वचनयुक्त देशाचे देखावे
यापो प्राचीन काळातील प्रसिद्ध बंदर
प्राचीन इस्राएलात एक लांब वाळूचा किनारा होता. तरीपण इस्राएली लोक खासपणे दर्यावर्दी म्हणून प्रसिद्ध नव्हते. कदाचित हा किनारा त्याचे कारण असावा.
हा नाईल नदीकडून समुद्राकडे येणारा किनारा वाळूच्या ढिगाऱ्याने भरलेला आहे. तुम्ही जर मिसरच्या किनाऱ्यावरुन प्रवास करीत आला तर कर्मेल डोंगराच्या दक्षिणेकडे असलेल्या या अप्रतिम नैसर्गिक बंदराची तुम्हाला गाठ पडणार नाही.
तथापि, इस्राएलाच्या या किनाऱ्याच्या अर्ध्यावर टेकडीवर यापो हे शहर तुम्हाला प्रवासात दिसते. हे चित्र दाखविते त्याप्रमाणे किनाऱ्याबाहेर छोट्या खडकांनी एक लहान खाडी तयार केली आहे. यामुळे तयार होणारे बंदर हे जरी उत्तरेकडे अक्रे (प्तलमैस) बंदरापेक्षा कमी दर्जाचे आहे तरी यापो हे लक्षणीय बनते. (प्रे. कृत्ये २१:७) हेरोद राजाने कैसरिया येथे कृत्रिम बंदराची उभारणी करीपर्यंत यापो हे जहाजांनी येऊन थांबण्याचे उत्कृष्ठ ठिकाण होते. यामुळे यापोविषयी जे पवित्र शास्त्र संदर्भ आहेत त्यांना अधिक उजाळा मिळतो.
शलमोनाला मंदिर बांधण्याच्या कामाची मदत देताना सोरचा राजा हुराम म्हणालाः “जितक्या लाकडाचे आपणाला प्रयोजन आहे तेवढे लबानोनाहून कापून त्याचे तराफे करून आमचे लोक जलमार्गाने यापो येथे पोचते करतील; तेथून ते आपण यरुशलेमेस घेऊन जावे.” (२ इतिहास २:१, ११, १६) हे तराफे सोर वा सीदोन येथील फेनिके बंदरातून निघाले असतील. (यशया २३:१, २, यहेज्केल २७:८, ९) कर्मेलला वळसा घालून ते तराफे यापो येथे आले असावेत. येथून हे देवदारु लाकूड पूर्वेकडे/आग्नेय दिशेकडे यरुशलेमास आले. याचप्रमाणे यहुद्यांनी बंदिवासातून परतल्यावर मंदिर पुन्हा उभारले तेव्हा देखील यापो हे देवदारु लाकडांच्या व्यापाऱ्यांसाठी चांगले बंदर होते.—एज्रा ३:७.
फेनिके जहाजांवर लाकूड लादल्यावर ते वाहून नेणारा कामगारवर्ग त्यासोबत असावा. या जहाजाची प्रतिकृति येथे चित्रात दिसते. तुम्ही याचे नीट निरिक्षण केले तर तुम्हाला ती घटना आठवेल, जेव्हा यहोवाने योनाला निनवेला जाण्यास सांगितले तेव्हा तो विरुद्ध दिशेला पळून गेला. “[योना] यापोस गेला, तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व यहोवाच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला.”—योना १:१-३.
योना बहुधा याचप्रकारच्या जहाजात बसला असावा; याकरवी हे दिसते की, यापो ते तार्शिश (बहुधा जुने स्पेन) इतका लांबचा प्रवास करण्यासाठी ते जहाज मजबूत असावे. त्याला एक नक्षीदार पडाव असावा व याला जवळच दगडाचा नांगर जोडलेला असे. प्रवासी, वल्हेकरी व काही सामान वरच्या मजल्यावर असत, जे या नमुन्याच्या जहाजावर दाखविलेले नाही. या मजल्याखाली एक माल ठेवण्याची जागा असे व येथेच योना जाऊन निजला होता. हे जहाज ज्युनिपरच्या कणखर लाकडाने बनवलेले असे व त्याला देवदारु लाकडाची डोलकाठी असे व त्यावर जहाजाच्या शिडाचे कापड बांधले जाई. हे बघा की जहाजाच्या प्रत्येक भागाला वल्ह्यांची ओळ आहे, जी बहुधा बाशानमधील ओक या वृक्षाच्या लाकडापासून तयार करीत. आता हे जहाज समुद्रात आहे व समुद्रावर मोठे तुफान आले आहे असे चित्र समोर उभे करा. जहाजावरील खलाशी आपापल्या देवांना मदतीसाठी आक्रंदन करून याचना करीत आहेत ही कल्पना करा व शेवटी हे पहा की, ते योनाला जहाजावरुन खाली समुद्रात ढकलून देत आहेत.—यहेज्केल २७:५-९; योना १:४-१५.
पहिल्या शतकातील यापो येथे एक ख्रिस्ती मंडळी होती व येथील काही लोक जहाजावर काम करणारे किंवा नावाडी असावेत. या धामधुमीच्या बंदरावर असणाऱ्या मंडळीतील एक सदस्या यहुदी दुकर्स (तबीथा) होती. “ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे.” इ. स. ३६ मध्ये दुर्कस आजारी पडली व त्यात ती वारली. तेव्हा पुष्कळांनी मोठे दुःख केले; ते तिच्या सत्कर्मांची आठवण सांगू लागले. सह ख्रिश्चनांनी प्रेषित पेत्राला लोद (तेल अवीव विमानतळाजवळ) येथून यापोला आणले. पेत्राने या प्रिय भगिनीचे पुनरुत्थान केले, हे चमत्काराचे कृत्य “सर्व यापोमध्ये माहीत झाले; आणि पुष्कळ विश्वासू बनले.”—प्रे. कृत्ये ९:३६-४२.
पेत्र काही काळासाठी शिमोन नावाच्या कातडे कमावणाऱ्या चांभाराच्या येथे राहिला. येथेच त्याला एक दृष्टांत घडला व त्यानुसार तो यापो मंडळीतील काही बांधवांना सोबत घेऊन बंदराच्या किनाऱ्याच्या उत्तर दिशेकडे कैसरीया या नव्या बंदराकडे गेला. येथे पेत्राने रोमी शताधिपती कर्नेल्य याला प्रचार केला व त्याचा बाप्तिस्मा केला; हा पहिला बेसुंती विदेशी होता, जो आत्म्याने अभिषिक्त असा ख्रिस्ती बनला. (प्रे. कृत्ये ९:४३–१०:४८) जेव्हा यापो मंडळीतील बांधव परत आले व त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात जी खडतर घटना घडल्याचे अनुभविले त्याची वार्ता मंडळीला संगितली तेव्हा सर्वांना किती आश्चर्ययुक्त आनंद झाला असावा!
आज पुष्कळ प्रवासी यापोला भेट देतात, जे सध्या तेल अवीव-जेफा येथे आहे. तेथे गेल्यावर त्यांना या प्रसिद्ध बंदरावर ज्या पवित्र शास्त्रीय घटना घडल्या त्यांचे स्मरण होऊन तो वृत्तांत जिवंत होतो.