मृत समुद्रातील गुंडाळ्या अभूतपूर्व खजिना
मृत समुद्राच्या वायव्य दिशेला वादी कुम्रानच्या पायथ्याशी काही प्राचीन अवशेष विखुरलेले आहेत. ते एखाद्या रोमी किल्ल्याचे अवशेष असतील असा खूप काळापासून समज आहे, परंतु पुराणवस्तु संशोधकांचे तिकडे दुर्लक्ष झालेले आहे. १९४७ मध्ये मृत समुद्रात सापडलेल्या यशयाच्या गुंडाळीमुळे त्या स्थळाबद्दल पुनर्विचार करण्यास चालना मिळाली आहे.
लवकरच विद्वानांच्या लक्षात आले की, या इमारती यहूदी धार्मिक गटाच्या मालकीच्या असाव्यात व लगेच अनुमान काढण्यात आले की, याच लोकांनी त्या गुंडाळ्या सुळक्यांच्या आसपास लपवून ठेवल्या असतील. परंतु नंतरच्या संशोधनामुळे त्याबद्दल शंका निर्माण झाली.
अभूतपूर्व शोध
बेदोयुईन लोक त्यांना मिळालेल्या हस्तलिखिताच्या मूल्याबद्दल जागृत होते. १९५२ साली एका वृद्धाने अशी हकीकत सांगितली की, तो तरुण असताना त्याने एका तित्तर पक्षाचा पाठलाग केला होता. पाठलाग करीत करीत तो खडकातील एका विवरामध्ये शिरला. तेथे त्याला काही मातीची भांडी, जुना तेलाचा दिवा आढळला. मग, मात्र नव्या जोमाने संशोधन सुरु झाले.
त्या उभट सुळक्याच्या खोलवर भेगांमधील त्या गुहेचे तोंड तो गृहस्थ अजूनही ओळखू शकत होता. ती एक मनुष्यनिर्मित गुहा होती व आता तिला गुहा क्रमांक ४ म्हणून ओळखले जाते. त्या ठिकाणी त्या बेदोयुईनला जमिनीच्या अस्तित्वातील पातळीपेक्षा काही मीटर खोलवर हस्तलिखितांचे तुकडे सापडले व कोणताही तुकडा भांड्यात न ठेवल्यामुळे ते वाईट रितीने खराब झालेले होते व काळे पडून ठिसूळही झाले होते. आतापर्यंत जवळजवळ ४०० हस्तलिखितांचे ४०,००० तुकडे मिळाले होते. त्यात पवित्र शास्त्रातील १०० हस्तलिखितात एस्तेरखेरीज सर्वच्या सर्व इब्री पुस्तके उपलब्ध होती. गुहा क्रमांक ४ मधील बरेचसे लिखाण अजून प्रकाशित झालेले नाही.
महत्त्वाच्या हस्तलिखितात शमुवेलाचे पुस्तकही समाविष्ट होते. एका अखंड गुंडाळीवर ते होते. ते इब्री पुस्तक ज्यात ५७ पैकी ४७ रकाने जतन करण्यात आले आहेत, ते ग्रीक सेप्ट्युजंट आवृत्तीसोबत अगदी मिळतेजुळते आहे. सेप्ट्युजंटचे ग्रीक भाषेतील लेवीय ते गणना यांचेही तुकडे मिळाले आहेत व ते इ. स. पूर्व १ल्या शतकाचे असल्याचे दिसते. लेवीयच्या हस्तलिखितात ग्रीक कायरिऑस, “प्रभू” याऐवजी इब्रीतील יהוה या देवाच्या ईश्वरी नामासाठी IAO अशी अक्षरे दिसतात.a
अनुवादच्या एका तुकड्यात इब्री लिखाणात अध्याय ३२ व वचन ४३चे अवतरण सेप्ट्युजंटमध्ये इब्रीयांस पत्र १:६ मध्ये घेतलेले आढळते, जेथे “देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत” असे म्हटलेले आहे. ग्रीक भाषांतरातील हे वचन इब्री हस्तलिखितात सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे विद्वानांना, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात वेळोवेळी अवतरीत केल्या जाणाऱ्या सेप्ट्युजंट वचनांबद्दल नवीनच दृष्टीकोण प्राप्त झाला.
निर्गमची गुंडाळी इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील तिसऱ्या भागाकडे, शमुवेलपैकी एक त्या शतकाच्या अखेरीस आणि यिर्मयाची गुंडाळी इ. स. पूर्वी २२५ ते १७५ च्या सुमारास निर्देश करते. इ. स. पूर्व तीन ते एक या कालावधीत पुरेसे लिखाण सापडले आहे, ज्यामुळे हस्तलिखाणातील पद्धतीतील बदल, व इब्री आणि अरामिक मूळाक्षरातील स्वतंत्र अक्षरातील बदल यांचा मागोवा घेणे शक्य झाले व हस्तलिखितांचा काळ ठरविण्यात बहुमोल सिद्ध झाले आहे.
गुहा क्रमांक ११चे आश्चर्य
सरते शेवटी स्थानिक बेदोयुईन लोकांच्या मदतीने पुराणवस्तु संशोधकाने कुम्रानच्या सर्व भूभागाचे पूर्णपणे संशोधन केले. तरी १९५६ सालातील एके दिवशी बेदोयुईन लोकांना गुहा क्रमांक १ च्या उत्तरेकडील सुळक्यातील फटीतून वटवाघळे बाहेर येताना दिसली. ते वर चढले व अजून एक गुहा त्यांना दिसून आली. परंतु तिचे प्रवेशद्वार बंद होते. ते खुले करण्यासाठी दोन टन वजनाचे पडलेले खडक बाजूला करावे लागले व त्यात जे काही सापडले ते आश्चर्याने थक्क करणारे होते—दोन पूर्ण हस्तलिखिते व इतरांचे पाच मोठे भाग.
सर्वात महत्त्वाचा शोध होता, स्तोत्रसंहितेची सुदंर गुंडाळी. त्या चर्माच्या जाडीवरुनच हे सूचित होत होते की, शेरडांच्या कातड्याऐवजी ते वासरांचे कातडे असावे. पाच पूर्ण ताव व चार वेगळी करता येण्याजोगी पाने व चार तुकडे यांनी मिळून ४ मिटरपेक्षा अधिक लांबी होती. या गुंडाळीचा वरचा भाग जरी सुस्थितीत असला तरी खालचा भाग मात्र खूपच खराब झाला आहे. त्याचा कालावधी इ. स. पूर्व १ल्या शतकातील पहिल्या टप्प्याचा आहे व यात ४१ स्तोत्रांचे भाग समाविष्ट आहेत. ईश्वरी नाम १०५ वेळा प्राचीन पालेओ-इब्री अक्षरांनी लिहिलेले आढळते व ते चौकोनी इब्री लिखाणात ठळकपणे उठून दिसेल असे लिहिलेले आहे.
आणखी एक लिखाण, लेवीय, हे पूर्णपणे प्राचीन इब्री भाषेत लिहिलेले आहे, परंतु असे का याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. हाच सगळ्यात असा मोठा दस्तऐवज आहे जो या भाषेत लिहिलेला आहे. ती भाषा, इ. स. पूर्व सातव्या शतकाच्या शेवटी जेव्हा यहूद्यांना बाबेलात बंदिवासासाठी नेले तेव्हा वापरीत असत.
तारगमची नक्कल, जी ईयोबाच्या पुस्तकाचा अरामिक भाषेतील अनुवाद आहे, प्रकाशात आली. ती प्रथम लिहिल्या गेलेल्या तारगमपैकी एक आहे. निरनिराळ्या गुहांमध्ये इतर पवित्र शास्त्रीय पुस्तकांवर केले गेलेले भाष्यही आढळून आले. या सर्व गुंडाळ्या त्या गुहांमध्ये इतक्या व्यवस्थितरित्या कशा ठेवल्या गेल्या?
आधी सांगितल्याप्रमाणे त्या कुम्रान समाजाकडून लपविल्या गेल्या असतील. परंतु पुरावा हे दाखवतो की, इ. स. ६८ मध्ये म्हणजे यरुशलेमाच्या शेवटच्या नाशाच्या दोन वर्षाआधी, यहूदावर रोमी लोकांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी पळून जाणाऱ्या यहूद्यांनी ती तेथे ठेवली असावीत. यहुदातील अरण्य ह्या अनमोल खजिन्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान होते. केवळ कुम्रानच्या गुहाच नव्हे तर यरीहोच्या सभोवतालचे उत्तरेकडील अनेक मैल व मसादाच्या जवळील दक्षिण भाग हेही सुरक्षित स्थान होते. यांच्या संरक्षणाबद्दल आम्ही किती कृतज्ञ असावयास हवे! यहोवाच्या प्रेरित शब्दात कधीच बदल होत नाही याचा पुरावा ते देतात. खरेच, “आमच्या देवाचे वचन सर्वकाळ राहते.”—यशया ४०:८. (w91 4/15)
[तळटीपा]
a रेफरन्स बायबलमधील अपेंडिक्स १सी(५) आणि लेवीय ३:१२ वरील तळटीप पहा, जेथे या हस्तलिखिताची ओळख 4Q LXX Lev/b अशी दिलेली आहे.
[३२ पानांवरील चौकट]
अधिक असे लवकर येणार का?
मृत समुद्रातील गुंडाळ्या जरी बऱ्याच दशकापूर्वी सापडलेल्या असल्या तरी त्यातील बरेच भाग अजूनही अप्रकाशित आहेत. द न्यूयॉर्क टाइम्सच्या डिसेंबर २३, १९९० अंकात अशी तक्रार केली आहे की, “विद्वानांच्या एका गटाने छायाचित्रातील साम्यदेखील लपवून ठेवले आहे व त्यांच्या सहकाऱ्यांना ते टाळतात व त्यांच्या ताब्यातील गोष्टीचे प्रकाशन करण्यास नकार देतात.” ते वर्तमानपत्र या संपादकांच्या नोकरमंडळीत झालेल्या बदलाबद्दल म्हणते की, ती एक पायरी असेल. “एकाधिकाराने वेढलेल्या गुंडाळ्या स्वतंत्र करण्याची व इतिहासातील एका असामान्य पर्वाची जगाला ओळख होईल.”