स्त्रिया आणि त्यांच्या कामाची कदर करणे
तीन हजार वर्षांआधी, लमुएल नामक एका मनुष्याने एका सद्गुणी स्त्रीचे अतिसुंदर वर्णन लिहिले. हे बायबलमध्ये नीतिसूत्रे अध्याय ३१ येथे नमूद केले आहे. जिचे गुण त्याने गायिले ती स्त्री निश्चितच कामात दंग असलेली स्त्री होती. ती आपल्या कुटुंबाची काळजी घेई, बाजारात जाऊन खरेदी-विक्री करी, जमिनीची खरेदी-विक्री करी, आपल्या घरच्यांसाठी कपडे बनवी आणि शेतात काम करी.
या स्त्रीकडे दुर्लक्ष केले गेले नाही. “तिची लेकरे उठून तिला आशीर्वादित म्हणतात; तिचा नवराहि तिची प्रशंसा करतो.” अशी पत्नी बहुमोलाची आहे. बायबल म्हणते, “तिचे मोल माणिकांपेक्षा फारच मोठे आहे.”—नीतिसूत्रे ३१:१०-२८, पं.र.भा.
लमुएलाच्या काळापासून आतापर्यंत स्त्रीचे काम आणखीनच क्लिष्ट झाले आहे. त्यांची २० व्या शतकातील भूमिका त्यांच्याकडून पत्नी, माता, नर्स, शिक्षिका, कमावणारी आणि शेतकरीण बनण्याची अपेक्षा करते—आणि तेही सर्वकाही एकाच वेळी. पुष्कळ स्त्रिया पराकोटीचे बलिदान करतात—आपल्या मुलाबाळांना खायला-प्यायला भरपूर मिळेल एवढ्यासाठीच. या सर्व स्त्रिया प्रशंसा आणि स्तुतीच्या योग्य नाहीत का?
कमावत्यांच्या रूपात स्त्रिया
आजकाल, अधिकाधिक स्त्रियांना आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी किंवा कुटुंबातली एकमेव कमावणारी व्यक्ती म्हणून घराबाहेर काम करावे लागते. स्त्रिया आणि जागतिक आर्थिक संकटप्रसंग (इंग्रजी) या पुस्तकातील एका अहवालात असे म्हटले होते: “स्त्रिया केवळ घरातीलच काम करत नाहीत. जगात तुलनेने अशा फारच कमी स्त्रिया आहेत की ज्या ‘केवळ गृहिणी’ असल्याचा दावा करू शकतात.” आणि स्त्रियांचे काम काही थाटामाटाचे नसते. पत्रिकांमध्ये किंवा टीव्हीच्या सोप ओपरांमध्ये स्त्रियांना शानदार ऑफिसमध्ये एक्झेकिटिव्ह म्हणून काम करत असलेले दाखवले जात असले, तरी वास्तविकता सहसा वेगळीच असते. जगातील बहुतांश स्त्रिया तासन्तास राबतात पण त्याचा फारच कमी मोबदला त्यांच्या पदरी पडतो.
कोट्यवधी स्त्रिया शेतावर जाऊन पिकांची लागवड करतात, कुटुंबाच्या लहान मळ्यांची काळजी घेतात किंवा गुरे राखतात. ही मोलमजुरी—जिच्यासाठी सहसा कमी पगार असतो किंवा काहीच पगार नसतो—निम्म्या जगाचे भरणपोषण करते. “आफ्रिकेत, स्त्रिया ७० टक्के पीक काढतात, आशियात ती संख्या ५०-६० टक्के आहे आणि लॅटिन अमेरिकेत ही संख्या ३० टक्के आहे,” असा अहवाल स्त्रिया आणि पर्यावरण (इंग्रजी) हे पुस्तक देते.
स्त्रियांना पगाराची नोकरी असते, तेव्हा सहसा पुरुषांपेक्षा त्यांना कमी पगार मिळतो; त्या केवळ स्त्रिया आहेत म्हणून. हा भेदभाव विशेषकरून त्या वेळी जड जातो जेव्हा एक माता कुटुंबाची एकमेव कमावती व्यक्ती असते—ही भूमिका अधिकाधिक सर्रास होत चालली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालाच्या अंदाजानुसार आफ्रिका, कॅरिबियन आणि लॅटिन अमेरिकेतील ३० ते ५० टक्के घराणी प्रामुख्याने भरणपोषणासाठी स्त्रियांवरच अवलंबून असतात. अधिक विकसित देशांतही बहुतांश स्त्रियांनाच मुख्य कमावत्या व्यक्तीची भूमिका स्वीकारावी लागते.
विकसनशील देशांत ग्रामीण दारिद्र्य सगळीकडे असल्याने ही वहिवाट वेगाने वाढत आहे. आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करायला एखाद्या पतीला कठीण जात असल्यास, नोकरी मिळवण्यासाठी कदाचित जवळपासच्या शहरात किंवा दुसऱ्या देशात जाण्याचे तो ठरवेल. मग कुटुंबाची काळजी घेण्याचे काम पत्नीवर टाकून तो निघून जातो. त्याला सुदैवाने नोकरी मिळालीच तर तो घरी पैसे पाठवतो. पण त्याचे हेतू चांगले असले, तरीही हे सहसा असेच चालू राहत नाही. मागे टाकून गेलेल्या त्याच्या कुटुंबाची परिस्थिती आणखीनच हालाखीची होत जाते आणि त्यांच्या कल्याणाची जबाबदारी साहजिकच आईवर येते.
“दारिद्र्याचे स्त्रीकरण” असे उचित वर्णन केलेल्या या दुष्ट चक्रामुळे, लाखो स्त्रियांवर मोठा बोजा पडतो. “सबंध जगभरात, अंदाजे एक-तृतीयांश घराणी जी स्त्रियांद्वारे चालवली जातात ती पुरुषांद्वारे चालवल्या जाणाऱ्या घराण्यांपेक्षा कितीतरी पटीने गरीब असण्याची शक्यता असते आणि अशा या घराण्यांत भरच पडत आहे,” असे स्त्रिया आणि आरोग्य (इंग्रजी) हे पुस्तक स्पष्ट करते. पण हे कितीही कठीण असले, तरी स्त्रियांना अन्न पुरवणे ही एकच कठीण समस्या नसते.
माता आणि शिक्षिका
एका मातेला आपल्या मुलांच्या भावनिक कल्याणाचीही काळजी घ्यावी लागते. मुलाला प्रेम आणि जिव्हाळा शिकवण्यात तिचा महत्त्वाचा हातभार असतो—या गोष्टी त्याच्या शारीरिक गरजा भागवण्याइतक्याच महत्त्वाच्या असतील. संतुलित प्रौढ बनण्याकरता एका मुलाचे संगोपन होताना उबदार, सुरक्षित अशा वातावरणाची आवश्यकता असते. यातही पुन्हा एकदा आईची भूमिका महत्त्वाची ठरते.
वाढते मूल (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात हेलन बी लिहितात: “एक स्नेही पालक आपल्या मुलाची काळजी घेतो, जिव्हाळा दाखवतो, वारंवार किंवा नेहमीच आपल्या मुलांच्या गरजांकडे सर्वात आधी लक्ष देतो, मुलाच्या कार्यहालचालींमध्ये रस घेतो आणि मुलाच्या भावनांबद्दल संवेदनशीलता आणि समभावना दाखवतो.” ममताळू आईकडून असे प्रेम ज्या मुलांना मिळाले आहे त्यांनी निश्चितच तिची प्रशंसा केली पाहिजे.—नीतिसूत्रे २३:२२.
अंगावर पाजून कित्येक माता आपल्या मुलांचे जन्मापासूनच एका स्नेहपूर्ण वातावरणात संगोपन करत असतात. विशेषतः गरीब घराण्यांमध्ये मातेचे दूध हे तिच्या नवजात बालकासाठी सर्वात मोलवान देणगी असू शकते. (पृष्ठे १०-११ वरील पेटी पाहा.) मनोरंजक गोष्ट अशी की, बायबलमध्ये प्रेषित पौल, थेस्सलनीकातल्या ख्रिश्चनांप्रती असलेल्या जिव्हाळ्याची तुलना ‘आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसोबत’ करतो.—१ थेस्सलनीकाकर २:७, ८.
आपल्या मुलांचे भरणपोषण आणि लालनपालन करण्याव्यतिरिक्त एक माता बहुधा त्यांची प्रमुख शिक्षिका देखील असते. “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको,” असा सल्ला देऊन आपल्या मुलांना शिकवण्यात मातांचा केवढा मोठा वाटा आहे हे बायबल सूचित करते. (नीतिसूत्रे १:८) खासकरून आई किंवा आजीच मुलाला अगदी धीराने बोलायला, चालायला आणि घरातली कामे तसेच इतर पुष्कळ गोष्टी करायला शिकवते.
दयाळुपणाची निकड
स्त्रिया आपल्या कुटुंबांना देऊ शकतात अशी सर्वात मोठी देणगी म्हणजे दयाळुपणा होय. कुटुंबातला कोणी सदस्य आजारी पडतो तेव्हा आई नर्स बनते; परंतु यासोबत ती आपल्या इतरही जबाबदाऱ्या पार पाडत असते. “जगात आरोग्य काळजी ही बहुतांशी स्त्रियाच घेत असतात,” असे स्त्रिया आणि आरोग्य हे पुस्तक म्हणते.
एका आईच्या दयाळुपणामुळे आपल्या मुलांचे पोट भरावे म्हणून ती स्वतः अर्धपोटी राहील. संशोधकांना असे आढळून आले आहे की, काही स्त्रिया कुपोषित असल्या तरी, आपल्याला मिळणारे जेवण पुरेसे आहे असे समजतात. अधिकांश वाटा आपल्या पतीला आणि मुलांना देण्याची त्यांना इतकी सवय लागून जाते की जोपर्यंत त्या काम करू शकतात तोपर्यंत त्या स्वतःला कुपोषित समजत नाहीत.
काहीवेळा एका स्त्रीचे दयाळुपण, स्थानिक पर्यावरणाविषयी तिला वाटणाऱ्या चिंतेत व्यक्त होते. ते पर्यावरण तिला महत्त्वाचे वाटते कारण अनावृष्टी, जमीन पडीक बनणे आणि जंगलतोड यामुळे जमीन निर्धन होते तेव्हा तिलाही त्याचा पीळ बसतो. भारतातल्या एका गावात, लाकडे तोडणारी एक कंपनी जवळपासच्या जंगलातली २,५०० झाडे तोडणार असे तेथील स्त्रियांना कळाले तेव्हा त्या जळफळून उठल्या. ती झाडे त्या स्त्रियांना अन्न, इंधन आणि चारा वगैरेंसाठी आवश्यक होती. लाकडे तोडणारे लोक आले तेव्हा ह्या बायका तेथे हजर होत्या, एकमेकींचे हात धरून त्या सर्वजणी झाडांभोवती घेरा घालून उभ्या होत्या. ‘झाडं तोडायची असतील तर आधी आमची डोकी तुम्हाला छाटावी लागतील,’ असे त्या स्त्रियांनी लाकडे तोडणाऱ्यांना ठामपणे सांगितले. आणि ते जंगल वाचले.
“तिच्या हातांचे फळ तिला द्या”
कमावणारी, माता, शिक्षिका किंवा दयेचा सागर यांपैकी कोणतीही भूमिका एखादी स्त्री पार पाडत असली, तरी ती आणि तिचे कामही आदर आणि मान्यता मिळण्यास पात्र आहे. सद्गुणी स्त्रीची इतकी प्रशंसा करणाऱ्या सुज्ञ पुरुष लमुएलाने स्त्रीच्या कामाची आणि तिच्या सल्ल्याचीही कदर केली. खरे म्हणजे, बायबल स्पष्ट करते की, आपल्या आईकडून मिळालेल्या सूचनेवरच त्याचा संदेश अधिककरून आधारित होता. (नीतिसूत्रे ३१:१) एका प्रामाणिक पत्नीला आणि मातेला गृहीत धरू नये अशी लमुएलाची खात्री पटली होती. “तिच्या हातांचे फळ तिला द्या,” त्याने लिहिले. “तिची कृत्ये तिची प्रशंसा करोत.”—नीतिसूत्रे ३१:३१, पं.र.भा.
तथापि, लमुएलाने हे विचार लिहिले तेव्हा ते फक्त मानवी विचार नव्हते. ते बायबलमध्ये अर्थात देवाच्या वचनात लिहिलेले आहेत. ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आहे.’ (२ तीमथ्य ३:१६) त्या भावनांवरून सर्वशक्तिमान देवाला स्त्रियांविषयी काय वाटते ते प्रकट होते कारण आपल्याला सूचना देण्याकरता हे उतारे देवाने बायबलमध्ये लिहिण्यास प्रेरित केले.
या शिवाय, “[आपल्या स्त्रियांना] मान द्या” असे देवाचे प्रेरित वचन पतींना सांगते. (१ पेत्र ३:७) पुढे इफिसकर ५:३३ येथे पतीला असे सांगण्यात आले आहे: “तुम्हांपैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी.” इतकेच काय तर, इफिसकर ५:२५ म्हणते: “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.” होय, ख्रिस्ताने आपल्या अनुयायांसाठी प्राण देण्याची तयारी दाखवण्याइतपत प्रीती केली. पतींसाठी हे केवढे उत्तम, निःस्वार्थ उदाहरण! शिवाय, येशूने जे दर्जे शिकवले व ज्यांनुरूप स्वतःचे जीवन व्यतीत केले ते देवाच्या दर्जांचे प्रतिबिंब होते की जे आपल्या लाभाकरता बायबलमध्ये नमूद केलेले आहेत.
तरीही, इतक्या ठिकाणी अनेक स्त्रिया काबाडकष्ट करूनही त्यांना त्याचे प्रतिफळ मिळत नाही. आता तरी त्या स्वतःची परिस्थिती कशी सुधारू शकतात? त्याचप्रमाणे, त्यांच्याबद्दल लोकांच्या मनोवृत्ती बदलतील अशी काही शक्यता आहे का? स्त्रियांकरता कोणत्या भावी आशा आहेत?
[१०, ११ पानांवरील चौकट/चित्र]
स्त्रीला आपले जीवन सुधारण्याचे तीन मार्ग
शिक्षण. जगभरात ६० कोटी निरक्षर स्त्रिया आहेत—यांतील अनेकांना कधी शाळेतही जायची संधी मिळालेली नाही. कदाचित तुमचे स्वतःचेच शिक्षण कमी झाले असावे पण याचा अर्थ तुम्ही स्वतःला शिक्षित करू शकत नाही असे नाही. हे सोपे नाही, पण अनेक स्त्रिया असे करण्यात यशस्वी झाल्या आहेत. “प्रौढांना साक्षर होण्याची प्रेरणा देण्यासाठी धार्मिक कारणे महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात,” असे स्पष्टीकरण स्त्रिया आणि साक्षरता (इंग्रजी) हे पुस्तक देते. वाचायला शिकल्यामुळे तुम्हाला स्वतः बायबल वाचण्याचे उत्तम प्रतिफळ लाभू शकते. पण इतरही पुष्कळ लाभ आहेत.
साक्षर आईला केवळ अधिक आर्थिक संधी मिळतात एवढेच नव्हे, तर ती उत्तम आरोग्य सवयींविषयीही शिकून घेऊ शकते. भारतातले केरळ राज्य साक्षरतेच्या लाभांचे स्पष्ट उदाहरण पुरवते. मिळकतीच्या बाबतीत हा प्रदेश सरासरीपेक्षा कमी असला, तरी तेथील ८७ टक्के स्त्रिया साक्षर आहेत. मनोवेधक गोष्ट अशी की, त्याच राज्यात बालमृत्यूचे प्रमाण भारतातील इतर ठिकाणांतील प्रमाणापेक्षा पाच पटीने कमी आहे; सर्वसाधारणपणे, स्त्रिया १५ वर्षे अधिक काळ जगतात; आणि सर्वच्या सर्व मुली शाळेत जातात.
निःसंशये, साक्षर आई आपल्या मुलांमधील शिक्षण क्रियेला प्रेरणा देते—ही काही क्षुल्लक कामगिरी नाही. मुलींचे शिक्षण ही एक उत्तम गुंतवणूक आहे. कौटुंबिक आरोग्य आणि खुद्द स्त्रियांचे जीवन सुधारण्याची शक्ती याशिवाय इतर कशातही नाही, असे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडचे (युनिसेफ) प्रकाशन जगातल्या मुलांची दशा १९९१ (इंग्रजी) म्हणते. लिहिण्या-वाचण्याच्या कौशल्यांमुळे तुम्ही एक उत्तम माता आणि कमावत्या होऊ शकाल यात काहीच शंका नाही.a
आरोग्य. गरोदर असल्यास किंवा बाळाला अंगावर पाजत असल्यास तुम्हाला आई म्हणून स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही तुमचा आहार सुधारू शकता का? आफ्रिका त्याचप्रमाणे आशियाच्या दक्षिण आणि पश्चिम भागातील सुमारे दोन तृतीयांश गरोदर स्त्रियांना वैद्यकीयदृष्ट्या रक्तक्षय झालेला आहे. क्षीण करून टाकण्याशिवाय रक्तक्षयामुळे प्रसूतीच्या वेळेचे धोके वाढतात आणि मलेरियाचा झटका येण्याची संभावना वाढते. मटण किंवा मासे कमी प्रमाणात उपलब्ध असले किंवा महाग असले, तरी अंडी आणि लोहाचे अधिक प्रमाण असलेली फळे आणि भाज्या उपलब्ध असतील. अंधश्रद्धेमुळे सकस आहार घेण्याचे आणि स्थानिक रीतीरिवाजांमुळे कुटुंबाच्या अन्नातील तुमचा वाटा घेण्यास कचरू नका.b
स्तनपान हे तुमच्याकरता त्याचप्रमाणे तुमच्या बाळाकरता देखील उत्तम आहे. अंगावरचे दूध हे स्वस्त, अधिक स्वास्थ्यजन्य आणि इतर कोणत्याही पर्यायापेक्षा अधिक पोषक असते. युनिसेफच्या अंदाजांनुसार मातांनी आपल्या बालकांना पहिल्या चार ते सहा महिन्यांदरम्यान अंगावर पाजले तर दरवर्षी १० लाख बालकांच्या मृत्यूवर अटकाव घालता येऊ शकेल. अर्थात, आईला एखादा संसर्गजन्य रोग असल्यास आणि त्याची लागण स्तनपानाकरवी होत असल्यास बाळाला भरवण्याची दुसरी एखादी सुरक्षित पद्धत वापरावी.
तुम्ही घरात चुलीवर स्वयंपाक करत असल्यास धूर बाहेर जायला जागा आहे याची खात्री करा. “स्वयंपाकाच्या वेळी निर्माण होणाऱ्या धूरात आणि विषारी वायुंमध्ये राहणे हा आज कामासंबंधीचा सर्वात गंभीर आरोग्य धोका आहे,” असा इशारा स्त्रिया आणि आरोग्य हे पुस्तक देते.
कितीही दबाव असला, तरी धूम्रपान करू नका. विकसनशील जगात सगळीकडे होणाऱ्या सिगारेटच्या जाहिराती खास स्त्रियांसाठी केल्या जातात आणि धूम्रपान करणे ही उच्चकुलीन गोष्ट आहे असे त्या पटवण्याचा प्रयत्न करत असतात. यात मुळीच सत्यता नाही. धूम्रपानाची तुमच्या मुलांना बाधा होते आणि त्यामुळे तुमचा मृत्यू ओढवू शकतो. असा अंदाज केला जातो की, सरतेशेवटी एक-चतुर्थांश धूम्रपान करणारे तंबाखूच्या व्यसनामुळे मरण पावतात. शिवाय, तज्ज्ञ असे सावध करतात की, पहिल्या वेळी सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला तंबाखूचे व्यसन लागण्याची जास्त शक्यता असते.
स्वास्थ्य. स्वास्थ्यासंबंधी तुमचे उदाहरण आणि तुमचा सल्ला तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जीवनाच्या वास्तविकता (इंग्रजी) हे प्रकाशन उत्तम स्वास्थ्याकरता खालील मूळ उपाय सुचवते:
मलमूत्राशी कोणताही संपर्क आल्यावर आणि अन्नाला शिवण्याआधी साबणाने व पाण्याने हात धुवा. तुमची मुले जेवणाआधी हात धुतात याची खात्री करा.
स्वच्छतागृहाचा वापर करा, आणि ते स्वच्छ व बंद ठेवा. हे शक्य नसल्यास, घरापासून होता होईल तितक्या दूर शौचास जा, आणि त्यानंतर लवकर मल पुरून टाका.—पडताळा अनुवाद २३:१२, १३.
तुमच्या घराण्यासाठी स्वच्छ पाणी वापरण्याचा प्रयत्न करा. यासाठी, विहिरी झाकून ठेवा आणि पाणी वाहून नेण्यासाठी स्वच्छ भांडी उपयोगात आणा.
तुम्हाला स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यास, पाणी उकळा आणि थंड करून प्या. न उकळलेले पाणी स्वच्छ दिसत असले, तरी ते दूषित असू शकते.
लक्षात ठेवा की न शिजवलेल्या अन्नातून संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. कच्चे खावयाचे अन्नपदार्थ खाण्याआधी नीट धुवून लवकरात लवकर खाण्यात यावेत. इतर अन्नपदार्थ नीट शिजवलेले असावेत, खासकरून मटण आणि कोंबडी.
अन्न स्वच्छ आणि झाकून ठेवा जेणेकरून कीटकांमुळे किंवा प्राण्यांमुळे ते दूषित होणार नाही.
घरातला कचरा एकतर जाळून टाका किंवा पुरा.c
[तळटीपा]
a यहोवाचे साक्षीदार त्यांच्या बायबल प्रशिक्षणाच्या व्यापक कार्यक्रमासोबत मोफत साक्षरतेचे वर्गही आयोजित करतात.
b काही देशांमध्ये, स्त्रियांनी गरोदरपणात मासे, अंडी किंवा कोंबडी खाऊ नये कारण न जन्मलेल्या बालकाला त्याची बाधा होऊ शकते अशी अंधश्रद्धा आहे. काही वेळा रीतीरिवाजांनुसार, स्त्रीला, पुरुषांचे आणि मुलग्यांचे जेवण झाल्यावर उरलेसुरले खावे लागते.
c अधिक तपशीलासाठी एप्रिल ८, १९९५ चे सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठे ६-११ पाहा.
[८ पानांवरील चित्र]
पाश्चिमात्य देशांतील अनेक स्त्रिया ऑफिसमध्ये काम करतात
[९ पानांवरील चित्र]
अनेक स्त्रियांना गच्चाळ परिस्थितींमध्ये काम करावे लागते
[चित्राचे श्रेय]
Godo-Foto
[९ पानांवरील चित्र]
माता घरात शिक्षिका असतात