जगाची आरोग्य स्थिती—वाढती तफावत
ब्राझीलमध्ये सावध राहा! याच्या बातमीदाराकडून
सोमालियात १९७७ मध्ये अली माओ मॉलीनला देवी रोगाची जडण झाली तेव्हा त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले तसेच त्याचे नाव ठळक बातम्यांमध्येही छापण्यात आले. त्यावर उपचार करून त्यास बरे करण्यात आल्यावर, डब्ल्यूएचओने (जागतिक आरोग्य संघटना) १९८० मध्ये घोषित केले की, देवीला—तिने शतकांपासून लाखो लोकांना नष्ट केल्यावर—पृथ्वीवरून नाहीसे करण्यात आले होते. अली हा जगातील शेवटला बळी असल्याचे सांगण्यात आले.
सन १९९२ मध्ये, डब्ल्यूएचओने आरोग्य निगेच्या इतर लाभांचा अहवाल दिला: १९८० च्या दशकात विकसनशील जगात अधिक लोकांना सुरक्षित पिण्याचे पाणी आणि आरोग्यासंबंधीच्या सोयी प्राप्त होऊ लागल्या. त्याशिवाय, कमीतकमी विकसनशील राष्ट्रांमधील अधिक टक्के लोकसंख्येला स्थानिक आरोग्य सेवा लाभली. परिणामस्वरूप, गत दशकात काही ठिकाणी मुलांच्या मृत्यूचे प्रमाण घटले.
भीतीजनक वास्तविकता
तथापि, हे लाभ नुकसानांनी झाकलेले व भीतीदायक धोक्यांनी ग्रासलेले आहेत. काही भीतीजनक वास्तविकतांचा विचार करा.
एचआयव्ही/एडस्—जगभरात १,७०,००,००० पेक्षा अधिक लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे, तो एडस्साठी कारणीभूत असणारा विषाणू आहे. अलीकडील वर्षात सुमारे ३०,००,००० म्हणजेच प्रती दिवशी सुमारे ८,००० लोकांना त्याची लागण झाली. दहा लाखापेक्षा अधिक मुलांना एचआयव्हीची लागण झाली आहे. एडस्मुळे घडणाऱ्या मुलांच्या मृत्यूचे प्रमाण लवकरच अलीकडील दशकांमध्ये मुलांना वाचवण्यासाठी जी प्रगती केली असेल तिच्यावर विरजण पाडेल. तसेच पुष्कळ जागी, जसे आशियामध्ये, या रोगाचे आता सुरवातीच्या स्फोटक अवस्थेत रुपांतर होत आहे. एडस् आणि विकास (इंग्रजी) असे म्हणते की, एचआयव्हीचे ८० टक्क्यांपेक्षा अधिक बळी विकसनशील राष्ट्रांमध्ये राहतात.
क्षय (टीबी)—गेल्या दोन दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्लक्षिलेला असला तरी, क्षय आता पुन्हा एकदा जगाला झपाटत आहे. त्यामुळे दर वर्षी सुमारे ३० लाख लोक मारले जातात व यासाठी तो संसर्गजन्य रोगांपैकी जगातील सर्वात प्रथम प्राणघातक रोग ठरला आहे. त्या सर्वांपैकी ९८ टक्क्यांपेक्षा अधिक मृत्यू विकसनशील राष्ट्रांमध्ये घडले. शिवाय, एचआयव्ही व क्षयाचे विषाणू यांचा प्राणघातक मिलाप होत आहे आणि त्याचे विध्वंसकारी परिणाम होत आहेत व यामुळे आधीच वाईट असलेली स्थिती आता बिकट होत आहे. असे अपेक्षिले जाते की, सन २,००० पर्यंत, दर वर्षी एचआयव्हीने संसर्गित झालेल्या दहा लाख व्यक्ती क्षयाने मरण पावतील.
कर्करोग—कर्करोगाचे रुग्ण विकसित राष्ट्रांपेक्षा विकसनशील राष्ट्रांमध्ये अधिक आहेत.
हृदय विकार—डब्ल्यूएचओचे डॉ. इवॉन डॉरफस असा इशारा देतात, “आपण हृदय विकाराच्या जागतिक महासंकटाच्या समीप आलो आहोत.” हृदय विकार आता केवळ औद्योगीकरण झालेल्या राष्ट्रांची पीडा नाही. उदाहरणार्थ, लॅटिन अमेरिकेमध्ये, दोन ते तीन पटीने अधिक लोक संसर्गजन्य रोगांपेक्षा हृदय विकाराने मरतील. काही वर्षांमध्ये, वाहिनीक्लथन आणि झटके हे विकसनशील राष्ट्रांमध्ये मृत्यूसाठी प्रामुख्याने कारणीभूत असतील.
उष्ण कटिबंधातील रोग—डब्ल्यूएचओ इशारा देते: “उष्ण कटिबंधातील रोग जणू अनियंत्रितपणे भरभराटीस लागले आहेत, पटकी अमेरिकेतही पसरत आहे . . . , पीत-ज्वर आणि गुडघेमोडी तापाच्या साथीचे रोग अधिक लोकांना जडत आहेत आणि मलेरियाची स्थिती खालावत चालली आहे.” टाईम नियतकालिक म्हणते: “जगाच्या गरीब राष्ट्रांमध्ये, संसर्गजन्य रोगाविरुद्धचा लढा अनर्थच आहे.” दर वर्षी केवळ मलेरियामुळे सुमारे २० लाख लोक मरत आहेत—काही ४० वर्षांआधीच त्याचे निर्मूलन केल्याचे वाटत असल्यानंतरची ही दशा आहे.
अतिसाराचे रोग—विकसनशील राष्ट्रांमध्ये लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण धक्कादायक आहे. संसर्ग किंवा कुपोषणामुळे जवळजवळ ४०,००० मुले प्रत्येक दिवशी मरण पावतात; केवळ अतिसाराच्या रोगांमुळे प्रत्येक आठ सेकंदाला एक मूल मरते.
आरोग्य आणि गरिबी—यांचा संबंध
आरोग्याच्या स्थितीवरून काय दिसून येते? “विकसनशील राष्ट्रांना दुहेरी समस्येचा सामना करावा लागत आहे,” असे एक आरोग्य तज्ज्ञ म्हणतात. “आधुनिक चिरकालीन व्याधींचा तसेच अद्यापही अस्तित्वात असणाऱ्या उष्ण कटिबंधातील रोगांचा त्यांना तडाखा बसत आहे.” त्याचा परिणाम? सन २००० पर्यंत सर्वांचे आरोग्य मिळवणे (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते, चिंतेत टाकणारी “भौगोलिक तफावत” नजरेस आली आहे. अशाप्रकारे, आफ्रिकेच्या आणि आशियाच्या सुमारे ४० राष्ट्रांमध्ये आरोग्याची निगा “उर्वरित जगाच्या बरोबरीची नाही.” आरोग्यातील अंतर भले मोठे आहे—आणि ते वाढतच आहे.
या वाढत्या तफावतीची अनेक कारणे असली, तरी जगाचे आरोग्य (इंग्रजी) हे नियतकालिक म्हणते की, “गरिबी” ढासळत्या आरोग्याचे एक मुख्य कारण आहे. (पडताळा नीतीसूत्रे १०:१५.) बहुधा गरिबीमुळे लोकांना पुरेसा निवारा मिळत नाही. स्वच्छतेचा अभाव, सुरक्षित आणि पुरेशा पाण्याची टंचाई आणि गजबजलेल्या, दाटीवाटीच्या राहणीमानाच्या परिस्थिती तिचे वैशिष्ट्य आहेत. या तीन गोष्टी केवळ आरोग्यासाठी अडथळाच नव्हे तर प्रत्यक्षात रोगांच्या वाढीला हातभार लावतात. त्यामध्ये, आजाराविरुद्ध शरीराच्या प्रतिकारक शक्तींना दुर्बळ करणाऱ्या कुपोषणाची भर टाका आणि मग वाळवी लाकडासाठी हानीकारक असते त्याप्रमाणे गरिबी आरोग्यासाठी हानीकारक का आहे हे तुम्हाला दिसून येईल.
प्राणघातक रोग परिसराला दूषित करतात, शरीरांना निर्बल करतात आणि मुलांचे प्राण घेतात तेव्हा गरीबांचे हाल होतात. काही उदाहरणांची नोंद घ्या. दक्षिण आफ्रिकेच्या गरीब विभागांमधील, क्षयाचे प्रमाण त्याच राष्ट्रातील अधिक मिळकतीच्या भागांमध्ये आढळते त्यापेक्षा शंभर पटीने जास्त आहे. ब्राझीलच्या गरीब भागांमध्ये, सीमेवरील श्रीमंत राष्ट्रांपेक्षा सहा पटीने अधिक लोक न्यूमोनिया आणि इंफ्लूएन्झाने मरत आहेत. तसेच भारतातील दरिद्री कुटुंबातील मरण पावणाऱ्या मुलांची संख्या भारताच्या सर्वात श्रीमंत कुटंबांमधील मुलांच्या मरण्याच्या संख्येपेक्षा दहा पटीने जास्त आहे. ही दुःखदायक वास्तविकता उघड आहे: ‘गरिबी तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे!’
जगाच्या एक अरबपेक्षा जास्त झोपडपट्टीच्या लोकांचा आशाभंग झाला आहे यात काहीच नवल नाही. गरिबीची मूलगामी कारणे त्यांच्या नियंत्रणापलीकडे आहेत आणि त्याचे रोगिष्ट परिणाम त्यांच्या जीवनांवर वर्चस्व गाजवून आहेत. तुम्ही गरिबीच्या दुष्परिणामांचा अनुभव घेत असाल, तर आरोग्याच्या तफावतीच्या कष्टी बाजूला आशाहीन स्थितीत अडकल्यासारखे तुम्हालाही वाटत असेल. तथापि, तुम्ही गरीब असला किंवा नसला, तरी तुमचे आणि तुमच्या मुलांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता. ती पावले कोणती आहेत? पुढील लेख काही सूचना देतो. (g95 4/8)