मृत आपल्याला पाहू शकतात का?
एक स्त्री तिच्या पतीचा खून करते. सात वर्षांनंतर तिला एक स्वप्न पडते ज्यामुळे ती अतिशय घाबरते. तिला वाटते की ते स्वप्न तिच्या मृत पतीच्या क्रोधाचे एक चिन्ह आहे. त्याच्या “आत्म्याला” शांत करण्यासाठी, ती तिच्या मुलीला त्याच्या कबरेवर दारूचे नैवेद्य ओतण्यास पाठवते.
त्या मुलीला तिच्या वडिलांच्या आत्म्याला काय म्हणावे हे कळत नाही कारण तिने आणलेले अर्पण तिच्या आईकडून असते जिने त्याला ठार मारले होते. ह्या मुलीचा धाकटा भाऊ आडोशाला लपून त्याच्या बहिणीकडे पाहत असतो. तो पुढे येतो आणि तो व त्याची बहीण त्यांच्या वडिलांना प्रार्थना करतात की त्यांच्या खूनाचा बदला घेण्यास त्यांनी त्यांना मदत करावी.
हे दृश्य, २,४०० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी लिहिलेल्या द लिबेशन बेर्रस् या ग्रीक नाटकातील आहे. जगातील काही भागांमध्ये, विशेषकरून ॲफ्रिकेत, आजही अशाप्रकारची अर्पणे कबरेच्या आजूबाजूला अर्पिली जातात.
उदाहरणार्थ, नायजेरियात राहणाऱ्या ईबचा अनुभव पहा. त्याची तीन मुले मेल्यामुळे तो परंपरागत वैदूला जाऊन भेटतो. तो वैदू त्याला सांगतो, की त्याच्या मुलांचे हे मृत्यू काही कारणास्तव झाले—ईबचे मृत वडील त्याच्यावर रागावले आहेत कारण त्यांचा दफनविधी योग्य पद्धतीने झाला नाही.
वैदूच्या सल्ल्यानुसार ईब एका बकऱ्याचा बळी देतो आणि त्याच्या वडिलांच्या कबरेवर नैवेद्य म्हणून जिन दारू व द्राक्षारस ओततो. तो त्याच्या वडिलांच्या आत्म्याला बोलावतो, त्यांच्याकडे क्षमेची याचना करतो, त्याला त्यांच्यावर अजूनही प्रेम असल्याची खात्री देतो आणि आशीर्वाद मागतो.
त्याचे वडील त्याला पाहू शकतात व त्याचे ऐकू शकतात याविषयी ईबला काहीच शंका नाही. ते निर्जीव आहेत असा त्याचा विश्वास नाही, तर मृत्यूमुळे त्यांचे दृश्य जगातून आत्मिक जगात “स्थलांतर” झाले. ईबला असेही वाटते की त्याचे वडील मांस आणि रक्ताच्या जगातून, पूर्वजांच्या प्रदेशात म्हणजे, आत्मिक लोकांच्या जगात गेले आहेत.
ईब असा तर्क करतो: ‘बाबा या जगात नसले तरी, त्यांना अजूनही माझी आठवण आहे आणि माझ्या भल्याविषयी त्यांना काळजी आहे. आणि आता तर, वाढत्या शक्तीची एक आत्मिक व्यक्ती असल्यामुळे, पृथ्वीवर मनुष्य असताना ते मला जितकी मदत करू शकत होते त्यापेक्षा अधिक ते आता करू शकतात. शिवाय, ते माझ्या वतीने देवाला थेटपणे भेटू शकतात, कारण देव सुद्धा एक आत्मिक व्यक्ती आहे. बाबा माझ्यावर आता रागावले असतील; पण मी जर त्यांना योग्य आदर दाखवला, तर ते मला क्षमा करतील आणि मला आशीर्वाद देतील.’
ॲफ्रिकेत, मृत लोक पृथ्वीवरील लोकांना पाहतात आणि त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकतात हा विश्वास पारंपारिक ॲफ्रिकन धर्म आचरणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य आहे. तो नामधारी ख्रिश्चनांमध्येही दिसतो. उदाहरणार्थ, स्त्रीचा विवाह चर्चमध्ये झाल्यावर, तिने तिच्या पालकांकडे जाऊन पारंपारिक आशीर्वाद मिळवणे ही गोष्ट काही असामान्य नाही. तेथे पूर्वजांचा धावा केला जातो आणि मग त्यांना नैवेद्य म्हणून पेय ओतली जातात. असे न केल्यास विवाहावर अरिष्ट येते असा अनेकांचा विश्वास आहे.
पूर्वज किंवा पूर्वजांचे आत्मे, पृथ्वीवरील त्यांच्या कुटुंबाचा बचाव आणि समृद्धतेची खात्री बाळगतात असा विचार केला जातो. या दृष्टिकोनानुसार, हे पूर्वजांचे आत्मे, चांगले पीक आणण्यास, चांगले आरोग्य देण्यास व लोकांना हानी होण्यापासून वाचवण्यास शक्तिशाली मदतनीस असतात. ते मनुष्याच्या वतीने मध्यस्थी करतात. परंतु त्यांच्याकडे जर दुर्लक्ष केले किंवा त्यांना दुःखित केले तर ते संकटे आणतात—जसे की, आजारपण, दारिद्य्र आणि मृत्यूसुद्धा. परिणामस्वरूप, अर्पणे व विधींच्याद्वारे लोक, मृतांसोबत चांगले नातेसंबंध ठेवण्यास झटत असतात.
जिवंताच्या जीवनामध्ये मृतांची सक्रिय भूमिका असते असा तुम्ही विश्वास बाळगता का? तुम्ही कधी तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कबरेजवळ उभे राहून कदाचित तो किंवा ती ऐकेल म्हणून दोन शब्द बोललात का? अर्थात, मृत आम्हाला पाहू किंवा ऐकू शकतात वा नाही हे मृत्यूच्यावेळी काय होते यावर अवलंबून आहे. बायबल या महत्त्वपूर्ण विषयावर काय म्हणते त्याचे आपण परीक्षण करून पाहूया.