“मुखात घास भरवा, पायांना नव्हे”
आफ्रिकेतील पारंपारिक दफन पद्धतीवरील एक दृष्टिक्षेप
“ते त्यांच्या मृतांचे दफन करत नाहीत!” पश्चिम आफ्रिका येथील यहोवाच्या साक्षीदारांबद्दल हे वाक्य सर्वसामान्यपणे वापरले जाते. परंतु, साक्षीदार त्यांच्या मृतांचे दफन करतात, हे सर्वांना माहीत आहे.
यहोवाचे साक्षीदार त्यांच्या मृतांचे दफन करत नाहीत असे लोक का म्हणतात? कारण, साक्षीदार अनेक प्रचलित स्थानिक दफन पद्धती पाळत नाहीत, म्हणून लोक असे म्हणतात.
पारंपारिक दफन पद्धती
ऑलियु नावाचा व्यक्ती मध्य नायजेरियातील एका लहानशा खेड्यात राहतो. त्याच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा, त्याने त्याच्या नातेवाईकांना तिच्या मृत्युची खबर कळवली आणि मग तिच्या घरी शास्त्रवचनावर आधारित भाषण देण्याची व्यवस्था केली. यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीतील वडिलांकरवी भाषण देण्यात आले, त्या भाषणाने मृतांची स्थिती व पवित्र शास्त्रातील पुनरूत्थानाची उत्साहित करणारी आशा यावर लक्ष केंद्रित केले. भाषणानंतर, ऑलियुच्या आईचे दफन करण्यात आले.
यामुळे नातलगांना अतिशय चीड आली. त्यांच्यासाठी दफन विधी तेव्हा पूर्ण होतो जेव्हा ते, एखादी व्यक्ती मेल्यानंतरच्या रात्री, प्रेताचे दफन करण्यापूर्वी प्रेतावर पहारा ठेवण्याचा कार्यक्रम साजरा करतात. ऑलियुच्या समाजात प्रेतावर पहारा ठेवण्याचा उत्सवाचा कार्यक्रम असतो, दुःखाचा नव्हे. त्यावेळी प्रेताला अंघोळ घालतात, पांढऱ्या शुभ्र वस्त्रात गुंडाळतात आणि मग खाटेवर झोपवतात. मृत्युमुळे दुःखित झालेले, वाद्य वाजवणाऱ्यांना बोलवतात, बियर बाटल्यांच्या व ताडाच्या द्राक्षरसाच्या पेट्या विकत आणतात, आणि बैल किंवा बोकडाचा बली देण्याची व्यवस्था करतात. आणि मग नातलग, मित्रमंडळी गाण्यास, नाचण्यास, खाण्यास येतात व दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत पीत राहतात.
ह्या उत्सवाच्या वेळी, प्रेताच्या पायाजवळ अन्न ठेवले जाते. मृत व्यक्तिचे केस, हाताची आणि पायाची नखे कापून “दुसरे दफन” यासाठी बाजूला काढून ठेवली जातात. हे, काही दिवसानंतर, आठवड्यानंतर, किंवा काही वेळा तर वर्षांनी होते.
दफन विधीचा समारंभ एक किंवा त्याहीपेक्षा अधिक आठवड्यांसाठी चालत असला तरी, प्रेतावर पहारा ठेवण्याच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प्रेताला पुरले जाते. नंतर, दुसरे दफन होते. प्रेताचे केस, आणि हातापायांची नखे एका पांढऱ्या कापडात गुंडाळली जातात, व पाच किंवा सहा फुटाच्या लाकडाच्या फळीला बांधली जातात. मग ही फळी यात्रेमध्ये, वाजत गाजत आणली जाते आणि त्या मृत माणसाच्या कबरेजवळ पुरली जाते. तेव्हा पुन्हा मोठमोठ्याने गाणी गायली जातात, पिणे होते व उत्सव होतो. दफन विधीची समाप्ती करण्यासाठी, आकाशाच्या दिशेने हवेत एकदाच गोळीबार केला जातो.
ऑलियुने यापैकी कोणतीही गोष्ट पाळण्याची परवानगी दिली नसल्यामुळे, त्याला मृतांविषयी आणि त्यांचा आदर करणाऱ्या परंपरेबद्दल आदर नाही असे त्याच्यावर अनेक दोष लावण्यात आले. परंतु यहोवाचा एक साक्षीदार या नात्याने, ऑलियुने या गोष्टी पाळण्यास नकार का दिला? कारण तो ह्या परंपरा, ज्या धार्मिक कल्पनांवर आधारित आहेत त्यांना हेतुपुरस्सर स्वीकारू शकत नव्हता.
आफ्रिकेतील पारंपारिक विश्वास
संपूर्ण आफ्रिकेत, लोकांचा असा विश्वास आहे की सर्व मानव आत्मिक क्षेत्रातून आले आहेत आणि ते तेथेच पुन्हा जातील. नायजेरियाचे योरूबा जमातीचे लोक म्हणतात: “ही पृथ्वी बाजारपेठ आहे जेथे आम्ही थोड्या वेळेसाठी येतो, परंतु आमचे कायमचे निवासस्थान स्वर्ग आहे.” तसेच इबो जमातीचे म्हणतात: “या जगात येणारी प्रत्येक व्यक्ती पृथ्वीवर कितीही काळासाठी रेंगाळली तरी, एक ना एक दिवस तिला घरी (स्वर्गात) जावे लागेल.”
आधी सांगितलेल्या पद्धतींचा जरा विचार करा. प्रेतावर पहारा ठेवण्याच्या कार्यक्रमाचा उद्देश, आत्म्याला चांगला निरोप देणे हा आहे. पांढरे शुभ्र वस्त्र आत्मिक क्षेत्रासाठी योग्य पोशाख समजला जातो. प्रेताच्या पायाजवळ अन्न ठेवण्याचा संबंध ह्या कल्पनेशी जोडला जातो की, प्रेत त्याच्या पायाद्वारे अन्न खाते आणि तसे त्याला दिले पाहिजे, जेणेकरून पूर्वजांच्या देशात जाताना प्रवासात त्याला भूक लागणार नाही.
शिवाय, सामान्यपणे लोक असा विश्वास करतात की जेव्हा आत्मा शरीराला सोडून जातो तेव्हा, तो जिवंत असलेल्यांच्या भोवती भटकत असतो व दुसऱ्या दफनाने पूर्ण सुटका झाल्याशिवाय पूर्वजांच्या देशाला पुन्हा जात नाही. दुसरे दफन होत नाही तोपर्यंत, तो आत्मा क्रोधित होऊन जिवंत असलेल्यांना आजार किंवा मृत्युने पिडीत करील अशी लोकांना भीती वाटते. “आत्म्याला स्वर्गात पाठविण्यासाठी” गोळीबार केला जातो.
आफ्रिका येथे दफन पद्धतींमध्ये एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी विविधता आढळत असली तरी, मेल्यानंतर आत्मा शरीरापासून जिवंत राहतो हीच सर्वसाधारणपणे मुख्य कल्पना आहे. ह्या विधींचा मुख्य उद्देश, आत्म्याला “स्वर्गातून आलेल्या बोलावण्याला” प्रतिसाद देण्यास मदत करणे हा आहे.
ह्या विश्वास आणि विधींना ख्रिस्ती धर्मजगताच्या मानवी आत्म्याचे अमरत्व आणि “संतांची” भक्ती या शिकवणीमुळे उत्तेजित केले आहे. येशू ह्या पृथ्वीवर पारंपारिक विश्वासांचा नाश करण्यासाठी नव्हे तर, त्यांना पूर्ण किंवा बळकट करण्यासाठी आला होता असे स्वाझीलँन्ड येथे सैन्यातील एका धर्मोपदशेकाने केलेले विवेचन वैशिष्ट्यपूर्ण आहे. सामान्यपणे दफन विधीच्या वेळी पाळक पुढाकार घेत असतात म्हणून, अनेक लोकांना वाटते की, पारंपारिक विश्वासांना आणि त्यातून उद्भवणाऱ्या पद्धतींना पवित्र शास्त्र मान्यता देते.
पवित्र शास्त्र काय म्हणते
पवित्र शास्त्र ह्या विश्वासांना आधार देते का? मृतांच्या स्थितीबद्दल उपदेशक ३:२० स्पष्टता देते: “सर्व [मानव आणि प्राणी] एकाच स्थानी जातात. सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन: मातीस मिळतात.” शास्त्रवचने पुढे म्हणतात: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते, पण मृतास तर काहीच कळत नाही . . . त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत . . . ज्या शिओलाकडे [कबर] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्ति-प्रयुक्ति, बुध्दि व ज्ञान यांचे नाव नाही.”—उपदेशक ९:५, ६, १०, न्यूव.
ही आणि इतर शास्त्रवचने स्पष्ट करतात की मृत आपल्याला पाहू शकत नाहीत, आमचे बोलणे ऐकू शकत नाहीत, आम्हाला मदत करू शकत नाहीत किंवा आम्हाला त्रासही देऊ शकत नाहीत. तुम्ही जे काही पाहिले आहे त्याच्या अनुषंगात ही गोष्ट नाही का? तुम्हाला कदाचित कोणा श्रीमंत व वजनदार माणसाबद्दल माहीत असेल, जो मरण पावला आणि त्याच्या कुटुंबाने दफन विधीच्या सर्व पद्धती पार पाडल्या तरीही, त्यानंतर त्याचे कुटुंब हालअपेष्टा सहन करत राहते. जर तो मनुष्य आत्मिक क्षेत्रात जिवंत आहे, तर तो त्याच्या कुटुंबाचे साहाय्य का करत नाही? तो तसे करू शकत नाही कारण, पवित्र शास्त्र जे काही म्हणते तेच खरे आहे की—मृत लोक निर्जीव आहेत, ते “मृत” आहेत, यास्तव इतर कोणालाही मदत करण्यास असमर्थ आहेत.—यशया २६:१४.
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त, याला ही वास्तविकता माहीत होती. लाजरच्या मृत्युनंतर काय झाले त्याचा विचार करा. पवित्र शास्त्र सांगते: “तो [येशू] त्यांना [त्याच्या शिष्यांना] म्हणाला: ‘आपला मित्र लाजर विसाव्यासाठी गेला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो.’ ह्यावरून शिष्य त्याला म्हणाले, ‘प्रभुजी तो विसाव्यासाठी गेला असेल तर तो बरा होईल.’ येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता.”—योहान ११:११-१३.
येशूने मृत्युची तुलना झोप किंवा विसाव्यासोबत केली आहे याकडे लक्ष द्या. बेथानी येथे आल्यावर, त्याने लाजरच्या बहिणी मार्था आणि मरीया ह्यांचे सांत्वन केले. कळवळा आल्यामुळे येशू देखील रडला. परंतु, लाजराचा आत्मा जिवंत असून पूर्वजांच्या देशात जाण्यासाठी मदतीची अपेक्षा करत भटकत आहे, असे बोलण्याद्वारे किंवा कृतीद्वारेही त्याने सूचित केले नाही. उलट, त्याने जे करील असे म्हटले होते तेच केले. त्याने लाजरला पुनरूत्थानाद्वारे मृत्युच्या झोपेतून उठवले. यावरून हा पुरावा मिळाला की कबरेत असलेल्या सर्वांचे पुनरूत्थान करण्यासाठी देव येशूचा उपयोग करणार आहे.—योहान ११:१७-४४; ५:२८, २९.
वेगळे का दिसावे?
अशास्त्रीय विश्वासांवर आधारित असलेल्या दफन विधीच्या पद्धतींना सहमती दाखवण्यात काही चूक आहे का? होय, ऑलियु आणि यहोवाचे आणखी लाखो साक्षीदार असाच विश्वास राखतात. त्यांना माहीत आहे की, खोट्या व ठकविणाऱ्या शिकवणींवर आधारित असलेल्या कोणत्याही पद्धतींना पाठबळ देणे त्यांच्यासाठी चुकीचे, होय दांभिकपणाचे ठरेल. येशूने ज्या शास्त्री आणि परूश्यांचा धार्मिक दांभिकतेसाठी धिक्कार केला त्यांच्यासारखे ते होऊ इच्छित नाहीत.—मत्तय २३:१-३६.
प्रेषित पौलाने त्याच्या सहकर्मचारी तीमथ्याला इशारा दिला: “आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ज्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे अशा खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने ते फुसलाविणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील.” (१ तीमथ्य ४:१, २) मृत मानव आत्मिक क्षेत्रात जिवंत असतात ही शिकवण भूतांची आहे का?
होय, ती आहे. “लबाडीचा बाप,” दियाबल सैतान याने हव्वेला सांगितले की ती मरणार नाही, तर शारीरिकरीतीने कायमची जिवंत राहील असे तो दर्शवित होता. (योहान ८:४४; उत्पत्ती ३:३, ४) शरीराच्या मृत्युनंतर अमर जीव जिवंत राहतो असे जे म्हटले जाते ते यासारखे नाही. तथापि, मृत्युनंतरही जीवन चालू असल्याच्या कल्पनेला चेतवून, सैतान आणि त्याचे दुरात्मे, लोकांना देवाच्या वचनाच्या सत्यतेपासून बहकविण्यासाठी झटत आहेत. यहोवाच्या साक्षीदारांचा, सैतानाच्या लबाडीला साथ देणारे दृष्टिकोन आणि पद्धती यामध्ये कोणताही भाग नाही कारण, पवित्र शास्त्रात देवाने जे काही म्हटले आहे त्यावर त्यांचा विश्वास आहे.—२ करिंथकर ६:१४-१८.
अशास्त्रीय दफन पद्धतींना टाळल्यामुळे, यहोवाच्या सेवकांनी इतरांच्या विचारात सहभाग न घेतल्यामुळे, त्यांचा तिरस्कार ओढवून घेतला आहे. काही साक्षीदारांकडून त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता हिरावून घेतली गेली. इतरांना त्यांच्या कुटुंबाने वाळीत टाकले आहे. तरी देखील, खरे ख्रिस्ती म्हणून, त्यांनी जाणले की देवाला विश्वासू आज्ञाधारकता दाखवल्यामुळे जगाची नापसंती मिळते. येशू ख्रिस्ताच्या निष्ठावान प्रेषितांप्रमाणे, “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा” मानण्यास ते दृढनिश्चयी आहेत.—प्रे. कृत्ये ५:२९; योहान १७:१४.
मरणात झोपी गेलेल्या त्यांच्या प्रिय जनांच्या आठवणींचा आनंद घेत असताना खरे ख्रिस्ती, जिवंत असलेल्यांना प्रेम प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, ऑलियुच्या पित्याच्या मृत्युनंतर त्याने त्याच्या आईला घरी नेले व तिच्या मृत्युपर्यंत तिची काळजी घेतली. जेव्हा इतर लोक म्हणाले की त्याला त्याच्या आईवर प्रेम नव्हते कारण त्याने दफन विधीच्या पद्धतीनुसार तिचे दफन केले नाही, तेव्हा त्याच्या लोकांमध्ये सर्वसामान्यपणे प्रचलित असणाऱ्या म्हणीचा त्याने संदर्भ घेतला की, “माझ्या पायांना घास भरवण्याआधी माझ्या मुखात घास भरवा.” आधी वर्णन केलेल्या रूढीप्रमाणे प्रेतावर पहारा ठेवण्याच्या कार्यक्रमात मृत व्यक्तिच्या पायांना घास भरवण्यापेक्षा तो किंवा ती जिवंत असतानाच, त्याच्या मुखात घास भरवणे किंवा त्यांची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. वास्तविक पाहता, पायांना घास भरवल्यामुळे त्याचा मृत व्यक्तिला काहीच फायदा होत नाही.
ऑलियु त्याच्या टिकाकारांना विचारतो, ‘तुमच्या कुटुंबाने तुमची वृद्धावस्थेत काळजी घ्यावी, की तुम्ही मेल्यावर त्यांनी तुमचा दफन विधी थाटामाटात साजरा करावा, यापैकी तुम्ही कोणती गोष्ट निवडाल?’ अनेक जण इच्छितात की जिवंत असताना त्यांची काळजी घेतली जावी. ते ह्या गोष्टीची कृतज्ञता बाळगतात की, त्यांच्या मृत्युच्या वेळी पवित्र शास्त्र आधारित योग्य स्मारक सेवा व सभ्य दफन विधी होईल.
यहोवाचे साक्षीदार त्यांच्या प्रिय जनांसाठी हेच करू इच्छितात. ते मुखात घास भरवतात पायांना नव्हे.