गोंधळलेल्या जगातील गुन्हेगारी
गुन्हेगारी ही काही आजच्या जगातील चमत्कार नाही. पहिला खून हजारो वर्षांपूर्वीच, काईनाने हाबेलाचा वध केला, त्यावेळी घडला. तसेच प्राचीन इब्री शास्त्रवचनात बलात्कार व अनैसर्गिक जारपणा यांचा उल्लेख आहे. (उत्पत्ती ३:८; १९:४, ५; ३४:१-४) आपल्या समान शकाच्या पहिल्या शतकात लोकांना लुबाडण्यात येत होते हे चांगल्या शोमरोन्याचा दाखल्याद्वारे दिसूनयेते. (लूक १०:२९-३७) परंतु, आज मात्र यात फरक जाणवतो.
जगातील प्रमुख शहरी राहणाऱ्या लोकांना, मग ते, न्यूयॉर्क, लंडन, कलकत्ता किंवा बोगोटा असो, गुन्हेगारी पूर्वीपेक्षा अधिक प्रचलित व भेडसावणारी बनली आहे असे वाटते. इंडिया टुडे या नियतकालिकात “बेबंदशाहीची तत्त्वप्रणाली” या मथळ्याखालील लेख असे म्हणतोः “समाजाला एकत्र आणणाऱ्या नाजूक नैतिक व सामाजिक गुंफणीचे तुकडे तुकडे करते ती आहे, हिंसाचारातील वाढ, उद्धट व बेशिस्त असे बेबंदशाहीचे वेड.” गुन्हेगारीविरुद्ध लढताना स्वतः पोलिसांना देखील कायद्याची अंमलबजावणी तसेच गुन्हेगारांना हाताळण्याच्या पद्धती यांच्या मर्यादेबाहेर जाण्याचा मोह जडतो. वर नमूद असणारा भारतातील गतकालीन अहवाल म्हणतोः “पोलिसांच्या कोठडीतील मृत्यूच्या बातम्या सातत्याने ऐकू येतात.” असे इतर देशांच्या बाबतीत देखील खरे आहे.
गुन्हेगारीचा बळी होण्याविरुद्धची लढत अधिक कमकुवत बनत चालली आहे. अमेरिकेतील एक अहवाल असे म्हणतोः “१९८८ मध्ये अमेरिकेतील चार घरांपैकी एका घराला हिंसाचार किंवा चोरी यांचा त्रास सहन करावा लागला आहे.” शिवाय अगदी अजाण वयातच लोक हिंसक गुन्हे करू लागले आहेत. व्हिजन हे लॅटिन-अमेरिकन मासिक म्हणते की, “सिकारिओस, किंवा भाडेकरी मारेकऱ्यात दहापैकी नऊ बालगुन्हेगार आहेत. ती, वंशंपरत्वे व कायद्याच्या संरक्षणाखाली असणारी ‘मुले’च आहेत.” अशाप्रकारातील बालगुन्हेगारांद्वारे हिंसक गुन्हे घडणे ही जगव्याप्त रुढीच बनली आहे.
पवित्र शास्त्राने २,००० हजार वर्षांपूर्वी सांगितले होते की, “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण मनुष्ये स्वार्थी, धनलोभी, . . . कृतघ्न, मयारहित . . . असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली . . . होतील. दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.”—२ तीमथ्य ३:१-४, १३.
आपण त्या शेवटल्या कठीण काळात राहात आहोत याबद्दलचा पुरावा १९१४ पासून मुबलक मिळत आहे. दोन जागतिक महायुद्धे व इतर प्रमुख दंगली यांनी त्रासलेले हे जग आज अनेक मार्गाने ताबा नसलेले व गोंधळलेले बनले आहे. गुन्हेगारी बेसुमार वाढली आहे. शहरातील कित्येक भागात गुंडांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे आणि त्यामुळे तेथील कायद्याचे पालन करणाऱ्यांची जीवनपद्धत बदलली आहे. एका प्रसिद्ध अमेरिकन पुढाऱ्याने म्हटल्याप्रमाणेः “आता पुष्कळ गोष्टींची आपल्याला चिंता लागून आहे. यांची पूर्वी आम्हाला तसे पाहता भीती वाटत नव्हती. कधीकधी तर आम्ही इतके भयग्रस्त होतो की, आपण स्वतःलाच बंदिस्त करून घेतो आणि ज्यांना बंदिस्त व्हावयाचे आहे ते तर मोकळेपणाने फिरत आहेत.”
याचा परिणाम म्हणून आज लोक अशी दक्षता घेत आहेत, जी गेल्या २० ते ३० वर्षांपूर्वी परिचित नव्हती. दारांना दुहेरी किंवा तिहेरी कुलूपे लावली जातात; व ही दारे पोलादाने मजबूत केली जातात. पुष्कळ ठिकाणी लोक आपल्यासोबत पैसे ठेवतात की लूटारु ते लुटू शकतील; आणि द्यायला काहीच नसण्यामुळे जो मार खावा लागतो त्यापासून बचाव होण्याची आशा धरतात. सूर्यास्तानंतर बरेच रस्ते ओसाड होतात. केवळ कोणी भाबडा किंवा एखादा मूर्ख किंवा परिस्थितीमुळे भाग पडते म्हणून काही रस्त्यावर दिसतात; पण ते रस्त्यावरील जंगलात मोकाट फिरणाऱ्या लुटारुंचे सावज बनतात.
तर मग, या अराजक व गोंधळलेल्या जगात गुन्ह्याचे बळी होण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे? आम्ही कसे तोंड देऊ शकतो?