राज्य घोषकांचा वृत्तांत
आमच्या ख्रिस्ती सेवकपणाला भूषविणारी वर्तणूक
प्रेषित पेत्र ख्रिश्चनांना सल्ला देतोः “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा.” (१ पेत्र २:१२) प्रेषित पौल देखील दाखवून देतो की, आम्ही “सर्व गोष्टीत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी.” (तीत २:१०) चांगल्या वर्तणूकीबद्दल यहोवाच्या साक्षीदारांची संपूर्ण जगात किर्ती आहे. काही उदाहरणांकडे लक्ष द्या.
चांगल्या वर्तणूकीबद्दल शिक्षकाचे विचार
कोस्टारिका येथील वॉचटावरच्या शाखा कार्यालयाकडून असा अहवाल आला आहे की, त्या देशातील पुष्कळ तरुणांनी चांगले उदाहरण प्रस्तुत केले आहे. एक बंधू त्यांना सत्याकडे वळण्यात कशाची मदत झाली हे सांगतात. ते म्हणतातः “ज्या गोष्टीमुळे मी आकर्षित झालो ती म्हणजे तरुण व प्रौढांची उत्तम वर्तणूक—खासपणे तरुणांची. शिक्षक या नात्याने काम करत असताना माझ्या शाळेत असणाऱ्या साक्षीदारांचे निरिक्षण करण्याची मला संधी मिळाली. मी एका साक्षीदार असणाऱ्या कुटुंबातच राहात असल्यामुळे तेथेही मुलांच्या वर्तणूकीचे परिक्षण करता आले.
मग शाळेतील साक्षीदार मुले व इतर मुले यांच्यातील फरक जाणवल्याशिवाय राहिला नाही. साक्षीदार नेहमी नियमित असत व त्यांची वागणूकही चांगली असे. ते कधीही खोटे बोलत नसत व त्यांना नेमून दिलेले काम करीत असत. परिक्षेच्या वेळी इतर मुले फसवणूक करत, पंरतु हे मात्र प्रामाणिक राहात हे माझ्या निर्दशनास आले. विशेष म्हणजे त्यांचा शिक्षक या नात्याने ते माझ्याशी नम्रपणे वागत व आदर देत. शाळेतील तरुण साक्षीदार व मी जेथे राहात होतो त्या घरातील साक्षीदाराकरवी प्रभावीत होऊन मी या धर्माचे परिक्षण करण्यास सुरवात केली व सरतेशेवटी सत्याचा स्वीकार केला.
अधिवेशनातील ख्रिस्ती वागणूकीचे चांगले परिणाम
एलसाल्वेडोरच्या पश्चिम भागात राहणाऱ्या एका यहोवाच्या साक्षीदाराला त्याच्या दोन भावांबरोबर राज्याच्या सुवार्तेची सहभागिता करावी असे वाटले. एकाने ती ऐकली व यहोवाच्या साक्षीदारांबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु केला. दुसरा भाऊ जो शांतीचा राजपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इव्हॅन्जीलिकल चर्चशी संबंधित होता. तो त्याच्या भावाला म्हणालाः “माझ्याशी बोलू नकोस, कारण तू सैतानाच्या इच्छेला मान देत आहेस.”
जेव्हा प्रांतिय अधिवेशनाची वेळ आली तेव्हा जो अभ्यास करत होता त्याने ह्या भावाला अधिवेशनास येण्याचे आमंत्रण दिले. भावाने उत्तर दिलेः “ठीक आहे, मी येईन. साक्षीदारांना मी कुठे पकडू शकेन हे पाहण्यासाठीच मी येईन.” दोन्ही भाऊ अधिवेशनास एकत्रच उपस्थित राहिले. मोठ्या प्रमाणावरील उपस्थिती व अधिवेशनातील सुव्यवस्था यामुळे इव्हॅन्जीलिकल असलेला भाऊ प्रभावीत झाला व म्हणालाः “अशा तऱ्हेचे वातावरण पूर्वी माझ्या पाहण्यात आले नाही.” जेव्हा तो घरी आला तेव्हा आपल्या भावाला म्हणालाः “तुझा हात जरा पुढे कर.” “कशासाठी?” भावाने विचारले. “तुझा हात पुढे कर.” हे उत्तर होते. त्यांनी हस्तांदोलन केले व चर्चचा सदस्य असलेला भाऊ म्हणालाः “येथून पुढे मी यहोवाच्या साक्षीदारांबरोबर अभ्यास करणार आहे. मी खरोखर काय गमावत होतो याची मला कल्पनाच नव्हती.” आता हा भाऊ देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यात उत्साहाने कार्यव्रत आहे.