कोणती गोष्ट तुमचे आरोग्य ठरवते—तुम्ही करू शकता त्या गोष्टी
निवारण कार्यकर्ता, तांदूळ किंवा पीठाप्रमाणे आरोग्याचे वाटप करू शकत नाही. ते पिशवीत मिळत नाही कारण ती वस्तू नसून परिस्थिती आहे. डब्ल्यूएचओ (जागतिक आरोग्य संघटना) अशी व्याख्या देते की, “संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हिताची स्थिती म्हणजे आरोग्य होय.” तथापि, या हिताचे प्रमाण कशावरून ठरवण्यात येते?
एखादे साधे घर फळ्या, खिळे आणि पन्हाळ्या असलेल्या पत्र्याने बांधले जाते, परंतु त्याचे वेगवेगळे भाग बहुधा चार कोपऱ्यातील खांबांनी आधारलेले असतात. त्याचप्रमाणे, आपले आरोग्य अनेक प्रभावांनी आकारण्यात येते, परंतु ते सर्व चार “कोपऱ्यातील” प्रभावांना जोडलेले असते. ते म्हणजे, (१) वागणूक, (२) वातावरण, (३) वैद्यकीय निगा आणि (४) जीवशास्त्रीय घडण. खांबांचा दर्जा वाढवून जसे तुम्ही तुमचे घर बळकट करू शकता त्याचप्रमाणे या प्रभावकारी घटकांचा दर्जा वाढवून तुम्ही आपले आरोग्य सुधारू शकता. तर मग, प्रश्न असा उद्भवतो की, मर्यादित साधनांनी हे कसे शक्य केले जाऊ शकते?
तुमची वागणूक आणि तुमचे आरोग्य
चार घटकांपैकी, तुमची वागणूक सर्वात जास्त तुमच्या ताब्यात आहे. तिला सुधारल्याने मदत होऊ शकते. हे खरे की, तुमचा आहार आणि सवय यामध्ये बदल करण्यास गरिबी मर्यादा घालते, परंतु उपलब्ध असणाऱ्या निवडींचा उपयोग करून तुम्ही पुष्कळ मोठा बदल करू शकता. पुढील उदाहरणाची नोंद घ्या.
बहुधा एखाद्या मातेला आपल्या बाळाला स्तनपान देणे आणि बाटलीने पाजणे यामध्ये निवड करावी लागते. युनायटेड नेशन्स् चिल्ड्रन्स फंड असे म्हणते की स्तनपान, “शारीरिकरित्या आणि आर्थिकरित्या सर्वात उत्तम निवड आहे.” तज्ज्ञ म्हणतात की, मातेचे दूध, “आरोग्याचे परम अन्न आहे.” ते बाळाच्या समतोल वाढीला आवश्यक असणारी “प्रथिने, चरबी, लॅक्टोस, जीवनसत्व, खनिज पदार्थ आणि मौल” यांची अचूक संहती पुरवते. स्तनांतील दूध मातेच्या शरीरातून बाळाच्या शरीरात रोगप्रतिकारक प्रथिने किंवा प्रतिद्रव्ये वाहून नेतात आणि बाळाला रोगांना लढा देण्यास अनुकूल सुरवात देतात.
विशेषतः, अस्वच्छ परिस्थिती असणाऱ्या उष्ण कटिबंधातील प्रदेशांमध्ये, स्तनपान सर्वात उत्तम आहे. बाटलीतील दूधाप्रमाणे, पैसे वाचवण्यासाठी स्तनांचे दूध अति सौम्य केले जाऊ शकत नाही, ते तयार करताना कोणत्याही चुका होऊ शकत नाहीत आणि ते नेहमीच स्वच्छ पात्रातून दिले जाते. याविरुद्ध, आंतरराष्ट्रीय आरोग्याच्या कॅनडीयन संस्थेकडील सीनर्जी हे बातमीपत्र अशी टिपणी करते की, “दरिद्री समाजातील, बाटलीने पाजलेल्या बाळाला, उत्तमरित्या स्तनपान दिलेल्या बाळापेक्षा जवळजवळ १५ पटीने अतिसाराचा रोग आणि चार पटीने न्यूमोनियाने दगावण्याची अधिक शक्यता असते.”
त्यानंतर आर्थिक लाभ आहे. विकसनशील जगात दूधाची पावडर महाग आहे. उदाहरणार्थ, ब्राझीलमध्ये बाळाला बाटलीने पाजण्यामध्ये एखाद्या गरीब कुटुंबाच्या महिन्याच्या मिळकतीचा एक पंचमांश भाग खर्च होऊ शकतो. स्तनपानामुळे वाचलेल्या पैशाने संपूर्ण कुटुंबाला—तसेच आईला देखील आरोग्यदायी अन्न पुरवले जाऊ शकते.
हे सर्व लाभ पाहून स्तनपान फायद्याचे असेल अशी अपेक्षा तुम्ही कराल. तरीसुद्धा, फिलिपाइन्समधील आरोग्य कार्यकर्ते, असा अहवाल देतात की, तेथे स्तनपानाचा “लोप पावण्याची अतिशय भीती” आहे. तसेच ब्राझीलमध्ये घेतलेल्या एका अभ्यासाने दाखवले की, श्वसनाच्या संसर्गामुळे दगावणाऱ्या बालकांशी संबंधित असलेले मुख्य कारण म्हणजे, “स्तनपानाचा अभाव” होय. तथापि, तुमचे मूल कदाचित तो प्राणघातक परिणाम चुकवू शकेल. तुमच्यासमोर निवड आहे.
तरीसुद्धा, बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या मातेच्या प्रयत्नांना कुटुंबातील इतर सदस्यांच्या अहितकारक वागणूकींमुळे बहुधा कमी लेखले जाते. नेपाळमधील एका मातेचे उदाहरण घ्या. ती आपल्या पतीसोबत आणि तीन वर्षांच्या मुलीसोबत एका कोंदट खोलीत राहते. पॅनस्कोप नियतकालिक असे लिहिते, ती छोटीशी खोली स्वयंपाकाच्या आणि तंबाखूच्या धुराने भरलेली असते. त्या लहान मुलीला श्वासाचा संसर्ग आहे. आई दु:खित होऊन म्हणते, “मी माझ्या पतीला धुम्रपान करण्यापासून थांबवू शकत नाही. आता, मी माझ्या पतीसाठी सिगारेट आणि माझ्या मुलीसाठी औषधे विकत घेते.”
दु:खाची गोष्ट अशी आहे की, विकसनशील देशांतील अधिकाधिक लोक धुम्रपानास सुरवात करून अत्यावश्यक मिळकत वाया घालवतात तसा तिचा पेचप्रसंग अतिशय सामान्य होत आहे. खरे म्हणजे, युरोप किंवा अमेरिकेमध्ये धुम्रपान करण्याचे सोडून देणाऱ्या प्रत्येकाच्या बदल्यात, लॅटिन अमेरिका किंवा आफ्रिकेमध्ये दोन लोक धुम्रपान करण्यास सुरवात करतात. रूकन वेलबेसकोड हे डच पुस्तक अशी टिपणी करते की, फसव्या जाहिराती या अधिक दोषपात्र आहेत. “वॉरसिटी: त्या उत्तम शुद्ध जाणीवेसाठी” आणि “गोल्ड लीफ: महत्त्वपूर्ण लोकांसाठी महत्त्वपूर्ण सिगारेटी” अशी घोषवाक्ये गरिबांची अशी खात्री पटवतात की, धुम्रपान प्रगती आणि संपन्नता यांच्याशी निगडित आहे. परंतु याच्या विरुद्धतेतील गोष्ट खरी आहे. त्यामुळे तुमचा पैसा खर्च होतो आणि तुमचे आरोग्य ढासळते.
याचा विचार करा. एखादी व्यक्ती एक सिगारेट ओढते त्या प्रत्येक वेळी तिच्या जीवनकाळातील दहा मिनिटे कमी होतात तसेच हृदयविकार आणि झटका, त्याचप्रमाणे फुफ्फुस, घसा व तोंडाचे कर्क आणि इतर रोगांचा धोका वाढतो. युएन क्रॉनिकल नियतकालिक म्हणते: “तंबाखू खाणे हे काही प्रमाणात अकाली मृत्यू आणि जगातील दुर्बलता यांचे टाळण्याजोगे सर्वात मोठे कारण आहे.” “टाळण्याजोगे कारण” असे ते म्हणते याकडे कृपया लक्ष द्या. तुम्ही शेवटली सिगारेट विझवू शकता.
अर्थात, तुमच्या आरोग्यावर प्रभाव पाडणाऱ्या इतर अनेक वागणूकीच्या निवडी आहेत. या लेखात पृष्ठ ११ वर जो चौकोन दिला आहे त्यामध्ये तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाच्या ग्रंथालयात वाचू शकाल असे काही साहित्य देण्यात आले आहे. हे खरे की, स्वतः माहिती करून घेण्यासाठी परिश्रम लागतात. तथापि, डब्ल्यूएचओचे एक अधिकारी म्हणतात: “आपल्या आरोग्याच्या परिस्थितीबद्दल माहिती आणि शिक्षण दिलेल्या ज्ञानी लोकांशिवाय आरोग्यपूर्ण समाज असू शकत नाही.” यास्तव, आरोग्यास हातभार लावणारे हे मोफत पाऊल उचला: सुशिक्षित व्हा.
आरोग्य आणि घरचे वातावरण
गरीब तरुण असतानाच मरतात (इंग्रजी) हे पुस्तक असे म्हणते, तुमच्या आरोग्यावर सर्वात अधिक प्रभाव पाडणारे वातावरण म्हणजे तुमचे घर आणि तुमचे शेजारी होय. पाण्यामुळे तुमचे वातावरण आरोग्याला धोकेदायक असेल. अपुरे आणि अशुद्ध पाण्यामुळे, संसर्ग, त्वचेचे रोग, अतिसार, पटकी, हागवण, विषमज्वर आणि इतर आजार होतात.
तुम्हाला हात धुण्यासाठी केवळ नळ चालू करावा लागतो, तर मग ज्या लोकांच्या घरात पाण्याचा पुरवठा नाही अशांना, पाणी आणण्यासाठी दररोज किती वेळ घालवावा लागतो याची तुम्हाला कल्पना करणे कठीण असेल. बहुधा, ५०० पेक्षा अधिक व्यक्ती एकाच नळाचा वापर करतात. त्याकरता थांबावे लागते. परंतु, कमी पगार असणारे लोक बरेच तास काम करतात आणि वर्धिष्णू शहरातील वातावरणाच्या समस्या (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते की, थांबल्याने “पगार कमवण्यात जो वेळ वापरला जाऊ शकतो तो खर्च होतो.” म्हणूनच, वेळ वाचवण्यासाठी सहा सदस्यांच्या कुटुंबाला दररोज लागणाऱ्या पाण्याच्या ३० बादल्यांपेक्षा कमी पाणी ते कुटुंब घरी नेते. पण मग, अन्न, भांडी, वस्त्रे धुण्यासाठी व वैयक्तिक स्वच्छतेसाठी खूपच कमी पाणी असते. यामुळे, ऊवा आणि माश्यांना आकर्षित करणाऱ्या दशा निर्माण होतात व त्यामुळे कुटुंबाच्या आरोग्याला धोका संभवतो.
या परिस्थितीचा विचार करा. दूर ठिकाणी तुमच्या कामाला जाण्यासाठी तुम्ही सायकलवर अवलंबून आहात, तर प्रत्येक आठवडी चेनला ऑईलिंग करणे, ब्रेक नीट करणे किंवा एखादा स्पोक बदलण्यात थोडा वेळ खर्च केल्याने तो वेळ वाया घालवल्यासारखा तुम्हाला वाटेल का? नाही, कारण तुम्हाला हे ठाऊक आहे की, सायकलची निगा राखण्याकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला आता काही तास मिळाले, तरी काही काळानंतर तुमची सायकल नादुरुस्त झाल्यावर तुम्हाला एक संपूर्ण कामाचा दिवस गमावावा लागेल. त्याचप्रमाणे, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेले पुरेसे पाणी न आणल्याने, प्रत्येक आठवडी तुमचा काही वेळ आणि थोडा पैसा वाचेल परंतु, नंतर व्यवस्थित निगा न घेतल्यामुळे तुमचे आरोग्य ढासळते तेव्हा बरेच दिवस व पैसा तुम्ही गमवाल.
पुरेसे पाणी भरणे हे काम सबंध कुटुंबाला मिळून करता येते. स्थानिक परंपरेनुसार आई आणि मुले पाणी भरणारे असले, तरी काळजी करणारा पिता स्वतः पाणी भरण्यासाठी आपल्या शक्तीचा वापर करण्यास नकार देणार नाही.
तथापि, पाणी घरात आणल्यावर दुसरी समस्या उद्भवते—त्याला स्वच्छ कसे ठेवावे. आरोग्य तज्ज्ञ असा सल्ला देतात: पिण्याचे पाणी व इतर गोष्टींसाठी वापरण्यात येणारे पाणी एकाच ठिकाणी साठवू नका. भांड्याला नेहमी घट्ट झाकणाने बंद करावे. पाणी काही वेळासाठी स्थिर ठेवावे जेणेकरून त्यातली घाण तळाला जाऊन साठेल. पाणी घेताना त्यात हात बुडवू नका, तर ओगराळ्याने ते घ्या. पाण्याच्या भांड्यांना नियमितरित्या विरंजक द्रावणाने स्वच्छ करा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यात विसळून काढा. आणि पावसाचे पाणी? ते तर स्वस्तात मस्त आहे (पाऊस पडला तरच!), तसेच पावसाच्या पाण्यासोबत कोणतीही घाण साठवणाऱ्या टाकीत मिसळली नाही व टाकीला कीटक, उंदीर किंवा इतर प्राण्यांपासून सुरक्षित ठेवल्यास ते स्वच्छ असू शकते.
पाणी शुद्ध आहे किंवा नाही याची शंका असल्यास, डब्ल्यूएचओ असे सुचवते की, सोडियम हायपोक्लोराईट किंवा कॅल्शियम हायपोक्लोराईट सारखा एखादा क्लोरीन सोडणारा पदार्थ त्यात मिसळा. ते परिणामकारी आहे आणि ते फारच स्वस्त आहे. उदाहरणार्थ, या पद्धतीसाठी, पेरूमध्ये सर्वसामान्य कुटुंबाला एका वर्षाकरता दोन डॉलर्सपेक्षा कमी खर्च येतो.
आरोग्य आणि आरोग्याची निगा
बहुतेकवेळा, आरोग्याची निगा राखण्याच्या दोनच पद्धती गरिबांना ठाऊक असतात: (१) उपलब्ध परंतु न पेलवणारे आणि (२) पेलवणारे परंतु उपलब्ध नसलेले. साओ पावलोच्या जवळजवळ ६,५०,००० झोपड्यांतल्या लोकांपैकी डॉना मारिया पहिल्या पद्धतीविषयी म्हणते: “आमच्याकरता चांगले आरोग्य, मोठमोठ्या दुकानांमध्ये ठेवलेल्या वस्तूंप्रमाणे आहे. आम्ही ते पाहू शकतो, परंतु ते प्राप्त करू शकत नाही.” (वनदार नियतकालिक) अर्थात, डॉना मारिया अशा शहरात राहते जेथील दवाखान्यात हार्ट-बायपास ऑपरेशन, ट्रान्सप्लांट, कॅट स्कॅन्स आणि इतर सुधारित औषधे उपलब्ध केली जातात. तथापि, या गोष्टींचा फायदा घेण्याची तिची ऐपत नाही.
न पेलवणारी आरोग्याची निगा मोठ्या दुकानांच्या बाजारातील महाग वस्तूप्रमाणे आहे, तर मग पेलवणारी आरोग्याची निगा कमी किंमतीच्या वस्तूप्रमाणे आहे जिला एकाच वेळी प्राप्त करण्यासाठी शेकडो गिऱ्हाईक झटत आहेत. दक्षिण अमेरिकन देशाच्या एका अलीकडील बातमी अहवालाने निरिक्षिले: ‘आजारी लोक डॉक्टरांना भेटण्यासाठी दोन दिवसांपासून रांगेत उभे आहेत. भरती करण्यासाठी जागा नाही. सार्वजनिक दवाखान्यांमध्ये पैसे, औषधे व अन्नाचा अभाव आहे. आरोग्याची निगा घेणारी व्यवस्था पीडित आहे.’
गरीबांकरता, अशा दुःखित आरोग्य निगेला सुधारण्यासाठी, डब्ल्यूएचओने हळूहळू आपले नियंत्रणाचे कार्य बदलून लोकांना रोगांच्या प्रतिबंधाबद्दल आणि नियंत्रणाबद्दल शिक्षित करून आरोग्याच्या वाढीस सुरवात केली आहे. पोषण, स्वच्छ पाणी व मूलभूत स्वच्छतेसारख्या मूळ आरोग्य निगेला हातभार लावणाऱ्या कार्यक्रमांमुळे, “जागतिक आरोग्यामध्ये अतिशय सुधारणा” झाली आहे असे युएन क्रॉनिकल (इंग्रजी) हे पुस्तक लिहिते. या कार्यक्रमांचा लाभ तुम्हाला होतो का? त्यातील एखाद्याचा लाभ झालाच असेल. कोणत्या? इपीआय (एक्सपांडेड प्रोग्रॅम ऑन इम्युनायझेशन).
इपीआयवरील एक अहवाल असे निरिक्षण करतो, “लशी देणाऱ्याने पोस्टमनची जागा घेतली आहे व तो घरी आणि खेडोपाडी भेट देणारा सर्वात सुपरिचित व्यक्ती ठरला आहे.” गेल्या शतकादरम्यान, ॲमेझॉनपासून हिमालयापर्यंत लशीकरण करण्यात आले होते आणि १९९० पर्यंत, जगातील ८० टक्के बालकांना सहा प्राणघातक रोगांविरुद्ध लशी टोचण्यात आल्या, असा अहवाल डब्ल्यूएचओने दिला.a दर वर्षी, इपीआय ३० लाखांपेक्षा अधिक मुलांचे प्राण वाचवत आहे. तसेच, अपंगत्व असलेल्या ४,५०,००० बालकांना आता चालता, पळता व खेळता येते. यास्तव, रोग टाळण्यासाठी पुष्कळ पाळक आपल्या मुलांना लशी टोचण्याचा व्यक्तिगत निर्णय घेतात.
काहीवेळा एखाद्या रोगाचा प्रतिबंध करता येत नाही, तरी तुम्ही त्यावर नियंत्रण घालू शकता. जगाचे आरोग्य (इंग्रजी) हे नियतकालिक सांगते, “अर्ध्यापेक्षा अधिक आरोग्याची निगा म्हणजे स्वतःची किंवा कुटुंब मिळून राखत असलेली निगा असते असा अंदाज केला आहे.” अशा स्वतःच्या निगेचा एक प्रकार म्हणजे, मीठ, साखर आणि स्वच्छ पाण्याचे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (पुपेक्षा) हे साधे व स्वस्त मिश्रण होय.
ओरल रिहायड्रेशन उपचार, तसेच पुपेक्षाचा उपयोग हा अतिसारामुळे होणाऱ्या निर्जलीकरणावर सर्वात परिणामकारी उपचार आहे असे पुष्कळ आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. विकसनशील देशांमध्ये, दर वर्षी अतिसाराच्या १.५ अरब प्रकरणांवर नियंत्रण घालण्यासाठी जगभरात याचा वापर केल्यास केवळ दहा सेंट्स किंमतीचे पुपेक्षा मीठाचे लहानसे पाकीट, प्रत्येक वर्षी अतिसाराच्या रोगांमुळे दगावणाऱ्या ३२ लाख मुलांचे प्राण वाचवू शकते.
तसे होऊ शकते, परंतु औषधांचा आवश्यक देखरेखा (इंग्रजी) हे डब्ल्यूएचओचे बातमीपत्र सांगते, काही राष्ट्रांमध्ये अतिसार थांबवण्याच्या औषधांचा वापर “पुपेक्षापेक्षा अजूनही अतिशय सामान्य आहे.” उदाहरणार्थ, काही विकसनशील राष्ट्रांमध्ये, अतिसारावर उपचार करण्यासाठी पुपेक्षापेक्षा औषधांचा वापर तीन पटीने अधिक केला जातो. ते बातमीपत्र निरिक्षण करते की, “औषधांचा हा अनावश्यक वापर अतिशय महाग आहे.” या कारणास्तव, गरीब कुटुंबांना आपले अन्नही विकावे लागत असेल. ते इशारा देते की, याशिवाय, अतिसार थांबवण्याच्या औषधांचे कोणतेही सिद्ध झालेले व्यावहारिक मूल्य नाही व काही तर घातकही आहेत. “डॉक्टरांनी अशा औषधांची शिफारस करू नये . . . व कुटुंबांनी ती विकत घेऊ नयेत.”
औषधे सुचवण्याऐवजी डब्ल्यूएचओ आता अतिसाराचा उपचार करण्यासाठी पुढील गोष्टी सादर करते. (१) बाळाला पेज किंवा चहा असे पेय देऊन निर्जलीकरणाला आळा घाला. (२) बाळ तरीही निर्जल झाले असल्यास, पाहणी करण्यास आरोग्य कार्यकर्त्याची भेट घ्या आणि पुपेक्षाने बाळावर उपचार करा. (३) अतिसारादरम्यान तसेच अतिसार झाल्यावर बाळाला सामान्यपणे खाऊ घाला. (४) बाळ फारच गंभीररित्या निर्जल झाले असल्यास, त्याला शिरेतून पुनर्जलीकरण करावे.b
तुम्हाला तयार पुपेक्षा मिळत नसल्यास, ही साधी पद्धत काळजीपूर्वक अनुसरा: मीठाने सपाट भरलेला एक छोटा चमचा, साखरेचे सपाट भरलेले आठ छोटे चमचे आणि एक लिटर (प्रत्येकी २०० मिलीलिटर प्रमाणाचे पाच कप भरून) पाणी यांचे मिश्रण करा. दर वेळी पातळ शौचाला झाल्यानंतर एक कप भरून ते द्यावे, लहान मुलांसाठी त्याचा अर्धा कप द्यावा. या विषयावरील अधिक माहितीसाठी पृष्ठ १० वरील चौकोन पाहा.
परंतु, चवथे कारण म्हणजे आपली जीवशास्त्रीय घडण याविषयी काय? त्यावर प्रभाव कसा पाडला जाऊ शकतो? पुढील लेख त्या प्रश्नाची चर्चा करतो.
[तळटीपा]
a घटसर्प, गोवर, पोलियो, धनुर्वात, क्षय आणि डांग्या खोकला हे ते सहा प्राणघातक रोग आहेत. डब्ल्यूचओ अशी शिफारस करते की, आता एडस्मुळे दगावणाऱ्या लोकांपेक्षा ज्या हेपटायटीस बीने त्याहूनही अधिक लोक दगावतात त्यास देखील रोगप्रतिबंधक कार्यक्रमांमध्ये समाविष्ट केले पाहिजे.
b बाळाच्या पोटाच्या कातडीला चिमटा घ्या. कातडीला सामान्य स्थितीत येण्यास दोनपेक्षा अधिक सेकंद लागले, तर बाळ फारच गंभीररित्या निर्जल झाले असेल.
[८, ९ पानांवरील चौकट]
आरोग्याची प्राथमिक निगा—ती कशी परिणामकारी ठरते?
या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी, सावध राहा! नियतकालिकाने दक्षिण अमेरिकेतील डब्ल्यूएचओचे प्रतिनिधी डॉ. मायकल ओ’कॅरल यांच्याशी बोलणी केली. काही उतारे पुढीलप्रमाणे आहेत.
‘आरोग्यासाठी वैद्यकीय उपचार असतो या कल्पनेवर आधारित आरोग्य–निगेची व्यवस्था आपल्याला वारशाने मिळाली आहे. आजारी पडल्यावर, तुम्ही डॉक्टरांकडे जाता. तुम्ही व्हिस्कीच्या दोन बाटल्या प्यायला ते जाऊ द्या. तुम्ही कधीही व्यायाम करत नाही तेही जाऊ द्या. डॉक्टरांना पाहून तुम्ही म्हणता: “डॉक्टर, मला बरे करा.” मग डॉक्टर तुमच्या तोंडात काही घालतात, तुमच्या हाताला काही टोचतात, शस्त्रक्रिया करून काहीतरी बाहेर काढतात किंवा आत बसवतात. तुम्ही पाहता तसे, येथे मी फारच उघडपणे बोललो आहे, केवळ तुम्हाला समजावे म्हणून, परंतु या प्रकारची वैद्यकीय पद्धत रूढ आहे. आपण अतिशय चुकीने समाजातील समस्यांना वैद्यकीय समस्यांचे रूप दिले आहे. आत्महत्या, कुपोषण आणि मादक औषधांचा दुरुपयोग वैद्यकीय समस्या बनल्या आहेत. परंतु त्या तशा नाहीत. त्या आरोग्य समस्या देखील नाहीत. त्या आरोग्य आणि वैद्यकीय परिणामांच्या सामाजिक समस्या आहेत.
‘मग, गेल्या २० वर्षांमध्ये लोक म्हणाले, “अहो, जरा विचार करू या. आपण चुकीच्या पद्धतीने सर्वकाही करत आहोत. आरोग्याबद्दलचा आपला दृष्टिकोन आपण पुन्हा सुधारला पाहिजे.” प्राथमिक-आरोग्य-निगा या पद्धतीच्या मुळाशी असलेली तत्त्वे विकसित झाली, जसे की:
‘दीर्घ काळात, एखाद्या रोगावर उपचार करण्याऐवजी त्यावर प्रतिबंध घालणे हे अधिक दयाळुपणाचे व बचतीचे आहे. उदाहरणार्थ, हृदयाची शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय बांधले जाते, परंतु तुम्ही त्याच्या कारणांबद्दल काहीच करत नाही या तत्त्वाच्या विरुद्धतेतील ती गोष्ट आहे. याचा अर्थ, रोग उद्भवल्यावर तुम्ही त्यावर उपचार करत नाही असा होत नाही. तुम्ही निश्चितच उपचार करता. रस्त्यावर एका खड्ड्यामुळे आठवड्याच्या प्रत्येक दिवशी अपघात होत असतील, तर जो बिचारा त्यात पडतो आणि पाय मोडून घेतो त्यावर तुम्ही उपचार करालच, परंतु सर्वात दयाळुपणाचे आणि बचतीचे कार्य म्हणजे: खड्डा बुजवणे होय.
‘दुसरे तत्त्व म्हणजे, तुमच्या आरोग्य साठ्याचा योग्यरितीने वापर करणे. घरीच हाताळता येणाऱ्या समस्येसाठी एखाद्याला दवाखान्यात पाठवणे किंवा दवाखान्यात दाखवण्याजोग्या समस्येसाठी एखाद्याला अगदी मोठ्या रुग्णालयात नेणे या तत्त्वाच्या ते विरुद्धतेत आहे. किंवा सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिलेली व्यक्ती लशी टोचू शकते तरीसुद्धा विद्यापीठात दहा वर्षांसाठी प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना दुसऱ्या ठिकाणी लशी टोचण्यासाठी पाठवणे. डॉक्टरांना ज्या गोष्टीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे ते काम करण्याची आवश्यकता पडते त्यावेळी ते उपलब्ध असले पाहिजेत. प्राथमिक आरोग्याची निगा आपल्याला हेच सांगते: लोकांना शिक्षण द्या, रोगांचा प्रतिबंध करा आणि तुमच्या आरोग्य साठ्याचा सुज्ञतेने उपयोग करा.’ (g95 4/8)
[१० पानांवरील चौकट]
पटकीसाठी आणखी एक पुपेक्षा
डब्ल्यूएचओ अशी शिफारस करते की, नमुनेदार ग्लुकोजच्या पुपेक्षाऐवजी भाताचा समावेश असलेले पुपेक्षा (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन) पटकीच्या रुग्णांचा उपचार करताना वापरावे. अभ्यास असे दाखवून देतात की, भाताचा समावेश असलेल्या पुपेक्षाने उपचार केलेल्या पटकीच्या रुग्णांना, नमुनेदार पुपेक्षा दिलेल्या पटकीच्या रुग्णांपेक्षा ३३ टक्के कमी वेळा शौचास जावे लागले व अल्प काळासाठी अतिसार झाला. भाताचा समावेश असलेले १ लिटरचे पुपेक्षा २० ग्रॅम साखरेच्या बदली ५०-८० ग्रॅम शिजलेल्या तांदळाची पूड मिसळून तयार केले जाते.—औषधांचा आवश्यक देखरेखा.
[११ पानांवरील चौकट]
अधिक वाचन . . .
वागणूक: “चांगले आरोग्य—तुम्ही त्यासाठी काय करू शकता?” (सावध राहा!, डिसेंबर ८, १९८९) “तंबाखू आणि तुमचे आरोग्य—यात खरोखर काही संबंध आहे का?” (सावध राहा!, जुलै ८, १९८९) “मुलांना जिवंत राहण्यात मदत करणे!” (सावध राहा!, सप्टेंबर २२, १९८८) “मद्य तुमच्या शरीराला काय करते”—सावध राहा!, मार्च ८, १९८०.
वातावरण: “स्वच्छतेचे आव्हान गाठणे” (सावध राहा!, सप्टेंबर २२, १९८८) “स्वच्छ राहा, निरोगी राहा!”—सावध राहा!, सप्टेंबर २२, १९७७.
आरोग्याची निगा: “जीवन वाचवण्याचे इतर उपाय” (सावध राहा!, सप्टेंबर २२, १९८८) “प्राण वाचवणारे क्षारयुक्त पेय!”—सावध राहा!, सप्टेंबर २२, १९८५.
[७ पानांवरील चित्र]
पाणी भरण्यासाठी थांबण्याची व परिश्रमाची आवश्यकता असते
[चित्राचे श्रेय]
Mark Peters/Sipa Press
[९ पानांवरील चित्र]
पुरेसे सुरक्षित पाणी—चांगल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक
[चित्राचे श्रेय]
Mark Peters/Sipa Press