गुन्हेगारीचा अंत समीप आहे!
गुप्तचर विभागातील अधिकारी गुन्हेगाराची ओळख व हेतू प्रकटविणाऱ्या संकेतांचे परिक्षण करून गुन्ह्याचा तपास लावतात. गुप्तचरांचे मार्ग व कौशल्य ही जगभरातील विख्यात कादंबऱ्यांचा विषय बनला आहे. गुन्हेगारांचा शोध लावण्यात गुप्तचर अधिकारी जरी शेवटी यशस्वी होतो तरी त्याचे हे काम घटना घडल्यावर, गुन्हा घडल्यानंतर सुरु होत असते.
गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष देता असे दिसते की, एखादा गुन्हेगार धरला जातो, पण याच वेळेला दुसरे गुन्हे घडत असतात. या कारणास्तव, घडलेले गुन्हे शोधून काढण्यापेक्षा मुळात गुन्ह्याचे उच्चाटन व्हावयास हवे ही गरज आहे. पण लोकांना गुन्हेगार बनण्यापासून काय रोखू शकते?
गुन्ह्यांचा संबंध नैतिकतेशी असतो. खून, बलात्कार व इतर हिंसाचारी कृत्ये गुन्हे आहेत हे मान्य करावेच लागेल. पण जेव्हा करपत्रक भरले जाते त्यात जी फसवणूक केली जाते त्याविषयी काय? असे हे कृत्य देखील गुन्हा आहे, कारण ते प्रामाणिकपणाच्या नैतिक स्तराविरुद्ध आहे. या कारणास्तव गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन म्हणजे मूलभूत नैतिकतेविरुद्ध असणाऱ्या सर्व कृतींचा नाश होय.
यासाठी पवित्र शास्त्रातील तीन उदाहरणे आपण लक्षात घेऊ या. यामध्ये आपल्याला केवळ गुन्ह्याचे कारण दिसणार नाही तर तो कसा मिटविला जाईल हे देखील कळू शकेल.
ईश्वरी भयाविरुद्ध हेवा
स्तोत्रकर्ता आसाफ याचे शब्द कृपया लक्षात घ्याः “दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो.” (स्तोत्रसंहिता ७३:३) होय, गुन्हेगाराच्या समृद्धीचा व राहणीमानाचा हेवा वाटून इतरांना अधार्मिक मार्गांचा अवलंब करण्याची भुरळ पाडली जाते. दूरदर्शन तसेच वृत्तपत्रातील गुन्हेगारीचे रसभरीत वर्णन वाईटाविषयीचा वीट जागृत करण्यापेक्षा त्याविषयीचे अधिक कुतुहल तसेच स्वीकृतपणा निर्माण करते.
तरीदेखील, नीतीसूत्राचा प्रेरित लेखक बजावून सांगतोः “पातक्यांचा हेवा करू नको; तर यहोवाचे भय अहर्निश बाळग.” एखाद्या व्यक्तीचा हेतू व इच्छा या गोष्टी समस्येच्या मूळाशी असतात. यावर प्रभावीपणे मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे यहोवा देव नाराज होऊ शकेल अशी ईश्वरी भीती आपणाठायी वाढवणे. “कारण पारितोषिक निश्चये मिळणार; तुझी आशा नष्ट होणार नाही.”—नीतीसूत्रे २३:१७, १८.
विश्वासाविरुद्ध हाव
इ.स. ३३च्या वसंत ऋतुत येशू यरीहो शहरातून चालला होता. हे जक्कयचे गाव होते. याबद्दल माहिती देताना शुभवर्तमानकार लूक म्हणतो की हा जक्कय “मुख्य जकातदार” होता; व तो “श्रीमंत” होता. यरीहो सभोवतालच्या सुपीक प्रांत हा जकात मिळविण्याचे प्रमुख क्षेत्र होते. जक्कयाने स्वतःच सांगितल्याप्रमाणे, तो प्रमुख जकातदार होता म्हणून त्याला लोकांची पिळवणूक करण्याची संधि मिळे. पण जक्कय गुन्हेगार राहिला नाही.—लूक १९:१-८.
जक्कय, येशूभोवती चाललेल्या जमावापुढे धावत गेला. येशूला बघण्याची त्याची इच्छा होती, पण शरीराने खुजा असल्यामुळे तो उंबराच्या झाडावर चढून बसला. येशूने त्याला बघितले व त्याला खाली येण्यास सांगितले. येशू म्हणाला की, तो जक्कयाच्या घरी उतरणार होता. घरी आल्यावर नंतर जक्कयने हे बोलून दाखविले की, “माझे अर्धे द्रव्य मी दारिद्र्यांस देतो, आणि अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल ते चौपट परत करतो.” अशाप्रकारे त्याच्या स्वभावात बदल दिसला. ज्यांची पिळवणूक झाली त्यांना त्यांची रक्कम परत करण्यामागे बराच खर्च येणार होता. पण हे करण्याचे घोषित करून जक्कयने येशूवरील आपला विश्वास प्रगट केला. होय, त्याने आपल्या दृष्टीकोणात बदल केला याचा प्रत्यक्ष पुरावा दिसला. बेकायदेशीरपणे जे लुबाडण्यात आले होते त्याचे तिप्पट मूल्य परत करून त्याने एकंदर चौपट रक्कम परत देण्याचे निश्चित केले. अशाप्रकारे जक्कयाने आपली चूक सुधारली आणि आपल्या बदललेल्या जीवनाचा खरेपणा त्याने शाबीत केला.—२ करिंथकर ७:११.
मालमत्तेपेक्षा लोकांचे महत्त्व अधिक
रोमी सुभेदार पिलाताने आरोपी येशू ख्रिस्ताविषयी म्हटलेः “मला या मनुष्यात काही दोष आढळत नाही.” (लूक २३:४) गुन्हेगारी प्रवृत्ती दाखवून स्वतःची मालमत्ता वाढविण्यापेक्षा येशूने पृथ्वीवरील आपल्या आयुष्यभराच्या उपाध्यपणात लोकांविषयी प्रेमळ आस्था प्रदर्शित केली. “लोकसमुदायाला पाहून त्याला त्यांचा कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणालाः ‘पीक फार, पण कामकरी थोडे आहेत; यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्तय ९:३६-३८) अशाप्रकारे, येशूने मालमत्तेपक्षा लोकांना महत्त्व दिले होते हे उघड आहे. त्याने स्वतःचा आराम तसेच आस्थेच्या पलिकडे लोकांना महत्त्व दिले होते. हे आपल्याला, त्याने नेहमी आपले शिष्य तसेच त्याच्याकडे मार्गदर्शन व मदतीसाठी येणारा लोकसमुदाय यांच्यासाठी काळजी वाहण्यात जी तत्परता दाखवली त्यावरून दिसते. (मत्तय ८:२०; १४:१३-१६) या बाबतीत, येशू इतरांना अनुकरण करण्याजोगे उदाहरण ठेवून गेला.—१ पेत्र २:२१.
मालमत्तेपेक्षा सहमानवांचे अधिक महत्त्व राखण्याचा कित्ता आज लोकांना गिरवता येणे शक्य आहे का? आम्ही होकारार्थी उत्तर देऊ शकतो. यहोवाच्या साक्षीदारांचा विचार करा, जे आज ३५ लाखांपेक्षा अधिक आहेत. ते येशूप्रमाणे मनोवृत्ती बाळगण्याचा व तो व्यवहारी मार्ग जोपासण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या लोकांना गुन्हे करण्यासाठी ज्या वाईट इच्छा प्रवृत्त करीत असतात त्या आपल्या अंतःकरणातून समूळ उपटून टाकण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. साक्षीदार बनण्याआधी काहीजण गुन्हेगार होते. पण, जसजसे ते पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत गेले, तसतशी त्यांच्या अंतःकरणात देवाविषयीची प्रीती उभारली गेली. त्यांचे अंतःकरण भारावले गेले व मग त्यांनी पूर्वी केलेल्या गुन्ह्यांची परतफेड केली. हे त्यांनी आपल्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी केले नाही. तर, यहोवा देवाबरोबर शांतीचे नाते राखावे आणि देवाने येशू ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणाच्या आधारावर जी विपुल दया व्यक्त केली आहे तिचा लाभ घ्यावा हा त्यामागील हेतू होता.—१ करिंथकर २:१६; ६:११; २ करिंथकर ५:१८-२०.
आपल्या शेजाऱ्यांविषयी प्रीती असल्यामुळे हे ख्रिस्ती वेळ काढून लोकांची भेट घेतात आणि कुटुंब या नात्याने ते देवाच्या राज्याखाली नंदनवनमय परिस्थितीत कसे जगू शकतात याची माहिती देतात. यहोवाचे साक्षीदार प्रत्येक आठवडी आपल्या राज्य सभागृहात नियमितपणे सभा घेतात. या सभा कशा असतात हे पाहण्यासाठी, स्वतः चोर आहोत अशी कबुली नंतर दिलेला एक जण तेथे आला. तो म्हणतोः “थोडक्यात सांगायचे म्हणजे मला खूप आश्चर्य वाटले. मी अपेक्षिले होते तसे काही कंटाळवाणे येथे नव्हते. जो उत्साह व प्रीती तेथे दिसून आली ती खरीच होती. तसेच आध्यात्मिक गोष्टीविषयीची साक्षीदारांठायी असणारी रसिकता उल्लेखनीय होती.” त्याच्यावर इतका प्रभाव पडला की त्याने आपली संगत साक्षीदारांसोबत चालू ठेवली व यामुळेच त्याजठायी बदल घडला. तुम्ही गुन्ह्यात गुंतलेले असा किंवा नसा, पण जेव्हा तुम्ही देवाच्या लोकांची संगत धरता तेव्हा मालमत्तेपेक्षा लोकांमध्ये खरीखुरी आस्था तुम्हामध्येही निर्माण होऊ शकेल.—मत्तय २२:३९.
गुन्हेगारी—आधीच नाहीशी झाली?
जर लोक गुन्हेगाराप्रमाणे वागत नाहीत तर याचा अर्थ ते परिपूर्ण झाले आहेत असा होतो का? नाही! आमचा पहिला मानवी पिता, आदाम, यापासून जे वारशाने पाप लागू झाले आहे त्याचा त्रास यहोवाच्या साक्षीदारांनाही होत आहे. (रोमकर ५:१२; १ योहान १:८) परंतु, आता ते देवाची सेवा करण्यात एक आहेत व हे त्यांच्या जगभरातील प्रचार कार्यावरुन स्पष्ट होते. हा यशयाच्या भविष्यवादाच्या पूर्णतेचा सामर्थ्यशाली पुरावा आहेः “शेवटल्या दिवसात असे होईल की, यहोवाच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगराहून तो उंच होईल; त्याकडे सर्व रा लोटतील.” (यशया २:२) होय, आज लाखो लोक यहोवाच्या उंचावलेल्या भक्तीकडे मार्गाक्रमण करीत आहेत व त्या मार्गामध्ये शिक्षण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुन्हेगारी टाळणाऱ्या या लोकांची संगती करून तुम्हीसुद्धा लाभ मिळवू शकता.
गुन्हेगारीचा अंत—भवितव्यातील आशा
आपल्या दिवसातील वाढती गुन्हेगारी भाकित करते की, दुष्ट लोकांचा तसेच गुन्हेगारांचे उच्चाटन करण्यास ईश्वरी हस्तक्षेप जवळ आलेला आहे. “दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल. . . . थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल, तू त्याचे ठिकाण शोधिशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही.” (स्तोत्रसंहिता ३७:९, १०) गुन्हेगारीचा अंत आता समीप आहे, कारण आम्ही त्या समयाजवळ येत आहोत जेव्हा मूळ गुन्हेगार दियाबल सैतान याला बांधून अगाधकूपात टाकण्यात येईल. (प्रकटीकरण २०:१-३) खरेच, गुन्ह्यांचे भय तसेच त्यामुळे ज्यांना दुःख सोसावे लागले आहे ते सर्व काही भूतकाळात जमा होईल हे जाणणे किती रोमांचक आहे!
पण, जे लाखो लोक पुनरुत्थानाद्वारे या पृथ्वीवर परतणार आहेत त्यांचे काय? (प्रे. कृत्ये २४:१५) ते आपल्या मरणाआधीच्या व्यक्तीमत्वात पुन्हा वागूवर्तू लागले तर गुन्हेगारी पुन्हा भडकणार नाही का? यामुळे भयभीत होण्याचे कारण नाही. येशूने एका चोराला पुनरुत्थानाचे अभिवचन दिले. तो म्हणालाः “मी तुला आज खचित सांगतो की, तू मजबरोबर नंदनवनात असशील.” (लूक २३:४३) यामुळे हे दिसते की, या पुनरुत्थितांना स्वतःमध्ये बदल करावा लागेल; कारण तसे न झाल्यास नवीन जग नंदनवन होऊ शकणार नाही.
कोणा अट्टल गुन्हेगाराने समाजात कोणताही गुन्हा न करता पुन्हा रहावयाचे असेल तर प्रथमतः त्याच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम राबवण्यात येतो. याचप्रमाणे देवाच्या राज्याखाली एक विशाल शैक्षणिक कार्यक्रम असेल ज्यामुळे तेथील लोक नियमांचे पालन करणारे बनतील. (प्रकटीकरण २०:१२, १३) देवाच्या आज्ञांचे पालन करणाऱ्या नंदनवनातील निवासियांचा सहवास लाभल्यामुळे या पुनरुत्थितांना नियंत्रित अशा आर्थिक परिस्थितीचा अनुभव येईल. (यशया ६५:२१-२३) सर्वत्र न्यायी राज्यकर्ते असतील व जो सतत वाईट कर्मे आचरतो त्याला जीवनातून काढून टाकले जाईल. (यशया ३२:१; ६५:२०) अशाप्रकारे, गुन्हेगारीचा सरतेशेवटी अंत होईल हे मानण्यास पुरेसे कारण आहे.
आम्ही जरी या गुन्हेगारी जगात आज जगत आहोत तरी तुम्हाला यहोवावर आपला भरवसा व्यक्त करता येईल; कारण तोच एक असा आहे जो आपल्या विश्वासू सेवकांना नंदनवनात परिपूर्ण जीवन प्रदान करण्याचे अभिवचन देऊन आहे. यास्तव, आत्ताच त्याच्याविषयीची गुणग्राहकता, यहोवाच्या साक्षीदारांमार्फत चालविलेल्या मोफत घरगुती शास्त्र अभ्यासाच्या योजनेचा लाभ घेऊन व्यक्त करा. (योहान १७:३) पुढील खेपेला जेव्हा ते तुम्हाला भेट देतील तेव्हा याविषयी सविस्तर माहिती त्यांना विचारा. किंवा तुम्हाला या मासिकाच्या २ ऱ्या पानावर असलेल्या पत्त्यावर लिहून ते विचारता येईल. हे परिश्रम घेणे खरोखरी योग्य आहे, कारण गुन्हेगारीचा अंत आता समीप आला आहे!
[५ पानांवरील चित्रं]
जक्कयाठायी असलेल्या विश्वासाने त्याला, त्याने जे लुबाडले होते ते परत करण्यास उद्युक्त केले
[७ पानांवरील चित्रं]
शैक्षणिक कार्यक्रम देवाच्या राज्यातील प्रजेला नियमाधीन राहण्याचे शिक्षण देईल