माझ्या अपेक्षांपेक्षा मला खूप काही मिळालं
विल्लेम व्हान सेइल यांच्याद्वारे कथित
वर्ष होतं १९४२ चं. दुसरं महायुद्ध सुरू होतं. आमचा देशही त्यात गोवला होता. नेदरलंडच्या ग्रोनीनजेन शहरात नात्सी लोकांपासून आम्ही पाच मुलं लपून बसलो होतो. एका लहानशा खोलीत बसून आमच्या बचावण्याची किती शक्यता आहे यावर आमच्यात चर्चा चालली होती.
आमच्यापैकी एकाने सुचवले की, कोणकोणत्या मार्गांनी आपण मरू शकतो त्याची आपण एक यादी बनवू या. आमची यादी तर फारच लांबली; तशी आमच्या वाचण्याची आशाही मालवली. आणि तसंच घडलं, आमच्यापैकी तीन जण अत्यंत हिंसकरित्या मारले गेले. खरं तर, मीच एकटा म्हातारा होईपर्यंत जिवंत राहिलोय. पण माझ्या अपेक्षांपेक्षा खूप मिळण्याची ही काही एक घटना नाही.
वर सांगितलेला प्रसंग घडला तेव्हा मी फक्त १९ वर्षांचा होतो; बायबल किंवा धर्माविषयी मला फारशी माहिती नव्हती. खरं तर, माझे बाबा सगळ्याच धर्मांच्या विरोधात होते. आईनं धर्माचा पुष्कळ शोध केला आणि शेवटी ती मंत्रतंत्र करू लागली. मला तर काही आशाच नव्हती. मला वाटायचं की, एखाद्या बॉम्ब हल्ल्यात किंवा आणखी इतर मार्गाने मी मेलो तर देव मला आठवणीतही ठेवणार नाही. कारण मी तर त्याच्याविषयी शिकण्याचा प्रयत्नसुद्धा केला नव्हता.
माझ्या श्रमाला फळ मिळालं
आमच्या पाच जणांमध्ये ती चर्चा झाल्यानंतर काही दिवसांनीच मी नात्सींच्या तावडीत सापडलो. ते मला जर्मनीत एमरिकजवळच्या एका मजुरीच्या छावणीत घेऊन गेले. दोस्त राष्ट्रांनी बॉम्ब हल्ले केल्यानंतर जिकडं तिकडं जमा होणारे दगड-विटांचे ढिगारे काढणं आणि काही तोडलं मोडलं असेल तर ते दुरुस्त करणं हे आमचं काम होतं. १९४३ सालाच्या शेवटी मी तिथून निसटून पळालो; युद्ध चालूच होतं; तशातच मी कसाबसा नेदरलंडला पुन्हा परतलो.
मला अशीच एकदा एक लहानशी पुस्तिका मिळाली; त्या पुस्तिकेत फक्त प्रश्नं आणि बायबलमधली शास्त्रवचनं दिली होती. ती पुस्तिका, यहोवाच्या साक्षीदारांनी छापलेल्या तारण (इंग्रजी) या पुस्तकाच्या अभ्यासासाठी वापरली जात होती. त्यातले प्रश्न वाचून आणि शास्त्रवचनं पाहून बायबलच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेविषयी जाणून घेण्यासाठी माझी जिज्ञासा खूपच वाढली.
माझं लग्न जिच्याबरोबर होणार होतं तिचं नाव होतं ख्रे; तिला मी याविषयी सांगितलं. पण सुरवातीला तिनं इतकी आस्था दाखवली नाही. आई मात्र काही केल्या ती पुस्तिका सोडेना. “याच सत्याचा शोध मी आयुष्यभर करत होते!” असं ती उद्गारली. मीसुद्धा माझ्या काही मित्रांना या गोष्टींबद्दल सांगितलं. काहींना त्याविषयी आणखी जाणून घ्यायची इच्छा होती. त्यांच्यापैकी एक तर साक्षीदार बनला; आता अलीकडेच १९९६ मध्ये त्याचा मृत्यू झाला. पण तोपर्यंत आम्ही एकमेकांना पत्रं लिहीत होतो आणि भेटतही होतो.
नंतर मग, ख्रे बायबलचा अभ्यास करू लागली आणि फेब्रुवारी १९४५ मध्ये आम्हा दोघांचाही बाप्तिस्मा झाला. त्यानंतर काही महिन्यांनी युद्ध संपलं. आमचं लग्न झाल्यानंतर आम्हाला पायनियर व्हायचं होतं—यहोवाच्या पूर्ण वेळेच्या सेवकांना पायनियर म्हणतात. पण आमच्यासमोर पुष्कळ अडचणी होत्या; आजारपण होतं, पैशांची तंगी होती. तसंच आम्हाला भरपूर पैसा कमवण्याची अनेकदा संधीही मिळाली. पण यांपैकी कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावं ते आम्हाला ठरवावं लागलं. आधी काम करून पैशांची चणचण दूर करायचं ठरवलं की सरळ पायनियरींगला सुरवात करायचं ठरवलं?
नेदरलंड येथील आमची सेवा
आम्ही सरळ पायनियरींगमध्ये शिरण्याचा निर्णय घेतला आणि सप्टेंबर १, १९४५ साली आम्ही पायनियरींगला सुरवात केली. त्याच दिवशी रात्रीच्या वेळी मी घरी येत असताना एका हॉटेलात काहीतरी थंड प्यायला गेलो. मी वेटरला एक गल्डनची नोट समजून एक नोट दिली आणि त्याला म्हटलं: “सुटे पैसे ठेव.” घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं की मी त्याला १०० गल्डनची नोट देऊन बसलो होतो! मग काय, आमच्याजवळ फक्त एक गल्डन उरले आणि आम्हाला तर पायनियरींग करायची होती!
मी १९४६ मध्ये बायबलवर आधारित जाहीर भाषणे देऊ लागलो तेव्हा माझ्याजवळ फक्त एकच लेदरचं जॅकेट होतं. माझा एक मित्र चेअरमन असायचा. तेव्हा माझ्या भाषणाचा विषय वगैरे सांगून पटकन मागे येऊन मला जॅकेट काढून द्यायचा. मग ते जॅकेट घालून मी भाषण द्यायचो. भाषण संपल्यावर मी पटकन मागे येऊन पुन्हा त्याला जॅकेट द्यायचो आणि मग तो स्टेजवर जायचा. अशी आमची गंमत चालायची!
मार्च १९४९ साली, ख्रे आणि मला विभागीय कार्यासाठी आमंत्रण मिळालं अर्थात, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांना भेटी देऊन त्यांना आध्यात्मिकरित्या दृढ करण्याचं हे काम होतं. फ्रिट्स हारस्टांग यांनी मला विभागीय कार्याचं प्रशिक्षण दिलं होतं; युद्ध सुरू होण्याआधी आणि युद्धादरम्यानच्या काळातही त्यांनी विश्वासूपणे सेवा केली होती. त्यांनी मला चांगला सल्ला दिला होता. ते म्हणाले, “विम, यहोवाच्या संघटनेकडून येणारी सगळी निर्देशनं तू पाळत राहा; सुरवातीला तुला ती निर्देशनं आवडली नाहीत तरीही. तुला याचा कधीच पस्तावा होणार नाही.” त्यांचं म्हणणं बरोबरच होतं.
एकोणीशे एकावन्न साली, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे तेव्हाचे अध्यक्ष, नेथन एच. नॉर यांनी नेदरलंडला भेट दिली. त्या वेळी, आम्ही दोघांनी संयुक्त संस्थानांत मिशनरी प्रशिक्षणासाठी नाव दिलं. त्यानंतर लगेचच, आम्हाला वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या २१ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं. आम्ही १९४५ मध्ये पायनियरींग सुरू केली तेव्हा नेदरलंडमध्ये २,००० च्या आसपास साक्षीदार होते; पण १९५३ सालापर्यंत तेथे ७,००० हून जास्त साक्षीदार झाले होते. पुन्हा एकदा आमच्या अपेक्षा फार कमी पडल्या!
नवीन परिसरात सेवा
आम्हा दोघांना डच न्यू गिनीला जाण्याची नेमणूक मिळाली; सध्या हे ठिकाण इंडोनेशियातला एक प्रांत आहे. पण तेथे जायला आम्हाला परवानगी मिळाली नाही तेव्हा आम्हाला सुरीनामला जाण्याची नेमणूक मिळाली; हा दक्षिण अमेरिकेतला ऊष्णकटिबंधीय देश आहे. आम्ही तिथं डिसेंबर १९५५ मध्ये पोचलो. त्या वेळी सुरीनाममध्ये फक्त शंभरच्या आसपास साक्षीदार होते, पण सगळ्यांनी आमची खूप मदत केली. त्यामुळे आम्ही त्या वातावरणात फार लवकर रुळलो.
अर्थात, आम्हाला फार वेगळ्या परिस्थितींशी जुळवून घ्यावं लागलं आणि काहीवेळा हे इतकं सोपं नव्हतं. जसं की, ख्रेला किड्यामुग्यांची फार भीती वाटायची. नेदरलंडमध्ये असताना, तिला आमच्या बेडरूममध्ये छोटासा कोष्टी जरी दिसला तरी मी तो काढल्याशिवाय ती झोपायची नाही. पण सुरीनाममध्ये तर दहा पटीने मोठे कोष्टी आहेत आणि त्यातले काही विषारीसुद्धा आहेत! आमच्या मिशनरी गृहामध्ये झुरळं, उंदीर, मुंग्या, डास आणि नाकतोडे यांची काही कमी नव्हती. सापसुद्धा यायचे. ख्रेला या सर्वांची इतकी सवय होऊन गेलीय की आता त्यांना हुसकणं तिचं नेहमीचच काम झालंय.
इथं आम्ही ४३ वर्षं घालवलीत; इथं जन्मलेल्या लोकांपेक्षा आम्हालाच या देशाची जास्त माहिती झालीय. इथल्या नद्या, पर्जन्यारण्यं आणि किनाऱ्याजवळचे दलदलीचे प्रदेश यांच्या सौंदर्याची कदर आता आम्हाला वाटू लागलीय. इथल्या विपुल प्रमाणातल्या वन्य प्राण्यांशीही आमची चांगली ओळख झालीय—सालस, स्लॉथ, जॅग्युआर आणि हो, वेगवेगळे रंगबेरंगी सापसुद्धा. पण आम्हाला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, इथले वेगवेगळ्या पार्श्वभूमीतले लोक. त्यांच्यापैकी काहींचे पूर्वज आफ्रिका त्याचप्रमाणे भारत, इंडोनेशिया, चीन आणि इतर देशांमधले आहेत. आणि काहीजण अमेरिंडियन लोक आहेत; हे लोक इथल्या मूळ रहिवाशांचे वंशज आहेत.
आमच्या ख्रिस्ती सेवेत, आम्ही लोकांच्या घरी जातो तेव्हा आम्हाला या सर्व पार्श्वभूमीचे लोक भेटतात. आमच्या राज्य सभागृहांमध्येही वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या ख्रिस्ती बंधू-बहिणींना पाहून खूप आनंद वाटतो. १९५३ साली इथं एकच राज्य सभागृह होतं; तेही असंच मोडकंतोडकं. पण आता ३० पेक्षा अधिक आकर्षक राज्य सभागृहं बनलीत, एक सुंदर संमेलन गृह आहे आणि प्रशस्त शाखा दफ्तर आहे; या शाखा दफ्तराचे समर्पण फेब्रुवारी १९९५ साली करण्यात आलं.
खूप काही शिकायला मिळाले
सुरीनामच्या आतल्या भागांमध्ये, जंगलात राहणाऱ्या निग्रो बांधवांच्या पुष्कळ मंडळ्या आहेत; त्यांना बुश निग्रो म्हटले जाते. हे आफ्रिकन गुलामांचे वंशज आहेत. ते आपल्या वसाहतींमधून पळून गेलेले आणि नद्यांच्या उगमांच्या होता होईल तितक्या जवळ जाऊन राहिलेले लोक आहेत. त्यांच्या एकेक करामती, जसं की, वाहतुकीसाठी नदीचा वापर आणि पर्जन्यारण्यांमधलं त्यांचं खडतर जीवन हे पाहून मी थक्क झालोय. ते झाडं कापून, त्यांच्या होड्या बनवतात आणि झरे व नदीच्या जोरदार प्रवाहांमधून त्या हाकतात. शिकार आणि मासेमारी करून ते अन्न शोधतात, कोणत्याही आधुनिक सुविधांविना अन्न शिजवतात आणि अशाच अनेक गोष्टी करतात ज्या आपल्याला जमण्यासारख्या नसतात.
या सबंध वर्षांमध्ये, सुरीनाममध्ये राहणाऱ्या इतर लोकांचाही आम्हाला परिचय झालाय; त्यांच्या परंपरा, त्यांची विचारसरणी, त्यांची जीवनशैली आम्हाला जवळून पाहायला मिळाली. मला आठवतं मी १९५० च्या दशकात एकदा एका अमेरिंडियन गावाला भेट दिली होती. मध्यरात्री मी पर्जन्यारण्यात एकदम दूरवर वसलेल्या एका छावणीत आलो; तिथून पुढचा प्रवास मला एका इंडियन मार्गदर्शकाबरोबर बोटीने करायचा होता. त्यानंच शेकोटी पेटवली, अन्न शिजवलं, झोपण्यासाठी पाळणे बांधले. माझ्यासाठीही हे सगळं करायला त्याला काही वाटलं नाही कारण मला त्या गोष्टी येत नव्हत्या.
मध्यरात्री मी माझ्या पाळण्यातून खाली पडलो, तेव्हा तो बिलकुल हसला नाही. उलट, त्यानं माझे कपडे झटकले आणि माझा पाळणा पुन्हा बांधून दिला. आम्ही रात्रीच्या वेळी एका चिंचोळ्या नदीतून जात होतो तेव्हा इतका काळाकुट्ट अंधार होता की माझे हातही मला दिसत नव्हते, पण तो मात्र वळणांवरून आणि अडथळ्यांना चुकवून बोट एकदम आरामात हाकत होता. त्याला हे कसं जमतं असं मी विचारलं तेव्हा तो म्हणाला: “तुम्ही चुकीच्या दिशेनं पाहताय. वरती पाहा; झाडांमधलं आणि आकाशामधलं अंतर पाहा. त्यावरून कुठं वळण आहे हे कळेल. आणि खाली पाण्यातल्या तरंगांवरून पाण्यात खडक किंवा दुसरे अडथळे आहेत का हे कळेल. आणि लक्षपूर्वक ऐका. आवाजांवरूनही पुढे काय आहे हे कळतं.”
झाडाच्या बुंध्यातून बनवलेल्या बोटींमधून प्रवास करणं, नदीच्या जोरदार प्रवाहांमधून आणि झऱ्यांमधून पार होणं हा अत्यंत धोक्याचा आणि शिणवणारा प्रवास असतो. पण हा सगळा प्रवास केल्यावर आपली वाट पाहत थांबलेल्या ख्रिस्ती बंधू बहिणींना भेटायला मिळतं तेव्हा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. ते लोक पाहुण्यांना काही न काहीतरी देतातच—एक वाटीभर सूप असलं तरीही हमखास देतात. मिशनरी जीवन फार आव्हानात्मक आणि कष्टदायक होतं पण निराशादायी मुळीच नाही.
आम्ही कशामुळे टिकलो
आम्ही प्रकृतीनेसुद्धा एकदम हट्टेकट्टे नव्हतो. शिवाय, आमच्या नातेवाईकांकडूनही आम्हाला फारसं प्रोत्साहन मिळालं नाही कारण माझी आई तेवढीच साक्षीदार होती. तरीपण आमच्या जिव्हाळ्याच्या मित्रमैत्रिणींकडून आम्हाला पुरेशी मदत आणि उत्तेजन मिळालं; त्यामुळंच आम्हाला कधी काही कमी पडलं नाही आणि म्हणून आम्ही आमच्या नेमणुकीत टिकून राहिलो. आईनं विशेषकरून खूप प्रोत्साहन दिलं.
आमच्या नेमणुकीत आम्हाला सहा वर्षं झाली तेव्हा आई खूप आजारी पडली. आम्ही तिला शेवटचं एकदा पाहून घ्यावं असं आमच्या मित्रमैत्रिणींना वाटत होतं, पण आईनं मला पत्र लिहिलं: “तुमचं काम सोडून इथं येऊ नका. मी आजारी नाही असाच विचार करा. पुनरुत्थानात तुम्हाला भेटेन अशी आशा करते.” माझ्या आईचा विश्वास एकदम भक्कम होता.
यानंतर आम्ही १९६६ सालीच नेदरलंडला सुटीसाठी जाऊ शकलो. आमच्या जुन्या मित्रमैत्रिणींना पाहून आनंद वाटला खरा, पण सुरीनाम हेच आमचं खरं घर आहे असं आम्हाला वाटत होतं. म्हणूनच, मिशनऱ्यांनी कमीत कमी तीन वर्षं आपल्या नेमणुकीत घालवल्यानंतरच सुटीला मायदेशी जावं या संस्थेच्या सल्ल्यामध्ये केवढं तथ्य आहे हे यावरून आपल्याला पाहायला मिळतं.
आणखी एका गोष्टीमुळं या नेमणुकीत टिकून राहायला आम्हाला मदत मिळाली. ती गोष्ट आहे विनोदबुद्धी, म्हणजेच हसण्याची क्षमता, स्वतःवरही हसता आलं पाहिजे. ही विनोदबुद्धी यहोवाच्या निर्मितीमध्येही आपल्याला आढळते. चिम्पान्झी आणि ऑटर किंवा कोणत्याही प्राण्याच्या पिल्लांचे नखरे पाहिले तर आपल्याला हसू आल्याशिवाय राहणार नाही. या शिवाय, नेहमी चांगल्या गोष्टींबद्दल विचार करावा आणि स्वतःला फार श्रेष्ठ समजू नये—हे आम्ही इतक्या वर्षांमध्ये शिकलो.
पण सर्वात जास्त, सेवाकार्यातल्या प्रतिफळानं या नेमणुकीत टिकून राहायला आम्हाला मदत केलीय. ख्रेनं पारामारिबो इथं वृद्धाश्रमात नऊ लोकांबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला होता. ते सगळे पुरुष ८० हून जास्त वर्षांचे होते. त्यातला प्रत्येकजण पूर्वी एकतर बलाताब्लिडर (रबर काढणारा) होता नाहीतर सोन्याच्या खाणीत काम करणारा होता. आम्ही त्यांना शिकवलेल्या गोष्टी त्या सगळ्यांना खूप आवडल्या. त्या प्रत्येकाने बाप्तिस्मा घेतला आणि शेवटपर्यंत विश्वासूपणे प्रचारकार्यात सहभाग घेतला.
न्यू चर्च ऑफ स्वीडेनबर्गचे एक प्रचारक होते; त्यांचं नाव होतं रिव्हर्स; ते नेहमी अभ्यासाच्या वेळी सगळं काही ऐकायचे आणि मग टिंगल करायचे. पण प्रत्येक आठवडी ते जरा जवळ येऊन बसू लागले आणि तशीच त्यांची टीकाही कमी कमी होत गेली. शेवटी, तेही सगळ्यांसोबत बसून अभ्यास करू लागले. ते ९२ वर्षांचे होते आणि त्यांना जास्त दिसत नव्हतं आणि ऐकूही येत नव्हतं; पण त्यांना शास्त्रवचनं अशी तोंडपाठ होती की जणू काय ते वाचून दाखवत होते. नंतर ते आमच्याबरोबर सेवाकार्यात भाग घेऊ लागले आणि जे कोणी त्यांचं ऐकेल त्या सर्वांना प्रचार करू लागले. त्यांच्या मृत्यूच्या काही वेळाआधी त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं. आम्ही गेलो तोपर्यंत त्यांनी प्राण सोडला होता; त्यांच्या उशीखाली मात्र आम्हाला त्यांचा त्या महिन्याचा सेवा अहवाल सापडला.
एकोणीशे सत्तरमध्ये, पूर्ण वेळेच्या प्रचार कार्यात २५ हून अधिक वर्षं घालवल्यावर मला सुरीनाम शाखा दफ्तराची पाहणी करण्याचं काम नेमून देण्यात आलं. इतक्या वर्षांनंतर फक्त बसून काम करायचा मला कंटाळ यायचा; ख्रे मात्र दररोज क्षेत्र सेवेत जात होती. मला तिचा हेवा वाटायचा. परंतु, आता ख्रेसुद्धा शाखा दफ्तरातच काम करते, आणि आमच्या या उतारवयात आम्हा दोघांनाही इथं अर्थपूर्ण काम मिळालंय.
एकोणीशे पंचेचाळीस साली सबंध जगभरातल्या १,६०,००० क्रियाशील राज्य घोषकांच्या लहानशा संख्येशी आजच्या सुमारे ६०,००,००० राज्य घोषकांची मी तुलना करतो तेव्हा पुन्हा एकदा माझ्या अपेक्षांपेक्षा काहीतरी वेगळंच घडल्याचं प्रत्ययास येतं. सुरीनाममध्ये तर, १९५५ साली आम्ही आलो होतो तेव्हापासून आतापर्यंत सेवाकार्यात भाग घेणाऱ्यांमध्ये १९ पटीने अधिक वाढ झालीय. आधी साक्षीदारांची संख्या १०० च्या आसपास होती; आता तीच संख्या १,९०० झाली आहे!
भविष्यामध्ये तर यहोवाच्या उद्देशांची आणखी मोठ्या प्रमाणावर पूर्ती होत असलेली आपल्याला पाहायला मिळेल याची मला पूर्ण खात्री वाटते; त्यासाठी फक्त आपल्याला आपल्या देवाला विश्वासू राहायला हवं. आणि तीच आपल्या सर्वांची इच्छा आहे.
[११ पानांवरील चित्र]
सन १९५५ मध्ये, आम्ही सुरीनामला आलो तेव्हा
[१३ पानांवरील चित्र]
आमच्या सेवाकार्यात बोटींचा उपयोग
[१३ पानांवरील चित्र]
माझ्या पत्नीसोबत