सदाचरणाद्वारे साक्ष देणे
१ हल्लीच्या स्वैराचारी समाजात अनेक युवक मादक पदार्थ, अनैतिकता, बंडखोरी आणि हिंसाचार यांवर बिनधोकपणे आपले उभे आयुष्य उधळून टाकतात. याच्या अगदी विपरीत, ख्रिस्ती मंडळीतील गुणी युवकांचे आदर्श आचरण पाहणे उभारी आणणारे असते आणि यहोवासाठी तर ते निश्चितच एक मनोहर दृश्य होय. त्यांचे आदर्श आचरण प्रभावशाली साक्ष देते जेणेकरून इतरजण सत्याकडे आकृष्ट होऊ शकतात.—१ पेत्र २:१२.
२ अनेक अनुभव दाखवून देतात, की ख्रिस्ती युवकांच्या सदाचरणाची पाहणाऱ्यांच्या मनावर एक सकारात्मक छाप पडली आहे. तरुण साक्षीदार असलेल्या आपल्या एका विद्यार्थीनीबद्दल बोलताना एका शिक्षिकेने सबंध वर्गाला सांगितले, की या मुलीचा देव, यहोवा हा सत्य देव आहे. त्या मुलीचे आचरण नेहमीच आदरयुक्त असल्यामुळे शिक्षिकेने असे उद्गार काढले. दुसऱ्या एका शिक्षकाने संस्थेला असे लिहिले: “तुमच्या धर्मात असलेल्या गुणी युवकांसाठी मी तुमची वाखाणणी करू इच्छितो. . . . ते खरोखरच आदर्श युवक आहेत. ते वडीलधाऱ्यांचा आदर करतात, ते विनयशील असतात शिवाय त्यांचा पोशाखही अगदी सुसभ्य असतो. आणि बायबलविषयी त्यांना असलेल्या ज्ञानाबद्दल तर काय विचारूच नका! खरंच धर्म असावा तर असा!”
३ आणखीन एक शिक्षिका तिच्या वर्गातील सात वर्षीय मुलाच्या सदाचरणामुळे प्रभावित झाली होती. आपल्या सौम्य, प्रसन्न व्यक्तिमत्त्वामुळे इतर मुलांत तो अगदी उठून दिसायचा; साहजिकच तिला तो आवडायचा. धार्मिक विश्वासांसंबंधी असलेल्या त्याच्या गंभीर मनोवृत्तीमुळे ती अवाक झाली; आपल्या विश्वासामुळे इतरांपेक्षा वेगळे असण्याची त्याला लाज वाटत नव्हती. तिला हेही दिसून आले, की त्याच्या विवेकास योग्य वळण लावले गेले होते व “चांगले आणि वाईट समजण्याचा सराव” त्याला झाला होता. (इब्री. ५:१४) कालांतराने, मुलाच्या आईने शिक्षिकेची भेट घेतली आणि एक बायबल अभ्यास सुरू झाला. सरतेशेवटी, या शिक्षिकेचा बाप्तिस्मा झाला आणि नंतर ती एक नियमित पायनियरही बनली!
४ एक युवक त्याच्या शाळेतील एका साक्षीदार मुलीच्या सदाचरणामुळे प्रभावित झाला होता. ती खरोखरच इतरांपेक्षा वेगळी होती—अतिशय सभ्य, अभ्यासू आणि तिचा पोशाखही नेहमी सभ्य असायचा; आणि मुख्य म्हणजे, इतर मुलींप्रमाणे ती कधीच मुलांशी प्रेमाचे चाळे करत नसे. त्याला हे दिसून आले, की ती बायबल तत्त्वांनुरूप आपले जीवन व्यतीत करत आहे. या युवकाने तिच्या धार्मिक विश्वासांसंबधी तिला प्रश्न विचारले आणि तिच्या तोंडून त्याने जे काही ऐकले त्यामुळे तो खूप प्रभावित झाला. तो अभ्यास करू लागला, लवकरच त्याचा बाप्तिस्मा झाला व सरतेशेवटी त्याने पायनियर सेवेत आणि मग बेथेल सेवेतही सहभाग घेतला.
५ तुम्ही एक ख्रिस्ती युवक असून आपल्या आचरणाद्वारे इतरांना उत्तम साक्ष देऊ इच्छिता तर हर तऱ्हेने आपल्या आचरणावर लक्ष द्या. जगाच्या स्वैर प्रवृत्ती, मते किंवा जीवनशैली यांसंबंधी पसंती दर्शवून एक क्षण देखील बेसावध राहू नका. केवळ क्षेत्र सेवेत व मंडळीच्या सभांमध्येच नव्हे तर शाळेत असताना व मनोरंजनात सहभागी होत असताना देखील आपली बोली, वेशभूषा आणि केशभूषा याबाबतींत एक उदात्त उदाहरण राखा. (१ तीम. ४:१२) तुम्ही आपल्या सदाचरणाद्वारे ‘तुमचा प्रकाश पाडत’ असल्यामुळे एखादी व्यक्ती सत्यात रस घेऊ लागते तेव्हा तुम्हाला खरा आनंद होईल.—मत्त. ५:१६.