वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल ख्रिश्चनांचा दृष्टीकोण
प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांस अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकारच नाही; जे अधिकारी आहेत ते आपल्या सापेक्ष स्थानी देवाकडूनच आहेत.”—रोमकर १३:१.
१, २. (अ) पौल रोममध्ये का बंदिवान होता? (ब) पौलाने कैसरास जे अपील केले त्यामुळे कोणते प्रश्न उद्भवतात?
वर नमूद असणारे शब्द, प्रेषित पौलाने इ. स. ५६ च्या सुमाराला रोमकरांना लिहिले. काही वर्षातच त्याला रोम येथे कैदी म्हणून नेण्यात आले. ते का? त्याच्यावर यरूशलेमामध्ये एका जमावाने हल्ला केला होता व यामधून रोमी शिपायांनी त्याची सुटका केली होती. त्याला कैसरियामध्ये नेण्यात आले. येथे त्याच्यावर खोटे दोषारोप करण्यात आले. पण रोमी सुभेदार फेलिक्ससमोर पौलाने स्वतःचे चांगले समर्थन केले. फेलिक्सला वाटले की, पौलाकडून लाच मिळेल व यासाठी त्याने त्याला साधारण दोन वर्षे कैदेत ठेवले. शेवटी, पौलाने नंतरचा सुभेदार फेस्त याला आपले प्रकरण कैसरापुढे मांडण्याचे अपील केले.—प्रे. कृत्ये २१:२७-३२; २४:१–२५:१२.
२ पौल रोमी नागरिक असल्यामुळे त्याला हा हक्क होता. पण येशूने सैतान खरोखर “जगाचा अधिपति” आहे असे म्हटले होते व शिवाय पौलानेही त्याला “या व्यवस्थीकरणाचा देव” असे म्हटलेले पाहता, पौलाने त्याच्या काळातील साम्राज्याच्या बादशहाला अपील करणे सुसंगत होते का? (योहान १४:३०; २ करिंथकर ४:४) की, त्या रोमी अधिकाराचे ‘सापेक्ष स्थान’ असल्याने पौलाने आपल्या हक्काच्या रक्षणासाठी त्याकडे पाहणे हे योग्य होते? “आम्ही माणसापेक्षा देवाला आपला शासक मानून त्याच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे,” हे प्रेषितांचे आधीचे शब्द, जेथे देवाशी आज्ञाभंजकता समाविष्ट नसते तेथे मानवी नेत्यांना ख्रिस्ती आज्ञाधारकपणा दाखविण्याची मुभा देतात का?—प्रे. कृत्ये ५:२९.
३. पौल कोणता प्रौढ दृष्टीकोण प्रकट करतो, व यामध्ये विवेक कसा समाविष्ट आहे?
३ पौल या प्रश्नांची उत्तरे रोमकरांना लिहिलेल्या पत्रात देतो. या पत्रात तो मानवी शासनाविषयीचा प्रौढ दृष्टीकोण प्रकट करतो. रोमकरांस पत्र १३:१-७ मध्ये, पौल, सर्वोच्च शासक यहोवा देवाला दाखविण्यात येणारी सर्वकष आज्ञाधारकता आणि “वरिष्ठ अधिकारी” यांना दाखविण्यात येणारी सापेक्ष आज्ञाधारकता यामध्ये समतोल राखण्यात ख्रिस्ती विवेकाने घ्यावयाची भूमिका स्पष्ट करतो.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना ओळखणे
४. १९६२ मध्ये दृष्टीकोणात कोणती सुधारणा झाली, व यामुळे कोणते प्रश्न उद्भवले गेले?
४ यहोवा देव व ख्रिस्त येशू हे ते वरिष्ठ अधिकारी आहेत असा यहोवाच्या साक्षीदारांचा १९६२ पर्यंत दृष्टीकोण होता. तथापि, नीतीसूत्रे ४:१८ नुसार अधिक प्रकाश मिळून या दृष्टीकोणात सुधारणा झाली. पण यामुळे काहींच्या मनात प्रश्न आले असतील. या जगात प्रापंचिक, राजकीय सामर्थ्य असलेले राजे, राष्ट्राध्यक्ष, प्रधान मंत्री, राज्यपाल, न्यायाधीश आणि इतर हे वरिष्ठ अधिकारी आहेत व यांना आपण सापेक्षरित्या अधीन असावे असे म्हणणे बरोबर आहे का?
५. वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यात रोमकर १३:१ च्या आधीचा संदर्भ आपणास कशी मदत देतो, आणि या ओळखीला विविध पवित्र शास्त्र अनुवाद आपली पुष्टी कशी देतात?
५ इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील इरेनियस या लेखकाने असे म्हटले की, त्याच्या [इरेनियस] काळातील काही लोकांच्या मतानुसार, रोमकरांस पत्र १३:१ मध्ये पौल “अदृश्य अधिपति किंवा स्वर्गदूतांची सत्ता” याविषयी बोलत होता. पण, इरेनियस स्वतः “खरोखरीच्या मानवी अधिकाऱ्यांना” वरिष्ठ अधिकारी मानीत होता. पौलाच्या वचनांचा संदर्भ दाखवितो की, इरेनियसचा दृष्टीकोण बरोबरचा होता. रोमकरांच्या पत्राच्या १२ व्या अध्यायाच्या समाप्तीला पौल, ख्रिश्चनांनी “सर्व मनुष्यांसमक्ष” कसे वागावे, आपल्या ‘शत्रूंना’ देखील प्रेम कसे दाखवावे व समजदारीने कसे वागवावे याचे विवेचन करतो. (रोमकर १२:१७-२१) “सर्व मनुष्यांसमक्ष” हा शब्दप्रयोग हा अर्थातच ख्रिस्ती मंडळीबाहेर असणाऱ्या लोकांना लागू होतो. तेव्हा, ज्याची चर्चा पौल पुढे करतो ते “वरिष्ठ अधिकारी” देखील ख्रिस्ती मंडळीबाहेरचेच असले पाहिजेत. यालाच अनुसरुन, विविध अनुवाद रोमकर १३:१ च्या पहिल्या भागाचा कसा अनुवाद देतात त्याकडे लक्ष द्याः “प्रत्येक जणाने प्रांताच्या अधिकाऱ्यांचे आज्ञापालन केले पाहिजे.” (टुडेज् इंग्लिश व्हर्शन); “सत्ता चालविणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रत्येकाने अधीन राहिले पाहिजे.” (न्यू इंटरनॅशनल व्हर्शन); “मुलकी अधिकाऱ्यांना प्रत्येकाने आज्ञाधारक असले पाहिजे.”—फिलिप्स् यांचे न्यू टेस्टमेंट इन मॉडर्न इंग्लिश.
६. पौलाने कर व जकात भरण्याविषयी जे काही म्हटले आहे ते, वरिष्ठ अधिकारी हे प्रापंचिक अधिकारी असले पाहिजेत हे कसे दाखवून देतात?
६ पौल पुढे म्हणतो की, हे अधिकारी कर व जकात यांची मागणी करतात. (रोमकर १३:६, ७) ख्रिस्ती मंडळी, त्याचप्रमाणे यहोवा देव, येशू किंवा इतर “अदृश्य अधिकारी” कर किंवा जकात यांची मुळीच मागणी करीत नाहीत. (२ करिंथकर ९:७) कर केवळ मुलकी अधिकाऱ्यांनाच दिले जातात. याच्या सहमतात, पौलाने रोमकर १३:७ मध्ये “कर” व “जकात” यासाठी जे ग्रीक शब्द वापरले आहेत ते प्रांताला जो पैशांचा भरणा देण्यात आला आहे त्यांना अनुलक्षून आहेत.a
७, ८. (अ) ख्रिस्ती लोकांनी या जगाच्या राजकीय अधिकाऱ्यांच्या अधीन राहण्यास हवे हे विविध शास्त्रवचने कसे स्पष्ट करतात? (ब) या “अधिकाऱ्यां”च्या आज्ञेनुरुप वागण्याची ख्रिस्तीजन केवळ केव्हा अनुमती दर्शविणार नाहीत?
७ आणखी, पौलाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असण्याविषयी दिलेला उपदेश, येशूने “कैसराचे ते कैसराला” द्या, अशा दिलेल्या आज्ञेशी सहमत आहे. येथे “कैसर” प्रापंचिक अधिकाऱ्यांना सूचित करतो. (मत्तय २२:२१) ही गोष्ट पौलाने नंतर तीतास लिहिलेल्या मजकुराशी जुळणारी आहे. तो म्हणालाः “त्यांनी सत्ता व अधिकार यांच्या अधीन राहावे, आज्ञा मानाव्या; प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे . . . अशी त्यांस आठवण करून दे.” (तीत ३:१) यास्तव, जेव्हा सरकार ख्रिश्चनांना सामाजिक कामात सहभागी होण्याची आज्ञा करते तेव्हा ते, जी कामे अशास्त्रीय कामांशी सहमत नसतील किंवा यशया २:४ मध्ये दाखविण्यात आलेल्या पवित्र शास्त्राच्या तत्त्वाचा भंग करीत नाहीत अशा कामात ते सहभाग देतात.
८ या जगाच्या प्रापंचिक अधिकाऱ्यांना आपण अधीन राहावे याविषयी पेत्रानेही पुष्टी दिली आहे. तो म्हणालाः “मनुष्यांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रभूसाठी अधीन असा; राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या, आणि अधिकारी वाईट करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी व चांगले करणाऱ्यांची स्तुती करण्यासाठी त्याने पाठविलेले, म्हणून त्यांच्या अधीन असा.” (१ पेत्र २:१३, १४) यालाच अनुसरुन, पौलाने तीमथ्याला दिलेल्या सूचनेकडे ख्रिस्तीजन कान देतीलः “सर्वात प्रथम हा बोध मी करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व इशोपकारस्मरण करावे. राजाकरता व उच्च पदावर असणाऱ्या सर्वांसाठी करावे. यासाठी की आपण सुभक्तीने व गंभीरपणाचे शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.”b—१ तीमथ्य २:१, २, न्यू.व.
९. मानवी अधिकाऱ्यांना “वरिष्ठ” म्हटल्यामुळे यहोवाला गौरव देण्यामध्ये कमीपणा का येत नाही?
९ प्रापंचिक अधिकाऱ्यांना “वरिष्ठ” म्हटल्यामुळे यहोवाच्या सन्मानात न्यूनता येते का? नाही. कारण यहोवा वरिष्ठ असण्यापेक्षा अधिक उच्च आहे. तो तर “सेनाधीश प्रभु,” “सर्वशक्तीमान” आहे. (स्तोत्रसंहिता ७३:२८; दानीएल ७:१८, २२, २५, २७; प्रकटीकरण ४:११; ६:१०) मानवी अधिकाऱ्यांना दाखविण्यात येणारी योग्य अधीनता आपल्या सर्वोच्च अधिकारी, सार्वभौम प्रभु यहोवाच्या उपासनेत कोणतेही न्यून निर्माण करीत नाही. मग, ते अधिकारी कोणत्या बाबतीत वरिष्ठ आहेत? इतर मानवाच्या बाबतीत आणि त्यांच्या कार्यसीमेच्या बाबतीत. मानवी समाजाची देखरेख आणि संभाळ करण्याची त्यांची जबाबदारी आहे व यासाठीच ते समाजात वावरताना ठेवण्याच्या वागणूकीबद्दल नियम घालून देत असतात.
“आपल्या सापेक्ष स्थानी देवाकडूनच आहेत”
१०. (अ) वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या ‘स्थानी ठेवण्या’विषयी पौलाने जे लिहिले ते यहोवाच्या स्वतःच्या अधिकाराविषयी काय सांगते? (ब) विशिष्ठ शासनकर्त्यांना त्या ‘स्थानी’ येऊ देण्याविषयी यहोवाने कशाची मुभा दिली आहे, व यामुळे त्याच्या सेवकांची कशी परिक्षा होते?
१० यहोवा देवाचे सार्वभौमत्व हे प्रापंचिक अधिकाऱ्यांच्याही वर आहे हे यामुळे दिसते की हे अधिकारी “आपल्या सापेक्ष स्थानी देवाकडूनच आहेत.” पण या विधानामुळे एक प्रश्न संभवतो. पौलाने हे शब्द लिहिल्यावर काही वर्षांनी रोमी सम्राट निरो याने ख्रिश्चनांविरुद्ध भयंकर छळाची लाट उसळविली. मग, याचा अर्थ, देवाने प्रत्यक्षात निरोला या पदावर नेमले होते का? मुळीच नाही. देव प्रत्येक शासनकर्त्याची निवड करतो व त्याला ‘आपल्या दयेने’ त्या पदावर नेमतो असे नाही. उलटपक्षी, सैतान कधीकधी निर्दयी माणसांना शासनकर्त्यांच्या जागेवर आणतो. याला तसेच त्यांच्या या पदावर येण्यामुळे आपल्या सचोटीच्या सेवकांवर ओढवणाऱ्या परिक्षांना देव मुभा देतो.—पडताळा ईयोब २:२-१०.
११, १२. यहोवाने प्रापंचिक अधिकाऱ्यांच्या बाबतीत व्यक्तीशः हस्तक्षेप केल्याची तसेच त्यांना स्थानभ्रष्ट केल्याची कोणती प्रकरणे अहवालात नमूद आहेत?
११ तथापि, यहोवाने आपल्या भव्य उद्देशाची परिपूर्ति व्हावी म्हणून विशिष्ट शासनकर्ते किंवा सरकार यांच्या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. उदाहरणार्थ, अब्राहामाच्या काळी कनान्यांना कनान देशी वस्ती करण्याची परवानगी दिली गेली. परंतु, नंतर यहोवाने त्यांचे समूळ उच्चाटन करून हा प्रदेश अब्राहामाच्या संतानाला वतन म्हणून दिला. इस्राएल लोक अरण्यात प्रवास करीत होते तेव्हा त्याने त्यांना अम्मोन, मवाब तसेच सेईर डोंगरातील लोकांवर प्रबळ होऊ दिले नाही. तथापि, त्याने त्यांना सीहोन व ओग यांची राज्ये नष्ट करण्याची आज्ञा दिली.—उत्पत्ती १५:१८-२१; २४:३७; निर्गम ३४:११; अनुवाद २:४, ५, ९, १९, २४; ३:१, २.
१२ इस्राएल कनानात स्थायिक झाल्यावर देखील यहोवाने त्याच्या लोकांवर परिणाम करणाऱ्या अधिकाऱ्यांसंबंधाने दखल घेणे चालू ठेवले. इस्राएली पातकी बनले तेव्हा काही वेळा यहोवाने त्यांना मूर्तिपूजकांच्या अधिकाराखाली आणले. आणि त्यांनी पश्चाताप दाखवला तेव्हा त्याने ते अधिकारी त्यांच्या देशातून घालवून दिले. (शास्ते २:११-२३) त्याने नंतर यहुदा व इतर कित्येक राष्ट्रांना बाबेलच्या दास्याखाली आणले. (यशया १४:२८–१९:१७; २३:१-१२; ३९:५-७) इस्राएल बाबेलच्या दास्यात गेल्यावर यहोवाने, बाबेलपासून ते आपल्या काळापर्यंत जी जागतिक साम्राज्ये त्याच्या लोकांवर परिणाम करतील त्यांच्या उदय व अस्ताचे भाकित केले.—दानीएल अध्याय २, ७, ८ व ११.
१३. (अ) मोशेने गीतामध्ये गायिल्याप्रमाणे यहोवाने राष्ट्रांच्या सीमा का ठरवून दिल्या? (ब) देवाने इस्राएलाला परत आपल्या देशी का वसविले?
१३ मोशेने यहोवाविषयी गीतात म्हटलेः “जेव्हा परात्पराने राष्ट्रांना त्याची वतने दिली; जेव्हा त्याने मानवांस निरनिराळे वसविले, तेव्हा त्याने इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे राष्ट्रांच्या सीमा आखून दिल्या. कारण आपले लोक हाच यहोवाचा वाटा. याकोब हाच त्याचा वतनभाग.” (अनुवाद ३२:८, ९; पडताळा प्रे. कृत्ये १७:२६.) होय, आपला उद्देश पूर्ण करता यावा म्हणून तेथे देवाने कोणती सत्ता राहील व कोणती नाश पावेल हे ठरवले. याप्रकारे, त्याने अब्राहामाच्या संतानाला वतनादाखल प्रदेश दिला आणि नंतर पुन्हा त्याच देशात त्यांचे पुनर्वसन केले; ते अशासाठी की, आधी भाकित केल्याप्रमाणे तेथे अभिवचन दिलेले संतान प्रकट व्हावे.—दानीएल ९:२५, २६; मीखा ५:२.
१४. यहोवा बहुतेक बाबतीत मानवी अधिकाऱ्यांना त्यांच्या सापेक्ष पदावर ठेवतो हे कोणत्या अर्थी म्हणता येते?
१४ तथापि, बहुतेक प्रकरणात, यहोवा शासनकर्त्यांना त्यांच्या सापेक्ष पदी ठेवतो ते या अर्थी की, तो मानवांना एकमेकांच्या संबंधात सापेक्ष अधिकाराचे पद घेऊ देतो; मात्र हे पद नेहमी त्याच्यापेक्षा कनिष्ठच राहते. यामुळेच, येशू पंतय पिलातासमोर उभा होता तेव्हा तो त्या शासनकर्त्याला म्हणालाः “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता.” (योहान १९:११) याचा हा अर्थ नाही की, देवानेच स्वतः पिलाताला त्या जागी नेमले होते, तर येशूच्या जीवन-मरणावरील त्याचा अधिकार हा केवळ देवाच्या अनुज्ञेमुळेच दिला गेला होता.
“या व्यवस्थीकरणाचा देव”
१५. सैतान या जगावर कशाप्रकारे अधिकार राखून आहे?
१५ आता, पवित्र शास्त्र सैतान हा या जगाचा देव, किंवा अधिपती आहे असे म्हणते, त्याविषयी काय? (योहान १२:३१; २ करिंथकर ४:४) तसेच सैतानाने येशूला या जगातील राज्ये दाखविली व म्हटले: “ह्या सर्वांवरील अधिकार व ह्यांचे वैभव . . . मला सोपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो,” या बढाईविषयी देखील काय? (लूक ४:६) येशूने सैतानाच्या या बढाईविरूद्ध काही म्हटले नाही. सैतानाचे ते शब्द, पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या मजकुराशी सुसंगत आहेतः “आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचे अधिपति, आकाशातला दुरात्मासमूह ह्यांबरोबर आहे.” (इफिसकर ६:१२) याचप्रमाणे, प्रकटीकरणाचे पुस्तक सैतानाला मोठा अजगर असे संबोधून, तो या जगाच्या राजकारणी व्यवस्थेच्या जनावरासारख्या प्रतिमेला “आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार” देत असल्याचे चित्रित करते.—प्रकटीकरण १३:२.
१६. (अ) सैतानाचा अधिकार हा मर्यादित स्वरुपाचा आहे हे कसे दिसते? (ब) यहोवा सैतानाला मानवजातीवर अधिकार गाजविण्याची का मुभा देऊन आहे?
१६ आता सैतानाच्या त्या विधानाकडे परत लक्ष द्या. त्याने येशूला म्हटले, “ह्या सर्वांवरील अधिकार व ह्यांचे वैभव . . . मला सोपून दिले आहे.” यामुळे स्पष्ट होते की, तोही आपला अधिकार त्याला मिळालेल्या परवानगीमुळेच गाजवीत आहे. मग, देवाने ही मुभा त्याला का दिली बरे? सैतानाचे हे जागतिक अधिपति या नात्याचे वर्चस्व मागे एदेनात सुरु झाले. तेथे त्याने देवावर, खोटे बोलणे व आपले सार्वभौमत्व अन्यायाने चालविणे याविषयी जाहीरपणे दोषारोप केला. (उत्पत्ती ३:१-६) आदाम व हव्वा यांनी सैतानाचा मार्ग अनुसरला व यहोवा देवाची अवज्ञा केली. त्या वेळेला यहोवा, सैतान व त्याच्या दोन नव्या अनुयायांचा तेथेच पूर्ण न्यायाने नाश करू शकत होता. (उत्पत्ती २:१६, १७) पण सैतानाचे शब्द यहोवाला व्यक्तीगत आव्हान होते. या कारणास्तव, देवाने आपल्या सूज्ञानाआधारे सैतानाला काही काळ जिवंत राहण्याची तसेच आदाम व हव्वेला आपल्या मरणाआधी आपली संतती वाढविण्याची मुभा दिली. याप्रकारे, देवाने, सैतानाचे आव्हान किती खोटेपणाचे आहे ते दाखवून देण्यासाठी वेळ व संधि देऊ केली.—उत्पत्ती ३:१५-१९.
१७, १८. (अ) सैतान या जगाचा देव आहे असे आपण का म्हणू शकतो? (ब) या जगात “देवापासून नाही असा अधिकारच नाही,” असे कसे म्हणता येते?
१७ एदेनानंतरच्या घडलेल्या सर्व घटनांनी सैतानाचे दोषारोप अगदीच खोटे असल्याचे दाखवून दिले आहेत. सैतानी राजवटीखाली किंवा मानवी अधिपत्याखाली आदामाच्या संततीला सौख्यानंद मिळालेला नाही. (उपदेशक ८:९) उलटपक्षी, देवाने आपल्या लोकांसोबत जे दळणवळण ठेवले त्याद्वारे ईश्वरी राजवटीची श्रेष्ठता प्रदर्शित झाली. (यशया ३३:२२) तथापि, आदामाच्या बव्हंश संततीने यहोवाच्या सार्वभौमत्वाचा स्वीकार केला नसल्यामुळे ते जाणते किंवा अजाणतेपणाने, देव या नात्याने सैतानाची सेवा करत आहेत.—स्तोत्रसंहिता १४:१; १ योहान ५:१९.
१८ एदेनात उद्भवलेल्या वादविषयांचे लवकरच निरसन करण्यात येईल. मानवजातीच्या घडामोडींवरील शासनाचा संपूर्ण ताबा देवाचे राज्य आपणाकडे घेईल आणि सैतानाला अगाधकूपात टाकण्यात येईल. (यशया ११:१-५; प्रकटीकरण २०:१-६) परंतु, या दरम्यान सुव्यवस्थित जीवन साध्य व्हावे म्हणून मानवजातीत एखादी व्यवस्था किंवा घडण याची जरुरी होती. यहोवा हा “अव्यवस्थेचा नव्हे तर शांतीचा देव आहे.” (१ करिंथकर १४:३३) यासाठीच, त्याने अधिकाराची घडण सामोरी आणली, जिची वाढ एदेनाबाहेरील समाजामध्ये घडली गेली. या घडणीत त्याने मानवाला अधिकार गाजविण्याची मुभा दिली. अशामुळे हे म्हणता येते की, “देवापासून नाही असा अधिकारच नाही.”
सोज्वळ मनाचे अधिपति
१९. प्रत्येक मानवी अधिकारी थेटपणे सैतानाच्या ताब्यात असतो का?
१९ एदेनापासून सैतानाला मानवजातीत पूर्ण स्वरुपाची मोकळीक मिळाली आणि त्याने या मोकळीकीचा, येशूपुढे केलेल्या बढाईनुसार, पृथ्वीवर विविध घटना घडविण्यात पुष्कळ फायदा करून घेतला. (ईयोब १:७; मत्तय ४:१-१०) तथापि, याचा हा अर्थ नाही की, या जगातील प्रत्येक अधिपति सैतानाच्या थेट ताब्यात असतो. पहिल्या शतकातील निरो व आमच्या काळातील ॲडॉल्फ हिटलर यासारख्या काहींनी सैतानासारखा आत्मा खरेपणाने दाखविला. पण इतरांनी नाही. कुप्र येथील एक अधिकारी सिर्ग्य पौल हा “बुद्धिमान मनुष्य” होता, याने “देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शविली.” (प्रे. कृत्ये १३:७) अखया प्रांताचा अधिकारी गल्लियोने पौलावर आरोप करणाऱ्या यहुदी लोकांच्या दबावाखाली स्वतःला आणले नाही. (प्रे. कृत्ये १८:१२-१७) आणखी पुष्कळ अधिपतींनी आपला अधिकार जाणीवपूर्वकतेने व सन्मान्यरितीने चालविला.—पडताळा रोमकर २:१५.
२०, २१. मानवी अधिकारी नेहमीच सैतानाच्या इच्छेप्रमाणे वागत नसतात हे या २० व्या शतकातील कोणत्या घटना दाखवितात?
२० प्रकटीकरणाचे पुस्तक भाकित करते की, १९१४ पासून सुरु झालेल्या “प्रभुच्या दिवसा”पासून यहोवा सैतानाच्या उद्देशांना धुडकावून लावण्यासाठी मानवी अधिपतींकरवी हस्तक्षेप करील. प्रकटीकरण छळाच्या एका मोठ्या पूराविषयी सांगते, जो सैतान अभिषिक्त ख्रिस्तीजनांविरूद्ध आणील, पण “पृथ्वी” तो गिळून टाकील. (प्रकटीकरण १:१०; १२:१६) “पृथ्वी”तील घटक म्हणजे सध्या अस्तित्वात असणारा मानवी समाज यहोवाच्या लोकांचे सैतानी छळापासून रक्षण करील.
२१ हे खरोखरीच घडले का? होय. उदाहरणार्थ, १९३०शीच्या १९४०शीच्या काळात अमेरिकेतील यहोवाचे साक्षीदार मोठ्या दबावाखाली होते; ते जमावाचा हल्ला व सतत होणाऱ्या अन्यायी धरपकडीमुळे ग्रस्त झाले होते. पण जेव्हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या कामाविषयीची मान्यता दर्शविणारे कितीतरी निवाडे दिले तेव्हा यांना मोठी सुटका मिळाली. इतर ठिकाणी देखील अधिकारी देवाच्या लोकांच्या मदतीला आले. साधारण ४० वर्षे आधी आयर्लंडमध्ये एका रोमन कॅथोलिक जमावाने कॉर्क शहरात दोन साक्षीदारांवर हल्ला केला. एक स्थानिक पोलिस साक्षीदारांच्या मदतीला आला, आणि न्यायालयातर्फे हल्लेखोरांना कायद्याने शिक्षा मिळाली. अलिकडे फिजीमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार होत आहे हे वरिष्ठांच्या एका सभेत कळाले. या सभेत एका वरिष्ठाने साक्षीदारांच्या वतीने निर्भिड स्वरुपाची बोलणी केली व मग तो प्रस्ताव सहजपणे फेटाळण्यात आला.
२२. पुढील लेखात कोणत्या प्रश्नांची चर्चा होणार?
२२ नाही, प्रापंचिक अधिकारी नेहमीच सैतानाच्या इच्छेची पूर्ति करीत नाहीत. सैतानाच्या अधीन न राहता ख्रिस्तीजनांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहता येऊ शकते. देव जोपर्यंत त्यांना अधिकारात राहू देण्याची मुभा देऊन आहे तोपर्यंत ते त्यांच्या अधीन राहतील. पण या अधीनतेचा काय अर्थ होतो? याच्या मोबदल्यात ख्रिस्तीजन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कशाची अपेक्षा धरू शकतात? पुढील लेखात या प्रश्नांची हाताळणी होईल.
[तळटीपा]
a उदाहरणार्थ, लूक २०:२२ मध्ये वापरण्यात आलेला “कर” (फोʹरोस) हा शब्द बघा. तसेच येथे ज्याचे “जकात” असे भाषांतर करण्यात आलेले आहे त्या टेʹलॉस या ग्रीक शब्दाचा मत्तय १७:२५ मधील वापर पडताळा, जो येथे “पट्टी” या शब्दाकरवी दाखविलेला आहे.
b “उच्च पद” यासाठी वापरण्यात आलेले ग्रीक नाम हाय·प·रोखेʹ याचा हाय·प·रेʹखो या क्रियापदाशी संबंध आहे. “वरिष्ठ अधिकारी” या शब्दात जो “वरिष्ठ” शब्द आहे तो याच ग्रीक क्रियापदापासून आला आहे व यामुळे हे वरिष्ठ अधिकारी प्रापंचिक अधिकारातील आहेत याला आणखी दुजोरा मिळतो. रोमकर १३:१ द न्यू इंग्लिश बायबल मध्ये असे दिलेले आहे की, “प्रत्येक माणसाने सर्वोच्च अधिकाऱ्यांना अधीन राहिले पाहिजे.” ही सादरता बरोबरची नाही. “उच्च पदावर” असणारी मनुष्ये मानवापेक्षा श्रेष्ठ असली तरी ती सर्वोच्च नाहीत.
तुम्ही कसे उत्तर देणार?
◻ वरिष्ठ अधिकारी कोण आहेत?
◻ “देवापासून नाही असा अधिकारच नाही,” असे आपण का म्हणू शकतो?
◻ यहोवा या जगाला सैतानाच्या अधिकाराखाली का राहू देतो?
◻ देव मानवी अधिकाऱ्यांना “त्यांच्या सापेक्ष स्थानी” कशा पद्धतीने ठेवतो?
[१३ पानांवरील चित्रं]
रोमला आग लागल्यावर निरोने खरोखरीच सैतानी आत्मा प्रदर्शित केला
[१५ पानांवरील चित्रं]
कुप्र प्रांताचा अधिकारी सिर्ग्य पौल याने देवाचे वचन ऐकून घेण्याची शिकस्त केली