यहोवा विश्वास व धैर्याचे प्रतिफळ देतो
“ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवावयाला समर्थ आहे; महाराज, तो आम्हास आपल्या हातातून सोडवील.”—दानीएल ३:१७.
१. मागील लेखात कोणता धडा ठळकपणे सांगण्यात आला, आणि त्या घटनांचे पुन्हा एकदा परिक्षण करणे का फायद्याचे आहे?
विश्वाचा सार्वभौम, यहोवा देव याने आपल्या सर्वोच्चपणाविषयीचे महत्वपूर्ण धडे जगातील अधिपतींना दिले. हेच आपण मागील लेखात, दानीएल पुस्तकाच्या पहिल्या सहा अध्यायातील घटनांचे परिक्षण करताना खरे असल्याचे पाहिले. पण आता याच अध्यायांचे पुनर्निरीक्षण करून त्यापासून, प्रेषित पौलाने लिहिलेल्या प्रेरित वचनांच्या अनुषंगाने आणखी काय शिकायला मिळते ते पाहू या. पौलाने म्हटलेच होते की, “जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले आहे ते सर्व आपणास शिक्षण मिळण्याकरता लिहिले, यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी.”—रोमकर १५:४.
२, ३. नबुखद्नेस्सर राजाने ज्या बंदिवानांना बोलावले ते कोण होते आणि त्यांच्या नावाच्या अर्थापासून आपल्याला कोणता निर्वाळा मिळतो?
२ यहोयाकीम राजाचा पुत्र यहोयाखीन याच्या अल्प कारकीर्दीत, इ. स. पू. ६१७ मध्ये नबुखद्नेस्सर राजाने हे आज्ञापिले की, ज्ञानी व सुंदर यहुदी युवकांना बाबेलोनात आणले जावे. यात दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हे होते.—दानीएल १:३, ४, ६.
३ या मुलांच्या नावांचे परिक्षण केल्यास हे सुव्यक्त होते की, त्या काळी यहुदात दुष्ट परिस्थिती होती तरी या चार इब्री युवकांना देवभिरु पालक होते. दानीएल याचा अर्थ “देव माझा न्यायाधीश आहे”, असा होतो. हनन्याचा अर्थ, “यहोवाने आपली मर्जी दाखवली आहे; यहोवा उदार आहे”, असा आहे. मीशाएलचा संभाव्य अर्थ, “देवासारखा कोण आहे?” किंवा “देवाच्या पक्षाचा कोण आहे?”, असा आहे. आणि अजऱ्याचा अर्थ, “यहोवाने मदत दिली आहे”, असा आहे. या मुलांना त्यांच्या नावांनी एकच खऱ्या देवास विश्वासू राहण्यास निश्चये उद्युक्त केले असावे. तथापि, खास्दी लोकांनी ही नावे बदलून त्यांना अनुक्रमे बेल्टशस्सर, शद्रख, मेशख आणि अबेद्नगो ही नावे दिली. अर्थात, विदेशी सत्तेखाली दास असल्यामुळे त्यांना बंदिवान करणाऱ्यांनी जी नावे दिली ती स्विकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.—दानीएल १:७.
विश्वास व धैर्य पणाला लागतात
४. शुद्ध व अशुद्ध प्राण्यांविषयी देण्यात आलेले नियम आपल्या लोकांनी गंभीरतेने घ्यावेत असे यहोवाला वाटत होते हे कशावरुन दिसते?
४ त्या देवभिरु पालकांनी आपल्या मुलांना चांगली नावे ठेवून त्यांच्या जीवनाची चांगली सुरुवात करून तर दिलीच पण सोबत त्यांनी यांना मोशेच्या नियमशास्त्रात दिलेल्या परिपाठाप्रमाणे शिक्षण दिले व संगोपन देखील केलेच असावे. यात आहारविषयक नियम देखील होते. या नियमांना स्वतः यहोवा देवाने इतके मोलवान समजले होते की, अशा प्रकारच्या आणखी काही मनाई नियमांना सांगितल्यावर त्याने म्हटलेः “मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा.”—लेवीय ११:४४, ४५.
५. चार इब्री युवकांचे सुंदरपणे करण्यात आलेले संगोपन कसे पणाला लागले?
५ त्या चार इब्री मुलांना देण्यात आलेले सुंदर संगोपन लवकरच पणाला लावण्यात आले. ते कसे? कारण यांना “राजा खात असे त्या मिष्टान्नातून व पीत असे त्या द्राक्षारसातून . . . नित्य खाणेपिणे” करण्याचे नेमण्यात आले. (दानीएल १:५) त्यांना ठाऊक होते की मोशेच्या नियमशास्त्रात मनाई करण्यात आल्याप्रमाणे डुकर, ससे, कालव शिंपले आणि वाम यांचे त्यांना सेवन करता येणार नाही. याखेरीज जे मांस खाण्याविषयी नियमशास्त्राने त्यांना मुभा दिली होती त्याविषयीही प्रश्नार्थकता होती, कारण त्या पशूचे रक्त योग्यपणे काढण्यात आले आहे वा नाही हे समजण्यात कोणताही मार्ग नव्हता. यात आणखी भर ही होती की ते मांस मूर्तिपूजक विधींकरवी विटाळविले जाई.—लेवीय ३:१६, १७.
६. परिक्षेचा चार इब्री युवकांनी कसा सामना केला?
६ तर आता त्या चार इब्री तरुणांना काय करता येत होते? आपल्याला वाचायला मिळते की दानीएल व निःसंदेह त्याच्या तीन मित्रांनी, या आहाराकरवी स्वतःला भ्रष्ट होऊ देऊ नये हा अंतःकरणात निर्धार केला. याकरताच, राजा खात असलेल्या मिष्टान्नाऐवजी शाकान्न आणि द्राक्षारसाऐवजी पाणी द्यावे अशी दानीएलाने “विनंती केली.” कोणते अन्न स्वादिष्ट लागते हा विचार त्यांनी आपल्या मनात आणला नाही. आपला हा निश्चय पुढे नेण्यात विश्वास व धैर्याची खरीच गरज होती. वस्तुतः यहोवा या चार युवकांच्या बाबतीत रस बाळगून होता म्हणून दानीएलाला खोजांच्या सरदाराची मर्जी लाभावी असे यहोवाने घडवून आणले. तरीपण, सरदार ही विनंती मान्य करण्यास थोडा काकू करू लागला, कारण त्याला वाटले की न जाणो वेगळ्या आहाराचा दानीएलाच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झालेला दिसून येईल. याकरताच दानीएलाने हे ठरविले की या आहाराचा प्रयोग दहा दिवस आजमावून पहावा. देवाच्या आज्ञांचे पालन केल्यामुळे आपल्याला चांगला विवेकभाव लाभेल इतकेच नसून आपले आरोग्य देखील चांगले राहील असा दानीएलाचा दृढ विश्वास होता. अशी ही भूमिका घेतल्यामुळे त्या चार इब्री युवकांना बाकीच्या तरुणांकडून बरीच थट्टा सहन करावी लागली असणार हे उघड आहे.—दानीएल १:८-१४; यशया ४८:१७, १८.
७. आपल्या धाडसी भूमिकेमुळे त्या इब्री युवकांना कोणते प्रतिफळ मिळाले?
७ आहाराविषयी राखलेल्या मनोदयानुरुप जगणे याकरता त्या चार इब्री युवकांना विश्वास व धैर्य प्रदर्शित करावे लागले हे निश्चित. पण याचे त्यांना चांगलेच प्रतिफळ मिळाले, कारण दहा दिवसानंतर यांची प्रकृती इतरांपेक्षा अधिक सुकुमार व धष्टपुष्ट झाल्याची दिसली! यहोवाने त्यांना ज्ञान, समज आणि बुद्धी दिली त्यामुळे ते आपल्या तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर राजासमोर उभे राहिले तेव्हा “ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिषांपेक्षा व मांत्रिकापेक्षा दसपट हुशार आहेत” असे दिसून आले.—दानीएल १:२०.
८. या गोष्टीत यहोवाच्या आजच्या सेवकांसाठी कोणता धडा आहे?
८ या सर्वांमध्ये, यहोवा देवाच्या आजच्या सर्व सेवकांसाठी धडा नमूद आहे. त्या इब्री युवकांना कदाचित असाही विचार करता आला असता की, मोशेच्या नियमशास्त्रात देण्यात आलेले आहारविषयक निर्बंध इतके महत्वाचे नाहीत. दहा आज्ञा व यज्ञयाग आणि वार्षिक मेळावे यांच्या दृष्टीने पाहता त्यांचे तितके मोल नाही असेहि कदाचित त्यांना विचार करता आला असता. पण नाही, त्या चार निष्ठावंत इब्री युवकांनी देवाच्या नियमांमधील सर्व गोष्टींचे आचरण करण्याचा निर्धार केला होता. याद्वारे येशूने दिलेले तत्व आपल्या ध्यानात येते, जे लूक १६:१० मध्ये असे लिखित आहेः “जो अगदी अल्प गोष्टीविषयी विश्वासू आहे तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे व जो अगदी अल्प गोष्टीविषयी अन्यायी आहे तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे.”—पडताळा मत्तय २३:२३.
९. आज काही साक्षीदारांनी अशाच प्रकारचे धैर्य कसे दाखविले?
९ यहोवाचे साक्षीदार प्रांतिय अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी मालकाकडून रजेची विचारणा करताना कित्येक वेळा असाच विश्वास व धैर्य दाखवतात. वेळोवेळी त्यांना याविषयी अपवादात्मकपणे मंजुरी मिळाल्याचे दिसले आहे. पायनियर मालिकेत समाविष्ठ व्हावे वा सहाय्यक पायनियर बनावे म्हणून साक्षीदारांनी अर्धवेळ नोकरी करण्याची आपली इच्छा मालकापुढे व्यक्त केली आणि यालाही वेळोवेळी अनुमति लाभली आहे.
१०. या सर्व गोष्टीत साक्षीदार पालकांना कोणता धडा मिळतो?
१० त्या चार इब्री युवकांना उत्तम प्रशिक्षण लाभले होते हे पाहता आजच्या देवभिरु पालकांना यापासून किती चांगला धडा मिळण्यास हवा! मुलांचे आध्यात्मिक कल्याण होण्याची ख्रिस्ती पालकांची खरीच आंतरिक इच्छा आहे तर तीच इच्छा ते आपल्याहि जीवनात मत्तय ६:३३ च्या अनुषंगाने दाखवीत राहतील. तेव्हाच त्यांना, आपली मुले मोहाचा तसेच त्यांचे मित्र, शिक्षक यांच्याकडून सण पाळण्याविषयीच्या किंवा इतर कोणा मार्गाने शास्त्रवचनीय तत्वे भंग करण्याच्या दबावाचा प्रतिकार करीत आहेत अशी आपल्या मुलांबाबत आशा बाळगता येईल. याकरवी हे देवभिरु पालक, नीतीसूत्रे २२:६ मधील तत्व खरे आहे असे शाबीत करतात.
नबुखद्नेस्सराच्या स्वप्नाचा निर्भिडपणे उलगडा करणे
११. आज आपल्याला दानीएल व त्याच्या तीन मित्रांचे उदाहरण कसे अनुसरता येईल?
११ दानीएलाच्या पुस्तकातील दुसरा अध्याय विश्वास व धैर्याविषयीचे आणखी एक उदाहरण देतो. बाबेलोनच्या सर्व ज्ञानी माणसांना राजाचे स्वप्न सांगता त्याचा उलगडा करता येईना म्हणून राजाने त्या सर्वांची हत्या करण्याच्या फर्मानाविषयीची बातमी दानीएलास कळाली तेव्हा तो व त्याचे तीन सोबती गडबडून गेले का? मुळीच नाही! उलटपक्षी, राजाला हवी असणारी माहिती यहोवा आपल्या प्रदान करील हा दृढ विश्वास राखून दानीएलाने बादशहाकडे जाऊन आपणाला याबाबतीत थोडा वेळ मिळावा अशी विनंती केली. त्याची ही विनंती मान्य झाली. मग दानीएल व त्याच्या मित्रांनी याविषयी कळकळीची प्रार्थना केली. यहोवाने ती माहिती पुरवून त्यांच्या विश्वासास प्रतिफळ दिले. तेव्हा दानीएलाने केलेल्या अंतःकरणपूर्वक प्रार्थनेत देवाचे उपकारस्मरण केले. (दानीएल २:२३) याशिवाय दानीएलाने ४थ्या अध्यायात असलेले स्वप्न उलगडून सांगताना नबुखद्नेस्सर राजाला हे सांगावे लागले की, राजा वनपशूंसोबत सात वर्षे एखाद्या पशूप्रमाणे जीवन व्यतित करील. याला विश्वास व धैर्याची गरज लागली. आज, देवाचे लोक सैतानी जगावर येणाऱ्या देवाच्या सूडाविषयीची जोरदार घोषणा करताना असाच विश्वास व धैर्य प्रदर्शित करतात.
‘अग्नीची शक्ती नाहीशी करणे’
१२, १३. दानीएल पुस्तकाचा तिसरा अध्याय दानीएलच्या तीन मित्रांवर ओढवलेल्या कोणत्या परिक्षा प्रसंगाचे वर्णन देतो?
१२ पवित्र शास्त्रात आढळणाऱ्या उल्लेखनीय उदाहरणांपैकीचे एक दानीएलाच्या पुस्तकातील ३ऱ्या अध्यायात सापडते. येथे यहोवाने, तीन इब्री सेवकांनी दाखविलेला आश्चर्यकारक विश्वास व धैर्य याला कसे प्रतिफळ दिले ते पहावयास मिळते. तो प्रसंग आपल्या डोळ्यांपुढे उभा करा. दुरा नावाच्या मैदानात बाबेलोनचे सर्व उच्च पदस्थ सेवक हजर आहेत. त्यांच्यासमोर ९० फूट उंच व ९ फूट रुंदीची सोन्याची मूर्ति उभी आहे. जमलेल्या लोकांच्या भावना उचंबळून याव्या याकरता राजाने वाद्येही आणली आहेत. ही वाद्ये वाजली म्हणजे ‘नबुखद्नेस्सर राजाने जी सुवर्ण मूर्ति स्थापिली आहे तिच्यापुढे त्या सर्वांनी साष्टांग दंडवत घालावयाचा आहे, आणि जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले जाणार.’—दानीएल ३:५, ६.
१३ ही आज्ञा मानण्यास नकार देणे यात मोठा विश्वास व धैर्य असावयास हवे होते यात कोणताच प्रश्न नाही. पण “अल्प गोष्टीत विश्वासू” राहिल्यामुळे त्यांना “पुष्कळ गोष्टीविषयी विश्वासू” राहण्यास तयार केले गेले. आपल्या या धोरणामुळे इतर यहुद्यांना अडचणीत पडावे लागेल हा आणखी एक मुद्दा होता. तरीपण ते मूर्तिपुढे दंडवत घालून तिची भक्ती करणार नव्हते. त्यांनी प्रदर्शित केलेला नकार त्यांच्या काही द्वेष्ट्या सहकाऱ्यांना सहज दिसून आला व त्यांनी वेळ न दवडता राजाकडे जाऊन त्याची बातमी दिली.
१४. त्यांनी दंडवत घालण्यास नकार दर्शविला तेव्हा नबुखद्नेस्सरने कोणती प्रतिक्रिया दाखवली आणि त्यांनी त्याच्या अंतिम निर्णयास कसे उत्तर दिले?
१४ नबुखद्नेस्सर “क्रोधाने संतप्त” झाला व त्याने त्या तिघा इब्री युवकांना आणण्याची आज्ञा दिली. “तुम्ही मुद्दाम करता काय?” ही त्याने केलेली पृच्छा, हे तिघे, सोन्याच्या मूर्तीला दंडवत घालून उपासना करण्याचे नाकारतील असे त्याला मुळीच वाटले नव्हते हे दाखविते. तेव्हा त्याने म्हटले की तो आणखी एक संधि देऊन बघणार आणि जर आताही त्यांनी नकारच दर्शविला तर मग त्यांना धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले जाणार. हे सांगताना बाबेलोनचा अहंकारी बादशहा मोठ्या गर्वाने म्हणालाः “माझ्या हातातून तुम्हास सोडवील असा कोणता देव आहे?” यावेळी यहोवावरील विश्वास व खरे धैर्य एकवटून ते तिघेही राजास आदराने म्हणालेः “याबाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवावयास समर्थ आहे. महाराज, तो आम्हाला आपल्या हातातून सोडवील. ते कसेही असो, पण महाराज आपण पक्के समजा की, आम्ही आपल्या दैवताची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीस दंडवत घालणार नाही.”—दानीएल ३:१३-१८.
१५. नबुखद्नेस्सरने कोणती कारवाई केली?
१५ मघाशी नबुखद्नेस्सर क्रोधाने संतप्त होता पण आता त्याचा रागाने तिळपापड झाला कारण आम्ही वाचतो की, त्या तीन इब्री युवकांच्या बाबतीत “त्याची मुद्रा पालटली.” (दानीएल ३:१९) अति कोपायमान होऊन त्याने भट्टी नेहमीपेक्षा सातपट अधिक तप्त करण्याची आज्ञा फर्मावली. मग त्याच्या सैन्यातील काही धिप्पाड लोकांनी या तिघांना मुसक्या बांधून धगधगलेल्या आगीच्या भट्टीत टाकून दिले. या भट्टीच्या ज्वाळा इतक्या प्रखर होत्या की यांना घेऊन जाणारेच भाजून मेले.
१६. तीन इब्री युवकांच्या विश्वासाला कसे प्रतिफळ मिळाले?
१६ पण मग राजाला काय दिसले? भट्टीत आगीची कसलीही इजा न होता तीन नव्हे तर चार इसम मोकळे फिरत आहेत! त्याला किती आश्चर्य वाटले असावे! त्याने त्या इब्री युवकांना बाहेर येण्याची आज्ञा दिली आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्याला त्यांच्या डोक्याचा एकही केस जळाला नव्हता की त्यांच्या कपड्यांना अग्नीचा गंधही लागला नव्हता हे दिसले. यहोवाने खरेच त्यांचा विश्वास व धैर्य याचे किती मोठे प्रतिफळ त्यांना दिले होते! प्रेषित पौलाच्या मनातही याच युवकांचे उदाहरण असावे कारण जेव्हा त्याने साक्षीदारांच्या भव्य मेघाविषयीची यादी दिली त्यात यांचा, यांनी “अग्नीची शक्ती नाहीशी केली” असा उल्लेख केला आहे. (इब्रीयांस ११:३४) त्या प्राचीन काळापासून त्या युवकांनी यहोवाच्या सर्व साक्षीदारांपुढे किती चांगले उदाहरण राखले!
१७. आज यासारखीच कोणती उदाहरणे आपल्याला सापडतात?
१७ आज यहोवाच्या सेवकांना खरोखरी अग्नीच्या भट्टीत पडण्याची भीती नाही. पण तेच राष्ट्रीय चिन्हाला भक्तिभावाने पूजनीय मानण्याविषयीच्या विविध प्रकारच्या परिक्षेत त्यांना आपली सचोटी कसोटीला लावावी लागली. काहींचा निष्ठावंतपणा राजकीय पक्षाचे पत्रक विकत घेण्याच्या प्रकाराने वा लष्करात भरती होण्याच्या प्रकाराकरवी पारखला गेला. यहोवाने या सर्व लोकांना टिकवून ठेवले आणि आपल्या सचोटीच्या आव्हानास यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी समर्थ केले व याद्वारे दियाबल सैतान हा लबाड आणि यहोवा हाच खरा देव असल्याचे शाबीत झाले.
विश्वास व धैर्याचे आणखी एक उदाहरण
१८. दानीएल पुस्तकाच्या ५ व्या अध्यायात ३ व ४ वचनात लिहिल्याप्रमाणे बेलशस्सरने यहुद्यांचा देव यहोवा याविषयीचे कपट कसे दाखविले?
१८ याशिवाय, विश्वास व धैर्याविषयीचे आणखी एक उदाहरण दानीएलाच्या पुस्तकातील पाचव्या अध्यायात नमूद आहे. येथे बेलशस्सर हा बाबेलोनचा राजा हजारो निमंत्रित उमराव, रखेल्या व उपपत्न्यांसोबत भव्य मेजवानीचा आनंद घेत होता. या मेजवानीत पवित्र पात्रे विटाळविण्यात आली होती. तेव्हा एकाएकी भिंतीवर विचित्र हातांनी लिहीलेला लेख दिसला. ते बघून राजा इतका गारठला की त्याच्या अंगात वारे भरुन त्याचे हातपाय लटपटू लागले. तेव्हा, बाबेलोनचे सर्व सूज्ञ पुरुष गोंधळात पडल्यामुळे खऱ्या देवाचा संदेष्टा दानीएल याला बोलावण्यात आले.
१९. दानीएलाने भिंतीवरील हस्तलिखाणाचा उलगडा केला तेव्हा लक्षणीय असे काय दिसले?
१९ ती दिमाखी मेजवानी व विदेशी वातावरण यात एकटाच उभा राहिला तरी दानीएलाने त्या गोष्टींची छाप स्वतःवर पडू दिली नाही, आणि त्याने देवाकडील संदेशाचा प्रभाव कमी केला नाही की एकंदर वादविषय आपल्या नजरेआड होऊ दिला नाही. शांतपणे उभ्या स्थितीत पण अगदी स्पष्ट व सन्माननीय पद्धतीने त्याने आपल्या देवाविषयीची साक्ष दिली. हस्तलिखाणाचा उलगडा पुरविण्यातच समाधान न मानता दानीएलाने राजाला, यहोवा देवाने त्याच्या आजोबाला पशुसारखे जीवन जगावयास लावून कसे नम्र केले होते व मानवजातीच्या जगावर सर्वसमर्थ देवच खरा शास्ता आहे याची जाणीव कशी घडू दिली याचे स्मरण दिले. ‘हे सर्व तुला ठाऊक आहे,’ असे दानीएल बेलशस्सरला म्हणाला, ‘तरीही तू स्वतःला नम्र केले नाहीस, तर यहोवाच्या मंदिरातील पात्रे आणली व सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यांनी तयार करण्यात आलेल्या दैवतांची स्तुति केली. पण ज्याच्या हाती तुझे सर्व व्यवहार स्वाधीन आहेत त्या देवाचे गौरव केले नाही. याकरता त्याच्याकडून हे फर्मान निघाले आहेः तुला तराजूत तोलून तू उणा भरला आहे. तेव्हा तुझे राज्य तुझ्यापासून काढून घेण्यात येऊन ते मेद व पारस यांना विभागून देण्यात आले आहे.’ होय, दानीएलाने पुन्हा एकदा विश्वास व धैर्याविषयीचे अप्रतिम उदाहरण देवाच्या आजच्या सेवकांसाठी दिले आहे.—दानीएल ५:२२-२८.
२०. दारयावेश राजाच्या कारकीर्दीत दानीएलाने प्रबळ विश्वासाचे आणखी कोणते उदाहरण मांडले?
२० दानीएलाच्या ६व्या अध्यायात आल्यावर आपल्याला विश्वास व धैर्याचे आणखी एक उदाहरण दिसते. आता दारयावेश राजा अधिपती होता व त्याने दानीएलास आपल्या राज्यात तीन प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक नेमले होते. दुसरे दानीएलाचे द्वेष्टे होते त्यामुळे त्यांनी बादशहाला त्याचे मन वळवून असे फर्मान काढावयाला लावले की, ३० दिवस राजाशिवाय इतर कोणाचीही याचना कोणी करता कामा नये. दानीएलाविरुद्ध खोटी सबब मिळविण्याचा हाच एक मार्ग आहे हे त्यांना दिसले. दानीएलाने या कायद्याकडे दुर्लक्ष केले आणि तो आपल्या माळ्यावर यरुशलेमाच्या दिशेने उघड्या असणाऱ्या खिडकीकडे तोंड करुन नित्याने प्रार्थना करीत राहिला. राजाज्ञेचा अवमान करण्याचा दोष आल्यामुळे कायद्यात दिलेल्या शिक्षेनुरुप दानीएलास सिंहेच्या गुहेकडे पाठविण्यात आले. येथे परत एकदा देवाने दानीएलास त्याच्या विश्वासाचे व धैर्याचे प्रतिफळ दिले. ते कसे? इब्रीयांस पत्र ११:३३ म्हणते त्याप्रमाणे यहोवाने “सिंहांची तोंडे बंद केली.”
२१. दानीएलच्या पुस्तकात पहिल्या सहा अध्यायात लिखित असणाऱ्या विश्वास व धैर्याच्या सुंदर उदाहरणांच्या दृष्टीने आमचा कोणता दृढ निर्धार असावा?
२१ दानीएलाच्या पुस्तकातील १ ते ६ अध्याय विश्वासास उभारणाऱ्या किती घटना पुरवितात! विश्वास व धैर्य प्रगटविणाऱ्यांना यहोवाने केवढ्या समृद्धरित्या प्रतिफळ दिले! यामुळे एका बाजूने त्यांना उंचावण्यात आले व दुसऱ्या बाजूने त्यांची अद्भूतरित्या सुटकाहि झाली. खरेच, आपणही परिक्षा प्रसंगाना तोंड देतो तेव्हा या विश्वासू साक्षीदारांच्या या अनुभवांमुळे आपल्याला सहनशीलता व आशा मिळाली पाहिजे. आणि वस्तुतः याच कारणास्तव या घटना नमूद करण्यात आल्या आहेत! तद्वत, आपण असा विश्वास व धैर्य जोपासण्याचे सुंदर उदाहरण राखण्याचा निर्धार करु या.—रोमकर १५:४; इब्रीयांस ६:१२.
उजळणीसाठी प्रश्न
◻ चार इब्री युवकांची नावे त्यांच्या संगोपनाविषयीची कोणती माहिती देतात?
◻ इब्री युवकांनी आहाराविषयीच्या परिक्षेचा केलेला सामना आम्हासाठी कोणता धडा देतो?
◻ तीन इब्री युवकांच्या सचोटीची परिक्षा झाली त्याप्रमाणेच आजच्या यहोवाच्या सेवकांची कशी परिक्षा झाली?
◻ बेलशस्सरास साक्ष देताना दानीएलने विश्वास आणि धैर्य कसे प्रदर्शित केले?
[२२ पानांवरील चित्रं]
दानीएल व त्याचे सोबती नकार दर्शविण्यास शिकले