सर्वांकरता उत्तम आरोग्य
वागणूक, वातावरण आणि आरोग्याची निगा यांच्याप्रमाणे जीवशास्त्रीय घडण हिचा देखील आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्या घडणीवर आनुवंशिकतेचा आणि कालांतराने आनुवंशिक कल असल्यामुळे निर्माण होणाऱ्या आजाराचा प्रभाव होतो.
“तुम्ही ज्या जीवशास्त्रीय घडणीत या जगात जन्म घेता त्यावरून सामान्यतः तुम्ही चांगले जगाल, दीर्घ काळ जगू शकाल किंवा जगाल की नाही हे ठरवले जाते,” असे एक आरोग्य तज्ज्ञ म्हणतात.
आपण कोणत्याही प्रकारे ते मिळवले असले, तरी डोकेदुखी, ताठलेले स्नायु, दुर्बल चेता, ठिसूळ झालेली हाडे, निकामी होणारी हृदये आणि इतर आजार दररोज आपणास आठवण करून देतात की, दुर्बल शरीर आणि मन आपल्या आरोग्याला नुकसान पोहंचवत आहेत. या व्यापक आरोग्य समस्यांचे मूळ कारण काय आहे?
मूळ कारण
सा. यु. पहिल्या शतकातील लूक नामक वैद्यकीय डॉक्टर या प्रश्नाचे उत्तर, त्याने येशू ख्रिस्तावर लिहिलेल्या प्रेरित जीवनचरित्रामध्ये देतो. लूक लिहितो, एके दिवशी एका पक्षघाती मनुष्याला येशूजवळ बरे करण्याच्या आशेने आणले जाते. येशूने पक्षघाती मनुष्याला म्हटले: “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” त्यानंतर, पापांची क्षमा करण्याची शक्ती आपल्याजवळ खरोखर आहे, हे दाखवण्यासाठी, येशू त्या मनुष्याला आज्ञा करतो: “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा.” तो मनुष्य गेला! परिणामतः, ज्यांनी त्याला बरे करताना पाहिले, “ते सर्व अगदी थक्क झाले” आणि “ते देवाचा महिमा वर्णू लागले.”—लूक ५:१७-२६.
येशूने कोणत्या पापाचा उल्लेख केला? ते उत्तर, आपण आजारी का पडतो, वृद्ध का होतो आणि का मरतो हे समजण्यास मदत करते. ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आहे’ याची खात्री असल्याने, आपण याच्या उत्तरासाठी बायबलकडे वळू शकतो. (२ तीमथ्य ३:१६; २ पेत्र १:२१) पहिला पुरुष, आदाम परिपूर्ण, आरोग्यपूर्ण असा निर्मिला गेला होता असे ते आपल्याला सांगते. जोवर तो आपल्या निर्माणकर्त्याच्या आज्ञेत होता तोवर त्याचे उत्तम आरोग्य होते.
तथापि, आदामाने देवाचा नियम मोडण्याचे निवडले. अवज्ञाकारी बनून व आपल्या निर्माणकर्त्याविरुद्ध हेतुपुरस्सर बंड करून तो पाप करत होता. परिणामस्वरूप, तो अपरिपूर्ण झाला, आजारास भेद्य बनला आणि कालांतराने मरण पावला. यास्तव, पाप आदामाच्या आजार आणि मृत्यूचे कारण होते.
आनुवंशिकतेच्या नियमांनुसार काही आजारांची लागण पालकांपासून मुलांना होते, त्याचप्रमाणे अपरिपूर्णता आणि परिणामी आजाराची लागण आदामाकडून त्याच्या संततीला म्हणजे मानवजातीला झाली. अशाप्रकारे, सर्व रोग आदामाच्या मूळ पापाचा परिणाम आहेत. (उत्पत्ती २:१७; ३:१-१९; रोमकर ५:१२) यातून निभावण्याचा उपाय आहे का?
निभावण्याचा उपाय
परिपूर्ण आरोग्यापासून ढासळत्या आरोग्यातील बदल पापामुळे—देवाच्या नियमाविरुद्ध आदामाच्या बंडाळीमुळे घडला. ढासळत्या आरोग्यातून परिपूर्ण आरोग्यातील बदल केवळ पाप काढून टाकल्यानेच शक्य आहे. (रोमकर ५:१८, १९) कसे? परिपूर्ण आदामाशी अगदी जुळणाऱ्या आणखी एका परिपूर्ण मनुष्याला खंडणी म्हणून आपल्या जीवनाचे बलिदान द्यावे लागणार होते. “जिवाबद्दल जीव,” म्हणजेच प्राणाबद्दल प्राण असा देवाचा नियम आहे.—अनुवाद १९:२१.
तथापि, आदामाच्या पापी वंशजांपैकी कोणीही ती खंडणी देऊ शकत नव्हता. अशाप्रकारे, यहोवाने स्वतः प्रेमळपणे आपला पुत्र, येशू याला परिपूर्ण मानव या नात्याने त्याचे जीवन “पुष्कळांच्या खंडणीसाठी” दिले जेणेकरून “त्याच्या द्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे.”—मत्तय २०:२८; १ योहान ४:९; स्तोत्र ४९:७.
पृथ्वीवर असताना, येशूने पक्षघाती मनुष्याला “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे” असे सांगितले आणि तो बरा झालेला मनुष्य घरी चालत गेला तेव्हा हे दाखवून दिले की, त्याचा पिता यहोवा, याने त्याला पापे काढण्याची शक्ती दिली होती. वेळोवेळी, आंधळे, बहिरे तसेच अनेक आजार असणाऱ्या इतरांना तत्काळ बरे करून येशूने देवाकडून प्राप्त झालेली ही शक्ती वापरली.
येशूच्या या चमत्कारिकपणे बरे करण्याच्या कृत्यांविषयी बायबल सांगते, “मग लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले; त्यांच्याबरोबर लंगडे, व्यंग, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळ जण होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायाशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले. मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात हे पाहून लोकसमुदायाने आश्चर्य केले.” (मत्तय १५:३०, ३१) त्याहूनही उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, येशू मृत लोकांना पुन्हा जिवंत करू शकला. बायबल अशा अनेक पुनरुत्थानांविषयी सांगते.—लूक ७:११-१६; ८:४९-५६; योहान ११:१४, ३८-४४.
चमत्कारिकरित्या बरे करण्याची ही कृत्ये आपली खात्री पटवून देतात की, येशू बरा करू शकत नाही असा कोणताही रोग नाही. देवाने प्रदान केलेल्या या शक्तीचा वापर तो पुन्हा करील का? आपल्याला त्याचा लाभ होईल का?
परिपूर्ण आरोग्य निश्चित आहे
बायबलच्या भविष्यवाण्या दाखवून देतात की, येशू देवाच्या स्वर्गीय सरकारचा राजा या नात्याने स्वर्गात आधीच राज्य करत आहे. आता अस्तित्वात असणारी सर्व मानवी सरकारे काढून टाकण्याचा व सबंध पृथ्वीवर राज्य करण्याचा अधिकार देवाने त्याला दिला आहे. (स्तोत्र ११०:१, २; दानीएल २:४४) येशूने आपल्या अनुयायांना शिकवलेली “तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो,” ही प्रार्थना पूर्ण होईल. (मत्तय ६:१०) त्या स्वर्गीय राज्याच्या अधिपत्यामध्ये, पृथ्वीसाठी मानवी कुटुंबाच्या आरोग्याच्या परिस्थितीत नाट्यमयरितीने सुधार करावा हा देवाच्या इच्छेचा काही भाग असेल.
मग, शब्दशः तसेच आध्यात्मिक अर्थाने, “अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.” “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवाशी म्हणणार नाही.”—यशया ३३:२४; ३५:५, ६.
देवाच्या स्वर्गीय राज्यात, परिपूर्ण आरोग्याचा अर्थ, आपण आता मरतो त्याप्रमाणे कोणीही मरणार नाही असा होतो. देवाचे वचन असे अभिवचन देते: “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो . . . त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त [होईल].” “देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.” (योहान ३:१६; रोमकर ६:२३) होय, बऱ्याच काळाआधी प्रेरित स्तोत्राने अभिवचन दिले: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) पृथ्वीवर असताना येशूने केले त्याचप्रमाणे तो त्यावेळी मृतांना पुनरुत्थित करील आणि त्यांना परिपूर्ण आरोग्याचा लाभ घेण्याची संधी देईल. बायबल अभिवचन देते: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.”—प्रेषितांची कृत्ये २४:१५.
पृथ्वी राज्याच्या अधिपत्याखाली उत्कर्ष पावेल जेणेकरून ढासळत्या आरोग्याला हातभार लावणारी भूक कधीच अस्तित्वात राहणार नाही. बायबलच्या भविष्यवाण्या आपल्याला सांगतात: “मळ्यातील झाडे फलद्रुप होतील, भूमि आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील.” (यहेज्केल ३४:२७) “भूमीने आपला उपज दिला आहे; देव, आमचा देव, आम्हाला आशीर्वाद देवो.” (स्तोत्र ६७:६) “भूमीत भरपूर पीक येवो.” (स्तोत्र ७२:१६) “अरण्य व रुक्ष भूमि ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल.”—यशया ३५:१.
देवाच्या नवीन जगातील परिस्थितीबद्दल सारांशात सांगून, बायबलचे शेवटले भविष्यसूचक पुस्तक म्हणते: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.
‘यावर विश्वास ठेवणे कठीण आहे,’ असे तुम्ही म्हणता का? मग, याचा विचार करा. पापी बनण्याआधी आदामाला परिपूर्ण आरोग्य होते. एके दिवशी पृथ्वीमध्ये दुःखणे, आजार आणि वृद्ध होणारे लोक असतील असे कोणी त्याच्याशी बोलू शकले याची कल्पना करा. आदामाला त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण वाटले असावे असे तुम्हाला वाटत नाही का? तरीसुद्धा, ही आता वास्तविकता आहे.
याच्या उलट, देवाच्या राज्यात परिपूर्ण आरोग्य ही वास्तविकता बनेल. यहोवाचे वचन आपल्याला याची खात्री देते: “ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.” (प्रकटीकरण २१:५) जे घडणार असे देव सांगतो ते घडेलच कारण, “खोटे बोलणे देवाला अशक्य आहे.”—इब्रीयांस ६:१८.
या प्राप्त होणाऱ्या आशीर्वादांचा उपभोग तुम्ही घेऊ शकाल अशी खात्री मिळवण्यासाठी तुम्ही आता काय करू शकता? परिपूर्ण आरोग्य व चिरकालिक जीवनाकडे जाण्याचा मार्ग, येशूने आपल्या पित्याजवळ प्रार्थनेत जे म्हटले त्यावरून स्पष्ट केला होता: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.
यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्या घरी मोफत बायबल अभ्यास देण्यासाठी सांगा. देवाच्या अद्भुत अभिवचनांबद्दल अधिक शिकण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी त्यांना आनंद वाटेल. परिपूर्ण आरोग्याकडे जाणाऱ्या मार्गावरील हे सर्वात पहिले पाऊल असेल! (g95 4/8)
[१४ पानांवरील चित्र]
देवाच्या नवीन जगात, सर्व मानव परिपूर्ण आरोग्याचा आनंद लुटतील