यहोवावरील भाव वाढवा त्याच्या वचनाचा परिश्रमी अभ्यास करण्याद्वारे
“ज्या गोष्टी आज मी तुम्हाला इशारेवजा सांगत आहे त्या सर्व आपल्या अंतःकरणी लावा . . . ही बाब तुमच्या दृष्टीने निरर्थक नसावी, कारण हीच तुमचे जीवन होय.”—अनुवाद ३२:४६, ४७, न्यू.व.
१, २. (अ) मवाबाच्या तळवटीसमोर डेऱ्यात असताना इस्राएलांपुढे कोणते भवितव्य समोर होते? (ब) मोशाने राष्ट्राला कोणता बोध केला?
अरण्यातील त्यांचे दीर्घ मुदतीचे प्रयाण आता संपण्याच्या बेतात आले होते. आता फक्त वळण घेत जाणारी यार्देन नदी ही त्या राष्ट्राला बऱ्याच काळापासून वाट पाहिलेल्या वचनयुक्त देशापासून वेगळे ठेवून होती. तथापि, त्या राष्ट्राचा पुढारी, मोशे याजमध्ये, राष्ट्राने त्या देशात प्रवेश करणे या गोष्टीने चिंतन उभे केले. त्याला आठवले की, त्या राष्ट्राने एकदा यहोवावरील भावविषयक उणीव प्रदर्शिंत केली होती व त्यामुळेच त्याला कनानमध्ये प्रवेश मिळण्याला मज्जाव घालण्यात आला होता.—गणना १३:२५-१४:३०.
२ यासाठीच मोशेने राष्ट्राला मवाबाच्या तळवटीवर एकत्र केले. सुरवातीला त्याने राष्ट्राच्या इतिहासाची उजळणी केली व देवाच्या नियमशास्त्राची परत माहिती दिली व यानंतर त्याने जे सांगितले त्याला त्याचे उत्कृष्ट काव्य म्हणता येईल. त्याने श्रेष्ठ पद्यात इस्राएलांना यहोवावर भाव ठेवण्यास व त्याच्या आज्ञा पाळून चालण्यास आर्जविले. तो म्हणाला की, यहोवा हा “विश्वसनीय देव आहे. त्याच्या ठायी अनीती नाही, तो न्यायी व सरळ देव आहे.” समारोपात मोशाने पुन्हा आवर्जून म्हटलेः “ज्या गोष्टी आज मी तुम्हाला इशारेवजा सांगत आहे त्या सर्व आपल्या अंतःकरणी लावा, ह्या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपर्वूक पाळण्याची तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा. ही बाब तुमच्या दृष्टीने निरर्थक नसावी, कारण हीच तुमचे जीवन होय.”—अनुवाद ३२:४, ४६, ४७, न्यू.व.
देवाच्या वचनाला ‘आपल्या अंतःकरणी लावणे’
३, ४. (अ) इस्राएलांनी काय ‘आपल्या अंतःकरणी लावायचे’ होते? (ब) नंतरच्या पिढ्यांनी मोशेच्या सूचनांचा कसा अवलंब केला?
३ मोशाने इस्राएलांना केवळ त्याच्या थरारक गाण्याचे शब्दच नव्हे तर सबंध पवित्र लिखाणाला ‘आपल्या अंतःकरणी लाव’ण्यास सांगितले. त्यांनी देवाच्या वचनाकडे “चांगले लक्ष द्यावयाचे” होते (नॉक्स), ते “मानण्याची खात्री करायची” होती (टुडेज इंग्लिश व्हर्शन), किंवा त्याचे “मनन करायचे” होते (द लिविंग बायबल). देवाच्या नियमाशी पूर्णपणे परिचित झाल्यावरच त्यांना ‘या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याची आज्ञा आपल्या मुलांना देता’ येऊ शकत होती. अनुवाद ६:६-८ मध्ये मोशाने लिहिलेः “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या ह्रदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव . . . त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव.”
४ या शब्दांचे प्रतिपादन नंतरच्या काळी “यहुद्यांनी अक्षरशः [कसे] केले” ते सांगून पवित्र शास्त्र भाष्यकार डब्ल्यू. एच. दवे म्हणतातः “त्यात दिलेल्या मार्गदर्शनाचा त्यांनी अंधश्रद्धेसाठी वापर केला. काही वचनांचे . . . चर्मपत्रावर लिखाण केले गेले व ती चर्मपत्रे प्रार्थनेच्या वेळी ते हाताला व कपाळाला बांधू लागले.” येशूच्या काळी शास्त्रवचने नमूद असणाऱ्या पेट्या किंवा मंत्रपत्रे घालण्याची प्रथा रुढ झाली आणि आजही काही यहुदी पंथात या गोष्टी आचरल्या जातात. (मत्तय २३:५) पण, दवे पुढे म्हणतातः “नियमशास्त्राच्या शब्दांची नक्कल आपल्यासोबत वागविण्याचे समाधान पुरुषांना वाटू लागले. त्यात लिहिलेल्या आज्ञांचे अवलंबन आपल्या जीवनात दाखविण्यापेक्षा असे करणे त्यांना बरे वाटू लागले.”
५. मोशाने अनुवाद ६:६-८ मध्ये लिहिलेल्या वचनांचा योग्य अवलंब कोणता होता?
५ पण खरे पाहता, देवाच्या नियमाने खरोखरीच्या हातावर किंवा कपाळावर नव्हे तर ‘त्यांच्या अंतःकरणी’ वास्तव्य करायचे होते. त्याविषयीचे केवळ ज्ञान नव्हे तर त्याविषयी वाटणारी गाढ रसिकता ही त्यांना जणू डोळ्याला प्रत्यक्ष दिसते वा हाताशी असते त्याप्रमाणे देवाचे नियम वाटणार होते.
देवाचे नियम शिकून घेण्याविषयी करण्यात आलेल्या तरतूदी
६, ७. (अ) मोशेच्या नियमशास्त्राशी इस्राएल लोकांनी परिचित व्हावे यासाठी यहोवाने त्यांना कोणत्या तरतुदी पुरविल्या? (ब) प्राचीन काळी देवाच्या लोकांना देववचनातून शिक्षण मिळणे देखील कसे शक्य झाले असावे?
६ नियमशास्त्रातील सुमारे ६०० नियम इस्राएलांना कसे शिकता येणार होते? सुरवातीला याच्या खूप कमी प्रती होत्या हे खरे. पण इस्राएलाच्या नंतरच्या राजांनी “नियमशास्त्राची एक नक्कल . . . एका वहीत स्वतःसाठी उतरुन घ्यावी, . . . आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे” असे सांगण्यात आले. याकरवीच, “त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधि पाळून व त्याप्रमाणे आचरुन [ते] आपला देव यहोवा ह्याचे भय बाळगावयाला” शिकणार होते. (अनुवाद १७:१८, १९) याचप्रमाणे, देवाने दर सातव्या वर्षी, मंडपाच्या सणाच्या वेळी नियमशास्त्राचे वाचन व्हावे हा नियम लावून दिला. (अनुवाद ३१:१०-१३) असे हे प्रसंग उभारणीकारक निश्चये होते, पण ते ज्ञानाची खोली प्रकटविण्यासाठी फारच तुरळक होते.
७ यासाठीच, यहोवाने आणखी एक व्यवस्था लावून दिली, व ती ही होती की, लेव्याच्या वंशातील लोकांनी ‘याकोबाला देवाचे न्यायी निर्णय आणि इस्राएलाला त्याचे नियमशास्त्र शिकवावे.’ (अनुवाद ३३:८, १०; पडताळा मलाखी २:७.) काही प्रसंगी, लेव्यांनी शैक्षणिक मोहीमा काढल्या ज्यामुळे ते सबंध राष्ट्रभर फिरु शकले. (२ इतिहास १७:७-९; नेहम्या ८:७-९) असे दिसते की, काही काळात देववचनाचा काही भाग सर्वसाधारण लोकांना मिळू शकला.a यासाठीच स्तोत्रकर्ता हे लिहू शकलाः “जो पुरुष . . . यहोवाच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे अहोरात्र मनन करतो, तो धन्य.” (स्तोत्रसंहिता १:१, २) अशाप्रकारे, ‘देवाचे वचन आपल्या अंतःकरणी लावा’ हा मोशाने केलेला बोध, पवित्र शास्त्राचा परिश्रमी अभ्यास करावा या आज्ञेच्या समतुल्य ठरला.
देवाचे वचन आज ‘आपल्या अंतःकरणी लावणे’
८. मोशेच्या बोधाचा इस्राएलांनी कितपत स्वीकार केला आणि याचा काय परिणाम झाला?
८ परंतु, इस्राएलांनी मोशाने केलेला बोध ऐकण्यात अपयश दर्शविले. राष्ट्रामध्ये बादशाही राजवट सुरु झाली तेव्हा बहुतेक सर्व राजांनी ‘नियमशास्त्राची एक नक्कल स्वतः लिहून तिचे जन्मभर पठण करावे’ यात अपयश दाखविले. इ.स.पूर्वीच्या सातव्या शतकात योशीया राजाच्या काळापर्यंत “नियमशास्त्राचा ग्रंथ” जवळजवळ सापडतच नव्हता. (२ राजे २२:८-१३) राष्ट्राच्या पुढाऱ्यांनी आपले जे दीन उदाहरण राखले त्यामुळेच सबंध राष्ट्र धर्मत्यागी स्थितीत गुरफटले. मोशाने आधी इशारा दिला होता त्याप्रमाणे या राष्ट्राला इ.स.पू. ६०७ मध्ये विनाश मिळाला.—अनुवाद २८:१५-३७; ३२:२३-३५.
९. ख्रिस्तीजनांची आजची स्थिती प्राचीन इस्राएलांसारखीच कशी आहे?
९ प्राचीन इस्राएलांप्रमाणे आज, ख्रिस्तीजन एका वचनयुक्त देशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत व तो आहे, देवाचे नवीन नीतीमान जग. (२ पेत्र ३:१३) पृथ्वीच्या क्षितिजावर या घटना घडण्याचे अंधूकपणे दिसत आहेः ‘शांती व निर्भयते’ची घोषणा, “मोठी बाबेल” हिचे पतन, ‘गोग व मागोग’चा हल्ला. या घटना, यहोवावरील आमचा भाव कसोटीस लावतील. तेव्हा आपण आत्ताच ‘देवाचे वचन आपल्या अंतःकरणी लावावे’ हे तातडीचे आहे!—१ थेस्सलनीकाकर ५:३; प्रकटीकरण, अध्याय १८; यहेज्केल, अध्याय ३८.
१०. काहीजण व्यक्तीगत अभ्यासात का मंदावतात?
१० पण हे सध्याच्या ‘कठीण दिवसात’ खरे आव्हान ठरु शकते. (२ तीमथ्य ३:१) प्रापंचिक नोकरी, मुलांचा संभाळ, शाळा, व मंडळीच्या जबाबदाऱ्या या गोष्टी आमचा बहुतेक वेळ घेतात. यामुळे कदाचित आम्हाला वाटू लागेल की, आमचा पवित्र शास्त्राचा अभ्यास झाला नाही तरी चालेल. ‘आम्ही करतो तेवढे पुरे आहे,’ अशी सबब कदाचित आपल्याला सांगावीशी वाटेल. तरीपण, पवित्र शास्त्र ख्रिस्तीजनांना बजावतेः “ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्यात गढून जा.” (१ तीमथ्य ४:१५, १६) आम्ही हे का करावे याविषयीच्या काही प्रबळ कारणांचा विचार करु या.
देवासोबत आमचे नाते दृढ करणे
११, १२. (अ) देवाचे अधिक जवळून ज्ञान प्राप्त करण्याचा ईयोबावर कसा परिणाम झाला? (ब) ईयोबाच्या काळापेक्षा आज आम्हाला देवाविषयीचा दृष्टांत अधिक स्पष्ट का असू शकतो?
११ ईयोब हा ‘देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा’ गृहस्थ होता. पण जेव्हा यहोवाने त्याला वावटळीतून प्रकट केले, तेव्हा ईयोब म्हणू शकलाः “मी तुजविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे.” (ईयोब १:१; ४२:५) आज आम्ही देखील देवाला “पाहू” शकतो का, म्हणजे त्याची नुसती ओळख नव्हे तर, त्यापलिकडे जाऊन त्याच्या व्यक्तीत्वाची विविध शैली अधिक जवळून ज्ञात करु शकतो का? होय, निश्चितपणे. पवित्र शास्त्राच्या पृष्ठांद्वारे यहोवाने स्वतःला, ईयोबापेक्षा अधिक असे प्रकटविले आहे.
१२ देवाच्या प्रेमाची खोली आज आपल्याला चांगली कळू लागली आहे, ती ही की, त्याने “जगावर एवढी प्रीती केली की त्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला.” (योहान ३:१६) पवित्र शास्त्राच्या भविष्यवादांकरवी आपल्याला देवाच्या कार्याच्या रुपरेषा समजतात—हजार वर्षींय राजवटीच्या अंतापर्यंत! (प्रकटीकरण, अध्याय १८-२२) देवाने ख्रिस्ती मंडळीशी कसे दळणवळण ठेवले त्याचा हा अहवाल आज आपल्यापाशी आहेः त्याने विदेश्यांना पाचारण केले, आपल्या लोकांची भरवणूक करण्यासाठी “विश्वासू व बुद्धीमान दास” याची नियुक्ती केली, पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाल जगण्याच्या आशेसाठी “मोठा लोकसमुदाय” याला सामोरे आणले. (मत्तय २४:४५; प्रकटीकरण ७:९, १४-१७; इफिसकर ३:३-६) देवाच्या गहन गोष्टी न्याहाळून बघितल्या आणि आमच्यासाठी त्याने केलेल्या गोष्टींचा मनःपूर्वक विचार केल्यावर आपल्याला न रहावता हेच म्हणावेसे वाटेलः “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे!”—रोमकर ११:३३.
१३. आम्ही ‘देवाचा शोध [कसा] घेऊ शकतो’, आणि यामुळे कोणते लाभ घडतात?
१३ स्तोत्रकर्त्याने म्हटलेः “मी आपल्या अंतःकरणापासून तुझा शोध केला आहे.” हेच आम्ही शास्त्रवचनीय साहित्याचा विचार प्रतिदिवशी करण्यामुळे करु शकतो; याकरवी आमचे यहोवासोबत असलेले नाते अधिक दृढ होईल. परिश्रमी अभ्यास आम्हाला ‘देवाचे नियम पाळण्यासाठी आमची वागणूक व्यवस्थित करण्यासाठी’ मोठी मदत देईल.—स्तोत्रसंहिता ११९:५, १०.
अभ्यास आम्हाला विश्वासाचे समर्थन करण्यास मदत देतो
१४. आमच्या ख्रिस्ती आशेविषयी ‘उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असण्या’विषयीचे महत्त्व विदारण करुन सांगा.
१४ घानामध्ये दोन साक्षीदार कार्य करीत असता एका घरमालकाने त्यांना म्हटलेः “माझ्या घरी तुम्ही साक्षीदार येऊ नका!” साक्षीदार “रक्त संक्रमण घेत नाहीत आणि राष्ट्रीय ध्वजास वंदन करीत नाही” म्हणून तो साक्षीदारांना अपमानकारक रितीने बोलला. असे हे आक्षेप क्षेत्र कार्यात सर्वसाधारणपणे येतात. अशावेळी, “तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास . . . सिद्ध” नसले तर ते किती अपमानकारक व लाजेचे वाटेल बरे! (१ पेत्र ३:१५) त्या दोन साक्षीदारांनी पवित्र शास्त्राचा प्रभावीपणे वापर करुन ख्रिश्चनांचा रक्ताविषयीचा योग्य दृष्टीकोन कसा असावा आणि त्याला मूर्तिपूजा टाळता येऊन राष्ट्रीय प्रतिकांस योग्य आदर दाखविण्यात समतोल कसा राखता येईल याचे प्रतिपादन केले. याचा काय परिणाम दिसला? त्यांच्या सरळ उत्तरामुळे घरमालकावर मोठी छाप पडली. आज हा घरमालक व त्याची बायको, दोघेही बाप्तिस्मा घेतलेले यहोवाचे साक्षीदार आहेत.
१५. वैयक्तीक अभ्यास आम्हाला आमच्या उपाध्यपणासाठी कसा तयार करतो?
१५ पौलाने आर्जविलेः “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.” वैयक्तीक अभ्यास आम्हाला जीवनाच्या मार्गावर राहण्यासाठीच नव्हे तर इतरांनाही याकरता मदत देता यावी म्हणून “पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होण्या”साठी सहाय्य करील.—२ तीमथ्य २:१५; ३:१७.
सैतानाच्या पाशांचा प्रतिकार करणे
१६. यहोवाच्या लोकांपुढे येणारे सैतानाचे काही पाश कोणते आहेत?
१६ आज, जाहिरातबाजी ही “देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराची फुशारकी” यांना उद्दीप्त करते. (१ योहान २:१६) लैंगिक अनैतिकतेला कामगार सोबती व शाळकरी मित्रांमार्फत विविध माध्यमाने जोरदारपणे चालना दिली जात आहे. क्षोभकारक धर्मत्यागी साहित्य कोणतेही अनुदान न घेता आमच्या घरी येऊ शकते. त्यांच्याविषयी कुतुहुल बाळगून काही बांधवांनी ते भ्रष्ट साहित्य वाचले—आणि परिणाम, आपल्या विश्वासाची नासाडी केली. यासोबत, ‘आज्ञाभंजक लोकात स्वार्थी व दैहिक स्वरुपाचा आत्मा कार्य करीत आहे.’ अशाकरवी संसर्गित होऊन नकारात्मक व टीकाखोर आत्मा बळावून घेणे हे किती सहजपणे घडते बरे!—इफिसकर २:२.
१७, १८. वैयक्तीक अभ्यास आम्हाला ‘वाहवत जाण्या’पासून कसे दूर ठेवू शकतो?
१७ अर्थातच, फारच थोडे सैतानाच्या या पाशात अडकतात. असे हे लोक वैयक्तीक अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, दोरखंडाला न बांधलेल्या नदीतील त्या बोटीसारखे ‘वाहवत जातात’ आणि सैतानाकरवी हल्ला होण्याचे मुख्य निशाण बनतात. (इब्रीयांस २:१) उदाहरणार्थ, एक तरुण बांधव आपल्या शाळेतील एका तरुण मुलीसोबत अनैतिक आचारात गुरफटला. “याला मुख्य कारण म्हणजे,” तो म्हणतो, “मी आध्यात्मिक रितीने उपासमारीत आहे हे मला आढळले. मी व्यक्तीगत अभ्यास केला नाही, आणि यामुळेच मला मोहाचा प्रतिकार करता आला नाही.” तथापि, त्याने त्यानंतर व्यक्तीगत अभ्यासाचा कार्यक्रम पाळला व यामुळे या बांधवाला आध्यात्मिकरित्या सबळ होण्यास मदत मिळाली.
१८ जमेल तितक्या देवाच्या लोकांचा नाश घडवून आणावा हा सैतानाचा निश्चय आहे. देवाचे वचन तसेच त्याचा विश्वासू कारभारी याजमार्फत मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींनी आम्ही आपले मन नित्याने भरवीत राहिल्यास आम्ही स्वतः पाशात गुरफटण्याचे टाळू शकू. (फिलिप्पैकर ४:८) जडवाद, लैंगिक अनैतिकता, धर्मत्यागी विचारसरणी आणि नकारात्मक स्वरुपाचा आत्मा या गोष्टी टाळाव्या याविषयीचे स्मरण आम्हाला पवित्र शास्त्र व वॉचटावर संस्थेच्या प्रकाशनात मुबलकपणे आढळते. आम्ही वाजवीपेक्षा अधिक लक्ष खरोखरी दिले तर आम्ही कधीच वाहवत जाणार नाही.
यहोवाच्या संस्थेकडील तरतुदी आम्हास मदत देतात
१९. आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या आमच्या गरजेविषयी कुशी षंढाने कोणती गोष्ट स्पष्ट केली?
१९ अभ्यास हे कठीण काम आहे. यासाठी यहोवाची संस्था आम्हाला बरीच मदत करते याविषयी आम्ही आपली कृतज्ञता व्यक्त करु शकतो. अलिकडच्या काळात काहींनी प्रतिपादिले आहे की, काही विशिष्टांना पवित्र शास्त्राचा स्वतः उलगडा करण्याची अनुमति मिळावी. पण तेच, कुशी षंढाने आध्यात्मिक मार्गदर्शन मिळण्याची आपल्याला किती गरज आहे हे स्पष्ट केले. यहुदी धर्मात मतपरिवर्तित झाल्यामुळे त्याला पवित्र शास्त्राविषयी निःसंशये बरेच ज्ञान असावे. खरे म्हणजे यशयाच्या ५३ व्या अध्यायासारखा गहन विषय त्याने अभ्यासाला घ्यावा यामुळे ते दिसून येते. पण जेव्हा, जे वाचले जात आहे ते कळते का अशी विचारणा त्याला केली गेली तेव्हा त्याने कबूल केलेः “कोणी मार्ग दाखविल्यावाचून मला कसे कळणार?”—प्रे. कृत्ये ८:२६-३३.
२०. (अ) पवित्र शास्त्राच्या आमच्या व्यक्तीगत अभ्यासात आम्हाला मदत मिळावी याकरता यहोवाच्या संस्थेने कोणत्या तरतुदी पुरविल्या आहेत? (ब) अशा या तरतुदींविषयी तुम्हाला काय वाटते?
२० यहोवाच्या लोकांना आज देखील आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज आहे. आध्यात्मिक विषयासंबंधाने “सारखेच बोलणे” करण्याची बाब येते तेव्हा ते यहोवाच्या संस्थेने देऊ केलेल्या मदतीचे स्वागतच करतात. ही केवढी थोर मदत आहे! (१ करिंथकर १:१०) आम्हाला वॉचटावर व अवेक! या मासिकातून माहितीचा ओघ नित्याने येत असतो. शिवाय पवित्र शास्त्राची बहुव्यापक माहिती पुरविणारी अगणित प्रकाशने व माहितीपत्रके आहेत. इंग्रजी वाचता येणाऱ्या आमच्या वाचकांसाठी १९३०-१९८५ चा वॉचटावर पब्लिकेशन इंडेक्स तर वरदानच ठरला आहे. हे असे साहित्य आहे जे एखाद्यास ‘चांदी व गुप्त खजिन्याप्रमाणे सूज्ञानास मिळविण्यासाठी’ मदत देतात.—नीतीसूत्रे २:२-४.
२१. (अ) प्रेषित पौलाने व्यक्तीगत अभ्यासाविषयी कसा रस दाखवला? (ब) व्यक्तीगत अभ्यास करता येण्यासाठी कोणते प्रस्ताव सुचविण्यात आले आहेत?
२१ अभ्यास व संशोधनासाठी संस्थेच्या प्रकाशनांचा वापर करुन तुम्ही त्याचा पूर्ण फायदा मिळवीत आहात का? किंवा ही प्रकाशने तुमच्या घरी फडताळावरील आकर्षक सजावट म्हणून दिसतात? पौलाने एकदा तीमथ्याला रोमला येताना “पुस्तके, विशेषेकरुन चर्मपत्रेही आण” अशी सूचना केली. ही चर्मपत्रे म्हणजे इब्री शास्त्रवचनांचा काही भाग असावा हे उघड दिसते. (२ तीमथ्य ४:१३) ती चर्मपत्रे अभ्यास व संशोधनासाठी आपल्याजवळ असावीत अशी त्याची इच्छा असावी. तुम्हापाशी अद्याप ईश्वरशासित प्रकाशनांचे ग्रंथालय नसल्यास त्याची जमवाजमव करण्यास आत्ताच सुरवात का करु नये, ज्यामुळे तुम्हालाही संशोधन करण्यास सुलभ जाईल? ही प्रकाशने हातास मिळण्याजोगी, व्यवस्थीत, नीट व स्वच्छ ठेवा. शांत व भरपूर प्रकाश असणारी जागा अभ्यासासाठी निवडा. व्यक्तीगत अभ्यासासाठी नियमित वेळेची आयोजना करा.
२२. ‘देवाचे वचन आपल्या अंतःकरणी लावा’ ही आज्ञा पूर्वीपेक्षा आज अधिक महत्वाची का आहे?
२२ मवाबाच्या समुद्ध तळवटीवर वसाहतीस असलेल्या इस्राएलांप्रमाणेच आम्ही आता नवीन जगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. पूर्वी नव्हता इतक्या परिश्रमाने आपल्याला देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची, तसेच अभ्यासासाठी ‘संधि साधून घेण्यासाठी’ आणि याकरता दूरदर्शनवरील कार्यक्रमांना बघत राहण्याच्या इतर आस्थांचा त्याग करण्याची ही निकडीची वेळ आहे. (इफिसकर ५:१६) “वचनास अनुलक्षून असणाऱ्या निऱ्या दुधाची इच्छा धरा,” असे पेत्र बजावून सांगतो, ते अशासाठी की, “वृद्धी व्हावी”, नुसती प्रौढतेप्रत नव्हे तर “तारणासाठी.” (१ पेत्र २:२; पडताळा इब्रीयांस ५:१२-१४.) आमचे जीवन यात गोवलेले आहे. याकरताच वैयक्तीक अभ्यास करण्याचे लांबणीवर टाकण्याची कसलीही प्रवृत्ती टाळा. अभ्यासाद्वारे देवासंबंधाने आपली प्रीती अधिक गाढ होते व त्याच्यावरील आपला भाव वाढतो व यामुळे त्याने आम्हाला मदत देण्यासाठी योजिलेल्या संस्थेविषयी आपली रसिकता बळावते हे लक्षात घ्या. होय, देवाच्या वचनाकडे ‘आपले अंतःकरण लावा,’ त्याचा परिश्रमी व नियमित अभ्यास करा. ‘ही बाब तुमच्या दृष्टीने निरर्थक नाही; कारण हीच तुमचे जीवन होय.’
[तळटीपा]
a पवित्र शास्त्रीय काळी, तुटलेल्या मातीच्या भांड्यांचे तुकडे यांना लिखाणाचे स्वस्त साहित्य या नात्याने सर्वसाधारण वापरले जाई. द इन्टरनॅशनल स्टँडर्ड बायबल एनसाक्लोपिडिआ (१९८६) म्हणतोः “हे साधन गरीब लोक देखील वापरीत; त्यांना लिखाणाचे दुसरे साहित्य परवडण्याजोगे नव्हते.” प्राचीन काळातील इस्राएल लोक पवित्र शास्त्रातील वचने लिहिण्यासाठी या साहित्याचा केवढा वापर करीत ते ज्ञात नाही. तरीपण हे मनोवेधक आहे की, इ.स. च्या सातव्या शतकात शास्त्रवचनांचे लिखाण केलेले मातीच्या भांड्यांचे तुकडे मिसरमध्ये संशोधनात आढळले; याकरवी, सर्वसाधारण लोकांना सुद्धा पवित्र शास्त्राच्या काही भागाचा परामर्श घेता येत होता हे स्पष्ट दिसते.
उजळणीचे मुद्दे
◻ मोशाने इस्राएलांना ‘देवाचे वचन आपल्या अंतःकरणी लावा’ असे का बजावले, व हे त्यांनी कसे करायचे होते?
◻ व्यक्तीगत अभ्यास देवाबरोबरील आमचे नाते कसे दृढ करतो आणि आमच्या विश्वासाचे समर्थन करण्यासाठी कशी मदत देतो?
◻ सैतानाकरवीच्या मोहांना प्रतिकार करण्यासाठी व्यक्तीगत अभ्यास कोणती भूमिका पार पाडतो?
◻ देवाच्या वचनाच्या अभ्यासात आम्हाला अधिक चालना मिळावी यासाठी यहोवाच्या संस्थेने कोणत्या तरतुदी पुरविल्या आहेत?
[१२ पानांवरील चित्रं]
देवाचे वचन आपल्या अंतःकरणावर कोरण्याऐवजी यहुद्यांनी शास्त्रवचने असणाऱ्या पट्टया आपल्यावर बांधून घेतल्या