युद्धाला अखेरचा प्रणाम
सगळीकडे लोक युद्ध नसलेले जग पाहायला आसुसलेले आहेत. पण हे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. आधीच्या लेखात पाहिल्यानुसार, अनेकांचा विश्वास आहे की, जागतिक शांती केवळ जागतिक सरकाराद्वारे येऊ शकते; असे एक सरकार जे पृथ्वीवरील सर्व लोकांप्रती अपक्षपाती असेल. तथापि, पुष्कळांना हे ठाऊक आहे की, मानवी शासक स्वतःहून आपली सत्ता पृथ्वीवरील सर्वांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एका सरकाराच्या हाती कधीच देणार नाहीत. याचा अर्थ जागतिक सरकार येणे अशक्य आहे का?
तसेच वाटेल. परंतु बायबलमधील भविष्यवाणी दाखवून देते की, लवकरच सबंध पृथ्वीवर सत्ता गाजवणारे एक सरकार पृथ्वीवर शांतीचे राज्य आणील. अर्थात, हे मानवांच्या वाटाघाटींमुळे किंवा आंतरराष्ट्रीय करारांमुळे घडणार नाही. त्याविषयी संदेष्ट्या दानीएलाने प्रेरित होऊन पुढीलप्रमाणे लिहिले: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही.” (तिरपे वळण आमचे.)—दानीएल २:४४.
याच राज्याविषयी येशूने त्याच्या अनुयायांना प्रार्थना करायला सांगितले; प्रभूची प्रार्थना किंवा आमच्या स्वर्गातील पित्या या नावाने कोट्यवधी लोक त्या प्रार्थनेला ओळखतात. कदाचित तुम्हालाही ती प्रार्थना अवगत असेल; बायबलमध्ये मत्तय ६:९, १० येथे ती आढळते. त्या प्रार्थनेत एका ठिकाणी देवाला अशी विनंती केली आहे: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” देव निश्चितच त्या प्रार्थनेला उत्तर देईल. लवकरच देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण करण्यासाठी ते राज्य ‘येईल.’ भूमंडळाचे शांतीच्या नंदनवनात रूपांतर करणे ही देवाची इच्छा आहे.
जागतिक शांतीचे स्वप्न वास्तवात
देवाचे राज्य मानवी राज्यांपेक्षा काही चांगले साध्य करील असा विश्वास करण्यासाठी कारण आहे का? देवाचे राज्य निश्चितपणे आपल्या प्रजेसाठी कायमस्वरूपी शांती कशाप्रकारे स्थापन करील त्याचे आठ मुद्दे पाहा.
१. गौरवलेला येशू ख्रिस्त, “शांतीचा अधिपति” हा त्या राज्याचा देवाकडून नियुक्त असलेला नेता असेल. (यशया ९:६) पृथ्वीवर असताना येशूने दाखवून दिले की, त्याचे सेवक युद्ध करण्यासाठी शस्त्रे हातात घेत नाहीत. उलट, त्याने पेत्राला असे म्हटले होते: “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.”—मत्तय २६:५२.
२. हे राज्य खऱ्या अर्थाने एक जागतिक सरकार असेल. येशूला दिलेल्या अधिकाराबद्दल दानीएलाने असे भाकीत केले: “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली” आहेत.—दानीएल ७:१४.
३. हे राज्य मोजक्यांचेच नव्हे तर सर्व लोकांचे प्रतिनिधीत्व करील. येशूचे सहराजे “सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे” ह्यांमधून असतील आणि “ते पृथ्वीवर राज्य करितील.”—प्रकटीकरण ५:९, १०.
४. देवाच्या राज्याधिकाराला विरोध करणाऱ्या सर्व मानवी सरकारांना देवाचे राज्य नष्ट करील. “ते या सर्व [मानवी] राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.
५. पृथ्वीवरील सर्व लोकांसाठी एकच कायदा असेल. यशयाने त्या समयाविषयी असे भाकीत केले: “सीयोनेतून धर्मशास्त्र व यरुलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल. तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील, देशोदेशींच्या बहुत लोकांचा इन्साफ करील.”—यशया २:३, ४.
६. त्या राज्याची प्रजा शांतीचा मार्ग शिकून घेईल. यशया पुढे म्हणतो: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—यशया २:४.
७. हिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्यांचा नायनाट केला जाईल. “परमेश्वर नीतिमानाला कसास लावितो; त्याला दुर्जनाचा व आततायी माणसाचा वीट येतो. दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील. अग्नि, गंधक व दाहक वारा ह्यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल.”—स्तोत्र ११:५, ६.
८. शस्त्रास्त्रे नष्ट केली जातील. “या, परमेश्वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करितो; तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो; रथ अग्नीत जाळून टाकितो.”—स्तोत्र ४६:८, ९.
देवाच्या अभिवचनांवर भरवसा—का आणि कसा?
देवाच्या राज्याविषयी बायबल आणखी पुष्कळ तपशील देते. उदाहरणार्थ, पृथ्वीवरील कारभार पाहण्यासाठी येशू ख्रिस्तासोबत कोण असेल, या लोकांची निवड कशाप्रकारे होते, त्यांना कोणत्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात याबद्दल ते सांगते. त्याचप्रमाणे, पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये संपन्नता आणि आनंदमय वातावरण निर्माण करण्यासाठी पृथ्वीच्या संपत्तीच्या वाटणीची पाहणी या राज्याकरवी कशी केली जाईल त्याबद्दलही बायबल सांगते; आणि असे केल्यामुळे, युद्धाला कारण ठरणारा द्वेषभाव आणि स्वार्थी वृत्ती राहणार नाही.
या भविष्यवाण्या विश्वासयोग्य आहेत काय? स्वतः यहोवा अशी शाश्वती देतो: “माझ्या मुखातून निघणारे वचन . . . माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.” (यशया ५५:११) वरील शब्दांवरून देव आपले वचन पूर्ण करतो अशी केवळ शाश्वती मिळत नाही. यहोवा सर्वशक्तिमान असल्यामुळे जागतिक शांती प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. एकही गोष्ट अशी नाही जी त्याच्या बुद्धिसामर्थ्यापलिकडे आहे; शांती टिकवण्याचे ज्ञान त्याच्याजवळ आहे. (यशया ४०:१३, १४) शिवाय, यहोवा प्रीतीचे प्रत्यक्ष स्वरूप आहे; त्यामुळे जागतिक शांती आणण्याची त्याला जितकी उत्कट इच्छा आहे तितकी दुसऱ्या कोणालाही नाही.—१ योहान ४:८.
अर्थात, देवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवण्याकरता विश्वासाची गरज आहे. हा विश्वास ज्ञानावर आधारलेला असतो आणि तो देवाचे वचन अर्थात बायबलचा अभ्यास करून विकसित केला जातो. (फिलिप्पैकर १:९, १०) देवाच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि उद्देशांविषयी आपण शिकतो तसे देवाच्या राज्याची सत्यता आपल्याला पटू लागते. होय, युद्ध संपुष्टात आणले जाईल; मानवांच्या प्रयत्नांद्वारे नव्हे, तर ईश्वरी पाठबळ असलेल्या वैभवी जागतिक सरकाराद्वारे अर्थात, देवाच्या राज्याद्वारे.
[८, ९ पानांवरील चित्रं]
देवाच्या राज्याधीन प्रजेला शांतीचे शिक्षण दिले जाईल आणि शस्त्रे नष्ट केली जातील