तुम्ही हे अडथळे पार करू शकता!
एक जंबो जेट विमान शेकडो प्रवाश्यांना आणि कितीतरी टन वजनाचा माल घेऊन आकाशात घेऊन जाऊ शकते. इतके वजनदार विमान आकाशात कसे उडू शकते बरे? केवळ एका उद्धहन यंत्राद्वारे (लिफ्टद्वारे).
जेव्हा विमान धावपट्टीवर वेग घेते, तेव्हा विमानाच्या वक्र पंखांवरून आणि पंखांखालून हवा शिरते. त्यामुळे वर उडण्याची उद्धहन नावाची शक्ती निर्माण होते. पुरेसे उद्धहन उत्पन्न झाल्यावर विमान जमीन सोडून वर उडू शकते. अर्थात, प्रमाणापेक्षा अधिक भारी विमान हवेत उडण्यासाठी पुरेसे उद्धहन उत्पन्न करू शकत नाही.
आपल्यावरही पुष्कळ भार असू शकतात. पुष्कळ शतकांआधी दावीद राजा, ‘त्याचे अपराध जड ओझ्याप्रमाणे त्याला भारी झाले’ असे म्हणाला होता. (स्तोत्र ३८:४) त्याचप्रकारे, येशू ख्रिस्ताने जीवनाच्या चिंतांनी भारावून जाण्याविरुद्ध ताकीद दिली. (लूक २१:३४) नकारात्मक विचार आणि भावना आपल्याला इतके भारावून टाकतील की विमान जसे सुरळीतपणे ‘हवेत उडत जाते’ तसे आपण निश्चिंत राहू शकत नाही. तुम्ही अशा प्रकारे भारावून गेला आहात का? किंवा तुमच्या पुढील आध्यात्मिक वाढीत अटकाव करणाऱ्या अडथळ्यांचा तुम्ही अनुभव घेतला आहे का? असे आहे तर, कोणती गोष्ट मदतदायी ठरू शकते?
तुम्ही कंटाळून गेला का?
कंटाळा—आजच्या दिवसांमधील सर्वसामान्य तक्रार—मानसिक अडथळा बनू शकतो. हीच तक्रार यहोवाच्या काही लोकांची देखील असू शकते. विशेषकरून लहान मुले, काही कामांना कंटाळवाणे समजतात. ख्रिस्ती सभांबद्दल तुम्हालाही कधीकधी असेच वाटते का? असे आहे तर, तुम्ही तुमच्या सभांची उपस्थिती उत्तेजक कशी बनवू शकता?
सभांमध्ये भाग घेणे हा मुख्य उपाय आहे. पौलाने तरुण तीमथ्याला लिहिले: “कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे; सुभक्ति तर सर्व बाबतीत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.” (१ तीमथ्य ४:७, ८) शारीरिक स्वास्थ्याच्या पुस्तकात दिलेल्या कसरतीनुसार व्यायाम केला नाही, तर ते कंटाळवाणे वाटेल व इतके मौल्यवान वाटणार नाही. ख्रिस्ती सभा आपल्या मनाच्या कसरतीसाठी रचल्या आहेत व आपण तयारी केली आणि सहभाग घेतला तर नक्कीच आपल्या मनाची कसरत होऊ शकते. अशा प्रकारचा सहभाग सभांना अधिक प्रतिफलदायी आणि रुचिकारक बनविल.
याबाबतीत, मॉरॉ नावाची एक तरुण ख्रिस्ती स्त्री म्हणाली: “मी सभांची तयारी केली नाही तर मी त्यांचा आनंद लुटत नाही. परंतु मी त्यांची पूर्वतयारी करते तेव्हा माझे मन व हृदय अधिक ग्रहणशील असते. सभा अधिक अर्थपूर्ण होतात आणि मी विवेचन देण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असते.”
ऐकण्यास शिकणे देखील मदतदायक असू शकते. मधुर संगीत ऐकण्यास सोपे व लागलीच सुखकर वाटते. परंतु सर्वच समाधान तत्क्षणीय नसते. सभांमध्ये जे काही म्हटले जाते ते लक्षपूर्वक ऐकल्यावरच आपल्याला सभेच्या कार्यक्रमातून समाधान प्राप्त होते. रेचल नावाच्या एका ख्रिस्ती स्त्रीने निरीक्षिले: “वक्ता, उत्साही नसतो तेव्हा मला मन एकाग्र करण्यास झटावे लागते. ‘भाषण जितके कमी रुचकर तितक्याच अधिक प्रमाणात मला मन एकाग्र करण्याची गरज आहे’ हा माझा नियम आहे. . . . मी शास्त्रवचनांकडे लक्ष देऊन त्यांतून होईल तितका फायदा घेण्याचा प्रयत्न करते.” आपणही रेचलप्रमाणे, ऐकण्यासाठी स्वतःला तालीम दिली पाहिजे. “माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव, माझ्या बोधाकडे तू आपला कान लाव” असे नीतिसूत्राचे पुस्तक म्हणते.—नीतिसूत्रे ५:१, पंडिता रमाबाई भाषांतर.
सभांमध्ये सादर केल्या जाणाऱ्या विशिष्ट माहितीची कदाचित पुनरावृत्ती होत असेल. ते आवश्यकच आहे! देवाच्या सर्व सेवकांना स्मरणिकांची गरज आहे. स्वच्छंदी वृत्ती आणि सदोषी आठवणी असलेल्या अपरिपूर्ण देहाला मिळेल तितक्या मदतीची आवश्यकता आहे. ‘सहख्रिश्चनांना त्यांना जरी काही गोष्टी माहीत होत्या व ते त्यांना प्राप्त झालेल्या सत्यात स्थिर झाले होते तरीही त्यांना आठवण करून देण्याची काळजी’ प्रेषित पेत्राला लागली होती. (२ पेत्र १:१२) “प्रत्येक शास्त्री . . . आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे” असेही येशूने स्पष्टीकरण दिले. (मत्तय १३:५२) अशा प्रकारे, आपल्या सभांमध्ये माहीत असलेले शास्त्रवचनीय विचार किंवा “जुन्या गोष्टी” जशा सांगितल्या जातात तशाच आपल्याला आनंदविणाऱ्या काही ‘नव्या गोष्टी’ देखील असतात.
सभांचा पूर्ण फायदा घेण्याच्या दृढनिश्चयामुळे वास्तविक रीत्या आध्यात्मिक उत्तेजन मिळू शकते. “आपल्या आध्यात्मिक गरजांविषयी [आत्म्यासाठी भीक मागत असलेले] जागृत असलेले धन्य,” असे येशू म्हणाला. (मत्तय ५:३, तळटीप, NW) सभांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या हितावह आध्यात्मिक अन्नाकडे पाहण्याचा अशा प्रकारचा दृष्टिकोन कंटाळा नाहीसा करील.—मत्तय २४:४५-४७.
वाईट उदाहरणामुळे झालेली निराशा?
तुम्ही तुमच्या मंडळीतील एखाद्याच्या वर्तनामुळे अस्वस्थ झाला आहात का? ‘हा बांधव असे वागूनही त्याचे चांगले नाव कसे राहते?’ असा विचार कदाचित तुमच्या मनात आला असेल. अशा प्रकारचे विचार मानसिक अडथळा बनू शकतात व देवाच्या लोकांसोबत आपण जो सुखकारक सहवास राखू शकतो त्याचे मूल्य समजण्यास आडकाठी आणू शकतात.—स्तोत्र १३३:१.
कलस्सैकरांच्या मंडळीतील काही सदस्यांची कदाचित अशा प्रकारची समस्या होती. “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा” असे पौलाने त्यांना आर्जवले. (कलस्सैकर ३:१३) काही कलस्सैकर ख्रिस्ती दुष्टपणे वागून, इतरांना वास्तविक तक्रार करण्यास त्यांनी वाव दिला असेल हे पौलाने ओळखले होते. यास्तव, आपला एखादा ख्रिस्ती बांधव किंवा बहीण अधूनमधून एखाद्या ख्रिस्ती गुणामध्ये उणा पडत असेल तर आपल्याला उगीचच आश्चर्य वाटू नये. येशूने गंभीर समस्या सोडण्याविषयी विश्वसनीय सल्ला दिला. (मत्तय ५:२३, २४; १८:१५-१७) परंतु बहुतेक वेळा, आपण आपल्या सहविश्वासूंच्या कमतरता सहन करून त्यांना क्षमा करू शकतो. (१ पेत्र ४:८) वास्तविक पाहता, अशा प्रकारचा दृष्टिकोन स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी असू शकतो. असे का बरे?
“विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे,” असे नीतिसूत्रे १९:११ म्हणते. क्रोध आणि संताप चिघळवण्यापेक्षा क्षमा करणे किती उत्तम आहे बरे! प्रेमळ स्वभावासाठी ओळखले जाणारे सॉल्वॉडोर नावाचे एक वडील म्हणतात: “मला एखाद्या बांधवाने वाईट वागणूक दिली किंवा मला निर्दयीपणे बोलले तर मी स्वतःला विचारतो: ‘मी माझ्या बांधवाला कशी मदत करू शकतो? त्याच्यासोबतचा माझा अनमोल नातेसंबंध गमावण्याचे मी कसे टाळू शकतो?’ चुकीची गोष्ट बोलण्यास किती सोपे जाते याबद्दल मी नेहमी दक्ष असतो. कोणी अविचारीपणे बोलला असल्यास त्याने त्याचे बोलणे माघारी घेऊन पुन्हा एकदा नव्याने सुरवात करावी हा उत्कृष्ट उपाय आहे. परंतु असे करणे अशक्य आहे, म्हणून मीच पुढचे उत्तम पाऊल उचलतो आणि त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. ते सर्व माझ्या बांधवाच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब नसून अपरिपूर्ण देहाचा उद्रेक होता असे मी समजतो.”
करण्यापेक्षा बोलणे सोपे आहे असे तुम्हाला वाटेल. परंतु आपण आपल्या विचाराला जसे मार्गदर्शन देतो त्याच्यावर ते जास्त करून अवलंबून असते. “जे काही प्रिय . . . त्यांचे मनन करा,” असा पौलाने सल्ला दिला. (फिलिप्पैकर ४:८, पं. र. भाषांतर) “प्रिय” याचा अक्षरशः अर्थ “प्रेम प्रवृत्त करणारे” असा होतो. आपण लोकांमधील चांगल्या गुणांचा विचार करावा, संतापाला प्रवृत्त करण्याऱ्या गुणांपेक्षा प्रेमाला प्रवृत्त करणाऱ्या गुणांवर लक्ष केंद्रित करावे अशी यहोवाची इच्छा आहे. या बाबतीत तो स्वतः आपल्याला एक सर्वोत्तम उदाहरण पुरवतो. “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” असे म्हणून स्तोत्रकर्त्याने आपल्याला याची आठवण करून दिली.—स्तोत्र १०३:१२; १३०:३.
काही प्रसंगी एखाद्या बांधवाची वागणूक आपल्याला निराश करणारी असू शकते हे खरे आहे, पण आपले बहुतेक सहउपासक ख्रिस्ती जीवनचर्येचे प्रशंसनीय उदाहरण आहेत. ते आपण आठवणीत ठेवले तर दावीदाप्रमाणे आपल्यालाही ‘यहोवाचे पुष्कळ उपकारस्मरण करण्यास व लोकसमुदायात त्याचे स्तवन करण्यास’ आनंद होईल.—स्तोत्र १०९:३०.
साक्षीदार होणे अतिशय कठीण वाटते का?
आणखी एका मानसिक अडथळ्यामुळे काहींनी अजूनही यहोवाची स्तुती करण्यास सुरवात केली नाही ही दुःखाची गोष्ट आहे. यहोवाचे साक्षीदार नसलेले अनेक पुरुष जबाबदारीने त्यांच्या कुटुंबासाठी तरतूद करतात आणि त्यांच्या पत्नींना ख्रिस्ती सेवेमध्ये आधारही देतात. ते स्नेही असतात आणि कदाचित मंडळीच्या हितामध्ये रस घेतील, पण देवाचे समर्पित सेवक होण्यापासून ते दूर राहतात. कोणती गोष्ट त्यांना यापासून मागे ओढत असते?
काही पती त्यांच्या पत्नींना ईश्वरशासित सेवेमध्ये व्यग्र असलेले पाहतात व ते स्वतः एक साक्षीदार झाल्यावर त्यांच्याकडून पुष्कळ काही अपेक्षिले जाईल असा विचार करू लागतात ही त्यांच्याबाबतीत एक समस्या असू शकते. किंवा ते घरोघरच्या प्रचार कार्यात कधीच भाग घेऊ शकणार नाहीत अशी त्यांच्या मनात भीती असण्याची शक्यता असते. त्यांच्या दृष्टिकोनातून पाहता, आशीर्वादांपेक्षा जबाबदाऱ्याच अधिक महत्त्वपूर्ण असतात. असा मानसिक अडथळा का बरे? बहुतेक बायबल विद्यार्थी हळूवारपणे सत्य शिकून ते लागू करतात. परंतु ख्रिस्ती विश्वासात नसलेल्या पतींना बहुधा ख्रिस्ती जबाबदाऱ्या स्वीकारण्यास प्रवृत्त होण्याआधीच त्यांच्याबद्दलची सर्व माहिती असते.
अशाच स्थितीत असलेल्या मॅनवेलने स्पष्टीकरण दिले: “जवळजवळ दहा वर्षांपर्यंत मी माझ्या पत्नीसोबत संमेलनाला व सभांना उपस्थित राहत होतो. खरं सांगायचं म्हणजे, मला जगिक लोकांऐवजी साक्षीदारांचा सहवास आवडत होता आणि होईल तेव्हा त्यांना मदत करण्यास मी तयार होतो. त्यांच्यामध्ये सर्वत्र दिसणारी प्रीती पाहूनच मी प्रभावीत झालो होतो. पण घरोघरी जाण्याची कल्पनाच मुळी माझ्यासमोर एक अडखळण म्हणून उभी होती. शिवाय माझ्यासोबत काम करणारे माझी थट्टा करतील ही माझ्या मनात भीती होती.
“माझी पत्नी माझ्याबरोबर अतिशय सहनशील होती, तिने मला बायबलचा अभ्यास करण्यासाठी कधीच जबरदस्ती केली नाही. तिने आणि मुलांनी त्यांच्या उत्तम उदाहरणाद्वारे मुख्यपणे ‘प्रचार’ केला. मंडळीतील होसे नावाच्या एका वडिलांनी माझ्यामध्ये खास आस्था घेतली. त्यांच्या उत्तेजनामुळे मी गंभीरपणे अभ्यासाला सुरवात केली असे मला वाटते. बाप्तिस्मा घेतल्यानंतर, इतर गोष्टींपेक्षा माझ्याच मनामध्ये अडखळणे असल्याचे मला समजून आले. मी यहोवाची सेवा करण्याचा निर्णय केला तेव्हा, माझ्या भीतीवर मात करण्यास त्याने दिलेल्या मदतीचा मी अनुभव घेतला.”
मॅनवेलसारख्या पतींना त्यांच्या मानसिक अडथळ्यांवर मात करण्यास पत्नी आणि ख्रिस्ती वडील कशी मदत करू शकतात? बायबलचा अभ्यास त्यांच्यामध्ये गुणग्राहकता व देवाची इच्छा करण्याची इच्छा उत्पन्न करू शकतो. खरेच, व्यापक शास्त्रवचनीय ज्ञान, भवितव्यातील आशेवर विश्वास प्रकट करण्यासाठी आणि भरवसा ठेवण्यासाठी आधार आहे.—रोमकर १५:१३.
अशा पतींना बायबलच्या अभ्यासाचा स्वीकार करण्यासाठी कोणती गोष्ट उत्तेजन देऊ शकेल? मंडळीतील एखाद्या समजूतदार बांधवासोबत मैत्री, निश्चायक कारण ठरू शकते. कदाचित एखादे वडील किंवा दुसरा अनुभवी बांधव त्या पतीसोबत चांगली ओळख करून घेऊ शकतात. चांगला नातेसंबंध एकदाचा स्थापित झाल्यावर कोणीतरी केवळ त्याला अभ्यास प्रस्तुत करण्याची गरज लागेल. (१ करिंथकर ९:१९-२३) तोपर्यंत, सुज्ञ ख्रिस्ती पत्नीने ख्रिस्ती विश्वासात नसलेल्या तिच्या पतीवर दबाव आणला तर तो त्याला प्रतिसाद देणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून, ती त्याला थोड्या थोड्या आध्यात्मिक गोष्टी सांगू शकते.—नीतीसूत्रे १९:१४.
एखाद्या व्यक्तीने एकदाचे आध्यात्मिक बळ प्राप्त केले, की डोंगरासमान अडथळे राई इतके होतात हे मॅनवेल अनुभवानिशी शिकला. यहोवा, त्याची सेवा करू इच्छिणाऱ्यांमध्ये उत्साह वाढवतो. (यशया ४०:२९-३१) देवाच्या शक्तीने व प्रौढ साक्षीदारांच्या आधाराने अडथळे काढता येऊ शकतात. अशा प्रकारे घरोघरचे कार्य करण्याचे एवढे भय वाटणार नाही तसेच सोबत काम करणाऱ्यांची भीती कमी होऊ शकते आणि पूर्ण जीवाने केली जाणारी सेवा अधिक अपीलकारक बनते.—यशया ५१:१२; रोमकर १०:१०.
संवेग राखणे
आपण अडथळ्यांना पार करू शकतो जसे की आपण त्या तीन अडथळ्यांचा विचार केला. विमान उड्डाण करते तेव्हा, इंजिनची जास्तीतजास्त शक्ती लागते तसेच विमानातील कर्मचाऱ्यांना अविरत लक्ष देणे जरूरीचे असते. उड्डाणाच्या इतर कोणत्याही वेळेपेक्षा, जमीन सोडून विमान हवेत उडू लागते तेव्हा इंजिनला अधिक इंधन लागते. त्याचप्रमाणे, नकारात्मक विचार आणि भावनांपासून परावृत्त होण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न आणि एकाग्रतेची गरज असते. सुरवातीला पुष्कळ कठीण वाटेल परंतु एकदा संवेग प्राप्त केला, की प्रगती करण्यास सोपे जाते.—पडताळा २ पेत्र १:१०.
प्रगतीशील संवेग, शास्त्रवचनीय सल्ला लागलीच अनुसरल्याने टिकवता येतो. (स्तोत्र ११९:६०) मंडळीला आपल्याला मदत करण्यास आवडेल याची आपण खात्री बाळगू शकतो. (गलतीकर ६:२) परंतु सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, यहोवा देवाचा पाठिंबा होय. दावीद म्हणाला त्याप्रमाणे, “प्रभु धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो.” (स्तोत्र ६८:१९) आपण प्रार्थनेद्वारे आपले मन हलके करतो तेव्हा आपले ओझे कमी होते.
कधीकधी, विमान ढगाळ वातावरण पार करून तेजोमय सूर्यप्रकाशाने प्रज्वलित झालेल्या आकाशात उडू लागते. आपण देखील नकारात्मक विचार मागे टाकू शकतो. ईश्वरी मदतीने, आपणही जणू काय त्या ढगाळ वातावरणातून पार होऊन यहोवाच्या उपासकांच्या जगव्याप्त कुटुंबाच्या उज्ज्वल, आनंदी वातावरणात येऊ शकतो.
[२३ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साहाय्याने आपण मानसिक अडथळ्यांना पार करू शकतो