शास्त्रवचनातील धडेः आमोस १:१-९:१५
एका राष्ट्राचा विनाश
आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध ऐस,” असे “यहोवा, सेनाधीश देव” इस्त्राएल राष्ट्राला म्हणतो. (आमोस ४:१३, १३) याचे कारण? समृद्धतेने धुंद होऊन इस्त्राएल देवाचे नियमशास्त्र विसरले होते आणि त्यांनी आपली पवित्र भूमि मूर्तिपूजा, अनैतिकता, रक्तपात आणि हिंसाचार यांनी भ्रष्ट केली होती.
या कारणास्तव आमोस या संदेष्ट्याला निपजविण्यात आले. याला त्याच्या स्वतःच्या यहुदा राष्ट्रालाच नव्हे तर उत्तरेकडील इस्त्राएल राज्यालाहि इशारेवजा संदेश कथित करावयाचा होता. तो इस्त्राएलाचा विषयासक्त जीवनाक्रमणासाठी धिक्कार करतो आणि शत्रुराष्ट्राद्वारे याचा ओघाओघाने विनाश होणार असे भाकित करतो. इ. स. पू. ८२९ ते इ. स. पू. ८०४ च्या दरम्यान लिहिण्यात आलेले हे आमोसचे पुस्तक देवाला येणारा नाश आधीच बघण्याची किती प्रचंड क्षमता आहे याची सूक्ष्मदृष्टी पुरविते आणि समयोचित इशारे सादर करते.
देवाच्या शत्रूंचा अग्निमय नाश
देवाच्या न्यायदंडापासून कोणीही वाचू शकत नाही. हे दिमिष्क (अराम), गज्जा (पलशेथ), सोर, अदोम, अम्मोन, मवाब आणि यहुदा या राष्ट्रांच्या बाबतीत केवढे खरे ठरले! यांच्या वाईट कर्मामुळे यहोवाने त्यांच्याविरुद्ध उगारलेला हात ‘मागे फिरविणार नाही.’ तथापि, यांच्यावर येणाऱ्या विपत्तीने, इस्त्राएलाला, याने देवासोबत कराराचे नाते राखण्यात आणि त्याचे नियम उंचावून धरण्यात दाखविलेल्या अपयशामुळे जो न्यायदंड येणार होता त्यावर अधिक भर दिला.—आमोस १:१-२:१६.
देवाचा इशारा ऐका. “भूतलावरील सर्व कुळात केवळ तुमच्या बरोबरच मी परिचय केला” असे यहोवा इस्त्राएलास म्हणतो. (आमोस ३:२) तथापि, त्यांच्या पापीष्ठ मार्गाक्रमणामुळे देवाचे नाव व त्याचे सार्वभौमत्व याविषयी तिटकारा व्यक्त केला. ते आपल्या भावांवर जाचजुलूम करुन ऐश्वर्य संपादित होते आणि ‘उन्हाळ्याचा महाल व हिवाळ्याचा महाल’ बांधून ऐषारामात राहात होते. (आमोस ३:१५) खोटी वजनमापे वापरुन ते स्वार्थीपणे गरीबांस फसवीत. त्यांनी यहोवाची खरी भक्ती सोडून दिल्यामुळे यहोवाकडील शिक्षा जवळ येत चालली होती. तरीही, ‘प्रभू यहोवा आपले सहस्य, आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय काहीच करणार नव्हता.’ यामुळेच आमोसने यहोवाच्या न्यायदंडाविषयीचे भाकित केले आणि त्यांना ही ताकीद दिलीः “आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध ऐस.”—आमोस ३:१-४:१३.
यहोवा तारणदाता आहे
पश्चाताप दाखविणाऱ्यांवर देव दया प्रदर्शित करील. “मला शरण या म्हणजे वाचाल” असे यहोवा इस्त्राएलाला अपील करतो. (आमोस ५:४) “वाईटाचा द्वेष करा व बऱ्याची आवड धरा.” (आमोस ५:१५) तरीपण हे शब्द नजरेआड केले जातात. धर्मत्याग्यांना मूर्तिपूजेची केंद्रे बेथेल आणि गिलगाल येथे जाऊन खोट्या दैवतांना यज्ञयाग करणे बरे वाटते. (आमोस ५:२६; १ राजे १२:२८-३०) अलंकाराने मढविलेल्या हस्तिदंती आसनावर बसून विलासी अधर्मी लोक विविध द्राक्षारस अधाशीपणे गिळतात आणि स्वतःच्या आवडीचे अन्न व तेल यावर यथेच्छ ताव मारतात. (आमोस ५:११; ६:४-६) “यहोवाचा दिवस” येत आहे आणि देवाने “स्वतःची शपथ वाहून” इस्त्राएलाचा नाश करण्याचे ठरविले आहे. (आमोस ५:१८; ६:८) इस्त्राएलावर जाच करण्यासाठी आणि त्याला बंदिवासात नेण्यासाठी यहोवा एका राष्ट्राचा उदय करणार.—आमोस ५:१-६:१४.
विरोध्यांचे नव्हे तर यहोवाचे भय धरा. इस्त्राएलचा नाश टोळधाडीने वा सर्वच भस्म करणाऱ्या अग्निने करता येत होता. पण आमोसने देवाकडे इस्त्राएलच्या वतीने प्रार्थना केली व देवाने ती ऐकली. “यहोवाला [आपल्या न्यायाच्या अमलबजावणीविषयी] अनुताप वाटला” त्यामुळे तो या मार्गाने याची पूर्णता करणार नव्हता. तरीपण इमारतीची बांधणी करणारा भींतीवरील लंबरेषा ओळंब्याने मापून बघतो तसेच यहोवा “यापुढे गय करणार नाही.” (आमोस ७:१-८) राष्ट्र धुळीस मिळाले पाहिजे. संदेष्ट्याचा संदेश ऐकून क्रोधायमान होऊन अमज्या हा वासराची उपासना करणारा याजक आमोसला यहुदा राष्ट्राकडे पळून जाण्याची आणि बेथेलमध्ये भविष्यकथन न करण्याची ताकीद देतो. (आमोस ७:१२, १३) आमोस भीतीने घाबरुन जातो का? नाही. तो अगदी निर्भिडपणे अमज्याच्या मृत्युविषयी आणि त्याच्या कुटुंबावर विपत्ती ओढवण्याविषयीचे भाकित करतो. हंगामाच्या वेळी जशी फळे गोळा करतात त्याप्रमाणे इस्त्राएलाकडून जाब घेण्याची यहोवाची नियुक्त वेळ झाली आहे. यापासून सुटका नाही.—आमोस ७:१-८:१४.
यहोवावर भाव ठेवणाऱ्यांना आशा आहे. “याकोबाचे घराणे मी समूळ नष्ट करणार नाही,” असे यहोवा म्हणतो. याकोबाच्या संतानापैकीच्या काहींना बचावाची आशा आहे, पण पाप्यांना नाही. त्यांचा नाश खात्रीचा आहे. तरीपण यहोवा ‘इस्त्राएल लोकांचा बंदिवास पालटणार.’—आमोस ९:१-१५.
आजच्यासाठी धडाः जे स्वतःला देवाचे वैरी करतात त्यांना मृत्युदंडाची शिक्षा मिळेल. तरीपण इश्वरी संदेश ग्रहण करून जे पश्चातापी बनतील अशांना यहोवाची दया मिळेल आणि ते जिवंत राहतील. आम्ही देवाचे भय धरुन आहोत तर त्याच्या इच्छेप्रमाणे करीत राहण्यामध्ये आम्ही शत्रूला बिघाड निर्माण करु देणार नाही.
[२८ पानावरील चौकट]
पवित्र शास्त्र वचनांचे परिक्षण
● १:५—प्राचीन काळी शहराला उंच भिंती असत आणि त्याच्या वेशी प्रचंड असत. या वेशी बंद करण्यासाठी लोखंडाचे वा तांबे व कथिल यांच्या मिश्र धातूंचे अडसर वापरीत. दिमिष्काचे अडसर मोडणे याचा अर्थ अरामाच्या या राजधानीला अश्शुरपुढे हार खावी लागणार होती. हे अडसर मोडून टाकल्यामुळे आता वेशी बंद होऊ शकणार नव्हत्या असे ते दिसणार होते.—२ राजे १६:८, ९.
● ४:१—शोमरोनात आरामशीर जीवन व्यतित करणाऱ्या स्त्रियांना “बाशानाच्या गाई” असे संबोधिले आहे. बाशानाच्या समृद्ध कुरणांनी उत्तम प्रकारातील जनावरांची निपज घडवून आणली. (अनुवाद ३२:१४; यहेज्केल ३९:१८) ‘बाशानच्या या स्वार्थी गाईंनी’ आपल्या ‘धन्यांना’ म्हणजे पतींना गरीबांची नाडवणूक करण्यास लावून आपली “हस्तिदंताने मढविलेली घरे” भरविली होती. (आमोस ३:१५) तरीपण अशा या कृतीमुळे इश्वरी सूड उगवण्यात आला.
● ४:६—“दातांची स्वच्छता” या शब्दप्रयोगाचा अर्थ, त्याजशी समांतरित असणारा दुसरा शब्दप्रयोग “भाकरीची वाण” याकरवी स्पष्ट करण्यात आला आहे. यामुळे दुष्काळ लक्षात येतो. अशा काळी काहीही खाण्यास न मिळाल्यामुळे दात स्वच्छ राहतात. दहा वंशीय राज्याचा मूर्तिपूजक आचार बघून यहोवा देवाने देशावर दुष्काळ आणून आपली नापसंती व्यक्त केली. हे त्याने आधीच भाकित केले होते. (अनुवाद २८:४८) तरीपण हे तसेच इश्वरी न्यायाची इतर वक्तव्ये कराराचा भंग करणाऱ्या लोकांच्या अंतःकरणात शिरु शकली नाहीत.—आमोस ४:६, ८-११.
● ५:२—आमोसने हा भविष्यवाद उदगारला तेव्हा लोक आणि इस्त्राएलाचा देश यावर विदेशी सत्तेने हल्ला केला नव्हता याकारणास्तव त्याला कुमारीची उपमा देण्यात आली. तरीपण ही इस्त्राएली कुमारी काही वर्षांतच अश्शुरपुढे पडणार होती व तिला “दिमिष्काच्या पलीकडे बंदिवान करून” नेण्यात येणार होते. (आमोस ५:२७) इस्त्राएलने अविश्वासूपणा प्रदर्शित केल्यामुळे जो विनाश त्याला मिळणार होता तो आमोसला इतका निश्चित वाटत होता की तो त्याने जणू तो घडलाच आहे या अर्थाने लिखाण केले.
● ७:१—“राजाकरिता उगवलेले गवत” हे बहुधा राजाने त्याची जनावरे व घोडे याजकरता अन्न देता यावे म्हणून बसविलेल्या करास सूचित करीत असावे. राजाचा कर पहिला भरण्यास हवा होता आणि मग लोक “गवत” किंवा भाजीपाला स्वतःच्या वापरासाठी घेऊ शकत होते. तरीपण हे करण्याआधीच टोळ आले व त्यांनी सर्व काही फस्त केले.
● ८:२—हंगामाच्या शेवटी उन्हाळी फळे गोळा करीत. शेतकी वर्षाची समाप्ती हे सूचित करीत होती की, इस्त्राएल आता आपल्या शेवटाला आले आहे. “यापुढे मी त्यांची गय करणार नाही,” असे यहोवाने घोषित केले. राष्ट्रावर त्याच्या न्यायदंडाची अमलबजावणी होण्याची वेळ आली होती.
● ९:७—त्यांच्या विश्वासू पूर्वजांमुळे यहोवाने इस्त्राएलाची निवड केली. त्या पूर्वजांना मिसराच्या दास्यातून बाहेर आणले आणि कनान देशी वसविले. पण याबद्दल त्यांना कसलाही अभिमान दाखवता येणार नव्हता कारण त्यांच्या दुष्टाईमुळे त्यांचा दर्जा कुशी माणसासारखा झाला होता. (पडताळा रोमकर २:२५) याचप्रमाणे मिसरातून त्यांची झालेली मुक्तता, पलिष्टी व अरामी लोक त्यांच्या आधीच्या जागेमधून निघून आत्ताच्या जागेत राहात होते त्याप्रमाणे इश्वरी मान्यता सतत लाभेल इतकी खात्रीची नव्हती. विश्वासू कुलपित्याकडून आलेली संतान इस्त्राएलांना वाचवू शकणार नव्हती. देवासोबतची मान्यवर भूमिका त्याच्या इच्छेनुरुपचे आचरण करण्यावर अवलंबून असते.—आमोस ९:८-१०; प्रे. कृत्ये १०:३४, ३५.