वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ९/८ पृ. १५-१९
  • हिम वादळ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हिम वादळ
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “सुंदर युद्धक्षेत्र”
  • थोडक्यात टळलेली संकटे
  • एकमेका साहाय्य . . .
  • कोणते धडे शिकायला मिळाले?
  • विनाशादरम्यान साहाय्य पुरवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • समुद्राचे स्फटिकी महाल
    सावध राहा!—१९९६
सावध राहा!—१९९८
g98 ९/८ पृ. १५-१९

हिम वादळ

“देशाच्या इतिहासातली सर्वात भयंकर नैसर्गिक आपत्ती.” या शब्दांत द टोरोंटो स्टार दैनिकाने जानेवारी महिन्यात कॅनडातील ऑन्टारियो, क्विबेक आणि न्यू ब्रुन्सविक या राज्यांत झालेल्या हिम वादळाच्या धुमश्‍चक्रीचे वर्णन केले. अमेरिकेत, राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मेइन आणि न्यू हॅम्पशायर या शहरांना तसेच व्हर्मंट आणि न्यूयॉर्कच्या काही भागांना विपत्तीग्रस्त घोषित केले.

पाच दिवस सतत पडत राहिलेल्या बर्फाळ पावसाच्या या वादळात, जवळजवळ ३५ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. असा हा बर्फाळ पाऊस सहसा दोनचार तासांतच थांबतो, पण सदर वादळात थंड हवेच्या थरावरती उष्ण हवेचा एक थर स्थिरावला होता; त्यामुळे पावसाचे थेंब पडताच गोठायचे. पाहता पाहता, बर्फाचा जवळजवळ आठ सेंटीमीटरचा जाड थर तयार झाला. बर्फाच्या वजनामुळे बरीच झाडे, विजेच्या तारा आणि खांब, तसेच ट्रान्समिशन टावर्स कोसळून भयंकर दुर्घटना घडल्या.

क्विबेक येथे मोठमोठाले पोलादी ट्रान्समिशन टावर्स पत्र्याचे असल्यागत कोसळले. एका घाबरलेल्या माणसाने पुढील वर्णन केले: “माझ्या डोळ्यांदेखत एक [टावर] प्लास्टिकच्या एखाद्या वस्तूसारखे पिळवटले. मग दुमडले, आणि चेंडूसारखे गोळामोळा होऊन अक्षरशः त्याचा चेंदामेंदा झाला. सबंध हायवेवर विजेच्या तारा पडल्या. पहिला पडल्यावर त्याच्यामागचे आणखी तीन कोसळले.”

बर्फ जमा झाल्यामुळे एकंदर १,२०,००० किलोमीटर लांबीच्या तारा तुटून पडल्या, सबंध पृथ्वीला तीन वेळा गुंडाळता येण्याइतक्या! कॅनडात, तब्बल तीन आठवड्यांपर्यंत आणि काही ठिकाणी त्याही पेक्षा जास्त काळ ३० ते ४० लाख लोकांना वीज पुरवठा आणि हवा उबदार करण्याची यंत्रणा उपलब्ध नव्हती.

मेइन येथे २,००,००० लोकांना वीज पुरवठा नव्हता; राज्यपाल ॲन्गस किंग यांनी आणीबाणीची स्थिती घोषित केली. ते म्हणाले, “या राज्यावर इतकी भयंकर विपत्ती कोसळण्याची ही पहिलीच वेळ आहे.” न्यूयॉर्कचे राज्यपाल जॉर्ज पटाकी यांनी “कितीतरी शहरांत अक्षरशः शून्य वीज पुरवठा” असल्याचे सांगितले.

सेंट लॉरेन्स नदीच्या दक्षिण किनाऱ्‍यावरील जवळजवळ ३०,००० लाकडी विजेचे खांब वादळामुळे पडले. न्यूयॉर्कच्या उत्तरेकडे असलेल्या या नदीपासून काही अंतरावर राहणाऱ्‍या जिम केली यांनी १७ तास सतत बर्फाळ पाऊस पडल्यानंतर कळवले: “खिडक्यांबाहेर काहीच दिसत नाही. नुसतेच बर्फाचे लहान तुकडे किंवा धुके नाही, चक्क गोठलेल्या बर्फाचे भले मोठे तुकडे आहेत. घराबाहेरून सर्व बाजूंनी कर्कश्‍श आवाज येताहेत.”

केली यांनी खुलासा करून सांगितले: “दूर गोळीबार सुरू असल्यासारखा आवाज येतोय. धडामदिशी आवाज येतो, मग शांतता! पुन्हा धडाम! पुन्हा शांतता!” नंतर त्यांना कळले की हे आवाज झाडे उन्मळून पडल्यामुळे आणि टेलिफोनचे खांब कोसळल्यामुळे येत होते.

विचित्र गोष्ट म्हणजे एवढा विध्वंस होत असताना, सगळा परिसर अतिशय सुंदर दिसू लागला होता. ओन्टारियोत दोन कोटी मेपल वृक्षे पडल्याची भयशंका व्यक्‍त करण्यात आली; यामुळे मेपल-सिरप उद्योगाला चांगलाच तडाखा बसला. या उद्योगात असणाऱ्‍या एका महिलेने म्हटल्याप्रमाणे, “झाडांऐवजी नुसतीच निष्पर्ण सुळे उरली आहेत.”

“सुंदर युद्धक्षेत्र”

या शब्दांत टोरोंटो स्टार दैनिकातील एका वृत्ताच्या ठळक मथळ्यात, कॅनडाच्या सर्वांत मोठ्या शहरांपैकी दुसऱ्‍या क्रमांकावर असणाऱ्‍या मॉन्ट्रीयल शहराचे वर्णन केले होते. एकाने म्हटले “रस्त्यांवर बॉम्ब पडल्यानंतरचे दृश्‍य आहे!” एकट्या मॉन्ट्रीयल क्षेत्रातच ५० कोटी डॉलरपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा सुरवातीला अंदाज बांधण्यात आला होता.

बेलव्हिल, ओन्टारियो येथे राहणाऱ्‍या एकाने म्हटले: “अणुयुद्ध होऊन गेले आहे असा भास होतो. नजर जाईल तिथपर्यंत प्रत्येक वस्तूवर पांढऱ्‍या धुळीसारखं काहीतरी जमलं आहे; सगळं भयाण दिसतंय.” त्याने याला “भयाण सौंदर्य” म्हटले.

वादळ आल्यानंतरच्या आठवड्यात लाखो लोकांना अद्यापही वीज पुरवठा नव्हता, कडाक्याची थंडी, आणि त्यात पोलिसांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू केले. एका पोलिस अधिकाऱ्‍याने विचारले, “[लोकांना] विनंती करावी की हुकूम सोडावा?”

वरिष्ठ अधिकाऱ्‍याने उत्तर दिले की, “कसेही करून त्यांनी बाहेर पडलेच पाहिजे. पण जरा चतुराईनं.” ते पुढे म्हणाले, “ही तर युद्धासारखीच स्थिती झालीय.”

थोडक्यात टळलेली संकटे

मॉन्ट्रीयलच्या बऱ्‍याच भागांत वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे ट्रॅफिक लाइट्‌स आणि भुयारी रेल्वे निकामी झाली. वादळाच्या शेवटल्या दिवसापर्यंत, शहराला प्रक्षेपण करणाऱ्‍या पाच ट्रान्समिशन स्टेशन्सपैकी चार निकामी झाले होते किंवा कोसळून पडले होते. परिणाम?

क्विबेकचे पंतप्रधान ल्यूस्याँ बूशार यांनी सांगितल्याप्रमाणे “दुपारी आम्हाला सबंध मॉन्ट्रीयल काळोखात बुडण्याची भीती वाटू लागली—शिवाय पाणी देखील नव्हते. दोन केंद्रांवर विद्युतचलित पाणी पुरवठा यंत्रणा बिघडल्यामुळे आणखी केवळ दोन तासच पाणी पुरवठा सुरू राहणार होता.” सगळे लोक मेणबत्त्या वापरणार आणि त्यात पाणी देखील नाही म्हटल्यावर अघटित घटना घडण्याचा धोका मोठा होता.

दोन आठवड्यांनंतर, जानेवारी २४ रोजी मॉन्ट्रीयल येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलन सभागृहात विभागीय संमेलन चालले असताना, तेथे उपस्थित असणाऱ्‍या १,८८९ लोकांवर आणखी एक संकट यायचे टळले. रात्रभरात मॉन्ट्रीयल शहरावर २० सेंटीमीटरपेक्षा जाड बर्फाचा थर जमला होता; संमेलनाचा सकाळचा कार्यक्रम सुरू असताना, सभागृहाच्या भिंतींना आणि सीलींगला नुकसान झाल्याचे आढळले. त्यामुळे दुपारचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि उपस्थितांना विनंती करण्यात आली की त्यांनी घरी जावे, आणि कपडे बदलून काम करण्याकरता संमेलनाच्या ठिकाणी परत यावे.

तासाभरात ३०० स्वयंसेवक फावडे, टिकाव वगैरे घेऊन ते ७,१०० चौरस मीटरच्या छतावरून बर्फ काढण्याच्या कामाला लागले. वरवरचा बर्फ काढल्यावर लक्षात आले की काही ठिकाणी चक्क ६० सेंटीमीटरपेक्षा जाड बर्फ जमला होता! यंत्राच्या साहाय्याने या बर्फाच्या चौकोनी लाद्या कापून छताच्या कडावरून खाली ढकलण्यात आल्या. जवळजवळ १,६०० टन बर्फ अशारितीने काढण्यात आला! नंतर तपासून पाहिल्यावर कळले की बर्फ काढल्यावर सिलींग आणि भिंतींत पडलेल्या फटी आपोआप बंद झाल्या. रविवार सकाळपासून कार्यक्रम सुरळीत पार पडला.

एकमेका साहाय्य . . .

या पावसाच्या आणि गारठ्याच्या काळात काहीजण इतरांच्या संकटातही स्वतःचाच कसा फायदा होईल हे पाहात होते, पण पहिल्या शतकात झाले होते त्याप्रमाणे, बऱ्‍याच जणांनी एकमेकांवर “विशेष उपकार केले.” (प्रेषितांची कृत्ये २८:२) लोकांना मदत करण्यासाठी पुढे आलेल्या यहोवाच्या साक्षीदारांविषयी रोम, न्यूयॉर्कच्या डेली सेन्टिनल दैनिकाने असे वृत्त दिले: “कार्याच्या योजना आखण्यासाठी वॉटरटाऊनच्या राज्य सभागृहात पुरुषांची एक सभा घेण्यात आली आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या सदस्यांच्या घरी जाऊन मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली. पण स्वतःच्या सदस्यांना साहाय्य पुरवण्यासाठी गेलेल्या या लोकांनी त्यांच्या शेजारपाजारच्या लोकांचीही मदत केली.”

या लेखात सांगितल्याप्रमाणे, “ॲडम्झ, पॉट्‌सडॅम, मलोन, ऑग्डन्झबर्ग, प्लॅट्‌सबर्ग, मसीना, गवरनूर आणि एलनबर्ग” या सर्व ठिकाणी असलेल्या लोकांना मदत मिळेल अशारितीने या कार्याचे नियोजन करण्यात आले. काही स्वयंसेवकांनी जेनरेटर्स वापरून घरांना काही तास गरम ठेवले. वादळानंतर बऱ्‍याच ठिकाणी तापमान शून्याखाली गेले होते.

एकदा, पोलिसांनी साक्षीदारांना लोकांच्या घरी जाताना पाहिले आणि ते त्यांना चोर समजले. साक्षीदारांनी आपण काय करत आहोत हे समजावून सांगितल्यावर एका पोलिसाने सांगितले की वादळानंतर मॉन्ट्रीयल येथे राहणाऱ्‍या त्याच्या वडिलांना, ते साक्षीदार नव्हते तरीसुद्धा, यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांना खूप मदत केली होती. या मदतीसाठी त्याने आभार व्यक्‍त केले.

मॉन्ट्रीयलच्या दक्षिणेकडे जवळजवळ १०० शहरांना वादळाचा सर्वात जोरदार तडाखा बसला; ही शहरे असलेल्या प्रदेशाला “अंधाराचा त्रिकोण” म्हणण्यात आले. वादळ येऊन गेल्यानंतर दहा दिवस होऊन गेले तरी शहरांत अजूनही वीजपुरवठा नव्हता. खरे तर, महिनाभर लोकांना वीजपुरवठ्याशिवाय राहावे लागले! टोरोंटोजवळ असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराने या परिसरात राहणाऱ्‍यांना साहाय्य करण्याकरता विशेष भेटी देण्याची व्यवस्था केली. दिव्यांकरता तेल, बॅटऱ्‍या, आणि फ्लॅशलाईट्‌स यांसारख्या आवश्‍यक सामग्री एका ठरलेल्या वाटप केंद्रात पोचत्या करण्यात आल्या आणि मग तेथून गरजू लोकांपर्यंत पोचवण्यात आल्या.

तसेच, या परिसरांत राहणाऱ्‍या लोकांना कशाची आवश्‍यकता आहे हे जाणून घेण्याची जबाबदारी ख्रिस्ती वडिलांवर सोपवण्यात आली. वडिलांच्या एका गटाने एका आठवड्यात ११ मंडळ्यांना भेटी दिल्या आणि बऱ्‍याच प्रोत्साहनपर सभा घेतल्या. या सभांमध्ये आध्यात्मिक प्रोत्साहन मिळाल्यावर कोणाचा तेथून पाय निघत नसे. सगळे जण कितीतरी वेळ तेथेच थांबून, आपापले अनुभव सांगत एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटायचे. खरे तर, वादळानंतरच्या आठवड्यांत सभांमध्ये पूर्वी कधी नव्हती इतकी उपस्थिती नोंदण्यात आली.

ज्यांच्याजवळ लाकडाच्या शेगड्या, किंवा वीज उत्पन्‍न करणारे जेनरेटर होते, त्यांनी हवा उबदार करण्याची कोणतीच सोय ज्यांच्याजवळ नव्हती अशांना आनंदाने आपल्या घरांत येऊन राहण्याचे आमंत्रण दिले. काही साक्षीदारांकडे तर चक्क वीस-वीस लोक राहायला होते. तसेच वीजपुरवठा नसलेल्या क्षेत्राबाहेर राहणाऱ्‍यांनीही आपल्या घरांत लोकांच्या राहण्याची सोय केली. उदाहरणार्थ, ‘अंधाराच्या त्रिकोणापासून’ ८०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्‍या सेटीयल या शहरातल्या साक्षीदारांनी ८५ कुटुंबांची राहण्याची सोय केली.

रिमूस्की यांसारख्या ग्रामीण भागातल्या साक्षीदारांनी लाकूड तोडून ते वेगवेगळ्या ठिकाणी पोचवले. पाठवण्याआधी काहींनी ओंडक्यांवर शास्त्रवचने लिहून काढली. एका साक्षीदाराने आपल्याला मिळालेल्या लाकडांपैकी थोडी आपल्या शेजाऱ्‍याला दिली, जो साक्षीदार नव्हता. त्याला मिळालेल्या एका ओंडक्यावर स्तोत्र ५५:१६ लिहिलेले होते: “परमेश्‍वर [“यहोवा,” NW] मला तारील.” तो ओंडका हातात घेऊन त्याने वर पाहिले आणि म्हणाला: “यहोवा तुझे आभार मानतो.”

कोणते धडे शिकायला मिळाले?

विजेची शक्‍ती किती सहज निकामी होऊ शकते आपण तिच्यावर किती अवलंबून असतो याचा प्रत्यय आल्यावर पुष्कळांना धक्का बसला. एकजण म्हणाला: “नवीन घर बांधताना आणखी काही नसले तरी, एक लाकडी शेगडी, जेनरेटर . . . आणि गॅस स्टोव्हची व्यवस्था मी न चुकता करीन.”

वादळानंतर जवळजवळ सहा आठवड्यांनंतर, एका पत्रकाराने म्हटले: “सगळीकडे बर्फ आणि अंधार होता, आणि टीव्ही नसल्यामुळे विचार करायलाही बराच निवांत वेळ मिळाला.” पुढे त्याने लिहिले: “नैसर्गिक शक्‍तींपुढे आपण किती हतबल आहोत हे पाहून माणूस थक्क होतो.”

या व्यवस्थीकरणाचा नाश केल्यानंतर या सबंध पृथ्वीवर एक आनंदमय परिस्थिती आणण्याच्या परमेश्‍वराच्या अभिवचनावर बायबलचे विद्यार्थी चिंतन करतात. (मत्तय २४:३७-३९; २ पेत्र २:५) देवाच्या शस्त्रागारातल्या शस्त्रांची आठवण करून देताना तो प्रश्‍न करतो: “तू हिमाच्या भांडारांत जाऊन शिरला आहेस काय? तू गारांची भांडारे पाहिली आहेत काय? ती मी संकटसमयासाठी, लढाई व युद्ध यांच्या प्रसंगासाठी राखून ठेविली आहेत.”—ईयोब ३८:२२, २३.

[१६ पानांवरील चित्र]

ट्रान्समिशन टावर्स पत्र्याचे असल्यागत कोसळले

[१७ पानांवरील चित्र]

संमेलन सभागृहाच्या छतावरून स्वयंसेवकांनी बर्फ काढल्यामुळे संकट टळले

[१७ पानांवरील चित्र]

वादळग्रस्तांसाठी लाकूड

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा