येशूचे जीवन व उपाध्यपण
येशू परुश्यांचा निषेध करतो
येशू हा दुरात्म्यांच्या बळाने भूते काढतो हा जो दावा मांडण्यात आला त्याविषयी उत्तर देताना येशू म्हणतो की, जर असे आहे तर मग सैतानामध्ये फूट पडली आहे. तो पुढे म्हणतोः “झाड चांगले व त्याचे फळ चांगले असे तुम्ही लोक म्हणता, झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणता; कारण फळावरुन झाड कळते.”
भूते काढण्याच्या कामात प्राप्त होणारे चांगले फळ हे येशू सैतानाची सेवा करतो म्हणून प्राप्त आहे असे म्हणणे केवढ्या मूर्खतेतील आहे. फळ चांगले आहे तर झाड वाईट असू शकत नाही. उलटपक्षी, परुश्यांचे वाईट फळ म्हणजे येशूवर असमंजसपणे दोष लावणे आणि बिनबुडाचा विरोध करणे हे एक प्रमाण होते की ते स्वतः वाईट होते. “अहो सापाच्या पिलांनो,” येशू मोठ्याने गरजतो, “तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण जे अंतःकरणात भरुन गेले आहे तेच मुखावाटे निघणार.”
आम्ही उच्चारलेले शब्द आमच्या अंतःकरणाची स्थिती प्रदर्शित करीत असल्यामुळे आम्ही जे काही बोलतो ते न्याय करण्यास आधार पुरविते. “मी तुम्हास सांगतो,” येशू म्हणतो, “मनुष्ये जो प्रत्येक व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यास न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरुन निर्दोष ठरशील आणि आपल्या बोलण्यावरुन सदोष ठरशील.”
येशूने एवढी सर्व अद्भूत कृत्ये केलेली आहेत तरीही सदूकी व परुशी त्याला विनवितातः “गुरुजी, आपल्या हातून झालेले चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.” यरुशलेमातील या प्रतिष्ठित लोकांनी कदाचित प्रत्यक्षात त्याचे अद्भूत चमत्कार पाहिलेले नसतील, तरी ते प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेले आणि ते खोटे असेल असे म्हणू न शकणारे साक्षी उपस्थित होते. या कारणास्तव येशू त्या यहुदी नेत्यांना स्पष्ट म्हणतोः “दुष्ट व व्यभिचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा या चिन्हावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही.”
हे सांगण्यामध्ये त्याचा काय अर्थ होता याविषयी स्पष्टीकरण करण्यात तो पुढे म्हणतोः “जसा योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.” माशाने गिळून घेतल्यावर योना बाहेर, जणू पुनरुत्थितासमान, आला. तसेच येशूने भाकित केले की, तो मरणार व तिसऱ्या दिवशी परत उठेल. तरीपण, प्रत्यक्षात येशूचे नंतर पुनरुत्थान घडले तेव्हाही यहुदी नेत्यांनी “योनाचे चिन्ह” स्पष्टपणे नाकारले.
यासाठीच येशू म्हणतो की, योनाच्या उपदेशामुळे ज्या निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला ते पुनरुत्थानसमयी उठून, ज्या यहुद्यांनी येशूला धिक्कारले त्यांना दोषी ठरवितील. याचप्रमाणे तो शिबाची राणी हिजविषयीचे उदाहरण घेऊन बोलतो. ती शलमोनाचे शहाणपण व ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली होती व जे काही तिने पाहिले व ऐकले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. या गोष्टीची तुलना साधण्यात येशू म्हणतोः “पहा, शलमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे.”
मग येशू अशा एका मनुष्याचा दृष्टांत देतो ज्याच्यामधून दुरात्मा बाहेर निघतो. हा मनुष्य, ती पोकळी चांगल्या गोष्टींनी भरत नाही, यामुळेच त्यात अधिक सात दुरात्मे येऊन वस्ती करतात. “तसेच या दुष्ट पिढीचेही होईल,” असे येशू म्हणतो. इस्राएल राष्ट्राला शुद्ध करण्यात आले होते व त्यांनी दुरात्मा जसा तात्कालिक निघून जातो तशी सुधारणा अनुभविली होती. पण त्या राष्ट्राने देवाकडील संदेष्ट्यांना नाकारण्यात व सरतेशेवटी स्वतः ख्रिस्तालाही विरोध करण्यात जी वृत्ती प्रदर्शित केली त्याकरवी आपली दुष्ट स्थिती सुरवातीपेक्षा अधिक दयनीय बनली आहे हे उघड केले.
येशू बोलता असता त्याची आई, भाऊ येतात व जमावाच्या मागे उभे राहतात. हे पाहून कोणीतरी म्हणतेः “पहा, आपली आई व आपले भाऊ आपल्याबरोबर बोलावयाची संधि पहात बाहेर उभे राहिले आहेत.”
“माझी आई कोण? व माझे भाऊ कोण?” असे येशू विचारतो. आपला हात शिष्यांकडे करुन तो म्हणतोः “पाहा, माझी आई व माझे भाऊ! कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई.” याद्वारे येशू हे दाखवितो की, नातेवाईकांसोबत असणारे संबंध कितीही प्रिय असले तरीही त्याचे आपल्या शिष्यांसोबत असणारे संबंध अधिक प्रिय आहेत. मत्तय १२:३३-५०; मार्क ३:३१-३५; लूक ८:१९-२१.
◆ परुश्यांना झाड व फळ या दोहोंना चांगले बनविण्यात कशी असमर्थता लाभली?
◆ “योनाचे चिन्ह” काय होते व ते कसे नाकारण्यात आले?
◆ इस्राएल राष्ट्र हे, ज्या माणसातून दुरात्मा बाहेर निघाला त्याच्यासारखे कसे होते?
◆ येशूने आपल्या शिष्यांबरोबरील त्याच्या अति निकटच्या संबंधावर कसा जोर दिला?