर काय?

ती मंडळीस सुरक्षित ठेवते

बायबल ख्रिश्‍चनांना आज्ञा देते: “बंधु म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्‍तीसहि बसू नये.”—१ करिंथकर ५:११.

बायबलचा हा नियम क्रूर व मानहानीकारक आहे का? यावर जरा विचार करा: एखाद्या निगरगट गुन्हेगारास कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे तुरुंगात डांबण्यात येते तेव्हा ते क्रूर व भावनाशून्यपणाचे आहे असे समजले जाते का? नाही, कारण लोकांना समाजातील शांती आणि निर्भयता कायम राखण्याचा हक्क आहे. त्यामुळे, गुन्हेगार त्याच्या तुरुंगवासाच्या काळादरम्यान कायद्यांचे पालन करणाऱ्‍या समाजातून बहिष्कृत केलेला असतो.

तशाचप्रकारे ख्रिस्ती मंडळीचे अपश्‍चात्तापी अपराध्यांना आपल्यामधून बाहेर काढणे रास्तच आहे. का? कारण मंडळी ही अनैतिक भक्षकांपासून व जाणूनबुजून पाप करणाऱ्‍या इतरांपासून एक आश्रय असण्यास हवी.

‘एकटा पापी बहुत हिताची नासाडी करू शकतो’ हे लक्षात घेऊन प्रेषित पौलाने सहविश्‍वासू बांधवांना आज्ञा दिली: “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.” (उपदेशक ९:१८; १ करिंथकर ५:१३) या कारवाईमुळे त्या पापी व्यक्‍तीला मंडळीत नीतिभ्रष्टता पसरवण्यापासून अडविले जाते, शिवाय, मंडळीचा नावलौकिक पण कायम राहतो.—पडताळा १ तीमथ्य ३:१५.

वैयक्‍तिकांसाठी संरक्षण

बहिष्कृतीमुळे मंडळीतील वैयक्‍तिक सदस्यांनाही संरक्षण लाभते. आपण एक उदाहरण विचारात घेऊ: कुलूपबंद मोटारीत कोणीतरी प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा वाजणारा खास सुरक्षा हॉर्न किंवा गजर यांपैकी कशाच्या तरी कर्कश आवाजामुळे तुम्ही झोपेतून जागे होता अशी कल्पना करा. त्या झोंबणाऱ्‍या आवाजाकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे; खरे तर तुम्ही त्याने हबकून जाता! त्याचप्रकारे, मंडळीतून कोणाला बहिष्कृत करण्यात येते तेव्हा ती कारवाई अपेक्षेप्रमाणे कळपातील प्रत्येक सदस्याचे लक्ष आकर्षित करते. त्यांची समजबुद्धी ढवळून निघते. त्याकडे दुर्लक्ष करता येणे शक्य नसते. हे कोणत्या अर्थाने एक संरक्षण ठरू शकते?

एक साक्षीदार भगिनी म्हणते, “मी पहिल्यांदा कुणालातरी बहिष्कृत करण्यात आलं होतं असं राज्य सभागृहात ऐकलं तेव्हा प्रथम मला धक्काच बसला. मग मात्र मी नमले. यामुळे मला जाणीव झाली की मी सुद्धा अडखळू शकते.” तिच्या शब्दांवरून सूचित होते त्याप्रमाणे, बहिष्कृतीमुळे इतरांना आपापले वर्तन जोखण्याची प्रेरणा मिळू शकते.—१ करिंथकर १०:१२.

‘माझ्या जीवनात असे काही पैलू आहेत का, ज्यांमध्ये मी आध्यात्मिकरीत्या धोक्यात आहे?,’ अशाप्रकारचे प्रश्‍न स्वतःला विचारण्याद्वारे आपल्याला देवासमोरच्या आपल्या स्थितीचे परीक्षण करण्यास मदत मिळू शकते. असे केल्यामुळे आपण सदोदित ‘भीत व कापत आपले तारण साधून घेऊ शकतो.’—फिलिप्पैकर २:१२.

देवाकडे परत या

काही काळाकरता मंडळीतून बाहेर काढण्यात आलेली एक ख्रिस्ती स्त्री म्हणते, “कितीही कठोर असली तरीही, ती शिक्षा अगत्याची व फार आवश्‍यक होती आणि तिने माझे जीवन वाचवले.” हे लक्षात घेता बहिष्कृतीच्या आणखी एका महत्त्वपूर्ण पैलूवर प्रकाश पडतो. ती पूर्वी अपश्‍चात्तापी असणाऱ्‍या पापी जनांना देवाकडे परतण्याकरता पहिली पावले उचलण्याची चालना देऊ शकते.

प्रेषित पौलाने म्हटले: “ज्यावर परमेश्‍वर प्रीति करितो, त्याला तो शिक्षा करतो.” (इब्री लोकांस १२:६) तसेच, “कोणतीहि शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते,” हे खरे असले, “तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व व शांतिकारक फळ देते.”—इब्री लोकांस १२:११.

रिचर्डच्या बाबतीतही असेच घडले. जवळजवळ दोन वर्षांपर्यंत बहिष्कृत अवस्थेत राहिल्यानंतर त्याने पश्‍चात्ताप केला, देवाचा अनादर करणारे आपले वर्तन सुधारले व त्याला ख्रिस्ती मंडळीत परत स्वीकारण्यात आले. गतकाळातील आठवणी ताज्या करताना तो या अनुभवाविषयी सांगतो: “मला बहिष्कृत करणे रास्तच होते व मी त्याच लायकीचा होतो याची मला जाणीव आहे. ते खरोखरच आवश्‍यक होते व मी पत्करलेला मार्ग केवढा धोकादायक होता आणि यहोवाकडे क्षमा मागण्याची मला किती गरज होती यासंबंधाने माझे डोळे उघडण्यास ते सहायक ठरले.”

शिक्षा सहन करणे कदाचित तितके सोपे नसेल. ती स्वीकारण्यासाठी नम्रतेची गरज आहे, तथापि जे तिच्यातून धडा घेतात त्यांना विपुल प्रतिफळ प्राप्त होते.

यास्तव, बहिष्कृती देवाच्या पवित्र नावाला समर्थन देत असल्यामुळे व पापाच्या नीतिभ्रष्ट करणाऱ्‍या प्रभावापासून मंडळीचे संरक्षण करत असल्यामुळे, ती एक प्रेमळ तरतूद आहे. याशिवाय, अपराध्याला पश्‍चात्ताप करण्यास प्रोत्साहित करण्याद्वारे व ‘विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे म्हणून, त्याची पापे पुसून टाकली जावी यासाठी त्याला वळण्याची’ चालना देण्याकरवी ती अपराध्याबद्दल देखील प्रीती प्रदर्शित करते.—प्रेषितांची कृत्ये ३:१९.

[तळटीपा]

a धर्मबाह्‍य करणे ही एक शिस्तभंगाची कारवाई आहे ज्याकरवी एखाद्याला धर्माच्या सदस्यत्वातून वाळीत टाकले जाते.

[२५ पानांवरील चित्राचे श्रेय]

The New Testament: A Pictorial Archive from Nineteenth-Century Sources, by Don Rice/Dover Publications, Inc.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा