“शांतीचा अधिपति” याच्या सत्तेखालील जगव्याप्त सुरक्षितता
“त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश यहोवाचा आवेश हे सिद्धीस नेईल.”—यशया ९:७.
१, २. (अ) देवाच्या राज्याचा जन्म हा कशाप्रकारचा प्रसंग असणार आणि हा जन्म कधी घडला? (ब) संयुक्त राष्ट्र संघटनेची सनद त्या संघटनेला कोणती नियुक्ति देते पण राज्याच्या कराराने येशू ख्रिस्ताला कोणती नियुक्ति दिली आहे? (क) यहोवा राज्याच्या कराराच्या बाबतीत अपयशी न होता तो त्यास सदा उंचावून धरील हे आम्हाला कसे कळते?
येशू या परिपूर्ण मानवी बालकाचा जन्म जसा असाधारण आनंदाचा प्रसंग ठरला त्याप्रमाणेच कित्येक काळाआधी वचन दिलेल्या त्याच्या राज्याचा जन्मसुद्धा अत्यंत आनंदमय प्रसंग ठरणार. (स्तोत्रसंहिता ९६:१०–१२) आधुनिक इतिहासाच्या सत्य परिस्थितीस अनुलक्षून पाहता त्या सरकारची सत्ता १९१४ मध्ये वैभवी येशूच्या खांद्यावर देण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाचे अस्तित्व सुद्धा त्या वस्तुस्थितीस कमीपणा आणू शकत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १५९ सदस्यांपैकी कोणताही अधिपति दावीदाच्या घराण्याचा नाही. तरीपण या जागतिक कटाच्या सनदेने आपणा स्वतःलाच मानवजातीकरता जगव्याप्त शांती व सुरक्षितता देऊ करण्याचे काम नेमून दिले आहे.
२ तथापि, यहोवाने राज्याविषयी केलेला कधीही रद्द झालेला नाही. यशया ९:७ मधील “दावीदाच्या सिंहासनावर” हे उद्गारच, देवाने दावीदाबरोबर चिरकालिक राज्याचा करार केला आहे याची पुष्टी देतात. याशिवाय हा करार पूर्णपणे यशस्वी होईल याची यहोवाने शपथ वाहिली आहे. या कराराशी यहोवा एकनिष्ठ राहील हे स्तोत्र संहिता ८९:३, ४, ३५ व ३६ वरून स्पष्ट दिसते: “मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे, मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे: ‘मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन; तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन.’ एकवार मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की, मी दावीदाला कदापि दगा देणार नाही. त्याची संतती सर्वकाळ राहील व त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.” हा करार तसेच “शांतीचा अधिपति” ही पदवी या गोष्टी येशू ख्रिस्ताला जगव्याप्त सुरक्षितता आणण्याचे काम नियुक्त करतात.
३. “शांतीचा अधिपति” याने आपली सत्ता सुरु करण्याचा काळ स्वर्ग किंवा पृथ्वीसाठी शांतीचा काळ का नव्हता?
३ तथापि, यहोवा देवाने आपली सत्ता वा शासन त्याच्या युवराजाच्या खांदी देण्याचा काळ वर स्वर्ग किंवा खाली पृथ्वीकरता शांतीदायक वर्ष ठरणार नव्हते. प्रकटीकरणाच्या १२व्या अध्यायानुसार त्याच्या राज्याच्या जन्मानंतर स्वर्गात युद्ध होणार होते. दियाबल सैतान व त्याचे दुरात्मे यांनी नव्यानेच प्रस्थापित झालेल्या सरकारसोबत टक्कर दिली त्यामुळे नव्यानेच सिंहासनाधिष्ठ झालेला राजा आपल्या पवित्र दूतांसह त्या दुरात्मिक शक्तीसोबत लढला. याचा परिणाम असा झाला की सैतान व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून खाली आमच्या पृथ्वीच्या वातावरणात ढकलून देण्यात आले. या कारणास्तव ही घोषणा निनादली गेली: “पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे गेला आहे.” (प्रकटीकरण १२:१२) दियाबलाच्या अधोगतीपासून आमची पृथ्वी विजोड हिंसाचार व युद्ध यांचे शोचनीय क्षेत्र बनली आहे. या करताच मानवजातीला “शांतीचा अधिपति” याच्या सत्तेची किती नितांत गरज आहे; कारण त्याद्वारेच जगव्याप्त सुरक्षितता परिणामित होईल!
४. “समर्थ देव” या पदवीचा सर्वसमर्थ देवाशी का गोंधळ होता कामा नये?
४ यशया ९:६च्या मते येशू ख्रिस्ताच्या प्रतापी नामास “शांतीचा अधिपति” याबरोबर आणखी पदव्या जोडल्या जाणार होत्या. या पैकीची एक “समर्थ देव” अशी आहे. होय, त्याला सर्वसमर्थ देव असे म्हटले जाणार नव्हते की ज्याकरवी तो त्र्यैक देवातील एका देवाच्या समान बनला असता. त्याचे पुनरूत्थान झाले अगदी त्याच दिवशी त्याने जाहीर होऊ दिले की तो अद्याप यहोवा देवापेक्षा कनिष्ठ होता. त्याने मरीया मग्दाली हिला दर्शन दिले व म्हटले की तिने त्याच्या उत्सुक शिष्यांना जाऊन हे कळवावे की, तो त्याचा पिता व त्यांचा पिता, तसेच त्याचा देव व त्यांचा देव याजकडे परत जात होता. (योहान २०:१७) आजतागायत तो सर्व निर्मितीला “देवाधिदेव” यहोवा याच्या उपासनेत निरवीत आहे. (दानिएल ११:३६) होय, येशू ख्रिस्तालाही एक देव आहे व तो स्वतः येशू नसून त्याचा स्वर्गीय पिता यहोवा हा आहे. तर मग, “शांतीचा अधिपति” विश्वव्याप्त अशी दीर्घकालीन शांती व सुरक्षितता याचे किती भव्य पूर्वचिन्ह ठरत आहे बरे!
५. खरा व जिवंत देव यहोवा याच्या उपासनेत सर्व बुद्धिमान प्राण्यांना निरविण्यात केवळ येशू ख्रिस्त हाच खऱ्या अर्थाने पात्र का आहे?
५ हा वैभवी देवाचा पुत्र, एकच खरा जिवंत देव यहोवाच्या उपासनेत सर्व बुद्धीमान प्राण्यांना सदासर्वकाळ निरवीत राहील. या कामासाठी उंचावण्यात आलेला देवाचा पुत्र हा खऱ्या अर्थाने पात्र आहे. कारण स्वर्ग व पृथ्वीवरील सर्व निर्मितीत देवाचा वैभवी पुत्रच यहोवाला सर्वांच्या आधीपासून जाणतो व तेही अधिक जवळून जाणतो. १ करिंथकर २:११ मध्ये प्रेषित पौल म्हणतो: “मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे?” हेच येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सुद्धा आहे. मानवाची निर्मिती करण्यात यहोवा देवाने त्याचा वापर केला असला तरी त्याने स्वतः मनुष्य व्हावे, पृथ्वीवरील वातावरणात वावरावे आणि मानवाच्या भावना प्रथमदर्शनी अनुभवाव्या हा त्याच्यासाठी आणखी एक अनुभव होता. याकरताच असे लिखित आहे की, येथे पृथ्वीवर मानव या नात्याने “तो पुत्र असूनही, त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला.” (इब्रीयांस ५:८) याकरवी ‘स्वर्ग व पृथ्वी यावरील सर्व अधिकारास’ तसेच “समर्थ देव” ही पदवी धारण करण्यास आपण पूर्ण रूपाने पात्र आहोत हे त्याने सिद्ध करून दाखविले.—मत्तय २८:१८; पडताळा फिलिप्पैकर २:५–११.
“अद्र्भित मंत्री” व “सनातन पिता”
६. येशू ख्रिस्त “अद्र्भित मंत्री” अशी सेवा कशी करीत आला आहे आणि त्याच्या अद्र्भित सल्ल्यापासून “मोठा लोकसमुदाय” कसा लाभ मिळतीत आहे?
६ वरील सर्व प्रबळ कारणांमुळे देवाचा स्वर्गीय अधिपति मानवजातिची “अद्र्भित मंत्री” या अर्थाने सेवा करण्यास पूर्णतयः समर्थ आहे. (यशया ९:६) त्याकडील सल्ला हा नेहमीच सूज्ञ, पूर्ण व अचूक असतो. यहोवा देव आणि नव्या करारात घेण्यात आलेले लोक यामध्ये मध्यस्त म्हणून हा गेल्या १९ शतकात अद्र्भित मंत्री या अर्थी खरीच सेवा करीत आला आहे; आणि आता १९३५ पासून त्याची “दूसरी मेंढरे” यांचा “मोठा लोकसमुदाय” त्याच्याकडिल अद्र्भित सल्ला प्राप्त करून सर्वोत्तम सूचना व मार्गदर्शन घेत आहे. (प्रकटीकरण ७:९–१७; योहान १०:१६) हा सल्ला देण्याचे माध्यम या अर्थी, त्याने “या सद्य व्यवस्थीकरणाची समाप्ती” मध्ये वचन दिलेला “विश्वासू व बुद्धीमान दास” वर्ग सामोरा आणला असून त्याला आपल्या पृथ्वीव्याप्त कारभारावर वा बादशाही आस्थेवर नेमले आहे. (मत्तय २४:३, ४५–४७; लूक १२:४२–४४) “मोठा लोकसमुदाय” याला सध्या मिळणारा आध्यात्मिक सल्ला, देवाच्या प्रकटीत वचनावर आधारीत असल्यामुळे खरेपणाने अद्र्भित व विश्वासपात्र आहे.
७. दियाबल सैतान यहोवाच्या लोकांवर प्रबळ देव असा आता का नाही?
७ या सल्ल्यास प्रतिसाद दिल्यामुळे “सध्याच्या व्यवस्थीकरणाचा देव” दियाबल सैतान आता आम्हा यहोवाच्या लोकांवर प्रबळ देव नाही. (२ करिंथकर ४:४) मोठी बाबेल या खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्यातून आम्ही आज्ञाधारकपणे बाहेर पडलो आहोत व त्याच्या दुष्ट पापकर्मात सहभागी नाही. यहोवा देवाने आपले सरकार ज्याच्या खांदी ठेवले आहे त्याच्या बाजूस आम्ही आपली अढळ भूमिका घेतली आहे.
८. (अ) “सनातन पिता” ही पदवी “मोठा लोकसमुदाय” ह्याला खासपणे अपीलकारक का वाटते? (ब) जे दियाबल सैतानाला स्वतःचा आध्यात्मिक पिता मानतात अशांचे काय होणार?
८ “सनातन पिता” हा खूपच प्रिय किताब वाटतो. “दुसरा मेंढरे” याच्या “मोठ्या लोकसमुदायाला” ती संज्ञा खासपणे आवडते. दियाबल सैतानाचे पितृत्व त्यांना अपीलकारक वाटले नाही. येशूचा विरोध करणाऱ्या यहुदी धर्मनेत्यांचा विचारच त्यांच्यावर शहारे आणतो कारण येशूने त्यांना म्हटले होते: “तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात व तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता, आणि तो सत्यात टिकला नाही. कारण त्याच्या मध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा स्वतःचे बोलतो. कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.” (योहान ८:४४) “मोठा लोकसमुदाय” याने स्वतःला दियाबल सैतानाच्या आध्यात्मिक पुत्रांपासून वेगळे केले कारण सैतानाचे पतित मानवजातीवरील पितृत्व सर्वकाळ राहणार नाही हे त्यांना समजले. जे त्याला आपला आध्यात्मिक पिता मानतील ते सर्व त्याच्यासह नष्ट होतील. मत्तय २५:४१ मध्ये निदर्शित असलेला “सार्वकालिक अग्नि” याकरवी सूचित असणारा कायमचा नाश दियाबल व जे त्याच्या पितृत्वापासून वेगळे होत नाही त्या सर्वांसाठी वाट पाहून आहे.—मत्तय २५:४१–४६.
९. “मोठा लोकसमुदाय” याला “सनातन पिता” याच्या पितृत्वाची कशी चुणूक मिळते?
९ उलटपक्षी, “मोठा लोकसमुदाय” याला “सनातन पिता” याच्या पितृत्वाची चुणूक लाभत आहे.a ती कशी? त्याची वाणी ऐकून, त्याची “दुसरी मेंढरे” बनून आणि आध्यात्मिक इस्राएलांच्या शेषांचा सहवास संपादन करून. हा उबदार कौटुंबिक जिव्हाळा शांतीचे वक्तव्य करतो. प्रेषित पौलाने, प्रेरणेद्वारा लिखाण करताना रोमकर १६:२० मध्ये यहोवाला “शांतीचा देव” असे संबोधिले. तर मग त्याच्या एकुलत्या एक पुत्राला “शांतीचा अधिपति” संबोधणे किती योग्यतेचे आहे! सबंध विश्वभरात शांतीची पुनर्स्थापना करून “शांतीचा अधिपति” आपल्या थोर पदवीच्या अर्थाप्रमाणे जगेल.
‘शांतीच्या अधिपति’चे बादशाही सरकार
१०, ११. सर्वथोर अशा पुत्रजन्माचे भाकित केल्यावर यशया पुढे काय म्हणतो व त्या शब्दांचा काय अर्थ होतो?
१० सर्वथोर अशा पुत्रजन्माचे, होय, ज्याला “शांतीचा अधिपति” ही पदवी देण्यात येईल त्या देवाच्या पुत्राच्या जन्माविषयीचे भाकित केल्यावर यशया संदेष्टा यहोवाच्या आत्म्याने भारावून पुढे बोलला: “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार . . . सेनाधीश यहोवाचा आवेश ते सिद्धीस नेईल.”—यशया ९:७.
११ “सत्तावृद्धी” अशी भाषा वापरण्यात भविष्यवाद स्पष्ट करतो की, ‘शांतीच्या अधिपति’ची राजवट सबंध पृथ्वीला सामावून घेण्यात तोकडी पडणार नाही. त्याच्या अधिपत्याला बांध घालू शकतील अशा पृथ्वीवर सरहद्दीच नसणार. ते सबंध पृथ्वीवर पसरेल. तसेच येत असलेल्या पृथ्वीवरील भावी नंदनवनात शांती संपुष्टात येणार नाही. कोठेही अव्यवस्था माजलेली दिसणार नाही. शांती सबंध पृथ्वीभर पसरलेली दिसेल व ती नेहमीच नांदेल. (स्तोत्रसंहता ७२:७) शांतीचा येथे अर्थ, हिंसाचार व युद्ध यांचा अभाव यापेक्षाहि अधिक असणार. त्यात न्याय व धार्मिकता यांचा सुद्धा समावेश राहील, कारण यशयाने म्हटलेच होते की ते साम्राज्य “सर्वकाळ न्यायाने, व धर्माने दृढ व स्थिर” राहील. मानवजातीसाठी महामूर आशीर्वाद प्राप्त होतील. हे सर्व काही यहोवा देवाचा अविश्रांत आवेश आमच्याच काळात तडीस नेईल.
१२. “शांतीचा अधिपति” याच्या खांद्यावर असणाऱ्या सरकारचे सबंध पृथ्वीभरात कसे प्रतिनिधित्व होत आहे?
१२ “शांतीचा अधिपति” याच्या खांदी असणाऱ्या या सरकारचे आजही साऱ्या पृथ्वीभरात प्रतिनिधित्व केले जात आहे. या बादशाही स्वर्गीय सरकारचा पाठींबा दिवसेंदिवस जलदगतिने वाढत आहे. येशू ख्रिस्ताचा आत्म्याने अभिषेक झालेल्या शिष्यांचा शेषवर्ग सर्व राष्ट्रातून आता पूर्णपणे गोळा झालेला आहे. याशिवाय २०० पेक्षा अधिक वेगवेगळ्या देशातून “मोठा लोकसमुदाय” गोळा करण्यात येत आहे. सध्या ३२,२९,०२२ इतके यहोवाचे साक्षीदार आहेत आणि एकत्रीकरणाचे आनंदी कार्य अद्याप पूर्ण झाले नाही. हा “मोठा लोकसमुदाय” “शांतीचा अधिपति” याच्या खांद्यावर असणाऱ्या सरकारची घोषणा मुक्तकंठाने करीत आहे. त्याच्या सदस्यांना या सरकारची प्रजा असण्याचे तसेच “ख्रिस्ताच्या वतीने वकिली” करणाऱ्या अभिषिक्त शेषांच्या सहवासात राहून सबंध पृथ्वीभरात त्याचे राजदूत असण्याची मोठी धन्यता वाटते.—२ करिंथकर ५:२०.
आधुनिक काळचा कट उधळून लावायचा आहे
१३. (अ) राज्याचे दूत आपणामध्ये काय करण्याचा प्रयत्न राखतात? (ब) देव संयुक्त राष्ट्र संघाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो?
१३ राज्याचे दूत आपणात सुद्धा शांतीसख्य राखतात. ‘आत्म्याच्या द्वारे घडून येणारे ऐक्य शांतीच्या बंधनाने [ते] राखावयास झटतात.’ (इफिसकर ४:३) सबंध पृथ्वीत सर्वत्र गोंधळ असला तरी ते हे करीत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या आतील व बाहेरील राष्ट्रीय गट हे खरेपणाने “शांतीचा अधिपति” याच्या सरकारविरूद्ध उभे ठाकले आहेत. देवाच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्र संघ हा अवाढव्य जागतिक कट आहे. ते का? कारण देवाने जे हेतू केवळ “शांतीचा अधिपति” याने पूर्ण करावे म्हणून सोपविले आहेत ते आम्हीच पूर्ण करून दाखवू असे दाव्याने तो घोषित करतो. यासाठीच मानवी प्रयत्नानिशी जगव्याप्त सुरक्षिततेची प्रस्थापना होण्यासाठी पाठबळ द्यावे याकरता तो सर्व राष्ट्रातील लोकांना आवाहन देऊन आहे. त्याने १९८६ हे वर्षसुद्धा ‘आंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष’ घोषित केले होते. अशाप्रकारे तो स्वतः “शांतीचा अधिपति” व यहोवा देवाने त्याच्यासोबत सार्वकालिक राज्याचा जो करार केला आहे त्याच्या विरूद्ध कटाच्या भूमिकेत उभे आहोत असे दाखवितो.
१४. यहोवा व त्याच्या राज्य कराराविरूद्ध असणाऱ्या सर्वांना यशया संदेष्ट्याने कशी ताकीद दिली?
१४ या सारख्याच कारणासाठी आहाज राजा व त्याच्या प्रजाजनाने अश्शुरच्या जागतिक साम्राज्यासोबत तह करून शांती व सुरक्षितता मिळवू नये असे यशया संदेष्ट्याने त्यांना बजावले होते. हा इशारा यशया ८:९, १० मध्ये आढळतो. हा संदेष्टा काव्यमय भाषेत यहोवा व त्याच्या राज्य कराराविरूद्ध असणाऱ्या सर्वाना अशी ताकीद देतो: “अहो राष्ट्रांनो, दंगल करा, पण तुमचा चुराडा होईल. पृथ्वीच्या दूरच्या देशांनो, कान देऊन ऐका: तुम्ही आपली कमर बांधा, पण तुमचा चुराडा होईल. मसलत करा पण ती निष्फळ होईल. विचार प्रगट करा, पण तो टिकणार नाही; कारण आमच्या सन्निध देव आहे!”
१५. आहाज राजाच्या काळी कटाच्या बाबतीत जे प्रदर्शित झाले ते पाहता आज राज्यकराराविरूद्ध असणाऱ्या कटाचे काय होईल?
१५ तर या जगाचा अधिपति दियाबल सैतान याच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या राष्ट्रांना राज्याचा करार व त्याचा बादशाही वारस व शासनकर्ता यांजविरूद्ध कट आखू द्या. हा कट आहाज राजाच्या दिवसातील कटाप्रमाणे उधळून लावण्यात येईल. अरामाचा राजा रेझिन व इस्राएलाचा राजा पेका यांनी सेनाधीश यहोवाचे भय न धरता त्याच्या राज्याच्या कराराविरूद्ध कट उभा केला. त्यांचा हा कट उधळला गेला. याचप्रमाणे यहुदाचा आहाज राजाने यहोवाची भीती न धरता अश्शुरच्या जागतिक साम्राज्यासोबत कटात हातमिळवणी केली. त्यामुळे आहाजाचे भले झाले नाही व त्याला शांती आणि सुरक्षितता मिळू शकली नाही. त्यामुळे त्याजवर दैन्यावस्था व कैद आली. यापेक्षा अधिक वाईट ते हे की आहाजने यहोवाची मर्जी गमावली.
१६. राज्य कराराविरूद्ध रचण्यात आलेला अश्शुरी कट यहोवाने कसा हाणून पाडला, व हे आज आमच्या काळी कशाची पडछाया आहे?
१६ आहाजाच्या मृत्युनंतर त्याचा पुत्र हिज्किया याच्या काळी सेनाधीश यहोवाने राज्य कराराविरूद्ध अश्शुरने केलेला कट उधळून लावला. यहोवाच्या दिव्यदूताने १,८५,००० अश्शुरी सैनिकांचा संहार केल्यावर अश्शुरच्या राजाला यहुदाच्या देशातून माघार घ्यावी लागली. शत्रूला यरूशलेम शहराविरूद्ध एकही बाण सोडता आला नाही. (यशया ३७:३३–३६) अशाच प्रकारे, यहोवाचा राज्य करार आणि “शांतीचा अधिपति” याविरूद्ध केलेल्या जागतिक कटाचाहि नक्कीच पराजय घडणार, कारण देव त्याच्या इम्मानुएल अधिपति व त्याचा मुक्तकंठाने जयघोष करणाऱ्यांच्या बाजूने आहे!
यहोवाच्या विश्वव्याप्त सार्वभौमत्वाच्या बाजूने निर्भयपणे उभे राहणे
१७. (अ) लवकरच राजकीय घटक मोठ्या बाबेलास काय करतील, तेव्हा यहोवाच्या लोकांना कशाची गरज असणार व काय मिळेल? (ब) मोठ्या बाबेलास उद्ध्वस्त केल्यानंतर निरिश्वरवादी अधिपति काय करतील व त्यामुळे यहोवा कोणती हालचाल करण्यास पुढे सरसावेल?
१७ लवकरच राजकीय घटक आपले प्रयत्न केवळ ख्रिस्तीधर्मराज्याचा नव्हे तर सबंध मोठ्या बाबेल विरूद्ध, खोट्या धर्माचे सबंध जागतिक साम्राज्य याचे अस्तित्वच नाहीसे करण्याच्या कामी लावतील. त्या विशिष्ठ कठीण समयी यहोवाच्या लोकांची इश्वरी सुरक्षा एका अभूतपूर्व मार्गी सामोरी दिसण्यास हवी. मोठ्या बाबेलवर प्राप्त झालेल्या विजयाने उत्स्फुर्त होऊन ते निरिश्वरवादी अधिपति येशू ख्रिस्तामार्फतच्या देवाच्या सरकारच्या अधीन असणाऱ्या सर्वावर क्रुरपणे हल्ला करण्यासाठी सरसावतील. त्यावेळी यहोवा आपल्या ‘शांतीच्या अधिपति’ला “सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी” आरंभ करण्यास संकेत दईल. (प्रकटीकरण १६:१४) येशू ख्रिस्त हा अजिंक्य योद्धा व त्याचे सरकार उन्नत असल्याचे सिद्ध होईल. तो स्वतः विजयी सर्वसमर्थ देव यहोवा याच्या वर्चस्वाखालील “समर्थ देव” असल्याचे सिद्ध होईल. हर्मगिद्दोनातील विजय प्राप्ती मुळे हा “समर्थ देव” आपल्या अति हुषार कामगिरीचा कळस गाठील व त्या कृत्याचे पडसाद चिरकालीन भविष्यात कधीही मंद होणार नाही. त्या अतुल्य विजयाचा सर्वानी जयजयकार करावा!
१८. राज्य कराराविरूद्ध आधुनिक काळी रचण्यात आलेल्या कटाच्या सम्मुख यहोवाच्या साक्षीदारांचा काय करण्याचा निश्चय आहे व त्याचा कोणता परिणाम दिसेल?
१८ तर मग, अहो, तुम्ही सर्व यहोवाचे साक्षीदारहो, तुमचा देव आणि त्याचा राज्यकर्ता राजा “शांतीचा अधिपति” यावर आपला पूर्ण भाव ठेवून पूर्वी नव्हता इतक्या प्रखरतेने जगात सामोऱ्या येणाऱ्या गोष्टीकडे वाटचाल करा! सध्याच्या जागतिक कटासमोर निर्भिडता व्यक्त करीत राहा. राज्याचा संदेश त्याप्रमाणे हर्मगिद्दोनात त्याला जागतिक कटावर मिळणारा विजय याविषयी सर्वत्र घोषणा करीत असता तुम्ही सर्वजण यहोवाच्या सन्मानार्थ चिन्हे व अद्र्भिते बना. जेव्हा दियाबल जागतिक शासनकर्त्यांना आम्हाविरूद्ध चाल करायला प्रवृत्त करील तेव्हा हे ध्यानात ठेवा की जे इम्मानुएल, “शांतीचा अधिपति” याच्या राज्याच्या बाजूस खरे व विश्वासू असतील अशांनाच विजय प्राप्त होईल; कारण त्यावेळी “आमच्या सन्निध देव” असणार! (मत्तय १:२३; पडताळा यशया ८:१०) त्यावेळी स्वर्गातील सर्व दिव्यदूत आणि पृथ्वीवर सचोटी राखणारी सबंध मानवजात, यहोवाने स्वर्ग व पृथ्वीवर निर्माण केलेल्या सर्व गोष्टींवरील त्याच्या सार्वभौमत्वाच्या विजयास्तव “आमेन” म्हणो, कारण तेथून पुढे सुरक्षितता कायमची अबाधित राहणार! (w87 4/1)
[तळटीपा]
a येशू ख्रिस्ताची “सनातन पिता” या अर्थी असणाऱ्या भूमिकेच्या सविस्तर माहितीसाठी वल्डवाईड सेक्युरिटि अंडर द “प्रिन्स ऑफ पीस” या वॉचटॉवर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील २०वा अध्याय पहा.
सारांशासाठी प्रश्न
◻ येशू ख्रिस्ताला “समर्थ देव” ही पदवी कशी लागू होते?
◻ येशू “अद्र्भित मंत्री” या अर्थी कशी सेवा करीत आलेला आहे?
◻ कोणाचे पितृत्व आम्ही स्विकारावे व कोणाचे नाकरावे?
◻ संयुक्त राष्ट्र संघ खरे पाहता काय आहे?
◻ राज्य कराराविरूद्ध व त्याचा वारस “शांतीचा अधिपति” याच्या विरूद्ध आजच्या काळी रचण्यात आलेल्या कटाचे काय होणार?
[२२, २३ पानांवरील चित्रं]
विश्वाचा सार्वभौम प्रभू याच्या शांतीप्रिय उपासनेत सबंध विश्व ऐक्याने एकवटले जाईल