जाहिरातबाजीचे सामर्थ्य
बऱ्याच काळापूर्वी, टीव्हीवरच्या जाहिरातीआधी असे म्हटले जायचे, “आता, आमच्या प्रायोजकाचे दोन शब्द.” प्रायोजक म्हणजे, आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी पैसे देणाऱ्या कंपन्या. आजकाल “आमच्या प्रायोजकाचे दोन शब्द” न राहता शब्दांचा भडिमार होत असला, तरी वृत्त आणि मनोरंजनाच्या प्रसार माध्यमांना—टीव्ही, नियतकालिके, वृत्तपत्रे आणि रेडिओ यांना प्रायोजकच आर्थिक मदत पुरवतात. परिणामी, प्रसार माध्यमात काय सादर केले जाईल आणि काय केले जाणार नाही यावर प्रायोजक नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करतात.
उदाहरण द्यायचे झाल्यास: १९९३ साली, एका जर्मन लक्झरी कारचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनीने ३० नियतकालिकांना असा आदेश लिहून पाठवला की, त्यांच्या कारच्या जाहिराती ‘योग्य संपादकीय वातावरणातच’ सादर केल्या जाव्यात. त्या पत्रात पुढे असे स्पष्ट करण्यात आले होते, की ज्या अंकांमध्ये त्यांच्या जाहिराती छापल्या जातील त्या अंकांमध्ये त्यांच्या कारची, जर्मन उत्पादनांची किंवा खुद्द जर्मनीविषयी टीका होईल असे काहीही छापले जाऊ नये. अर्थात, नियतकालिकातल्या जाहिरातींवर १५० लाख डॉलर खर्च करणारी ही कंपनी ‘योग्य संपादकीय वातावरणाची’ अपेक्षा करते यात काहीच आश्चर्य नाही.
त्याचप्रमाणे, नवीन वेडिंग गाऊन्सची जाहिरात करणारी नियतकालिके वापरलेल्या वेडिंग गाऊन्सची जाहिरात देत नाहीत किंवा स्थावर संपत्तीच्या दलालांची नावे देणारी वृत्तपत्रे त्यांच्या मदतीविना घर कसे खरेदी करावे याची माहिती देत नाहीत हे देखील आश्चर्याचे नाही. त्याचप्रमाणे, सिगारेटींची अथवा लॉटरींची जाहिरात करणारी प्रसार माध्यमे धूम्रपानावर किंवा जुगारावर टीका करत नाहीत याचेही आपल्याला नवल वाटू नये.
ग्राहक संस्कृती
यास्तव, जाहिरातबाजीचे सामर्थ्य फक्त उत्पादनांची विक्री करण्यापुरतेच मर्यादित नाही. ती ग्राहकांसाठी एक विशिष्ट जीवनशैली, भौतिक वस्तूंवर केंद्रीत असलेली एक जागतिक संस्कृती ठरवून देते.
त्यात काही गैर आहे का? तुम्ही कोणाला हा प्रश्न विचारता यावर हे निर्भर करते. जाहिरातदारांचे म्हणणे आहे की, लोकांना खेरदी करायला आणि वस्तू जवळ बाळगायला फार आवडते आणि जाहिराती त्यांची मदत करतात. शिवाय, ते म्हणतात, जाहिरातींमुळे नोकऱ्या निर्माण होतात, क्रिडा व कला यांचे प्रायोजन केले जाते, किफायतशीर प्रसार माध्यमे मिळवून दिली जातात, स्पर्धेला उत्तेजन मिळते, उत्पादनांमध्ये सुधार होतो, किंमती कमी राहतात आणि उत्पादनांविषयी माहिती देऊन त्याआधारे लोकांना डोळस निर्णय घ्यायला मदत होते.
इतरांचा असा दावा आहे की, जाहिरातींमुळे लोकांजवळ जे आहे त्यात ते तृप्त नसतात शिवाय त्यांच्या इच्छा वाढतच राहतात. संशोधक ॲलन ड्यूरींग लिहितात: “आपल्या युगाप्रमाणे जाहिराती क्षणिक, चंगळवादी, आदर्शवादी आणि फॅशन-वेड्या आहेत; त्या व्यक्तीची स्तुती करतात, वैयक्तिक समाधानाकरता उपभोग हा शंभर टक्के योग्य आहे असे प्रतिपादन करतात आणि तंत्रज्ञानातील प्रगती भविष्य घडवण्यामागची शक्ती आहे असा दावा करतात.”
तुमच्यावरील प्रभुत्व
जाहिरातींमुळे आपण सध्या जे आहोत आणि आपल्याला जे हवे आहे ते घडवले जाते का? कदाचित. परंतु, तो प्रभाव मोठा आहे की लहान हे इतर प्रभावांवर अवलंबून असते.
बायबल तत्त्वांनी आणि मूल्यांनी आपण मार्गदर्शित झालो, तर भौतिक वस्तू बाळगण्यात काही गैर नाही हे आपण ओळखू. देवानेच तर, अब्राहाम, ईयोब, शलमोन आणि इतरांना अफाट धनसंपत्ती देऊ केली होती.
दुसऱ्या बाजूला पाहता, आपण शास्त्रवचनीय तत्त्वे लागू केली, तर भौतिक वस्तूंच्या अंतहीन शोधात समाधान आणि आनंद मिळवू पाहणाऱ्यांची असंतुष्टी आपल्याला टाळता येईल. “शॉप टिल यू ड्रॉप” (अर्थात, खिसे पार रिकामे होईस्तोवर खरेदी करा) हा बायबलचा संदेश नाही. त्याउलट, ते आपल्याला सांगते:
देवावर भरवसा ठेवा. “प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.”—१ तीमथ्य ६:१७.
तृप्त असा. “आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.”—१ तीमथ्य ६:७, ८.
मर्यादशील असा. “स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मोलवान वस्त्रे ह्यांनी नव्हे, तर देवभक्ति स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभवावे.”—१ तीमथ्य २:९, १०.
ईश्वरी बुद्धी धनसंपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे हे जाणून घ्या. “ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करितो, तो मनुष्य धन्य होय. कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीहि इष्ट वाटणारी वस्तु त्याच्याशी तुल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे; त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत; त्याचे मार्ग आनंदाचे आहेत; त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. जे त्याला धरून राहतात त्यांस ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवितो तो धन्य होय.”—नीतिसूत्रे ३:१३-१८.
देण्याची सवय ठेवा. “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
कोणी म्हणेल की, ही लेखमालाच एकप्रकारची जाहिरात आहे; भौतिक मूल्यांनी आध्यात्मिक मूल्यांना बाजूला सारून देऊ नये या कल्पनेला “उत्तेजन” देणारी जाहिरात. याजशी तुम्ही देखील सहमत असाल यात शंका नाही.
[९ पानांवरील चौकट]
देव राज्याची जाहिरात
एखादा आकर्षक संदेश लोकांपर्यंत पोचवायचा असला, तर सर्वात उत्तम मार्ग कोणता? जाहिराती: सिद्धान्त आणि पद्धती (इंग्रजी) हे पुस्तक असे म्हणते: “एका आदर्श जगात प्रत्येक उत्पादक एकेका ग्राहकासोबत विक्री केल्या जाणाऱ्या उत्पादनाविषयी किंवा सेवेविषयी बोलू शकेल.” खरे ख्रिस्ती तर, सुमारे २,००० वर्षांपासून अशाप्रकारे देवाच्या राज्याची स्वेच्छेने घोषणा करत आहेत. (मत्तय २४:१४; प्रेषितांची कृत्ये २०:२०) अधिकाधिक उद्योगधंदे, लोकांपर्यंत पोचण्यासाठी या मार्गाचा अवलंब का करत नाहीत? ते पुस्तक उत्तरते: “ते अतिशय खर्चीक आहे. सेल्समनच्या भेटींचाच खर्च, प्रत्येक भेटीमागे ६,००० रुपयांपेक्षाही अधिक होऊ शकतो.” पण ख्रिस्ती, स्वयंसेवक या नात्याने देवाच्या राज्याची “जाहिरात” करतात. तो त्यांच्या उपासनेचा एक भाग आहे.
[८ पानांवरील चित्रं]
“शॉप टिल यू ड्रॉप” (अर्थात, खिसे पार रिकामे होईस्तोवर खरेदी करा) हा बायबलचा संदेश नाही