बायबलचा दृष्टिकोन
ख्रिस्ती ऐक्य, वैविध्यास अनुमती देते का?
ख्रिस्ती मंडळीत ऐक्य अत्यावश्यक आहे. सैद्धान्तिक विश्वासावरील दुमतामुळे तीव्र वादविवाद, कलह आणि वैरभाव उद्भवू शकतो. (प्रेषितांची कृत्ये २३:६-१०) बायबल म्हणते: “देव अव्यवस्था माजविणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे.” (१ करिंथकर १४:३३) यास्तव, ख्रिश्चनांचे बोलणे एकसारखे असावे तसेच त्यांनी एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे असा सल्ला त्यांना दिला गेला आहे.—१ करिंथकर १:१०.
हे शब्द आणि बायबलचे इतर समान उतारे, ख्रिश्चनांना प्रत्येक गोष्टीत काटेकोर साम्यता राखण्याचे उत्तेजन देतात का? (योहान १७:२०-२३; गलतीकर ३:२८) वैयक्तिक व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न येतो तेव्हा बायबलमध्ये वर्णिलेला खरा ख्रिस्ती विश्वास, वैविध्यासंबंधी नापसंती दर्शवितो का? सर्व ख्रिश्चनांनी एक साचेबद्ध जीवन व्यतीत करावे अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते का?
देव वैयक्तिकांना आकर्षितो
काहींचे असे एक ठाम मत आहे, की बायबल हे सर्वसामान्य लोकांना जुलमीरित्या नियंत्रणात ठेवण्याचे केवळ आणखीन एक साधन आहे. हे मान्य आहे, की काही पंथांच्या हाती अनेकदा त्याचा असा दुरुपयोग झाला आहे. पण येशूने, शास्त्रवचनांविषयी व त्यांच्या ईश्वरी लेखकाविषयी रेखाटलेले चित्र अगदी निराळे होते. आपल्या प्रत्येक मनुष्यप्राण्यामध्ये जिवापाड आस्था राखणारा, असे येशूने देवाचे वर्णन केले.
योहान ६:४४ येथे येशूने स्पष्टीकरण दिले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” येथे वापरलेल्या क्रियापदावरून असे सूचित होत नाही, की देव लोकांच्या इच्छेविरुद्ध, त्यांना जबरदस्तीने आपल्याकडे खेचतो. उलटपक्षी, अंतःकरणास उद्दीपित करून देव सौम्यपणे आकर्षितो. एका बायबल विद्वानाने लिहिले त्याप्रमाणे, ‘विश्वास ठेवण्याकडे मनाचा कल असावा म्हणून देवाकडून प्रभावित केले जाते.’ सृष्टीकर्ता, मानवी कुटुंबाला व्यक्तिमत्त्वहीन जनसमूह समजत नाही. तो व्यक्तींना तोलून पाहतो आणि नेमलेल्यांना [योग्य मनोवृत्ती असलेल्यांना] सौम्यपणे आपल्याकडे आकर्षितो.—स्तोत्र ११:५; नीतिसूत्रे २१:२; प्रेषितांची कृत्ये १३:४८.
प्रेषित पौल किती जुळवून घेणारा होता त्याकडे लक्ष द्या. त्याने व्यक्तींच्या खास गरजा ओळखल्या आणि ठराविक राष्ट्रीयत्व व पार्श्वभूमींमध्ये काही दृष्टिकोन एकसारखेच होते हे देखील त्याने मान्य केले. मग त्यानुसार त्याने आपली प्रस्तावना जुळवून घेतली. त्याने लिहिले: “यहूदी लोक मिळविण्यासाठी मी यहूदी लोकांना यहूद्यासारखा झालो. . . . दुर्बळांना मिळविण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे.”—१ करिंथकर ९:२०-२२.
यावरून स्पष्ट होते, की पौलाने लोकांना साचेबद्ध केले नाही किंवा त्या सर्वांशी एकाच प्रकारे व्यवहारही केला नाही. त्याने त्यांना असे प्रोत्साहन दिले: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.” (कलस्सैकर ४:६) होय, एखाद्याला मदत करण्यासाठी पौलाला आणि इतर ख्रिश्चनांना प्रत्येक व्यक्तीचे अनोखेपण ओळखून त्याचा आदर करायचा होता.
देवाचा मूळ उद्देश
व्यक्ती म्हणून एखाद्याचा हा आदर ती व्यक्ती ख्रिस्ती मंडळीचा भाग बनल्यानंतरही शाश्वत असतो. देवाचे लोक, अधिकारपदावर असणाऱ्यांच्या पसंतीखातर, संपूर्ण साम्यता व परिपूर्ण सुसूत्रता असलेल्या संघटनेत आपापले व्यक्तित्त्व गमावून बसत नाहीत. या उलट, ते अफाट वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्त्वांचा आनंद घेतात शिवाय त्यांचे हुन्नर, सवयी व मते देखील निरनिराळी असतात. प्रत्येकाचे व्यक्तित्त्व उपद्व्याप अथवा पिडा असल्याचे समजले जात नाही. ते तर देवाच्या मूळ उद्देशाचा एक भाग आहे.
म्हणून, बायबलमध्ये नीतिमानांसाठी भाकीत केलेल्या नव्या जगात, मानवांमधील परिपूर्णता अफाट विविधतेस अनुमती देईल. (२ पेत्र ३:१३) “परिपूर्णता” या मथळ्याखाली, शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टीa (इंग्रजी) हा बायबलचा विश्वकोश यथोचितपणे पुढील टिपणी करतो: “तथापि, लोक बहुधा गृहित धरतात त्याप्रमाणे, परिपूर्णतेचा अर्थ वैविध्याचा अंत नव्हे. यहोवाच्या ‘परिपूर्ण कृतीची’ (उत्प[त्ति] १:२०-२४; अनु[वाद] ३२:४) फलनिष्पत्ती असलेल्या प्राणी जगात प्रचंड वैविध्य आहे.”
सूक्ष्मदृष्टी पुढे म्हणते: “त्याचप्रमाणे पृथ्वी ग्रहाची परिपूर्णता देखील वैविध्य, निराळेपण किंवा गुणवैधर्म्य यांस अनुरूप नाही; सरळ-जटील, साधे-शोभिवंत, आंबट-गोड, खडबडीत-मऊ, कुरण-रान, डोंगर-दऱ्या अशा सर्वांस ते अनुमती देते. ते, वसंत ऋतूचा प्रारंभिक उत्तेजनात्मक तजेला, उन्हाळ्याची ऊब व त्यासोबतच स्वच्छ निळेशार आकाश, शरद ऋतुचे नयनरम्य रंग, तजेलदार हिमवृष्टीचे सौंदर्य यांस सामावून घेते. (उत्प[त्ति] ८:२२) म्हणूनच, परिपूर्ण मानव एकसारखी व्यक्तिमत्त्वे, हुन्नर व क्षमता असलेले साचेबद्ध लोक नसतील.”
इतरांविषयी चिंता
तथापि, आत्मकेंद्रित बनून आपल्या सभोवतालच्या लोकांकडे डोळेझाक करण्यासंबंधी खरा ख्रिस्ती विश्वास नापसंती दर्शवितो. इतर जण अडखळले जाऊ नयेत म्हणून प्रेषित पौलाने आपल्या जीवनाच्या व वर्तनाच्या प्रत्येक बाबीसंबंधी सावधगिरी बाळगली. करिंथ मंडळीला लिहिलेल्या आपल्या पत्रात त्याने म्हटले: “आम्ही करीत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याहि प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही.” (२ करिंथकर ६:३) कधीकधी, आपल्याला आपल्या वैयक्तिक इच्छाआकाक्षांवर संयम राखून इतरांच्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. उदाहरणार्थ, पौलाने रोममधील ख्रिश्चनांना लिहिले: “मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो किंवा अडखळतो अथवा अशक्त होतो ते न करणे हे चांगले.”—रोमकर १४:२१.
त्याचप्रमाणे आजही, मद्यपानावर संयम राखण्याची समस्या असलेल्या व्यक्तीदेखत एखादी व्यक्ती मद्यपान करणार नाही. (१ करिंथकर १०:२३, २४) समोरील व्यक्तीच्या आवडीनिवडीशी अनुरूप होण्याच्या सक्तीमुळे नव्हे, तर कृपा आणि प्रेमाच्या उदात्त कृत्यांमुळे तो हे करत असतो. “ख्रिस्तानेहि स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही.” येशू एक व्यक्ती होता परंतु, इतरांच्या भावभावनांची हेळसांड करून त्याने आपल्या आवडीनिवडी व्यक्त केल्या नाहीत.—रोमकर १५:३.
पण तरीही, खऱ्या ख्रिस्ती विश्वासाचा सर्वात सुखावह पैलू म्हणजे बायबलमधील मार्गदर्शक सूचनांच्या सीमांतर्गत असलेल्या वैयक्तिक आवडीनिवडी व स्वतंत्रता. बायबल अशी शिकवण देते, की देवाने आपल्याला विभिन्न व अनोखे बनविले आहे. १ करिंथकर २:११ येथे आपण वाचतो: “मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्यावाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे?” आपण होता होईल तितके इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण हे वचन असे सूचित करते, की आपल्या प्रत्येकाचे एक अनोखेपण असून केवळ आपण स्वतः आणि आपला सृष्टीकर्ताच ते समजू शकतो. आपल्यापाशी ‘अंतःकरणातील गुप्त मनुष्यपण’ असते जे आपल्या निवडींवरून प्रकट होते.—१ पेत्र ३:४.
ऐक्य आणि वैविध्य—एक नाजूक संतुलन
ख्रिस्ती संतुलन राखण्यात प्रेषित पौलाने एक उत्तम आदर्श मांडला. ख्रिस्ताचा प्रेषित या नात्याने त्याच्या हातात अधिकाराचे सूत्र असतानाही आपले स्वतःचे मत इतरांवर लादण्यासंबंधी तो दक्ष होता.
उदाहरणार्थ, या अपरिपूर्ण जगात सडे राहण्याच्या फायद्यांविषयी पौलाचे मत अतिशय प्रबल होते. त्याने हे लिहिले तेव्हा तो स्वतःच अविवाहित होता: “अशांना [विवाहितांना] संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील,” आणि “[“विधवा,” NW] तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल.” त्याचे हे शब्द देवाच्या प्रेरित वचनाचे भाग झाले हीच वस्तुस्थिती दाखवून देते, की त्याचे मत काही चुकीचे नव्हते. पण, तरीही त्याने स्पष्टीकरण दिले: “तू लग्न केलेस म्हणून पाप केलेस असे होत नाही.”—१ करिंथकर ७:२८, ४०.
पौलाने पुढील शब्दांत मान्य केले त्यावरून बहुतेक प्रेषित विवाहित असल्याचे स्पष्ट दिसून येते: “इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ व केफा ह्यांच्याप्रमाणे आम्हालाहि एखाद्या ख्रिस्ती बहिणीला लग्नाची पत्नी करून घेऊन तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय?” (१ करिंथकर ९:५) ख्रिश्चनांना माहीत होते, की या बाबतीत पौलापेक्षा वेगळ्या निवडी करूनही ते त्याच्या आदरास पात्र असू शकत होते.
देवाच्या उपासकांना नेहमीच आपल्या अनोख्या व्यक्तिमत्त्वाच्या एकवाक्यतेत आपला विश्वास अभिव्यक्त करण्याची अनुमती मिळाली आहे. खरे तर, देवाने बायबल लेखकांना देखील आपली वैयक्तिक लिखाणशैली वापरण्याची अनुमती दिली. उदाहरणार्थ, नहेम्याने आपला अहवाल प्रथम पुरुष या स्वरूपात मांडला असला तरी तो अतिशय नम्र होता. (नहेम्या ५:६, १९) दुसऱ्या बाजूला पाहता, सभ्यता म्हणून प्रेषित योहानाने आपल्या शुभवर्तमानाच्या अहवालात एकदाही स्वतःच्या नावाचा उल्लेख केला नाही आणि फारच क्वचित स्वतःकडे लक्ष वेधले. देवाने दोन्ही शैली पसंत केल्या आणि त्या बायबलमध्ये जतन करून ठेवल्या आहेत.
सबंध शास्त्रवचनांमध्ये संतुलन व सामंजस्याची अशीच उदाहरणे आढळतात. तर मग स्पष्टच आहे, की ख्रिस्ती ऐक्य, वैविध्यास अनुमती देते. तथापि, आध्यात्मिक गुणांचा अभाव असल्यास विविध पार्श्वभूमी व मतांमुळे फुटी निर्माण होऊ शकतात. (रोमकर १६:१७, १८) परंतु, ‘पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती धारण केल्यास’ आपण इतरांची अनोखी व्यक्तिमत्त्वे स्वीकारून त्यांचा आनंद घेण्यास शिकू या.—कलस्सैकर ३:१४.
“म्हणून देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीहि एकमेकांचा स्वीकार करा,” असे बायबल म्हणते. (रोमकर १५:७) देवाच्या आत्म्याच्या साह्याने ख्रिस्ती लोक ऐक्य राखण्याचे नाजूक संतुलन गाठू शकतात आणि त्याचवेळी मंडळीतील वैविध्यपूर्ण अनोख्या व्यक्तिमत्त्वांचा आनंद लुटू शकतात.
[तळटीप]
a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित
[१४ पानांवरील चित्र]
सृष्टीकर्ता, मानवी कुटुंबाला व्यक्तिमत्त्वहीन जनसमूह समजत नाही
[१५ पानांवरील चित्र]
आपल्या प्रत्येकाचे एक अनोखेपण असून केवळ आपण स्वतः आणि आपला सृष्टीकर्ताच ते समजू शकतो