गोंधळलेल्या जगातील गुन्हेगारीस तोंड देणे
रात्री बाहेर पडण्याची तुम्हाला भीती वाटते का? तुमच्या दारे व खिडक्यांना दोन किंवा तीन कुलुपे लावण्याची जरुरी तुम्हास भासते का? तुमची मोटार किंवा सायकल कधी चोरीस गेली आहे का? तुमच्या मोटारीतील रेडिओची नासधूस झाली आहे का? एखाद्या वस्तीत राहण्यास तुम्ही घाबरता का?
यातील कोणत्याही प्रश्नाला तुमचे उत्तर होय असे असेल तर या गोंधळलेल्या जगातील गुन्हेगारीला तुम्ही तोंड देण्याचा प्रयत्न करीत आहात असा त्याचा अर्थ आहे. याबाबतीत तुम्ही काय करू शकता? पवित्र शास्त्र तुम्हाला तोंड देण्यात मदत करू शकेल का?
गुन्हेगार प्रवृत्ती व न्याय
गुन्हेगारीच्या जगतात तीन मूलभूत घटक आहेतः गुन्हेगार, पोलिस व बळी. एक संभाव्य बळी या नात्याने या गुन्हेगारीस तोंड देण्यासाठी कशाची गरज आहे? या तिन्ही घटकांपैकी एकावर तरी तुम्ही प्रभाव राखू शकता का? उदाहरणार्थ, तुम्हाला गुन्हेगारांना बदलता येईल का?
तसेच पाहता, बऱ्याच गुन्हेगारांनी गुन्ह्याला आपले जीवित साधन बनवले आहे. जीवन जगण्याचा तो एक सोपा मार्ग म्हणून त्यांनी तो निवडला आहे. ‘दुसऱ्यांच्या कमाईवर जगता येते तर कामधंद्याची जरुरीच ती काय?’ असे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. लुटारुला हे माहीत आहे की, बळी पडणारी व्यक्ती ही सर्वसाधारणपणे काहीही प्रतिकार न करता आपणाकडील पैसे देऊन टाकते. त्यामुळे पकडले जाण्याची व तुरुंगवास मिळण्याची शक्यता असताना सुद्धा गुन्हेगारांना गुन्हेगारीच लाभदायक वाटते.
याशिवाय, न्यायालयाचे कामकाज गुंतागुंतीचे व वेळ खाणारे असते. काही देशांमध्ये न्यायालये, न्यायाधीश व तुरुंगांचे प्रमाण अल्प असते. गुन्हेगारीच्या खटल्याची पद्धत सर्व सुसंगतपणाच उलटवून टाकते. न्यायचक्रे इतकी हळू फिरतात की, पवित्र शास्त्रात तीन हजार वर्षांपूवी सांगितलेली स्थिती प्रत्ययास येतेः “दुष्कर्मांबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.” जसे हे पवित्र शास्त्र तत्त्व दर्शविते त्याप्रमाणे गुन्हेगारांची आकडेवारी कमी करण्याचा किंवा त्यांची सुधारणूक करण्याची उपाययोजना मुळीच आशादायक वाटत नाही.—उपदेशक ८:११.
आता, दुसरा घटक पोलिस याबद्दल काय? पोलिस परिस्थितीवर ताबा मिळवतील अशी काही आशा आहे का? तेच स्वतः उत्तर देतीलः गुन्हेगारांच्याच बाजूने झुकणारे कायदे; अपराधी माणसाच्या सुटकेसाठी कारस्थान रचणारे, खऱ्या खोट्याची चाड न बाळगणारे वकील; जास्त व मोठ्या खर्चाच्या तुरुंगाच्या खर्चाला आधार देण्यास नाराज असलेला समाज व पोलिसांची कमतरता या सर्वांमुळे वाढत्या गुन्हेगारीला काहीच करू शकत नाहीत.
आता तिसरा घटक राहतो, व तो संभाव्य बळी: म्हणजे आपण, जनता. या बहुतेक गोंधळलेल्या परिस्थितीस चांगल्या रितीने तोंड देण्यासाठी आपल्याजवळ काही आहे का?
व्यावहारिक ज्ञान व चातुर्य
पवित्र शास्त्रातील नीतीसूत्रे हे पुस्तक म्हणतेः “तू चातुर्य व विवेक ही संभाळून ठेव; म्हणजे जी तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील. तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही.” जेव्हा एखादा त्या गुन्हेगारीचा बळी ठरण्याच्या स्थितीत असेल तेव्हा हा सल्ला लागू होऊ शकेल. तर या क्षेत्रात व्यावहारिक ज्ञानाचा अवलंब ज्याप्रकारे करता येऊ शकेल असे व्यावहारिक मार्ग कोणते आहेत?—नीतीसूत्रे ३:२१-२३.
गुन्हेगारांचा कल झडप घालणाऱ्या जंगली श्वापदासारखे असण्याचा असतो. ते सहजगत्या पकडीत येणाऱ्या सावजास हेरत असतात. तितकाच माल या सोप्या सावजाकडून मिळत असल्यास मारामारी करण्याचा व पकडले जाण्याचा धोका घेण्यास ते तयार नसतात. यासाठीच ते वृद्ध माणसे, आजारी लोक, परके लोक आणि धोकादायक परिस्थितीची जाणीव नसणाऱ्या लोकांचा माग घेत असतात. हल्ल्याला योग्य असणारी वेळ व जागा हे ठग निवडतात. अशा ठिकाणी बळी पडणाऱ्या संभाव्य लोकांना व्यावहारिक सूज्ञता वापरता येते.
पवित्र शास्त्र वर्णन करते त्यानुसार वाईट गोष्टी आचरणारे आपली कामे नेहमी अंधाराच्या आवरणाखाली करीत असतात. (रोमकर १३:१२; इफिसकर ५:११, १२) माणसांविरुद्ध तसेच मालमत्तेसाठी घडणारे गुन्हे रात्रीचेच घडतात हे खरे आहे. (पडताळा ईयोब २४:१४; १ थेस्सलनीकाकर ५:२.) यामुळे शक्यतो, सूज्ञ माणूस अशा धोकादायक प्रदेशात रात्रीचे बाहेर पडणार नाहीत. गुन्हेगारीने खच्चून भरलेल्या न्यूयॉर्क शहरात रोजचा पोलिस अहवाल उघड करतो की, बरेचसे लोक अंधार पडल्यानंतर व विशेषेकरुन दहाच्या नंतर आपल्या घरी परतत असता लुटले गेले आहेत. ठग एकांतातील रस्त्यावर आपले सावज हेरत असतात. यास्तव, तुम्हाला बसची किंवा टॅक्सीची वाट पहावी लागत असल्यास किंवा घातकी वसाहतीतून जाण्याचा प्रसंग असल्यास धीर धरा व वाट पाहा. नाहीतर येणारा अनुभव यातनामय असेल.
रात्री दहाच्या बसची वाट न पाहता साधारण अंधारात थोडेच अंतर चालायचे म्हणून निघालेल्या एका ख्रिश्चनाला बेदम चोप तर बसलाच, पण लुबाडण्यातही आले. रस्त्यावर तीन माणसे होती, परंतु त्या तीन ठगांनी बेसावध व्यक्तीसाठी सापळा रचला होता. ज्यावेळी हे संभाव्य सावज रस्त्यावर आले तेव्हा एकाने इतरांना इशारा केला. एक शब्दही न बोलता त्यांनी या सावजावर हल्ला केला व त्याला लुबाडले. हे सर्व इतक्या थोडक्या वेळात घडले की शेजाऱ्याला येऊन हस्तक्षेप करण्यासही वेळ मिळाला नाही. त्या बळी पडलेल्या व्यक्तीने हे नंतर कबूल केले की, पुढच्या वेळी मी बसची प्रतीक्षा करीन.”
डिकन्स यांच्या ऑलिव्हर ट्विस्ट् या कादंबरीतील तरुण खिसेकापू आर्टफूल डॉजर हा आधुनिक लुटमार करणाऱ्यांचा सहृदयी नमुना आहे. मूळ आर्टफूल डॉजरप्रमाणे नव्हे तर आजचे चोर, ठग, ज्यांच्यात वयाची कोणतीही अट नाही ते, बंदूक किंवा चाकू बाळगतात व त्याचा वेळप्रसंगी उपयोगही करतात. परकीय प्रवासी, भेट देणारे आणि गजबजलेल्या शहरात इथे तिथे फिरणारे या दुष्ट, अमानुष अपराध्यांचे प्रमुख लक्ष्य असते. तुमच्या डोळ्यांची उघडझाप होण्याआधीच ते तुमच्याकडे आहे ते चोरुन नेतात! पण कशामुळे चोराच्या नाडीचे ठोके जोरदारपणे धडधडू लागतात? लोकांच्या गळ्यात हेलकावणारी सोन्याची साखळी किंवा किंमती दागिने, किंवा प्रवाश्याच्या गळ्यात लोंबकळणारा कॅमेरा पाहून. अशा वस्तु घालणे वा जवळ बाळगणे हे जणू, “या, व मला लुटा,” असे निमंत्रण देण्यासारखेच आहे. या कारणास्तव, दक्षता बाळगण्याची गरज आहे. दागिने लपवून ठेवा आणि कॅमेरा नजरेत येणार नाही असा एखाद्या पिशवीत ठेवा. ही व्यावहारिक सूज्ञता आहे.
सतत दक्ष असणे हे गुन्हेगारीला तोंड देण्याचा आणखी एक मार्ग आहे. पवित्र शास्त्र सांगतेः “ज्ञान्यांचे नेत्र त्याच्या मस्तकात असतात, आणि मूर्ख अंधारात चालतो.” (उपदेशक २:१४) हा इशारा व्यवहारात आणल्यामुळे आपले लक्ष, संशयास्पद तसेच कोणताही उद्देश नसताना फिरत राहणाऱ्या लोकांकडे राहील. तुम्ही रस्त्याने चालत असता तुमच्या मागून येऊन तुमची बॅग हातातून हिसकावून घेऊन पळून जातील अशा चोरांकडे लक्ष असू द्या. काही लोक मोटार सायकलवर येऊन तुम्हाला जोराचा धक्का देतील व तुमचे सामान घेऊन पळून जाऊ शकतील, यासाठी तुमच्या हातात एखादी लहानशी बॅग किंवा पिशवी असल्यास रस्त्याच्या अगदीच कडेने चालू नका. जमिनीखालील भुयारी मार्गाने जाणाऱ्या मोटारींना टाळा, कारण त्या बहुधा रिकाम्या असतात. पुष्कळ प्रकाश असलेल्या व बरेच लोक असलेल्या ठिकाणी तुम्ही सुरक्षित असाल. चोरांना आपले निरिक्षण झालेले व ओळखले जाणे आवडत नसते.
लोकांठायी गुन्हेगारीविषयीची जर अधिक जाणीव राहिली तर घरफोडीसारखा सर्वसामान्य गुन्हा दक्षतेने टाळता येऊ शकतो. पवित्र शास्त्राने ही तुलना अगदी योग्यपणे मांडली आहेः “ते चोरांसारखे खिडक्यातून प्रवेश करतात.” (योएल २:९) तुमची दारे व खिडक्या उघड्या ठेवू नका असे व्यावहारिक ज्ञान सांगते. इलाजापेक्षा उपाय बरा हे नेहमीच खरे ठरते. आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी थोडा अधिक खर्च करणे हे चोरी व शारीरिक इजा टाळण्याचा उत्तम विमा आहे.
तुम्हाला लुबाडण्यात आले तर काय?
होय, सर्व खबरदारी घेऊन देखील तुम्हाला ठकाने अडविले तर काय? शक्यतो घाबरुन जाऊ नका व घाईने काहीही कृती करू नका. लक्षात असू द्या की, कदाचित चोरही घाबरलेला असेल व तो तुम्ही केलेल्या कृतीचा वेगळा अर्थ करील. त्या व्यक्तीची परवानगी घेऊन त्याच्याशी किंवा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. (होय, तुम्हावर हल्ला करणारी व्यक्ती कदाचित स्त्री देखील असू शकते.) संभाषणाद्वारे लुबाडणाऱ्यांना जेव्हा हे कळते की, ते प्रामाणिक व खऱ्या ख्रिश्चनांची फसवणूक करीत आहे तेव्हा ते नरम होतात. प्रतिक्रिया कोणतीही असली तरी पैसे किंवा इतर वस्तूचा मामला असेल तर प्रतिकारास वाव देऊ नका. ज्याची मागणी केली आहे ते देऊन टाका. पवित्र शास्त्र सांगते की, माणसाचे जीवन हे त्याच्याकडे जे आहे त्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे.—पडताळा मार्क ८:३६.
लुबाडणाऱ्याचे निरिक्षण करीत आहात असे भासवू न देता तुम्ही त्याचे कपडे किंवा शारीरिक स्वरुप याबाबत असणाऱ्या काही विशिष्ट गुणलक्षणांची नोंद घ्या. त्याची बोलण्याची ढब कशी आहे? हा सर्व तपशील, तुम्ही जेव्हा पोलिसात तक्रार द्याल, तेव्हा उपयुक्त ठरेल. कारण बरेचसे गुन्हेगार ठराविक पद्धतीचाच उपयोग करतात व त्यामुळे ते चटकन् ओळखता येतात.
तुम्ही स्वसंरक्षणार्थ एखादे हत्यार बाळगले तर काय? शस्त्रे बाळगणे हे ख्रिश्चनासाठी निश्चितच सूज्ञतेचे नसणार. त्या ठकाच्या लक्षात आले की तुम्ही हत्यार काढण्यासाठी आपला हात वळवला आहे, तर तो तुम्हाला जखमी करू की ठार करू याबद्दल विचार करीत बसणार नाही. हिंसात्मक हल्ल्यासाठी तुम्ही जर हत्यारबंद असाल तर “सर्व मनुष्यांबरोबर शांतीने राहा,” या पवित्र शास्त्रीय तत्त्वाचे कसे अनुकरण करू शकाल?—रोमकर १२:१८.
तुम्ही सर्व खबरदारी बाळगून आहात तरी कधीही तुम्ही बळी होणार नाही अशी खात्री नाही. गुन्ह्यांनी काठोकाठ भरलेल्या शहरांमध्ये तुम्ही अयोग्य वेळी व अयोग्य जागी असलात म्हणजे झाले. अलिकडेच न्यूयॉर्कमध्ये एका वकिलाने कॉफीचा कप विकत घेण्यासाठी आपले दप्तर सोडले. त्यांनी दुकानात प्रवेश केला तेव्हाच काही युवक मोटारीतून आले व त्यांनी दुकानावर गोळीबार केला. वकिलांना डोक्यात गोळी लागून ते जागीच कोसळले. “काळ व अकल्पित घटना” यामुळे त्यांनी आपले जीवन गमावले. केवढी ही दुःखद घटना! तर मग, जगाला झोडपून नेणाऱ्या या सद्य गुन्हेगारीच्या लाटेतून चिरस्थायी क्रियेची अशी काही आशा आहे का?—उपदेशक ९:११.
जेव्हा गुन्हेगारीचा अंत होईल
जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी येशूने असा भविष्यवाद केला की, अशी एक पिढी येईल की, जीमध्ये पूर्वीच्या पिढींनी कधीही न पाहिलेल्या भयचकित घटना घडतील. दूरदर्शन तसेच जलद दळणवळणामुळे लाखो नव्हे तर करोडो आपल्या स्थानीय वृत्तप्रसार मार्गामधून प्रत्यक्ष घडत असलेली दुष्कृत्ये पाहू शकतात. जग हे एका खेड्याप्रमाणे झाले आहे आणि जागतिक बातम्या या जणू स्थानिक बातम्या बनल्या आहेत. यामुळे वास्तवता स्थानिक परिस्थितीवर परिणाम करते, आणि येशूने भाकित केल्यानुसार “भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे मनुष्ये मूर्च्छिंत” होत आहेत.—लूक २१:२६.
“या व्यवस्थीकरणाची समाप्ती”च्या आधी घडणाऱ्या १९१४ पासून घडत असलेल्या घटना येशूने आधीच पाहिल्या होत्या. (मत्तय २४:३-१४) पण त्याने असेही म्हटलेः “या गोष्टी होताना पाहाल तेव्हा देवाचे राज्य जवळ आले आहे असे समजा.” (लूक २१:३१) याचा अर्थ हा की, देवाचे नीतीमान अधिपत्य लवकरच या पृथ्वीवर नाट्यपूर्ण रितीने परिणाम करील.—मत्तय ६:९, १०; प्रकटीकरण २१:१-४.
त्या सत्तेखाली केवळ नम्र, शांतीप्रिय आणि देवाच्या इच्छेस आज्ञाधारक राहणाऱ्या लोकांनाच पृथ्वीवरील नंदनवनमय परिस्थितीचा सहभाग मिळू शकेल. मग, गुन्हेगार व अपराध्यांचे काय होईल? “ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. दुष्कर्म्यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची [यहोवा, न्यू.व.] प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.” त्या स्वर्गीय सरकारी सत्तेच्या वर्चस्वाखाली ना गोंधळ ना गुन्हेगारीचा मागमूसहि राहणार नाही.—स्तोत्रसंहिता ३७:२, ९.
या शांतीप्रिय व चिरस्थायी जागतिक सरकारच्या पवित्र शास्त्रीय आशेबद्दल तुम्हाला अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे तर कृपया आपल्या परिसरात राहणाऱ्या किंवा स्थानिक राज्य सभागृहात यहोवाच्या साक्षीदारांचा संपर्क साधा. ते तुम्हाला पवित्र शास्त्र समजून देण्यात आनंदाने व विनामूल्य मदत करतील.
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
“दुष्कर्म्यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची [यहोवा, न्यू.व.] प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.”
[७ पानांवरील चित्रं]
आर्टफूल डॉजर हा चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीतील खिसेकापू आजच्या लुटारूंपुढे तर नवशिका होता