जीवन वाचविणारे एक खारट पेय!
सेईरा लिओन येथील “अवेक!” वार्ताहाराकडून
संध्याकाळ होत आली तेव्हा दोन वर्षे वयाच्या जिनिबा हिने माझं पोट दुखतय अशी आईला तक्रार केली. पण तिची आई मरीआम्मा हिने इतकं लक्ष दिलं नाही. जिनिबाला अशा “कळा” पूर्वी येऊन गेल्या होत्या. परत आता तोच प्रकार होता.
पण तो अतिसार चालूच राहिला—वाढणारा, अगदी पातळ पाण्यासारखा, संयम न धरता येणारा. मग उलट्या सुरु झाल्या. जिनिबा गलितगात्र होऊ लागली. मरीअम्मानं मुलीला आपल्या गुडघ्यावर उलटं निजविलं व तिची पाठ चोळून काढली. पण तितका उपयोग झाला नाही.
सकाळ होत आली त्यावेळी जिनिबा जमिनीवर शिणलेल्या स्थितीत पडली—धापा टाकीत, अशक्त आणि हृदयाची धडधड होत. तिचं डोकं बेचैनीनं इकडून तिकडं होत होतं, तिचे सुंदर घारे डोळे खोल गेले होते व अर्धवट बंद झाले होते, तिच्या गालाचे खळगे झाले होते आणि तिचं तोंड कोरडं पडलं होतं. तिची ही दशा बघून मरीअम्माच्या काळजाचं पाणी झालं.
सूर्योदय झाला त्यावेळी आक्रंदन ऐकू आलं. होय, बिचारी जिनिबा आता वारली होती.
मुलांना व तान्ह्या बाळांना कोणत्या रोगाला अधिकपणे बळी व्हावे लागते बरे? तुम्ही माना वा मानू नका, पण ती आहे शुष्कता—अतिसाराकरवी होणारी शुष्कता वा जलहीनता.a दर वर्षी पाच वर्षाखालील पन्नास लाख बालके यामुळे दगावतात—म्हणजे दर सहा सेकंदाला एक. विकसनशील देशात हा रोग पाच वर्षाआधीच्या दर २० बालकामागे एकाचा बळी घेतो. आर्थिकदृष्ट्या विकसित झालेल्या देशात शस्त्रक्रियेचा प्रकार सोडला तर मुलांना इस्पितळात का दाखल करण्यात येते त्याचे प्रमुख कारण हे आहे की हा अतिसार, श्वासोच्व्छासाविषयक रोगात केवळ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तथापि, यापैकीचा बहुतेक त्रास व मृत्यु नुसत्या साध्या खारट पेयाने दूर करता येऊ शकतात हे उपरोधिक वाटण्यासारखे आहे.
पण, ते कसे काय? पहिली गोष्ट ही की, अतिसार माणसाला ठार करत नाही. तो तर कोणत्याही इलाजाविना दूर होतो. पण, येथे समस्या ही असते की ज्या माणसाला अतिसार असतो तो आपल्या शरीरातून द्रव आणि क्षार गमावत असतो—तो जलहीन किंवा शुष्क होत जातो. जादा द्रव गमावले गेले व त्याची भरपाई झाली नाही तर मृत्यु संभवतो.
विकसनशील जगात दरवर्षी ५० कोटी बालकांना अतिसार जडतो. गरीब देशात साधारण मुलाला वर्षातून तीन-चारदा तो होतो. तरीपण हा रोग तसे पाहता सौम्य त्रासाने सुरु होतो. पण कधीकधी तो पटकीप्रमाणेच काही तासातच शुष्कता वा जलहीनता निर्माण करतो व मृत्यु आणतो. या रोगाची लक्षणे दिसतात तेव्हाच हा प्राणघातक ठरेल वा नाही त्याचे निदान करता येत नाही हे खेदाचे आहे. याकरताच, पालकांनी या शुष्कतेविषयी वा जलहीनतेबद्दल जाणून घेतले पाहिजे इतकेच नव्हे तर तिला अटकाव घालण्यासाठी आणि ती काढून टाकण्यासाठी कोणती पावले त्वरेने घ्यावीत हे ओळखले पाहिजे.—पृष्ठे २९ व ३० वरील तक्ते पहा.
गमाविलेला द्रव—कसा भरून काढला जातो?
गळणाऱ्या बादलीतील पाण्याची कमी होणारी पातळी परत आणण्यासाठी आपण त्यात पाणी घालत राहतो. हेच अतिसार लागलेल्या मुलाच्या बाबतीत आहे—त्याच्या शरीरातील द्रवाची भरपाई झाली पाहिजे. यालाच पुनः जलसंयोग होणे म्हणतात.
अलिकडील वर्षापर्यंत ही कृति एक खारट रसायन शिरेत थेटपणे (इन्ट्रावेनस थेरपी) घालण्याकरवी आचरली जाई. ही पध्दत परिणामकारक होती व आताही जलहीनता निर्माण झालेल्या मुलांच्या बाबतीत उत्तम आहे तरी ती काही समस्या निर्माण करते. एकतर ती खर्चिक आहे, व या उपचारासाठी कुशल व्यक्ती व मिश्रण बरोबर करुन देणारी साधने आवश्यक आहेत जी केवळ आरोग्य केंद्रे वा इस्पितळात मिळू शकतात. या गोष्टी कधीकधी आजारी मुलाला लवकर मिळू शकत नाहीत. या कारणास्तव इन्ट्रावेनस थेरपी ही बहुतेक गरजूंना आपल्या आवाक्याबाहेरची ठरते.
तथापि, खासपणे १९६०च्या काळापासून एक अशी चिकित्सा उपलब्ध झाली आहे जी त्या इन्ट्रावेनस पध्दतीपेक्षा सुरक्षित, साधी आणि स्वस्त अशी आहे. तिला ओरल रिहायड्रेशन थेरपी किंवा ओ आर टी असे म्हणतात. इन्ट्रावेनस इलाजाप्रमाणेच ओ आर टी सुध्दा द्रव आणि क्षार यांची भरपाई करुन देते. पण हा द्रवपदार्थ शिरेत सुईने भरविण्याऐवजी तो मुलाला पिता येतो.
पण मग, ही चिकित्सा आधी का गवसली गेली नाही बरे? ती गेली होती. पण अडचण ही होती की अतिसार हा शरीरातील द्रवच गाळतो असे नाही तर इतर पातळ द्रव आतड्यांना शोषून घेण्यास मज्जाव करतो. याकरताच द्रवाचे प्राशन पुरेसे नव्हते—यापैकीचे बहुतेक शरीरामार्फत थेटपणे जात होते.
पण मग, एकदा योगायोगाने एक नवे संशोधन उदयास आले. तोंडाने द्रव प्राशन करण्याच्या चिकित्सेविषयीचे शास्त्रज्ञांचे संशोधन जारी असता त्यांनी हे द्रव पिण्यास मधूर वाटावे म्हणून त्यात साखर मिसळली. यामुळे हे दिसले की आता शरीर नुसतीच साखर शोषून घेत नाही तर त्याबरोबर जीवनप्रदायक क्षार व पाणीही शोषून घेत आहे! अशाप्रकारे साखर ही त्या द्रवाच्या समस्येविषयीचा तोडगा ठरली. योग्य प्रमाणाचे द्रव दिले गेले तेव्हा साखर ही शोषकता २५ पटीने वाढविते असे दिसून आले!
मोठे अभुतपूर्व वाटते ना? लान्सेट या आघाडीच्या ब्रिटीश वैद्यकीय मासिकाने या संशोधनाची प्रशंसा, “या शतकातील संभाव्य अशी अत्यंत महत्वपूर्ण वैद्यकीय प्रगति” या शब्दात केली. तसेच युनिसेफ (युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड) या संघटनेने याला “विज्ञानशास्त्राची इतिहासातील अत्यंत साधी पण अगदी महत्वपूर्ण वाटचाल” असे म्हटले!
हे असे का? कारण आता पालकांना आपल्या मुलांना घरीच इलाज करता येत होता! याकरता कोणत्या खास साधनांची गरज नव्हती की काही प्रशिक्षणाची आवश्यकता नव्हती. शिवाय याला खर्चही तसा पाहता नाही. खाण्याच्या या रिहायड्रेशन क्षाराची काही कंपन्यांनी निर्मिती करुन त्याला बाजारात विक्रीसाठीही आणले त्यामुळे किफायतशीर दरात हे क्षार उपलब्ध होऊ शकते. याचप्रमाणे ते विविध आरोग्य योजना व संस्था यांजकरवी विस्तारीतपणे मिळते. पालकाला एवढेच करावे लागते की हे क्षारयुक्त औषध पाण्यात मिसळून मुलाला प्यावयास देणे.
पण ही तयार अशी क्षारयुक्त औषधे उपलब्ध नाहीत तर काय? पालक स्वतःच आपल्या घरी असणाऱ्या सामानाकरवी हे द्रव बनवू शकतात. घरी बनवलेले हे औषध बाजारात उपलब्ध असणाऱ्या औषधाइतके प्रभावी व विविध स्वरुपाचे नसले तरी ते तसे चांगले बनते. प्रगत तंत्रज्ञानाने बनविलेल्या डिहायड्रेशन क्षाराविषयीच्या मौल्याबद्दल काही वैद्य जरी प्रश्नार्थक असले तरी बहुतेक म्हणतात की घरी बनवलेली ही पेये, अतिसाराचे लक्षण दिसताच घेतल्यावर महत्वपूर्ण भूमिका बजावतात.
तरी मुले का मरतात
जरी ओ आर टी कार्य करते व कार्यक्षम आहे तरी ते जगातील लोकांप्रत आणण्यात अद्याप आव्हान असे राहिले आहे. कितपत प्रगती साधण्यात आली? इस्पितळात ओ आर टीची जागा इन्ट्रावेनस चिकित्सा झपाट्याने घेत असल्याचे दिसून आले आहे. १९८३च्या उत्तरार्धापर्यंत ३० पेक्षा अधिक विकसित राष्ट्रांनी ओ आर टी कार्यक्रम आपल्या हाती घेतला आणि निदान २० देशांनी तरी स्वतःचेच ओरल रिहायड्रेशन क्षार निर्मिण्याला सुरुवात केली. कित्येक आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था ओ आर टी हा शब्द प्रचारात आणण्याच्या मोठ्या खटपटीत आहेत. एकंदरीत परिणामही सरळ स्वरुपाने दिसत आहेत. जगभरात केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळले की जेथे या चिकित्सेची शिफारस झाली तेथे शुष्कता वा जलहीनता यामुळे घडणाऱ्या मृत्युत ५० ते ६० टक्के कपात झाली! तरीपण, दर वर्षी अर्ध्या महापद्म मुलांना अतिसाराची लागण होत असता प्रत्येकासाठी क्षाराची आधीच पाकिटे तयार करुन ठेवण्याचे काम खरेच प्रचंड आहे.b
पण मग पालकांना आपल्या घरीच हे औषध तयार करता येणार नाही का? तसे पाहता, मीठ, साखर व त्यांचे प्रमाण सर्वत्र सापडू शकत नाहीत हे खेदाचे आहे. पण जेथे हे आहे तेथे रिहायड्रेशन पेय बनविण्यासाठी योग्य तालीमदेखील जरुरीची आहे. कारण, समजा की, हे औषध तयार करताना जादा साखर मिसळली गेली तर शोषकता कमी होईल आणि अतिसार वाढेल. याचप्रमाणे खूप मीठ देखील घातक ठरु शकते. याचप्रमाणे औषधाचे प्रमाण यातही फरक घडू शकतो. अधिक प्रमाण अतिसारास अधिक काळ राहू देण्यास प्रवर्तित करु शकतो तर फारच कमी प्रमाण शुष्कता चालू ठेवते.
याखेरीज लोकांचे मन बदलण्याचीही मोठी समस्या आहे. ओ आर टीचा प्रयोग करुन पाहण्यास काहीतर नकोच म्हणतात. काही मातांना तर असेच वाटते की अतिसारावर उत्तम औषध म्हणजे मुलांचे अन्नपाणी बंद करणे. इतर काही स्थानिक वैदूंचा सल्ला घेण्याचे पत्करतात—आणि भयंकर परिणाम मिळवतात.
तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की ओ आर टी ही नुसती एक चिकित्सा आहे. ती अतिसाराला थांबवू वा दूर करू शकत नाही. अतिसार हा मुळातूनच काढून टाकायचा आहे तर मग पाणी, आरोग्यवर्धन आणि आरोग्य याविषयी जगाला ज्या ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे त्या काढून टाकणे होय.c उपासमारसुध्दा काढली गेली पाहिजे कारण उपासमार अतिसार आणते आणि अतिसार उपासमार करते हे घातक चक्र आहे.
ख्रिस्तीजनांना, अर्थातच हे ठाऊक आहे की शेवटचा उपाय म्हणजे देवाचे राज्य होय. ते उपासमार, रोग आणि मृत्युलाही पूर्णतयः काढून टाकील. (प्रकटीकरण २१:४; स्तोत्र. ७२:१६) दरम्यानच्या काळात, लाखो मुलांचा बळी घेणाऱ्या या हत्याऱ्याविरुध्द सामना देण्याचे साधे पण अधिक प्रभावकारी शस्त्र म्हणजेचः ओरल रिहायड्रेशन थेरपी. (g85 9/22)
[तळटीपा]
a अतिसाराचे २५ वेगवेगळे परजीवीकण, जंतु, अत्यंत सूक्ष्म जंतु आढळले आहेत. हे तसेच इतर गोष्टींमुळे अतिसाराचा प्रकार ठरविणे कठीण जाते. तरीपण सर्वसाधारणपणे आपल्याला त्याचे वर्णन, दिवसातून तीनपेक्षा अधिक वेळा द्रवमय किंवा पातळ पाण्यासारखी परसाकड होणे असे देता येईल.
b दरवर्षीचे उत्पादन हे साधारण ८ कोटी पिशव्या इतके आहे.
c शौचालयातून बाहेर आल्यावर तसेच जेवणाआधी साबणाने हात धुतल्यास अतिसाराचा संसर्ग ५० टक्के कमी करता येतो हे अभ्यासाने दाखविले आहे.
[पानांवरील चौकट]
“या शतकातील संभाव्य अशी अत्यंत महत्वपूर्ण वैद्यकीय प्रगति”—लान्सेट
“विज्ञानशास्त्राची इतिहासातील अत्यंत साधी पण अगदी महत्वपूर्ण वाटचाल”—युनिसेफ
[पानांवरील चौकट]
अतिसार संभवतो त्यावेळी मुलांवर करण्याजोग्या उपचारांची मार्गदर्शिका
अन्न भरविण्याचे थांबवू नका: पातळ पदार्थ दिले जाऊ शकतात. चहा, भाताचे पाणी, बार्लीचे पाणी आणि सूप देणे चांगले. पिण्याचे पाणी उपलब्ध असू द्या. अंगावर पिणाऱ्या बालकास दूध चालू ठेवा. मुलगा जेवू शकतो तर त्यास जेवण देणे बरे. तरीपण त्याचे प्रमाण कमी व नियमित असावे. सहज पचन होणारे व शक्तीवर्धक अन्न, जसे की, शिजविलेले अन्न आणि केळी या गोष्टी चांगल्या आहेत.
सुरुवातीपासून तोंडाने पिण्याचे रिहायड्रेशन पेय द्या: यामुळे वाया गेलेल्या द्रवाची भरपाई होते आणि शुष्कता वा जलहीनतेस प्रतिबंध होतो. जेथे शक्य आहे तेथे अगोदरच तयार केलेले व बाजारात उपलब्ध असणारे रिहायड्रेशन क्षार वापरा. जर ते उपलब्ध नसेल तर पुढील प्रकाराने ते तयार करा (मिश्रणाची अचूकता महत्वपूर्ण आहे)
खावयाचे मीठ: एक चमचाभर सपाट
साखर: आठ चमचे सपाट
पाणीः एक लिटर (२०० मिली. चे ५ कप पूर्ण)
केवढे द्यावे: जितके द्रव वाया गेले आहे तेवढ्याच प्रमाणापर्यंत दिले जावे. साधारणपणे दर पातळ अतिसारामागे एक कपभर रिहायड्रेशन पेय द्यावे. मुलांसाठी याचे प्रमाण अर्धे करावे. (लहान बाळांना चमचाने भरवावे.) मुलाला आवडते तितके त्याला पिऊ द्या!
रिहायड्रेशन पेय देण्याचे केव्हा थांबवावे: अतिसार थांबतो तेव्हा लगेच किंवा या रिहायड्रेशन पेयाची तृष्णा थांबते.
वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी:
शुष्कता वा जलहीनतेची चिन्हे दिसतात तेव्हा
माणसाला पेय प्राशन करता येत नाही तेव्हा
कोणतीही सुधारणा न दिसता अतिसार चार दिवस चालू राहतो (किंवा बाळांच्या बाबतीत एक दिवसानंतर या अतिसाराची तीव्रता कमी झाली नाही तर)
जेव्हा सारख्या उलट्या होतात.
[पानांवरील चौकट]
शुष्कता वा जलहीनतेची वाढलेली लक्षणे
लघवी थोडी किंवा काहीच नाही
वजन जलदीने कमी होणे
तोंडाला कोरड पडणे
बाळाचे मऊ अवयव खालावणे
डोळे खोल जाणे
नाडीचे ठोके जोराने, कमी प्रमाणात
त्वचेची लवचिकता कमी होणे
दोन बोटांनी कातडी उचलता येते. ही कातडी आपल्या नेहमीच्या स्थितीत येत नाही तर मुलामध्ये शुष्कता वा जलहीनता आहे
संदर्भः व्हेअर देअर इज नो डॉक्टर, डी वॉर्नरद्वारा, लंडन, १९८१, पृष्ठ १५९.