राज्य घोषकांचा वृत्तांत
पवित्र शास्त्र सत्य भूतविद्येपासून मुक्तता देते
भूतविद्येविषयी यहोवाला वाटणारा दृष्टीकोण त्याने इस्राएलांना या शब्दात अगदी उचितपणे व्यक्त केला: “तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका व शकुनमुहूर्त पाहू नका.” (लेवीय १९:२६) तरीपण जो जादूटोणा व भूतविद्येत गुंतला आहे त्याला दुरात्म्यांच्या पकडीतून कसे मुक्त होता येईल? येशूने म्हटले: “तुम्हास सत्य समजेल व सत्य तुम्हास बंधमुक्त करील.” (योहान ८:३२) ही गोष्ट खरी असल्याचे फ्रान्समधील एका साक्षीदार सेविकेच्या अनुभवाद्वारे सिद्ध होते:
“मी माझ्या नव्या घरी रहायला आले तेव्हा लवकरच एका शेजारणीने येऊन माझी जन्मकुंडली काढून देण्याची स्वेच्छा दर्शविली. मी लगेच निर्णय घेतला की याविषयी काहीही करायचे नाही. कारण ही गोष्ट काही हलकी नाही व शिवाय ती स्त्री संगतिप्रिय वृत्तीची आहे हे मला दिसून आले.
“नोव्हेंबर १९८० मध्ये मी आजारी पडल्ये तेव्हा हीच स्त्री मला मदत द्यायला आली. तिने दाखविलेल्या दयाळू वृत्तीमुळे मी भारावून गेले. तिने तिच्या एका समस्येबद्दल बोलताना म्हटले की तिला रात्री मनोवेदना होऊन गुदमरल्यासारखे होऊन एकाएकी जाग येते. यामुळे मला तिजविषयी अधिक सहानुभूति वाटू लागली. ती वरवर आनंदी आहे असे भासवीत होती पण प्रत्यक्षात तसे नव्हते हे मला कळाले. पण आता या दुरात्मिक समस्येविषयी काय करावे? हे प्रकरण अधिक लांबणीवर पडू नये यासाठी मी तिच्यासोबत सत्याविषयी बोलण्याचा निश्चय केला.
“आम्हा सड्या स्त्रियांना सध्या किती आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते याविषयाची सुरुवात करून मी तिच्याबरोबर बोलणे आरंभिले. त्यावेळी ती म्हणली: ‘याबद्दल माझ्याजवळ उपाय आहे. मी पत्ते वाचून पैसे बनवून घेते.’ तेव्हा मी माझे पवित्र शास्त्र घेऊन, दुरात्मिक शक्तीसोबत संबंध जडविणे किती घातक आहे ते दाखविले.
“याद्वारे भूतविद्येच्या गंभीर चर्चेला प्रारंभ झाला. तिने म्हटले की तिने स्वतः भाकित केलेल्या सर्व गोष्टी खऱ्या निघाल्या. मी तिच्याशी विचारविनिमय करून तिला समजाविण्याचा प्रयत्न केला. तिला अनुवाद १८:१०, ११ मध्ये मोशाने लिहिलेले शब्द दाखवले: ‘चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार . . . पंचाक्षरी, छाछू करणारा, दुरात्म्याला किंवा ज्योतिष्यांना विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा.’ मी निघाले त्यावेळी ती म्हणाली, ‘मला आता असे वाटते की माझ्या समस्यांना तोडगा सापडला.’ केवढे आश्चर्य! कारण भूतविद्येविषयीच्या केवळ एकाच चर्चेत तिला उत्तर मिळाले.
“आध्यात्मिक अन्न सेवन करण्याची तिची इच्छा प्रदीप्त झाल्यामुळे ती पहाटेच्या तीन ते चार वाजेपर्यंत पवित्र शास्त्राचे वाचन करू लागली. आरंभी आठवड्यातून दोनदा अभ्यास करू लागलो. ती सभांना येऊ लागली व खूप प्रगति केली. होय, आम्ही पवित्र शास्त्र व वॉचटावर संस्थेच्या प्रकाशनांद्वारे भूतविद्येबद्दलच्या विषयाची माहिती मिळविली तेव्हा तिने स्वतःपाशी भूतविद्येच्या प्रकाराशी संबंधित असणाऱ्या सर्व वस्तु, पुस्तके इत्यादि गोष्टी जाळून टाकण्याचा निर्धार केला.
“ही स्त्री सत्याच्या मार्गात टिकून राहिली. लवकरच ती ‘सुवार्ता’ इतरांना सांगण्यासाठी प्रचाराला येऊ लागली. तिला अधुनमधून तिच्या पूर्वीच्या ग्राहकांकडून फोन आले. पण आता भूतविद्या सोडून दिली आहे हे स्पष्ट केल्यावर, त्यापेक्षा अधिक मनोरंजन गोष्टी ऐकण्यासाठी तिच्याकडे यावे म्हणून तिने त्यांना आमंत्रण दिले. तिचा बाप्तिस्मा झाला व ती आता आपल्या भगिनींपैकी आहे”